दिवाळी अंक २०२२ - वळसा - The Detour

पर्णिका's picture
पर्णिका in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 9:36 am

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */

.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}

.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}

.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}

@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}

.field-items img{max-width:100%;height:auto;}.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}

'माधोपूर २१० कि.मी. ’ हा फलक वाचताच मीरा वैतागलीच. घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे आधीच काही तास वाहतूक खोळंबा झाला होता. नंतर दुसऱ्याच कुठल्यातरी आतील मार्गाने ती लांबलचक वाहनांची रांग वळवण्यात आली आणि अतिशय मंद गतीने सरकत सरकत अखेर ती पुन्हा हायवेला लागली होती. या सर्व प्रकारांत संध्याकाळ व्हायला आलेली… नेहमीप्रमाणे प्रवास झाला असता, तर एव्हाना ती तिच्या घरी पोहोचलीदेखील असती. घराच्या आठवणीने नाही म्हटले तरी तिला थोडं भरून आलेच. आज सकाळी का कुणास आपल्या घरी जावे असे तिला वाटले आणि थोडीफार आवाराआवरी करून ती निघालीदेखील होती. त्या गडबडीत आपण घरी येतोय, हे आई-बाबाला सांगितलेले नाही हे आठवून तिला जरा हायसे वाटले. दोघेही उगाच काळजी करत बसले असते.
“काय ठरवलंयस तू? काही दिवस घरी येतेस का? बरं वाटेल तुला.” फोनवर तिचा बाबा काही दिवसांपूर्वी तिला म्हणाला होता. नियोजित मार्गाने वाटचाल करताना काही अनपेक्षित अडचणी, वळणे आल्यावर पुढचा प्रवास पूर्ण बदलूनच जातो, मीरा विचार करू लागली. आयुष्याचेही काहीसे तसेच नाही का? आईबाबांच्या उबदार घरट्यांत गेलेले सुरक्षित बालपण, शाळा-कॉलेजमधील धमाल, मन लावून केलेला अभ्यास, नामांकित विद्यापीठात मिळालेला प्रवेश, शैक्षणिक यश, अत्यंत नावाजलेल्या फायनान्शिअल फर्मध्ये मिळालेली पहिली नोकरी, अमेयशी भेट-प्रेम-लग्न आणि घटस्फोट असा तिचा जीवनप्रवास सहजच तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.

“..आणि म्हणूनच मी आणि अमेयने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.” व्हिडिओ कॉलवर तासभर तरी मीरा तिच्या बाबाशी बोलत होती.
“छकुली, तुम्ही दोघेही सुजाण आहात, पूर्ण विचारांतीच घेतलेला हा निर्णय आहे, हे मी समजू शकतो. काल अमेयशीही माझे बोलणे झाले. त्याच्या आई-वडिलांचेही हेच म्हणणे आहे. एकच सांगतो, आयुष्यात अडचणी, दुःख कुणाच्या वाटेला येत नाहीत? मात्र योग्य जोडीदार असला की त्यांना सामोरे जायला बळ तर मिळतेच, तसेच ते अवघड क्षणही पुढे सुखद आठवणी होतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी आणि आईने तुला नेहेमीच पाठिंबा दिला आहे, यापुढेही नक्कीच देऊ. पण घाई-गडबडीत निर्णय घेऊ नका.” बाबा तिला समजावत होता. असाच तर होता तिचा बाबा! सुखाच्या क्षणीही संतुलित आणि वाईट-दुःखी प्रसंगातही शांतपणे पुढे काय करता येईल एवढाच विचार करणारा! ‘आपणही आपल्या बाबासारखेच आहोत, प्रत्येक गोष्ट अथवा परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकतो.’ हा तिचा स्वतःवरील विश्वास मागील काही आठवड्यांत मात्र कुठेतरी डळमळीत झाला होता. अखेर, काही आठवड्यांची सुट्टी घेऊन आई-बाबाकडे जावे असे तिने ठरवले. अर्थात तिच्या कार्यालयीन कामांत ती निपुण, हुशार होतीच, त्यांमुळे “Just take your time and be back where you started.” असे म्हणत तिच्या मॅनेजरने - आदित्यनेही तिची रजा लगेचच मंजूर केली होती.

