दिवाळी अंक २०२२ - भांडण

श्रेयाभि's picture
श्रेयाभि in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 7:31 am

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .field-item even p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.col-sm-9 p {text-align:justify;} .samas {text-align: justify; text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3);}
/* System */
.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.row {margin-top: 16px;}.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}
.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}
@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}
.field-items img{background-color:#fff;border:1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 10px 0 rgba(0,0,0,.12);max-width:100%;height:auto!important}.author-type-posted,.field-items a:link{color:#600}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;)

दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ गोकुळातील नीरव शांततेला आश्वस्त करत होती. लवकरच पहाट होईल. सारे गोकुळ शांत झोपलेले असताना राधा मात्र जागीच होती. झोप लागणार तरी कशी? काल नंदवाड्यावर गेल्या गेल्या तिला यशोदा मैय्याकडून कळाले होते की कान्हाच्या जन्मतिथीचा उत्सव धूमधडाक्यात पूर्ण जनपदांत साजरा होणार होता. गोकुळातले प्रत्येक गाव सजले होते. त्यांचा आवडता नेता कृष्ण याचा वाढदिवस होता. राधेला माईची ही कल्पनाच भारी आवडली. कान्हाचा वाढदिवस दिवसभर साजरा करायचा! व्वा! तिचे टपोरे डोळे आनंदाने अधिकच विस्फारले. गालांवर गुलाब फुलले. यशोदेच्या नजरेतून हे काही सुटले नाही. “राधे, सकाळचे आन्हिक वगैरे लवकर आटोपून ये हो माझ्या मदतीला. पावसाच्या पाण्याचे दिवस आहेत. उगा वेळेवर फजिती नको. यमुनेला जाऊन आपण सर्व सवाष्णी अर्घ्य द्यायला पण जाऊ. तुला तर माहीतच आहे कान्हाला काय काय आवडते ते!”

“हो मैय्या, मी येईन लवकरच. इतर सख्यांनासुद्धा आणते. माई, कान्हा दिसत नाहीये कुठे.”

“हो गं, आल्यापासून तुझे भिरभिर डोळे त्यालाच शोधत आहे हे माहीत आहे मला.”

“छे माई, काहीतरीच काय?” राधा गोरीमोरी झाली. “माझं एक काकण सापडत नाहीये काही दिवस झाले. इथेच कुठेतरी पडलं होतं बहुतेक. ते शोधत आहे."

“बरं, बरं. सांग आता कारणं.”

कान्हा कुठे दिसलाच नाही. राधा हिरमुसली होऊन परत आली. वाड्यावर यशोदामाई होती, रोहिणीमाई होती. नंदबाबा भेटले. पण हा कान्हा कुठे गेला आहे? राधेचं मन थोडं खट्टूच झालं. रात्री काहीतरी चिवड-चिवड करत जेवली. डोळ्याला डोळा लागला नाही. क्षणाक्षणाला फक्त कान्हाचा विचार. आला असेल का घरी सुखरूप परत? की कुठे पुरात अडकला असेल? यमुनेच्या डोहात त्याने कालियाला मारल्यापासुन तिला धडकीच भरली होती. हा कुठे कुठे हिंडत राहतो. याला भीती कशी वाटत नाही? माईने एवढा उत्सव ठरवला आहे. राहावं की भर पावसाळयात शांतपणे घरात.

भर श्रावणात कान्हाचा वाढदिवस यायचा, म्हणून राधेला हा पावसाळा खूप आवडायचा. पण एक समस्या मात्र यायची. बाहेर जायची सहज संधी मिळायची नाही. घराबाहेर पडायला कोणतेच निमित्त मिळायचे नाही. झड सुरू झाली की पापण्याच्या काठांना रग लागेस्तोवर राधा अनिमिष नेत्रांनी खिडकीबाहेर बघत रहायची. भर संध्याकाळी कान्हा अचानक थोड्या वेळासाठी घरी यायचा. नेमके त्याच दिवशी त्याला काय काम असायचे, हे कधीच कळले नाही. पण काहीतरी काम नक्की असायचे. यशेादा मैय्याचा निरोप घेऊन कान्हा यायचा. जटीला माईशी गप्पा मारत बसायचा. नुसती डोळाभेट व्हायची.

