India's biggest cover up: अनुज धर ह्यांच्या २० वर्षांच्या नेताजींच्या रहस्याच्या अभ्यासाचा निष्कर्ष

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
13 Aug 2022 - 12:00 pm

सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि... असे सर्व प्रसंग मनावर कोरले गेले होते. पुढे २००५ मध्ये आलेला 'नेताजी द फरगॉटन हिरो' हा चित्रपटही हा अनुभव परत देऊन गेला. नेताजींचा शेवट नक्की काय झाला, ह्याबद्दल मनामध्ये नेहमी प्रश्न होता. आता ह्या प्रश्नाचं सुस्पष्ट असं उत्तर नाही, पण एक निश्चित दिशा मिळते आहे असं वाटतंय. निमित्त झालं नेताजींच्या रहस्यांवर गेल्या २० वर्षांपासून अभ्यास करणा-या अनुज धर ह्यांच्या विविध पोडकास्टसचं आणि 'India's biggest cover up' ह्या त्यांच्या पुस्तकाचं. त्यांचे दोन- तीन तासांचे पोडकास्टस अक्षरश: न थांबता ऐकले आणि मग त्यांचं पुस्तकही सलग वाचून काढलं. नंतर मुखर्जी आयोगाच्या कामकाजावर आधारित असलेला गुमनामी चित्रपटही बघितला. हे ऐकणं- बघणं आणि वाचणंही थरारक होतं. आणि त्यानिमित्ताने नेताजींबद्दल खूप काही कळालं. निश्चित उत्तरांची दिशा कळाली. भारतीय राजकारणाची एक नवीन आणि खोलवर ओळख झाली. हा छोटा लेख म्हणजे हे पोडकास्टस, हे पुस्तक आणि ह्या विषयावर समोर आलेल्या सद्यस्थितीला थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न.

(शब्द संख्या- २६३९ वाचन अवधी १० मिनिटे. हा लेख इंग्लिशमध्ये http://niranjan-vichar.blogspot.com/2022/08/indias-biggest-cover-up-infe... इथे वाचता येईल)

✈ नेताजींना जाऊन तर इतकी वर्षं झाली. आता त्याचं काय? "मेरे पिताजी हैं, उनका सच मुझे जानना है|"
✈ २० वर्षांचे परिश्रम आणि अथक अभ्यास- अनुज धर!!
✈ १९४५ नंतर रशियामध्ये नेताजींच्या उपस्थितीची साक्ष देणारे अनेक पुरावे
✈ आपला भारत देश असा- इतका उदासीन, इतका अंधारात आणि इतका भ्रष्ट?
✈ देशप्रेम आणि स्वाभिमानापुढे सगळ्या अडथळ्यांची शरणागती
✈ Your dead man- गुमनामी बाबा!
✈ नेताजींच्या केवळ १% हिंमत, साहस, शौर्य, बुद्धीमत्ता आपल्याला कशी मिळेल?
✈ जोदी तोर डाक सुने केउ ना आसे तोबे एकला चोलो रे एकला चोलो एकला चोलो रे

नेताजी! स्वातंत्र्याचे एक शिल्पकार! डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ब्रिटीश पंतप्रधान एटली ह्यांनी म्हंटलंय की, भारताला स्वातंत्र्य मिळालं‌ त्यामागे मुख्य कारण आझाद हिंद सेनेमुळे प्रेरित झालेली व ब्रिटीशांची चाकरी सोडून देण्यास सज्ज झालेली भारतीय सेना हे होतं. आता भारतीय सैनिकांचा भरवसा आपण धरू शकत नाही, ही खात्री ब्रिटीशांना झाली. आणि त्यातून देश सोडून जाण्याची भुमिका ब्रिटीशांना घ्यावी लागली. नेताजींनी वस्तुत: अशा शेकडो गोष्टी केल्या आहेत, ज्यापैकी एक गोष्टही कोणी करू शकला तरी तो स्वत:ला धन्य समजेल. मग ते तत्कालीन आयसीएस उत्तीर्ण होणं असेल, गांधीजींना थेट विरोध करणं असेल, मणिपूरपासून पेशावरपर्यंतच्या लोकांसोबत नातं जोडणं असेल, उद्दाम विदेशी सत्तेच्या गुहेमध्येही स्वाभिमान आणि देशप्रेमाने कार्यरत राहणं असेल! किंवा अतिशय भयंकर असा अंधारात उडी मारून केवळ स्वत:च्या हिमतीवर केलेला कोलकाता- काबूल- मॉस्को- जर्मनी असा प्रवास असेल किंवा १% पेक्षाही कमी शाश्वती असलेला अर्ध्या जगाला समुद्राखालून प्रदक्षिणा घालून केलेला पाणबुडीचा प्रवास असेल! किंवा पूर्व आशियामध्ये थायलंड- म्यानमार ते मणिपूर- इंफाळ परिसरामध्ये दिलेली अफाट झुंज- संपूर्ण भारतातील विविधतेचं केलेलं नेतृत्व! तेही‌ असं की, शेकडो सैनिकांनी युद्धात आहुती द्यावी आणि लाखो भारतीयांनी त्यांना सर्वस्व द्यावं! ह्या शेकडो गोष्टींपैकी जो एकही करू शकत असेल तो स्वत:ला धन्य समजेल. असे नेताजी! देशगौरव नेताजी! आत्ताच्या लेखाचा विषय त्यांच्या रहस्यावर अलीकडे पडलेला प्रकाश हा आहे, त्यामुळे त्यासंदर्भात बोलतो.

