अ‍ॅटिट्यूड वाला मुण्डा!

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
5 Nov 2022 - 1:10 am

साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान.

२००३ विश्वचषकाचा अंतिम सामना. ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरताना - हर्षा भोगलेंच्या शब्दांत सांगायचं तर "Somebody needed to TAKE ON McGrath" आणि ती जबाबदारी एका विक्रमादित्याने घेतली. चौथाच बॉल किंचित शॉर्ट पडल्यावर मिडविकेटला सणसणीत चौका मारला. पुढच्या बॉलला बाद झाला, पण "३६० करायच्या असल्या म्हणून काय झालं - घेऊ की शिंगावर" ही तयारी तरी दाखवली. सेहवाग असेपर्यंत थोडी धुगधुगी होती. पण ३६० धावांचा पाठलाग करणं आवाक्याबाहेरचंच होतं.

२०२२ चा टी-२० वर्ल्डकप. भारत वि. पाकिस्तान. ९० हजारापेक्षा जास्त लोकांनी भरलेलं एमसीजी. ८ चेंडूंत २८ धावा जिंकायला. प्रत्येक बॉलवर ३.५ धावा हव्यात. वातावरणात प्रचंड तणाव आणि तुटेपर्यंत ताणली गेलेली उत्सुकता. एक विक्रमादित्य जिवाच्या आकांताने लढतोय. पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी धडपडतोय. त्यांच्या त्या डावातला सर्वोत्कृष्ट बोलर हरीस रौफने पहिल्या चार चेंडूंवर फक्त तीन धावा दिलेल्या. ओव्हरचा पाचवा चेंडू... शॉर्ट ऑफ लेंग्थ....विक्रमादित्य किंचित बॅकफुटवर जातो...आणि चक्क सरळ बॅटनी बॉल समोर मारतो. बोलर सुन्न.... फील्डर्स स्तब्ध... कॉमेंटेटर्स नि:शब्द... आपले खेळाडू थक्क.... प्रेक्षक वेडेपिसे. अहो वेड नाही लागणार तर काय?? त्याने मारल्यावर बॉलला पंख फुटतात... तो उडत उडत जातो अन साइटस्क्रीनपलिकडे प्रेक्षकांत उतरतो. तरीही ड्रामा संपलेला नसतोच. अजूनही ७ चेंडूंत २२ हव्यात. पुढच्या बॉलला विक्रमादित्य आधीच मागे जातो. रौफने पुढे टाकलेल्या चेंडूला केवळ मनगटाने दिशा दाखव्तो आणि तो पांढरा गोळा पुन्हा गाण्यातल्या पाखरासारखा आकाशी झेप घेतो. पुढच्या ओव्हरमध्ये अजून एक सिक्स मारली जाते... अत्यंत थंड डोक्याने पाकिस्तानच्या घशातली मॅच काढली जाते. आणि काही दिवस पायउतार झालेला बॅटिंगचा राजा पुन्हा आपल्या सिंहासनावर विराजमान होतो. किंग कोहली!

त्या मॅच नंतरच्या मुलाखतीत विराट म्हणाला "I told Hardik, we need to take Shahin down. Nawaz has one over. If I take Haris down, then they will panic."

"Take ON" नाही बरं का.... "Take DOWN"... शिंगावर घ्यायचं नाही... संपवायचं... खात्मा करायचा... नेस्तनाबूत करायचं. २ ओव्हर्समध्ये असा हल्ला करायचा की शेवटचा बोलर खचलाच पाहिजे. १८ बॉलमध्ये ४८ रन्स हव्या असताना आमचा विक्रमादित्य समोरच्या बोलरला खल्लास करायच्या गोष्टी करत होता...आणि त्यानं तसं केलं देखील. मॅच नंतर विराटने आपल्या डायरीत नोंद केली असेल "Opponent eliminated".

ह्या माणसाचं वर्णन करायला एकच शब्द पुरेसा आहे - ATTITUDE, मूर्तिमंत अ‍ॅटिट्युड!