उद्या वाढदिवसाच्या दिवशी होईल का विशेष भेट?
अखेर श्रावणातल्या अष्टमीचा दिवस एकदाचा उजाडला. पहाटे लवकर उठून रोजची सर्व कामे आटोपून राधा नंदवाड्यावर गेली.

“अगदी देवासारखी आलीस ग राधे! खूप कामे पडली आहेत.” राधा पुढे सरसावली. जाई-जुईची, कमळांची फुले आणली. हार गुंफायला घेतले. कान्हा नदीवर स्नानासाठी गेला होता म्हणे.
यशोदा माईने राधेच्या हातात तेल-हळदीची उटी, औक्षण करायला चांदीचे ताट आणून ठेवले. ओवाळायला सुवर्णमुद्रिका होती.
खरे तर कान्हा पहाटेच नदीवर गेला होता. एव्हाना यायला हवा होता. राधा वाट पाहून कंटाळली. इतरांच्या नकळत फुलपात्र दाराच्या कडीला अडकवून ठेवले. अंगणात जागोजागी दह्यादुधाचे घट लटकत होते. केळीचे लोंगर अंगणात लावलेले होते. कान्हाच्या मित्रांनी आदल्या दिवशीच गोवासरांची शिंगे रंगवली होती. कुणी सोनेरी शेंब्या चढवल्या होत्या. गाई-वासरांना कान्हाच्या जन्मदिनाचा सोहळा म्हणून नंदबाबांनी सोन्याचांदीच्या घुंघुरघंटी साखळ्याही बांधल्या होत्या.
रंधनग्रहात स्वयंपाक तयार होत होता. शेकडो लोक आज जेवायला होते. अपुप, पुरीका, भाताचे प्रकार, स्थालिपाक, पर्पट, पायस, पुऱ्या, लोणी, साखर अगदी मस्त बेत होता. कान्हाने त्याच्या मित्रांना अनेक खेळ शिकवले होते. यष्टिकाकर्ण, हुतूतू, सूरपारंब्या, टिपऱ्या, लगोऱ्या, हुंबरी आणि कुस्तीसुद्धा.

राधेला फुलांचे हार करता करता हसू आले. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी राधेच्या सासूची जटीलाची कृष्णाने हुबेहुब नक्कल केली होती. नाकात बोलायचा आवाज काढला. ती सुरेख नक्कल पाहून सर्व खूप हसले.

आत्ता कुठे गेला असेल हा? या विचारात राधा असतानाच कान्हा आला. मग काय.. सर्व गडबडच उडाली. राधाला एकही काम सुचेना नि दिलेले कामही जमेना. क्षणभरही कृष्णावरून दृष्टी दूर करू नये असे तिला वाटले. गोप स्त्रियांचा जथाच नंदवाड्यात शिरला. हसणे खिदळणे उतू जाऊ लागले. ओवाळायची वेळ जवळ आली. पितांबर नेसून नि अंगावर जांभळ्या रंगाची पाभरी घालून कृष्ण चौरंगावर बसला. त्याचे डोळे राधेला शोधत होतेच. यशोदामाईने, रोहिणीमाईने नि इतर ज्येष्ठ गोपस्त्रियांनी कान्हाला ओवाळले. राधेने थरथरत्या हाताने तबक हातात घेतले. कोणीतरी गुलाल हवेत उधळला होता. राधेचे गाल अधिकच गुलाबी झाले. कृष्णाला ओवाळताना काही क्षण तरी सर्व जण अदृश्य व्हावे. असा एक विचार तिच्या मनात आला. कृष्णाने तिच्या मनातली चलबिचल ओळखली. “कुठे होतास केव्हाचा?” हा तिच्या नजरेतला प्रश्नही त्याला कळला.
पुढचे काही तास विलक्षण धामधुमीत गेले. औक्षण, मिष्टान्न भरवणे, भेाजनाच्या पंगती, संध्याकाळी टिपरी नृत्य.. वेळ कसा उडून गेला, ते कळलेच नाही. कृष्णाला उद्या भेटायचेच असा काहीसा निश्चय करून राधा जड मनाने घरी गेली.

