"प्रचंडगड" तोरणा

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
4 Aug 2022 - 1:13 pm

२४ जुलै २०२२

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात स्थित एक बळकट, भर-भक्कम, मोठा विस्तार असणारा प्रचंड किल्ला म्हणजे तोरणा. रायरेश्वरला स्वराज्य स्थापनेचा संकल्प केल्यानंतर शिवरायांनी पाय रोवलेला पहिला-वहिला किल्ला, समुद्रसपाटीपासून अदमासे चौदाशे मीटर इतकी धडकी भरवणारी उंची, दक्षिणेला वेळवंडी तर उत्तरेला कानद नदीचे खोरे, उशाला काहीचं वर्षांपुर्वी झालेलं गुंजवणी धरण तर एका डोंगरधारेने विलग केलेली पायथ्याची घेरा वेल्हे आणि भट्टी ही गावं.

T1

२४ जुलैच्या रविवारी आमचा तोरणा स्वारीचा मुहुर्त होता. पहाटे साडे-चार ला उठून आन्हिके उरकून, साडेपाचच्या आसपास घरं सोडले, बाहेर पावसाची भुरभुर सुरू होती, घरापासून अगदी पाचेकशे फुटांवर माझा "पिक-अप पॉईंट" होता. तिथे पोहचतो न पोहोचतो तोचं भुरभुरीचं रूपांतर जोरदार सरीत झालं. एक आडोसा धरून उभा राहिलो. रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात, पहाटेच्या निःशब्द वेळी, एका लयीत कोसळणाऱ्या सरींचं संगीत एकट्याने अनुभवत काही क्षण गेले. उभ्या गाड्यांच्या टपावर, काचांवर, घरांच्या गॅलऱ्यांवर, सिमेंटच्या रस्त्यावर अशा वेगवेगळ्या जागी पडणाऱ्या थेंबांचा वेगवेगळा आवाज, एकमेकांपासुन वेगळा करून ऐकण्याचा प्रयत्नही करून पाहीला, चला!! मोहिमेची सुरवात तर अशी अप्रतिम झाली.

T2

थोड्याच वेळात अजून एक मित्र तिथे पोहोचला व त्यानंतर १० चं मिनिटात आमची गाडी इतर तिघांना घेऊन तिथे पोहोचली. त्यानंतर रस्त्यात अजून एका मित्राला "उचलणे", पाठपिशव्या नीट लावून घेणे, गाडीतील इंधन वगैरे सोपस्कार पार पाडत साधारण सहा वाजता आम्ही सहाजणांनी आपला मोर्चा "तोरण्या"च्या दिशेने वळवला. खराडी-हडपसर-दिवेघाट-सासवड मार्गे कपूरहोळ व तिथून महामार्गावर उजव्या हाताला वळून नसरापूर फाट्यावरून वेल्ह्याच्या मार्गाला लागणे व वेल्हा गावातून बिनी दरवाजा मार्गे तोरण्यावर चढाई अशी योजना होती.

T3

रस्ताभर पावसाच्या भुरभुरीने सोबत केली. दिवेघाटात पोहोचेपर्यंत चांगलं उजाडलं होतं. घाटातून दिसणारा मस्तानी तलाव अजुन ही जवळपास कोरडा म्हणावा असा होता. रस्त्याची अवस्था "कभी खुशी-कभी गम" अशी जरी असली तरी सकाळच्या वेळेतील अत्यंत तुरळक वाहतुकीमुळे अंतर भराभर मागे पडत होतं. शांत पडलेलं सासवड पार करून, धुक्यात बुडालेला पुरंदर डाव्या हाताला ठेवत, नारायणपूर ओलांडून पुढच्या दहा मिनिटात केतकावळे ही मागे टाकले. कपूरहोळ वरून नसरापूर फाटा गाठलं. अंग मोकळं करायला दहा मिनिटांचा घेतलेला एक थांबा वगळता अजिबात वेळ न घालवता पावणे-आठ वाजायच्या आत वेल्ह्यात पोहोचलो.

