कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७

Primary tabs

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
24 Aug 2022 - 4:42 pm

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

"ह्याठिकाणी असलेल्या एका दुकानात 'खारा' लिंबू सोडा पिऊन तरतरीत झाल्यावर 10 किमी वर असलेल्या 'बेतुल' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आलेल्या किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला..."

Map
.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंचे काही किल्ले जिंकले, काही किल्ल्यांची डागडूजी केली, तर काही किल्ले नव्याने बांधले. महाराष्ट्रात मोक्याची ठिकाणं पाहून महाराजांनी अनेक किल्ले बांधले आहेतच, पण गोव्यामध्ये देखील त्यांनी बरंच वर्चस्व निर्माण केले होते त्याचा साक्षीदार आहे 'बेतुल' हा छत्रपतींनी गोव्यामध्ये बांधलेला एकमेव किल्ला!.
दक्षिण गोव्यातील वेर्णे (Vernem) गावाजवळ उगम पावलेली साळ नदी (Sal River) सोळा किलोमीटरचा प्रवास करत बेतूल येथे अरबी समुद्रात विलीन होते. तिच्या नदीमुखावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून स्वराज्याचे पाईक असलेल्या बाल्ली (बाळ्ळी/Balli) च्या हवालदारांनी केपे (Quepem) तालुक्यातील बेतुल ह्या ठिकाणी १६७९ साली हा 'बेतूल' किल्ला बांधला.

Board
.
साळ नदी हि एकप्रकारे पोर्तुगीज आणि मराठा साम्राज्यातली नैसर्गिक सीमारेषा होती, नदीच्या उत्तरेकडील काठापासून पोर्तुगीजांचे राज्य होते तर दक्षिणेकडील काठापासून मराठ्यांचे राज्य होते. हा किल्ला बांधण्यामागे महाराजांचा आपल्या सीमेचे रक्षण हा हेतू तर होताच पण त्याच बरोबर साळ नदीतून साष्टी (Salset) प्रांतात पोर्तुगिजांचा बराच व्यापार त्याकाळी चालत असे त्यावर ह्या मोक्याच्या ठिकाणी किल्ला बांधून महाराजांनी कर आकारणीहि सुरु केली होती.
पुढच्या काळात सोंधेकरांकडून १७६३ मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला तो थेट १९६१ पर्यंत.

दुर्दैवाने आज ह्या किल्ल्याचा केवळ एक बुरुज आणि त्यावरील लांब पल्ल्याची एक तोफ वगळता बाकी काहीही बांधकाम दृष्टीस पडत नाही. पण असे असले तरी किल्ल्याचा परिसर, इथले ग्राम रक्षक राखणदेवाचे छोटेखानी 'खाणेश्वर' मंदिर आणि बुरुजावरून दिसणारी दृश्ये अतिशय प्रेक्षणीय आहेत.
बेतूल किल्ल्याचा बुरुज आणि परिसराचे काही फोटोज-

बुरुज १
शाबूत असलेला किल्ल्याचा एकमेव बुरुज.
.
बुरुज २
बुरुजावरची साळ नदीमुखाच्या दिशेने रोखलेली लांब पल्ल्याची तोफ.
.
तोफ
.
बेतूल बीच
बुरुजावरून समोर दिसणारा पांढऱ्या वाळूचा अतिशय सुंदर असा 'बेतूल बीच' (Betul Beach), बीचच्या उजवीकडे साळ नदी तर पुढ्यात आणि डावीकडे अरबी समुद्र.
.
बेतूल बीच २
किल्ल्या खालचा खडकाळ समुद्र किनारा.
.
बेतूल बीच ३
.
बेतूल बीच ४
किल्ल्याच्या उजवीकच्या टेकडीवर लांबवर दिसणारे दीपगृह, खाली दगडांवर पाण्यात गळ टाकून मासे पकडणारे स्थानिक.
.
lighthouse
दीपगृहाचा झूम करून काढलेला फोटो.
.
we ३
बुरुजावर उभी तीन भावंडे.
.
temple १
बुरुजा जवळचे खाणेश्वर मंदिर.
.
ग्रामरक्षक 'राखणदेव' खाणेश्वर .
.
नदीमुखात उभ्या मच्छीमारी नौका.
.
बेतूल किल्ला पाहून आम्ही तिथून ३७ किमी. अंतरावरच्या श्री शांतादुर्गा मंदिराकडे जायला निघालो. वाटेत 'बोरी' (Borim) इथे रस्त्याच्या उजव्या बाजूला नव्याने बनलेले छानसे साईबाबा मंदिर दिसले. पश्चिम शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गाभाऱ्यात संगमरवरी सजावटीचे काम सुरु असले तरी मंदिर दर्शनासाठी खुले होते.

