कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) म्हणजे कृत्रिम पद्धतीने विकसित करण्यात आलेली बौद्धिक क्षमता. अलीकडील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जात आहे. या बुद्धिमत्तेवर आधारलेलं यंत्र मानवाप्रमाणं स्वत: विचारही करू शकतं आणि परिस्थितीनुरुप निर्णयही घेऊ शकतं.
कृत्रिम बुद्धिमत्तेची ऐतिहासिक पार्श्वभूमी
इसवी सन पहिल्या शतकात ग्रीक वैज्ञानिक हेरोन यानं मानवाला त्याच्या कामात उपयुक्त ठरू शकणाऱ्या यंत्राचा उल्लेख केला होता. त्यानं काही यंत्र बनवलीही होती. त्यानं आपल्या ग्रंथांमध्ये 100 पेक्षा जास्त यंत्रांचं सचित्र वर्णन केलं होतं. भारतीय पौराणिक कथांमध्ये अशा स्वरुपाच्या यांत्रिक वस्तूंवर आधारित कथांचा समावेश आहे. ज्यूधर्मीयांच्या कथांमधील मातीच्या गोलेन, प्राचीन ग्रीक कथांमधील यांत्रिक दास ही त्या काळातील यंत्रांची काही उदाहरणं आहेत. इब्न अल-जजरी या अरब वैज्ञानिकांनं आपल्या लेखनात मानवाप्रमाणं दिसणाऱ्या आणि काम करू शकणाऱ्या यंत्रमानवाची संकल्पना सर्वात आधी मांडली होती. त्यानं मांडलेल्या संकल्पनांमध्ये शंभरपेक्षा जास्त यंत्रांमध्ये यांत्रिक चाकांचा वापर करून वेग आणि गतीचं नियंत्रण करण्याच्या पद्धतींचा समावेश होता. चीनमध्ये सु सोंग यानं 1088 मध्ये एक यांत्रिक घंटागृह उभारलं होतं.
यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
यंत्रमानव (Robot) किंवा अन्य यंत्रांचे नियंत्रण मानवाकडून केलं जातं. त्यामुळं नंतरच्या काळात मानवानं त्याच्याही पुढे विचार करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये अशा यंत्रांच्या निर्मितीबाबत विचार मांडला जाऊ लागला, जी यंत्र परिस्थितीनुरुप स्वत:हून निर्णय घेऊ शकतील, जिला विविध वस्तूंविषयी मानवाप्रमाणेच संवेदनशील असेल. या दृष्टीनं 1950 नंतर संशोधन सुरू झालं. अलिकडील काळात होत असलेल्या व्यापक संशोधनामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनात प्रवेश करू लागलेली दिसत आहे. आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेले दूरचित्रवाणी संच (टी.व्ही.), धुलाई यंत्र (Washing Machine), शीतपेटी (Fridge) यांसारखी यंत्र कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणं आहेत. आपण त्यामध्ये ज्या पद्धतीनं आज्ञावली (Programming) करू, त्याप्रमाणं ती कार्यरत राहतात. त्यामुळं यंत्रमानव हे आता केवळ यंत्र राहिलेलं नसून मानवाप्रमाणं विचार, आचार करू लागले आहेत आणि वस्तूंबाबत त्यांची जाणीव वाढू लागली आहे. ही यंत्र एखाद्या घटनेवर आपलं मत देऊ लागली आहेत आणि एखाद्या घटनेचं विश्लेषणसुद्धा करू लागली आहेत. हे सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेमुळंच शक्य होत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जास्तीतजास्त माहितीचं संकलन आणि तिचं अत्यंत वेगानं विश्लेषण या दोन्ही घटकांना अतिशय महत्व असते. त्यासाठी संगणक किंवा यंत्राला संलग्न केलेला processor उच्च क्षमतेचा असणे अत्यावश्यक असते.
