/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */
.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}
.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}
@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}
.field-items img{max-width:100%;height:auto;}.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}
सोनेरी सूर्यकिरण
अनुराधा गुप्ते.
स्थळ - पुणे येथील गुप्ते कुटुंबाचे घर.
काळ - रात्र, ९ नोव्हेंबर २००३.
वेळ ८.३०.
आज मला कितीतरी दिवसांनी खूप छान वाटत होते. आज कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवळात संध्याकाळी सूर्यकिरण मूर्तीच्या पायाला स्पर्श करून गेले. टीव्हीवर ते दृश्य बघून मला आनंदाचे भरते आले. कसा काय घडत असेल हा चमत्कार? माझी महालक्ष्मीवर खूप श्रद्धा आहे. तिच्या कृपेने माझ्या जीवनातही असा प्रकाश पुन्हा नक्की पडेल असे मला वाटत होते. दोन वर्षांपूर्वी जानेवारीत साध्या तापाचे निमित्त झाले आणि माझा चार वर्षाचा ..खेळकर ..आनंदी प्रकाश मला सोडून गेला. माझे जीवन अंधकारमय करून गेला.
मग ती काळरात्र जणू संपलीच नाही. आम्हाला पुन्हा मूल होईल म्हणून आम्ही दोघांनी खूप वाट पाहिली. देवाला नवस झाले. अनेक डॉक्टर झाले. सगळे पुन्हा पुन्हा हेच सांगत होते, तुम्हा दोघात काहीही दोष नाही, थोडा धीर धरा. पण आजपर्यंत काही उपयोग झाला नाही.
माझा प्रकाश परत आला नाही.
मग काही मैत्रिणींच्या सांगण्यावरून काही तथाकथित गुरूंचा आशीर्वाद घेतला. खूप पैसा खर्च केला. माझ्या नवऱ्याला - म्हणजे इन्स्पेक्टर राहुल गुप्ते याला हे अजिबात पसंत नव्हते. असल्या बुवाबाजीवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता.
“आपण अजून नुकतेच कुठे तिशी ओलांडली आहे. सगळे डॉक्टर सांगतात की थोडा धीर धरा, तर हे वेगवेगळ्या बुवांकडे जायचे काय सुरू केले आहेस? तू हुशार आहेस. एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेस. असा वेडेपणा करू नकोस.” राहुल मला नेहमी म्हणायचा. तो मोठ्या धीराचा आहे. पण आताशा तोसुद्धा रात्र रात्र झोपत नाही . मधेच रात्री केव्हाही उठतो आणि पोलीस स्टेशनवर जाऊन बसतो. दारूचे प्रमाणहि थोडे वाढले आहे.
मी किती दिवसापासून त्याला म्हणते आहे की आपण स्वामी आनंदजी केव्हा केव्हा इथे येतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ. पण हा अजिबात ऐकत नाही.
आज मात्र तो तयार झाला. उद्या सकाळी निवृत्त पोलीस अधिकारी घोरपडे यांच्या घरीच ते येणार आहेत आणि लोकांच्या प्रश्नाला उत्तरे देणार आहेत ...तुम्ही दोघेही त्यांचे आशीर्वाद घ्यायला या, असे घोरपडेकाकांनीच बोलवल्यावर मग तयार झाला. सोनारानेच कान टोचायला हवेत. घोरपडेकाकूंचा आमच्या दोघांवर खूप जीव आहे. काहीही करून आम्हा दोघांना परत एकदा मूल होऊ दे असे त्यांना फार वाटते.
राहुलच्या थोडे मनाविरुद्ध आहे हे सगळे. पण माझ्यासाठी तो काहीही करायला तयार असतो.
नाही म्हणजे तसा वरवर कठोर वाटत असला, तरी आतून खूप हळवा आणि प्रेमळ आहे माझा राहुल.
उद्या सुट्टीच टाकतो किवा मग दुपारी उशिरा कामाला जातो असे सांगून गेलाय.
“उद्या त्या स्वामी आनंद यांची उलटतपासणीच घेतो.. अगदी पोलिसी खाक्यात..” जाताना हसत हसत मला सांगून गेलाय.
आता रात्री केव्हा येतोय कुणास ठाऊक ?रात्री केव्हा का येईना. उद्या सकाळी स्वामीजींना भेटायला मात्र वेळेवर यायला हवा .
**********
विक्रम बिडकर. वकील.
स्थळ - कोरेगाव पार्कमधील बिडकर यांचा बंगला.
काळ - रात्र, ९ नोव्हेंबर २००३.
वेळ - ८.३०.
स्वामीजी मला केव्हा काय करायला सांगतील याचा काही नेम नसतो. पण ते माझे सद्गुरू आहेत. त्यानी मला विहिरीत उडी मारायला सांगितली तरी मी मारेन. अगदी डोळे झाकून. कारण मला माहीत आहे की तसेच काही कारण असल्याशिवाय ते मला काहीही करायला सांगणार नाहीत. संध्याकाळी त्यांचा फलाहार झाला आणि ते बेडरूमकडे निघाले. आता ते समाधी लावतील आणि मग कधीतरी मध्यरात्री थोडावेळ झोपतील. सकाळी लवकर उठून मग योगासने आणि प्राणायाम. मग सकाळी सहा वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरू होतो. ते चालवत असलेल्या वेगवेगळ्या संस्थांना भेटी, तिथल्या कामाची बारकाईने पाहणी करतील. नव्या योजना सांगतील. काही वेळा सकाळी प्रवचने असतात, नाहीतर संध्याकाळी. या वेळच्या पुण्याच्या पंधरा दिवसाच्या मुक्कामात हा असा त्यांचा कार्यक्रम असे.