दुसरा दिवस उजाडला. राधा सकाळीच यमुनेच्या काठावर घागर घेऊन गेली. कृष्ण एव्हाना यायला हवा होता. हृदयाची व्याकूळता वाढत गेली. हे हृदया, धीर धर. कान्हा किती अस्वस्थता, तगमग जाणवते आहे रे. पण सारे माहीत असूनही दुर्लक्ष करण्याची तुझी खुबी आजची थोडीच आहे?
कान्हा पंधरा दिवसांपासून धड भेटलासुद्धा नाही ना! मानसमंदिरातला परमेश्वरच असा पाठ करून रुसून बसला, तर राधाने तरी कोणाकडे तक्रार करावी?

मागच्याच होळीत तर डोळ्यात फुंकर घालण्याचे निमित्त करत तू अगदी जवळ आला होतास! डोळ्यातली धूळ तुला दिसली, पण पाणी दिसत नाही असे कसे मनाला समजवावे? राधेच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तेवढ्यात तिला बासरीचा आवाज ऐकू आला. कदंबाच्या झाडाखाली कान्हा उभा होता. राधा त्या दिशेने निघाली. पण त्या बासरीचा आवाज ऐकून लतिका, भूदेवी, मंजिरी यासुद्धा तिकडे जाऊन पोहोचल्या. कितीतरी वेळ साऱ्या जणी त्या सुरांच्या लकेरीवर लहरत होत्या. कान्हाने बासरी वाजवणे थांबवले. मग बराच वेळ भूदेवी, मंजिरी, लतिका, दीपमाला कान्हाशी गप्पा मारत बसल्या. मथुरेतल्या कितीतरी वेगळ्याच गमती-जमती कान्हाने त्यांना सांगितल्या. राधा एका कोपऱ्यात शांत शांतच उभी होती.
अचानक कान्हा नदीतिरावरील पुळणीवर दूर अंतरावर चालत गेला. राधा व सख्या झाडाखालीच उभ्या होत्या. कान्हाने बासरीच्या टोकाने काहीतरी रेतीत रेखाटले. दूर असल्याने नक्की काय आहे ते कळलेच नाही.

"काय केलंस कान्हा आत्ता?" भूदेवीने विचारले.

“माझ्या सर्वात आवडत्या प्रिय सखीचे नाव रेखाटले आहे. या आणि बघा की जवळ येऊन.” कान्हाने ओरडून सांगितले.

सर्व जणी कुतूहलाने पुढे झाल्या. राधाचे हृदय धडधडले. हे असे सगळ्यांसमोर सांगणार आहे का हा? हे भगवंता, या सख्यांना मला आता चिडवायला संधी मिळणार! काय होईल आता? कान्हाने राधेचे नाव बासरीने वाळूत रेखाटले, ही वार्ता अख्ख्या वृंदावनात कर्णोपकर्णी होणार .

भूदेवी, लतिका, मंजिरी, दीपमाला पोहोचण्यापूर्वीच राधा एकटीच पळत सुटली. ती नजरेच्या टप्प्यात पोहोचते न पोहोचते तोच कान्हा खाली वाकला आणि नाव हाताने सारवून मोडून टाकले. राधा धपापत्या उरासह त्याच्याजवळ पोहोचली. वाळूत कोणतेच अक्षर शिल्लक नव्हते. एकाच क्षणी आनंद, दु:ख, हताशा, उत्सुकता अशा अनेक भावना राधेच्या मनात दाटून आल्या. आनंद यासाठी होता की त्या तिघी पोहोचण्यापूर्वीच नाव मोडले गेले होते. हताशा यासाठीही की राधेला स्वत:च्या डोळ्याने नाव पाहायचे होते. फक्त कान्हा आणि मी दोघेच असताना याने हे नाव का नाही रेखाटले?
किती सुंदर असता तो क्षण?