ह्या अ‍ॅटिट्युडची पहिली आठवण म्हणजे २०११ वर्ल्डकप मधला बांगलादेश विरुद्धचा सामना. विराटने बॉल सरळ मारल्यावर बोलर रुबेल हुसेनने तो अडवून थ्रो करण्याची अ‍ॅक्शन केली. बरं - तेव्हा क्रिकेटच्या मैदानावरच्या आपल्या लढायासुद्धा रामानंद सागरच्या रामायणासारख्या "हे रावण, मैं दशरथपुत्र राम तुम्हें युद्धके लिये ललकारता हूँ|" छाप असायच्या. त्या युद्धात सुद्धा एक प्रकारची फॉर्मॅलिटी होती. मुळात आधी कोणीतरी आक्रमण करायचं आणि मग आपण त्याला प्रत्युत्तर द्यायचं. "ते" वाईट वागायचे आणि मग आपण त्यांचा सामना करून त्यांचा पराभव करायचो. बोलर आधी आगावपणा करायचा आणि मग तेंडुलकर त्याला धोपटायचा. आधी आमिर सोहेलने बॅट दाखवायची आणि मग वेकंटेश प्रसादने त्याचा स्टंप उडवायचा. जणू Gentleman's game चं जंटलमनत्व जपायची नैतिक जबाबदारी आपली होती. या परंपरेला अनुसरून विराटने तेव्हा दुसरीकडे बघून मग पुढच्या एखाद्या बॉलवर आपल्या बॅटनी उत्तर देणं अपेक्षित होतं. पण झालं भलतंच.

डोळ्याची पापणी सुद्धा न लवू देता या दिल्लीच्या छोकर्‍याने रुबेलला ऐकवलं "क्या हुआ?? भें** बोलिंग कर - चल!" क्षणापूर्वी आक्रमक वाटणारा तो रुबेल बिचारा चेहरा पाडून आल्या पावली परत गेला. तेव्हा अनेकांना "चांगल्या घरातल्या मुलीला असं वागणं शोभतं का"? च्या स्टाईलमध्ये "आपल्या बॅट्समनला असं शिव्या देणं शोभतं का?" वगैरे वाटलं असेल. पण ही येऊ घातलेल्या वादळाची नांदी होती. आता त्या नांदीचा पहिला शब्दच "भ"कारानी सुरू होणारा तीन अक्षरी शब्द होता त्याला कोण काय करणार?

उर्मटपणा, उद्धटपणा, माज, रग ह्या गोष्टी बिनडोक रोड-रोमियो गावगुंडांकडेपण असतात. पण याच गोष्टी एखाद्या निडर, कट्टर देशप्रेमी, मेहनती, विजिगीषु वीराच्या बाबतीत विरघळून आक्रमकता नावाचं धारदार शस्त्र बनतात. नुसती आक्रमकता असून चालत नाही - ती निभावता यावी लागते. आणि ती निभावण्यासाठी फक्त जिगर असून भागत नाही तर त्यामागे भक्कम टेक्नीक लागतं. आणि ह्या मुलाकडे उत्तम टेक्नीक होतं, पुस्तकातले आणि पुस्तकाच्या बाहेरचे अनेक फटके होते, खेळाची प्रगल्भ समज होती आणि मुख्य म्हणजे नुसती धावांचीच नाही तर जिंकण्याची भूक होती. २००८ ते २०१२ मधला प्रत्येक डाव छिन्नी बनून कोहलीमधल्या street fighter ची एक एक कपची उडवत त्यातून एक दिग्विजयी योद्धा घडवत होता. होबार्टमधल्या श्रीलंकेविरुद्धच्या ८६ बॉल १३३ धावांच्या खेळीने त्याला युवराजपदी बसवलं. लगेच पाकिस्तानविरुद्ध ढाक्यात ३३० धावांच्या पाठलागात १८३ धावा ठोकल्या गेल्या. जयपुरमध्ये तब्बल ३५९ चेस करताना रोहित, शिखर आणि विराट या आमच्या फक्त तीन बॅट्समननी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा धुव्वा उडवला. रैना, युवराज, धोनी, जडेजा आत निवांत बसले होते. २००३ मध्ये ३५९ चा पाठलाग करताना १२५ धावांनी हारलो होतो. या वेळी तब्बल ३९ चेंडू आणि ९ विकेट्स राखून २००३ चा बदला चक्रवाढ व्याजाने घेतला गेला. ३३०-३५० चा स्कोरसुद्धा भारतीय फलंदाजीसमोर पुरेसा ठरत नव्हता. आणि दर वेळी त्या पाठलागाचा कणा होता तो विराट!