अचानक मागच्या गाडीने दिलेल्या हॉर्नच्या आवाजाने ती भानावर आली. सकाळपासून सलग चार-पाच तास ड्रायव्हिंग केल्याने आपण प्रचंड थकलो आहोत, हे तिला जाणवले. पोटानेही भुकेची जाणीव करून दिली. तेव्हा वाटेत कुठेतरी थांबून गाडीची आणि आपलीही थोडी पोटपूजा करावी, असे तिने ठरवले. काही अंतर जाताच रतनगामचे विविध फलक दिसू लागले अन मीरा तिच्याही तिच्याही नकळत प्रसन्न हसली. गेले कित्येक महिने अनुभवत असलेली घुसमट, मनात चालू असलेले द्वंद्व आणि त्यामुळे आलेली मरगळ यांचा काही क्षणांसाठी तिला विसर पडला. माधोपूर या मुख्य शहरापासून काही तासांच्याच अंतरावर असलेले निसर्गरम्य आणि नितांतसुंदर रतनगाम - तिच्या लहानपणी असंख्य वेळा ती इथे आली होती. कधी आई-बाबांबरोबर, कधी शाळेच्या सहलीबरोबर, तर कॉलेजमध्ये असताना मित्र-मैत्रीणींसोबत! मीराने हायवे सोडला अन कार रतनगामकडे वळवली. शेवटचे कधी बरे आलो होतो आपण रतनगामला? ती विचार करू लागली. ८-१० वर्षे तर सहजच झाली असतील. गेल्या काही वर्षांत व्यग्रतेमुळे माधोपूरला, घरीसुद्धा १-२ दिवसांचीच धावती भेट असायची. मग कसे जमणार? नावाप्रमाणेच निळेशार असलेल्या नीलम लेकवर वसलेले हे हिरवेगार छोटेसे गाव फारसे बदललेले दिसत नाही, याचे तिला हायसे वाटले. आठवड्याचा मध्य अन त्यातही सुट्ट्यांचा सिझन नसल्याने बऱ्यापैकी शांतता जाणवत होती. सहजच तिने कारच्या खिडकीची काच खाली केली अन नीलम लेकवरून आलेल्या वाऱ्याच्या मंद झुळकीने ती सुखावली. जास्त शोधाशोध न करता एका छोट्याशा फूड जॉइंटसमोर तिने आपली कार पार्क केली.

वॉशरूमध्ये जाऊन जरा फ्रेश होऊन ती बाहेरील टेबलावर जाऊन बसली. काही क्षणांतच एक थोडासा वयस्कर मनुष्य तिची खाण्याची ऑर्डर घेण्यासाठी आला. प्रसन्न हसत त्याने तिला अभिवादन केले.
“Good evening ma'am! It's a very beautiful day today!” मीरानेही हसून त्याला प्रतिसाद दिला आणि एक व्हेज सँडविच, कॉफीची ऑर्डर दिली. पाण्याचा जग आणि पेल्याचा ट्रे ठेवून तो निघून गेला. तहानलेल्या मीराने पटकन तो पेला उचलला आणि ती घटाघट पाणी पिऊ लागली. पाणी पिताच तिला जरा तरतरी आली. ऑर्डर येईपर्यंत ती सहजच आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करू लागली. आज फारशी गर्दी नव्हती. अगदीच दोन-चार टेबलांवर काही लोक होते. या छोट्याशा रेस्तराँचे लोकेशन मात्र फारच सुंदर होते. समोरच दिसणारा भव्य नीलम लेक, आजूबाजूला पसरलेली घनदाट झाडी आणि दूरवर दिसणारे काही सुंदर बंगले - नजर जाईल तिथे निसर्गाचे अत्यंत मोहक रूप मनाला सुखावत होते. रेस्तराँसुद्धा अतिशय स्वच्छ होते. बसण्यासाठी साध्याच पण आरामशीर टेबल-खुर्च्या, अत्यंत अदबशीर सर्व्हिस आणि अगदी घरगुती मेन्यू यांमुळे हे नक्कीच लोकप्रिय असावे, असा तिने अंदाज केला. मघाशी तो तिची ऑर्डर घेणारा कदाचित या रेस्तराँचा मालक असावा. तिच्या बाबाच्याच वयाचा असावा, सर्व टेबलावर जाऊन सगळ्यांची अत्यंत आपुलकीच्या स्वरांत चौकशी करत होता. त्यांना काही हवे-नको ते अगदी तत्परतेने पाहत होता.

