राजधानीची सफर (भाग-३)

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
30 Mar 2022 - 11:52 am

भोपाळ जंक्शनवर गाडी थांबल्यावर मी खाली उतरून जरा फलाटावर रेंगाळलो. इथे आमच्या ‘राजधानी’चे चालक, गार्ड, तपासनीस, पोलीस बदलले गेले. भोपाळ जं.वर नियोजित वेळेच्या दोन मिनिटं आधी दाखल झालेली आमची ‘राजधानी’ सुटली मात्र नियोजित वेळेच्या 4 मिनिटं उशिरा म्हणजे मध्यरात्री 2:09 वाजता.

भोपाळनंतर पाचच मिनिटांनी मोटारगाड्या वाहून नेणारी WAG-9 इंजिन जोडलेली मालगाडी भोपाळच्या दिशेने गेली. आता आमच्या ‘राजधानी’नं पुन्हा एकदा मस्त वेग पकडला होता. आता घड्याळाचे काटे पहाटेचे 3:27 वाजल्याचे दर्शवत होते. आमची ‘राजधानी’ बिना जंक्शन क्रॉस करत असतानाच स्टार्टर सिग्नलजवळ नवी दिल्लीहून आलेली आणि थिरुवनंतरपुरम सेंट्रलकडे निघालेली 12626 केरळ एक्सप्रेस WAP-7 कार्यअश्वाच्या मागोमाग फलाटाकडे जात होती. मग मात्र करोंदा, मोहसा, धोरा, जाखललौन अशी स्थानकं ‘राजधानी’ धडाधड ओलांडत गेली आणि त्या दरम्यान अनेक मेल-एक्सप्रेस आणि मालगाड्याही आम्हाला क्रॉस होत होत्या. इकडे गाडीत अजून शांतताच होती, कारण सगळ्यांची गाढ झोप सुरू होती, कोणाचं घोरणं सुरू होतं, तर कोणी तरी मधूनच चुळबुळ करत होतं.

आता पहाटेचे ठीक 5 वाजले होते आणि आमची ‘राजधानी’ नियोजितवेळेच्या आधीच वीरांगना लक्ष्मीबाई म्हणजेच झाशी जंक्शनवर दाखल झाली होती. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्हा मध्येच मध्य प्रदेशात घुसलेला आहे. वीरांगना लक्ष्मीबाई स्थानकावर आमच्या ‘राजधानी’चे चालक, गार्ड, तपासनीस बदलले गेले. ती अदलाबदल आटोपून ‘राजधानी’ 5:11 ला पुढे निघाली. पुढे ह. निझामुद्दिनकडे निघालेली 12192 श्रीधाम एक्सप्रेस आमच्या ‘राजधानी’साठी तिथे लूप लाईनवर रोखून धरलेली होती.

आता गाडीत पँट्रीवाल्यांची हळुहळू हालचाल सुरू होत होती, तशीच काहींची झोपही हळुहळू उघडू लागली होती. तिकडे खिडकीच्या बाहेर आता उजाडायला सुरुवात झाली होती. ग्वाल्हेरमधून 6:13 वाजता निघाल्यावर पुढे तीनच मिनिटांनी ‘राजधानी’ पुन्हा 3 मिनिटं एकाच जागी थांबून राहिली. ‘राजधानी’च्या प्रवासामधला शेवटचा थांबा आग्रा कँट जंक्शन यायला थोडा वेळ होता. पण आता सकाळचा चहा दिला जात होता. दरम्यान, जशा काही गाड्या आमच्या शेजारून ग्वाल्हेरकडे जात होत्या, तशाच आग्रा, मथुरा, दिल्लीकडे निघालेल्या काही गाड्यांना लूप लाईनवर रोखून धरून आमच्यासाठी मार्ग मोकळा करून दिला जात होता.

