दिवाळी अंक २०२२ - ललित - तुला कसे बोलावू?

मित्रहो's picture
मित्रहो in दिवाळी अंक
3 Oct 2022 - 8:41 am

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */

.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}

.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}

.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}

@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}

.field-items img{max-width:100%;height:auto;}.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}

मी माझ्या एका मित्राला खूप वर्षांनंतर भेटत होतो. वर्धा सोडल्यानंतर मी दक्षिण भारतात स्थिरावलो आणि तो पुण्यात स्थिरावला. मनमुराद गप्पा सुरू होत्या. मित्राशी बोलताना जाणवत होते की पुण्याबाहेरील मंडळी पुण्यात राहायला लागल्यानंतर ओढूनताणून स्वतःच्या भाषेवर शुद्ध भाषेच्या नावाने जे अत्याचार करतात, तसेच काहीतरी माझ्या मित्राच्या मराठीचे झाले होते. मंडळी पुण्यात गेल्यावर स्वतःच्या भाषेचे असे भजे का करून घेतात, कळत नाही. मित्राच्या बोलण्यातली औपचारिकता आणि माझ्या बोलण्यातला अघळपघळपणा यातला फरक मला जाणवत होता. थोड्या वेळाने त्याने त्याच्या बायकोशी माझी ओळख करून दिली.
“माझी मिसेस.”
“नमस्कार” - मी.
“वहिनीसुद्धा आल्या आहेत का?”
“नाही, ती मुंबईला गेली. आमच असंच असतं. बायको एकीकडे, मी दुसरीकडे. बायको तिच्या नातेवाइकाकडे जाते, मी माझ्या.”

रस्त्यावरून चालताना अचानक सुतळी बॉम्ब फुटल्यावर माणूस जसा दचकतो, तसे ते दोघेही माझ्या बोलण्यात ‘बायको’ हा शब्द ऐकून दचकले. खरे तर दचकायचे काही कारण नव्हते. बायकोला बायकोच म्हणणार, नाहीतर काय पापपुण्यसहवाटेकरी वगैरे म्हणणार? तसेही कोणी पापपुण्यात सहवाटेकरी नसतो, हे वाल्मिकी काळापासून ऐकून आहोत. बायको हा तुलनेत बराच सोज्ज्वळ शब्द आहे, असे माझे मत आहे. बायकोला कुटुंब, खटलं, बंब, हिटलर असे शब्दसुद्धा आहेत. ज्या स्त्रीला मिसेस असे संबोधल्याने प्रतिष्ठा मिळते, त्याच स्त्रीला बायको असे संबोधले तर ती प्रतिष्ठा जाते का? तसेही चारचौघात बायकोला मिसेस म्हटले म्हणून घरी गेल्यावर लगेच चहा मिळतो असे काही नाही. बायको या शब्दाला दुसरा सर्वमान्य शब्द पत्नी असा आहे. पती व पत्नी या दोन शब्दांवर सरकारचे पेटंट असल्यासारखी छाप पडली आहे. कोणत्याही सरकारी फॉर्ममधे पतीचे नांव, पत्नीचे नाव असेच असते. कुठेही बायकोचे नाव, किंवा भार्येचे नाव असे नसते. या सरकारी बाबू मंडळींनी पतीपत्नीला पार सरकारी करून टाकले आहे. नवरा-बायकोला पती-पत्नी म्हणणे म्हणजे घरातल्या जुन्या वह्यांना दस्तऐवज म्हणण्यासारखे आहे. सरकारी शब्द वापरला म्हणून सरकार शाब्दिक कर लादेल की काय अशी भीती वाटते, म्हणूनच मी पत्नी हा शब्द वापरणे टाळतो. बघा, बायको हा शब्द वापरण्यामागे हे शास्त्र आहे, विचार आहे, तरी मंडळी बायको म्हटले की तोंड वाकडे करून बघतात.