ह्या माणसाने फलंदाजीतली आक्रमकता वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवली. त्याने जिंकून दिलेले सामने, पाठलाग करतानाची त्याची आकडेवारी, सामना "संपवण्याची" त्याची हातोटी, त्याची फील्डिंग, त्याचा फिटनेस ह्यांबद्दल लिहीत बसलो तर एक ग्रंथ तयार होईल. पण विराट जेव्हा केव्हा निवृत्त होईल तेव्हा तो ओळखला जाईल त्याच्या "अ‍ॅटिट्यूड" साठी!

वयाच्या १८व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी मैदानावर उतरण्याचा अ‍ॅटिट्यूड. "He has carried the burden of the nation for 21 years. It is time we carried him on our shoulders" म्हणत सचिनला खांद्यावर घेणारा अ‍ॅटिट्यूड. हुल्लडबाज प्रेक्षकांना middle finger दाखवण्याचा आणि वॉर्नरची टवाळी न करता त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगायचाही अ‍ॅटिट्यूड. शतक मारल्यानंतर खुल्लमखुल्ला आपल्या "गर्लफ्रेंड" अनुष्काला (लग्ना आधी) बॅटनी फ्लाइंग किस देण्याचा अ‍ॅटिट्यूड. फिटनेससाठी अपार कष्ट आणि त्याग करण्याचा अ‍ॅटिट्यूड. आपल्या सहकार्‍याचंच नव्हे तर प्रतिस्पर्ध्याचं देखील खुल्या दिलाने कौतुक करण्याचा अ‍ॅटिट्यूड. धावा होत नसताना होणार्‍या टिकेला त्याच भाषेत उत्तर देण्याचा अ‍ॅटिट्यूड. पाकिस्तानच्या आमीरचं पुनरागमन क्रिकेटसाठी गरजेचं आहे असं आवर्जून नमूद करण्याचा अ‍ॅटिट्यूड. मैदानावर अचानक बिनधास्त नृत्य सुरू करण्याचा अ‍ॅटिट्यूड. आयपीएलमध्ये नजरेला नजर भिडवून खुन्नस देणार्‍या सूर्यकुमार यादवचं भरभरून कौतुक करण्याचा अ‍ॅटिट्यूड.

ह्या सगळ्यामध्ये ठळक उठून दिसतो आणि भावतो तो त्याचा नि:स्वार्थीपणा. संघ जिंकणं हे एकच उद्दिष्ट त्याच्या डोळ्यांसमोर असतं. केवळ संघाच्या गरजेप्रमाणे तो त्याची खेळी उभारतो. स्वतःचा स्कोअर किती होतोय, आपण ४८ किंवा ९७ धावांवर नाबाद राहातोय का असल्या गोष्टींची त्याला अजिबात फिकीर नसते. हा इसम धोनीने त्याचं शतक व्हावं म्हणून डॉट बॉल खेळला तर त्याच्यावरच नाराज होतो, आपण ४९ वर असताना कार्तिकला मॅच लवकर संपवायला सांगतो, आपलं शतक व्हावं म्हणून कधीच डावाच्या momentum मध्ये फरक पडू देत नाही. आपल्या साथीदारासाठी जीवाच्या आकांताने धावतो. "हार्दिक चांगला मारत होता म्हणून मी माझा वेग कमी केला" असं सहज बोलून जातो.

