श्री गणेश लेखमाला २०२२ - टिपेश्वर आणि ताडोबा भटकंती - वाघ अनुभवणे

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in लेखमाला
1 Sep 2022 - 8:56 am

h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float: left;width:20%;margin-right:20px;}

श्री गणेश लेखमाला २०२२टिपेश्वर आणि ताडोबा भटकंती - वाघ अनुभवणे
मार्च-एप्रिल-मे म्हटल्यावर आमच्यासारख्या भटक्यांचे प्लॅन्स होतात सफारींचे.. त्यातून गेली २-३ वर्षे कोरोनामुळे कुठे जाता आले नव्हते. मग आम्ही प्लॅन केला ह्या वेळेला टिपेश्वरला जायचा. मग मेंबर गोळा करणे सुरू झाले आणि ११-१२-१३ जूनचा प्लॅन झाला. पटापट आधी परमिट बुक केले, विमान तिकिटे बुक केली आणि नवीन कॅमेऱ्याची सगळी सेटिंग्ज वगैरे बघणे सुरू केले.. तेव्हाच लक्षात आले की सोमवारी टिपेश्वर बंद असते. आता फक्त आमच्या तीनच सफारी होणार होत्या. आम्ही वेगवेगळे पर्याय पाहिले आणि शेवटी ठरवले की रविवारची सफारी झाली की थेट ताडोब्यात जायचे. तिकडे सकाळ-संध्याकाळ सफारी बुक केल्या, कारण विमान रात्री ११:३०चे होते.
आणि निघायच्या ३-४ दिवस आधी एकाच्या पायाला गाडीच्या सायलेन्सरचा चटका बसला आणि त्यातून जखम चिघळत त्यांचे येण्याचे कॅन्सल झाले. आता परत चौथ्या मेंबरसाठी शोधाशोध सुरू झाली, आणि नशिबाने एक मित्र तयार झाला.
आता विमानाची तिकिटे बुक करतोय तर रिटर्नचे विमान त्याला दिसले नाही. मी म्हणालो, “अरे, बुक केले आहे आम्ही, तू कॉल कर कस्टमर केअरला." तर आणखी एक बॉम्ब पडला - परतीचे विमान कॅन्सल झाले होते. मग काय, परत शोधाशोध करून दुसऱ्या दिवशी पहाटे ४च्या विमानाचे तिकीट बुक केले.


.

शेवटी ही सगळी विघ्ने पार करून एकदाचे विमानात बसलो. गो-एअरचे ७.१५ला विमान होते पुणे ते नागपूर. पण ७.३० झाले, तरी ते धावपट्टीवरच! शेवटी ७.४५ला उड्डाण केले आणि नियोजित वेळेच्या अर्धा तास उशिरा नागपुरात पोहोचलो. तिकडे २ जण पेंचहून आले होते, त्यांनी पिकअप केले आणि गाडीने यवतमाळच्या दिशेने कूच केले. जांबला एकदम जंबो नास्ता केला - सामोसा सांबार, डोसा, इडली, मेदूवडा आणि डाळिंबाचे सरबत आणि मग थोड्याच वेळात आम्ही AH ४३ ह्या रस्त्याला लागलो. हा रस्ता पार दिल्लीपासून पुढे कन्याकुमारीपर्यंत जातो. दोन-एक तासांनी आम्ही आतल्या रस्त्याला लागून टिपेश्वरच्या दिशेने लागलो. त्या भागात आणखी जास्त हॉटेल्स, रिसॉर्ट्स नसल्याने आम्ही एका होम स्टेमध्ये उतरलो. ही जागा जंगलाला एकदम लागून असून तिथून सफारी गेट साधारण दीड कि.मी.वर आहे. ही जागा मथनी गेट ह्या बाजूला आहे. पटापट फ्रेश होऊन जेवायला बसलो. विदर्भी जेवण असल्याने नुसती लाल चॉकलेटी तर्री आणि बऱ्यापैकी तिखट जेवण, पण चविष्ट होते. जेवण झाले आणि सगळे लटांबर घेऊन जिप्सीमध्ये बसलो. जिप्सी चालवणारा सरदारजी होता, पण आश्चर्य म्हणजे मथनी ह्या तिथल्याच एकदम खेड्यातला राहणारा असल्याने अस्खलित मराठी बोलणारा होता. जिप्सीने निघालो आणि गेटवर आलो. वातावरण अचानक बदलले आणि लांबवर पाऊस दिसायला लागला. पटापट सगळे सोपस्कार पार पाडले आणि आमच्या जिप्सीने पहिली एंट्री घेतली. ज्यांनी जिप्सीमध्ये बसून जंगलात जाण्याचा अनुभव घेतला असेल, त्यांना जाणवेल तो क्षण किती भारी असतो ते.
(तुम्ही ओळखले असेलच, डावीकडचा अस्मादिक आहे!)


.