“नमस्ते मॅडम, एक व्हेज सँडविच आणि कॉफी!” वेटरच्या बोलण्याने तिची विचारशृंखला तुटली. सुरेख रंगसंगती, नाजूक डिझाइन असलेल्या प्लेटमध्ये गरमागरम सँडविच आणि तितक्याच सुंदर कपामध्ये जायफळाचा सुंदर स्वाद असलेली वाफाळती कॉफी पाहून मीराला पुन्हा एकदा भुकेची जाणीव झाली. करकरीत भाज्यांचे ते खमंग-क्रिस्पी सँडविच, त्याबरोबर असलेला चटणीसदृश चटकदार सॉस आणि ताजेताजे बटाट्याचे काप… सर्व पदार्थच अप्रतिम स्वादिष्ट होते. आज कितीतरी दिवसांनी ती मनापासून जेवत होती. काही क्षणांतच तिने ते चविष्ट सँडविच संपवले. कॉफीचा घुटका घेत, अजून एखादे ऑर्डर करावे का? असा ती विचार करत होती, तोवर तेच प्रेमळ गृहस्थ पुन्हा तिच्या टेबलाजवळ आले.

“कसे होते आपले सँडविच?सर्व ठीक ना?” असे त्याचे ते आपुलकीचे बोलणे ऐकून मीराला तिचा बाबाच आठवला.
“सर्वच उत्तम होते. पदार्थ, प्लेट्स, कप आणि हा व्ह्यूदेखील!” मीराने मनापासून दाद दिली.
“आणखी तासाभरात संध्याकाळचे जेवण तयार होईल. तुम्ही आज इथेच रतनगाममध्ये राहणार असाल, तर रात्रीचे जेवण इथेच घेऊ शकता.” तो अगत्याने बोलत होता.
आपण फारच भुकेजलेलो असल्याने अगदीच अधाशासारखे खात होतो की काय? या विचाराने मीरा जरा ओशाळलीच. पण ते गृहस्थ मात्र अत्यंत आत्मीयतेने बोलत आहेत, हे तिच्या लक्षात आले.
“नक्कीच! आवडेल मला इथे पुन्हा यायला.” ती हसत म्हणाली, “तुमच्या रेस्तराँचा मेन्यू छानच आहे. नवीनच सुरू केले आहे काय? पूर्वी बघितल्याचे आठवत नाही.”
“हो मॅडम, चारच वर्षांपूर्वी सुरू केले. माझ्या पत्नीचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मेन्यू, पदार्थांच्या रेसिपीज, कटलरी, फर्निचर सर्व काही तिच्याच पसंतीचे आहे.” ते समाधानाने बोलले.
“मस्तच… मी माझ्या आई-बाबाला, मित्र-मैत्रीणींना नक्कीच रेकमंड करेन.” बिल पे करून त्यांचा निरोप घेऊन मीरा कारकडे निघाली.

संध्याकाळचे मस्त वारे सुटले होते. बऱ्याच वेळाने पोटात गरम गरम अन्न गेल्याने तिला एखादी डुलकी घ्यावी, असे वाटू लागले. इथे आल्यापासून आजूबाजूचा आकर्षक निसर्ग तिला खुणावू लागला होताच, काय हरकत आहे? आजची रात्र इथल्याच एखाद्या हॉटेलमध्ये राहू, अन उद्या सकाळी घरी जाऊ, असे तिने ठरवले. फारसे पर्यटक नसल्याने तिच्या आवडत्या हॉटेलमध्ये तिला रूमही लगेचच मिळाली. आई-बाबाबरोबर कधीही ती रतनगामला आली, तर ते नेहमी याच हॉटेलमध्ये रहायचे.
“A bit busy today, will call you tomorrow… ” रूममध्ये गेल्या गेल्या तिने बाबाला एक टेक्स्ट मेसेज केला. पटकन शॉवर घेऊन, तिच्या आईच्या भाषेत सांगायचे तर कावळ्याची अंघोळ करून ती बेडवर आरामात बसली अन कधी तिला डुलकी लागली, हे तिचे तिलाही कळले नाही. जाग आल्यावर क्षणभर तिला आपण कोठे आहे हे कळलेच नाही. घड्याळात बघितले, तर सात वाजत आले होते. थोडेफार आवरून ती हॉटेलच्याच बागेत येऊन बसली. काही जागा या खास आठवणींमुळे मनांत कायम घर करून असतात. तिच्यासाठी हे हॉटेल किंबुहना रतनगाम त्यापैकीच एक होते. उंच डोंगरावरून दूरपर्यंत दिसणारा शांत नीलम लेक पाहत मीरा एका बाकावर बसली होती. इतकी आश्वासक शांतता तिने कित्येक दिवसांत अनुभवली नव्हती. ती आणि अमेय कितीही सामंजस्याने, विचारपूर्वक वेगळे झाले असले, तरी दोघांचेही आयुष्य ढवळून निघाले होतेच की! आणि हा बदल, हा निर्णय प्रयत्नपूर्वक स्वीकारल्यावरदेखील “आता पुढे काय?” हा इतरांकडून वारंवार येणारा प्रश्न तिलाही छळत होताच ना? आई-बाबाचा भक्कम आधार, उत्तम नोकरी, आर्थिक सुरक्षितता, तरुण वय असे कितीतरी सकारात्मक घटक असतानाही गेले काही दिवस तिच्याही नकळत ती निराशेच्या गर्तेत जात होती. कामातही तिचे लक्ष लागत नव्हते, मित्र-मैत्रीणींना भेटावेसे वाटत नव्हते. इतकेच नव्हे, तर ती आई-बाबाशीही बोलणे टाळत होती. अर्थात आई-बाबा, मित्र-मैत्रीणी आणि अगदी ऑफिसमधील सहकारीही सर्वांनीच तिच्या निर्णयाचा आदर केला होता, तिची प्रायव्हसी जपली होती. तिला हवे असेल तर परदेशातील शाखेमध्ये ती बदली करून घेऊ शकते, हेदेखील आदित्यने सुचवले होते. मीरा मात्र अजून काही ठाम निर्णयाप्रत आली नव्हती. आपण पुन्हा तोच तोच विचार करतोय, हे तिला जाणवले अन ती झटकन उठली. रात्रीच्या जेवणासाठी जवळपास काही नवीन पर्याय आहे का हे फोनवर बघू लागली. पण सर्वत्र नेहमीचेच मेन्यू बघून शेवटी तिने पुन्हा त्याच रेस्तराँमध्ये जाण्याचे ठरवले.

