प्रभावी भाषणासाठी...

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
20 Dec 2021 - 9:29 am

आपल्यातील काही जणांवर आपले व्यवसाय वगळता सार्वजनिक मंचावर छोटेमोठे भाषण देण्याचा प्रसंग कधीतरी येतो. अशा प्रसंगांमध्ये कौटुंबिक मेळावा, मित्रांचे संमेलन, सामाजिक उत्सव आणि विविध विशेष दिनांचे कार्यक्रम इत्यादींचा समावेश होतो. माझ्यावर अशी वेळ आतापर्यंत बरेचदा आलेली आहे. तेव्हा आपल्यासमोर उपस्थित असणारा श्रोतृवर्ग हा विविध वयोगटांतील आणि विभिन्न प्रकृतींचा असतो. अशा प्रसंगी थोड्या वेळात प्रभावी बोलणे ही एक कला आहे. ही कला मी प्रयत्नपूर्वक विकसित करीत राहिलो. त्यासाठी काही थोरामोठ्यांच्या भाषणांचा व त्यांच्या मेहनतीचा अभ्यास केला. माझ्यावर झालेले शालेय शिक्षकांचे संस्कारही यासाठी उपयोगी पडले. तसेच वक्तृत्वकलेसंबंधी काही पुस्तके वाचली. या अभ्यासातून माझ्यावर काही चांगल्या वक्त्यांच्या कृतींचा प्रभाव पडला. पुढे त्यात स्वानुभवाने काही भर घालता आली. या संदर्भातील काही रंजक व रोचक माहिती, अनुभव आणि किस्से आपल्या सर्वांसोबत वाटून घेण्यासाठी हा लेख लिहितोय. माझ्याप्रमाणेच इथल्या वाचकांमध्येही काही हौशी वक्ते असू शकतील. त्यांनीदेखील आपापले असे अनुभव प्रतिसादांमध्ये जरूर लिहावे
...
१.
सुरुवात करतो नामवंत साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या संदर्भातील एका प्रसंगाने. हा किस्सा रवींद्र पिंगे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे.
एकदा शिक्षणदिनाच्या निमित्ताने आकाशवाणीने पुलंना अवघ्या ४ मिनिटांचे भाषण देण्यासाठी बोलावले होते. पिंगे तेव्हा तिथले अधिकारी होते. त्यांचा अंदाज होता की, पुलं भाषणाच्या फार तर तासभर आधी येतील आणि उत्स्फूर्तपणे ते छोटेसे भाषण ठोकून देतील ! परंतु तसे अजिबात घडले नाही. पुलं पिंगे यांना दोन दिवस आधी भेटायला गेले. त्यांनी त्यांच्याशी संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली. आधी या विषयावर कोण कोण व काय बोलून गेले आहे, त्याची सुद्धा चौकशी केली. मग भाषणाच्या तयारीसाठी २४ तास मागून घेतले. घरी गेल्यावर पुलंनी त्यावर पुरेसा अभ्यास करून अडीच पानी मजकूर तयार केला. दुसऱ्या दिवशी ते आकाशवाणीत गेले. तिथे त्यांनी आधी भाषणाची तालीम केली आणि मगच ध्वनिमुद्रणासाठी तयार होऊन बसले. हे छोटेखानी भाषण त्यांनी बरोबर ३ मिनिटे ५९ सेकंदात बसवले होते.
एका लहानशा भाषणासाठी पुलंसारखा मुरब्बी साहित्यिक किती मेहनत घेतो हे वाचून मी थक्क झालो. श्रोत्यांना प्रेमात पाडणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रभाव पाडणारे भाषण देण्यासाठी ते किती परिश्रम करीत हे यातून शिकता आले.

२.
दुसरा किस्सा आहे इंग्लंडचे भूतपूर्व पंतप्रधान आणि साहित्यिक विन्स्टन चर्चिल यांचा. ते पट्टीचे वक्ते होते पण त्यांनी कधीही उत्स्फूर्त भाषण केले नाही. ते भाषणाची पूर्वतयारी अगदी कसून करीत. आधी उत्तम मसुदा तयार करीत. तो झाला की स्वतःच्या बायकोला तो खणखणीत आवाजात पण संथपणे वाचून दाखवत. अगदी पाच मिनिटांचे औपचारिक भाषण असले तरी त्याच्या ६-७ तालमी ते घरी करीत. अंघोळीच्या वेळेस ते आपले भाषण स्वतःलाच मोठमोठ्याने म्हणून दाखवत. प्रत्यक्ष भाषणाचे वेळी मात्र ते भाषण वाचून दाखवत. त्यांचे कुठलेही भाषण १५ मिनिटांच्या आत संपणारे असे हेही एक विशेष. बोलण्याची मंदगती आणि थांबत थांबत बोलण्याची पद्धत ही त्यांची खास वैशिष्ट्ये. अशी दांडगी मेहनत केल्यानेच त्यांना वक्तृत्वात उत्तुंग यश मिळाले. त्यांच्या कित्येक भाषणांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि त्यांची तडाखेबंद विक्री झाली.
एकेकाळी आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या या मुत्सद्द्याची भाषण-पूर्वतयारी पाहून आपण स्तिमित होतो. लेखन असो वा भाषण, कठोर परिश्रमाला पर्याय नाही हेच त्यांच्याबद्दलच्या या माहितीतून मला शिकता आले.