पण आज बेडरूमकडे जाता जाता ते एकदम थांबले. माझ्याकडे वळून म्हणाले,
“विक्रम मित्रा, आत्ता आपल्याला जरा बाहेर जायला लागेल. आपल्या सारथी मित्राला जरा गाडी काढायला सांग. अजयला आज जरा त्रास द्यायला लागणार. तुलाही बरोबर यायला लागणार.” अजय आमचा विश्वासू सारथी. स्वामीजी सर्वांना नावाने ओळखत आणि ते आपल्या सगळ्या शिष्यांना आपला मित्र म्हणत.
“स्वामीजी, आपल्याला कुठे जायचे आहे का?” मी विचारले. स्वामीजी जरा गंभीर झाले.
“आपली कुठे तरी गरज निर्माण झाली आहे. चला..”
आम्ही मग निघालो. स्वामीजींनी अजयला डेक्कन जिमखान्याकडे गाडी न्यायला सांगितली
सगळ्या प्रवासात स्वामीजी शांत बसले होते. अशा वेळी त्यांना काहीही विचारण्यात अर्थ नसतो, याची मला आता कल्पना आली होती. मी स्वामीजींकडे जरा विस्मयानेच पाहिले. अगदी बेडरूमकडे निघालेले स्वामीजी असे अचानक बाहेर कुठे निघाले असतील आणि माझे काय काम असावे? भगव्या रंगाचा पायघोळ अंगरखा, पिळदार शरीरयष्टी. जेमतेम पन्नास वर्षांचे स्वामीजी. व्यवस्थित दाढी केलेला चेहरा आणि अगदी बारीक असे कापलेले डोक्यावरचे अजूनही काळे असलेले केस. कपाळावर लाल रंगाचा टिळा. त्यांच्या हातात एक मजबूत लाठी नेहमी असे. माझ्यावर यांनी कृपा कशी काय केली असेल? माझे पूर्वजन्मीचे काहीतरी पुण्य असले पाहिजे.
आम्ही संभाजी बाग सोडून जरा पुढे आलो.
“अजय, गाडी थांबव जरा. आम्ही आता जरा येथून चालत जाणार आहोत. तुला जिथे जागा मिळेल तिथे तू थांब. आमचे काम झाले की तुला आम्ही फोन करू. विक्रम मित्रा, चला. आपण जरा इथून चालत जाऊ.” असे म्हणून स्वामीजी खाली उतरले आणि माझी वाट न पाहताच आपल्या नेहमीच्या लगबगीच्या चालीने आपली लाठी जमिनीवर टेकवत चालायला लागले. माझी त्यांना गाठेपर्यंत जरा दमछाकच झाली. प्रयाग हॉस्पिटल असलेल्या रस्त्यावरून आम्ही फर्गुसन कॉलेज रोडकडे निघालो. फूटपाथवरून स्वामीजी पुढे आणि मी लगबगीने मागे असे जात असता एका झाडाजवळ स्वामीजी एकदम थांबले. प्रयाग हॉस्पिटलच्या विरुद्ध बाजूच्या फुटपाथवर. पहिली गोष्ट मला दिसली ती फूटपाथवर झोपलेली एक स्त्री आणि तिच्याजवळ बसून तिला हलवत असलेली दोन-तीन वर्षांची एक मुलगी. असे रस्त्याच्या कडेला बसून भीक मागणाऱ्या बायका आणि त्यांची लहान मुले हे दृश्य मी या बाजूला बर्याच वेळा पाहिले होते. काही वेळेला ते फुगे किवा प्लास्टिकच्या पिशव्या विकताना दिसत. ही मुलगी रडत होती आणि आईला हलवत होती.
“मा ,घर चलो ना!... मा, उठो ना” असे काहीतरी ती बोलत होती. तेवढ्यात आपटे रस्त्याच्या बाजूने दोन तरुण मोटारसायकलवरून आले. ती स्त्री जिथे झोपली होती, तिथे ते थांबले. मागे बसलेला तरुण पटकन खाली उतरला. त्या मुलीजवळ जाऊन त्याने तिला उचलले,
“चलो बेटा, घर चलो.” असे म्हणत तो मागे वळला. त्या मुलीने त्याला विरोध केला आणि ती जोरात रडायला लागली.
“मा को ले चलो ना. मा, मा. उठो ना” असे म्हणत तिने त्या तरुणाला आपल्या दोन्ही हातांनी मारायला सुरुवात केली.
स्वामीजी आणि मी जवळ उभे राहून हे पाहत होतो.
“बच्ची को छोडो.” स्वामीजी थोडे पुढे सरकून म्हणाले. ते आता त्या तरुणाच्या आणि मोटारसायकलवर बसून असलेल्या तरुणाच्या मध्ये आले.
“घर का मामला है! आप बीच मे मत बोलो.” तो मुलीला घेतलेला तरुण म्हणाला. पण त्याने त्या मुलीला खाली ठेवले.