या वेळी, या रेस्तराँमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. एका तरुण, उत्साही वेटरने तिचे स्वागत केले. मेन्यूकार्ड न बघता तिने लगेचच ऑर्डर दिल्याने त्याला जरा आश्चर्यच वाटले. मघाशी भेटलेले ते मालक मात्र कुठे दिसत नव्हते. काही मिनिटांतच तिचे कम्फर्ट फूड - गरम गरम डाळ-भात खिचडी, तिखट लसणीचे तेल, घट्ट सायीचे दही, भाजलेला कुरकुरीत पापड, ताजे लोणचे तिच्या टेबलावर होते. ते सात्त्विक, रुचकर जेवण मीरा मोठ्या चवीने खाऊ लागली. त्या मधुर दह्याचा शेवटचा घास ती खातच होती, तेवढ्यात त्याच वेटरने तिच्यासमोर अननस शिऱ्याची मूद असलेला बोल आणून ठेवला.

“ हे हॅलो, मी डेझर्ट ऑर्डर नव्हते केले.” मीरा किंचित मोठ्या आवाजात म्हणाली.
“माहित आहे मला, मॅडम! पण आज आमच्या रेस्तराँतर्फे कॉम्प्लिमेंटरी आहे. आमच्या बाईसांचा आज वाढदिवस आहे ना, म्हणून!” तो हसत म्हणाला आणि चटकन दुसऱ्या टेबलाकडे निघूनही गेला.
“हो का? माझ्या शुभेच्छा सांग त्यांना..” हे शब्द मीराच्या ओठांतच अडखळले.

सत्यनारायणाच्या प्रसादासारखा मऊ, लुसलुशीत, किंचित पिवळसर दिसणारा तो साजूक तुपातला शिरा, त्यावर लावलेले अननसाचे छोटे काप अन सुबक, नाजूक नक्षीकामाचा तो बोल, त्याला साजेसा छोटा चांदीचा चमचा.. सारेच कसे मोहक दिसत होते. न राहवून तिने चमच्याने थोडासा शिरा खाल्ला. जिभेवर अक्षरश: विरघळणारा, सौम्य चवीचा तो प्रसादासम शिरा खाताच मीराला नकळत तिची आजी आठवली. आपले डोळे भरून येत आहेत, हे तिला जाणवले.
“सर्व ठीक ना? आणखी काही हवे आहे का?” पुन्हा तोच आपुलकीचा प्रेमळ स्वर कानी आला. ते वयस्कर गृहस्थ, त्या रेस्तराँचे मालक मीराला विचारत होते.
महत्प्रयत्नाने ते अश्रू आवरून तिने नुसतीच मान डोलावली. तिला अभिवादन करून ते निघूनही गेले.