वरील दोन नामवंत उदाहरणे दिल्यावर एक मुद्दा स्पष्ट करतो. आपण जरी या मंडळींसारखे व्यावसायिक वक्ते नसलो, तरीही त्यांचा तयारी व मेहनतीचा गुण आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. एखाद्या मर्यादित परिचित समूहात देखील जर आपण तयारीनिशी व परिपक्वतेने बोललो, तर त्याचेही वेगळेच समाधान मिळते. आपल्या छोट्याशा पण चांगल्या बोलण्याला मिळालेली श्रोत्यांची दाद आनंददायी व उत्साहवर्धक असते.
...
३.
आता वळतो एका मार्गदर्शक इंग्लिश पुस्तकाकडे. त्याचे नाव आहे Write better, Speak better. लेखकद्वयाची नावे आता आठवत नाहीत. ते रीडर्स डायजेस्टचे प्रकाशन आहे. एका शब्दात सांगायचे तर हे पुस्तक म्हणजे बावनकशी सोने आहे ! मी ते वयाच्या तिशीच्या आतच वाचले. पुस्तकाच्या शीर्षकात दोन कलांचा उल्लेख आहे. या कलांमध्ये मला आजपर्यंत जी काही थोडीफार गती मिळाली त्याबद्दल मी या पुस्तकाचा कायम ऋणी आहे. उत्तम लिहिणे व बोलणे यासंबंधी पुस्तकात मिश्कील शैलीत अमूल्य मार्गदर्शन आहे. (त्यापैकी लेखनकलेसंबंधी मी या संस्थळावर अन्यत्र प्रतिसादांमधून पूर्वी काही लिहिले आहे). पुस्तकातील बरेचसे आता विसरलो आहे, पण जे एक-दोन मुद्दे तेव्हापासून मी आत्मसात केले ते चांगलेच लक्षात आहेत.

पहिला मुद्दा आहे वक्त्याच्या आत्मविश्वासासंबंधी. लेखकाने एक काल्पनिक परिस्थिती वर्णिली आहे. त्यामध्ये एखाद्या सामान्य हौशी वक्त्यासाठी काही सूचना केली आहे. समजा, एखाद्या सार्वजनिक मंचावर भाषणांचा कार्यक्रम आहे. त्यांमध्ये एक जण सामान्य माणूस आहे आणि बाकीची सर्व तालेवार मंडळी आहेत-अगदी वक्तृत्व शिरोमणी वगैरे. त्यांच्यापैकी एखादा अगदी राष्ट्रप्रमुख सुद्धा असू शकेल ! अन्य मंडळी देखील उच्चपदस्थ मान्यवर आहेत. वरील सर्वांनाच क्रमाने बोलायचे आहे. आता इथे गोची होते ती त्यातल्या सामान्य माणसाची. समारंभ सुरू होण्यापूर्वीच त्याच्यावर या सगळ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे प्रचंड दडपण येते. त्याच्यात क्षणभर कमालीचा न्यूनगंड येतो. इथे या पुस्तकाचे लेखक त्याला बळ देतात. कसे, ते त्यांच्याच शब्दात लिहितो :

“अशा वेळेस वरील वक्त्यांच्या समूहातील सामान्य माणसाने अजिबात बिचकू नये. मनात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी. जगातील प्रत्येक माणसात कुठला ना कुठला गुण हा जबरदस्त असतो. हा जो गुण आहे तो बाजूच्या अन्य वक्त्यामध्ये बिलकुल नाही असे समजा. त्यांचे गुण त्यांच्यापाशी, पण ‘मी’ हा मीच आहे ही भावना पक्की करा. मग तुमची पाळी येईल तेव्हा निर्भिडपणे जे काय बोलायचं आहे ते मनापासून बोला. तुमचे भाषण सुद्धा लोक उचलून धरतील”

अशी भावना जर प्रत्येक होतकरू वक्त्याने मनात ठेवली तर त्याचा आत्मविश्वास नक्की उंचावेल. पुस्तकातील या सूचनेचा मला काही प्रसंगात चांगला उपयोग झाला आहे. वक्तृत्वासाठी लागणाऱ्या निर्भिडपणाची त्यामुळे सुरेख जोपासना करता आली.