साईबाबा मंदिर, बोरी
.
साईबाबा मंदिर, बोरी
.
बोरीच्या साईबाबा मंदिरापासून ६ किमी अंतरावर असलेल्या श्री शांतादुर्गा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो तर आमच्या स्वागताला उभा असलेला हा बोर्ड दिसला -

नोटीस बोर्ड
.
मंदिरातले सगळे पुजारी कोविड पॉजिटीव्ह झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंदिराजवळील शीतपेय विक्रेत्या महिलेने दिली. अर्थात पर्यटकांना मंदिरात प्रवेशबंदी असली तरी स्थानिकांना ओळखपत्र दाखवून सकाळी ८ ते १२:३० आणि दुपारी २:३० ते ६:३० अशा वेळांत प्रवेश दिला जात होता. मग बाहेरूनच कळसाचे दर्शन घेऊन, मंदिराचे २-४ फोटो काढले.
.
श्री शांतादुर्गा मंदिर १
.
श्री शांतादुर्गा मंदिर २
.
मंदिराजवळच्या दुकानात शीतपेये पिऊन आम्ही पुढे फर्मागुडीचे 'श्री गोपाळ गणपती मंदिर' आणि त्याच्या समोरच असलेला 'छत्रपती शिवाजी महाराज किल्ला' (Ponda Fort / Farmagudi Fort) बघायला निघालो. फर्मागुढीला पोचलो तेव्हा किल्ला बंद व्हायची वेळ होत आली असल्याने उपलब्ध असलेल्या कमी वेळात आधी किल्ला पाहून नंतर मंदिरात जायचे ठरवले.

ponda fort १
.
सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहने बांधलेला 'फोंडा किल्ला' (Ponda Fort) हा 'फर्मागुढी किल्ला' (Farmagudi Fort) नावानेही प्रसिद्ध असला तरी आता 'छत्रपति शिवाजी महाराज किल्ला' म्हणून ओळखला जातो.

१६६४ साली शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले तेव्हा फोंडा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात अपयश आले. पुन्हा १६७५ साली जोरदार आक्रमण करून महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर ताबा मिळवला पण १६ व्या शतकाच्या अखेरीस छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिकून घेतला.
संभाजी राजांच्या शासन काळात येसाजी कंक फोंडा किल्ल्याचे किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी ३००० सैन्यासह हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी केलेल्या आक्रमणात अवघ्या ३०० मावळ्यांसह लढताना येसाजी कंक जायबंदी झाले होते तर त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हा धारातिर्थी पडला होता. पण किल्ला राखण्याचा पराक्रम त्यांनी केला होता.

अनेक घनघोर लढायांचा साक्षीदार असलेल्या ह्या किल्ल्याचे खंदक, तटबंदीचे प्राचीन अवशेष आता शिल्लक नाहीत आज जो किल्ला दिसतो त्याचे बहुतांश बांधकाम नव्याने केले आहे.

छत्रपति शिवाजी महाराज किल्ल्याचे काही फोटोज-

ponda fort २
.
ponda fort ३
.
ponda fort ४
.
ponda fort ५
किल्ल्यावरुन दिसणारे 'श्री गोपाळ गणपती मंदिर'
.
ponda fort ६
.
ponda fort ७
.
ponda fort ८
.
हा किल्ला लहानसा असला तरी, त्याचा परिसर, महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि बगीचा प्रेक्षणीय आहे. अंधार पडायला सुरुवात झाली होती त्यावेळी किल्ल्यातून बाहेर पडून आम्ही समोरच्या 'श्री गोपाळ गणपती मंदिरात प्रवेश केला.