आजीच्या आठवणींत रमत तिने तो शिरा हळूहळू संपवला. अशा छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद आपण कित्येक महिन्यांत घेतला नाही, हे पुन्हा एकदा तिला जाणवले.
“अरेच्चा! आपण त्या गृहस्थांना त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत.” मीराच्या लक्षांत येताच ती स्वतःवरच वैतागली. लगेचच, काउंटरवर जाऊन बिल पे करु या, म्हणजे शुभेच्छाही देता येतील असे मनाशी ठरवत ती उठली.

“फार मस्त रेस्तराँ आहे तुमचे, जेवणही उत्तम होते. आणि कॉम्प्लिमेंटरी डेझर्टसाठी धन्यवाद! मी रेस्तराँच्या मालकांना भेटू शकते का? मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या.” तिने काउंटरवरील वेटरला विचारले.
“अं… ते जरा किचनमध्ये बिझी आहेत. थोडा वेळ थांबू शकाल का?” बरीच गर्दी असल्याने तोही जरा घाईतच होता.
“काही हरकत नाही. तुम्हीच माझ्या शुभेच्छा त्यांना सांगाल का?” मीरा म्हणाली. बिल पे करताना आवर्जून मोठी टिप द्यायला ती विसरली नाही.

त्या रात्री हॉटेलवर परतताना मीराला फारच हलके वाटत होते, तिच्या मनावर असलेला शिणवटा कुठल्या कुठे पळून गेला होता. दिवसभरात तर काहीही विशेष घडले नव्हते की मग हा सभोवतालच्या निसर्गाचा परिणाम? तिचे तिलाच फार आश्चर्य वाटत होते. त्या रात्री कित्येक महिन्यांनंतर मीराला शांत झोप लागली. सकाळी लवकर जाग आल्यावर तर तिला फारच प्रफुल्लित वाटत होते. मीराने रूमच्या खिडकीबाहेर पहिले, सूर्योदय अजून झाला नव्हता. ती तशीही तिच्या बाबासारखीच ‘मॉर्निंग पर्सन’ होती. रात्री कितीही उशिरा झोपी गेली तरी तिला कायम पहाटेच जाग यायची. फारसा विचार न करता पटकन फ्रेश होऊन सूर्योदय पाहायला ती ‘सनराइज पॉईंट’कडे निघालीदेखील. सूर्योदयाच्या या प्रसन्न सोहळ्याची तिच्या बाबाने अशाच एका ट्रीपमध्ये तिला प्रथम ओळख करून दिली होती. त्यामुळे यापूर्वी रतनगामला जितके वेळा ती आली होती, तिने तिथला सूर्योदय कधीच चुकवला नव्हता. कार पार्क करून निसर्गाचा आनंद घेत ती उंच कड्याच्या दिशेने चालू लागली. झुंजूमुंजू व्हायला आले होते, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट कानी येत होता. सकाळची मंद झुळूक, त्यांमुळे हळुवारपणे डोलणाऱ्या वृक्षवेली जणू सूर्यनारायणाच्या आगमनाची वार्ताच देत होते. उगाच दोन-चार कार्स आणि हाताच्या बोटांवर मोजता येणारी माणसे यांमुळे वातावरणात अजून शांतता होती. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर तर मीरा निःस्तब्धपणे निसर्गाचे ते अतिमनोहर रूप पाहू लागली. अथांग, भव्य निळाशार नीलम लेक, त्यावर क्वचित कुठे उमटणारे तरंग, पिवळ्या-केशरी रंगाच्या असंख्य छटा असलेले आकाश आणि त्याचे त्या निळ्या जलाशयात दिसणारे तितकेच आकर्षक प्रतिबिंब, अन सभोवताली हिरवागर्द शालू ल्यालेली वसुंधरा… ते दृश्य, तो क्षण न क्षण ती मनांत साठवू लागली. किती तरी वेळ ती नुसतीच शांतपणे ते अनुभवत राहिली.