“नाव कोणाचे होते कान्हा आणि मी वाचायच्या आधीच ते पुसले का बरे?” राधेने कमरेवर हात ठेवून दरडावत विचारले.

“आहे एक त्रिभुवनसुंदरी, सहजच रेखाटले, सहजच पुसले. माझी इच्छा!”

इतर तिघी तिथे पोहोचल्या. नाव न दिसल्यामुळे सगळ्यांची घोर निराशा झाली. कोण असेल कान्हाची प्रिय सखी?
उत्तर दिल्याशिवाय कान्हाची काही धडगत नव्हती. पण
भूदेवीला लवकर घरी जायचे होते, म्हणून तिघी पण तिथून निघून गेल्या.
राधा एकटीच रेंगाळली. काय करू आता? यांच्याशी भांडू की थोडे गोड बोलून लिहून मोडलेले नाव काढून घेऊ? आता भेटलोच आहे तर इथेच संध्याकाळपर्यंत कान्हासोबतच वेळ घालवावा, या विचाराने राधेचा मलूल चेहरा फुलला.

राधेने कान्हाचे मनगट धरले.
“सांग ना रे, काय नाव आहे तिचे?"

"तिचे नाव साऱ्यांना माहीत आहे. तुला सांगू का राधे एक गम्मत? मी ना, चक्क प्रेमात पडलो आहे. जिचे नाव मी लिहिले ना, तिच्याच. मी प्रेमात आहे हे ताऱ्यांना, वाऱ्याला, फुलांना, पानांना साऱ्यांना ठाऊक आहे.
तुला सांगू का राधे, ती किती सुंदर आहे ते. तिचे विलक्षण डोळे मला सतत खुणावतात. तिची गुलाबपाकळ्यांसारखी जिवणी मला अस्वस्थ करते. तिच्या आठवणींशिवाय माझा एक क्षणही जात नाही. तिच्या नुसत्या नावाच्या उच्चाराने गात्र गात्र पुलकित होतात. ती येते अधूनमधून पाणी भरायला, म्हणून मी सारखा यमुनेच्या काठी येतो. खूप नाजूक आहे ती. कधीकधी थकून इथेच खडकावर झोपते. मग मी तिच्या नकळत तिला वारा घालतो. तिचे एक कंकण सापडले आहे मला राधे!” कान्हा डोळे मिचकावत म्हणाला,
"अगं, पण तिला हे ठाऊकच नाहीये. ती आली नाही की चक्क मी तिच्या कंकणाशी गप्पा मारतो आणि हलकेच त्याच्यावर आपले ओठ ठेवतो.”

“अहाहा! काय तर म्हणे ओठ ठेवतो!”
राधा चिडून म्हणाली.

”असेल एखादी चेटकीण किंवा राक्षसीण. मुद्दाम तुझ्यासमोर मानवी रूपात येत असेल. कान्हा, भलत्याच जखिणीच्या मागे लागू नकोस हो. आधीच लहानपणी तुझ्यावर फार संकटे आलीत बरे का! ती पूतना नि काय काय! अनोळखी सुंदरीच्या मागे लागू नाही कान्हा आणि काय रे कान्हा, अख्ख्या वृंदावनातल्या गोधनाची जबाबदारी तुझ्याकडे दिलेली असताना त्या सुंदरीकडे पाहावेच कशाला?”

कान्हाला हसू फुटले.
“कशाला म्हणजे? अगं, मी सौंदर्याचा उपासक आहे. जगात जे जे काही सुंदर आहे ते पाहावे की माणसाने. पक्षी, तारे, वासरे, मोर,
कदंब, यमुना आणि सुंदरीसुद्धा."

