दोन पैश्याचं ऊन !

Primary tabs

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
3 Feb 2022 - 12:25 pm

सीन १:

मुंबईतला पावसाळी दिवस, धो धो पाऊस कोसळतोय. तो पावसात चिंब भिजून आंतर्बाह्य निथळतोय ! समोर काही सेकंद थांबलेल्या टॅक्सीचे दार उघडून तो आत घुसतो. टॅक्सीत एक तरुणी आधीच बसलीय. ती त्याला उतरायला सांगतेय. धो धो पावसामुळे तो टॅक्सीतच थांबायचे आहे. तिला वाटतेय हा आपला "ग्राहक" म्हणून बसू इच्छितो !
"मी रस्त्यात एके ठिकाणी थांबणार आहे, अर्धा तास लागेल."
पुढच्या दृष्यात ती एका फ्लॅटची बेल दाबते, फ्लॅटवाला दरवाजा उघडतो. ती थेट त्याच्या बेडवर जाऊन बसते.
"कॉण्डोम लाया ना? " सॅण्डल काढता-काढता तिचा प्रश्न.
"मी काय पैसे देत नसतो का?" तो. त्यानं कॉण्डोम आणलेला नाहीय हे ती ओळखते.
"तुला शंभर वेळा सांगितलंय, कॉण्डोमशिवाय माझं जमत नाही" पर्स मधून कॉण्डोम काढून त्याच्या समोर फेकत ती म्हणते.
"हे मस्तच झालं, पाऊस आहे आणि रेनकोट नाही योग्य नाही नई का ? तो हसत हसत म्हणतो !

dpfm001

हा फ्लॅटवाला तिचा नेहमीचा ग्राहक. ती त्याची शैय्यासोबत करायला पुढे सरसावते.
तो पर्यंत तो धो-धो पावसात टॅक्सीत बसून आहे, टॅक्सीड्रायव्हरशी गप्पा मारत. त्याच्याशी बोलून तो कवि-बिवी असल्यांच लक्षात येतंय.
ती फ्लॅटवाल्याचं काम उरकून टॅक्सीत परतलीय.
"करायला जागा आहे ना ?” तिचा त्याला प्रश्न.
"आतापर्यंत तरी होती, आता शोधावी लागेल" तो.
तिचं घर आल्यावर ती त्याला खाली उतरवून देते ... कारण तो कफल्लक असल्याचं तिच्या लक्षात आलंय.

कट टू :

२०१७ सालाचा जून महिना असेल, माझा यवतमाळचा हरहुन्नरी कलाकार मित्र जयू (जयंत कर्णिक) पुण्यात आला होता. आजकाल बिझी झाल्यामुळे त्याचं पुण्यात येणं तसं दुर्मिळ झालं होतं. तो पुण्याच्या एका टोकाला आणि मी दुसऱ्या टोकाला. भेटायचं असेल तर खुप प्लांनिंग करून भेटावं लागायचं. आम्ही दोघे एकत्र आलो सिनेमा, नाटक बघत मजा करायचो. एक दिवस पेपरला अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या "द मॅड तिबेटीयन" या मराठी पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नॅशनल फिल्म अर्काईव्हज (NFAI) असल्याचं कळलं. आम्हा दोघांनाही ही जागा भेटायला गप्पा मारायला सोयीची होती. आणि दीप्ती यांना नवल ऐकण्याची सुवर्ण संधी देखील !
dpfm002

आम्ही धडपडत नॅशनल फिल्म अर्काईव्हज कसेबसे वेळेत पोहाचलो. चप्पल बाहेर काढूनच त्या हॉलमध्ये जाता येते (ही तिथली खासियत आहे) बाहेर असलेला चप्पल बुटांचा खच पाहून चोखंदळ रसिक पुणेकरांनी गर्दी केली होती, त्या पॉश एसी हॉलमध्ये गेल्यावर हाऊसफुल्ल असल्याचं लक्षात आलं. बरेचसे लोक उभे होते. काही पायऱ्यांवर बसण्याचा प्रयत्न करत होते, पण परवानगी नसल्यामुळे संयोजक पायऱ्यांवर बसायला मनाई करत होते. रसिक पुणेकरांच्या आग्रहामुळे त्यांना परवानगी द्यावी लागलीच.