बायकोला सोज्ज्वळ आणि औपचारिक शब्द नाही असे नाही, परंतु बायकोचा सोज्ज्वळता, औपचारिकता याच्याशी काही संबंध असतो का? विचार करा, तुम्ही घरात आल्यावर जर बायको सोज्ज्वळ आणि औपचारिक वागायला लागली, तर घरात नाही हॉटेलात आल्यासारखे वाटेल. कुणी फारच सौजन्य प्यालेला असेल तर त्याने इंग्लिश My better halfसारखी माझी अर्धांगिनी म्हणावे. त्याने प्रतिष्ठा तशीच टिकून राहते आणि तुमचे मातृभाषाप्रेमदेखील सिद्ध करता येते. माझी अर्धांगिनी गेली मुंबईला आणि मी नागपूरला असे म्हणणे म्हणजे गाडीचे इंजीन मुबंईला गेले, पण डबा नागपूरातच राहिला असे म्हणण्यासारखे होईल. काही मंडळी मिसेस या इंग्लिश शब्दाऐवजी वाइफ हा पर्यायी शब्द वापरतात. इंस्टाच्या इन्स्टंट पिढीने त्याचे Wify (वाइफी) केले. जिच्यापुढे माझ्या तोंडातून वाफ निघत नाही ती माझी वाईफी. घरात हल्ली Wify आणि Wifi यांचेच राज्य असते. मराठीतसुद्धा बायकोची लडिवाळ रूपे शोधायला हवी. जसे बायकोचे बायडी होऊ शकते, पण ते मराठी सिनेमाने पारशी समाजाला चिकटवले. असे लडिवाळ रूप शोधताना सांभाळून राहायला हवे. मराठी भाषेत संदर्भाबरोबर शब्दांचे अर्थ बदलतात. तुम्ही घऱात बायकोला लाडाने कितीही ‘माझी बायं’ असे म्हणा, पण समोरच्याशी ओळख करून देताना ही ‘माझी बाय’ म्हटले, तर तो भलताच अर्थ काढायचा.

परदेशस्थित मंडळी तिथल्या जनतेप्रमाणे बायकोला 'हनी' म्हणतात. तू कशी मधासारखी गोड आहे वगैरे दर मिनिटाला सांगणे सुरू असते. एक लक्षात असू द्या - तुम्ही बायकोला हनी म्हटले म्हणून ती तुमच्याशी मधाळ बोलण्याची शक्यता शून्य आहे, उलट ती चवताळलेल्या मधमाश्यांसारखी अंगवार धावून येण्याचीच शक्यता अधिक असते. घरात जर नवरा-बायको एकमेकांशी मधाळ बोलत असतील, तर त्याचे दोनच अर्थ निघतात - एकतर यांचे लग्न मुरलेले नाही किंवा विटलेले आहे. बेबी हेही एक लडिवाळ इंग्लिश रूप, हे ऐकले की ती कालबाह्य झालेले बेबी मावशी, बेबी आत्या या मार्गाने परत शिरतात की काय असे वाटते. बायको या शब्दाला मराठी भाषेत भार्या, जाया, कांता आणि असे बरेच पर्यायी शब्द आहेत. पण त्याचा व्यवहारातील वापर बघता त्या शब्दांचा उपयोग फक्त शब्दकोशाची जाडी वाढवायला झाला आहे. असे वाटते.

नवऱ्याच्या बाबीततली गंमत वेगळीच असते. नवरा हे एकेरी संबोधन आहे, म्हणून पूर्वीच्या काळी स्त्रिया माझा नवरा असे न म्हणता माझे मिस्टर असे संबोधत असत. नवरा या प्राण्याला असे काय चिकटले होते की सारी सासुरवाडी त्याला आदररार्थीच संबोधयाचे. तू आणि तुम्ही दोन्हीला एकच You असा एकेरी शब्द वापरणाऱ्या इंग्रजांच्या भाषेतील मिस्टर संबोधन आपण आदरार्थी म्हणून का स्वीकारतो, ते एक कोडे आहे. पूर्वीच्या स्त्रियांना नवऱ्याचे नाव घ्यायला इतकी लाज वाटत होती की त्यासाठी उखाणा नावाचा प्रकार जन्माला आला. त्या काळी नावेही अशी असायची - रघुनाथपंत, कमलाकरराव, त्या नावाप्रमाणे ती व्यक्तीही अगदी पोक्त असायची. दोन-तीन वेळा बोहल्यावर चढून झालेला तो आणि काल-परवाची कोवळी पोर ती, तेव्हा तिला त्याचे नाव घ्यायला लाज वाटणारच. हल्ली तसे काही उरले नाही, हल्लीच्या मुली 'हा माझा नवरा अमुकतमुक' अशी बिनधास्त ओळख करून देतात. हल्लीच्या मुलींना नवऱ्याला भर मांडवात हा माझा नवरा असे म्हणण्याची अजिबात लाज वाटत नाही. मुलांसारखा बायको म्हणू की वाइफ असा त्यांचा गोंधळ होत नाही. त्या बिनधास्त न-वरा-वा असा हा नवरा असे म्हणून मोकळ्या होतात. स्रियांच्या विचारांमध्ये किती स्पष्टता असते, याचे याहून उत्तम उदाहरण सापडणार नाही. उखाण्याचे म्हणाल दिवसरात्र नवऱ्याला बबड्या आणि पवड्या म्हणणाऱ्या या मुलींना उखाण्याची खरेच गरज आहे का? नाव तर जाऊ द्या, लग्नाआधीपासून लडिवाळ नावेदेखील ठरलेली असतात.