चहा झाल्यावर दहाच मिनिटांनी नाश्ताही दिला जाऊ लागला. काही वेळानंतर गंगेचं मैदान सुरू झालं आणि ‘राजधानी’नं पुन्हा उत्तर प्रदेशात प्रवेश केला. आता 7:32 ला ‘राजधानी’नं आग्रा कँट जंक्शन गाठलं होतं. इथं आमचा डबा 80 टक्के मोकळा झाला. काही मिनिटांमध्ये 12002 नवी दिल्ली-रानी कमलापती (हबीबगंज) शताब्दी एक्सप्रेस WAP-5 इंजिनासोबत तिच्या पूर्ण फॉर्ममध्ये, ताशी 150 कि.मी. वेगाने आग्रा कँटकडे गेली. त्याचवेळी आमचा नाश्ता आला – ब्रेड-कटलेट, बटर, सॉस, फ्रूटी आणि चहाचं किट. गरमागरम नाश्त्याचा आस्वाद घेऊन होत असतानाच ‘राजधानी’ मथुरा जंक्शनमध्ये शिरत होती. काही मिनिटं तिथून 12953 मुंबई सेंट्रल-ह. निझामुद्दिन ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी एक्सप्रेस पुढे निघून गेली होती.

आता मथुऱ्यापासून चारपदरी मार्ग सुरू झाला होता. पण पुढे ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी असल्यामुळे आमच्या ‘राजधानी’चा वेग मधूनमधून कमी होत होता. त्यातच मध्येमध्ये जिथे Road under Bridge चं काम सुरू होतं, तिथेही ताशी 20 कि.मी. इतक्या कमी वेगानं जावं लागत होतं. आता आमच्या नाश्त्यानंतरच्या चहासाठी थर्मासमधून गरम पाणी आले. आता गतिमान एक्सप्रेस बघायची होती. ताशी 160 कि.मी. वेगानं धावणारी ही गाडी WAP-5 इंजिनासह काही सेकंदातच शेजारून निघून गेली. त्यानंतर अशा अनेक मेल/एक्सप्रेस आणि मालगाड्यांना क्रॉस करत किंवा ओलांडत आमची ‘राजधानी’ हजरत निझामुद्दिनच्या दिशेने निघाली होती आणि आम्ही चहा घ्यायला सुरुवात केली. आता पलवल-दिल्लीदरम्यान धावणाऱ्या मेमूही दिसू लागल्या होत्या. इकडे गाडीत हळुहळू सगळ्यांची आवराआवर सुरू झाली होती.

9:31 ला तुघलकाबाद ओलांडत असताना दिल्लीकडून आलेली एक मेमू फलाटावर विसावत होती. त्यामुळे तिच्या मागे असलेली हिरव्यागार रंगातील WAG-9 इंजिनाची BOST वाघिण्यांची मालगाडी होम सिग्नलला वाट पाहत उभी होती, तर दुसरी मालगाडी तुघलकाबादहून बाहेर पडण्यासाठी स्टार्टर सिग्नल मिळण्याची वाट बघत पलीकडच्या तिसऱ्या मार्गावर उभी होती. तुघलकाबादनंतर ‘राजधानी’ थांबत-थांबत पुढे जाऊ लागली. अखेर 9:46 ला मधल्या सिग्नलजवळ आमची ‘राजधानी’ मिनिटभर थांबली, कारण पुढेच असलेली ऑगस्ट क्रांती तेजस एक्सप्रेस. त्यानंतरही हळुहळू पुढे सरकत शेवटी आमची ‘राजधानी’ 5 मिनिटं उशिरा हजरत निझामुद्दिनच्या 2 नंबरच्या फलाटावर जाऊन थांबली आणि आम्ही अगदी समाधानानं गाडीतून उतरलो. एकूण प्रवास मस्तच झाला!

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/3.html

भाग-1
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/1.html

भाग-2
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/2.html

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 Mar 2022 - 9:03 pm | कंजूस

गाड्या आणि स्टेशने पाहायला रात्री जागे राहिलात की काय?

पराग१२२६३'s picture

30 Mar 2022 - 10:37 pm | पराग१२२६३

मी प्रवास कायमच असा जागून करतो.

कंजूस's picture

31 Mar 2022 - 5:16 am | कंजूस

जागे राहण्याने दुसरा दिवस वाईट जातो.

सौंदाळा's picture

31 Mar 2022 - 10:51 am | सौंदाळा

मस्तच लिहिले आहे.
प्रवासात जागायला मला पण खूप मजा येते.

रात्रीचे चांदणे's picture

31 Mar 2022 - 11:03 am | रात्रीचे चांदणे

स्टेशन वर उभा राहिलेली, उलट्या दिशेने गेलेली गाडी कशी काय ओळखू येते?