गोपाळ गणपती मंदिर १
.
प्राचीन आणि अर्वाचीन हिंदू स्थापत्यशास्त्राचा संगम बघायला मिळणाऱ्या गोमंतकातील फारच थोड्या मंदिरांपैकी हे एक मंदिर असून ह्या सुंदरशा छोटेखानी मंदिराचे बांधकाम गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत श्री. दयानंद बांदोडकर ह्यांनी केले आणि त्यांच्याकडे असलेल्या पंचधातूच्या गणेशमूर्तीची २४ एप्रिल १९६६ रोजी ह्या नव्या मंदिरात स्थापना केली.

ह्या ठिकाणी असलेल्या मूळ जुन्या मंदिराबाबत एक कहाणी सांगितली जाते ती अशी कि, बांदिवड्याचे राजे असलेल्या सौंधेकरांच्या पदरी चाकरीस असलेल्या 'हापो' नावाच्या गुराख्याला सुमारे १०० वर्षांपूर्वी माळरान असलेल्या ह्या पठारावर गाई चरायला घेऊन आला असताना ह्याठिकाणी फूटभर उंचीची श्री गणेशाची दगडी मूर्ती सापडली आणि त्याने नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या मंडपात तिची स्थापना केली होती. गोपालन करणारा गुराखी म्हणजे 'गोपाळ' आणि गोपाळाने स्थापन केलेला हा गणपती असल्याने त्याचे नाव 'गोपाळ गणपती'.

मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे दीपमाळ आहे. मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असून येथे दरवर्षी गणेश जयंती उत्सव भाविकांच्या लक्षणीय उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि भाविकांना देवस्थानतर्फे महाप्रसाद दिला जातो.. यादिवशी दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रात्री भजन आणि अन्य कार्यक्रम होतात. अनंत चतुर्दशीला गुढी उभारण्याची ह्या मंदिरात प्रथा आहे.

याशिवाय संकष्टी, अंगारकी व विनायकी चतुर्थीला मंदिरावर रोषणाई केली जाते आणि भाविकांच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागतात. आम्ही गेलो होतो त्यादिवशी संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे आम्हाला श्रींचे दर्शनहि घडले आणि रोषणाईही पाहायला मिळाली तसेच त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असूनही करोना पर्वातील निर्बन्धांमुळे फार गर्दीही नव्हती.

गोपाळ गणपती मंदिर २
.
गोपाळ गणपती मंदिर ३
.
गोपाळ गणपती मंदिर ४

फर्मागुढीच्या या गोपाळ गणपतीच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या इमारतीत प्रशस्त अशी सभागृहे आहेत आणि त्यांचा वापर लग्न तसेच इतर मंगल कार्यासाठी केला जातो. फर्मागुढीचे पठारा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने कायम या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते. गोपाळ गणपतीवर गोमंतकीयांची आणि हिंदू धर्मियांची श्रद्धा आहेच पण विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने या मंदिराला आवर्जून भेट देतात. हे मंदिर किल्ल्याच्या समोरच असल्याने किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांना आपसूक देवदर्शनही घडते.

(गेल्यावर्षी मिपाच्या श्रीगणेश लेखमाला २०२१ मध्ये माझा 'श्री गोपाळ गणपती मंदिर (फर्मागुढी, गोवा)' हा लेख प्रकाशित झाला होता त्यामुळे काही वाचकांना हा किल्ला आणि ह्या मंदिराची माहिती आधी वाचल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे.)

फर्मागुढीचा किल्ला आणि मंदिर पाहून सव्वा सात वाजता आम्ही १८ किमी अंतरावरच्या आमच्या मुक्कामस्थळी करमळीला जायला निघालो. भाऊजी घरी पोचल्याचा फोन येऊन गेला होता. त्यादिवशी चंद्रोदय लवकर म्हणजे रात्री ८:३६ ला असल्याने बहिणीला घरी परतल्यावर उपास सोडायला उशीर व्हायला नको म्हणून तो प्रेमळ नवरा सव्वा आठच्या सुमारास 'वरण भाताचा' कुकर लावून ठेवणार होता. दुपारचे जेवण स्किप झाल्याने तेवढ्याने माझे आणि भावाचे पोट भरणार नव्हते म्हणून त्याआधी थोडीशी पोटपूजा करण्यासाठी वाटेत जुन्या गोव्यातल्या (Old Goa) 'रसोडा' (Rasoda) ह्या ऑथेंटिक उत्तरभारतीय चवीचे पदार्थ मिळण्याचा दावा करणाऱ्या महागड्या राजस्थानी उपहारगृहात जाऊन बहिणीच्या शिफारशीवरून 'राज कचोरी' आणि 'सामोसा चाट' असे चविष्ट पदार्थ खाल्ले आणि घरी जेवणानंतर सर्वांसाठी म्हणून चार 'ड्राय फ्रुट मिल्क शेक' पार्सल घेतले. ह्या सहा नगांचे बीलच जवळपास १५०० रुपये मात्र झाले, पण आमच्यासाठी हि कॅसिनो कडून मिळालेली 'ट्रीट' असल्याने त्याचे काही विशेष वाटले नाही 😀

