मेषपात्र

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
28 Sep 2022 - 8:52 am

Being मेष
मी आणि श्रीनिवास योगायोगाने मेष रासवाले. त्यामुळे अनेकदा दोघांचं अनेक बाबतीत एकमत होत. मेष असण्याचे फायदे तोटे दोघानाही भोगावे लागतात. कुठल्याही गोष्टीवर भावनिक रित्या व्यक्त होण्यापेक्षा प्रॅक्टिकली विचार करतो. त्यामुळे कधीतरी आम्ही फारच कोरडे आहोत का असा विचार येतो.
फेसबुक वरचे reels बघताना किंवा अगदी एखादा शो म्हणा, पिक्चर म्हणा, आम्ही असं डोकं बाजूला ठेवून बघूच शकत नाही. हे अस कुठे असतं का? अस वाटत राहतं.
गणपती डेकोरेशन आयडिया बघताना सतत जाणवत राहतं,' हे तिच्या घरी छान दिसते पण आमचं घर मोठं, गणपतीची मूर्ती मोठी, घरात चिल्ली पिल्ली अशी अस्ताव्यस्त बागडत असतात की झालाच कल्याण सगळ्याच. होम डेकोरेशन च्या आयडिया पण अश्याच. सोफ्यावर इतकी छान , सुंदर कव्हर घातलेली, त्यावर जरिकाठाच्या कव्हर घातलेल्या उश्या ठेवलेल्या, समोरच्या टी पॉय वर घंगाळात पाणी घालून त्यावर फुलांच डिझाईन. लगेच माझं डोकं भिरभिरत. सुंदर कव्हर घातलेल्या सोफ्यावर आमची पोरं पाय वर घेवून बसणार म्हणजे अर्धा जीव त्यांच्यावर ओरडण्यात जायचा. छान, डिझायनर उश्या माझी पोर एकमेकांना फेकून मारून मस्ती करणार आणि या मस्ती करण्यात समोरच्या घंगाळातल पाणी सगळीकडे सांडणार. असे सगळे विचार मनात चालू असतात. त्यामुळे समोरचा व्हिडिओ मी अजिबात एन्जॉय करू शकत नाही.
चॅटिंग करताना उगाच बाकी काय? हा प्रश्न येतच नाही. मुद्द्याच बोललं की काम झाल. बोलताना समोरच्याला आधी वेळ आहे ना? विचारतो. त्याने नाही सांगितलं तरी वाईट वाटत नाही. तसच आपल्याला कॉल आलेला असताना वेळ नसेल तर तेही स्पष्ट सांगितलं जातं. कॉल मिस झाला तर न चुकता कॉल बॅक केला जातो. अगदी शॉपिंग करताना पण काय घ्यायचंय हे फिक्स असल्याने इकडे तिकडे न फिरता त्याच गोष्टी खरेदी करून परत येतो. कुठल्यातरी थुकरट जोक वर समोरच्याला बरं वाटावं म्हणून हसताही येत नाही. निर्णय घेताना फार वेळ लावत नाही. एकदा निर्णय घेतल्यावर होणाऱ्या परिणामांची पर्वा करत नाही. त्याची जबाबदारी घेतो. अती उत्साह कधीच नसतो. सौजन्य सप्ताह पाळण अती मुष्कीलीच काम. शक्यतो एक घाव दोन तुकडे हीच वृत्ती कायम. चुकूनही कुणाच्या वाईटाचा विचार मनात येणार नाही. पण म्हणून भरपूर आनंद झाला तरी उड्या मारत सगळीकडे बोंबलत फिरणार पण नाही.