dpfm003

दीप्ती नवल यांचं ‘द मॅड तिबेटीयन” हा मुळ कथासंग्रह, त्याचा अनुवाद, पुस्तकातल्या माणसांचे अनुभव, त्यांचे विश्व याबद्दल भाषणं झाली. मग मुलाखतीचा सुंदर कार्यक्रम सुरु झाला. अमृता सुभाष सारखी अभिनेत्री मुलाखतकार म्हटल्यावर मुलाखत उत्तरोत्तर बहरत गेली ! रसिक या कार्यक्रमात रंगून गेले होते ! ८:३० - ९ वाजायला आले होतेच. कार्यक्रम संपला असं जाहीर करताना संयोजकांनी जाहीर केलं "आता अर्ध्याच तासानंतर दीप्ती नवल यांनी दिग्दर्शित केलेला "दो पैसे की धूप, चार आने की बारीश" हा सिनेमा दाखवण्यात येईल !
dpfm004

अरेच्या, हा कुठला सिनेमा ? "दो पैसे की धूप, चार आने की बारीश" हे असलं कसलं छटाक नाव ? कधी ऐकलं, वाचलं नव्हतं ! दीप्ती नवल अभिनेत्री, चित्रकार, लेखक, कवयत्री आहेत हे माहीत होतं, पण दिग्दर्शक देखील ? आमची उत्सुकता चाळवली. वेळेची कमतरता आहे तरी हा सिनेमा बघायचाच हे माझं आणि जयूचं एकमत झालं. त्या मध्यंतरात चहावडा असं इंधन पोटात भरून आम्ही सभागृहात परतलो. आता बसलायला लगेच जागा मिळाली. आमच्या सारखे काही उत्सुक होतेच. स्टेजचं रूपांतर रुपेरी पडद्यात झालं आणि " दोन पैश्याचं ऊन, चार आण्याचा पाऊस" चं कॉम्पुटर प्रोजेक्शन सुरु झालं. सुरुवातीच्या पावसाच्या दृष्यानी, लाईट इफ्फेक्ट्स यांनी उत्सुकता निर्माण केली ! वर वर्णन केलेला सीन सिनेमाच्या सुरुवातीचा आहे. साधारण आर्ट फिल्म सारखं टेकिंग असलेला सिनेमा. अगदी भारून टाकलं नाही तरी कहाणी पुढे पाहत राहावी असं वाटलं. किंचितसा संथ असून देखील सिनेमा आवडत गेला ! सिनेमा लक्षात राहिला. किती दिवस या सिनेमावर लिहीन लिहीन म्हणत होतो, पण आज मुहूर्त लागला !

सीन २:

ती म्हणजे जुही (मनीषा कोईराला) ही वय वाढत चालली वेश्या, देहविक्रयावर तिचा उदरनिर्वाह चालतो. घरी १०-१२ वर्षाचा, , मुका मुलगा काकू (सनाज नवल; अतिशय नितळ, प्रांजळ दिसणारा आणि उत्तम अभिनय करून जाणारा हा मुलगा दीप्ती नवल यांचा भाचा ) याचा सांभाळत करता करता तिची प्रचंड तारांबळ होतेय. एखादं गिऱ्हाईकं घरी आलं आणखी कुचंबणा. वाढत्या वयामुळे तिची गिऱ्हाईकं कमी होतायत. आता ती म्हातारी होत चाललीय,

dpfm005

गिऱ्हाईकांना आता "गुड क्वालिटी ऍट लो कॉस्ट" असा “फ्रेश माल” हवाय, ती हतबल झालीय. मुलावर राग काढतेय. तो देबू (रजित कपूर) असा अचानक भेटलाय. तो मुंबईत सिनेमाचा गीतकार व्हायला आलाय. त्याच्या पदरीही अपयशच लिहिलेलं. पैश्याच्या अभावी तो तिचं घरकाम आणि मुलाचं काम देखील करायला तयार आहे !
ती राजी होते आणि तो तिच्याकडे राहायला येतो. हे तीन अभागी जीव एकत्र येतात. त्यांचं एकमेकांशी जमत का ? की सारखे खटके उडत राहतात ? त्या मुलाचं काय होतं ? हा नवीन आलेला पाहुणा त्याला रुचतो का ? ती वेश्या, तो कवि, बेडमध्ये दोघचं सुरळीत होतं का ? काय काय गैरसमज होतात ? काय समस्या असतात ? काय उपाय सापडतात ? सिनेमाचं नांव त्या तिघांच्या कहाणीला कसं रिलेट करतं ?

dpfm006

यासाठी हा सिनेमा बघायला हवा !