अलिकडे कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची यंत्र बसवलेली असतात, जी अनेक माणसांची कामं कमी वेळेत करू शकतात. अलिकडे चालकरहित मोटारगाड्या ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागली आहे. या गाड्या कृत्रिम बुद्धिमत्तेचंच उदाहरण आहेत. या गाड्या स्वयंचलित आणि रस्त्यावरील परिस्थितीनुसार वाहनाचे नियंत्रण करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं मानवी मेंदूचे कृत्रिम प्रतिरुप बनवण्याचे प्रयत्न होत आहेत. हा कृत्रिम मेंदू मानवी मेंदूप्रमाणेच विचार, विश्लेषण करून निर्णय घेऊ शकेल. तो स्वत:चे तर्कही मांडू शकेल.
फेसबुकच्या वापरकर्त्यांना त्यांच्या संभाव्य मित्रांची सूची सतत पाठवली जात असते. कधी असंही होतं की, आपण इंटरनेटवर काम करत असताना आपल्याला विविध जाहिराती अचानक स्क्रीनवर दिसू लागतात. अलिकडील काळात भ्रमणध्वनी संचाला (mobile phone) वापरकर्त्याने प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर त्या यंत्राकडून दिलं जातं. या सर्व बाबी कृत्रिम बुद्धिमत्तेचाच भाग आहेत. अलिकडे यंत्रांमध्ये ऐकण्याची, पाहण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही एखाद्या यंत्राची बुद्धिमत्ता असते. पंचेंद्रियांच्या माध्यमातून सजीवाला ज्ञान मिळत असते. पंचेद्रियांकडून आलेल्या संवेदनांची माहिती मेंदूपर्यंत पोहचवली जाते. त्यानंतर त्या माहितीचे मेंदूमध्ये विश्लेषण होऊन सजीवांकडून निर्णय घेतले जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेत अशाच प्रकारे विविध संवेदकांचं जाळं निर्माण केलेलं असतं. त्यांच्या मदतीनं या संजाळातील मुख्य संगणकापर्यंत माहिती पाठवली जाते. त्या माहितीच्या आधारे तो संगणक त्या माहितीचे विश्लेषण करून योग्य तो निर्णय घेतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोग
- डिजिटलीकरणाच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व बरंच वाढलेलं आहे. मानवापेक्षा वेगानं काम करू शकणाऱ्या यंत्रांचं महत्व आज वाढलेलं आहे. चिकित्सा, बांधकाम, अंतराळ संशोधन आणि मानवी जीवनाशी निगडीत विविध कामं करण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाची ठरू लागली आहे.
- भविष्यात नॅनो तंत्रज्ञानातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू होईल. त्याच्या मदतीनं सूक्ष्म यंत्रमानव रुग्णांवर शस्त्रक्रिया करू शकेल. म्हणजे डॉक्टरांच्या अत्यल्प हस्तक्षेपानं यंत्राच्या आधारे जटील शस्त्रक्रिया पूर्ण केल्या जाऊ शकतील. वैद्यकीय क्षेत्रातील अन्य कार्यांमध्येही सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहेच.
- क्रीडा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. सामन्याची उच्च क्षमतेची छायाचित्रं जलद गतीनं काढणं, प्रतिस्पर्ध्यांचे डावपेच पाहून आपले डावपेच रचणं यात कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करत आहे.
- बांधकाम क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता लाभदायक ठरणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुधारणा करण्यासाठी तिचा वापर होत आहे.
- अंतराळ संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेचं अतिशय महत्वाचं स्थान आहे. मानवासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या अंतराळ मोहिमांमध्ये याचा वापर वाढत आहे.
- सायबर गुन्हेगारीमध्ये फसवणुकीचा शोध घेणे किंवा वित्तीय अनियमितता शोधून काढणे, वित्तीय देवघेवींवर देखरेख ठेवणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरत आहे.
- सध्या वेगानं वाढत असलेल्या ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जात आहे.
- विविध कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांची माहिती गोळा करणे, त्यांना संदेश पाठवणे, नव्या उत्पादनांची माहिती पाठवणे, सूची करणे इत्यादींसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे.
