भाव तिथे देव

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
18 Oct 2022 - 2:17 pm

सायकलिंगला बाहेर पडते तेव्हा रस्त्यावर रोज नवीन गमती जमती दिसतात. आपल्याकडे एकूणच देवदेवतांचं आणि देवळांचं प्रमाण खूप आहे. इथेही तेच आहे. जागोजागी छोटी मोठी देवळं आहेत. नवीन नवीन बांधली जात आहेत. जात येता ट्रक दिसतात त्यांच्यावरची नावं वाचून तर ज्ञानात भरच पडते. खरंच अशा नावाचा देव आहे ? असा प्रश्न मनात येतो.

रस्त्याच्या कडेची छोटी छोटी देवळं असतात ना त्यात लोकांची मजेशीर गोष्ट अनुभवयाला मिळते. बरेचदा हि हद्दीवरची किंवा वेशीवरची देवळं असतात. फार मोठी नसतात. अगदी छोटंसं देऊळ असत. पण एका गावाची हद्द संपून दुसर्या गावाची हद्द सुरु होते तिथे हि देवळं असल्याने याना महत्व असत. फार मोठा उत्सव वगैरे पण नसतो यांचा. रोज एक पुजारी किंवा गुरव नियमित पूजा करतो एवढंच. तर इकडे गावाकडे साधारण या देवळात क्षणभर का होईना थांबायची पद्धत आहे. नवीन लग्न झालेले वऱ्हाड जात असेल किंवा नवीन बाळाला घेऊन जात असतील तर अश्या देवळापाशी थांबून देवाला नमस्कार करून, देवासमोर पैसे ठेवून, नारळ फोडून मगच पुढचा प्रवास होतो. आणि लोक अगदी प्रामाणिकपणे हे पाळतात. आमच्या इथलं काळकाईच देऊळ, कामथे घाटातलं देऊळ, किंवा कुंभार्लीची सोनपत्रा देवी. इथे हि दृश्य हमखास दिसतात. वऱ्हाड असलेल्या गाडीवरून ओवाळून नारळ काढायचा आणि तिथेच फोडायचा.

आता रोज जाणारे थोडेच रोज नारळ फोडत बसणार ? मग रोज चालायला जाणारे निदान चप्पल काढून बाहेरूनच का होईना देवाचं दर्शन घेतात. गाड्यांवरून जाणारे लोक कपाळाला हात लावून देवाला नमस्कार करतात. गाडीतून जाणारे काच खाली करतात आणि कपाळाला हात लावतात. यातले काहीजण पुटपुटतात तर काही नुसतेच नमस्कार करतात. काही जण मात्र अगदी गाडी चालवताना एक हात सोडता येत नाही म्हणून नुसताच हॉर्न वाजवतात. जणू देवाला जागं करून सांगतात कि, "बाबारे मी हात जोडले नाहीत तरी तुझी आठवण आहे मला." मजेशीर असत असे लोक बघणं. काही लोक चालताना थांबतात, देवळाजवळच्या बाकावर विश्रांती घेतात आणि मग परत फिरतात. काहीजण जाताना तिथल्याच जवळच्या झाडाची फुलं काढून नेतात. आमच्यासारखे सायकलवाले किंवा धावणारे इथे हमखास पाणी भरायला थांबतात. एरवी नुसतीच बाहेरून नमस्कार करणारी मुलं देवळाच्या आत नमस्काराला गेली की समजायचं परीक्षा चालू झाल्या.

रोज सायकलिंग करताना असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळे प्रकार करताना दिसतात. पण एक मात्र नक्की, अगदी गाडीवरून जाताना का होईना नमस्कार करण्यासाठी कपाळाला लावलेला हात हा माणसाची भक्ती दर्शवतो. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात सुखाने जिथे घरच्या माणसांना द्यायला वेळ नाही तिथे देवासाठी कुठून आणणार वेळ असही होत असेल. पण म्हणून मनात देवाचं अस्तित्व तर कायम आहे.देवावर श्रद्धा आहे. आणि म्हणूनच जिथे भाव आहे तिथेच देव आहे.

-- धनश्रीनिवास

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Oct 2022 - 6:44 pm | मुक्त विहारि

एरवी नुसतीच बाहेरून नमस्कार करणारी मुलं देवळाच्या आत नमस्काराला गेली की समजायचं परीक्षा चालू झाल्या....

अगदी अगदी...

सस्नेह's picture

18 Oct 2022 - 8:51 pm | सस्नेह

आमच्या गावातही लोक या प्रथा अजूनही पाळतात.
त्यात भाव कितपत असतो, हा प्रश्न मला पडतो.

श्वेता व्यास's picture

19 Oct 2022 - 10:12 am | श्वेता व्यास

छान लिहिलं आहे.
काही जण मात्र अगदी गाडी चालवताना एक हात सोडता येत नाही म्हणून नुसताच हॉर्न वाजवतात. हे वाचून गंमत वाटली.

सौंदाळा's picture

19 Oct 2022 - 10:24 am | सौंदाळा

आमचे कोकणातले नातेवाईक नदी आली की नमस्कार करतात. शक्य असेल तेव्हा नदीत नाणे टाकतात.