“कितीही मोठी रात्र असू दे, सूर्योदय हा होतोच आणि तो आपल्या आयुष्यांत सोनेरी पर्वाची संधी घेऊन येत असतो. आपल्याला फक्त ते उमगले पाहिजे.” त्याच ठिकाणी असाच एक सूर्योदय बघताना तिचा बाबा तिला म्हणाला होता. आता बाबा इथे पाहिजे होता, मीराला उगाचच वाटून गेले.
तिने सहज मागे वळून पाहिले, अन ती विलक्षण आनंदलीच… एका बाकावर कालच्या रेस्तराँचे मालक शांतपणे बसले होते. तिच्याही नकळत ती तिथे धावत गेली.
“व्हेरी गुड मॉर्निंग! ओळखलं का?” ती उत्साही स्वरांत म्हणाली.
“अरे तुम्ही? … सुप्रभात!” ते थोडे आश्चर्याने उत्तरले.
“हो, इथे आले की मी कधीच सूर्योदय चुकवित नाही. माझ्या बाबाची ही आवड माझ्यातही आली आहे.” ती पटकन बोलून गेली.
“मीही इथे रोज येण्याचा प्रयत्न करतोच. माझ्या पत्नीमुळे मला ही सवय लागली.” ते नेहमीच्याच प्रेमळ स्वरांत म्हणाले.
“अरे हो, काल त्यांचा वाढदिवस होता ना ? माझ्यातर्फे वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! मी काल निघताना तुमची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही गडबडीत होता.” ती बाकावर त्यांच्या शेजारी बसत म्हणाली.
“धन्यवाद! हो, काल उशिरा अचानक एक ग्रूप ऑर्डर आल्याने थोडी तारांबळ उडाली होती. बाय द वे, मी अविनाश देसाई.” त्यांनी आपली ओळख करून दिली.
“मी मीरा पंडित. मूळची माधोपूरची, पण सध्या उदयनगरला असते.” तिने हसून त्यांना प्रतिसाद दिला. “तुमच्या पत्नी नाही दिसत? आल्या नाहीत का आज?” मीरा अभावितपणे बोलून गेली. आपण फारच आगाऊपणा केला आहे हे लगेच तिच्या लक्षात आले.
क्षणभरच त्यांचा चेहरा दुःखी झाला असे तिला वाटले… पण लगेचच त्यांनी स्वतःला सावरले. मीराला काय बोलावे, काय करावे हे कळेना… तोच अविनाश समोरच्या नीलम लेककडे पाहत बोलू लागले.

"मीही पूर्वी उदयनगरलाच जॉब करत होतो. माझी पत्नी इथलीच… हे रेस्तराँ जिथे उभारले आहे, तिथेच तिच्या आईवडिलांचे घर होते. फूलझाडांची आवड असलेली, अतिशय सुगरण अशी माझी आसावरी! आम्हाला मूलबाळ नाही, याचे तिला अतिशय वाईट वाटायचे. पण आपल्या दुःखावर फुंकर मारून दुसऱ्यांच्या जीवनात आनंद कसा फुलवयाचा हे तिला पुरते ठाऊक होते. हळूहळू तिने अनाथाश्रमातल्या मुलांना सकस अन्न पुरवण्याचा उपक्रम सुरू केला. यासाठी आम्ही सुरुवातीला स्वतःचा पैसा वापरला. उदयनगर मोठे शहर असल्याने तिथे अशा लहान मुलांच्या बऱ्याच संस्था होत्या. मग आम्ही अनेक दानशूर लोकांकडून आणि विविध समाजोपयोगी संस्थांकडून मदत घेतली. आसावरीने विशेष मेहनत घेऊन त्या मुलांना कायम सकस, सुग्रास अन्न मिळेल अशी योजना यशस्वीपणे राबवली. त्याबरोबरच त्या अनाथ मुलांच्या अंगभूत गुणांचा विकास व्हावा, यासाठीही प्रयत्न केले. मीरा, तू काल रेस्तराँमधील प्लेट्स, बोल्स यांचे जे कौतुक केलेस, ते याच मुलांनी बनवले होते."
मीरा थक्क होऊन ऐकत होती.

बाटलीतील थोडेसे पाणी पिऊन अविनाश काही काळ गप्प राहिले. थोड्या कातर स्वरांत पुन्हा म्हणाले, "काही वर्षांपूर्वी, आसावरीच्या मोठ्या आजाराचे निदान झाल्यावर तिच्या इच्छेनुसार आम्ही इथे रतनगामला रहायला आलो. तेव्हाही, तिने मोठ्या आग्रहाने मला हे रेस्तराँ सुरु करायला लावले. त्यासाठी मेन्यू, फर्निचर, जेवायची-सर्व्ह करायची भांडी, आतील किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू ते हर्ब्ज गार्डन, भाजीपाला-किराणा कोणाकडून घ्यायचा अशा अनेक गोष्टींचे तिने सुयोग्य नियोजन केले. मेन्यू कार्डावरील सर्व पदार्थांच्या पाककृती, विशेष टिप्स यांची तिने व्यवस्थित टिपणे करून ठेवली. इतुकेच नव्हे, तर वर्षांतील काही विशिष्ट दिवशी आम्ही आमचे रेस्तराँ इतरांसाठी बंद ठेवून खास अनाथालयातील मुलांना मेजवानी देतो. काल तिचा वाढदिवस होता, म्हणून खरे तर काल आम्ही आमचे रेस्तराँ बंद ठेवणार होतो. पण काल वाहतूकीचा काहीतरी गोंधळ झाल्याने ते येऊ शकत नाही, असा अनाथालयातील संचालकांचा मला फोन आला होता. त्यामुळे मी मग रेस्तराँ नेहेमीप्रमाणेच सुरू ठेवले."