- वाहतूक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं मोटारगाड्या, विमानांचं संचालन मानवी हस्तक्षेपाशिवाय केलं जात आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा असा असणार आहे की, एकदा यंत्रामध्ये आपण आज्ञावली समाविष्ट केली की, ते यंत्र काम करण्यासाठी स्वत:चे नियम स्वत:च बनवेल.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/09/blog-post_9.html
प्रतिक्रिया
10 Sep 2022 - 7:06 pm | कंजूस
बुद्धिमत्ता अशी नसते पण ते एक गोंडस नाव आहे. पुढे याचं नाव बदलेल.
अगोदर काय केलं, काय विचार केला हे नसेल तर संगणक काम करू शकणार नाही.
आपल्या ब्राउजरमध्ये भरपूर कचरा ( cache ) जमा करून ठेवण्याचा हेतू हाच आहे.
आगामी काळात आपल्या घरातील कचरा गोळा करण्याचं कामही कंपन्या विकत घेतील. कारण त्यातून त्यांना आपल्या सवयी आणि गरजा कळतील आणि त्याप्रमाणे तशा वस्तू विकणारे आपल्या दारात हजर होतील. किंवा मोबाइलात तशा जाहिराती दाखवल्या जातील. सध्या आपण कचरा उचलून नेण्यासाठी महिना पैसे देतो. पण पुढे कचरा उचलून नेणारे आपल्याला पैसे देऊ करतील.
10 Sep 2022 - 7:22 pm | गवि
रोचक.
लेखही आणि प्रतिसादही.
10 Sep 2022 - 11:42 pm | पराग१२२६३
धन्यवाद!!
10 Sep 2022 - 8:32 pm | चौथा कोनाडा
माहितीपूर्ण लेख!
(( कृत्रिम बुद्धिमत्तेची ऐतिहासिक पार्श्वभूमी
इसवी सन पहिल्या शतकात ग्रीक वैज्ञानिक हेरोन यानं मानवाला त्याच्या कामात उपयुक्त ठरू शकणाऱ्या यंत्राचा उल्लेख केला होता. त्यानं काही यंत्र बनवलीही होती. त्यानं आपल्या ग्रंथांमध्ये 100 पेक्षा जास्त यंत्रांचं सचित्र वर्णन केलं होतं. भारतीय पौराणिक कथांमध्ये अशा स्वरुपाच्या यांत्रिक वस्तूंवर आधारित कथांचा समावेश आहे.)))
भारतीय चा उल्लेख केला आहे तेंव्हा याबद्दल आणखी वाचायला आवडेल.
10 Sep 2022 - 11:42 pm | पराग१२२६३
हो नक्की
11 Sep 2022 - 9:45 am | कर्नलतपस्वी
माहितीपूर्ण लेख व ताकदवर प्रतीसाद. विषयाबद्दल अनभिज्ञ नाही पण सखोल ज्ञान पण नाही. इथे नव्या पिढीतील कुशल तंत्रज्ञांकडून नवीन माहीती मिळेल.
लेख आवडला. सर्व प्रतिसादही वाचणार.
11 Sep 2022 - 11:02 am | टर्मीनेटर
विषय आवडीचा आहे. अजून वाचायला आवडेल.
मागे orfonline.org साईटवर मृणाल जोशींच्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण’ ह्या लेखमालिकेतील "माणसापुढील आव्हान कृत्रिम बुद्धिमत्तेचे" हा पहिला भाग वाचनात आला होता. लेख आवडला म्हणून बुकमार्क करून ठेवला होता, पण मालिकेतील पुढचे भाग काही सापडले नाहीत; बहुतेक अजून प्रकाशित झाले नसावेत!
11 Sep 2022 - 11:06 am | कुमार१
माहितीपूर्ण लेख!
16 Sep 2022 - 7:59 pm | सुबोध खरे
दूरचित्रवाणी संच (टी.व्ही.), धुलाई यंत्र (Washing Machine), शीतपेटी (Fridge) यांसारखी यंत्र कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणं आहेत.
हि कृत्रिम बुद्धिमत्ता आहे का यांबद्दल मला शंका आहे.
कारण हि यंत्रे स्वतः विचार करू शकत नाहीत तर त्यात दिलेल्या आज्ञावलीप्रमाणे दिलेल्या हुकुमाबर काम करणारे यंत्रमानव आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जेंव्हा संगणक दिलेल्या माहितिचा स्वतः विचार करून त्याचे विश्लेषण करून तुम्हाला निर्णय देतो किंवा त्याप्रमाणे स्वतः काम करतो.