“उसकी मा को उठने दो फिर…” स्वामीजी म्हणाले. ती लहान मुलगी परत आईजवळ गेली. तो तरुण परत त्या मुलीकडे सरकला,
“ए गोसावड्या, समजत नाही का? या मुलीच्या घरीच घेऊन चाललो आहे." तो आता मराठीत म्हणाला.
“उसकी मा को उठने दो| फिर लेके जाओ|” स्वामीजींनी आपला हेका सोडला नाही .
“ए, चलो जल्दी.” तो मोटारसायकलवरचा तरुण आता म्हणाला. मला शंका आली की प्रकरण काहीतरी वेगळे आहे.
तेवढ्यात त्या मुलीजवळ असलेल्या तरुणाने आपल्या खिशातून चाकू काढला, तो उघडत तो स्वामींना म्हणाला,
“हमारी बच्ची है! हम क्या करते है, क्या नही करते है इसमे तुम मत पडो.” असे म्हणत त्याने चाकू स्वामींच्या दिशेने उगारला.
मी स्वामींना सावध करायच्या आत स्वामींची लाठी फिरली आणि त्यांनी त्या तरुणाच्या खांद्यावर जोरदार प्रहार केला. तो तरुण एकदम किंचाळला आणि त्याच्या हातातून चाकू खाली पडला. आपला खांदा धरून तो तरूण आपल्या साथीदाराकडे गेला आणि ते दोघेही मोटरसायकलवरून पळून गेले.
स्वामीजी मग त्या झोपलेल्या स्त्रीकडे गेले. खाली वाकून त्यांनी तिला हाक मारली.
“माताजी, उठो| ये लोग आपके बच्चीको ले जा रहे थे|” त्या स्त्रीने काहीच हालचाल केली नाही, तेव्हा स्वामीजींनी आपला हात तिच्या नाकापाशी धरला. मग तिचा हात आपल्या हातात घेऊन तिची नाडी बघितली आणि ते माझ्याकडे वळून म्हणाले,
“मित्रा, ही तर जिवंत नाही! पोलिसांना फोन करून वर्दी दे.” मी माझा मोबाइल काढून फोन लावला. दरम्यान स्वामीजी त्या मुलीकडे जाऊन तिच्यासमोर वाकून बसत तिच्याशी बोलू लागले.
“आप का नाम क्या है बेटा?”
“माला…”
“ये मा है आपकी?"
“हां.. .ये उठती नही है|”
“ये अब भगवान के पास चली गयी है बेटा. आपके पिताजी कहा है?”
“मालूम नही|”
“ये कौन लोग तुम्हे ले जा रहे थे?”
“मालूम नही. मा अब भगवानके घरसे कब वापस आयेगी ?”
“मा वापस नही आयेगी बेटा.. पर वो हमेशा तुम्हारे पास रहेगी|”
“तुम कौन हो?”
“हम तुम्हारे दादाजी जैसे है बेटा|”
स्वामीजी कधीही खोटे बोलत नसत. लहान मुलांशी तर कधीच नाही . काही वेळा ते अप्रिय गोष्टीबद्दल मौन पाळत. या मुलीला काय समजले कुणास ठाऊक, पण त्यांचे प्रेम तिला नक्कीच समजले असावे.
आता स्वामीजींनी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले होते. ती मुलगीसुद्धा आता स्वामीजींच्या बोलण्यामुळे जरा सावरली होती. मी पोलिसात वर्दी देऊन माझा फोन खिशात ठेवला. त्या मुलीकडे मी आता जरा निरखून पहिले. जेमतेम दोन-तीन वर्षांची असावी ती. काळसर वर्ण, कृश शरीर, मानेपर्यंत नीट कापलेले केस आता जरा विस्कटलेले होते, तोंडावर आणि हातापायावर बरीच धूळ, कानात कसल्या तरी चमकत्या धातूची रिंग. गुडघ्याच्या खालपर्यंत येणारा फ्रॉक. त्याचा मूळ रंग ओळखणे कठीण होते, पण तो बराच मळलेला असावा. रस्त्यावरील पिवळसर प्रकाशात तो आणखीनच जुनाट आणि काळपट रंगाचा दिसत होता. मुळात बहुधा तो निळा असावा. नाकात एक चमकीसुद्धा होती आणि गळ्यात कसली तरी माळ. मोठी गोजिरवाणी मुलगी दिसत होती. किंबहुना ती तशी दिसावी आणि लोकाना दया येऊन तिला भीक द्यावी, अशीच तिच्या आईने योजना केली असावी. पण मला आकर्षित केले तिच्या चमकदार आणि काळ्याभोर डोळ्यांनी. तिच्या आईने तिला काजळ लावले होते, पण आता ते पार विस्कटून गेले होते. आपले अश्रूंनी डबडबलेले डोळे आपल्या चिमुकल्या हाताने पुसत ती स्वमिजींकडे पाहत होती. तिच्या हातातील तीन-चार बांगड्या त्या पिवळसर प्रकाशात चमकत होत्या. स्वामीजींनी आता तिला उचलून घेतले. आपल्या भगव्या नीट धुतलेल्या अंगरख्याला धूळ लागेल असले विचारसुद्धा त्यांच्या मनात आले नाहीत.