कुणाशी पटलं नाही तर वाद घालायचा नाही.' तू तुझ्या घरी हुशार, मी माझ्या घरी हुशार 'असं म्हणून विषय संपला. अगदी नाहीच तर ,' हो, तुझंच बरोबर ' अस म्हणून एक तऱ्हेने समोरच्याला फाट्यावर मारून निघून जायचं हा attitude. आपल्या पसंतीवर कायम ठाम त्यामुळे क्वचित वादाचे प्रसंग येतात. घरात दोघेही मेष असल्याने आम्ही स्वतंत्रपणे आपले निर्णय घेतो. पण जेव्हा एकत्र निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा मेंढे कधीतरी टकरा होतातच. गाडी चालवताना समोरचा चुकला की शिव्यांची लाखोली वाहिली जाते. भले त्याला बंद काचेमुळे ऐकू न जावोत. नवऱ्या शेजारी बसून आता तेच अपशब्द माझ्याही ओठावर येतात. संगतीचा परिणाम दुसरं काय ? अगदी परवा एक बाई ७ वाजून गेले तरी गाडीचा लाईट न लावता गाडी चालवत होत्या. किती वेळ दुसऱ्याच्या प्रकाशात गाडी चालवनार? न राहवून म्हटलंच,' काकू, आता तरी स्वतःचा प्रकाश पाडा.' अर्थात calculated risk घ्यायच्या स्वभावानुसार काकू काय मला गाठणार नाही नक्की हे बघून मी सुसाट पुढे निघून गेले.
राशिभविष्य बघितलं तर कायम,' अचानक खर्च संभवतो ' किंवा तत्सम फक्त खर्चाचं भविष्य असतं . कमाईच नावं नाही. बाबा तर नेहमी म्हणायचे, तुझं नाव धनश्री, पण पैसे फक्त खर्च करतेस . अर्थात स्वभावानुसार लगेच उत्तर देताना मी म्हणालेच,' घरात आहेत म्हणून खर्च करतेय '. टोमणे मारणाऱ्यांचा तर प्रचंड तिरस्कार. समोरच्याने टोमणे मारलन तर प्रत्युत्तर म्हणून व्याजासहित चार टोमणे अधिक मारून घेतो. स्वभाव हो दुसरं काय?
तर अशा या सगळ्या गुण वैशिष्ट्यांसह दोन मेंढे एकाच घरात नांदत आहेत. अधून मधून टकरा देत जराही मागे न हटता एका छोट्या सिंहाला सध्या तरी कंट्रोल मध्ये ठेवलंय. पण सिंह असल्याने ' माझंच खरं ' यावर तो ठाम असतो. लहान असल्याने अजून मेंढ्यांसमोर झुकतो. पण फार दिवस चालायच नाही हे ही माहितेय. तो आपले गुण दाखवणार. योगायोगाने माझी गादी चालवायला माहेरी माझी भाची पण जन्माला आली ती मेष होऊन. त्यामुळे तिकडेही छोट्या छोट्या टकरा चालूच असतात. सुदैवाने जवळचे मित्र मिळाले ते पण मेषच. त्यामुळे एकूणच मेंढे एकत्र आले की मज्जा येते हे खरं .
- धनश्रीनिवास

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Sep 2022 - 9:31 am | मुक्त विहारि

आम्ही दोघेही मेष राशीचेच ...

त्यामुळे, तुमच्या भावना समजल्या...

कर्नलतपस्वी's picture

28 Sep 2022 - 10:27 am | कर्नलतपस्वी

छान लिहिलय.

एकाच राशीचे असल्यास एकमेकांस चांगले ओळखतात. डावपेच टाकणे थोडे मुश्किल होते.

भिन्न राशी असतील तर मग वेगळीच गंमत.

जसे बायको सिह किवा वृश्चिक आणी नवरा कन्या यात नवरा मेषपात्र ठरतो.

🙂

सुर्य राशीनुसार मनुष्यस्वभाव स्त्री आणी पुरूष यावर विदेशी लेखीका लिण्डा गाॅडमॅन याचे पुस्तक चांगले वाटले. पि डी एफ ड्राइव्ह वर फ्री डाउनलोड आहे.

मराठीत शरद उपाध्ये यांची पुस्तके व राशीचक्र हा एकपात्री प्रयोग मस्त आहे व या विषयावर चांगला प्रकाश टाकतो. बहुतेक ते चंद्र राशी मानत असावे.

मी काही खुप आभ्यासू किंवा माझा विश्वास आहे असे नाही. पुस्तक समोर आले की कुरतडणे एवढाच संबंध

मुक्त विहारि's picture

28 Sep 2022 - 11:02 am | मुक्त विहारि

टाईमपास आहे

श्वेता व्यास's picture

28 Sep 2022 - 10:44 am | श्वेता व्यास

छान लिहिलंय. मेषेच्या लोकांचा फार अनुभव नाही त्यामुळे यातल्या काही गोष्टी राशीनुसार असतीलही. पण बहुतेक गोष्टी कोणत्याही राशीचे लोक कॉमनसेन्स म्हणून पाळतात अशा आहेत, स्वभावाच्या परिपक्वतेचा भाग आहे.

सरिता बांदेकर's picture

28 Sep 2022 - 11:48 am | सरिता बांदेकर

छान लिहीलं आहे. माझ्या मैत्रीणी आहेत मेषेच्या.प्रेमळ असतात,पण प्रेम व्यक्त करायची पद्धत मजेशीर असते.