नवऱ्यासाठी इकडची स्वारी, तिकडची स्वारी हा शब्दप्रयोद खरेच पेशवाईत होता की पेशवेकालीन मालिकांनी आणि चित्रपटांनी ती संबोधने आपल्यावर लादली आहेत, हे फक्त इतिहासाचे अभ्यासकच सांगू शकतील. पुरुष सतत युद्धावर जात असतील, म्हणून त्यांना स्वारी म्हणत असावे. अहो, ऐकलंत का, अगं ऐकतेस ना, आमचे हे, आमची ही, ही संबोधने बरीच वर्षे वापरात होती. ती संबोधने शहरी सुशिक्षित मराठी मध्यमवर्गीयाच्या दिवाणखान्यात होती आणि तिथेच विरली, क्षीण झाली. हल्ली सुशिक्षित मराठी मध्यमवर्गीय कुंटुबात नवरा-बायको एकमेकांना सरळ नावाने हाक मारतात.

गावखेड्यात मात्र परिस्थिती वेगळी आहे. तिकडे नवऱ्याला संबोधने कोणत्यातरी नात्यातूनच यायला हवे. उदा., याचा काका, त्याचे भावजी आणि पोरे झाली की बाल्याचे बाबा नाहीतर बालीचे बाबा. तो बाल्या जन्माला यायच्या आधी ते एकांतात एकमेकांना काय म्हणतात, हे त्यांचे त्यांनाच माहीत. आता त्या बालीचे बाबाचे बालीचे पप्पा झाले, हाच काय तो बदल घडला. बाकी सारे तसेच आहे. आजही चर्चा त्याच आहेत.
“बालीच्या पप्पालं सकाळी उठून च्या लागते नं वं”
“बाल्याच्या पप्पाचा राग तर तुलं मालूम हाय.”

ही वाक्ये पूर्वीही ऐकू येत होती, आजही तशीच आहे. आजही कुणी बालीचा पप्पा सकाळी उठून बालीच्या मम्मीसाठी चहा करीत नाही. मागे एकदा मी एका गावाच्या बस स्टँडवर उभा होतो. एक काकू तिच्या पुतण्याला विचारत होती,
“मंग का म्हणे रे तुये काका?” तो आपला काहीतरी सांगत होता. ती त्याला तोच प्रश्न विचारीत होती
“मंग का म्हणे रे तुये काका?” तो आणखीन काहीतरी सांगत होता, पण तिचा प्रश्न तोच होता. शेवटी तिला मुळात काय विचारायचे होते ते तिने विचारलेच.
“मायाइशयी काही बोलले?”
“हां.... म्हणे मटन करावं तर बाल्याच्या काकींनंच.”
“असं म्हणले. अमदा पोळ्याची कर येईल ना, तवा असं मटन बनवते का बोटं चोखत रायले पायजे.” शेवटी तिला जे हवे होते, ते मिळाले. तेव्हा कुणी स्त्री जर "मंग का म्हणले रे भावजी?" किंवा "का म्हणे तुया मामा?" किंवा "का म्हणले बालीचे बाबा?" असे सतत विचारत असेल, तर तिच्या नवऱ्याने निवडणुकीत काय जोरदार भाषण दिले यापेक्षा तो नवरा तिच्याविषयी काय म्हणाला हे ऐकण्यात तिला रस असतो. चाणाक्ष व्यक्ती अशा वेळेला तिच्या नवऱ्याच्या नावाने त्या स्त्रीची तोंडभर स्तुती करू शकतो.