तर टिपेश्वरमध्ये ३ वाघिणी आहेत आणि त्यांना प्रत्येकी ३ पिल्ले आहेत आणि म्हणून आम्ही इकडे जायचे ठरवले होते. नेहमीप्रमाणे शोधमोहीम सुरू झाली. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्याने वाघ हमखास पाणवठ्यावर येतात. टिपेश्वर हे नाव ‘तिपाई’ ह्या देवीच्या मंदिरावरून पडले आहे, हा भाग एकदम उंचसखल असा आहे. इकडच्या जिप्सी फारच खराब होत्या, पण जंगल सफारी म्हटल्यावर खपवून घ्यायचे, असे ठरवले. ४-४.३० झाले होते, पण काहीच कुठेच हालचाल दिसत नव्हती. वातावरणही एकदम ढगाळ आणि पावसाळी झाले होते. आणि तेवढ्यात गुरमीत (ड्रायव्हर) ह्याला फोन आला की वाघीण दिसते आहे दरीत. आम्ही लगेच तिकडे मोर्चा वळवला आणि मग ती दिसली.. आर्ची - A मार्क असल्याने आणि सैराट तेव्हा एकदम हिट असल्याने तिचे हे नाव ठेवले होते.


.

हळूहळू ती वरती येत होती रस्त्याकडे. पण रस्त्यावर तिच्यासमोरच २ जिप्सी आणि मागे आमची जिप्सी होती. त्यांना म्हणालो की पुढे सरका आणि तिला जागा द्या वरती येण्यासाठी. आम्हीही आमची जिप्सी मागे घेतली. हे सगळे होईपर्यंत ती शांतपणे बघत होती. आता ही सुवार्ता कळल्याने सगळ्या गाड्या आमच्या मागे येऊन लागल्या आणि मोबाइल कॅमेरे बाहेर निघाले. आमच्या अंदाजानुसार ती बरोब्बर वरती आली आणि आमच्या समोर आली. आम्ही हळूहळू जिप्सी मागे घ्यायला लागलो, जेणेकरून तिला चालायला मिळेल आणि आम्हाला फोटोसुद्धा मिळतील. पण पण.. गाड्या मागेच जायला तयार नाहीत! आम्ही ओरडून सांगतोय की तिला चालायचे आहे, मागे घ्या.. पण कोणीच ऐकायला तयार नाही. सगळ्यांना मोबाइलमध्ये फोटो काढायचे होते. वाघिणीने २-४ मिनिटे वाट पाहिली, पण काहीच घडत नाही म्हटल्यावर तिने रस्ता सोडला आणि थेट उंच डोंगर चढायला सुरुवात केली. आम्ही इतके हताश आणि चिडलो होतो, पण काहीच करू शकत नव्हतो. फोटो चांगले मिळाले होते, पण गाड्यांनी ऐकले असते, तर तिला पूर्ण रस्ता चालता आले असते. असो. अशा रितीने आमच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. फोटो मिळाल्यावर लगेच आम्ही बाकरवड्यांची पार्टी केली आणि स्टेला आल्यावर जेवण एकदम साधे बनवायला सांगून फ्रेश व्हायला गेलो. रात्री तिकडे इतर बाजारबुणगे लोक होते, जे सफारी म्हणजे पिकनिक ट्रिप ह्या विचारांचे होते. जेवताना त्यांनी अंडाकरीवरून इतका वाद घातला की आम्हालाही जेवण नीट जाईना. अक्षरशः शाळेत जसे आपल्याला शिकवले होते की तारेवर १० पोपट असतील आणि ४ उडाले तर किती राहतील, तसे त्यांचे चालले होते की आम्हीं १२ अंडी सांगितली होती, ४ खाल्ली, उरलेली कुठे गेली? जाम वैतागलो होतो आम्ही आणि त्या स्टेचा मालकसुद्धा. तर शेवटी ह्यांना इग्नोर मारले, कारण भल्या पहाटे उठून सफारी होती आणि प्रवास बराच झाला होता. पटकन पडी टाकली आणि पहाटे ४.३०ला उठून ५.००ला चहाचा घोट घेतला.

परत सगळा जामानिमा चढवला आणि गेटवर येऊन थांबलो. परत आमची जिप्सी पहिल्या नंबरवर होती. एक महत्त्वाचे कारण असे की जमिनीवर वाघांचे, जंगली प्राण्याचे ठसे असतात आणि त्यावरून आपण त्यांना ट्रॅक करू शकतो. नाहीतर गाड्यांच्या टायरमुळे ते पुसले जातात. थोड्याच वेळात आम्हाला वाघाचे पंजे दिसले. एका मोठ्या वाघाचे. आम्ही लगेच जिप्सी त्या बाजूला वळवली. काही अंतर गेल्यावर ते ठसे आतमध्ये जंगलात गेलेले दिसले, तरी आम्ही खूप पुढे जाऊन फेरफटका मारून आलो, पण वाघ दिसला नाही. अगदी पहाटे त्याने मूव्ह केलेली होती. तर असेच शोधत पुढे जात राहिलो. रस्त्याने ह्या वाघाचे पंजे दिसत होते, म्हणजे तो ५ कि.मी. चालत होता, हे दिसले. आम्ही आता एका सुंदर अशा तळ्यापाशी येऊन थांबलो, जिकडे तालाबवाली वाघीण राहते. खूप मस्त वातावरण होते, शांतता होती आणि मुख्य म्हणजे गाड्या नाहीत आणि लोकांचा कोलाहल नाही. बराच वेळ वाट पाहिल्यावर एक वाघीण दिसली झाडीमध्ये आणि आम्ही ट्रॅकिंग सुरू केले. तेवढ्यात एक गाडी आली. त्यांना आधीच दम भरला की शांत बसा, सगळ्यांना नीट वाघ दिसेल. जवळच एक नाला होता, तिकडे हरणे चरत होती. तिने हळूच पोझिशन घेतली. आम्हाला वाटले, आता मस्त एकदम action बघायला मिळणार.. पण त्यांना वाघाची चाहूल लागली आणि त्यांनी धूम ठोकली. हळूहळू ती पुढे जायला लागली. आमच्या लगेच लक्षात आले की ती थोड्या अंतरावर एका ठिकाणी बाहेर येईल. आम्ही एकदम पुढे जाऊन आमची जिप्सी उभी केली आणि त्या गाडीवाल्याला सांगितले की तू अलीकडेच थांब, म्हणजे तुम्हालाही दिसेल आणि आम्हालाही दिसेल आणि मुख्य म्हणजे तिला जायला जागा मिळेल. त्या गाडीवाल्याने शांतपणे आमचे म्हणणे ऐकले आणि ती आम्हाला येताना दिसली. आमचा अंदाज होता त्या ठिकाणीच बरोब्बर ती बाहेर आली आणि मस्तपैकी आमच्याकडे बघत बघत रस्ता क्रॉस करून परत जंगलात निघून गेली.