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2022 - 11:57 am | चौथा कोनाडा

कुणाशी पटलं नाही तर वाद घालायचा नाही.' तू तुझ्या घरी हुशार, मी माझ्या घरी हुशार 'असं म्हणून विषय संपला. अगदी नाहीच तर ,' हो, तुझंच बरोबर ' अस म्हणून एक तऱ्हेने समोरच्याला फाट्यावर मारून निघून जायचं हा attitude. आपल्या पसंतीवर कायम ठाम त्यामुळे क्वचित वादाचे प्रसंग येतात. घरात दोघेही मेष असल्याने आम्ही स्वतंत्रपणे आपले निर्णय घेतो.

ह्ये बेष्ट अय बगा !

कर्नलतपस्वी's picture

28 Sep 2022 - 12:27 pm | कर्नलतपस्वी

@चौको, दोघही मेषेचे म्हणजे मेष स्क्वेअर म्हणायचे की स्क्वेअर रूट म्हणायचे!

हम दो हमारे चार.

मुक्त विहारि's picture

29 Sep 2022 - 8:49 am | मुक्त विहारि

काळा प्रमाणे कौटुंबिक बदल होतो

पटले तर डब्बल धमाका

नाहीतर, फाट्यावर...

अनिंद्य's picture

28 Sep 2022 - 12:38 pm | अनिंद्य

शीर्षकातच जिंकलात तुम्ही ! 'मेषपात्र' :-) :-)

तुमच्या विनोदबुद्धीचे कौतुक वाटले. स्वतःवर जोक करणे सर्वोत्तम विनोदाचे लक्षण आणि सगळ्यात कठीण आहे ते. मेषेकडून सहसा अपेक्षित नसते :-)

सुखी's picture

29 Sep 2022 - 12:42 am | सुखी

छान लिहिलं आहे

श्वेता२४'s picture

29 Sep 2022 - 4:37 pm | श्वेता२४

कोणत्याही माणसाच्या स्वभावावर केवळ चंद्रराशीचा प्रभाव नसावा तर लग्नराशीचापण प्रभाव असावा असे माझे एक निरीक्षण आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Sep 2022 - 10:04 pm | श्रीगुरुजी

छान आहे लेख. शीर्षकही समर्पक आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर बहुतांशी चंद्र राशीचा प्रभाव असतो. सूर्य राशीचाही काहीसा प्रभाव असतो. व्यक्तीच्या स्वभावावरून त्या व्यक्तीची चंद्ररास ओळखता येते व त्या राशीच्या चंद्रराशीवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो.

खूप पूर्वी वेगवेगळ्या राशींच्या व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांवर मी मिपावर एक लेख लिहिला होता. तो लेख कोठे आहे शोधावं लागेल.

आणि माझी रास सिंव्ह (टाय्पो नाही, मुद्दाम उच्चाराप्रमाणे लिहिलं आहे) असली तरी वागणं मेषेसारखं आहे. शिन्या सांगेलच.

जगप्रवासी's picture

1 Oct 2022 - 10:39 am | जगप्रवासी

मी पण मेष राशीचा. अक्षरशः तुमचं वाक्य न वाक्य मला लागू होतंय जस काही माझेच गुणस्वभाव वाचल्यासारखे वाटतंय.
छान लिहिलंय

राशींप्रमाणे स्वभाव ह्याकडे केवळ मनोरंजनात्मक दृष्टीनेच पाहावे अन्यथा ह्या निव्वळ अंधश्रद्धाच.

मुक्त विहारि's picture

1 Oct 2022 - 4:29 pm | मुक्त विहारि

इकडून तिकडून, मनुष्य स्वभाव सारखाच...

जो तो मनुष्य, ह्या बारा स्वभाव वैशिष्ट्यातच फिरत राहतो...

मेष राशीशी मिळती जुळती आहेत. मेषेच्या फटकळपणाच्या जोडीला सिंह राशीच्या काही व्यक्ती गर्विष्ठ असतात. मेष व्यक्ती गर्विष्ठ असतात कि नाही त्याची नक्की माहिती नाही.

सिरुसेरि's picture

3 Oct 2022 - 8:45 pm | सिरुसेरि

राशीचक्रामधे ऐकले आहे की , मेष राशीचे बहुतांशी लोक हे पोलिस दलात वा सैन्य दलात असतात .