१८ ऑगस्ट १९४५ ला तैपेई येथे झालेला त्यांचा अपघात हा तेव्हाही जाणकारांनी स्वीकारला नाही आणि तो ब्रिटीश- अमेरिकन अशा विरोधकांनीही मान्य केला नाही. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमध्ये असंख्य विसंगती होत्या, पुरावे उपलब्ध नव्हते. अनेक गोष्टी संशयास्पद होत्या. परंतु काही जणांना नेताजी गतप्राण झाले, हे सांगणं सोयीस्कर होतं, त्यामुळे ती‌ बाजूच खरी आहे, असं रेटून सांगितलं गेलं. तुटक तुटक ठिकाणी नेताजी रशियात असल्याचे पुरावे लोकांना माहिती होते, कालांतराने भारतातही त्यांना काही जणांनी बघितलं होतं. पण ही गोष्ट कधीही "सरकारी सत्य" बनली नाही. का? हे जाणण्यासाठी अनुज धरचे काही पोडकास्टस ऐकावे लागतील. अनुज धर ह्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे! ज्या काळी हा विषय जवळ जवळ मागे पडलेला होता, तेव्हा 'एकला चोलो रे' हा मंत्र घेऊन ह्यांनी नेताजींच्या रहस्याच्या उत्खननाला स्वत:ला वाहून घेतलं. आज हे त्यांचं जीवन झालं आहे. २००४- ०५ च्या सुमारास 'Enigma of Netaji Subhas Bose' अशी हिंदुस्तान टाईम्सची लेखमालिका नेटवर वाचल्याचं आठवतं. ती त्यांनीच केलेली होती. हिंदुस्तान टाईम्समधली कव्हर स्टोरी म्हणून त्यांचा हा प्रवास सुरू झाला आणि पुढे पुढे तर हेच त्यांचं मिशन बनलं. कालांतराने इतर नेताजीप्रेमी व संशोधक असे चंद्रचुड घोष व इतर लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. सरकार दरबारी असंख्य अडथळ्यांमधून आणि विरोधाच्या अनेक स्तरांवर सतत संघर्ष करून त्यांनी वाट काढली. सरकारी लोकांकडून एक एक गोष्ट करून घेणं ही अशक्य बाब असते! हळु हळु काही सरकारी अधिकारी, नेताजीप्रेमी, माजी अधिकारी अशांच्या मदतीने काही तथ्य समोर आणली. पारदर्शकतेला मानणा-या विदेशांमधील माहितीचा छडा घेतला. कालांतराने आलेल्या माहितीचा अधिकारासारख्या शस्त्राचा व इंटरनेटवर होणा-या जागतिक संपर्काचा उपयोग करून घेतला. त्याच काळात म्हणजे १९९९ मध्ये नेताजींच्या रहस्यासाठी तिसरा आयोग- मुखर्जी आयोग स्थापन झाला होता. मुखर्जी आयोगाने खूप उत्तम काम केलं आणि १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैपेई येथे अपघात झालाच नव्हता, हे सिद्ध केलं. नेताजींचं रशियातलं आणि भारतातलं वास्तव्य जवळ जवळ उघड होईल, अशा स्वरूपाचे इतर पुरावे समोर आणले. पण २००५ मधल्या केंद्र सरकारने ह्या आयोगाचा अहवालच फेटाळला. परंतु तरीही सत्य प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रकारे समोर येतच आहे. अप्रत्यक्ष प्रकारे हे अनेकांना तुटक तुटक माहिती होतंच, पण आता अनेक धागे दोरे एकत्र येत आहेत. नवीन युगामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक डॉटस जोडले जात आहेत. २०१६ मध्ये मोदी सरकारने नेताजींच्या अनेक फाईल्स डिक्लासिफाय केल्या. सरकारने मान्य केलेलं सत्य नसलं तरी आज अनेक गोष्टी उजेडात आलेल्या आहेत. देश म्हणून आपल्यामध्ये देशप्रेम आणि देशासाठी काम केलेल्यांसाठी प्रेम असेल तर इतर लपलेल्या गोष्टीही समोर येतील.

मांचुरियामार्गे रशिया!

ह्या सर्व संशोधनातून समोर आलेले धागे मांडतो. ज्यांना अधिक रस असेल त्यांनी अनुज धरचे पोडकास्टस वाचावेत आणि २० वर्षांच्या अभ्यासासह व शेकडो कागदपत्रांचा पुरावा देऊन त्याने लिहीलेलं 'India's biggest cover up' पुस्तक वाचावं. त्यातून समोर आलेले निष्कर्ष- धागे इथे मांडतोय. ह्या गोष्टींना अप्रत्यक्ष प्रकारे दुजोरा मिळालेला आहे, पुरावे मिळालेले आहेत. १८ ऑगस्ट १९४५ चा अपघात हा केवळ बनाव होता. ज्याप्रमाणे कोलकत्यावरून नेताजी जर्मनीला जाण्यासाठी निसटले होते व ते प्रत्यक्षात काबूलजवळ पोहचल्यानंतर ते घरात नसल्याची 'बातमी' सांगण्यात आली होती, त्याप्रमाणे १८ ऑगस्टच्या कथित अपघाताची बातमी टोकिओवरून २२ ऑगस्टला देण्यात आली होती व तेव्हा ते मांचुरियाजवळ पोहचले असावेत. पुढे मांचुरियामार्गे सोव्हिएट रशियात ते गेले. आल्फ्रेड वेग ह्या अमेरिकन पत्रकाराने १८ ऑगस्टनंतर त्यांना एकदा बघितल्याचं नेहरूंच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. स्वातंत्र्यानंतर एक भारतीय इंजिनिअर एका ऑटोमोबाईल प्रोजेक्टसाठी सोव्हिएट रशियात गेला होता. त्या विशिष्ट प्रकल्पावर त्याचा प्रमुख एक जर्मन होता. तो जर्मन रशियामध्ये अनेक वर्षांपासून काम करत होता. त्याने त्या भारतीय इंजिनिअरला विश्वासात घेऊन सांगितलं की, तो नेताजींना भेटला होता. आणि १९४१ मध्ये त्याने जर्मनीमध्ये नेताजींना समोरून बघितलं होतं. व्यावसायिक व राजकीय नेत्यांच्या एका कँपवर तो असताना त्याने तिथे नेताजींना ओळखलं व जर्मनमधून संवादही साधला होता. त्यांना राजदुताचा दर्जा दिलेला होता. जेव्हा त्या इंजिनिअरने मॉस्कोच्या भारतीय राजदुताला ही बातमी सांगितली, तेव्हा त्या राजदुताने त्याला धमजीवजा सूचना केली की, तुझ्या कामाकडेच लक्ष दे. पुढे भारतात आल्यावर आणि निवृत्त झाल्यावर त्याने ही आठवण सांगितली व मुखर्जी आयोगापुढे तशी साक्षही दिली. तथाकथित तैपेई अपघातानंतर एक वर्षाने म्हणजे जुलै १९४६ मध्ये गांधीजींची सेक्रेटरी व दादाभाऊ नवरोजींची नात खुर्शीद नवरोजीने अमेरिकन पत्रकार लुई फिशरला लिहीलेल्या पत्रात म्हंटलं होतं की, जर रशियन सेनेच्या मदतीने नेताजी भारतात आले तर गांधी- नेहरू काही करू शकणार नाहीत. सगळा देश त्यांच्यासोबत जाईल.