“बेटा, वो बुरे लोग फिरसे आ सकते है| हमे यहासे दूर जाना पडेगा| तुम हमारे साथ चलोगी? तुम्हारी मा को लेने हमारे मित्र आ रहे है|” स्वामीजी ममतेने त्या मुलीला म्हणाले.
त्या मुलीने वळून एकदा आपल्या आईकडे बघितले. भीती, आश्चर्य आणि असल्याच काही भावना तिच्या चेहऱ्यावर उमटल्या. तिचा चेहरा रडवेला झाला. तिने एकदम आईकडे झेप घेतली. स्वामीजींनी तिला आपल्यापाशी ओढून घेतली आणि ती मुलगी कसल्याश्या अनामिक श्रद्धेने त्यांना बिलगली.
स्वामीजी माझ्याकडे वळले आणि म्हणाले,
“विक्रम मित्रा, ते गुंड परत यायची शक्यता आहे. आपण आता या मुलीला इथून घेऊन जायला हवे. आपण इथून जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात जावे हे उत्तम.”
“चला मग, प्रभात रोड वरच एक पोलीस ठाणे आहे, तिथे जाऊ आपण.”
“आपला सारथी अजय कुठे जवळ असेल तर त्याला बोलावून घे, म्हणजे आपण लवकर पोहोचू.”
अजय लगेच आला आणि आम्ही ठाण्यात पोहोचलो. तिथले इन्स्पेक्टर गुप्ते माझ्या ओळखीचे होते. ते आपले काम आटपून घरी जायच्या तयारीतच होते.
“मी डॉक्टर अनिकेत गुहा. आणि हे बिडकर वकील. या लहान मुलीला काही गुंड पळवून नेत होते. आम्ही तिला त्यांच्या ताब्यातून सोडवून आणली आहे. आणि तिकडे प्रयाग हॉस्पिटलपाशी हीची आई मृताअवस्थेत आम्हाला सापडली. बिडकर वकिलांनी नुकतीच कंट्रोल रूमला त्याची वर्दी दिली आहे.”
स्वामीजी म्हणाले.
“वकीलसाहेब, बसा. हे आपल्या बरोबरच होते का? आणि हे बंगाली असून इतके चांगले मराठी कसे काय बोलू शकतात?” इन्स्पेक्टर गुप्ते जरा गोधाळून म्हणाले.
“स्वामीजी डॉक्टर आहेत. इथेच पुण्यात बीजे मेडिकलमध्ये ते शिकले आहेत. त्यांना बऱ्याच भाषा येतात. प्रेताबद्दल मी वर्दी दिली आहे. आता या मुलीचे काय करायचे ते पाहिले पाहिजे.” मी म्हणालो.
“या मुलीची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. मग तिला बाल सुधार केंद्रात दाखल करू.” इन्स्पेक्टर गुप्ते म्हणाले.
ती मुलगी आता स्वामीजींच्या खांद्यावर झोपून गेली होती. स्वामीजींनी तिला शेजारच्या बाकावर झोपवली. तिने थोडी चुळबुळ केली, पण मग लगेच परत झोपून गेली. तिच्याकडे मायेने पाहत स्वामीजींनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
“ती आपले नाव माला असे सांगते आणि ती मृत बाई आपली आई आहे असे म्हणते. आपले वडील कुठे आहेत याची तिला कल्पना नाही. हिंदी बोलू शकते ही मुलगी. तशी या मुलीला काही दुखापत झालेली वरकरणी तरी दिसत नाही .” स्वामीजी म्हणाले.
“ठीक आहे. वकीलसाहेब, पण आपण या वेळी रात्री इकडे कसे काय आलात? आपले इकडे काही काम होते का?” गुप्तेसाहेबांनी चौकशी केली. माझ्या मागच्या दोन-तीन भेटीत एक तरुण आणि कर्तबगार अधिकारी म्हणून गुप्ते मला माहीत झाले होते. वेगवेगळ्या साधू आणि बाबाजी याबद्दल त्यांचे मत काही फारसे चांगले नाही, याची मला कल्पना होती. पण मी त्यांना या स्वामीजींबरोबरच होतो, याची खातरी पटवून दिली आणि ही मुलगी घेऊन आम्ही पोलिसांकडेच आल्याने हे मुले पळवापळवीचे प्रकरण नसावे आणि त्यात या स्वामीजींचा काही हात नाही, याची त्यांची खातरी झाली. एका चाकूधारी गुंडाला या स्वामीजींनी लाठीचा प्रसाद दिला हे समजल्यावर त्यांना जरा आश्चर्य वाटले.
“मी इकडे याच वेळी इथे कसे आलो, हे फक्त स्वामीजीच सांगू शकतील. आम्ही चालत चालत त्या रस्त्यावरून जात होतो, तेव्हा हे प्रकरण घडले हेच खरे.” मी गुप्तेना म्हणालो. गुप्तेने स्वामीजींकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले.
स्वामीजी हसून म्हणाले,
“परमेश्वराची इच्छा.. मी इथे या वेळीच का आलो आणि या मुलीला त्या गुंडांच्या तावडीतून का सोडवले हे काही मी सांगू शकणार नाही. असो. पण ते महत्त्वाचे नाही. आता रात्र खूप झाली आहे. आम्ही आता निघतो. या मुलीची योग्य काळजी घ्या. बिडकरसाहेब आपल्या संपर्कात राहतील. या मुलीला योग्य घर मिळावे अशी माझी इच्छा आहे.”