पराग१२२६३'s picture

31 Mar 2022 - 8:26 pm | पराग१२२६३

गाड्यांच्या वेळापत्रकाची माहिती असल्यास स्टेशनवर उभ्या असलेल्या आणि क्रॉस होणाऱ्या गाड्या ओळखता येऊ शकतात.

कंजूस's picture

1 Apr 2022 - 6:36 am | कंजूस

१) NTES हे रेल्वेचे app आहे त्यात 'live station' आणि 'spot my train' हे दाखवते.
२) Railyatri app
यामध्ये express train schedule मध्ये न थांबणारी स्टेशनेही दिसतात.
३) इतर train status दाखवणारी apps
कोणतीही ट्रेन आता कुठे आहे ते दिसते. ट्रेन टाइम टेबलप्रमाणे जात नसते. मागेही असते. ती कुठे ते दिसते.

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2022 - 5:59 pm | चौथा कोनाडा

छान रेल वृतांत !

मी प्रवासात रात्री जागा रहातो, गाड्या व स्टेशने बघायला जागे रहाता काय? रात्री जागे रहाण्याने दुसरा दिवस खराब जातो, वाचून मस्त मजा आली असे प्रश्र्न असे लेखक व अशी उत्तरे . वा, वा बहुत मजा आया , बहुत हसूही आले असे लोक, अशी प्रश्र्नोत्तरे व भांडखोरपणा किंवा असे वादविवाद किती ही कुरघोड्य एकमेंकावर करण्याची होस व शब्द पडू न देण्याची मराठी माणसाची हौस अशी हौस सर्वानी एकजूट ठेवून दूसरे परप्रतियांशी भांडताना ठेवूया. म्हणजे परप्रांतिय शत्रू नव्हेत पण कधिकधि फारच माजून कुरघोड्या करायला लागतात आपल्य महाराष्टात आपल्या शहरात येउन तेव्हा त्यांची जागा दाखविलीच पाहिजे. तसेच परदेशी जेव्हा sightseeing करायला येतात तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखविलीच पाहिजे कारण मी स्वता तसा आनुभव घेतलाय, भारत अजूनही पारतंत्र्यात आहे वत्यांची सत्ता आपल्यावर अजूनही आहे अशा आवेशात अजूनही वागतात ,त्रास होतो तो याच गोष्टीचा. आमच्यृ जवळ बसायचे नाही दोघे मिळून लागत नसेल तरी सर्व जागा आमचीच असे train प्रवासात वागणे कििंवा boating करताना किती वेळ ट्रंन अथवा बोटिंग करणार होतो जेमतेम 2/4 तास ट्रेन व अर्धा तास बोटिंग इतकेच करणार होतो पण त्यांचा आव आम्ही अजूनही तुमच्यावर राज्य करतो व तुम्ही आमच्या पारतंत्र्यात 1990 ला पण केरळ बोटिंग करताना हा अनुभव, स्वतंत्र भारतात जन्मलेली मी मुळीच हे चालवून घेणारी नाही मी मराठी ,हिदीत भांडून मला बसायला, photos काढायला जागा घेतलीच करून.

हे काय प्रकरण आहे? आणि केरळ बोटींगमध्ये काय घडलं वाचायला आवडेल. इथे अवांतर होत असेल तर खरडवहीत टाका.

चौथा कोनाडा's picture

25 Apr 2022 - 5:00 pm | चौथा कोनाडा

त्यापेक्षा वेगळाच धागा काढावा, सर्वांनाच सावध होता येईल

जेम्स वांड's picture

25 Apr 2022 - 8:11 am | जेम्स वांड

तुमचे रेल्वेचे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण लेखन वाचायला आवडते, पण एक अजिबात कळले नाही, भाग १ मिपावर, भाग २ साठी ब्लॉगची लिंक अन भाग ३ पुन्हा मिपावर ? मग भाग २च का नाही मिपावर ? वाचताना रसभंग होतो अश्याने असे मला तरी वाटते.

sunil kachure's picture

25 Apr 2022 - 1:00 pm | sunil kachure

देशातील इतर भागात अतिशय उत्तम,निसर्ग रम्य,स्वच्छ,सुंदर शहर ,ठिकाणे असताना तुम्ही दिल्ली मध्ये कशाला गेला असाल.
????