T4

मढे घाटाच्या रस्त्याकडे वळणारी एक व दुसरी गडाकडे जाणारी, अशा वाटेवरील तिठ्यावरच असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. आत, भातलावणीच्या गडबडीत असणाऱ्या शेतकरी मंडळींनी, पुढच्या कष्टाच्या दिवसाला सुरवात करण्याआधी थोडा विरंगुळा म्हणून चहाच्या जोडीने हॉटेल मालकाबरोबरंचं गप्पांचा अड्डा जमवला होता. आम्ही आत येताच ते आम्हाला जागा करून देत बाहेर गेले. कमी तिखट, बेताची तर्री असलेली अशी डोंगर-भटक्यांच्या पोटपूजेसाठी आदर्श तरीही चवदार अशी मिसळ व त्यानंतर फक्कड चहा असा भरपेट नाश्ता झाला, गावकरी मंडळींच्या मोठ्या आवाजात अघळपघळ गप्पा सुरूच होत्या व भर म्हणून, आत हॉटेल मालक व मालकीण यांच्यातही नवरा-बायकोमध्ये सतत चालणाऱ्या तद्दन लटक्या कुरबुरीही चालू होत्या, त्यात गप्पांच्या नादात उतू गेलेलं दूध हे मुख्य कारण होतं. आतल्या या कुरबुरींबरोबरचं बाहेर पावसाचीही भुरभुर चालूच होती.

T5

अशा सर्व "सुशेगात" वातावरणात साधारण साडे-आठच्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या वाटेला लागलो, किल्ल्याच्या वाटेवर साधारण एक-दीड किलोमीटरचा उत्तम रस्ता आता झालेला आहे व त्याच्या टोकाला पाच-पंचवीस गाड्या लावता येतील अशी जागा ही आहे. त्यामुळे गाडी घेऊन सरळ वर रस्त्याला लागलो व उपद्रव शुल्क भरून गाडी व्यवस्थित लावून घेतली. अंगावर शहारे आणणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या लोटांसोबत पाऊस पाठवून तोरण्याने आमचं स्वागत केलं. पार्किंग गाड्यांनी बऱ्यापैकी भरलेलं होतं, म्हणजे आमच्या आधीही बरीच मंडळी गडाकडे गेली होती, त्यातील काही मुक्कामीही असावीत बहुदा. वेळ न दवडता आम्हीही चढाईला लगेच सुरुवात केली.

T6

समोर होता ढगांच्या पावसाळी धुक्यात पुर्णपणे बुडून गेलेला "प्रचंडगड" तोरणा, बऱ्याचदा, शिवरायांनी घेतलेला पहिला किल्ला म्हणजे जणू स्वराज्यचं तोरणचं असं रूपक किल्ल्याच्या नावाच्या स्पष्टीकरणासाठी दिलं जातं जे प्रत्यक्षात एक साहित्यिक कल्पनाच असावी कारण स्वराज्यात येण्याआधीपासुनच हा किल्ला तोरणा म्हणुन ओळखला जात होता. हे नाव किल्ला व परिसरातील बोरवर्गीय तोरण नावाच्या झुडुपावरून आलं. शिवाय, शिवराय ज्यावेळी या गडावर आले तेव्हा त्याचा भलामोठा विस्तार पाहून त्यांनी या गडाला प्रचंडगड असं नाव दिलं.

T7

कुण्या परदेशी इतिहासकाराने "गरुडाचे घरटे" असा उल्लेख केलेला, थेट आभाळात घुसलेले कडे असणारा, चढायला अत्यंत कठीण, पावसाळ्यात धो-धो कोसळणारा पाऊस झेलणारा, बारमाही वस्ती करून राहणे अत्यंत कष्टाचे व जिकिरीचे असणारा व त्यामुळे जरासा दुर्लक्षित असा हा किल्ला, शिवरायांनी किल्लेदाराच्या गाफीलीचा अचूक फायदा उठवत ताब्यात घेतला. साल होत १६४७. त्यानंतर दोनवेळा तोरणा मोगलांच्या ताब्यात गेला पण १७०८ नंतर तो शेवटपर्यंत स्वराज्यातचं राहिला.