हे सगळे प्रकरण संपून घरी परत येईपर्यंत रात्रीचे साडेअकरा वाजले होते. स्वामीजी मग आपल्या बेडरूममध्ये निघून गेले.
रात्री साडेआठ वाजता विश्रांतीसाठी निघालेले स्वामीजी एकदम मला घेऊन डेक्कन जिमखान्याकडे का आले, याचा मला उलगडा झाला होता.
पण त्या मुलीबाबत आपले काम अजून संपलेले नाही, असे मला सारखे राहून राहून वाटत होते.
पुढे काय होणार हे स्वामीजीच जाणे.
*******
इन्स्पेक्टर राहुल गुप्ते.
स्थळ - घोरपडेसाहेबांचा बंगला.
काळ - सकाळ, १० नोव्हेंबर २००३.
वेळ ८.३०.
साधू आणि बाबा या जमातीवर माझा अजिबात विश्वास नाही. अनुराधाचा आग्रह आणि घोरपडेसाहेबांचा शब्द.
“हे स्वामीजी वेगळे आहेत. तुम्ही एकदाच या. खरे सोने आणि पितळ यातला फरक तुमच्यासारख्या चाणाक्ष पोलीस अधिकाऱ्यापासून लपून राहणार नाही.”
दहा-पंधरा मिनिटे थांबायचे आणि निघायचे, असे ठरवून आलो आहे. पण एक प्रश्न मनात घोळवत होतो. अनेक संत ज्याचे गोडवे गातात, तो सद्गुरू कसा ओळखावा? माझे बाबा म्हणायचे, ”अरे, अंतरीची खुणगाठ लगेच समजते.”
आता हा स्वामी आनंदजी का कोण गुरू आहे, तो काय आहे ? आज बघतोच. माणूस बघताच तो किती पाण्यात आहे हे आम्हा पोलिसांना समजते.
मी आणि अनुराधा बरोबर ८.३० वाजता घोरपडेसाहेबांच्या बंगल्यात पोहोचलो. त्यांच्या प्रशस्त दिवाणखान्यात स्वामींचे प्रवचन होते. बरीच गर्दी दिसत होती. दोन मोकळ्या खुर्च्या पाहून मी आणि अनुराधा बसलो. समोर एक छोटे व्यासपीठ केले होते. त्यावर एकच खुर्ची होती. भिंतीला लागून एका स्टुलावर दत्ताची एक सुरेख मूर्ती होती. त्याच्यासमोर एक समई तेवत होती. मूर्तीसमोर बागेतील ताजी फुले ठेवलेली होती. मला का कोण जाणे खूप प्रसन्न वाटले. अनुराधाच्या चेहऱ्यावरसुद्धा एक स्मित झळकले. तिने दत्ताच्या मूर्तीकडे पाहून हात जोडले आणि आपले डोळे मिटून ती कितीतरी वेळ तशीच बसून राहिली. आमचा प्रकाश गेल्यापासून असे मनापासून स्मित फार कमी वेळाच तिच्या चेहऱ्यावर मला दिसले असेल.
थोड्याच वेळात स्वामीजी भरभर चालत स्टेजवर आले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला! काल रात्री आमच्या पोलीस ठाण्यात हेच आले होते. त्या वेळी त्यांनी 'डॉक्टर अनिकेत गुहा' अशी आपली ओळख करून दिली होती. मी कालसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालो होतो.
भगव्या रंगाचा पायघोळ अंगरखा, पिळदार शरीरयष्टी. जेमतेम पन्नास वर्षांचे असावेत स्वामीजी. व्यवस्थित दाढी केलेला चेहरा आणि अगदी बारीक कापलेले केस. कपाळावर लाल रंगाचा टिळा. हातात कालचीच लाठी आणि मला कालही जाणवलेले शांत पण अथांग असे डोळे.
त्यांनी आल्यावर दत्ताच्या मूर्तीला नमस्कार केला आणि मग स्मितहास्य करत जमलेल्या सर्वांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. मग जमलेल्या सगळ्यांकडे एक नजर फिरवली. माझ्याकडे आणि अनुराधाकडे पाहत जणू त्यांनी आमच्या नजरेला नजर मिळवली. एक क्षणभरच .मग ते सर्वाना उद्देशून म्हणाले,
“आपले स्वागत आहे. या प्रसन्न सकाळी आजपासून नव्हे, या क्षणापासून आपले सर्वांचे जीवन आनंदमय होऊ दे, अशी परमेश्वराचरणी प्नार्थना करून मी आजच्या चर्चेला सुरुवात करतो. आपण दूरदर्शनवर आणि वर्तमानपत्रात नेहमी भोंदू बाबांना पकडले, त्यांना शिक्षा झाली अशा बातम्या वाचत असतो. आपल्या अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी येत असतो - सद्गुरु कसा ओळखायचा? आज आपण त्यावरच बोलणार आहोत."
स्वामीजी आता इंग्लिशमध्ये बोलत होते. माझ्या मनात क्षणभर वीज चमकावी असे झाले. स्वामींना माझ्या मनातील प्रश्न कसा समजला? ते माझ्याशीच बोलत आहेत की काय?