“तुमच्या पत्नीच्या वाढदिवसाचे ते खास जेवण परमेश्वराने माझ्या नशिबात लिहिले होते.” मीरा हसत म्हणाली. “मी आज निघणार आहे. पण जाण्यापूर्वी मला त्यांना भेटायची फार इच्छा आहे. मी भेटू शकेन का त्यांना?”
पुन्हा एकदा विषण्णता अविनाशच्या चेहऱ्यावर पसरली. त्यांचे डोळे, स्वर आर्द्र झाला.
“दोन वर्षांपूर्वीच या जीवघेण्या आजाराशी तिची झुंज अयशस्वी ठरली, मीरा! माझी आसावरी मला सोडून गेली.”
मीरासाठी हा धक्का अनपेक्षित होता, नकळत तिचेही डोळे अश्रूंनी भरून आले आणि अचानक ती हमसून हमसून रडू लागली. तिला असे रडताना पाहून अविनाश थोडे गोंधळून गेले, तिची काळजीही वाटू लागली. मोठ्या ममतेने त्यांनी तिला थोपटले, बॅगेतून दुसरी पाण्याची बाटली काढली आणि तिला थोडे पाणी पिण्यास दिले. तोपर्यंत मीराही थोडी शांत झाली होती. तिला जरा ओशाळल्यासारखेच वाटत होते.

“मला माफ करा. इतके दिवस मी माझेच दुःख कुरवाळत बसले होते. माझ्याच कोशांत मी स्वतःला इतके कोंडून घेतले होते की जगण्याकडे जवळ जवळ पाठ फिरवली होती. आज त्या फुग्याला टाचणी लागल्यासारखे वाटले, आणि आतील सर्व वेदना बाहेर पडल्या. मला प्लीज माफ करा.” ती डोळे पुसत बोलली.
अविनाश काहीही न बोलता फक्त तिच्याकडे पाहून आश्वासकपणे मंद हसले. जणू ते तिला डोळ्यांनीच धीर, दिलासा देत होते. दोघेही समोर पसरलेल्या विशाल नीलम लेककडे पाहू लागले, तो अथांग जलाशयही जणू त्या दोघांची कहाणी ऐकत होता. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही.
अविनाशच मग पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाले, “हे बघ मीरा, मी वयाने तुझ्यापेक्षा मोठा आहे. माझे काही अनुभवाचे बोल सांगू का?”
“जरूर सांगा. मला आवडेल ऐकायला.” मीरा आता बरीच सावरली होती.
“आपल्या आयुष्यात कधी कधी अनपेक्षित, नकोशी वळणं येतात. समोरचा मार्ग दिसेनासा होतो, किंवा मग आपण तो शोधण्याचे टाळतो. पण म्हणून जगणं थांबत नाही. खरं तर अशा वळणावरच आपल्याला आपल्यातलं, आपल्या जीवलगांचं काहीतरी खास सापडतं, तेही अगदी सहजरित्या… आपण कुणाच्यातरी आनंदाचं, हसण्याचं कारण होऊ शकतो आणि आपल्या आयुष्याची गाडी पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच जोराने धावू लागते. थोडा वेळ लागू शकतो, पण पुन्हा सर्व स्वच्छ दिसू लागतं.”
तेवढ्यात अविनाश देसाईंचा मोबाईल वाजला. थोडा वेळ फोनवर बोलून ते उठले.
“चल, येऊ मी आता? मला बरीच तयारी करायची आहे. काल कॅन्सल झालेली मेजवानी आज होणार आहे. वाहतूक सुरळीत चालू झाली आहे. अनाथालयाचे संचालक आज मुलांना घेऊन येत आहेत.” मीराने हसून मान डोलावली.
“मीरा, काळजी घे. मला विश्वास आहे की सर्व काही नक्कीच नीट होईल. आज तर आपलं रेस्तराँ बंद आहे, पण पुन्हा कधीही रतनगामला आलीस तर नक्की आमच्या रेस्तराँला भेट दे, हे आग्रहाचं निमंत्रण! येतो मी ” असे म्हणून अविनाश त्यांच्या कारकडे निघाले.
“खूप खूप धन्यवाद! आता तर खास तुमच्या रेस्तराँमधील रुचकर जेवणासाठी माझ्या पुन्हा पुन्हा रतनगामला भेटी होणार.” हसत हसत मीरानेही त्यांना निरोप दिला.
काल ध्यानीमनी नसताना, खरे सांगायचे तर काहीसे वैतागूनच घेतलेल्या या वळणाने तिला खूप काही अवचितपणे गवसले होते. प्रवासात अनपेक्षितपणे मिळालेली ही शिदोरी आता तिला आयुष्यभर पुरणार होती.