.

खूप भारी पोझेस मिळाल्याने खूश होऊन लगेच बाकरवड्यांची मेजवानी झाली. आता एका उंच रस्त्याने खाली उतरलो. वळण लागले आणि आणि मोठ्ठा वाघ येताना दिसला, तो होता स्टार.. कारण त्याच्या डोक्यावर स्टारसारखी खूण आहे. हा ह्या जंगलातल्या सगळ्या पिल्लांचा पिता आहे आणि वय साधारण १४ वर्षे आहे. आम्ही पटापट पोझिशन घेऊन जिप्सी थांबवली. फोटो काढणे सुरू केले आणि जसाजसा तो पुढे येऊ लागला, तसे आम्ही गाडी मागे घेणे सुरू केले, जेणेकरून त्याला डिस्टर्ब नाही होणार आणि फोटोसुद्धा मिळतील.


.

मध्येच त्याने रस्ता सोडला आणि आतून चालायला लागला. नंतर आमच्या लक्षात आले की आमच्या मागे परत गाड्या लागल्या आणि तो आवाज आणि कोलाहल त्याला सहन नाही झाला. आम्हाला माहीत होते की तो परत बाहेर येणार, म्हणून परत सगळ्यांना सांगितले की पटकन आपण सगळे मागे जाऊन थांबू, म्हणजे तो बाहेर येईल.. पण हाय रे कर्मा, इथेही तेच. गाड्या मागे जायलाच तयार नाहीत. मग वाघ आणखी आत निघून गेला. आम्ही तसेच पुढे निघालो दुसरीकडे - म्हणजे सुन्ना गेटकडे, कारण तिकडे पिलखान वाघिणीची पिल्ले होती. तिकडे १-२ गाड्या होत्या, तिकडे कळले की आत पिल्ले आहेत आणि बाहेर येतील. पण ही पिल्ले लॉकडाउनच्या काळात जन्माला आल्याने त्यांना गाड्यांची सवय नाही आणि म्हणूनच खूपच लाजाळू आहेत.. आणि तसेच झाले. ते पिल्लू (बऱ्यापैकी मोठे झालेले) बाहेर आले आणि इकडेतिकडे न बघता लगेच आत निघून गेले. मग आम्ही परत मागे फिरलो. एका ठिकाणी आम्हाला मारलेले रानडुक्कर (किल) दिसले. बराच वेळ तिकडे थांबलो, पण वाघाची कुठलीच हालचाल न दिसल्याने स्टेवर परत आलो.
.
थोडी विश्रांती घेऊन, जेवण करून सफारीसाठी सज्ज झालो. आता आमची ही शेवटची सफारी होती टिपेश्वरमधली आणि आम्हाला इतर २ वाघिणी आणि बच्चे दिसले नव्हते. भरपूर वेळ वेगवेगळ्या ठिकाणी फिरस्ती केली, पण जंगल त्या दिवशी एकदम शांत होते आणि त्या दिवशी खूप गाड्या सोडल्या होत्या. टिपेश्वरमध्ये एक प्रॉब्लेम म्हणजे खाजगी गाड्यांना परवानगी आहे. त्याचा तोटा असा की ड्रायव्हरला माहीत नसते गाडी कशी चालवायची, वाघापासून किती अंतर ठेवायचे वगैरे. गाड्यांमध्ये मेंढरे भरावी तसे लोक भरले होते. वाघ दिसत नव्हता, तर आम्ही गाइडला सांगितले की काही घुबड असल्यास बघू या, त्याप्रमाणे त्याने एका ठिकाणी नेले आणि आम्हाला दाखवले एक झाड. ढोलीमध्ये मस्तपैकी एक घुबड (indian scoups owl) बसलेले दिसले. माझ्यासाठी ते lifer (म्हणजे पहिल्यांदाच दिसणे) होते. मस्तपैकी फोटो काढले. मग जिकडे मेलेले रानडुक्कर होते, तिकडे परत जाऊन थांबलो. खूप वेळ वाट पाहिली आणि हळूहळू सूर्य अस्ताकडे जायला लागलेला. मग बसल्या बसल्या त्या निसर्गाची अनुभूती घेत शांतपणे बसलो आणि परतीच्या वाटेवर लागलो. डोळे शोधत होते वाघाला. प्रत्येक पिवळसर वस्तू वाघ दिसत होती. लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजेसच्या नियमानुसार आज वाघ दिसणार नव्हता, पण आम्हीही खट्टू झालो नव्हतो, कारण दोन दिवस एका वेगळ्याच भागात वाघाचे ट्रॅकिंग करायला आणि फोटो काढायला मिळाले होते. तीन सफारी मिळून तीन वाघ म्हणजे तसे नशीब चांगलेच होते. बाहेर पडायच्या आधी एका ठिकाणी मोर बसलेला दिसला आणि काही क्षणात मस्त पिसारा फुलवून नाचू लागला. वाघ दिसला नाही, पण मोराचे नृत्य खूप छान दिसले.