संबोधनातील ही गंमत फक्त नवराबायकोच्याच नात्यात आहे असे नाही. ते इतर नात्यातदेखील आहेत. मी एकदा माझ्या मित्राला फोन केला. तो उचलत नव्हता. सकाळी तीनचारदा केला, दुपारी केला, संध्याकाळी केला. शेवटी त्याने फोन उचलला. मी त्याला म्हणालो,
“अरे सकाळपासून फोन करतोय”
“अरे, तो नंबर Ramdevbaba Calling असे दाखवत होता. मला वाटलं स्पॅम आहे.”

त्याचे म्हणणे बरोबर होते. त्याला कशाला कोणी रामदेवबाबा फोन करणार! मी नियमित योगा करतो, म्हणून मला कुणी लगेच रामदेवबाबा वगैरे म्हणावे असे काही नाही. तेव्हा मी या प्रकाराचा शोध घेतला, मग लक्षात आले की माझ्या मुलाने माझा नंबर त्याच्या फोनमध्ये नुसता बाबा म्हणून सेव्ह न करता रामदेवबाबा असा सेव्ह केला होता. पोरगाच तो. True Caller या अ‍ॅपने ते नाव पसरवले. बरे झाले, पोराने रामदेवबाबा असाच स्टोअर केला होता. बाबा बंगाली किंवा बाबा जरतारी वगैरे असे काही केले असते, तर मला मी रस्त्यावर आय़र्वेदिक औषधांचे दुकान लावून हातात लाउडस्पीकर घेऊन ओरडतोय, असे दृश्य दिसले असते. पोरे बापाचा कधी कुठे कसा कचरा करतील, काही सांगता येत नाही.

आम्ही अकरावी-बारावीला असताना उगाचच एकमेकांना वडिलांच्या नावाने हाक मारायचो. ओ गणपतराव, ओ विनायकराव, ओ नथ्थुजी असे काहीतरी. हे असे का करत होतो, त्याला 'ते वय' हेच उत्तर होते. हळूहळू असे व्हायला लागले की आम्ही मित्राचे खरे नाव विसरून त्या मित्राला त्याच्या वडिलांच्या नावानेच ओळखायला लागलो. हळूहळू गणपतरावचे गणपत झाले, मग गण्या झाले. कुणी ग्रूपमधे नवीन आला, तर त्याला त्या मित्राचे नाव गण्या आहे असेच वाटत होते. आम्ही एकदा असेच एका मित्राच्या घरी गेलो होतो. आमच्या ग्रूपमध्ये एक नवीन मुलगा होता. आम्ही मित्राच्या घऱी पोहोचलो. त्या नवीन मुलाने जोरात आवाज दिला,
“ए दिन्या.” खरे दिनकरराव लगेच फाटकापाशी आले.
“कोण हवंयं?”
“दिन्या, दिनकरराव.” त्या काळ्या, धिप्पाड, जाड मिशांच्या दिनकररावांना हे कोणते कालचे बारीक पोरगे दिन्या म्हणून बोलावतेय म्हणून त्याचे डोळे लाल झाले होते. काय गोंधळ झाला आहे हे आमच्या लक्षात आले होते, परंतु आमच्यापैकी कुणालाच आमच्या मित्राचे खरे नाव आठवत नव्हते. आमचा मित्र सांगत होता,
“ओ, त्या दिन्याला बोलावून द्या ना.”
दिनकरराव आमच्या त्या बारीक मित्राला नखशिखांत न्याहाळत होते. पुढील काही क्षणात दिनकरराव आमच्या मित्राची हाडे खिळखिळी करणार, याची खातरी झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी म्हणालो,
“काका, आमचा मित्र दिन्या बहुदा मागच्या गल्लीत राहत असावा.” असे म्हणून आम्ही तिथून सुटलो ते आजतागायत त्या मित्राच्या घरी गेलो नाही.