तिने पटकन घरी फोन लावला.
“बाबा, मी आज घरी येतेय, काही दिवसांची सुट्टी घेतलीय. दुपारचे जेवण घरीच घेऊ. आईला माझ्या आवडीचा बासुंदी-पुरीचा बेत करायला सांगाल का?” ती भरभरून बोलत होती. लाडक्या लेकीचा बऱ्याच दिवसांनी असा उत्साही, खळाळता आवाज ऐकून पलीकडे तिचा बाबाही सुखावला होता.

प्रतिक्रिया

याचा पुढचा भाग पण वाचायला आवडेल

याचा पुढचा भाग पण वाचायला आवडेल

श्वेता२४'s picture

9 Nov 2022 - 10:53 am | श्वेता२४

आवडली कथा

कर्नलतपस्वी's picture

9 Nov 2022 - 1:30 pm | कर्नलतपस्वी

कथा पूर्णत्वाला न्या.

सस्नेह's picture

9 Nov 2022 - 2:34 pm | सस्नेह

सुरेख कथा !

सरिता बांदेकर's picture

10 Nov 2022 - 10:04 pm | सरिता बांदेकर

छान आहे कथा.

सरिता बांदेकर's picture

10 Nov 2022 - 10:04 pm | सरिता बांदेकर

छान आहे कथा.

कथा आवडल्याची पोच दिल्याबद्दल धन्यवाद - सुखी, श्वेता२४, कर्नलतपस्वी, सस्नेह, सरिता बांदेकर !

याचा पुढचा भाग पण वाचायला आवडेल.

नक्की प्रयत्न करेन. :D

श्वेता व्यास's picture

17 Nov 2022 - 1:00 pm | श्वेता व्यास

जगण्याचा नवा दृष्टिकोन शोधायला शिकवणारी कथा आवडली.
वर सर्वांनी म्हटल्याप्रमाणे पुढचे भाग वाचायला आवडतील.

आलो आलो's picture

17 Nov 2022 - 2:02 pm | आलो आलो

छान ! सुरेख लिहिलीये कथा .
आणखी पुढे फुलवा ....सध्या काही तरी मिसिंग असल्यासारखे वाटले.

धन्यवाद श्वेता व्यास, आलो आलो !

आणखी पुढे फुलवा ....सध्या काही तरी मिसिंग असल्यासारखे वाटले.

अभिप्रायाबद्दल आभारी आहे, Such feedback can be helpful for a novice writer like me.

छान लिहिलंय कथा,पण वर काहिंनी म्हटल्याप्रमाणे अर्धाच भाग वाटतोय. पुढे मीरा तिच्या दुखातून सावरून तिने नविन काय आयुष्य सूरू केले नविन व्यवसाय नवीन दुसरे लग्न किंवा त्याच नवर्याने काही तडजोड किंवा तिने केली काय ? अशी पुढची कथा असेल का किंवा असावी असै वाटते अर्थात लेखकाचे स्वातंत्रय आहेच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Dec 2022 - 4:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली गोष्ट,
मस्त लिहिली आहे,
पैजारबुवा,

पर्णिका's picture

4 Dec 2022 - 5:11 am | पर्णिका

धन्यवाद nutanm आणि ज्ञानोबाचे पैजार !

पुढे मीरा तिच्या दुखातून सावरून तिने नविन काय आयुष्य सूरू केले नविन व्यवसाय नवीन दुसरे लग्न किंवा त्याच नवर्याने काही तडजोड किंवा तिने केली काय ? अशी पुढची कथा असेल का किंवा असावी असै वाटते

बरेच पर्याय सुचवले आहेत, nutanm... आवडले ! मलादेखील एव्हढे सुचले नसते.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2022 - 4:57 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर !
💖