कट टू :

सौदागर, १९४२ लव्ह स्टोरी, बॉंबे, दिलसे, अकेले हम अकेले तुम सारख्या सिनेमा मधून स्वतःच सौंदर्य झळकवत प्रेक्षकांच्या मनात स्थान काबीज करणाऱ्या मनीषा कोईरालाला असं १०-१२ वर्षानंतर असं अचानक पाहणं किंचित धक्कादायक होतं. तिच्या रूपाचं चांदणं ढळताना पाहून मला कसंनुसं झालं. सौदागर मधून "इलुइलु गर्ल" म्हणून लक्ष वेधून घेत नंतर अग्नीसाक्षी, खामोशी, लज्जामधून तिनं तिच्या अभिनय क्षमतेचं नाणं खणखणीत वाजवलं होतं ! "इलुइलु गर्ल" मनीषा कोईराला "धकधक" गर्लला मागे टाकणार अशी चर्चा सुरु झाली. पण अचानक प्रमुख भूमिकांमधून गायब होऊन तिनं फिल्म मेकिंगच्या डिप्लोमा कोर्ससाठी अमेरिकेचा रास्ता धरला. काही कामं देखील केली. मग लग्न आणि नंतर कॅन्सरमुळे ती नाहीशी झाल्यासारखी झाली ! "दो पैसे की धूप" मध्ये अतिशय सुंदर काम केलंय तिनं. समरसून. जोडीला रजित कपूरसारखा चोखंदळ भूमिका करणारा सह-कलाकार असला की विचारायला नको. बाकी सनाज नवल, मकरंद देशपांडे, राजेंद्र गुप्ता, मिलिंद सोमण इ कलाकार त्यांच्या छोट्या भूमिका समर्थपणे पार पाडून जातात ! पाऊस आणि छाया-प्रकाश यांचा सुंदर खेळ विषयाला साथ देत आपल्यी उत्सुकता जपत राहतो. डार्क फ्रेमस खुप परिणामकारक आहेत. बजेटमुळे सिनेमाचं बरंचसं शूटिंग मुंबईत खरोखरच्या पावसात केलंय ! सिनेमात हा पाऊस वेळोवेळी भेटत राहतो.

dpfm007

हा "दो पैसे की धूप, चार आने की बारीश" सिनेमा २००९ लाच तयार झाला, त्याच वर्षी कान फिल्म फेस्टिवलला स्क्रिनिंग झालं ! आणखी काही फेस्टिवल्स मध्ये स्क्रिनिंग होऊन थोडंफार कौतुकही याच्या वाट्याला आलं. २०१० ला न्यूयॉर्कच्या मिऍक फिल्म फेस्टिवल मध्ये "बेस्ट स्क्रीनप्लेचं" अवार्ड देखील या सिनेमाला मिळालं ! सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित करायचा ठरला पण थिएटर्स मध्ये प्रदर्शित होण्याचं भाग्य यांच्या नशिबी नव्हतं ! सिनेमा तयार झाल्यानंतर ७-८ वर्षांनी म्हणजे २०१७ ला बघण्याचा योग अचानकपणे येणं हे माझ्यासाठी भारीच सुंदर म्हणावं लागेल !
"दो पैसेकी धूप, चार आनेकी बारीश" दीडदोन वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आणि नुकताच यूट्यूबवर देखील उपलब्ध झालाय. दोन्हीकडे उत्तम प्रतिसाद मिळतोय !