उदा. माझ्या सोनोग्राफी यंत्रात गर्भाच्या डोक्याच्या आकाराचे विश्लेषण करून त्याचा व्यास आणि परिमिती स्वतः मोजतो आणि ते दिलेल्या सरासरी प्रमाणे बरोबर आहे कि नाही हे ताबडतोब दाखवतो.
तज्ज्ञांनी आपले मत द्यावे हि विनंती.
16 Sep 2022 - 9:11 pm | गवि
तज्ञ असे नव्हे, पण या शास्त्राशी नेहमी संबंध येत असल्याने शिकून घेतले आणि अजूनही नवीन शिकणे चालूय.. म्हणून असे ढोबळमानाने सांगता येईल की
डेटा
अनालिसिस
मशीन लर्निंग
आर्टिफिशीयल इंटेलिजंस
अशी एकाबाहेर एक वर्तुळे कल्पिता येतील.
पहिल्या दोघांशी आपला परिचय असतोच. एसीने तापमान "सेन्स" करुन आपोआप चालू बंद होणे किंवा तत्सम ऑटोमेटीक गोष्टी म्हणजे AI नव्हे. ते मशीन लर्निंगही नव्हे.
कॉम्प्युटर व्हिजन हे एक उदाहरण घेता येईल.
ट्रेनिंग डेटा म्हणजे जी माहिती आगोदर मनुष्याने validate केली आहे ती कॉप्यूटर प्रोग्रामला दिली की तो विविध चले (व्हेरियेबल्सला योग्य शब्द?) एकमेकांशी ताडून एक अधिकाधिक अचूक होत जाणारा अल्गोरिदम बनवतो. मग पुढे न बघितलेला नवा डेटा आला तरी तो उदा.85% अचूक भाकिते करु शकतो.
उदा. ट्विटरवर मा. अमुक मंत्री यांच्याबद्दल आलेली वाक्ये ही सकारात्मक की नकारात्मक, त्या भावनांचे प्रमाण किती?
यासाठी जिवंत मनुष्यांनी बसून वाचून वर्गीकरण केलेली हजारो वाक्ये प्रोसेस करुन एक मॉडेल बनवले जाते. मग रोज येणारी लक्षावधी ट्वीट्स त्याला दिली तरी तो विशिष्ट टक्के अचूकतेने सकारात्मक/ नकारात्मक टक्केवारी दाखवतो.
किंवा हजारो फोटो, त्यावर कुत्रा की मांजर असे tag करुन दिले की पुढे येणारे नवे फोटो कुत्रा की मांजर हे ओळखण्याचे मॉडेल तयार करता येते. त्यात खास कुत्रा अथवा मांजर यांची लक्षणे वगैरे असे प्रोग्रामिंग करावे लागत नाही.
पण.. हा देखील AI नव्हे. हे मशीन लर्निंगच.
AI म्हणजे अशा मॉडेलवर आधारित आऊटपुट वापरुन जेव्हा कुत्रा, मांजर, मूल, सायकल, कार, खांब असे समोर आलेले अडथळे ओळखून त्यानुसार ब्रेक लावणे, लाल सिग्नल दिसला की ओळखून थांबणे असे कारचे मशीन प्रत्यक्ष करेल ते.
पण कोणतेही मॉडेल कधीच 100% अचूक नसते. तेव्हा अगदी सार्वजनिक रस्त्यावर अशी कार येणे अद्याप दूर आहे.
नियंत्रित आणि मर्यादित एरीयात हे आधी येईल (उदा गोडाऊनमधे मालवाहतूक करणारे वाहन, गटार स्वच्छ करणारे वाहन, विमानतळावर नॉन पसेँजर एरीयात वाहतूक, रेल्वे इत्यादि.)
17 Sep 2022 - 8:51 am | शाम भागवत
अॅमेझॉनने हे सुरू केलंय असं वाचल्याचं आठवतंय.