“हे बघ कान्हा, असले काही बरळू नकोस. मी मुळी आज तिचे नाव जाणून घेतल्याशिवाय जाणारच नाहीये.”

“नको जाऊ. बस उपाशी इथेच ताटकळत."

कान्हाचा चढलेला सूर पाहून राधाने जरा स्वर हळुवार केला.

“ए कान्हा, ऐक ना. तुला जे हवे ते मी करीन. तुझ्यासाठी पात्र भरून लोणी आणेन. तुला कमलपत्राने वारा घालेन. सगळी गोड-गोड फुले जमा करून त्याची माळ गुंफेन नि त्यात मोरपीस खोवून तो टोप घालेन तुला. अगदी रो----ज----! फक्त तिचे नाव तेवढे सांग आता? कान्हा, थांब. मीच ओळखू का ते नाव?”

कान्हाने हाताची घडी घातली नि शांतपणे तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, ”बरं चालेल. ओळख पाहू तिचे नाव.”

“कान्हा, तिचे नाव दोन अक्षरी आहे ना?”

कान्हाला खळकन हसू फुटले, “ओहो राधे, हा प्रश्न विचारतांना भारीच खट्याळ भाव दिसत आहेत तुझ्या डोळ्यात.”

“ए, सांग ना.. दोनच अक्षरी ना?” राधेने तिची दोन बोटे पुढे केली. कृष्णाने तिचे नाजूक हात आपल्या दोन्ही हातात घेतले नि तो म्हणाला. “छे! सहा अक्षरी!”

राधेचा चेहरा खाडकन उतरला. डोळ्यात पाणी जमा झाले. हृदयाचा ठोका चुकला. घशात आवंढा दाटला. काळजात कालवाकालवा झाली. कदंबाच्या झाडाला घट्ट मिठी मारून एकदा रडावे की काय असेही तिला वाटले.

“सहा अक्षरी? कान्हा, मोठ्ठे नाव असलेल्या स्त्रिया फार शिष्ट असतात बरे का? आणि सहा अक्षरी म्हणजे खूपच मोठे नाव. अशांच्या प्रेमात पडावेच कशाला जरा साधे नाव शोधावे. येता जाता उच्चारायला सोपे जाते."

"साधे-सोपे म्हणजे कसे गं राधे?"

"साधे------ म्हणजे दोन अक्षरी."

“अगं पण दोनच उशाला? तीन अक्षरी नावेसुद्धा सोपी आणि सुंदर असतात. तुझ्याच सख्यांची नावे बघ की - लतिका, भूदेवी, मंजिरी वगैरे.”

हात कमरेवर ठेवत राधा म्हणाली, “ए कान्हा, त्रास देणे बंद कर. मला नीट सांग पाहू. ती कशी आहे? खूप सुंदर आहे का?"

“होय तर, खूप सुंदर. माझे मन आणि ती या दोनच गोष्टी जगात सुंदर आहेत. राजहंसाप्रमाने तिचा डौल एखाद्या राजकुमारीसारखा असतो. तिचा क्षणभराचाही सहवास विलक्षण आनंद देऊन जातो. फुलांच्या दोल्यात तिला रोज बसवावे एवढी ती गोड आहे.”

"हे बघ कान्हा, तुझ्याजवळ मी असे कोणालाही फुलांच्या दोल्यावर बसू देणार नाही."

"किती घमकावतेस राधे! मी तुझा आहेच कोण? तुझे नाव अगदी योग्य अगदी ठेवले आहे तुझ्या घरच्यांनी. वृषभानु बाबांना राधा नाव सुचले ते बरेच झाले. राधा ----- राहून राहून धास्ती देणारी!
आता राहिला प्रश्न फुलांच्या दोल्याचा. मला त्या सुंदरीला बसू द्यावे लागेल ना! ती माझी प्रेयसी रुसून बसेल की!
राधे, ती रुसली कीसुद्धा किती सुंदर दिसते म्हणून सांगू?"