dpfm009

अमृतसर पंजाब येथे जन्मलेल्या दीप्तीने चित्रकार व्हावे वडिलांची इच्छा होती. अमेरिकेत फाईन आर्ट्सचे शिक्षण घेत असताना अभिनयात रुची निर्माण झाली. १९७८ मध्ये आलेल्या ‘जुनून’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नंतर १९८१ मध्ये आलेल्या 'चश्मे बद्दूर' या चित्रपटात "'मिस चमको" ही भूमिका रसिकांना बेहद्द आवडली. फारुख शेख सोबत तिची जोडी जमली आणि दोघांचे ‘कथा’ ‘साथ-साथ’ का रसिकांनी मोठी पसंती दिली ! पुढे 'एक बार फिर', कमला, दामूल, ‘हम पांच’, ‘अंगूर’ ‘मिर्च मसाला’ ‘लीला 'अनकही', 'बावंदर,' लीला, 'फिराक' अशा अनेक चित्रपटात तिने भूमिका केल्या.
मुळात चित्रकार असल्यामुळे तिचे पेंटिंग्ज करणे सुरु होते. अनेक चित्र प्रदर्शने होऊन तिची पेंटिंग्जही खूप वाखाणली गेली. तिच्यात एक संवेदनशील कवयित्री देखील दडलेली होती. तिचे 'लम्हा-लम्हा' 'ब्लैक विंड एंड अदर पोयम्स' सारखे कविता संग्रह प्रकाशित झाले. २०११ मध्ये तिचा 'द मैड तिब्बन स्टोरीज फ्रॉम देन एंड नाउ' हा लघुकथा संग्रह प्रकाशित झाला, ज्याचा मराठी अनुवाद देखील प्रकाशित झाला ज्याच्या धाग्याच्या सुरुवातीस उल्लेख आला आहे.

dpfm007

आज या प्रतिभावान अभिनेत्रीचा वाढदिवस (३ फेब्रु १९५२) ! हॅप्पी बर्थडे " मिस चमको दीप्ती नवल !

कलाशुभेच्छा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

3 Feb 2022 - 12:43 pm | कुमार१

सर्व परिचय आवडले.

एका चांगल्या चित्रपटाची ओळख करुन दिलीत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Feb 2022 - 2:36 pm | ज्ञानोबाचे पैजार

या सिनेमा बद्द्ल माहित नव्हते. सिनेमा पाहिला पाहिजे,

दिप्ती चांगली अभिनेत्री आहे, नाना पाटेकर आणि तीचा सुर्योदय नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात दोघांनीही अप्रतिम काम केले होते.

पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2022 - 5:47 pm | चौथा कोनाडा

सुर्योदय पाहिला नव्हता त्यावेळी. या सिनेमाचे दिग्दर्शन त्यावेळी गगनविहारी बोराटे या एका़ंकिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या युवक दिग्दर्शकाने केल्याचे चांगलेच आठवतेय. आर्ट फिल्म्स मधली स्टार कास्ट असल्याने सिनेमाने मोठे लक्ष वेधून घेतले होते.
यू ट्युब वर आहे. येत्या विकांताला बघता येईल.

एका फिल्मी साईटवर लिहिलेली एक विशेष उल्लेखनीय गोष्ट :
दिप्ती नवलने काम केलेला पहिला मराठी चित्रपट.
कोलकत्त्यास भरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘पॅनोरमा’ विभागात ‘सूर्योदय’ दाखविला गेला. त्यावेळी नाना पाटेकर याने अत्यंत आवर्जून बंगाली शहरात पत्रकार परिषदेत मराठीत उत्तरे दिली.

याच सिनेमा दरम्यान नाना पाटेकर दिप्ती नवलच्या प्रेमात होते असे बोलले जाते.

दीप्ती नवल खूप चांगली अभिनेत्री आहेच. कविता, चित्रकारी आणि इतर कालांब्द्द्ल विशेष माहिती नव्हती . हा चित्रपट आता बघणे आले.

दिप्ती नवल बद्द्ल पण छान लिहीले आहे. येऊ द्या अजुन अशा काही हटके चित्रपटांबद्द्ल.

सौन्दर्य's picture

4 Feb 2022 - 12:28 am | सौन्दर्य

दीप्ती नवलचा निरागस अभिनय पाहायचा असेल तर 'अनकही' हा चित्रपट आवर्जून पहा. ह्यात तिने एका मतिमंद मुलीची भूमिका केली आहे. मला वाटते हा चित्रपट अमोल पालेकरनी दिग्दर्शित केला होता. ह्यातील आशा भोसलेंच्या आवाजातील सर्व गाणी फारच श्रवणीय आहेत.

प्रचेतस's picture

4 Feb 2022 - 7:10 am | प्रचेतस

सुरेख परिचय आणि सहजसुंदर लेखनशैली.
आपण नेहमी लिहीत नाहीत ही तक्रार आहे.

