मेषपात्र
Being मेष
मी आणि श्रीनिवास योगायोगाने मेष रासवाले. त्यामुळे अनेकदा दोघांचं अनेक बाबतीत एकमत होत. मेष असण्याचे फायदे तोटे दोघानाही भोगावे लागतात. कुठल्याही गोष्टीवर भावनिक रित्या व्यक्त होण्यापेक्षा प्रॅक्टिकली विचार करतो. त्यामुळे कधीतरी आम्ही फारच कोरडे आहोत का असा विचार येतो.
फेसबुक वरचे reels बघताना किंवा अगदी एखादा शो म्हणा, पिक्चर म्हणा, आम्ही असं डोकं बाजूला ठेवून बघूच शकत नाही. हे अस कुठे असतं का? अस वाटत राहतं.
गणपती डेकोरेशन आयडिया बघताना सतत जाणवत राहतं,' हे तिच्या घरी छान दिसते पण आमचं घर मोठं, गणपतीची मूर्ती मोठी, घरात चिल्ली पिल्ली अशी अस्ताव्यस्त बागडत असतात की झालाच कल्याण सगळ्याच. होम डेकोरेशन च्या आयडिया पण अश्याच. सोफ्यावर इतकी छान , सुंदर कव्हर घातलेली, त्यावर जरिकाठाच्या कव्हर घातलेल्या उश्या ठेवलेल्या, समोरच्या टी पॉय वर घंगाळात पाणी घालून त्यावर फुलांच डिझाईन. लगेच माझं डोकं भिरभिरत. सुंदर कव्हर घातलेल्या सोफ्यावर आमची पोरं पाय वर घेवून बसणार म्हणजे अर्धा जीव त्यांच्यावर ओरडण्यात जायचा. छान, डिझायनर उश्या माझी पोर एकमेकांना फेकून मारून मस्ती करणार आणि या मस्ती करण्यात समोरच्या घंगाळातल पाणी सगळीकडे सांडणार. असे सगळे विचार मनात चालू असतात. त्यामुळे समोरचा व्हिडिओ मी अजिबात एन्जॉय करू शकत नाही.
चॅटिंग करताना उगाच बाकी काय? हा प्रश्न येतच नाही. मुद्द्याच बोललं की काम झाल. बोलताना समोरच्याला आधी वेळ आहे ना? विचारतो. त्याने नाही सांगितलं तरी वाईट वाटत नाही. तसच आपल्याला कॉल आलेला असताना वेळ नसेल तर तेही स्पष्ट सांगितलं जातं. कॉल मिस झाला तर न चुकता कॉल बॅक केला जातो. अगदी शॉपिंग करताना पण काय घ्यायचंय हे फिक्स असल्याने इकडे तिकडे न फिरता त्याच गोष्टी खरेदी करून परत येतो. कुठल्यातरी थुकरट जोक वर समोरच्याला बरं वाटावं म्हणून हसताही येत नाही. निर्णय घेताना फार वेळ लावत नाही. एकदा निर्णय घेतल्यावर होणाऱ्या परिणामांची पर्वा करत नाही. त्याची जबाबदारी घेतो. अती उत्साह कधीच नसतो. सौजन्य सप्ताह पाळण अती मुष्कीलीच काम. शक्यतो एक घाव दोन तुकडे हीच वृत्ती कायम. चुकूनही कुणाच्या वाईटाचा विचार मनात येणार नाही. पण म्हणून भरपूर आनंद झाला तरी उड्या मारत सगळीकडे बोंबलत फिरणार पण नाही.
कुणाशी पटलं नाही तर वाद घालायचा नाही.' तू तुझ्या घरी हुशार, मी माझ्या घरी हुशार 'असं म्हणून विषय संपला. अगदी नाहीच तर ,' हो, तुझंच बरोबर ' अस म्हणून एक तऱ्हेने समोरच्याला फाट्यावर मारून निघून जायचं हा attitude. आपल्या पसंतीवर कायम ठाम त्यामुळे क्वचित वादाचे प्रसंग येतात. घरात दोघेही मेष असल्याने आम्ही स्वतंत्रपणे आपले निर्णय घेतो. पण जेव्हा एकत्र निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा मेंढे कधीतरी टकरा होतातच. गाडी चालवताना समोरचा चुकला की शिव्यांची लाखोली वाहिली जाते. भले त्याला बंद काचेमुळे ऐकू न जावोत. नवऱ्या शेजारी बसून आता तेच अपशब्द माझ्याही ओठावर येतात. संगतीचा परिणाम दुसरं काय ? अगदी परवा एक बाई ७ वाजून गेले तरी गाडीचा लाईट न लावता गाडी चालवत होत्या. किती वेळ दुसऱ्याच्या प्रकाशात गाडी चालवनार? न राहवून म्हटलंच,' काकू, आता तरी स्वतःचा प्रकाश पाडा.' अर्थात calculated risk घ्यायच्या स्वभावानुसार काकू काय मला गाठणार नाही नक्की हे बघून मी सुसाट पुढे निघून गेले.
राशिभविष्य बघितलं तर कायम,' अचानक खर्च संभवतो ' किंवा तत्सम फक्त खर्चाचं भविष्य असतं . कमाईच नावं नाही. बाबा तर नेहमी म्हणायचे, तुझं नाव धनश्री, पण पैसे फक्त खर्च करतेस . अर्थात स्वभावानुसार लगेच उत्तर देताना मी म्हणालेच,' घरात आहेत म्हणून खर्च करतेय '. टोमणे मारणाऱ्यांचा तर प्रचंड तिरस्कार. समोरच्याने टोमणे मारलन तर प्रत्युत्तर म्हणून व्याजासहित चार टोमणे अधिक मारून घेतो. स्वभाव हो दुसरं काय?
तर अशा या सगळ्या गुण वैशिष्ट्यांसह दोन मेंढे एकाच घरात नांदत आहेत. अधून मधून टकरा देत जराही मागे न हटता एका छोट्या सिंहाला सध्या तरी कंट्रोल मध्ये ठेवलंय. पण सिंह असल्याने ' माझंच खरं ' यावर तो ठाम असतो. लहान असल्याने अजून मेंढ्यांसमोर झुकतो. पण फार दिवस चालायच नाही हे ही माहितेय. तो आपले गुण दाखवणार. योगायोगाने माझी गादी चालवायला माहेरी माझी भाची पण जन्माला आली ती मेष होऊन. त्यामुळे तिकडेही छोट्या छोट्या टकरा चालूच असतात. सुदैवाने जवळचे मित्र मिळाले ते पण मेषच. त्यामुळे एकूणच मेंढे एकत्र आले की मज्जा येते हे खरं .
- धनश्रीनिवास
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आमच्या घरी पण हीच परिस्थिति आहे ...
छान लिहिलय.
राशीचक्र
छान लिहिलंय. मेषेच्या लोकांचा
छान
कुणाशी पटलं नाही तर वाद
@चौको, दोघही मेषेचे म्हणजे
दोन्ही होतात
शीर्षकातच जिंकलात तुम्ही !
छान लिहिलं आहे
मजा आली वाचून
छान आहे लेख. शीर्षकही समर्पक
राशींवर विश्वास नाही...
द्या टाळी
राशींप्रमाणे स्वभाव ह्याकडे
अगदी अगदी....
सिंह राशीचे बरेच स्वभाव वैशिष्ठ
राशीचक्रामधे ऐकले आहे की ,