“तू कधाी पाहिले तिला रुसताना?”

“अगं, परवाच तर तिच्यात आणि माझ्यात भांडण झाले ना, तेव्हा!”

“अरे, पण परवा तर आपलेसुद्धा भांडण झाले होते."

“हो, बरोबर. काय करणार! ती रुसली ना माझ्यावर, मग सगळा राग तुझ्यावर काढला. क्षमा कर हो राधे. मी असे करतो, तुझी आणि तिची ओळख करून देतो. तू माझी जवळची सखी आहेस. तूच तिची समजूत काढत जा."

"काही नको कृष्णा. तुझी कामे तूच कर. त्या जगतसुंदरीची समजूत मी का काढावी? एवढा वेळ आहेच कुठे? तू एकटाच प्रेम करतोस तिच्यावर की तीसुद्धा करते? तू कुठल्या भ्रमात तर जगत नाहीयेस ना कान्हा?"

“छे! छे! असे कसे? तिच्या डोळ्यात पाहून कळते ना मला की तीसुद्धा माझ्या प्रेमात आहे ते. अजून ती तसे बोलली नाही किंवा मीही विचारले नाही. पण मला माहीत आहे. ती क्षणाक्षणाला माझीच वाट पाहात असते. तिला आमच्या भेटीची सतत उत्कंठा असते. माझ्याशी बोलायची एकही संधी सोडत नाही. कधीकधी लपवून मातीच्या बुडकुल्यात घालून माझ्यासाठी अपूप आणते. फुलांचा हार आणते. डोळ्याला तर काय माझ्या आठवणीत अखंड धारा लागलेल्या असतात. रडायला तर नुसते निमित्त हवे तिला. एका क्षणाचासुद्धा विरह तिला सहन होत नाही. कमळाच्या पानावर नखाने कृष्ण कृष्ण लिहीत बसते आणि तेच कमळपत्र हृदयाशी कवटाळून रडत राहते.
नदीकाठी पडलेली अशी असंख्य कमळपत्रे मी जमा करतो. रोज जपून ठेवतो. तिची प्रत्येक गोष्ट मी तिच्या नकळत जपतो राधे. तिचे कंकण, वाऱ्यावर उडालेली गुलाबी ओढणी, तिच्या वेणीतली बकुळीची फुले, तिची विसरलेली घागर सारे जपतो.
एकदा नदीकाठी मला भेटायला आली. खरे तर घरात भरभरून पाणी होते. पण हिने सर्वांच्या नकळत ते ओतून दिले नि पाणी भरायचे निमित्त काढून यमुनेवर आली. मी दिसलो नाही, मग एवढेसे तोंड करून बसली. वासरांच्या कळपात उगाचच रेंगाळली. मोरांच्या थव्यांना गोंजारत बसली. हरीण शावकांच्या कानात माझ्याविषयीची तक्रार केली. तिचे रुसणे सुंदर असणे सुंदर, चालणे सुंदर, बोलणे सुंदर.अहाहा! काय ते प्रत्येक लोभस रूप!"

“कृष्णा, बस------ बस-------- पुरे ते वर्णन. तुझी कटकट वटवट ऐकण्यासाठी मी इथे आलेले नाहीये. ते जे आत्ता मिटवले ते नाव सांग काय आहे ते? बाकी काही बोलू नकोस."

“तूच ओळख. तुझ्या परिचयातली आहे ती. तिचे नाव सहा अक्षरी आहे. ती त्रिभुवनसुंदरी आहे. ती या कृष्णाला हृदयाच्या अगदी जवळची आहे. प्रतिकृष्णच आहे समज. सतत माझा विचार करून ती माझ्यासारखीच दिसायला लागली आहे.”