साडे आठच्या सुमारास रसोडा मधून निघून पाच-सात मिनिटांत मुक्कामी पोचल्यावर फ्रेश होऊन भाऊजींनी बनवलेला गोडं वरण भात मस्तपैकी तूप, मीठ, लिंबू पिळून बहिणीने तळलेल्या मिरगुंडां सोबत खाल्ला आणि थोडा वेळाने पार्सल आणलेले ड्राय फ्रुट मिल्कशेक चवीने रिचवल्यावर काहीवेळ गप्पागोष्टी आणि सव्वादहाच्या सुमारास उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेलेल्या ह्या बहिणीच्या मुलाशी व्हिडीओ कॉलवर सर्वांचे बोलणे झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठण्याची तशी काही घाई नव्हती पण अंधार लवकर पडत असल्याने शक्यतो लवकर निघून उत्तर गोव्यातले किल्ले पाहायला सुरुवात करायची असल्याने साडेदहा- पावणे आकाराच्या सुमारास झोपून गेलो.

पुढचा भागः
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

24 Aug 2022 - 6:17 pm | ॲबसेंट माइंडेड ...

हा भागही सुंदरच.
👌

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 6:54 pm | जेम्स वांड

साधा, सरळ, निरलस आणि अत्युत्तम सिंपलीसिटी, खूप आवडला, जमल्यास नकाशे, किंवा रेखाटने द्यावीत सोबत, अमुक ठिकाणाहून तमुक ठिकाणी वगैरे वाचण्याच्या फ्लो मध्ये मी तरी वाचतो पण उद्या जायचे म्हणले तर बल्ल्या होणार माझा, मस्तपैकी directions देणारा नकाशा असल्यास, (आयुष्यात) कधीतरी चांस मिळेल तेव्हा इथे फिरायला बरे होईल एकदम.

टर्मीनेटर's picture

25 Aug 2022 - 6:15 pm | टर्मीनेटर

ॲबसेंट माइंडेड ... | जेम्स वांड
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ जेम्स वांड

जमल्यास नकाशे, किंवा रेखाटने द्यावीत सोबत,

प्रत्येकाची मुक्कामाची ठिकाणे वेगवेगळी असतात, शिवाय कुठली ठिकाणे बघायची आहेत त्यांची निवडही वेगवेगळी असल्याने अशा नकाशांचा कितपत उपयोग होईल त्याबद्दल साशंक आहे! एकदा आपली त्या त्या दिवशी बघायची ठिकाणे नक्की झाली कि निघताना गुगल किंवा अन्य मॅप्स वापरून मार्ग निश्चित करणे जास्त सोयीचे पडेल.

सौंदाळा's picture

24 Aug 2022 - 7:26 pm | सौंदाळा

हा भाग पण भारीच.
बेतुल बीच मस्तच आहे. फोटो बघून देवबाग बीच (मालवण)ची आठवण झाली.
गोपाळ गणेश मंदीरापासून जो उतार चालू होतो तिकडुन गेल्यावर खाली नागेश आणि महालक्ष्मी यांची मंदीरे आहेत आणि नागेशी मंदीराचे सुंदर तळे पण.
भाऊसाहेब बांदोडकरांचे फुलांनी देवळे सजवण्याच्या आवडीबद्दल (कदाचित) मधु मंगेश कर्णिक यांनी खूप सुंदर लिहिले आहे. बकुळ आणि मोगर्‍याच्या भरपूर फुलांनी संपूर्ण महालक्ष्मी मंदीर सजवल्याचा एक लेख आहे.