डोंगराला किल्ल्याचं स्वरूप बहामनी कालखंडात आलं असलं तरी किल्ला त्याआधीही तीन-चारशे वर्षापुर्वीपासून बिगर लष्करी धार्मिक कारणांसाठी राबता असण्याचे अनुमान आहे. बहामनी, निजामशाही, आदिलशाही मग स्वराज्य-मोगल-स्वराज्य असा किल्ल्याचा प्रवास राहिलाय.

पुणे जिल्ह्यातला सर्वात जास्त उंचीवर वसलेला किल्ला म्हणून तोरणाची ओळख आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून निघून पुर्वेकडे जाणाऱ्या दोन रांगापैकी एक रांग भुलेश्वर जिच्यावर पुरंदर वसला आहे तर दुसऱ्या रांगेवर राजगड आणि तोरणा वसले आहेत. सुप्रसिद्ध बुधला व झुंजार या दोन माच्या व बालेकिल्ला अशी तोरणा किल्ल्याची रचना आहे.
T7

चढाईच्या सुरवातीला सोपी, जास्त त्रास न देणारी चढण लागते, एका बाजूला कमी उंचीचे उतरते कडे व दुसऱ्या बाजूला छोट्या छोट्या रानझुडपांनी भरलेली दरी, दरीपलीकडे तोरणा-राजगड डोंगर रांगेवरून खाली वाहणारे छोटेमोठे धबधबे, स्वर्गीय म्हणावा असा नजारा धुक्याच्या चादरी आडून दिसत राहतो. अधूनमधून कोसळणाऱ्या सरी अंगावर झेलत, वीस एक मिनिटांच्या चढाईनंतर एका बऱ्यापैकी मोठ्या पठारावर आम्ही पोहोचलो, इथं भणाणनाऱ्या वाऱ्यांनी आमचं स्वागत केलं. डोक्यावरील घट्ट घातलेली टोपीही उडून जाईल वा चाळीसेक किलो वजनाच्या व्यक्तीला आरामात मागे ढकलेल एवढा जोर त्या वाऱ्यात होता. खाली दुसऱ्या बाजूला, गुंजवणीचा विस्तीर्ण जलाशय धुक्याच्या आड लपला होता, एका क्षणात त्याच्यावरील धुक्याची चादर वाहत्या वाऱ्याने बाजूला होऊन त्याचं दर्शन व्हायचं तर दुसऱ्याच क्षणाला तो पुन्हा धुक्यात हरवून जात होता. हा पाठशिवणीचा खेळ अनुभवत व दरीतून वर येणारे ढगांचे धुक्याच्या रूपातील लोट पाहत काही वेळ आम्ही तिथंच रेंगाळलो.

T8

तिथून एक चढ चढून पुन्हा एक छोटंसं पठार लागलं जिथं पुन्हा हाच नजारा व प्रचंड वेगाने वाहणारे वारे अंगावर झेलत पुढे निघालो. इथून पुढली चढण खडी होत गेलेली अशी होती, आतापर्यंत कधी वेल्हा तर कधी गुंजवणी धरण पाठीशी ठेवत आमची चढाई सुरू होती ती एकदम डोंगराला पूर्ण वळसा घालून वेल्हा बाजूला तोंड करती झाली. जागोजागी लावलेल्या रेलिंगच्या आधारे चालत आम्ही चढ पार करीत होतो. दृष्यमानता अगदीच जेमतेम होती. एका टप्प्यावर एका बाजूला रेलिंग दुसऱ्या बाजूला दोर व मध्ये जवळपास ऐंशी अंशांच्या कोनातील चढाई होती. भक्कम रेलिंग्स साथीला असल्यामुळे विशेष श्रम पडले नाहीत.