तसे वडिलांना संबोधण्यासाठी दादा, अप्पा, अण्णा, भाऊ, तात्या असे शब्द वापरात होते. काही तर काकासुद्धा म्हणत होते. महाभारतामुळे ते माताश्री, पिताश्रीदेखील आले होते, पण ते गंमत म्हणून. माझे काही मित्र वडिलांविषयी मित्रांमध्ये बोलताना बावाजी, बुढा असे शब्द वापरत होते.
“बावाजीची पँट अल्टर केली का बे?” किंवा
“तुया बुढ्याने सकाळी उठून दिमाग खराब केला यार.”

हल्ली डॅड, डेड, पॉप्स अस काही म्हणायची पद्धत रुढ झाली आहे. आता गावखेड्यातसुद्धा पप्पा घुसले आहेत. शहरात तर आधीपासूनच पप्पा, डॅडी ऐकू येत होते. माझा मुलगा त्याच्या एका मित्राविषयी म्हणायचा, "संकेत म्हणजे तो जो मराठी असूनही त्याच्या बाबांना डॅडी म्हणतो." शहरांमध्ये दुसरादेखील एक प्रवाह आहे की मुलाचे पालक मुलांनी आईबाबा म्हणण्याचा आग्रह करतात. त्यामुळे कधीकधी अमेरिकेतून आलेला मुलगा त्यांच्या इंग्रजाळलेल्या भाषेत ‘माय बाबा’ म्हणतो, तर गावातला पोरगा ‘माये पप्पा’ म्हणतो, असा विरोधाभास दिसून येतो. एक मात्र नक्की - मराठी कुंटुंबात आईबाबा हे शब्द अजूनही मोठ्या प्रमाणात टिकून आहेत. हिंदी भाषिक कुटुंबातून माँ, पिताजी केव्हाच गायब झाले आहेेत. दक्षिणात्या कुटुंबात मात्र अम्मा, अण्णा, अप्पा, अक्का टिकून आहेत.

माझा मुलगा लहान असताना त्याचे मित्र म्हणायचे, "Go and ask your Aai re?" ते ऐकले की आता पुढे जाऊन लवकरच Aai आई म्हणजे Mother असे काही ऑक्स्फर्ड डिक्शनरीत येणार, असा आशावाद मला वाटत होता. माझे हे स्वप्न लवकरच भंगले. मुलगाच पुढे जाऊन घरात भलेही आई म्हणत असला, तरी मित्रांशी बोलताना माय मॉम वगैरे म्हणायला लागला. हिंदी भाषक भागात - म्हणजे इंदोर किंवा रायपूर अशा शहरात राहणारी मराठी मंडळी ‘आई मै जा रहा हूं’ असे म्हणतात. आई, बाबा असे मराठी शब्द ऐकल्यानंतर हिंदी भाषा ऐकायला वेगळे वाटते. कानाला त्याची सवय व्हायला वेळ लागतो. आईची पुण्याई इतकी थोर आई या व्यक्तीला संबोधण्याचे आई, आये, माय आणि मम्मी किंवा मॉम सोडले तर फार जास्त शब्द नाही. कुणी आपल्या आईला हिटलर वगैरे म्हणताना फारसे बघितले नाही. जसे आम्ही मुले एकमेकांना वडिलांच्या नावाने आवाज द्यायचो, तसे मुली एकमेकींना आईच्या नावाने आवाज देतात का.. मला माहित नाही. आईची सोज्ज्वळता मुलांच्या गप्पांमद्येसुद्धा टिकून असते.

मी मुंबईत एकदा आजारी असताना मला डॉक्टरांनी विचारले होते,
“काय म्हणतात तर तुमच्याकडे बापू की भाऊ?”
“भाऊ” मी. खरे तर याचा उच्चार भौ असा केला जातो.
“मीसुद्धा तुला तेच म्हणणार. दोन दिवस आऱाम करा ना भाऊ, मग आहेच काम.” ऐकून खूप बए वाटले होते. आजारी असताना असे काही ऐकले की बरे वाटते. विदर्भातील मंडळी 'नाही ना भाऊ', 'हो ना भाऊ' हे वापरतात. बापू तिकडे फारसे वापरले जात नाही. तसे विदर्भातील मंडळी एकमेकांशी बोलताना 'बे' हे संबोधन सहज वापरतात. मालिकांमध्ये जितका अतिरेक दाखवतात आणि ज्या प्रकारे म्हटले जाते, ते तसे नसते. ते अगदी सहज यायला हवे. माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर आणि बेळगाव या भागातील मंडळीदेखील बे वापरतात, परंतु तिथे उच्चार करण्याची पद्धत वेगळी आहे. पुण्यातील मंडळी 'काय राव' असे म्हणतात. दक्षिण भारतात ज्याच्या त्याच्या नावामागे सर लावण्याची पद्धत आहे. कधी विनोदाने त्या सरचे ‘सार’ असेदेखील होते. एक मुलगा तर अमेरिकन मंडळींच्या नावामागेदेखील सर लावीत होता. मी त्याला सांगितले,
“Sir, don’t call him sir, he Feel Offended sir.”