“माझे गुरू - ज्यांना मी गुरुजी म्हणतो, ते माझ्या मते सद्गुरू आहेत. मला त्यांच्यात काय जाणवले ते मी सांगतो, म्हणजे तुम्हाला सद्गुरू कसा ओळखायचा हे कळेल.
पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या सान्निध्यात गेल्यावर मला काय वाटते? माझ्या मनात निखळ, निर्हेतुक आणि उत्स्फूर्त असा आनंद निर्माण होतो. माझ्या मनात आनंदाचा झरा निर्माण करण्याचे सामर्थ्य सद्गुरूंमध्ये आहे, हे मला पदोपदी जाणवते.
दुसरी गोष्ट.. गुरुजी मला फक्त मार्ग दाखवत नाहीत. माझा हात धरून मला ते योग्य मार्गावरून चालवतात आणि अनुभव देतात. प्रत्येक क्षणी ते माझ्या बरोबर असतात. आत्ता या क्षणी मी जे तुम्हाला सांगतोय ते मी आताच तुम्हाला का सांगतोय हे मला माहीत नाही, पण ते त्यांना माहित आहे आणि काही विशिष्ट हेतूने ते माझ्याकडून तुम्हाला सांगितले जाते आहे, अशी माझी खातरी आहे.
तिसरी गोष्ट. आपण सगळे परमेश्वराच्या हृदयात आहोत आणि तो आपल्या हृदयात आहे असा अनुभव ते मला पदोपदी देतात. हा कल्पनाशक्तीचा विलास नाही. प्रत्यक्ष अनुभव मला माझे गुरुजी देतात.
तर मित्रांनो, सद्गुरू हा असा असतो.. असा हवा.”
मग स्वामीजींनी या तीन गोष्टींवर सखोल मार्गदर्शन केले. बाकी लोकांना काय समजले कुणास ठाऊक, पण स्वामीजी माझ्या मनातील कुशंका एक एक करून नाहीशा करत होते, हे मला स्पष्टपणे जाणवत होते.
माझे सद्गुरु मला मिळाले होते का? आमच्या जीवनात प्रकाश परत येणार होता का? हीच ती वेळ होती का?
आपले प्रवचन संपल्यावर स्वामीजींनी लोकांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. अनुराधाने माझ्याकडे पाहत मला विचारले,
“तू स्वामींची उलटतपासणी घेणार होतास ना? तुझे काही प्रश्न असतील तर विचार .”
मी अनुराधाचा हात माझ्या हातात घेतला आणि म्हणालो,
“मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत आणि पुढे येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरेसुद्धा फक्त हेच स्वामी देऊ शकतील अशी माझी खातरी पटली आहे.” अनुराधाने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी जमा झाले. पण हे वेगळे अश्रू होते. समाधानाचे.
मग घोरपडेसाहेबांनी आमची स्वामीजींची ओळख करून दिली.
आम्ही दोघेही त्यांच्या पायाशी वाकलो, तेव्हा स्वामीजी आम्हाला अडवत म्हणाले,
“माझ्या नको, या दत्तगुरूंच्या चरणी नम्र व्हा.”
मी घोरपडेसाहेबाना आमच्या कालच्या भेटीची माहिती दिली. ते हसून म्हणाले,
“म्हणजे तुमची अगोदरच ओळख झाली आहे तर.. स्वामीजी केव्हा काय करतील कुणास ठाऊक?”
स्वामीजी नुसतेच हसले आणि त्यांनी मग अनुराधाबरोबर थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग आम्ही घरी आलो.
माझ्या मनात स्वामीजींनी आदराचे स्थान मिळवायला सुरुवात केली होती, तरीही आपल्या खबरी लोकांकडून या स्वामीजींसंबंधी नीट माहिती काढायची, असे मी ठरवले होते.
पण मला जी माहिती मिळाली, त्यावरून स्वामीजी एक सिद्धपुरुष आहेत आणि अतिशय स्वच्छ चारित्र्याचे आहेत, हे प्रत्येकाने मला सांगितले आणि मग मला बिडकर वकिलांचा फोन आला. स्वामीजींना मला आणि अनुराधेला भेटायचे आहे, ते आमच्या घरी केव्हा येऊ दे असे ते विचारत होते.
दुसर्याच दिवशी स्वामीजी आणि बिडकर वकील आमच्या घरी आले.
“काही दिवसांपूर्वी जी मुलगी मी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो होतो, तिला तुम्ही दत्तक घ्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे." स्वामीजींनी प्रस्ताव ठेवला .
आणि मग आमच्या जीवनात प्रकाश उजळत दीपाली आमच्या जीवनात आणि घरात आली.
*******
दीपाली गुप्ते.
स्थळ - पुणे येथील गुप्ते कुटुंबाचे घर.
काळ - रात्र, ११ नोव्हेंबर २०१८.