मेरा भारत महान

एक प्रश्न इथे पडतो की, नेताजी रशियात होते तर भारतात का आले नाहीत? किंवा नंतरही आले तेव्हा लपून का राहिले? त्याचं एक कारण हे आहे की, भारतीय स्वातंत्र्याच्या करारात (Transfer of powers) मध्ये कदाचित एक गोपनीय अट ही होती की, जर नेताजी भारतात आले असते तर युद्ध गुन्हेगार म्हणून सरकारला त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन करावं लागलं असतं. किंबहुना आतील धागे असंही सांगतात की, हे स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नव्हतंच, Dominion status होता हा. आणि वस्तुत: अगदी १९५५ पर्यंत भारतीय सेनेचं नेतृत्व ब्रिटीशच करत होते. स्वत: नेहरूंनी १९५६ मध्ये ब्रिटनच्या दौ-यात राणीच्या एकनिष्ठेची प्रतिज्ञा घेतलीही होती. आणि ह्यासंदर्भात धक्कादायक पण कोणाला माहिती नसलेली वस्तुस्थिती ही आहे की, जालियांवाला बागेमध्ये गोळ्या झाडणारे जे पोलिस होते- ते भारतीय पोलिस होते- त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सरकारी नोकर म्हणून पेंशन मिळत होती आणि आझाद हिंद सेनेमध्ये लढलेल्या सैनिकांना व अधिका-यांना स्वातंत्र्यसैनिकसुद्धा मानलं जात नव्हतं. त्याबरोबर स्वतंत्र भारतात असे अनेक कायदे होते जे कोणी स्वाभिमानी व देशप्रेमी मान्य करणार नाही. अस्पृश्यता ही कायद्याने समाप्त होण्यासाठी १९५५ वर्षं यावं लागलं. गुन्हेगार जमाती अधिनियमासारखा काळा कायदा १९५२ पर्यंत होता. तेव्हा हे स्वातंत्र्य खरोखर स्वातंत्र्य होतं का केवळ dominion status होतं, हाही मुद्दा समोर येतो. ब्रिटीश नेताजींना युद्ध गुन्हेगार मानत होतेच, पण एकाही भारतीय नेत्याने पारतंत्र्याच्या काळात केलेल्या अत्याचारांमुळे ब्रिटीशांना गुन्हेगार म्हंटलं नाही.

सरकारची भुमिका काहीही असो, नेताजींचे जवळचे सहकारी, त्यांचे दोन्ही भाऊ, पत्नी एमिली अशा जवळच्यांना जाणीव होती की, नेताजी रशियात आहेत. त्याचं आणखी एक कारण म्हणजे १९६८ पर्यंत नेताजींच्या कुटुंबावर सरकार पाळत ठेवून होतं. मृत व्यक्तीच्या कुटुंबावर पाळत ठेवण्याची काय गरज? त्यामुळे हे एक प्रकारे ज्यांना आतल्या गोष्टी माहिती आहेत, त्यांच्यासाठी उघड सत्य होतं. त्यामुळेच तर हे रहस्य सोडवण्यासाठी पहिला आयोग १९५६ च्या सुमारास व दुसरा आयोग १९७० साली स्थापन केला गेला. अनेकदा सरकारने प्रयत्न केला की, टोकिओच्या रेनकोजी मंदिरात नेताजींच्या तथाकथित अस्थी भारतात आणून हा विषयच संपवावा. पण नेताजींच्या कुटुंबियांच्या विरोधामुळे हे करता आलं नाही.

सरकारची‌ भुमिका जास्त करून सत्य समोर येण्यापासून टाळण्याची होती. तत्कालीन तैवानसोबत भारताचे राजकीय संबंध नाहीत, म्हणून सरकारने पहिल्या दोन आयोगांना तैवानला जाऊ दिलं नाही. किंवा कदाचित प्रत्यक्ष तिथे गेल्यावर तिथे असलेल्या "पुराव्यांचा" फोलपणा उघड होण्याची भिती असेल. त्यावेळी नेताजी मात्र केवळ स्वत:च्या हिमतीच्या बळावर आणि त्यांना ओळखणा-या देश- विदेशातील जीवाभावाच्या सहका-यांच्या मदतीने मांचुरिया- चीन- रशिया अशा अज्ञात देशात झेप घेत होते. किती वेगवेगळे देश- प्रदेश! अफघनिस्तान- रशिया- इटाली- जर्मनी नंतर म्यानमार- थायलंड- इंडोनेशिया- सिंगापूर- जपान! हे काही त्यांच्या मित्रांचे देश नव्हते. इथेही उर्मट राज्यकर्ते आणि अधिकारी होतेच. पण त्या सर्वांना नेताजींनी आपल्या देशप्रेमाच्या शक्तीपुढे झुकवलं. उर्मट राज्यकर्त्यांनी त्यांनाही दाबण्याचा प्रयत्न केल, पण ते कुठे झुकले नाहीत आणि आपल्या उद्दिष्टावर ठाम राहिले. अगदी हिटरलरलाही त्यांनी आपल्या स्वाभिमानाची‌ चुणूक दिली. भारतीय लोक म्हणजे शेळ्या- मेंढ्या आहेत असं मानणारा हिटलर वरमला. डोळ्याला डोळे भिडवून आणि प्रचंड आत्मविश्वासाने शेक हँड करून त्यांनी हिटलरची भेट घेतली. आणि विदेशी शक्तींची मदत ही एका स्वतंत्र देशाला केलेली मदत आहे जी स्वातंत्र्यानंतर हा देश कृतज्ञतेने परत करेल ही त्यांची भुमिका होती. पण तेव्हाचे भारतातले मुख्य नेते हिटलरला भेटणं म्हणजे नरकात बुडाल्यासारखी गोष्ट करत होते. "हिटलरने सैतानावर जरी स्वारी केली तरी माझा सैतानाला पाठिंबा आहे" असं म्हणणारा भारतद्वेष्टा चर्चिल त्यांना चालत होता. कृत्रिम दुष्काळामुळे ३० लाख बंगाली लोकांचा बळी घेणारा व भारताला गुलाम ठेवू इच्छिणारा चर्चिल त्यांना चालत होता.

Your dead man- गुमनामी बाबा!