तो सचिनचे विक्रम मोडेल की नाही, अजून किती धावा, किती शतकं करेल हे प्रश्नच मुळात गौण आहेत. विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर क्रिकेटपलिकडेही खूप काही देऊन जातो आहे. सचिन टेनिस एल्बोनंतर आपल्या तरुण सहकार्‍यांच्या साथीत अजून खुलला होता. हरपलेल्या फॉर्मनंतरचा Kohli 2.0 काय असेल ह्याची आत्ताच्या वर्ल्डकपमध्ये फक्त झलक दिसते आहे. ओये मुन्डा तो कमाल दा ए. अग्गे अग्गे देख्खो की होन्दाए. अपणा गब्रू जवाण ऐसा खेडणाए कि चक दे फट्टे. चीकूपाको जणमदिणादी लख लख वदाइयाँ. रब रखां!

© - जे.पी. मॉर्गन

क्रीडाप्रकटनसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

शलभ's picture

5 Nov 2022 - 1:20 am | शलभ

एक नंबर लेख.

फारएन्ड's picture

5 Nov 2022 - 4:42 am | फारएन्ड

मजा आली वाचायला. बिग-५ नंतर इतर कोणी खेळाडू जरी आवडला तरी त्यांनी ती तशी पॅशन पुन्हा निर्माण केली नव्हती. परवाच्या कोहलीच्या खेळीने ती झाली. मी शेवटच्या पाच एक ओव्हर्स पुन्हा पुन्हा बॉल टू बॉल पाहिल्या. ती १९ वी ओव्हर आता अजरामर होईल.

पूर्वीचा कोहली निर्विवाद विजेता होता. अ‍ॅरोगंट होता. असे लोक भारतात एका लिमिटच्या पुढे लोकप्रिय होत नाहीत. पण हरलेला आणि संपला म्हणून निकालात काढलेला कोहली पुन्हा उठतो आणि मॅच जिंकून देतो. त्याच वेळेस एकदम भावूक रिअ‍ॅक्शन देतो - याला आपल्याकडे प्रचंड सपोर्ट मिळतो. त्यामुळेच कोहली आता "त्या पंक्तीत" गेला.

श्रीगुरुजी's picture

5 Nov 2022 - 7:39 am | श्रीगुरुजी

फारच सुंदर लेख! मागील १-२ वर्षात तो अपेक्षेप्रमाणे धावा करीत नव्हता. परंतु "कामगिरी तात्पुरती असते, दर्जा कायमस्वरूपी असतो" या उक्तीला अनुसरून तो पुन्हा मोठे डाव खेळायला लागलाय.

धर्मराजमुटके's picture

5 Nov 2022 - 8:58 am | धर्मराजमुटके

छान लेख ! आणि विराट चे कर्तुत्व ही सरस आहे.
मात्र व्यक्तीशः अ‍ॅटीट्यूड वाले मुण्डे आणि मुण्डी दोघेही मला आवडत नाहीत. डोक्यात जातात. 'अ‍ॅटीट्यूड'स होम डाऊन' अशी काही म्हण लहानपणी शिकल्याचा परिणाम असावा. कदाचित ही म्हण कलियुगात लागू नसावी ते एक असो. मुळात दिल्ली, हरियाणा आणी पंजाबी लोकांच्यात सढळपणे शिव्यांचा वापर असतो ते मला पटत नाही. ही लोक कदाचित बापाला देखील आई-बहिणीवरुन शिव्या देत बोलत असावेत. (माझ्या बघण्यात बायकोला अशा शिव्या देणारा एक नग आहे). आता इथे उघड्यावर संवाद लिहिणे योग्य दिसणार नाही.

"कामगिरी तात्पुरती असते, दर्जा कायमस्वरूपी असतो" या गुरुजींच्या वाक्याशी सहमत !

Bhakti's picture

5 Nov 2022 - 10:45 am | Bhakti

अगदी अटिट्यूडवाला मुण्डा आहे.खेळात एव्हढ मनमौजी?पुढचा वर्ल्ड कप यात आणखिन सकारात्मकता येवो.