भाऊबहीण आणि मित्रमैत्रीण एकमेकांना काय म्हणतील, याचे काही नियम नाहीत की बंधने नाहीत. शाळा-कॉलेजातील मुले त्यांच्या शिक्षकांना काय नावे ठेवतील यावर एखादा प्रबंध तयार होईल. बऱ्याचदा ही संबोधने हम भी मॉडर्न है अशा अर्थाने बदलत जातात - म्हणजे गावातील मंडळी शहरात राहायला लागली, तसे मुलांना मम्मी पप्पा म्हणायला शिकवतात. इथली मुले अमेरिकेत गेली, तर आईबाबांना मॉम, डॅड म्हणू लागतात. याउलट बरीच मुले अमेरिकेत राहूनदेखील आईवडिलांना आईबाबा म्हणाताना आढळतात. त्यांच्या आईबाबांसाठी ते आमची नाळ अजूनही तुटली नाही हे दर्शवणारे असते. तसे बघितले तर कुणी कुणाला काय म्हणावे हा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु वैयक्तिक आवडीनिवडीदेखील आपण ज्या समाजात वावरतो त्यावर अवलंबून असतात, हीच गोष्ट संबोधनाला लागू होते. वैयक्तिक आवड आणि आजूबाजूचा समाज याच्या मिश्रणातून ज्याचे त्याचे वैयक्तिक संबोधन तयार होते. तरीही बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. नाळ या चित्रपटातील मुलासारखा मीदेखील सुरकांडी नावाचा खेळ खेळायचो. तसेच शब्द तोंडी होते “काहून चिल्लालवून रायला बे.” आज इतर शब्द तर बोलण्यात येत नाहीच, परंतु बे, आबे, हेसुद्धा बोलण्यात येत नाही. परंतु परवा 'उधळी की वाळवी?' या चर्चेवरून जाणवले की विदर्भ अजूनही भाषेत ठाण मांडून आहे. अशा वेळेला आपली नाळ तुटली की अजूनही जोडली आहे, हा प्रश्न मला पडतो. मी परत मागे वळून शोध घेतो.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

20 Oct 2022 - 3:20 pm | तुषार काळभोर

+१

सस्नेह's picture

20 Oct 2022 - 4:14 pm | सस्नेह

+१

श्वेता व्यास's picture

8 Nov 2022 - 3:53 pm | श्वेता व्यास

छान लेख आहे, किस्से आवडले.

टर्मीनेटर's picture

11 Nov 2022 - 8:19 pm | टर्मीनेटर

खुसखुशीत लेख!
स्त्रीयांनी त्यांच्या नवऱ्यांना कसेही बोलावले तरी मला त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही, अगदी त्या खाजगीत बोलावत असतील त्या 'लोद्या', 'ढोल्या' अशा लाडिक विशेषणांनी बोलावले तरी सुद्धा. पण त्यांची मुले बापाला ज्या 'बाबा', 'पप्पा' किंवा 'डॅडी' वगैरे नावांनी संबोधत असतील त्या संबोधनांनी कोणासमोर बोलावतात तेव्हा मात्र फारच विचित्र वाटते. नवऱ्याला काय चार लोकांसमोर 'बाबा', 'पप्पा' किंवा 'डॅडी' अशा हाका मारायच्या? शी... 😂

Bhakti's picture

11 Nov 2022 - 9:53 pm | Bhakti

मस्तच लिहिलंय!
नाव ,एखाद्याला विशेष नाव देणे ,मजेशीर छान अनुभव असतो.
माझी मुलगी आईहून लाडात आली की mom म्हणते.आणि कधी भक्ती म्हणते अजून काही गोड खाजगी शब्द आहेत :) सिमिलर नवर्याला तिच्या बाबांना पण, छान मैत्रीणच वाटते ती मला मग!
मुलीला पूर्ण नाव सांगताना आईचे पण नाव सांगायला लहानपणापासून सवय लावली आहे.घरातील इतर सनातनी त्यावेळी कावतात.