T9

T10

T11

तिथून वर गेल्यावर थोडा उतार लागला व पाचच मिनिटात आम्ही तोरण्याच्या प्रसिद्ध धबधब्यापाशी आलो. समोर, धुक्यात बुडालेलं वरचं टोक दिसत नसलं तरी सरळसोट चाळीसेक फूट तरी नक्कीच भरेल एवढ्या उंचीवरून एकदोन टप्प्यात पडणारा पांढराशुभ्र प्रपात डोळ्यांचं पारणं फेडत होता. खाली जास्त वेळ थांबायला धडकी भरावी असं ते रौद्र सौंदर्य डोळे भरून पाहात पुढे निघालो. पाचव्याचं मिनिटाला आम्ही, सत्तर-ऐंशी अंशाच्या कोनात वर चढणाऱ्या व बिनी दरवाजात पोचवणाऱ्या सरळसोट लांबलचक टप्प्यापाशी होतो. उतरणाऱ्या लोकांना वाट देण्यात थोडा वेळ खर्च करीत दहा-पंधरा मिनिटात आम्ही बिनी दरवाजात पोहोचलो. इथून आता तोरण्याची बेलाग तटबंदी दाट धुक्यातूनही नजरेच्या टप्प्यात होती. मोठमोठे ताशीव दगड एकावर एक रचित तयार केलेला दुर्गबांधणीशास्त्रातील अविश्वसनीय कामगिरीचा अव्वल नमुना डोळ्यांसमोर होता.

T12

बिनीदरवाजा नावाप्रमाणे बिनीचा, लढाऊ, वेळप्रसंगी अवघे चार-पाच मावळेही रोखून धरू शकतील असा, जास्त मोठा नाही वा छोटाही नाही. बिनीदरवाजातून विस्फारल्या डोळ्यांनी पुढील चढण चढत, अर्धवक्राकृती कोनात बांधलेल्या मोठ्या कोठी दरवाजापाशी पोहोचलो, बांधकाम पाहून स्तिमित व्हायला झालं. दरवाजावरती प्रशस्त बुरुज, आत पहारेकाऱ्यांच्या देवड्या, बुरूजावर चढून जायला पायऱ्या, वक्राकार रस्त्याच्या शेवटाला भिंतीत उभा केलेला दरवाजा, मानेत वळून पाहणाऱ्या गाईची आठवण करून देणाऱ्या अशा प्रकारच्या दरवाजा बांधकाम पद्धतीला गोमुख पद्धत असं म्हंटलं जातं. कोठी दरवाजाच्या एका देवळीत तोरण जाई देवी स्थापित आहे. याचं कोठी दरवाजात शिवरायांना गुप्तधनाचे हंडे सापडले होते, या धनातूनच मुरंबदेवाच्या डोंगरावर दुर्गराज राजगड उभा ठाकला अस ही सांगितलं जात.

t13

कोठी दरवाजातून आत प्रवेश केला की बालेकिल्ल्यावर आपली गडफेरी सुरू होते, दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होती. त्यामुळे इतर सर्व गट ज्या मार्गाने गर्दी करून जाताना दिसत होते तो मार्ग टाळून आम्ही कोठी दरवाजाच्या वरच्या बुरुजावरून बालेकिल्ल्याकडे तोंड करून उजव्या हाताला तटबंदीवरून चालत जायचा मार्ग निवडला, तटबंदीपलीकडे गच्च धुक्याने भरलेली दरी व अलीकडे धुक्यात बुडालेला बालेकिल्ला यातून आम्ही चालत होतो. तटबंदीची डागडुजी केल्याच्या खुणा दिसत होत्या, तटबंदीचा रस्ता ही बहुदा साफ करून घेण्यात आला असावा. ढगांच्या वरून चालण्याची अनुभूती देणारी ही वाट होती, सगळंच अविस्मरणीय असं.....