फोटो बघून देवबाग बीच (मालवण)ची आठवण झाली.

बरोब्बर, मलाही देवबागचीच आठवण आली होती. एक समोर दिसणारा किल्ला सोडला तर बाकी दृश्य खूप सारखे आहे. येतीलच देवबाग बीचचे फोटोज पुढच्या एका भागात.

खाली नागेश आणि महालक्ष्मी यांची मंदीरे आहेत आणि नागेशी मंदीराचे सुंदर तळे पण.

ही मंदिरे आणि तळे नाही बघितले.

बकुळ आणि मोगर्‍याच्या भरपूर फुलांनी संपूर्ण महालक्ष्मी मंदीर सजवल्याचा एक लेख आहे.

हो. अजुनही मला वाटतं नवरात्रात महालक्ष्मी मंदीरात होणाऱ्या अशा फुलांच्या सजावटीचे बहिणीकडून खूप कौतुक ऐकले आहे. तसेच देवीला अर्पण केलेल्या साड्यांच्या लिलावाबद्दलही तिने सांगितले आहे, अर्थात चांगलेच!

Nitin Palkar's picture

24 Aug 2022 - 7:53 pm | Nitin Palkar

हा ही भाग सुंदरच! फार्मागुडीच्या गणेश मंदिरा समोरच गोवा पर्यटन विकासाचे विश्रामगृह होते (१९९० सालच्या आसपास) असे आठवते...

फार्मागुडीच्या गणेश मंदिरा समोरच गोवा पर्यटन विकासाचे विश्रामगृह होते (१९९० सालच्या आसपास)

हो, मंदिरा शेजारी आहे. पणजी कडून येताना मंदिराच्या थोडे आधी ते लागते. पूर्वी समोर असले तर मग आता ते शेजारी स्थलांतरित केले असावे बहुतेक.

कंजूस's picture

24 Aug 2022 - 8:22 pm | कंजूस

फोटो खूपच छान. कोणत्या क्याम्राचे? रात्रीचेही स्पष्ट छान आले आहेत.

कोणत्या क्याम्राचे? रात्रीचेही स्पष्ट छान आले आहेत.

तोच तो, तुम्हाला न आवडणारा पण माझा प्रचंड आवडता आयफोन 😀 😂

कंजूस's picture

25 Aug 2022 - 9:04 pm | कंजूस

ओके.

रोचक, रंजक. असेच तपशीलवार येऊ द्यात.

अवांतर: ती तोफ अशी दगडात पुरुन एकाच दिशेत आणि कोनात फिक्स केलेली बघून असे वाटते की नेमका विशिष्ट जहाज अथवा हलत्या टार्गेटवर नेम धरुन गोळा डागणे हा हेतू कितपत साध्य होत असेल? की शत्रूला केवळ एक pyrotechnical इशारा, सिग्नल, जरब इतकाच त्या गोळाफेकीचा उपयोग असेल?

@ गवि,

ती तोफ अशी दगडात पुरुन एकाच दिशेत

माझ्यापण मनात त्यावेळी जवळपास असाच विचार आला होता. पण त्या तोफेच्या मागचे ते गोल बोंडुक पकडून गुडघ्यात वाकून, स्नायपर रायफलच्या टेलिस्कोप मधून बघितल्या प्रमाणे तोफेच्या लक्ष्याचा अंदाज घेतला तेव्हा लक्षात आले कि अत्यंत विचारपूर्वक हा कोन निवडला असावा. त्यावरून काढलेला माझा अंदाज असा कि,
साळ नदीतून येणारे जहाज/गलबत असेल तर त्याला समुद्राकडे जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागणार त्याच प्रमाणे समुद्राकडून येणाऱ्या जहाज/गलबताला नदीमध्ये जाण्यासाठी डावीकडे वळावे लागणार असल्याने कुठल्याही दिशेने जाणारे-येणारे जहाज/गलबत ह्या तोफेच्या निशाण्यापासुन वाचू शकत नव्हते.
तसेच वळताना जहाज/गलबताच्या डाव्या किंवा उजव्या बाजुचा जास्तीत जास्त भाग माऱ्याच्या टप्प्यात येत असल्याने फायर केलेला तोफगोळा अचुक लक्ष्यावर बसण्याची शक्यताही बरीच जास्त!
किल्ल्याच्या उजव्या बाजूला डेड एन्ड आहे त्यामुळे ह्या तोफेच्या निशाण्यापासून वाचण्याची संधी कुठल्याही जहाज/गलबताला जवळजवळ नसावीच!
अर्थात हा झाला केवळ माझा ह्या तोफे बाबतचा अंदाज, किल्ला शाबुत असताना हिच्या जोडिला अन्य हलत्या तोफाही असव्यात.