.

होम स्टेला परत आलो. फ्रेश होऊन शांतपणे जेवण केले आणि ताडोबाकडे कूच केले साधारण रात्री ९.३० वाजता. रात्री-बेरात्री १२:३० वाजता छावा रिसॉर्ट कोलाराजवळ पोहोचलो. पटकन चेकइन करून झोपलो, कारण आमची सफारी दुसऱ्या दिवशी १५-२० कि.मी. अंतरावर असलेल्या अलिझन्झा गेटवर होती आणि दुसरे म्हणजे आमची कॅब नव्हती, त्यामुळे सकाळी सकाळी जिप्सीने जायचे होते.

पहाटे बरोब्बर ४.३०ला चहा मारून निघालो, उघड्या जिप्सीमध्ये मस्त थंडगार वारे खात गेटवर पोहोचून पहिल्या नंबरवर जिप्सी लावली. आम्हाला तिकडे ड्रायव्हरने सांगितले की काल रात्री गेटजवळ वाघाने एका म्हशीला मारले आहे, पण तो भाग दाट झाडीत असल्याने तिकडे जाता येत नाही. सोपस्कार करून निघालो. जिकडे काल म्हैस मारली होती, साधारण त्या बाजूला रस्त्यावर थांबलो काही वेळ आणि पुढे निघालो. जवळच एका ठिकाणी एक adult आणि तरुण गरुड (Crested Serpent Eagle) दिसले. पुढे गेल्यावर परत परवा दिसलेली घुबडे दिसली. दोन पिल्ले होती, छानपैकी फोटो आणि व्हिडिओ घेऊन पुढे गेलो. आता एकदम उंच भाग ओलांडून पुढे गेलो. खूपच सुंदर वातावरण होते. पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याचा शांत आवाज.. एका ठिकाणी गेलो, जिथे इतकी वेगळीच झाडे होती - म्हणजे मोठ्ठाले वेल होते आणि तो भाग एका वाघिणीचा होता. पुढे गेलो, जिकडे शंकराचे पुरातन मंदिर आहे आणि दर सोमवारी तिकडे दर्शनाला लोक जातात आणि त्याच भागात एक मोठ्ठा वाघ असतो. आणि महत्त्वाचे म्हणजे आजतागायत तिकडे कुठलेही अनुचित प्रकार घडलेले नाहीत. आमची शोधमोहीम चालू होती कुठे कॉल्स येतात का किंवा पंजे दिसतात का वगैरे आणि तेवढ्यात माझा मित्र सागर म्हणाला, “थांबा, आतमध्ये झाडावर काहीतरी बसलेले दिसतेय.. शेपूट आहे” आणि हो! बिबट्या.. आम्ही वेडेच झालो गाइडसकट, की काय शोध लावला. आपल्या भागात झाडावर बसलेला बिबट्या दिसणे म्हणजे खूपच नशीब लागते. पटापट १-२ फोटो काढले आणि त्याला काय वाटले कळले नाही, तो झाडावरून खाली उतरला आणि डोंगराकडे निघून गेला. आम्हाला पुढची काही मिनिटे खरेच वाटत नव्हते जे काही पाहिले ते.. एकवेळ वाघ दिसू शकतो, पण बिबट्या दिसणे आणि तेही झाडावर म्हणजे कमाल प्रकार होता. आम्ही आता परत थोडेसे पुढे गेलो, तर तिकडे खूप पक्षी दिसले. नवरंग, स्वर्गीय नर्तक ह्यांची घरटी, नीलिमा पक्षी वगैरे. खूपच सुंदर परिसर होता तो. परत आम्ही काही ठिकाणी फिरलो आणि एका मोठ्या पाणवठ्यावर आलो, जिकडे झरणी नावाची वाघीण असते. गाइड म्हणाला, “काल आम्ही गाडी लावली आणि २ मिनिटांमध्ये ती पाण्यावर आली.” आम्ही म्हणालो, ”आजही असेच घडू दे..” पण १०-१५ मिनिटे शांततेत गेली आणि अचानक पलीकडून एक मोठ्ठे अस्वल पाण्यावर यायला लागले. अस्वल खूपच लाजाळू असल्याने आम्ही काही फोटो काढले, पण तेवढयात एक जिप्सी मोठा आवाज करत आली आणि ते घाबरून आत पळाले. थोडा वेळ वाट पाहून आम्ही निघालो. परत काही ठिकाणे शोधली आणि गेटवरून बाहेर आलो. जिप्सी घेतली आणि रिसॉर्टला आलो.