तुषार काळभोर's picture

5 Nov 2022 - 4:10 pm | तुषार काळभोर

प्रत्येक पिढीचे स्वतःचे हिरो असतात, आणि त्यांना पुढची पिढी बहुतेकदा नावडती असते. म्हणजे गावस्कर आवडणार्‍यांना तेंडुलकर आवडत नाही, तेंडुलकर आवडणार्‍यांना कोहली आवडत नाही, दिलीपकुमार ज्यांचा हिरो होता त्यांना अमिताभ, आणि अमिताभ हिरो असलेल्यांना शाहरुख आवडत नाही. शाहरुख पाहत मोठे झालेल्यांना आताचा कोण तो टायगर आणि सिद्धार्थ मल्होत्रा आवडत नाही. थोडं जनरलायझेशन केलंय. पण साधारण असं असतं.
तुम्ही याआधीच्या पिढीतील क्रिकेटपटूंविषयी जितक्या आत्मीयतेने लिहिलंय, तीच विराट कोहलीसाठीसुद्धा दिसून येतेय. यासाठी मनःपूर्वक अभिनंदन!!

मला वैयक्तिक आता क्रिकेट मध्ये रस राहिलेला नाही. पाचेक वर्षे आयपीएल पाहिलेलं नाहीये. एकेकाळी प्रत्येक संघाची प्रत्येक सिरीज, प्रत्येक दौरा, प्रत्येक सामना यातील बरीच सांख्यिकी तोंडावर असायची. आता टी-२० वर्ल्डकप सुरू झाल्यावर ते कळलं. भारत-पाकिस्तानची मॅच कधी होती, तेही माहिती नव्हतं. बघितली नाहीच.
नंतर बातम्या वाचून, सगळीकडेच त्या सामन्याविषयी वाचूनही विशेष काही वाटलं नाही.
आताचे विराट, रोहीत, हार्दिक हे खेळाडू अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाहीत! अंपायरने बोट वर करायच्या आधी चालणे सुरू करणारा सचिन पाहिलेला मी, १९४ वर असताना द्रविडने डाव घोषीत केल्याची नाराजी त्याने चेहर्‍यावर दाखवली, तेही पटलं नव्हतं!! हा एवढा अ‍ॅटिट्यूड झेपतच नाही ब्वॉ! माझ्यासाठी क्रिकेटमधील भारतीय अ‍ॅटीट्यूडचं सर्वोच्च शिखर म्हणजे दादाने लॉर्ड्सवर शर्ट काढून फिरवला ते. दिवसभर खेळपट्टीवर टिकून संध्याकाळी परत येतानादेखील राहूल आणि लक्ष्मणचा शांत चेहरा अजून आठवतो, तिथे विराटचा 'माजोरडा अ‍ॅटिट्यूड' कसा पचनी पडणार, राजेहो!!

तरीपण..
लेख मनापासून आवडला! मनःपूर्वक धन्यवाद!!

श्वेता व्यास's picture

5 Nov 2022 - 4:25 pm | श्वेता व्यास

हॅपीवाला बड्डे किंग कोहली !

हा लेख कसा सुटला म्हणायचा..! नेहमी प्रमाणेच अप्रतीम! पण तुमच्या लेखणीतून लेख उतरत असला की संपूच नये असं वाटतं.. त्यामुळे कमीत-कमी ५ भागांची मालिका लिहा या अ‍ॅटीट्यूड वाल्या भौ साठी! गरज आहे हो जिगरी खेळाची!!

कोहलीची अ‍ॅटीट्यूड आतून आलेली वाटते, जशी युवराजची वाटायची! आणि जेवढं त्याला छेडाल तेवढा तो जास्त उसळतो!!
लेकाचा हरला तरी माणसाची कॉलर खाली जात नाही! जीव तोडून खेळतो.. आणि तेच आवडतं! लढणार्‍याच्या लढवय्येपणाचंच आपल्याला कौतूक! :-)

बाकी मला त्याचा २०१४-१५ चा ऑस्ट्रेलिया टूर वरचा जिगर आठवतो.. कसला भारी खेळत होता तो त्या सिरीज मधे! हॅट्स ऑफ्!!