“हे बघ कान्हा, वृंदावनातल्या स्त्रियांना खूप कामे असतात. सारा वेळ दूध, दही, लोणी याभोवती जातो. पुन्हा मथुरेच्या बाजारी जाणे-येणे ते वेगळेच. त्यात ही तुझी अखंड बडबङ. रागे भरतील मला सर्व उशिरा घरी गेले तर. एक नाव सांगायला एवढा वेळ कोणी लावतंय होय? नसेल सांगायचे तर नको सांगू. निघालेय मी ही घागर घेऊन. तुझी वटवट पुरे.”

“खुशाल जा हो, राधे, मी थोडी तुझी वाट अडवली आहे? वेळ तुझा. घागर तुझी. पायवाट तुझी. तू तुझ्या मनाची स्वामिनी आहेस. तुझ्या मनावर माझी सत्ता थेाडी चालते!"

“बरं ------ तुझ्यासारख्या लबाड माणसाची सत्ता नकोच माझ्या मनावर. मला यानंतर तुझ्याशी एक क्षणही बोलायची इच्छा नाही. तुझ्याशी ओळख झाली नि जीव नुसता मेटाकुटीला आला आहे. जातेय मी आता. मागे वळून पाहणारही नाही. उद्यापासून भेटणार तर नाहीच नाही. मग म्हणू नकोस राधा भांडण करून गेली म्हणून. रडशील उद्या.”

"छे छे! रडायला नि भांडायला वेळ आहेच कोणाला? अगं, प्रेमात पडलेल्या माणसाला वेळ असतोच कुठे इतरांवर घालवायला. बस्स------ फक्त तिचीच ओढ, तिच्याच आठवणी तिचीच स्वप्ने ----- नि तिचेच नाव ओठांवर!”

“बस, पुरे पुरे ! मला ते नावसुद्धा आता ऐकायचे नाहीये. कोण कुठली मेली लबाड चेटकीण तुझ्यावर जादू करून गेली, देवच जाणे. बस आपल्या कर्माची फळे भोगत!”

राधा तिरिमिरीने उठली. कसेबसे उसने अवसान आणुन पाण्याची घागर डोक्यावर ठेवली. चालत गेली नि थोड्याच अंतरावर तिच्या डोळ्यातून गंगायमुना वाहू लागल्या. सगळे शरीर जणू दगड झाले आहे असेच तिला वाटले. कष्टाने एकेक पाऊल टाकत ती वृंदावनाच्या दिशेने निघाली. सहा अक्षरी नाव या नुसत्या वाक्याने राधेच्या जिवाचा पालापाचोळा झाला होता.
असे कसे शक्य आहे? म्हणजे कृष्ण आपल्यावर प्रेम करत नाही? खरेच करत नाही? तो कोणत्यातरी दुसऱ्याच गोपीवर प्रेम करतो, जिचे नाव सहा अक्षरी आहे! मी अशी रोज वेड्यासारखी कृष्णाच्या ओढीने का धावत जाते? रोज कान्हा आपल्याला भेटायला येतो, बोलतो तेव्हा त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक असते. मी कसल्या भ्रमात वावरत आहे? रोज मला आतून जाणवते ती भावना कुठली? किती दुष्ट आहेस कृष्णा, काही काळासाठी आपले करायचे नि असेच सोडून द्यायचे, याला काय अर्थ? ही राधा कृष्णाची नाही, तर आणखी कोणाची? हा कृष्ण राधेचा नाही, तर आणखी कोणाचा? तू नक्की कशाला भुललास कृष्णा? त्या सुंदरीच्या डोळ्यांना की ओठांना? केसांना की गोड गोड गप्पांना? तूही असाच निघावास कृष्णा, इतर पुरुषांसारखा.. ज्यांचे मन सतत या फुलावरून त्या फुलावर भटकत राहते. केवढा दैवदुर्विलास आहे हा!
सहा अक्षरी नाव? ती याच वृंदावनातील आहे म्हणे. रोज कृष्णाला सकाळ-संध्याकाळ भेटते? कोण असेल? गोपींमधली काही नावे तर आपल्याला माहीत आहेत - अनंगमंजिरी, वसंततिलका, लावण्यदीपिका, लवंगलतिका, देविषाचित्राणी, आनंदनंदिनी.. कितीतरी नावे राधेच्या मनात आली. सारी सहा अक्षरी नावे. यातली कोण आवडली असेल कान्हाला?