सौंदाळा's picture

4 Feb 2022 - 10:57 am | सौंदाळा

हेच म्हणतो

चौथा कोनाडा's picture

14 Feb 2022 - 5:31 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद _/\_
प्रचेतस आणी सौंदाळा

😊

Bhakti's picture

4 Feb 2022 - 8:24 am | Bhakti

सुरेख लेख!
प्रतिभावंत अभिनेत्रीचे माहिती नसलेले पैलू समजले.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Feb 2022 - 9:44 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान परिचय.

रुपी's picture

4 Feb 2022 - 11:42 am | रुपी

मस्तच...
खूपच सुंदर लिहिलं आहे.

नगरी's picture

4 Feb 2022 - 2:16 pm | नगरी

वाचन खुणा मध्ये टाकले!

कंजूस's picture

4 Feb 2022 - 4:23 pm | कंजूस

पण सिनेमातलं काही वेळा काही कळत नाही.
असो.

चौथा कोनाडा's picture

11 Feb 2022 - 12:59 pm | चौथा कोनाडा

मला ही या सिनेमात एक रिक्षावाला त्याच्या रिक्षात पिवळे फुगे भरून पावसात फिरताना दिसतो तो संदर्भ समजला नाही.
नंतर दिप्ती नवलच्या एका मुलाखतीत ते "पिवळे फुगे हे आपल्या आशा आणि स्वप्नांचे प्रतिक म्हणुन दखवले आहेत" असे वाचले.

मदनबाण's picture

4 Feb 2022 - 7:32 pm | मदनबाण

सुरेख परिचय. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Raja Ko Rani Se Pyar Ho Gaya... :- Akele Hum Aklee Tum

कासव's picture

5 Feb 2022 - 1:06 am | कासव

तुमचा लेख वाचला. हातात वेळ पण होता म्हणाले चला बघुया तरी कसा आहे तो. आवडला...
कॅमेरा. ॲक्शन सर्व काही सुरेख.

श्रीगणेशा's picture

5 Feb 2022 - 1:35 am | श्रीगणेशा

खूप छान लिहिलं आहे. फोटो ही छान निवडले आहेत.
इतर मिपाकर म्हणतात त्याप्रमाणे तुमच्याकडून अजून वाचायला आवडेल _/\_

सिरुसेरि's picture

5 Feb 2022 - 6:05 pm | सिरुसेरि

सुरेख ओळख . असाच एक राहुल बोस आणी करीना कपुर यांचा ऑफबीट पठडीतला चित्रपट गाजला होता .

सुरिया's picture

5 Feb 2022 - 9:30 pm | सुरिया

असाच एक राहुल बोस आणी करीना कपुर यांचा ऑफबीट पठडीतला चित्रपट गाजला होता .
हो हो, ती मनिष मल्होत्रा डिझाइन्ड साडी आणि ब्लाऊज घालून मान वेळावू वेळावू अ‍ॅक्टिंग्चा प्रेत्न करणारी करीनारुपी चमेली पाहून आमच्या मजनू झकासभायची चमेली रुपी अमृता जास्त आवडली होती हे जाणवले. जागे रे मन मेरा, भागे रे मन मेरा गाणे मात्र चांगले होते.

निनाद's picture

6 Feb 2022 - 11:43 am | निनाद

चमेली की शादी!
कसला मस्त सिनेमा होता तो.
कोयलेवाले की बेटी!

मुक्त विहारि's picture

6 Feb 2022 - 1:07 am | मुक्त विहारि

चित्रपट अंगावर येईल असे वाटते

त्यामुळे, बघणार नाही....

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2022 - 5:30 pm | चौथा कोनाडा

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार !

🙏

स्मिताके's picture

8 Feb 2022 - 10:11 pm | स्मिताके

वर सर्वांनी म्हटलं आहे तसंच म्हणते..आणखी चित्रपटांविषयी लिहा.

चौथा कोनाडा's picture

11 Feb 2022 - 12:44 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद स्मिताके !

टर्मीनेटर's picture

11 Feb 2022 - 1:07 pm | टर्मीनेटर

उत्तम परिचय 👍
दीप्ती नवल ह्यांचे काही अज्ञात पैलू समजले!

चौथा कोनाडा's picture

14 Feb 2022 - 5:22 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद टर्मीनेटर _/\_

अभिजीत अवलिया's picture

13 Feb 2022 - 7:44 am | अभिजीत अवलिया

फार सुरेख लिखाण.

चौथा कोनाडा's picture

14 Feb 2022 - 5:23 pm | चौथा कोनाडा

अभिजीत अवलिया, धन्यवाद _/\_