रशियामध्ये काही काळ अज्ञातवासात राहून आणि देशामधील राज्यकर्ते आपल्याला अनुकूल होतील अशी वाट अनेक वर्षं बघून नेताजी गुमनामी बाबांच्या रूपात भारतात आले, असं आज म्हणता येऊ शकतं. अर्थात् ते रशियात असतानाही भारतीय जनतेच्या हिताच्या दृष्टीने कम्युनिस्ट देशांमध्ये प्रवास करायचे, अनेक नेत्यांसोबत संपर्क ठेवायचे, असेही तुटक धागे दिसतात. १९५५ नंतरच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये नेपाळ सीमेपासून जवळ बस्ती, फैजाबाद व तशा इतर साध्या गावांमध्ये गुमनामी बाबांचं वास्तव्य होतं. पूर्णपणे पडद्याआड ते राहायचे, एकांतात असायचे, सतत चेहरा झाकून ठेवायचे आणि कोणालाही भेटायचे नाहीत. पण त्यांच्या साहित्यात मात्र इंग्लिश- बंगाली- जर्मन पुस्तकं, युद्ध, गुप्तहेर क्षेत्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी ह्यावरची पुस्तकं होती. कालांतराने त्यांचा आझाद हिंद सेनेचे वरिष्ठ सेवक व नेताजींचे म्हणजे त्यांचेच जुने मित्र- सहकारी ह्यांच्यासोबत संपर्क झाला. आणि हळु हळु नेताजींच्या 'इनर सर्कलला' त्यांच्या आगमनाची जाणीव होते. त्यांचे लहानपणीचे मित्र, तरुणपणीचे सहकारी, कार्यकर्ते व आझाद हिंदचे लोक अशा अनेक मंडळींनी गुमनामी बाबा किंवा भगवनजी किंवा पर्देवाले बाबा ह्यांच्या भेटी घेतल्याचे व दीर्घ काळ त्यांचा संपर्क असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. गुमनामी बाबांनी लिहीलेली पत्र उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या लोकांचं एकच विचारणं असायचं की, तुम्ही समोर का येत नाही? त्यावर ते म्हणायचे की, माझं समोर येणं देशहिताचं नाही. कदाचित देशांतर्गत सत्ता संघर्ष, अहिंसावाद्यांचा विरोध, अन्न- धान्य व मदतीसाठी भारताचं अनेक देशांवर अवलंबून असणं व देश ख-या अर्थाने स्वतंत्र नसणं अशी कारणं असतील. असो.

अनेकांना प्रश्न पडतो की, मग नेताजी अशा अज्ञातवासात व लपून राहताना करत काय होते? ह्याची दोन- तीन उत्तरं स्पष्ट मिळतात. एक तर ते साधना करत होते. श्री अरविंदही क्रांतिकारक होते, पण ते पुढे साधनेत गेले आणि ती साधनाही देशासाठी होती. नेताजी १७ व्या वर्षी ७ महिने हिमालयात निघूनही गेले होते. ती त्यांची एकांत साधना आता पुढे जात होती. त्याबरोबर ते कम्युनिस्ट फोल्डसह अनेक आशियातल्या नेत्यांच्या गुप्त संपर्कात होते आणि वेगवेगळे प्रश्न, व्हिएतनामसारखं युद्ध ह्याबद्दल त्यांना मदतही करत होते, असंही गुमनामी‌ बाबांच्या पत्रातून व बोलण्यातून दिसतं. अगदी भारत- चीन युद्ध आणि बांग्लादेश मुक्तीसंग्राम ह्यामध्येही त्यांनी गुप्त प्रकारे मध्यस्थी/ हस्तक्षेप केलेला आहे, असं ते सांगतात. एका बाजूला हे अविश्वसनीय वाटेल. पण हा माणूस कसा होता, हे आपल्याला परत एकदा आठवायला पाहिजे. आयसीएस राजीनाम्यानंतर म्हणजे १९२१ पासून १९४१ पर्यंत ते भारतात सक्रिय होते (त्यातही काही वर्षं तब्येतीमुळे विदेशामध्ये सक्तीची विश्रांती घेत होते व राज्यकर्त्यांच्या भेटीही घेत होते), ह्या २० वर्षांच्या सक्रिय आयुष्यात तुरुंगवास, स्थानबद्धता, मंडालेचा विजनवास अशा गोष्टी धरल्या तर जेमतेम तीन- साडेतीन वर्षं ते मुक्त होते आणि तरीही इतका मोठा प्रभाव त्यांचा होता. संपूर्ण देशभर त्यांचे लोक होते. गांधीजींविरुद्ध निवडणूक लढून ती ते जिंकू शकले व अगदी मद्राससारख्या राज्यांमधून त्यांना समर्थक मिळाले होते. अशी त्यांची योग्यता असेल तर त्यांना पारख असलेले विदेशी राज्यकर्तेसुद्धा कधीच दूर करणार नाहीत. ब्रिटीशांच्या पोलादी पकडीमधून जो अगदी शिवाजी महाराजांच्या हुशारीने पसार झाला होता, ज्याच्याकडे गुप्त संपर्काचं इतकं प्रभूत्व होतं जो नाझींमधील हिटलरविरोधी गटही लगेच ओळखू शकला, त्याला कोणत्या सीमा अडवू शकतील? आणि मग तो माणूस गुप्त प्रकारे अनेक देशाच्या नेत्यांच्या संपर्कात असणं ह्यात आश्चर्य ते काय? आणि मग अशा माणसाला काम करण्यासाठी समोर येऊनच केलं पाहिजे अशीही गरज उरत नाही. असो. ह्याबद्दल असंख्य अप्रत्यक्ष पुरावे दिसतात, अनेक डॉटस दिसतात, जे आपण आपल्या बुद्धीने कनेक्ट करू शकतो. शास्त्रीजींच्या मृत्युचं गूढ, स्वतंत्र भारतातील अनेक राज्यकर्त्यांचा कार्यकाळ, अगदी इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही पी सिंह, नरसिंह राव, अटलजी, मनमोहन सिंह अशा पंतप्रधानांचे कार्यकाळ असे अनेक संदर्भ ह्यात येतात. प्रत्येक बिगर काँग्रेस सरकारने हे गूढ उलगडण्यासाठी केलेली मदत त्यात दिसते. आणि १९९५ च्या सरकारमधले विदेश मंत्री व नंतर राष्ट्रपती झालेले नेते एमिली शेंकलना टोक्योच्या अस्थी आणण्याच्या प्रस्तावावर सही करण्याची सक्ती करताना दिसतात (त्यांना त्या घराबाहेर जायला सांगतात). अशा अनेक गोष्टीचे पुरावे सरकारी कागदपत्रांत आहेत. आता डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांत दिसतात. असो.

मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांच्या हस्ताक्षराची व डिएनएची चाचणी केली होती. एका तज्ज्ञाने हस्ताक्षर जुळतं हा निष्कर्ष दिला. सरकारी तज्ज्ञांनी नकारात्मक निष्कर्ष दिला. आणि नेताजींच्या कुटुंबियांसोबतच्या डिएनए चाचण्यांचे परिणाम नकारात्मक आले. पण सरकारी प्रयोगशाळा ह्या चाचण्यांचे खोटे अहवाल देत होत्या, हे आयोगाच्या कामकाजावेळी तिथे असलेल्या नेताजी प्रेमींना माहिती आहे. त्यामुळे मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांबद्दल हे नेताजीच होते, असं निर्विवाद प्रकारे म्हणता येत नाही, असा निष्कर्ष काढला. कारण पुरावे आहेत, पण ते कागदोपत्री सबळ ठरले नाहीत. कारण आपल्या देशाची उदासीनता, अनास्था आणि भ्रष्टाचार! पण खाजगीमध्ये बोलताना न्यायमूर्ती मुखर्जींनी गुमनामी बाबा हे तेच होते, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि योगायोगाने त्यांचं हे सांगणं एका कॅमेरामध्ये शूट झालं आहे व तो व्हिडिओ इंटरनेटवर आज उपलब्धही आहे. गूगल करू शकता. गुमनामी बाबा हे तेच हे त्यांनाही माहिती होतं, पण चाचण्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आणि सरकारने असहकार केल्यामुळे ते तसं सिद्ध करू शकले नाहीत. पण अप्रत्यक्ष पुरावे आहेतच. अनेक बंगाली क्रांतीकारक आणि राजनेते लीला रॉय, समर गुहा, आझाद हिंद सेनेतील दिग्गज, तत्कालीन युपीचे मुख्यमंत्री संपूर्णानंद अशा अनेकांनी त्यांनाच नेताजी म्हणून दुजोरा दिला होता. फक्त वर दिलेल्या कारणांमुळे हे उघड सत्य होऊ शकलं नाही. असो.

आजच्या काळात नेताजी आणि त्यांचं सत्य आणि योगदान हे सगळं आठवण्याचे दोन उद्देश निश्चित आहेत. एक तर माझ्या बाबांचं पुढे काय झालं, हे जाणणं माझा अधिकार आहे. किंबहुना जो मुलगा- मुलगी असेल त्याला/ तिला त्याशिवाय चैन पडणार नाही. आणि त्याबरोबर हेही महत्त्वाचं आहे की, ही प्रेरणा, ही ऊर्जा आजच्या पिढीला व पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे. असंही अविश्वसनीय व्यक्तिमत्व होतं, आपण त्यांच्या निदान १% होण्याचा प्रयत्न करावा, इतका विश्वास मिळाला पाहिजे. असंख्य अडथळे असले तरी त्यावर मात करण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आपल्यालाही मिळाला पाहिजे. आणि आपण आज जे स्वातंत्र्य- मर्यादितच पण तरीही स्वातंत्र्य उपभोगतोय, जे सुख अनुभवतोय, त्याची किंमत किती मोठी होती, ह्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. ही जाणीव झाली, ही आठवण राहिली तर आपण निदान १% तरी त्यांना आत्मसात करू शकू. हे करण्याचे अनेक मार्ग असतील. आपल्या आपल्या क्षेत्रात हिंमतीने, स्वाभिमानाने आणि स्वयंप्रेरणेने काम करणं असेल. नवीन पिढीला पथनाट्य, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा माध्यमातून हे सांगणं असं असेल. आपल्या ठिकाणी सत्याचा शोध घेत राहणं असेल. आपण १% जरी हे करू शकलो तरी आपलं आयुष्य कृतार्थ ठरेल.

'नेताजी द फरगॉटन हिरो' चित्रपटात एकला चोलो रे गाण्यात एक ओळ आहे. जर आपण देश म्हणून आणि नेताजींचे वारस म्हणून त्यांना १% आत्मसात करू शकलो तर त्याच गाण्याची पुढची ओळही सार्थक ठरेल-

मज़िलें कभी क्या मिलेगी हमें
होगी क्या सहल कभी जो राह है कड़ी
आज हर जवाब हमको मिल जाएगा
आ गई है आज फैसले की घड़ी

(निरंजन वेलणकर 09422108376, niranjanwelankar@gmail.com)

समाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

13 Aug 2022 - 12:31 pm | क्लिंटन

लेख आवडला. पूर्वी मिपावर अशाप्रकारचे लेख येऊन त्यावर उत्तम चर्चा (किंवा खडाजंगी) व्हायची हे हा लेख वाचल्यावर आठवले. काही मुद्दे पटले नाहीत तरीही सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले हे समजायला पाहिजे याविषयी पूर्ण सहमती.

जानेवारी १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्री ताश्कंदला गेले होते तेव्हा सुभाषचंद्र बोस त्यांना तिथे भेटले होते ही एक थिअरी आहे. शास्त्रीजींनी अयुबखानबरोबर करारावर सह्या केल्यानंतर शास्त्री, अयुबखान आणि रशियाचे कोसीजीन यांचा पुढील फोटो प्रसिध्द आहे. त्या फोटोत अयुबखानच्या मागे उभी असलेली व्यक्ती म्हणजे सुभाषचंद्र बोसच आहेत अशी ती थिअरी आहे. खखोदेजा.

shastriji

त्याच थिअरीचा पुढचा भाग म्हणजे शास्त्रीजी ताश्कंदहून भारतात परत येताना सुभाषचंद्र बोसांना बरोबर घेऊन येणार होते म्हणून त्यांचा ताश्कंदमध्येच काटा काढला गेला.

ह्यांच्या भेटी घेतल्याचे व दीर्घ काळ त्यांचा संपर्क असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. गुमनामी बाबांनी लिहीलेली पत्र उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या लोकांचं एकच विचारणं असायचं की, तुम्ही समोर का येत नाही? त्यावर ते म्हणायचे की, माझं समोर येणं देशहिताचं नाही.

इन द्याट केस, too many people knew it for it to remain secret.

यामुळे ही आणि अशा थियरीज विश्वसनीय राहात नाहीत.

सुभाषबाबूंच्या नातेवाईकांनी त्यांचे निधन रुढ थियरीनुसारच झाल्याचे मान्य करुन त्यावर पडदा टाकला आहे. जपान सरकार आणि इतर अनेक प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघात आणि त्यानंतरच्या सुसंगत घटना नोन्दवल्या आहेत. अशा वेळी पुन्हा संशय उत्पन्न करुन त्यांच्या पुढच्या पिढीला मानसिक क्लेश होण्याखेरीज काही होईल असे वाटत नाही.