डोक्यावरची घागर डुचमळत होती. पाणी डोक्यावरून कपाळावर पडू लागले. डोळ्यातूनही धारा वाहत होत्या.
राधेला भान नव्हते.

अचानक कृष्णाची हाक ऐकू आली. “हे कदंबवृक्षा, ऐक, फुलांनो, वेलींनो, तारकांनो ऐका, ऐका, ऐका. आज मी तुम्हाला सर्वांना माझ्या हृदयाच्या स्वामिनीचे नाव सांगत आहे. सहा अक्षरी सुंदर नाव आता माझे जीवन झाले आहे. सगळे ऐकत आहात ना?"

राधेच्या घशात हुंदका दाटला. ती आता कधीच मागे वळून पाहणार नव्हती. पुन्हा कान्हा ओरडला. “मी तुम्हाला नाव सांगत आहे. ऐका हो ऐका."

राधेला क्षणभर वाटले की हातातली घागर टाकून द्यावी नि कानावर गच्च हात ठेवावेत. नकोच ते नाव ऐकणे. तेवड्यात कृष्ण मोठ्याने ओरडला...
वृषभानुसुता - - - -वृ- - - ष- - - - भा - - - - नु - - - - सु - - - - ता..
वृषभानुसुता.......!"

नदीच्या पाण्यावर तरंग उठले. राधा क्षणभर स्तब्ध झाली. डोईवरची घागर अंगावरच उलथून गेली. चेहऱ्यावरचे भाव भराभर बदलले. घडा तसाच जमिनीवर टाकून कृष्णाकडे धावत गेली. ओलेत्या अंगाने वाळूतून तिला धड चालता येत नव्हते. आनंद, आश्चर्य, लज्जा, संकोच, राग अशा कितीतरी भावना एकाच वेळी राधेच्या मनात दाटून आल्या. कृष्णाच्या चेहऱ्यावर खट्याळ स्मित होते. राधा कृष्णाच्या जवळ आली. नजरेला नजर मिळाली. फार काही बोलण्यासारखे नव्हतेच. कृष्णाने अगदी सहज हात पुढे केले. राधेचे हुंदके कृष्णाला ऐकू येत होते.

“तू खूप दुष्ट आहेस कान्हा!”

“हो का, बरे झाले सांगितलेस. मला वाटले की मी फार साधा आहे --- अगदी निर्मळ मनाचा !”

“तू नुसता गोडबोल्या आहेस कान्हा. मला खूप राग आला तुझा.”

“येऊ दे.. कृष्णाची प्रेयसी राग आला की खूप छान दिसते, हे सांगितले ना मी तुला थोड्या वेळापूर्वी.”

थोड्या वेळापूर्वीचे भांडण आठवले नि दोघांनाही हसू फुटले.
उन्हे कलली होती. आकाश शांत निळसर होते. सगळे संभ्रम मिटले होते. कृष्णाने राधेला हलकेच जवळ ओढले नि आपले ओठ तिच्या माथ्यावर ठेवले - - - - नि तो हलकेच पुटपुटला,
"- - - - - - - वृषभानुसुता!”

श्रेया सरनाईक
shreyasarnaik@gmail.com

प्रतिक्रिया

सुखी's picture

6 Nov 2022 - 10:42 pm | सुखी

सुरेख

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2022 - 7:55 am | प्राची अश्विनी

छान लिहिलंय. पुलेशु

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Nov 2022 - 12:37 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान लिहिलय.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2022 - 6:27 pm | मुक्त विहारि

आवडले

श्वेता व्यास's picture

15 Nov 2022 - 3:09 pm | श्वेता व्यास

खूप छान लिहिलं आहे.
पापण्याच्या काठांना रग लागेस्तोवर हे विशेष आवडलं.