18 Sep 2022 - 7:49 pm | शेर भाई
मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वेगळी असते का ? कारण इतके दिवस "मशीन शिकली बुद्धिमान झाली किंवा बुद्धिमत्ता आली" असे समजत होतो. याचा अजून विस्तृत खल होईल का ?
तसेच अलेक्सा किंवा बिक्सी बाई कुठल्या सदरात येतात ?
18 Sep 2022 - 8:58 pm | शाम भागवत
रशियाने २० मॅकच्या वेगाने जाणारी मिझाईल्स बनवली आहेत. ती कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारलेली आहेत. ती सोडणे फक्त आपल्या हातात असते. सोडल्यावर ती लक्ष्यावर जाताना वाटेतील रडार आपणहून ओळखतात व त्यानुसार आपला मार्ग बदलतात. थोडक्यात एखाद्या रडारने जागा बदललेली असली किंवा एखादे नवीन रडार वाटेत सुरू झाले असेल तरी ते ओळखण्याची क्षमता व त्यानुसार आपला मार्ग बदलण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात असते. खरे तर ही क्षेपणास्त्रे २५ मॅक या वेगाने जाऊ शकत असली तरी २० मॅक ह्या वेगाची क्षेपणास्त्रे रशियाने तैनात केलेली आहेत. ही आहे कृत्रीम बुध्दीमत्ता. यात क्षेपणास्त्र सोडल्यावर काहीही हस्तक्षेप करता येऊ शकत नाही. ते स्वयंभू बनते.
-वासलेकर यांच्या ६५ मिनिटांच्या व्हिडिओतून साभार
18 Sep 2022 - 9:13 pm | शाम भागवत
माझ्या मते आधी जी माहिती भरलेली आहे त्या आधारे यांचे कार्य चालते. या माहितीच्या बाहेरचे काहीही त्यांना सांगता येत नाही. पण कृत्रीम बुध्दीमत्ता ही त्याच्या पुढची पायरी आहे.
जर
या बिक्सी बाईंना भरलेल्या माहितीतून उत्तर मिळाले नाही व त्यासाठी त्यांनी चक्क गुगलचा वापर केला व त्यातून माहिती मिळवून मग उत्तर द्यायला सुरवात केली तर मात्र ती कृत्रीम बुध्दिमत्ता म्हणायला लागेल. मग मात्र मूळ संगणक आज्ञावली लिहिणा-या संगणक अभियंताच्या हातात काहीही राहणार नाही.
18 Sep 2022 - 9:50 pm | गवि
कोणत्याही माणसाच्या बोललेल्या शब्दांवरुन त्याचा अर्थ जाणणे यासाठी जे केले जाते ते मशीन लर्निंग.
शब्द ऐकून action घेणे हा प्राथमिक दर्जाचा AI म्हणता येईल तो केवळ अशासाठी की शब्दाच्या उच्चारातले किरकोळ भेद, हेल हे असूनही त्यातून इच्छा समजून घेणे.
अधिक उच्च AI म्हणजे समजा बोलण्याच्या टोनवरुन ते गंभीर आहे की उपरोधिक आहे वगैरे ओळखून तसे उत्तर देणे. (बरं , ब्वोर्र, बरं ssss )
मिपावर उदाहरणे असतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा..
19 Sep 2022 - 9:19 am | वामन देशमुख
कोणत्याही माणसाच्या बोललेल्या शब्दांवरुन त्याचा अर्थ जाणणे यासाठी जे केले जाते ते
ते Natural Language Processing (NLP) आहे, नाही का?
19 Sep 2022 - 9:40 am | गवि
NLP, Computer vision वगैरे हे मशीन लर्निंगचे विभाग. त्यात अधिक खोल अचूकता येऊन त्याचा वापर होऊन यंत्राने प्रत्यक्ष प्रतिसाद देणे, कृती करणे म्हणजे AI.