T14

तटबंदीच्या कडेने चालत लागलेल्या दोन छोट्या बुरुजांवरून पलीकडे काही दिसतंय का हे पाहण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत तटबंदीतच बांधलेल्या एका सरळसोट जिन्यावरून वर चढत आम्ही कोकण दरवाजाच्या अलीकडे असणाऱ्या पाण्याच्या टाक्यापाशी थोडावेळ विसावलो, टाकं ही अलीकडेच स्वच्छ केल्यासारखं दिसत होतं. तिथे थोडा वेळ थांबून, हत्तीमाळ बुरुज उजव्या हाताला ठेवत, भव्य अशा कोकण दरवाजाकडे गेलो, प्रथम पायऱ्या चढून दरवाजावर गेलो. दरवाजावरती बुरुजाचे बांधकाम, खाली प्रशस्त खोल्या असाव्यात अशा बांधकामाच्या खुणा, बुधला माचीकडे जाण्यासाठीच्या रस्त्याला नव्वद अंशाच्या कोनात, दोन बुरुजांमध्ये लपवून, तटबंदीकडे तोंड करून बांधलेला भव्य कोकण दरवाजा, दरवाजावरून दिसणारी धुक्यात बुडालेली बुधला माचीकडे जाणारी वाट, पुन्हा एकदा या दुर्गबांधणी कौशल्याने नतमस्तक व्हायला झालं.
T16

धुक्यामुळे समोरचं काहीचं दिसत नव्हतं, पावसाळी डोंगर भटकंतीची एक न्यून बाजू म्हणजे डोंगरावरून खालचा नजारा, परिसर पाहता न येणे, पावसामुळे, धुक्यामुळे छायाचित्र काढता न येणे, पण गच्च धुक्यातून वाट काढत चालणे ह्या एका अनुभवाकरता तेवढं बलिदान द्यायला निदान आमची तरी काहीचं हरकत नसते.

T15

इथून, कोकण दरवाजाने उतरून आम्ही बुधला माचीकडे गेलो, रेलिंग्ज इथे ही होते, त्यामुळे विशेष अडचण झाली नाही, साधारण दहा मिनिटात आम्ही माचीच्या बुरुजावर होतो. बुरुजाला संरक्षक भिंत वा रेलिंग्ज ही नव्हते, प्रसिद्ध बुधल्याचा आकार पाहायला पुढे जाऊन खाली वाकून पाहावे लागते, खाली दरीत पसरलेल्या धुक्याच्या समुद्रात पुढे मार्गक्रमण करणाऱ्या जहाजाच्या नाकाप्रमाणे बुधला आपल्याला या ठिकाणावरून भासतो. अप्रतिम बांधकाम कौशल्याचा नमुना आहे बुधला माचीवरचं हे बांधकाम. अगदी तोंडात बोटं घालायला लावणार व त्याकाळी हे कसं जमवलं असेल या विचाराचा भुंगा डोक्यात सोडून पोखरणारं....बुधला माची वरूनच पुढे जाऊन नंतर डाव्या हाताला वळण घेत राजगडाकडे जाणारी वाट आहे, या वाटेवर राजगड साधारणपणे पंधरा किलोमीटरवर आहे.

T17

पुन्हा मागे फिरून, कोकण दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश केला, उजव्या हाताच्या तटबंदीची वाट पुन्हा एकदा पकडून चढाई सुरू केली. तसं पाहता, किल्ल्यावरील सर्वात उंच व प्रशस्त ठिकाण म्हणजे बालेकिल्ला होय. बालेकिल्ल्यावर अनेक वास्तू आहेत. पण दृष्यमानता खुपचं कमी असल्यामुळे अगदी जवळ गेल्याशिवाय वास्तूंचं अस्तित्व कळून येत नव्हतं. बहुतांश वास्तू या जीर्णोद्धारानंतर ही केवळ तग धरून उभ्या अशा अवस्थेत आहेत. बालेकिल्ल्यावरील तटबंदी मात्र चांगल्या स्थितीत आहे.