अनेक मृत्युंच्या बाबतीत अशा थियरीज असतात. अमेलिया एरहार्ट, हिटलर, सुभाषचंद्र बोस आणि इतरही असतील.

एक लक्षात घेतलं पाहिजे की सतत आणि सलग कार्यरत असलेली, एखादे मिशन हाती घेतलेली ध्येयासक्त माणसे (मिशन भले की बुरे हा विषय वेगळा) ही अचानक एका रात्रीत किंवा एका अपघातानंतर अचानक कायमचे विजनवासात जाणे आणि अगदी नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत पूर्ण काळ अज्ञात बनून राहणे हे तर्काने पटत नाही. आणि साधू, बैरागी बाबा, संन्यासी अशा रुपात राहणे तर त्याहून न पटण्यासारखे.

तुषार काळभोर's picture

13 Aug 2022 - 3:58 pm | तुषार काळभोर

too many people knew it for it to remain secret.

गवि यांच्या वरील दोन्ही प्रतिसादाशी सहमत.

१९४७ ला मिळालेलं स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नव्हतं, ब्रिटिश v तत्कालीन भारतीय नेत्यांमध्ये गुप्त करार झाला होता, हे स्वातंत्र्य मर्यादित काळासाठी असून भारत परत एकदा ब्रिटिशांच्या अधीन होणार आहे - या सर्व वाक्यांना conspiracy theories च्या पलीकडे जास्त घटकाभर मनोरंजन या व्यतिरिक्त जास्त मूल्य नाही.

(१९३०-४० च्या दशकातील) जपानी साम्राज्याच्या सैन्याच्या तुलनेत अन्याय, शोषण आणि पिळवणूक करणारे ब्रिटिश नक्कीच जास्त सभ्य होते. तेच नाझी जर्मनी बाबत.
यदाकदाचित दुसरे महायुध्द नाझी जर्मनी आणि जपानी साम्राज्य यांनी जिंकले असते आणि त्याला समांतर पद्धतीने नेताजींना आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने ब्रिटिशांविरोधात यश मिळाले असते, तर त्यातून निर्माण होणाऱ्या स्वतंत्र भारताच्या भविष्याचा (जास्त रोमँटिक न होता व्यावहारिक पद्धतीने - pragmatic) विचार करणे रोचक असेल. जसे भारताचे परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, जर्मनी आणि/किंवा जपानचा सांस्कृतिक , धोरणात्मक प्रभाव (जसा आता ब्रिटिशांचा आहे), इत्यादी.

क्लिंटन's picture

13 Aug 2022 - 4:27 pm | क्लिंटन

एक लक्षात घेतलं पाहिजे की सतत आणि सलग कार्यरत असलेली, एखादे मिशन हाती घेतलेली ध्येयासक्त माणसे (मिशन भले की बुरे हा विषय वेगळा) ही अचानक एका रात्रीत किंवा एका अपघातानंतर अचानक कायमचे विजनवासात जाणे आणि अगदी नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत पूर्ण काळ अज्ञात बनून राहणे हे तर्काने पटत नाही. आणि साधू, बैरागी बाबा, संन्यासी अशा रुपात राहणे तर त्याहून न पटण्यासारखे.

अगदी पूर्ण सहमत.

पण १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी तैवानमधील त्या बेटावर कोणताही विमान अपघात झाल्याची नोंद नाही हे तैवानच्या सरकारने मुखर्जी आयोगाला कळवले होते. याविषयी अनुज धरांच्या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. तसे असेल आणि त्यादिवशी विमान अपघात झालाच नसेल तर मग सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले हा प्रश्न उभा राहतोच. या सगळ्या वावड्या उठल्या होत्या त्या खर्‍या असतीलच असे म्हणत नाही पण सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले याविषयी स्पष्टता नसेल तर अशा वावड्या उठणे अपरिहार्य आहे. त्यापेक्षा त्यांचे नक्की काय झाले याचे उत्तर मिळाले तर मग हे सगळे प्रकार बंद होतील. दुसरे म्हणजे मार्ग पटला-नाही पटला तरी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना हा स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचा भाग होता हे कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे अशा महत्वाच्या नेत्याचे पुढे काय झाले हे संशयाचे धुके असणेही बरे नाही.

क्लिंटन's picture

13 Aug 2022 - 4:16 pm | क्लिंटन

(१९३०-४० च्या दशकातील) जपानी साम्राज्याच्या सैन्याच्या तुलनेत अन्याय, शोषण आणि पिळवणूक करणारे ब्रिटिश नक्कीच जास्त सभ्य होते.

प्रचंड सहमत.

काही मुद्दे पटले नाहीत असे वर प्रतिसादात लिहिले आहे त्याला तोच संदर्भ आहे. पण मागे झाले त्याप्रमाणे धाग्याचा मूळ विषय सोडून भलतीच चर्चा व्हायला लागून धागा हायजॅक होऊ नये म्हणून त्यावर जास्त लिहिले नाही.

जेम्स वांड's picture

14 Aug 2022 - 7:40 am | जेम्स वांड

इतरत्र लिहिलं आहे, इथे पण लिहितो.

अनुज उत्तम शोध पत्रकार आहे*, हो मी आहे म्हणतो कारण तो विषयाच्या मुळाशी उत्तम जातो. पण नेताजी ह्या विषयात अनुजने ऑब्जेक्टिविटी हरवल्याचे दुर्दैवाने कायमच वाटत राहिले आहे, संशोधनाची वस्तू ओबसेशन झाली की असे होते कारण आपण घेत असलेल्या मेहनतीला फळ मिळावे अश्या पद्धतीने conformational biases माणूस आपलेसे करू लागतो. हे म्हणजे गूगलवर "हाऊ गांधी इज बॅड" सर्च करण्यासारखे आहे, गुगल तुम्हाला आवडेल असे सर्च रिझल्ट आणून समोर ठेवेल. हे झालं अनुज बद्दल माझं वैयक्तिक मत, आता आपण वळू आपल्या लेखनाकडे. काही मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे:-

स्वातंत्र्याच्या करारात (Transfer of powers) मध्ये कदाचित एक गोपनीय अट ही होती की, जर नेताजी भारतात आले असते तर युद्ध गुन्हेगार म्हणून सरकारला त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन करावं लागलं असतं.