19 Sep 2022 - 11:31 am | चौकस२१२
Computer vision
यातील काही उत्पादन क्षेत्रातील उधारणे
- कत्तलखान्यात ( विशेष करून बीफ सारखा मोठ्ठा प्राणि )चरबी किती आहे त्यानुसार त्याचे वर्गीकरण , कधी चरबी खूप असणे म्हणजे निकृष्ट प्रत असते तर कधी चरबी योग्य प्रकारे "पसरली " आहे का हे महत्वाचे असते जसे कि व्याग्यु जातीचे बीफ मध्ये चरबीक ची जाळी ( मार्बलिंग ) लागते तर ते चांगल्या प्रतीचे
- धातुचे सपाट (शीट मेटल ) भाग पंच केल्यावर त्याची विभागंनि, उत्पादन दर्जा तपासणे
19 Sep 2022 - 4:49 pm | वामन देशमुख
हं बरोबर आहे.
---
सवांतर: AI, ML, NLP, AGI, ASI, ... काही वेळा, नुसत्या या तंत्रज्ञानाची प्रगती ट्रॅक करत राहण्यातच दमछाक होते आजकाल. 😫
---
अवांतर: टर्मिनेटर ३ मध्ये दाखवलेला यंत्रांचा उदय होऊ घातला आहे का?
19 Sep 2022 - 9:55 am | कंजूस
१) प्रसेसर दांडगा लागतो,
२) इंटरनेट स्पीडही वेगवान लागतो.
कारण . .
जेव्हा तुम्हाला काय हवंय हे तुमच्या डिवाइस हिस्ट्रीतून बोध होत नाही तेव्हा जालावर सध्या काय प्रचलीत आहे ते ताडून त्या बातम्या,फोटो सादर करणे.
उदाहरणार्थ मी 'हाइब्रिड' शब्द वापरल्यास डिवाइस गंडेल. की याने शेती किंवा कार याबद्दल कधी वाच्यता केली नाही तर काय शोधत असेल?
'अंदमान' म्हटल्यावरही तारांबळ उडू शकते. समुद्रकिनारे पाहात नाही. मग महाराष्ट्रातला मराठी आहे म्हणजे सावरकरांच्या जेलला जाणार आहे काय?
दसरा म्हटले तर मी कानडी/बंगाली नसेल तर मराठी अस्मिता सभा कुणाची पाहात असणार.
ता.वरून ताकभात.
तर तारतम्याचे भान ठेवणे म्हणजे AI असावे.
19 Sep 2022 - 4:13 pm | तर्कवादी
मी अजून अलेक्सा वा तत्सम यंत्र घेतलं नाही पण खालील काल्पनिक प्रसंग प्रत्यक्षात उतरेल तेव्हा चार-पाच काय अगदी दहा-पंधरा हजार देवूनही विकत विकत घ्यायला.
"अॅलेक्सा, मी आता चार दिवस बाहेरगावी चाललोय हं"
"बरं दादा. मग मी डेली डिलिवरी अॅपमधून उद्द्यापासून चार दिवस दूधाची डिलिवरी बंद करवते"
"अगं अॅले पण मी एकटाच चाललोय , तुझी वहिनी इथेच असणार आहे"
"बरं दादा मग एक लिटरचं अर्धा लिटर करते"
"ठिक आहे"
"बरं दादा.. जाण्यापुर्वी तो स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर तेवढा बदलून जा बरं"
"का गं बाई ?"
"अरे का म्हणून काय विचारतोस , वहिनीला बदलता येत नाही ना सिलिंडर"
"ते तुला कुणी सांगितलं...? "
"कारण गॅसचं रिफिल बूकिंग करायला मला नेहमी तूच सांगतोस? "
"बरं पण रिफील बूक करण्याचा सिलिंडर बदलण्याशी काय संबंध"
"माझ्याकडील विदानुसार ९३.३% वेळा जी व्यक्ती गॅस सिलिंडर बदलते तीच रिफील बूक करते. "
"बरं पण आताच बदलायला सिलिंडर संपलाय कुठे अजून"
"संपेलच रे एक दोन दिवसात. दोन महिन्यापुर्वी बदलला होतास तू. मग मध्यंतरी दोन पाहूणे आले होते ते चार दिवस राहिलेत म्हणजे जास्त स्वयंपाक झाला.हो ना ? "
"ए तुला काय माहित आमच्याकडे पाहुणे आले होते ते..."