सरिता बांदेकर's picture

12 Nov 2022 - 2:43 pm | सरिता बांदेकर

छान,मस्तच.
विषय साधाच पण निरीक्षणं छान .

मित्रहो's picture

12 Nov 2022 - 5:56 pm | मित्रहो

सर्वांना खूप खूप धन्यवाद
धन्यवाद तुषार काळभोर, सस्नेह, श्वेता व्यास, टर्मीनेटर भक्ती सरिता बांदेकर
@Bhakti आई आणि मुलगी किंवा मुलगा यात एकमेकांना संबोधण्याची खूप संबोधने असतात. मूल लहान असताना तर जास्त असतात त्यातून नात फुलत जातं. मोठे झाले की मग कमी होतात.
@ सरिता बांदेकर हो साधा आणि माहितीतला विषय आहे.
@टर्मीनेटर अगदी बरोबर आहे. नवऱ्याला चारचौघात काय बाबा, पप्पा म्हणायचे. आता हे प्रकार कमी व्हायला लागलेत.
@श्वेता व्यास धन्यवाद किस्से घडतात आजूबाजूला. मजा येते ते बघताना. तो बालीचे काकाचा प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे.

सुधीर कांदळकर's picture

12 Nov 2022 - 6:19 pm | सुधीर कांदळकर

खमंग, खुसखुशीत लेखन. आवडले. मी पण भाषेच्यातरी शुद्धतेला वचकून असतो. चित्रवाणीवर तर मराठीबरोबर संस्कृतचेही हाल करतात. स्त्रीला पुरुषाला सारखाच आशिर्वाद देतात. आता मराठी काय, संस्कृत'ची'ही आपण मदत करू शकत नाही.काही असले तरी करमणूक मस्त होते हे खरे.

मित्रहो's picture

22 Nov 2022 - 5:40 pm | मित्रहो

धन्यवाद सुधीर कांदळकर

श्वेता२४'s picture

24 Nov 2022 - 2:13 pm | श्वेता२४

वाचताना बऱ्याच ठिकाणी खिक्क झालं मला. उदा.'तुम्ही घऱात बायकोला लाडाने कितीही ‘माझी बायं’ असे म्हणा, पण समोरच्याशी ओळख करून देताना ही ‘माझी बाय’ म्हटले, तर तो भलताच अर्थ काढायचा.'बेबी हेही एक लडिवाळ इंग्लिश रूप, हे ऐकले की ती कालबाह्य झालेले बेबी मावशी, बेबी आत्या या मार्गाने परत शिरतात की काय असे वाटते' 'दोन-तीन वेळा बोहल्यावर चढून झालेला तो आणि काल-परवाची कोवळी पोर ती, तेव्हा तिला त्याचे नाव घ्यायला लाज वाटणारच. '

मित्रहो's picture

24 Nov 2022 - 9:45 pm | मित्रहो

खूप धन्यवाद
अगदी वाक्ये हायलाइट करुन ठेवल्यासारखे वाटले. छान वाटले.
खूप धन्यवाद

चित्रगुप्त's picture

25 Nov 2022 - 10:02 am | चित्रगुप्त

लेख अतिशय आवडला. दिलखुलास, मजेशीर, अभ्यासपूर्ण आणि थेट भिडणारा. यातले प्रत्येक वाक्य वाचनीय आहे. अनेक आभार.

मित्रहो's picture

29 Nov 2022 - 7:14 pm | मित्रहो

खूप धन्यवाद चित्रगुप्त सर
मी तुमच्या प्रतिसादाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. तुमच्या प्रतिक्रियेशिवाय दिवाळी अंकात लिहिल्यासारखे वाटत नाही.
यावर्षी अंक उशीरा आल्यामुळे मलाच इतर लेख वाचायला जमले नाही. तर तुम्हालाही वाचायला जमेल की नाही अशी भिती वाटत होती. प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले.
खूप धन्यवाद