रिसॉर्टवर मस्तपैकी नास्ता करून जरा विश्रांती घेतली आणि तयार झालो शेवटच्या सफारीला. दोन सफारी ड्राय (वाघाच्या बाबतीत) गेल्या होत्या. आता मनात वनदेवतेला प्रार्थना केली की आम्हाला आज चांगले काहीतरी दिसू दे. आम्ही कोलारा बफरमध्ये एंट्री घेतली, गाइडकडून सध्याच्या हालचालीवर चर्चा केली. शेवटची १५-२० मिनिटे blacky (ब्लॅक लेपर्ड) ठेवायची, असे ठरवले आणि वाघाचे ट्रॅकिंग सुरू केले. ऊन बऱ्यापैकी असल्याने वाघ नक्कीच पाणवठ्यावर येणार असा कयास केला आणि सगळे पाणवठे पालथे घालणे सुरू केले. तशातच काल तिथली वाघीण आणि नवीन वाघ एका ठिकाणी दिसला, त्या भागात जिप्सी नेली. ते ठिकाण बऱ्यापैकी लांब होते, पण आम्हाला ते शोधणे भाग होते. फिरून परत आलो. ४ वाजले होते, हाताशी तीनच तास उरले होते. पटकन वॉशरूमसाठी १० मिनिटे ब्रेक घेतला आणि एका पाणवठ्याकडे गेलो. तिथे गेलो, तर २-३ जिप्सी होत्या आणि ते म्हणाले की आत्ताच वाघीण पाण्यात उतरली होती, पाणी प्यायली आणि आत जंगलात जायला लागली. आम्ही हताश झालो, स्वतःवर राग व्यक्त झाला की वॉशरूम ब्रेकमुळे आम्ही त्या क्षणाला मुकलो. काय करावे कळत नव्हते. खूपच निराश झालो होतो. पण असे हातपाय गाळून उपयोगाचे नव्हते. आम्ही परत तिला ट्रॅक केले, तर ती जंगलात चालताना दिसली. आता परत आम्ही आधीच पुढे गेलो, साधारण अंदाज घेतला की ती कुठून बाहेर येईल आणि तिथे जाऊन जिप्सी उभी केली. सगळ्यांना सांगितले की ह्या बाजूला पटापट येऊन उभे राहा, म्हणजे ती रस्त्यावर येईल आणि सगळ्यांना समोरून दिसेल व त्याचबरोबर आमच्या फोटोमध्ये मागे गाड्या येणार नाहीत. पण लोक ऐकतात कसले! काही जणांनी आमचे ऐकले, पण २-३ जिप्सीवाले मागेच थांबले. आता ती वाघीण हळूहळू रस्त्याकडे यायला लागली, त्याचबरोबर आमचे श्वास जोरात चालू लागले आणि जिकडे अंदाज व्यक्त केला तिकडेच ती बरोबर बाहेर आली, आमच्याकडे बघितले आणि थेट रस्त्यावर चालू लागली. ह्याला म्हणतात ‘हेड ऑन चालणे’.


.

माझ्यासाठी हे ड्रीम होते, ती पुढे यायला लागली की आम्ही पटापट गाड्या पुढे घ्यायचो, म्हणजे अंतरही राहील. ती १५ मिनिटे चालत होती आणि तेवढ्यात एका जिप्सीवाल्याने जिप्सी इतक्या जवळ नेली की ती परत आत निघून गेली. सगळे जण त्या माणसावर खूप भडकले. आम्ही पुढे जाऊन थांबलो तिची वाट बघत. खूप दाट झाडी असल्याने नक्की कुठून बाहेर येईल ते कळत नव्हते आणि परत ती बाहेर आली एकदम आमच्या जिप्सीच्या समोर.


.

आम्ही पटकन जिप्सी मागे घेतली, जेणेकरून तिला त्रास होणार नाही. हळूहळू ती परत रस्त्यावर आली, येता येता ती झाडाचा वास घेत होती आणि सेंट मार्क करत होती - म्हणजे आपली हद्द ठरवत होती.


.

ह्याबरोबरच माझे आणखी एक ड्रीम होते - वाघाचे एक behavior असते, त्याला म्हणतात Flehmen Response ते बघणे आणि जमल्यास फोटो मिळवणे. त्यांच्या टाळूवर असलेल्या Jacobson organपर्यंत घेतलेला वास पोहोचवतात आणि आपल्याला जसे पाच सेन्स असतात, तसा वाघाला आणखी एक सेन्स असतो, ज्याच्यामुळे त्यांना कळते की ह्या भागात आपल्या आणखी वेगळा वाघ / वाघीण आहे का, किंवा एखादी वाघीण माजावर आली आहे का वगैरे. बऱ्याच फोटोमध्ये बघितले असल्यास हसल्यासारखा किंवा चिडल्यासारखा चेहरा केलेला असतो, त्यालाच Flehmen Response behavior असे म्हणतात. तर हा Flehmen Response मला बघायला आणि फोटोमध्ये capture करायला मिळाला.


.

आता ती वाघीण - जिचे नाव जुनाबाई असे आहे, ती पुढे येत होती. एका ठिकाणी झाडाच्या मागून तिने मस्तपैकी आमच्याकडे बघितले.