"हो.. तसं तु आज काल खूपशा गोष्टी सांगत नाहीस मला पण तुझ्या सोसायटीच्या गेट एन्ट्री अॅपवरुन मला कळालं की. आणि मग पाहूणे आलेत म्हणून स्वीटमार्ट्मध्ये जावून मिठाई आणलीस , वाईन शॉपमधून वाईन आणलीस ते तुझ्या क्रेडीट कार्ड स्वाईपवरुन कळालं. शिवाय मला चार दिवस डेली डीलिवरी अॅपमधून दूधाचा सप्लाय एक लिटर वरुन दीड लीटर करायला सांगितलं होतंस"
"हं.. हुशार आहेस हं.."
"नाही म्हणायला दोन महिन्यात तुम्ही स्विगीवरुन जेवण बोलावलंत सहा वेळा आणि बाहेर चरायला गेला होतात तीन वेळा म्हणजे तितका गॅस वाचला असेल पण तरी चार दिवस आकाश सतत ढगाळ होते, सोलर हीटरचे पाणी तापले नाही मग तुम्ही स्वयंपाकाच्या गॅसवर तापवले असणार. म्हणजे मला काही बोलला नाहीस तू पण मला कळतं सगळं बरोबर"
"मानलं बाई तुला.. फारच डोकं लावतेस गं तू"
"आता ते लावावं लागतं.. ती गॅसची शेगडी बदलून तु स्मार्ट शेगडी बसवली असतीस तर माझं काम थोडं सोपं नसतं का झालं ? पण तु महाकंजुस..किती दिवसाची तुला सांगत्येय की ड्रॉईंगरुम आणि किचनमध्ये कॅमेरे बसव आणि त्यांना माझ्याशी जोड मग बघ मी तुला अजून कित्ती कित्ती मदत करते ते..."
"काही नको अॅले.. आधीच तुझा चोंबडेपणा फार वाढलाय... आता मला बॅग भरायला मदत कर.."
"बसं का दादा.. ते काय सांगायला हवं का ? आता तु स्मार्ट ट्रॅव्हलबॅग घेतली असतीस तर त्यात मागच्या वेळी भरलेल्या सामानाची हिस्ट्री राहिली असती.. पण ठीक आहे.. मागच्या वेळी वहिनीने यादी वाचून दाखवली होती मला तर आता सांगते मीच तुला... "
19 Sep 2022 - 4:15 pm | गवि
हा हा हा.. धागाच करा राव याचा..
19 Sep 2022 - 4:27 pm | तर्कवादी
हो खरंच की.. दिवाळी अंकासाठी पण छोटासा लेख होवू शकला असता पण आता संधी गेली कारण तिथे अप्राकशित साहित्य हवंय. वेगळा धागा काढता येईल ; हा धागा जुना झाल्यावर विचार करता येईल.
या धाग्यावर आल्यावर हे अचानकच सुचलं आणि लिहिलं. पण माझी अॅलेक्सा सारख्या यंत्रांकडून हीच अपेक्षा आहे.. नाहीतर उगाच एखादं गाणं वाजवण्यापुरता किंवा गुगलवरुन एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरिता फक्त अॅलेक्साचा उपयोग होत असेल तर तो माझ्या लेखी तो उपयोग नाहीच.
19 Sep 2022 - 4:39 pm | वामन देशमुख
व्वा! आवडली तुमची अलेक्षी!
अर्थात, हे अगदीच काही अशक्य नाही वाटत पुढच्या काही काळात.
नाहीतरी, "इलेक्ट्रॉनिक टॅटू स्मार्टफोनची जागा घेतील" असं बिल गेट्स म्हणालेतच.
19 Sep 2022 - 5:02 pm | तर्कवादी
धन्यवाद..
सहमत
आणि हळूहळू ती गरजही होईल किंबहूना आताच झाली आहे.. कारण घरातल्या अनेक गोष्टी लक्षात ठेवून , त्याप्रमाणे नियोजन करुन खरेदी वा इतर गोष्टी करणं हे लोकांना आता जमेनासं झालंय.. त्यामुळे लवकरच गृहकृत्यदक्षता अलेक्साकडे आउटसोर्स करावी लागणार आहे.
23 Sep 2022 - 6:26 pm | पाषाणभेद
माहितीपूर्ण लेख