बालेकिल्ल्यावर जीर्णोद्धारीत तोरणेश्वर मंदिर दगडी चौथऱ्यावर मजबुतीने उभे आहे. मंदिरात भगवान महादेवाची पिंड आहे. या मंदिराच्या थोडं पुढे नव्वद अंशाच्या कोनात समोर तोंड करून गडदेवता मेंगाई देवीचे मंदीर आहे. हे ही मंदिर जिर्णोध्दारीत आहे, दोन्ही मंदिरांना पत्र्याचे छप्पर घालण्यात आले आहे. मेंगाई देवी मंदिर राहण्यायोग्य आहे पण पावसाळ्यातील गळती आणि दर्शनासाठी येणारे भटके यांच्यामुळे आतमध्ये पुर्ण ओल होती, पावसाळ्यात इथे मुक्काम थोडा गैरसोयीचाचं ठरेल.

T18

मंदिराच्या समोर, जोती शिल्लक असलेलं बांधकाम दिसतं, कदाचित गडकऱ्याचा वाडा असावा बहुतेक, तिथं तशी काही पाटी मात्र दिसली नाही. मुख्य दोन-तीन बुरुज सोडले तर इतर बुरुजांवरही नावाच्या पाट्या दिसल्या नाहीत, असो....

तोरणेश्वर मंदिराच्या पुढे दोन मिनिटे चालत, जिर्णोध्दारीत पण छप्पर उडून गेलेली सदर आहे. लांबीला अवाढव्य पण रुंदीला अगदीच जेमतेम असं पडवी, सोपा, माजघर अशा स्वरूपाच वाटावं असं दगडी बांधकाम. तोरण्यावर राज्य करणाऱ्या वाऱ्याला जिर्णोध्दारीत सदर आणि इतर काही बांधकामांवर ठिगळासारखे लावलेले पत्र्यांचे छप्पर काही पसंत पडलेले दिसत नाही, एकजात सर्व पत्रे त्याने उडवून लावलेत. असे असले तरी "सदर" ही वास्तू नजरेत भरण्यासारखी आहे हे मात्र खरं !!
T19

सदरेकडे तोंड करून उजव्या बाजूला खाली चालून गेल्यास एक पाण्याचे तळे लागते. संपुर्ण बालेकिल्ला विस्तीर्ण आहे, त्याची पूर्ण तटबंदी ताशीव कड्यांनी भक्कम करून बांधली आहे.

सदरेकडे पाठ करून समोर पाहिल्यास, थोडासा उजव्या हाताला हनुमान तथा झुंजार बुरुज दिसतो. चढून जायला पायऱ्या, मजबुत बांधकाम, प्रशस्त जागा व समोर दिसणारा धुक्याचा समुद्र, बालेकिल्ल्याच्या तटबंदीतून, बालेकिल्ल्यावर लावलेल्या भल्यामोठ्या ध्वजस्तंभाच्या अगदी मागून जवळपास नव्वद अंशांच्या कोनात लावलेल्या लोखंडी शिडीमार्गे एक अत्यंत अवघड वाट आपल्याला झुंजार माचीकडे घेऊन जाते. भगवी गांधीटोपी घातलेल्या भटक्यांच्या एका तुकडीचा शिडीला पडलेला गराडा, खाली ही त्यांचीच गर्दी, व झुंजार माचीकडे जाण्यास प्रतीक्षेत असलेले इतर भटक्यांचे गट हा सगळा रागरंग पाहता जड मनाने आम्ही झुंजार माचीकडे जायचा बेत रद्द केला.