वेळ - ८.३०
काही महिन्यांपूर्वी मला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि मला समजेना.. मी कुणा कुणाचे आभार मानू? आईबाबा म्हणतात माझ्या रूपाने त्यांच्या जीवनात पुन्हा हरवलेला प्रकाश आला. त्यांच्या जीवनात प्रकाश आला की नाही कुणास ठाऊक, पण माझ्या जीवनात आमूलाग्र बदल त्यांच्यामुळे झाला. नाहीतर मी कोणत्यातरी वेश्यागृहात सडत पडले असते. त्यांनी मला दत्तक घेतले.. एका भिकारी, अनाथ मुलीला. माझे नाव बदलून मला एक नवी ओळख दिली. आणि माझ्यावर पोटच्या मुलीपेक्षासुद्धा जास्त प्रेमाचा वर्षाव केला. काही वर्षापूर्वी त्यांनी मला हे सांगितले आणि तेव्हापासून दररोज त्यांच्या पाया पडल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही. मी त्यांची मुलगी नाही हे समजल्यावर मी काही दिवस सैरभैर झाले. पण मग मलाच माझी लाज वाटली. माझ्या आईने मला जन्म दिला नसेल, पण मातृत्वात ती कुठे कमी पडली ? आणि बाबा? ते तर सावलीसारखे माझ्याबरोबर असतात आणि असणार …
आणि स्वामीजी? ते तर माझे दादाजी आहेत, माझे परमेश्वर आहेत. त्यांचे आभार मी काय मानणार?
माझे भीक मागणे, फूटपाथवर राहणे.. मला फारसे काही आठवत नाही .
माझी खरी आईसुद्धा आठवत नाही. माझे खरे बाबा तर नाहीच नाही. स्वामीजींनी गुंडांच्या हातून माझी कशी सुटका केली हे आईबाबांनी मला काही वर्षांपूर्वी सांगितले होते, पण तो प्रसंग मला काही आठवत नाही .
पण एक आठवण मात्र मला कायम होती. ते काय आहे याची मात्र मला संगती लागत नव्हती. मला आईने तो प्रसंग सांगितला आणि मग मला सगळी संगती लागली आणि स्वामीजींची जणू नव्याने ओळख झाली.
तो क्षण जणू मनावर कायमचा कोरला गेलाय. भगव्या कपड्यातील एक स्वामीजी मला सांगत आहेत,
“हम तुम्हारे दादाजी जैसे है बेटा"”
त्या क्षणापासून कुठेही असले तरी स्वामीजींचे माझ्याकडे लक्ष असे.
सिद्धपुरुषाच्या तोंडून जे शब्द बाहेर पडतात, ते त्रिवार सत्य असतात. त्या क्षणापासून ते माझे आजोबा झाले होते.
मला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला, हे फोनवर त्यांना मी काही महिन्यांपूर्वी सांगितले. तेव्हा ते परदेशात होते आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले,
“बेटा, तुझ्या हातून हजारो लोकांचे प्राण वाचावेत हीच परमेश्वरची इच्छा आहे.”
आज इतक्या महिन्यांनी ते पुण्यात आले आणि आल्या आल्या मला भेटायला आले. त्यांची लाडकी नात होते ना मी! पण मीच का? अशा कितीतरी मुली-मुलांवर त्यांचा वरदहस्त असतो. पण मी किती भाग्यवान ,ते मला भेटायला आले.
त्यांना पाहताच मला रडू आवरले नाही. तेव्हा मला जवळ घेऊन माझे डोळे पुसत ते म्हणाले,
“हा तुझा दादाजी असताना तू रडतेस का बेटा?“
“दादाजी.. परमेश्वर तुमच्याच रूपात मला नेहमी दिसत आला आहे. पण आज किती दिवसांनी तुमची भेट होते आहे, म्हणून रडू आले. तुम्ही आणि माझे आईबाबा असताना मला काय कमी असणार?” मी म्हणाले आणि मला परत रडू फुटले. पुढे काही मला बोलता आले नाही .
जगाचे स्वामीजी पण माझे दादाजी नुसतेच हसले आणि मग आईने दिलेले दूध पीत, आपला परदेश दौरा कसा झाला ते मला कितीतरी वेळ सांगत बसले.
काही वेळाने ते गेले आणि त्यांच्या येण्याने आमचे घर पावन झाले असे मला आणि आईला वाटले.
मग आईच्या कुशीत शिरून मी अनेक वेळा तिला विचारलेला प्रश्न पुन्हा एकदा विचारला,
“आई, स्वामीजी त्या वेळी तिथे आले नसते आणि मला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवले नसते तर?” आत्तापर्यंत हजार वेळा मी हा प्रश्न विचारला असेल, आई काहीना काही उत्तर देत असे. आमचे भाग्य, तुझी पूर्व पुण्याई वगैरे वगैरे..
पण का कोणास ठाऊक, आज आईने थोडे वेगळे उत्तर दिले. आजचा दिवसच वेगळा होता ना?
“दीपा, मी तुला नेहमी सांगते ना? या तीन दिवसांत सूर्यकिरण संध्याकाळी महालक्ष्मीच्या मूर्तीला दर वर्षी स्पर्श करतात. पण हे असे योग्य स्थळी, योग्य काळी आणि योग्य वेळी व्हावे हे कुणा योजकाने ठरवून तसे मंदिर बांधले, म्हणूनच ना? स्वामीजी तसे योजक आहेत. योग्य स्थळी, योग्य काळी आणि योग्य वेळी ते बरोबर तिथे हजर असतात. तुझ्या जीवनात त्या वळणावर ते नेमके पोहोचले आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनात प्रकाश आणला."