की शत्रूला केवळ एक pyrotechnical इशारा, सिग्नल, जरब इतकाच त्या गोळाफेकीचा उपयोग असेल?

ह्या किल्ल्याचा वापर कर वसुलीसाठी जकातनाक्याप्रमाणे होत असल्याने ही शक्यताही ग्राह्य मानता येइल!

ही तोफ किल्ल्याचा जीर्णोद्धार करताना केवळ दिखावा म्हणून बुरूजावर बसवली आहे. बुरुजावरील तोफा मुख्यतः चाकांच्या गाडीवरील आणि आकाराने लहान असत. ही लांब पल्ल्याची तोफ आहे, हिच्या हादऱ्याने बुरुज फुटण्याचा संभव वाटतो. जिथं बुरुज नसेल अशा मोकळ्या जागी जमिनीवर अशा तोफा बसवत.

टर्मीनेटर's picture

26 Aug 2022 - 11:26 am | टर्मीनेटर

काय राव तुम्ही!

ही तोफ किल्ल्याचा जीर्णोद्धार करताना केवळ दिखावा म्हणून बुरूजावर बसवली आहे.

ही आणि पुढची तांत्रिक माहिती देऊन आमच्या विचारशक्ती/कल्पनाशक्तीचे पंखच छाटून टाकलेत की! आणखीन थोडे अंदाज बांधू द्यायचे होतेत की आम्हाला 😀 😂

प्रचेतस's picture

26 Aug 2022 - 11:39 am | प्रचेतस

=))

प्रचेतस's picture

26 Aug 2022 - 6:18 am | प्रचेतस

हा भागही खूप आवडला, लेखन आणि फोटो सगळं एकदम ओक्केच :)
खाणेश्वराची मूर्ती एकदम आधुनिक आहे.

खाणेश्वराची मूर्ती एकदम आधुनिक आहे.

मध्यंतरी तुमच्या 'दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात' ह्या धाग्यावर आपली ह्या खाणेश्वर मंदिरातील मूर्तीबद्दल चर्चा झाली होती.
त्यावेळी मला ही पण वेताळाची मूर्ती असावी का असा प्रश्न पडला होता. पण आता हा लेख लिहिताना संदर्भ तपासत असताना 'छत्रपति शिवाजी महाराज यांचा बेतुल (गोवा) येथील किल्ला आणि श्री राखणदेव देवस्थान येथे जाणारा रस्ता ख्रिस्ती भूमालकाने अडवला' ही बातमी वाचनात आली आणि ही मूर्ती वेताळाची नसून स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'राखणदेवाची' असल्याचा उलगडा झाला.
बातमीच्या शेवटी दिलेला 'संदर्भ' फार गंभीरपणे घेण्यासारखा नसला तरी मूर्ती नक्की कोणाची आहे ते समजले 'हे ही नसे थोडके' 😀

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

प्रचेतस's picture

26 Aug 2022 - 11:49 am | प्रचेतस

तळकोकणात आणि गोव्यात हे राखणदार/क्षेत्रपाल जागोजागी आहेत.
तुम्ही दिलेली बातमी एकदम रोचक आहे :)

मुक्त विहारि's picture

26 Aug 2022 - 8:13 pm | मुक्त विहारि

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत ...

रंगीला रतन's picture

10 Sep 2022 - 1:45 pm | रंगीला रतन

+१oo८२२
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत ...

अर्रर्रर्र..... चुकी झाली +१००९२२ पायजे होतं

फोटो, वर्णन छानच!
बेतुलचा समुद्र्किनारा फार सुंदर वाटला!!
.

टर्मीनेटर's picture

29 Aug 2022 - 12:36 pm | टर्मीनेटर

मुविकाका |अथांग आकाश

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