T20

तशी ही झुंजार माची पुर्वी पाहिल्याप्रमाणे, नागमोडी बांधकामाद्वारे तासलेले कडे व शेवटाला एकदम डोंगराच्या धारेवर दोन टप्प्यांत उंचावून केलेले चिलखती बुरुजांचे भक्कम बांधकाम अशी अतिशय सुंदर आहे पण गडावरून झुंजार माचीकडे जायची वाट थोडी अवघड आहे, लोक वेळ घेऊन उतरतात त्यामुळे गर्दी तुंबत जाते शिवाय बालेकिल्ल्यावरून वा झुंजार बुरुजावरून धुक्यामुळे माचीचे निव्वळ दुरून दर्शन ही दुरापास्त, त्यामुळे तिथूनच झुंजार माचीचा निरोप घेऊन उर्वरित गडफेरीकडे मोर्चा वळवावा लागला.... असो...

t21

पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने, इथून तटबंदीचा मार्ग सोडून, पुन्हा, सदर डाव्या हाताला ठेवत खाली उतरणाऱ्या पायवाटेवर चालू लागलो. काही अंतर गेल्यावर, डाव्या हाताला धुक्यात एक मोठं बांधकाम व त्याच्या बाजूलाच एक मोठं टाकं नजरेस पडलं. थोडासा चढ चालून जवळ गेलो, ते खोकड टाकं होतं, बऱ्यापैकी मोठं व अगदी नितळ निळ्या पाण्याने ते काठोकाठ भरलेलं होतं. त्याच्या बाजूला उंच जोत्यावर एक जिर्णोध्दारीत बांधकाम उभं होतं, त्याचे ही छप्पर गायब होतं, आतमध्ये डोंगर भटके मुक्कामी राहिल्याचा खुणा होत्या. मागे एक पडवीवजा जागा होती. हे बांधकाम पाहून पुन्हा खाली उतरून दोनच मिनिटांत पुन्हा कोठी दरवाजाच्या समोर पोहोचलो. या ठिकाणी आमची गडफेरी पुर्ण झाली.

T22

१६८९ साली, औरंगजेबाच्या हातमखान नावाच्या सरदाराने लाच खाऊ घालून तोरणा ताब्यात घेतला होता व फुशारकीने किल्ला लढाई करून जिंकला असे औरंगजेबाला कळवले, औरंगजेबाने खुश होऊन 'किलेदार खान' किताब देत तोरण्याची किल्लेदारी ही त्यालाच सांगितली. तोरण्यावरच्या काहीचं दिवसांच्या वास्तव्याने हातमखान नैराश्यात गेला. हा किल्ला म्हणजे सैतानाची गुहा व इथे भूत-प्रेतांशिवाय कोणी राहूचं शकत नाही असे तो सांगू लागला. शक्य तितक्या लवकर तोरण्यावरून आपली सुटका व्हावी म्हणून देवाची करुणा भाकणारा हातमखान जिवंतपणी तरी तोरणा सोडून जाऊ शकला नाही. किल्ल्यावरील एका चकमकीदरम्यान त्याला मरण आले.

T23

थोडावेळ थांबून, गडाची माती भाळी लावून आम्ही गडाचा निरोप घेत परतीच्या मार्गाला लागलो. कोठी दरवाजा, बिनी दरवाजा उतरून खाली धबधब्यापाशी आलो. धबधबा गर्दीने फुलून गेला होता. तिथे अजिबात न थांबता पुढे चालू लागलो. वाटेतील दोन अवघड टप्पे अत्यंत काळजीपूर्वक उतरून खाली सोप्या उतरणीला लागलो.

पाऊस अजूनही जोरात सुरूच होता, दृष्यमानता ही कमीच, इथून पुढे अगदी रमत-गमत गड उतरू लागलो. वाटेत, एका पालामध्ये गरम-गरम चहाचा आस्वाद घ्यायला थोडा वेळ थांबून पुन्हा हळू-हळू उर्वरित गड उतरून पार्किंगपाशी पोहोचलो. नखशिखांत भिजलो होतो, पडत्या पावसातचं गाडी आणि छत्रीच्या आडोशाने कसेबसे कपडे बदलले व गाडी काढली. वेल्ह्यात पोटपूजेला एक थांबा घेत, पुन्हा नसरापूर-कपूरहोळ-सासवड-दिवेघाट मार्गे घर गाठलं.