“माझ्या जीवनातील योजकाला शतशः प्रणाम. त्यांची कृपा आम्हा सर्वांवर अशीच राहो. ” मी म्हणाले .
माझी खातरी आहे, स्वामीजी जिथे असतील तिथून म्हणाले असतील ,
“ तथास्तु!”
प्रतिक्रिया
7 Nov 2022 - 8:38 am | ॲबसेंट माइंडेड ...
काय सुंदर कथा लिहिली आहे. खुप आवडली.
8 Nov 2022 - 8:31 am | Jayant Naik
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार
7 Nov 2022 - 12:26 pm | मार्गी
खूपच सुंदर आणि अप्रतिम कथा. कथा म्हणवत नाही, इतकी खरी आणि जीवंत वाटली. मनात वाटतंय की, कुठे तरी ही अंशत: तरी सत्यकथा असली पाहिजे. आणि वर्णनात जे अध्यात्माचं विवेचन आलंय, तेही फार सुरेख आणि रिलेट होणारं. त्यामुळे असंच वाटतंय की, ही कथा कथा नसून एखाद्या अनुभूतीची/ घटनेची आंशिक अभिव्यक्तीच असली पाहिजे! अनेक धन्यवाद!
8 Nov 2022 - 8:41 am | Jayant Naik
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. आपण म्हणता ते खरे आहे. लेखक आपल्याला आलेल्या अनुभवांच्या भोवतीच कथा गुंफत असतो. पण काही अनुभव सोडले तर ही कथा काल्पनिक आहे. तथापि तुम्हाला ही सत्यकथा वाटली यातच या कथेचे यश आहे असे मला वाटते.
8 Nov 2022 - 8:43 am | Jayant Naik
ती म्हणते " खूपच सुंदर कथा आहे.विशेषतः महालक्ष्मीला होणारा सूर्यकिरणांचा स्पर्श आणि आपल्या जीवनाला होणारा देवत्वाचा स्पर्श हे साधर्म्य तर ग्रेटच.
खूप आवडली."
9 Nov 2022 - 2:35 pm | श्वेता२४
स्वगत रुपाने लिहीलेली पण कथेला पुढे पुढे घेऊन जाणारी शैली आवडली.
10 Nov 2022 - 10:52 am | Jayant Naik
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार
9 Nov 2022 - 2:52 pm | सस्नेह
छान लिहिली आहे कथा. कथानकपण चांगले आहे.
10 Nov 2022 - 5:24 pm | Jayant Naik
अतिशय आभार
9 Nov 2022 - 9:11 pm | टर्मीनेटर
झकास कथा 👍
दर वर्षी दिवाळी अंकातली तुमची कथा छानच असते ह्यात शंकाच नाही. पण ह्यावेळची मात्र खुपच छान आहे. तो फेसबुक वर एक स्टीकर आहे ना "Super Se Bhi Upar" एकदम त्याप्रमाणेच.
धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेछा!
10 Nov 2022 - 5:28 pm | Jayant Naik
आपल्या सारख्या दर्दी लेखकाच्या अश्या अभिप्राय च्या शिवाय माझ्या सारख्या लेखकाला अजून काही नको
9 Nov 2022 - 10:28 pm | पॉइंट ब्लँक
वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या आणि वरवर संबंधित न वाटणाऱ्या घटना, एका उद्देशपूर्तीसाठी अध्यात्माच्या धाग्यात छान गुंफल्या आहेत.
10 Nov 2022 - 5:30 pm | Jayant Naik
आपले अनेक आभार
10 Nov 2022 - 5:46 pm | सरिता बांदेकर
छान लिहीली आहे तुम्ही कथा.
कालपासून किरणमहोत्सव सुरू झाला अंबाबाईचा आणि आज ही कथा वाचली हा पण योगा योगच म्हणावा लागेल.
लहानपणी बघितला आहे किरण महोत्सव, तेव्हा एव्हढी गर्दी नसायची.
आवडली कथा.
11 Nov 2022 - 5:40 am | Jayant Naik
होय.. योगायोग नक्कीच आहे. पण प्रत्येक योगायोगा मागे तो अदृश्य योजक असतोच की! तुमचा विश्वास असो अथवा नसो.
16 Nov 2022 - 6:02 pm | श्वेता व्यास
खूप अप्रतिम कथा.
असे सद्गुरू आयुष्यात असणं हे केवढं परमभाग्य!
16 Nov 2022 - 8:21 pm | Jayant Naik
मुळात गुरु भेटणे कठीण. आणि त्यात सदगुरू भेटणे म्हणजे खरेच परम भाग्य .
19 Nov 2022 - 1:26 pm | अथांग आकाश
सुरेख कथा! फार आवडली!!
21 Nov 2022 - 10:42 am | Jayant Naik
आपले खूप आभार
21 Nov 2022 - 2:53 pm | स्वधर्म
आपला वॉल्डन हा अनुवाद वाचला आहे. खून आवडला होता.
22 Nov 2022 - 11:51 am | Jayant Naik
ही कथा माझी आहे आणि ती तुम्हाला आवडली याचा आनंद आहे पण तुम्ही जो Walden चा अनुवाद म्हणता तो मी केलेला नाही. तुमचा काही तरी गैरसमज होतो आहे.