कदाचित हा शब्द आल्यावर नेताजींना युद्धकैदी केलं असतं, ब्रिटनच्या हवाली केलं असतं वगैरे सगळ्या hypothesis चा उभा केलेला डोलारा पोकळ होऊन थरथरू लागतो. भारत ब्रिटन गुप्त समझोता वगैरे विषय ओके आहे वाचायला पण ते पु ना ओक टाईप पुस्तकांत, माफ करा पण १९३८ हरिपुरा काँग्रेस अधिवेशन आणि १९३९ त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनात हेच शिकवलं आहे आपल्याला, objective thinking and Questioning. मग महातम्याला प्रश्न विचारावे लागले तरी बेहत्तर Happy

जालियांवाला बागेमध्ये गोळ्या झाडणारे जे पोलिस होते- ते भारतीय पोलिस होते- त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सरकारी नोकर म्हणून पेंशन मिळत होती आणि आझाद हिंद सेनेमध्ये लढलेल्या सैनिकांना व अधिका-यांना स्वातंत्र्यसैनिकसुद्धा मानलं जात नव्हतं.

छोटीशी दुरुस्ती, ते पोलीस नव्हते तर गोरखा रेजिमेंटचे लष्करी जवान होते. जर दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांकडून लढलेले Cariappa, sam maneckshaw Field Marshal होऊ शकतात, तर सामान्य जवानांना पेन्शन नाकारण्यात काय हशील ?? आझाद हिंद सेनेच्या जवान व अधिकाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिक दर्जा बहाल करून इंदिरा गांधींनी पेन्शन पण सुरू केली होती.

अजूनही कैक मुद्दे आहेत, आत्ता वेळेअभावी इतकेच, उरलेले परत मांडतो आरामात सवड मिळेल तसे.

(सुभाषवादी म्हणून objective ) वांड

*अनुजला पार हिंदुस्तान टाईमस् अन् प्री ऑर्कुट याहू ग्रुप काळापासून बघत आलोय, मिशन नेताजींची कार्यक्रमाची सुरुवात अन् अनुजचे त्यात बुडून जाणे हे त्रयस्थपणे बघत आलो आहे सुरुवातीपासून

तर्कवादी's picture

16 Aug 2022 - 6:25 pm | तर्कवादी

पण नेताजी ह्या विषयात अनुजने ऑब्जेक्टिविटी हरवल्याचे दुर्दैवाने कायमच वाटत राहिले आहे, संशोधनाची वस्तू ओबसेशन झाली की असे होते कारण आपण घेत असलेल्या मेहनतीला फळ मिळावे अश्या पद्धतीने conformational biases माणूस आपलेसे करू लागतो. हे म्हणजे गूगलवर "हाऊ गांधी इज बॅड" सर्च करण्यासारखे आहे, गुगल तुम्हाला आवडेल असे सर्च रिझल्ट आणून समोर ठेवेल.

लेख वाचून माझेही साधारण हेच मत झाले. पण तरीही महत्वाचा विषय चर्चेत आणल्याबद्दल मार्गी यांचे आभार

मार्गी's picture

14 Aug 2022 - 1:52 pm | मार्गी

वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!

वेगवेगळे सर्व अँगल्स, बाजू, मतांचं व भुमिकांचं स्वागत करतो. मी लिहीली तीच भुमिका एकमेव बरोबर आहे, असं मला अजिबातच वाटत नाही. पुस्तक वाचल्यावर व पोडकास्टस ऐकल्यानंतरची प्रतिक्रिया, इतकाच लेखाचा स्कोप होता. अनेक जणांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे, त्यांना विशेष धन्यवाद. माझ्या माहितीमध्ये त्यामुळे भर पडली. ह्या विषयाच्या इतरही बाजू आहेत. मुळात २०१६ मध्ये डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांमध्ये नव्याने समोर आलेले मुद्दे ह्या विषयामध्ये आहेत, ते लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.

प्रत्येकाला कशाला योग्य मानायचं, कोणत्या गोष्टी, कोणते स्रोत खरे मानायचे, ह्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहेच. पटणं न पटणं किरकोळ गोष्ट आहे. वेगवेगळे व्यापक मुद्दे विचारात घेता यावेत, इतकंच वाटतं. ज्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना मी सुचवेन की, अनुज धरचं https://open.spotify.com/episode/0orD4XiUYwKk6vIdO5AmaP?si=9RKOxwpZSlerF... पोडकास्ट पूर्ण ऐकून आपली प्रतिक्रिया द्यावी.

सर्वांना पुनश्च मन:पूर्वक धन्यवाद.

मार्गी's picture

14 Aug 2022 - 1:53 pm | मार्गी

वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!

वेगवेगळे सर्व अँगल्स, बाजू, मतांचं व भुमिकांचं स्वागत करतो. मी लिहीली तीच भुमिका एकमेव बरोबर आहे, असं मला अजिबातच वाटत नाही. पुस्तक वाचल्यावर व पोडकास्टस ऐकल्यानंतरची प्रतिक्रिया, इतकाच लेखाचा स्कोप होता. अनेक जणांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे, त्यांना विशेष धन्यवाद. माझ्या माहितीमध्ये त्यामुळे भर पडली. ह्या विषयाच्या इतरही बाजू आहेत. मुळात २०१६ मध्ये डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांमध्ये नव्याने समोर आलेले मुद्दे ह्या विषयामध्ये आहेत, ते लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.

प्रत्येकाला कशाला योग्य मानायचं, कोणत्या गोष्टी, कोणते स्रोत खरे मानायचे, ह्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहेच. पटणं न पटणं किरकोळ गोष्ट आहे. वेगवेगळे व्यापक मुद्दे विचारात घेता यावेत, इतकंच वाटतं. ज्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना मी सुचवेन की, अनुज धरचं https://open.spotify.com/episode/0orD4XiUYwKk6vIdO5AmaP?si=9RKOxwpZSlerF... पोडकास्ट पूर्ण ऐकून आपली प्रतिक्रिया द्यावी.

सर्वांना पुनश्च मन:पूर्वक धन्यवाद.

गामा पैलवान's picture

14 Aug 2022 - 6:47 pm | गामा पैलवान

मार्गी,

एका ज्वलंत विषयाची ओळख नव्याने करवून दिल्याबद्दल आभार. या भाश्नाच्म अक्षरी रुपांतर कुठे मिळेल काय? ३ तास ऐकणं मुश्कील. शिवाय संदर्भ द्यायची सोय नाही. त्यामुळे मजकूर मिळाल तर बरं होईल.

धन्यवाद ! :-)

आ.न.,
-गा.पै.