.

आणि परत मुख्य रस्त्याला येऊन मिळाली आणि त्याच जिप्सीवाल्याने परत तिच्याजवळ जिप्सी नेल्याने ती आतमध्ये गेली आणि एका ठिकाणी झोपली. सगळे त्या ड्रायव्हरवर खूप चिडले होते आणि काही जण तर त्याला म्हणाले की तुझी तक्रार करतो. असो. तर जुनाबाई आज जाऊन झोपली. आता आम्हाला स्ट्रॅटेजी ठरवायची होती की इतर वाघांच्या मागावर जायचे की इकडेच थांबायचे. आमच्या अंदाजानुसार ती नक्कीच परत रस्त्यावर यायची होती, कारण तिला तिची हद्द मार्क करायची होती आणि पुढे वेगळ्या ठिकाणी जायचे होते. आमच्या सगळ्यांचे एकमत झाले की काहीही झाले तरी इकडून जायचे नाही. मग काय, परत चितळे मदतीला धावले आणि बाकरवड्या पोटात सरकावल्या गेल्या. काही जिप्सी १० मिनिटे थांबल्या आणि कंटाळून गेल्या. इकडेतिकडे फिरून परत आम्ही जिकडे होतो तिकडे यायचे, चौकशी करायचे आणि परत जायचे. अशा रितीने अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, १ तास झाला. ड्रायव्हर म्हणाला, “आपल्याकडे आणखी १ तास आहे, त्यामुळे काळजी नाही.” आणि पुढच्याच मिनिटाला आतमध्ये हालचाल जाणवली आणि ती उठली, चालू लागली. परत नेहमीप्रमाणे आम्ही एका ठिकाणी गाडी नेऊन उभी केली, इतर गाड्यांना सूचना आणि विनंती केली आणि मॅडम रस्त्यावर आल्या. अ हा हा! काय ती चाल, तो चेहरा, आणि जेव्हा कॅमेऱ्यातून आपण बघतो, तेव्हा तिचे डोळे बरोब्बर आपल्यावर रोखलेले असावे.. ह्या अनुभवाला जगात तोड नाही. पुढचा अर्धा तास ती मस्तपैकी रस्त्यावर चालत होती आणि वेगवेगळ्या पोझेसमध्ये आम्ही फोटो-व्हिडिओ काढत होतो.


.

तो क्षण संपूच नये असे वाटत असताना एका ठिकाणी तिने रस्ता क्रॉस केला आणि आत निघून गेली.


.

आम्ही अक्षरशः स्वप्नवत थिजलो होतो. तेवढ्यात ड्रायव्हर म्हणाला, “सर, १० मिनिटे राहिली आहेत फक्त, आपल्याला तातडीने निघावे लागेल.” त्याला म्हणालो, “मित्रा, तू काय म्हणशील ते करतो आता. तुझ्यामुळे आणि गाइडकाकांमुळे सगळे स्वप्नवत पाहायला, फोटो काढायला मिळाले.” अशा रितीने आमची शेवटची सफारी एकदम भारी झाल्याने रिसॉर्टवर येऊन जोरदार स्वीट खाऊन आम्ही रात्री १०च्या सुमारास निघालो. जाताना वाटेत चिमूरला पान खाल्ले, गाडीत मस्तपैकी पंचम-किशोरची गाणी लावून नागपूर एअरपोर्टवर आलो १२ वाजता. आणखी ४ तासांनी विमान होते, त्यामुळे तिकडेच खुर्चीवर पड्या टाकल्या आणि पहाटे ५ वाजता पुण्यात पोहोचून ६ला घरी पोहोचलो. ह्या वेळेस आम्ही वाघ नुसता पाहिला नाही, तर अनुभवला!


.

योगेश पुराणिक
जून २०२२
ह्या लेखातील सर्व फोटो योगेश पुराणिक ह्यांनी स्वतः काढलेले आहेत आणि त्यांचा copyright आहे. कृपया कोणीही हे फोटो वापरण्याआधी योगेश पुराणिक ह्यांची परवानगी घ्यावी, ही विनंती.

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

1 Sep 2022 - 10:27 am | टर्मीनेटर

फोटोज कमालीचे सुंदर आले आहेत 👍

आम्ही पटकन जिप्सी मागे घेतली, जेणेकरून तिला त्रास होणार नाही. हळूहळू ती परत रस्त्यावर आली, येता येता ती झाडाचा वास घेत होती आणि सेंट मार्क करत होती - म्हणजे आपली हद्द ठरवत होती.

सेंट मार्क करतानाच्या (खालून सहाव्या) फोटोत वाघिणीच्या लघवीचे उडणारे थेंबही अगदी स्पष्ट दिसत आहेत! सलाम तुमच्या फोटोग्राफीच्या कौशल्याला 🙏
लेख आवडला हे.वे.सां.न.ल.
धन्यवाद!

कॅलक्यूलेटर's picture

1 Sep 2022 - 10:44 am | कॅलक्यूलेटर

वाह! खूप मस्त

अप्रतिम लेख, छायाचित्रे!

ही पिल्ले लॉकडाउनच्या काळात जन्माला आल्याने त्यांना गाड्यांची सवय नाही आणि म्हणूनच खूपच लाजाळू आहेत.. आणि तसेच झाले. ते पिल्लू (बऱ्यापैकी मोठे झालेले) बाहेर आले आणि इकडेतिकडे न बघता लगेच आत निघून गेले.