T24

असा हा गरुडाचं घरटं अशी ओळख सांगणारा, अंगाखांद्यावर फक्त मराठ्यांना खेळू-बागडू देणारा, शत्रूला सैतानासमान भासणारा, बेलाग, बुलंद प्रचंडगड......
वातावरणात, हवेत, मातीत एक वेगळीच मस्ती पांघरून, गर्वित, कडे-बुरुजांच्या साथीने डोंगर भटक्यांना आव्हान देत आजही मजबुतीने उभा आहे. त्याचं आव्हान स्वीकारून त्याच्या भेटीला जाणं हे प्रत्येक गडप्रेमीचं कर्तव्यचं आहे.

प्रतिक्रिया

इकडे डिसेंबरमध्ये २००५ ला गेलेलो. वाटा सुकलेल्या पण त्यावर मोठी गांडूळे ओलावा शोधत होती. देवससाणे आकाशाय स्थिर उडय खाली काही शोधत होते. वरचे देऊळ छान होते. पण पाण्याची सोय दिसली नव्हती.

उत्तम.
( सुरवातीच्या फोटोंत कलर balance गंडलेले वाटत आहे. )

हातमखानाकडून तोरणा घेण्यासाठी कान्होजी झुंजारराव देशमुख, कानद खोरे यांनी यशस्वी प्रयत्न केले. त्यांना लिहिलेले छत्रपती राजाराम महाराजांचे पत्रच राजवाडे खंड २६ याच्यात छापलेले आहे.

श्रीगणेशा's picture

5 Aug 2022 - 5:38 pm | श्रीगणेशा

चित्रदर्शी, ओघवतं वर्णन!

लहानपणी दोन वेळा पाहिला आहे तोरणा किल्ला, साधारण १९९५ च्या आसपास.

झुंजार माचीवर जाण्यासाठी तटबंदीवरुन ९० अंशाची शिडी उतरून खाली उतरावे लागते.

आणि बुधला माचीवर जाण्यासाठी प्रचंड वाऱ्याचा सामना करत कोकण दरवाजातून उजव्या बाजूच्या तटबंदीचा आधार घेत, डावीकडील खोल दरीला न घाबरता जावं लागतं.

दोन्हीही ठिकाणी त्या वेळी तरी जाण्याची हिंमत झाली नाही.

बाकी इतर बऱ्याच किल्ल्यापेक्षा इथे पर्यटकांचा वावर खूप कमी असावा, अजूनही, अशी अपेक्षा आहे.
त्याला एक कारण म्हणजे खूप अवघड चढण, त्यामुळे भविष्यात व्यवस्थित रस्ता होणे अशक्य -- संवर्धनाच्या दृष्टीने चांगलंच आहे म्हणा!

गेल्या एक दोन आठड्यांपूर्वी, गो. नी. दांडेकर यांच्यावरील एक छान माहितीपट पाहण्यात आला, किल्ले पाहिलेला माणूस:
https://youtu.be/qhr4WkhytSA

मुक्त विहारि's picture

8 Aug 2022 - 5:48 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

प्रचेतस's picture

9 Aug 2022 - 9:38 am | प्रचेतस

भन्नाट

क्लिंटन's picture

9 Aug 2022 - 1:44 pm | क्लिंटन

जबरदस्त फोटो आणि लेख. आवडला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Aug 2022 - 1:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त फिरा आणि लिहित राहा. तोरणा एकटा, राजगड एकटा, तोरणा-ते-राजगड आणि राजगड-ते-तोरणा जोड ट्रेक असा सगळा प्रवास आठवला.

गोरगावलेकर's picture

16 Aug 2022 - 3:41 pm | गोरगावलेकर

आपल्या लेखांमुळे अनेक गड -किल्ल्यांची घरबसल्या भ्रमंती झाली