विजुभाऊ's picture

16 Aug 2022 - 5:34 pm | विजुभाऊ

रंगो बापूजी गुप्ते हे स्वातंत्र्य सैनीक असेच बेपत्ता झाले.
सातार्‍यात त्यांचे चार भिंती हे स्मारक आहे.
ठाण्यात देखील एका चौकाला त्यांचे नाव आहे.
ते ठाण्याला एका लग्नासाठी आले होते. तेथे ब्रिटीश सैनीकांनी त्यांना पकडण्याचा घात घातला. ते तेथून पळून गेले. त्या नंतर कोणालाच त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

सुरिया's picture

16 Aug 2022 - 5:44 pm | सुरिया

१८५७ चे वर्ष स्वातंत्र्यसमरामुळे गाजू लागले. गोसाव्याच्या वेशात भटकणाऱ्या रंगोबांची गाठ तात्या टोपे ह्यांच्याशी पडली. विचार-विनिमय झाले. त्यानंतर स्वतः धोंडोपंत बाजीराव पेशवे त्यांना बिठूरला घेऊन गेले. स्वातंत्र्यलढ्यासाठी दक्षिणेतले नेतृत्व करण्याचे निश्चित करून रंगोबा परतले. छत्रपतींविषयी आदर असणाऱ्या अठरापगड जातींमधील शेकडो लोकांना त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित केले. भोरचे पंतसचिव चिमणाजी रघुनाथ ह्यांच्या मदतीने त्यांनी सैन्यभरणी सुरू केली. तसेच त्यांच्या हेरांनी इंग्रजांच्या पलटणींमध्ये बेदिली माजवण्यास सुरुवात केली.
मंगल पांडे यांची फाशी (एप्रिल ६ १८५७) व मीरतचा उठाव (मे ७, १८५७) या घटनांमुळे महाराष्ट्रात उठाव करण्यास उत्सुक लोकांना काळाचे वारे ओळखून त्यांनी "कुशल सेनानी योग्य वेळीच आघात करतो वा माघार घेतो" असा सबुरीचा सल्ला दिला. दुर्दैवाने फंदफितुरीमुळे ते इंग्रजांच्या तावडीत सापडले. पण तिथूनही मोठ्या शिताफीने ते निसटले ते पुन्हा इंग्रजांच्या हाती लागले नाहीत.
रंगो बापूजींचे पुतणे यशवंतराव व वामनराव त्यांनीच केलेल्या तयारीप्रमाणे ५०० च्या आसपास मावळे घेऊन उत्तरेकडील उठावात सामील झाले. १८५७ च्या अखेरच्या लढाईत ते सहभागी झाले होते. स्वातंत्र्यलढा मोडून काढल्यावर दक्षिणेतल्या १७ जणांवर खटला भरण्यात आला त्यात रंगो बापूजींचा मुलगा सीताराम व त्यांचे मेव्हणे केशव निळकंठ चित्रे (अण्णा मामा) यांच्यासकट त्या १७ जणांना फाशीची शिक्षा झाली.
मृत्यू: कैदेतून निसटल्यावर रंगो बापूजी बैरागी बनले. इ.स. १८७०मध्ये दारव्हा येथे कुपरी नदी (गोकी नदीच्या?)च्या काठावर ‘बैरागी बाबा‘ या नावाने ते प्रकट झाले. काही काळ माहूरच्या अरण्यात राहिले. इ.स. १८८५मध्ये दारव्हा येथे आपल्या मठात त्यांनी देह ठेवला.

मुक्त विहारि's picture

16 Aug 2022 - 7:49 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

मार्गी's picture

17 Aug 2022 - 3:20 pm | मार्गी

धन्यवाद विजुभाऊ जी आणि सुरिया जी! खूप वेगळी माहिती आपण सांगितलीत.

@ गामा पैलवान जी, मग तुम्हांला हे पुस्तक वाचणं जास्त सोपं जाईल. इतकं रंजक आणि फास्ट आहे की थांबवावसं वाटत नाही: https://www.amazon.in/Indias-Biggest-Cover-Up-Anuj-Dhar/dp/9380828691/re...

गामा पैलवान's picture

17 Aug 2022 - 11:01 pm | गामा पैलवान

धन्यवाद मार्गी! पीडीएफ मिळाली. सप्ताहांतास वाचून काढेन.
आ.न.,
-गा.पै.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Aug 2022 - 9:13 am | ज्ञानोबाचे पैजार

नेताजींबद्दल एक प्रकारचे आकर्षण लहानपाणापासुनच वाटत आले आहे.
त्यांचे नक्की काय झाले? ह्या प्रष्णाचे उत्तर कधी ना कधी तरी मिळेलच.
पैजारबुवा,

नेताजींना त्यांच्या तोडीचे शिष्य म्हणा किंवा कार्यकर्ते मिळाले नाहीत. नेताजी नंतर फक्त वापरले जातायत, आजतागायत..

नेताजींनी स्थापन केलेला फॉरवर्ड ब्लॉक आज एक प्रभावहीन कम्युनिस्ट पक्ष होऊन नेताजी भवन दिल्लीत मर्यादित होऊन बसला आहे.

एकेकाळी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरेय्या यांच्यासारख्या आधुनिक भगीरथ माणसाला सोबत घेऊन ज्या माणसाने विज्ञान परिषद घेऊन स्वतंत्र भारत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात कसा प्रगती करेल ह्यावर परिसंवाद घेतले होते त्याचे शिष्य म्हणवणारे आता एकतर कन्स्पिरसी कन्स्पिरसी खेळत बसलेत

नेताजींचा उदोउदो करणारे त्यांनी ताठ मानेने गांधी ते पटेल सगळ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले होते त्यांचे तथाकथित शिष्य त्यांनी एकतर फक्त गांधींना प्रश्न विचारले ह्या एकाच कोत्या मनोवृत्तीने नेताजी नेताजी करतात किंवा स्वतः प्रश्न करणाऱ्याच्या मोटीव वर शंका घेतात.

नेताजी वारलेत कारण नेताजी ज्यांच्यासाठी लढत ती वृत्तीच गायब आहे, महानायक मध्ये जीवित कृपलानी ह्यांचं एक वाक्य आहे

"नेताजींचे समर्थक निद्रिस्त आहेत तेच बरे आहे कारण ते जागे झाले तर नेताजींच्या विचारांवर आधारित एक देशव्यापी संघटना बांधतील"

नेताजी जिवंत ठेवायची एकच रीत म्हणजे त्यांचे विचार काया वाचा मने आत्मसात करणे, अगदी त्यांच्यातही शंका असल्या तर बेडर पणे त्या प्रश्न रुपात विचारणे, अन् जमेल तसे त्यावर स्वतः सोल्युशन शोधणे, तोवर नेताजी कायमच मृत राहतील. अगदी विचारांनी सुद्धा.