सो क्युट,कसं ना माणसाच्या कर्माचा त्यांच्यावरही परिणाम झाला.

कुमार१'s picture

1 Sep 2022 - 12:22 pm | कुमार१

सुंदर लिहिलंय .....

कपिलमुनी's picture

1 Sep 2022 - 12:23 pm | कपिलमुनी

लैच भारी ...
बिबट्याचा फोटो असता तर डेझर्ट !

MipaPremiYogesh's picture

6 Sep 2022 - 9:54 am | MipaPremiYogesh

खरंय...माझ्या bucket list मध्ये आहे बघू कधी पूर्ण होतात ते

बेकार तरुण's picture

1 Sep 2022 - 1:46 pm | बेकार तरुण

मस्त लेख अन फोटो....

निव्वळ अद्भूत. लेखन तर सुंदर आहेच पण आपण फोटोंद्वारे जे सूक्ष्म बारकावे टिपलेत त्याला तोड नाही.
उघड्या जिप्सीने जंगलाची सैर करण्याची मजा औरच. भले वाघ जरी दिसला नाही तरी जंगल आपले विभ्रम अनेकप्रकारे दाखवत असतेच.

MipaPremiYogesh's picture

6 Sep 2022 - 9:55 am | MipaPremiYogesh

बरोबर आहे वल्ली...जंगल अनुभवणे ह्यात एक वेगळीच मजा आहे

श्वेता२४'s picture

1 Sep 2022 - 3:33 pm | श्वेता२४

फारच सुंदर आहेत छायाचित्रे. प्रवासवर्णनही आवडले.

शिवाय हा लेख मिपासाठी राखून ठेवलात!!
धन्यवाद.

आता उरलेली चित्रे घुबडं वगैरे दुसऱ्या साध्या लेखात टाका नंतर.

गुरूमितलाही धन्यवाद सांगा.

MipaPremiYogesh's picture

6 Sep 2022 - 9:55 am | MipaPremiYogesh

हो काका, नक्कीच टाकेन

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

1 Sep 2022 - 6:25 pm | ॲबसेंट माइंडेड ...

अप्रतिम छायाचित्रण आणि वर्णन.
👌

प्रशांत's picture

1 Sep 2022 - 6:38 pm | प्रशांत

अप्रतिम लेख, छायाचित्रे!

जेम्स वांड's picture

1 Sep 2022 - 8:19 pm | जेम्स वांड

पण लेख अजून उजवा करता आला असता असे प्रामाणिकपणे वाटते, गलेमा मधील लेख असल्यामुळे इथे मला जाणवलेले सगळेच विचार मांडणे कदाचित औचित्याला धरून नसतील त्यामुळे इथेच थांबतो

पुढील लेखनास शुभेच्छा, भरपूर फिरा अन् मिपाला फोटो मेजवानी देत रहा.

आभार.

MipaPremiYogesh's picture

6 Sep 2022 - 9:56 am | MipaPremiYogesh

धन्यवाद...अभिप्राय नक्कीच द्या सुधारण्याचा प्रयत्न करीन..

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Sep 2022 - 2:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

बाकीचे फोटू पण दाखवा
पैजारबुवा,

सुरेख लेखन आणि अप्रतिम फोटो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bal Bhakta Laagi Tuchi Aasara

चांदणे संदीप's picture

4 Sep 2022 - 11:03 am | चांदणे संदीप

काय ती चित्रे आणि काय ते वर्णन! मस्त लेख, मस्त सफारी.

सं - दी - प

मुक्त विहारि's picture

4 Sep 2022 - 12:19 pm | मुक्त विहारि

फोटो पण मस्तच आले आहेत ...

नचिकेत जवखेडकर's picture

5 Sep 2022 - 6:45 am | नचिकेत जवखेडकर

वाघ बघायला जाताना तुम्ही अभ्यास करून गेला होतात आणि मुळात वाघांना त्रास न देता कशी सफारी करता येईल याच्यावर भर दिला होतात हे प्रत्येक ठिकाणी जाणवतंय. उत्तम फोटो आणि त्या जोडीला उत्तम वर्णन! धन्यवाद ह्या लेखाबद्दल.

अनिंद्य's picture

5 Sep 2022 - 1:50 pm | अनिंद्य

वाघोबाचे फोटो आवडले, एकदम राजबिंडा प्राणी !

नयना माबदी's picture

5 Sep 2022 - 3:58 pm | नयना माबदी

खुप सुंदर फोटोज.

MipaPremiYogesh's picture

6 Sep 2022 - 10:04 am | MipaPremiYogesh

धन्यवाद टर्मीनेटर, कॅलक्यूलेटर, भक्ती, कुमार सर, कपिलमुनी, बेकार तरुण, प्रचेतस, श्वेता२४, कंजूस, ॲबसेंट माइंडेड, प्रशांत, जेम्स वांड, ज्ञानोबाचे पैजार, मदनबाण, चांदणे संदीप, मुवि, नचिकेत जवखेडकर, अनिंद्य, नयना माबदी.

तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून लेख वाचला आणि अभिप्राय दिल्या ह्या बद्दल मनापासून आभार

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Sep 2022 - 12:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

वाह , झकास लेख!!

आर्ची, तालाबवली आणि स्टारचे फोटो एकदम कातील आले आहेत.जबर लेन्स आहे तुमची. जुनाबाईचा डरकाळी फोडतानाचा फोटोही जबरदस्त.आणि पुढे तिचा झाडामागुन डोकावतानाचा फोटो बघून आता ही आपल्याला भॉ करणार असेच वाटतेय :)

असेच फिरत रहा आणि लेखातुन मांडत रहा!! बाकीच्या फोटोंचाही एक लेख येउदे आता.

मित्रहो's picture

8 Sep 2022 - 9:42 pm | मित्रहो

खूप सुंदर लेखन, अनुभव आणि फोटो. वाघ फक्त दिसण्यापेत्रा तो अनुभवण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. थरार असतो. मस्त वर्णन केले तुम्ही.
हल्ली टिपेश्वरच्या जंगलात देखील वाघ दिसायला लागलेत. खाजगी वाहनांना बंदी करायला हवी. बोरच्या जंगलात सुद्धा वाघ बरेच झालेत असे ऐकले आहे. तुम्हाला वाघासोबत अस्वल दिसले (सहसा दिसत नाही) मोठ अस्वल. ते सुद्धा लुप्त होत चाललेली प्रजाती आहे. तसेच झाडावरचा बिबट्या दिसणे हा दुर्मिळ असा योग आहे.

MipaPremiYogesh's picture

12 Sep 2022 - 10:15 pm | MipaPremiYogesh

एकदम सहमत आहे. खाजगी गाड्यांचा खूप त्रास झाला आम्हाला ..आणि एकूणच वन्य जीवांना पण

मस्त भ्रमंती... बाकीचे फोटो पण टाका ही आग्रहाची विनंती

MipaPremiYogesh's picture

12 Sep 2022 - 10:15 pm | MipaPremiYogesh

नक्कीच लिहितो आणि फोटो पण टाकतो, धन्यवाद

सौंदाळा's picture

12 Sep 2022 - 3:26 pm | सौंदाळा

अशक्य फोटो आहेत. Flehmen Response चा फोटो तर कहर.
वाघ भलेही दिसो पण त्याची लकब कॅमेर्‍यात सुस्पष्टपणे टीपणे ही कलाच आहे.
तुम्ही उल्लेख केलेले पण इकडे नसलेले बाकीचे फोटो अजून एका धाग्यात (तुमच्या लिखाणासहीत) येऊ द्यात.

MipaPremiYogesh's picture

12 Sep 2022 - 10:16 pm | MipaPremiYogesh

flehmen रिस्पॉन्स खूप वर्ष मला पाहायचा होता ..भारीच प्रकार असतो...
नक्कीच लिहितो आणि फोटो पण टाकतो, धन्यवाद

छान लेख व फोटोज्. जणू प्रत्यक्षसफारी पाहत आहोत असेच
सुंदर वर्णन वाटले.

मार्गी's picture

21 Sep 2022 - 3:36 pm | मार्गी

अप्रतिम आणि जबरदस्त! फोटोज अद्भुत!!!

रंगीला रतन's picture

21 Sep 2022 - 3:59 pm | रंगीला रतन

खल्लास फोटू!!! जाम आवडले

MipaPremiYogesh's picture

21 Sep 2022 - 8:08 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद मार्गी, रंगीला रतन आणि nutanm

श्वेता व्यास's picture

22 Sep 2022 - 3:47 pm | श्वेता व्यास

मस्त भटकंती, फोटो एक नंबर!

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2022 - 4:56 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त, अप्रतिम !
क्या बात हैं
माझी पण सुंदर सफारी झाली !

Nitin Palkar's picture

8 Dec 2022 - 5:54 pm | Nitin Palkar

अतिशय चित्रदर्शी वर्णन. प्रकाश चित्रांबद्दल काय बोलणार ..... कातील, जबरा, नंबर एक, अशक्य सुंदर!

dadabhau's picture

23 Dec 2022 - 9:17 pm | dadabhau

च्यायला...लै दिवसान्पासुन एक प्रश्न पडलाय...जिप्श्यान्ना जाळया का नाही लावत? वाघाने उडी मारुन हल्ला केल्याशिवाय कुनालाच हे सुचणार नाहि का?

MipaPremiYogesh's picture

29 Dec 2022 - 10:09 pm | MipaPremiYogesh

वाघांना आत मध्ये लोकं बसली आहेत ते कळत नाही, ते पूर्ण जिप्सी लाच एक मोठ्ठा ऑब्जेक्ट समजतात आणि तसेही आजतागायत अशी एकही घटना घडली नाहीये. तसेही कुठलेही जंगली प्राणी हे अनावश्यक हल्ला करून आपली शक्ती आणि वेळ वाया घालवत नाही ते शक्यतो दूर राहणायचा प्रयन्त करतात. अगदीच त्यांना राग आला तर मॉक म्हणजे खोटं खोटं गाडी मागे धावतात.

सस्नेह's picture

2 Jan 2023 - 8:50 pm | सस्नेह

जबरी फोटो आणि सफारी.
तुम्ही खरंच लकी. इतक्या वाघोबांनी असे मनसोक्त दर्शन दिले म्हणजे जॅकपॉट च की !