आपले भाषण फुलवण्यासाठी आपण बरेचदा म्हणी, वाक्प्रचार आणि थोरामोठ्यांची अवतरणे इत्यादींचा वापर करतो. त्या संदर्भात पुस्तकात काही चांगल्या सूचना आहेत. शंभर वर्षे जुन्या म्हणी, घासून गुळगुळीत झालेले वाक्प्रचार, सुमार कोट्या, इत्यादी गोष्टी भाषणात कटाक्षाने टाळा, नव्हे गाळा, असे लेखकांचे आग्रही प्रतिपादन आहे. या स्वरूपाच्या गोष्टी आपण भाषणात अंतर्भूत केल्याने त्यावर श्रोत्यांकडून रटाळपणाचा शिक्का बसण्याचा धोका असतो. अन्य लोकांची अवतरणे अगदी गरज असली तरच आणि ते सुद्धा संपूर्ण भाषणात एखादेच वापरावे हेही चांगले.

ज्या सभांमध्ये वक्त्याला ‘माइक’ (microphone)चा वापर करून बोलायचे असते त्यासंदर्भात काही मौलिक सूचना या पुस्तकात आहेत. आता त्याबद्दल पाहू :
अ) माइक वापरून बोलताना एक घोडचूक अनेक जण करतात. आपले बोलणे सुरू करण्यापूर्वी समोरच्या माइकमध्ये जोराची फुंकर मारून आवाज उमटतो का, ते पाहतात. हे अत्यंत अयोग्य आहे. अनेक वक्त्यांनी अशाप्रकारे माइकमध्ये वारंवार फुंकर मारल्याने आपल्या तोंडातील बाष्प त्यात जाऊन साठते व लवकरच त्याच्यातील विद्युत यंत्रणा खराब होते. म्हणून ही सवय कटाक्षाने मोडली पाहिजे. त्याऐवजी माइक हातात घेतल्यावर श्रोत्यांकडे दूरवर पहात, “हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय ना सर्वांना ?” असे स्पष्टपणे विचारावे हे उत्तम. (माइक हातात घेणाऱ्या प्रत्येकाने अशी फुंकर मारून ठेवणे हे पुढच्या वक्त्याच्या अनारोग्याला निमंत्रण देत असते. सध्याच्या महासाथीच्या काळात तर हा मुद्दा अधोरेखित व्हावा).

आ) काही सभांमध्ये एखाद्या वक्त्याला प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा असतो. अशा भाषणांमध्ये बहुतेकांकडून एक चूक सतत होत राहते. वक्त्याच्या समोर माइक असतो. पण वक्ता परिचय करून देताना सलग श्रोत्यांकडे न बघता मध्येमध्ये काटकोनात मान वळवून पाहुण्यांकडे बघत राहतो. यामुळे होते असे की, त्याचे निम्मेअधिक बोलणे माइकच्या कक्षेत येत नाही आणि श्रोत्यांना ऐकूच जात नाही. इथे वक्त्याने एक महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे. पाहुण्यांचे नाव, हुद्दा आणि परिचय हे सर्व सुस्पष्टपणे सांगताना तोंड पूर्णपणे माइकसमोर आणि नजर श्रोत्यांकडेच ठेवली पाहिजे. आपले सर्व बोलणे संपल्यावरच पाहुण्यांकडे मान वळवून त्यांना अभिवादन करावे.

भाषणाची पूर्वतयारी, त्याचा गाभा, प्रत्यक्ष संवादफेकीचे कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबी यासंबंधी कितीतरी चांगली माहिती या पुस्तकातून मला समजली. अशा या सुंदर पुस्तकाबद्दल लेखक आणि प्रकाशक यांना मनोमन वंदन !
...
४.
आता अजून एका पुस्तकाबद्दल. ‘सभेत कसे बोलावे’ हे माधव गडकरी यांचे छोटेखानी पुस्तक आहे. त्यातून काही मूलभूत गोष्टी शिकता आल्या. चांगल्या वक्तृत्वासाठी चौफेर वाचन व मननाची गरज लेखकाने अधोरेखित केली आहे. श्रोत्यांना आपला एखादा विचार पटवण्याची काही माध्यमे असतात. त्यापैकी विनोद हे सर्वात मोठे व उपयुक्त माध्यम असल्याची टिपणी त्यात आहे. महत्वाचे म्हणजे भाषणाची सुरुवात हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे लेखक सांगतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “जो वक्ता पहिल्या पाच मिनिटात सभा ताब्यात घेतो तो अर्धी लढाई जिंकतो”. या विवेचनातून मी भाषणाची सुरुवात नेहमी आकर्षक व प्रभावी होईल याकडे विशेष लक्ष दिले. वेळोवेळी त्याची पसंती श्रोत्यांकडून मिळाली.

आपल्या भाषणातील शब्दांचे सुस्पष्ट उच्चार हा या कलेतील एक महत्त्वाचा भाग आहे. मराठी बोलण्याच्या बाबतीत काही जोडाक्षरे आणि पुढे विसर्ग असलेल्या काही अक्षरांचे उच्चार कष्टपूर्वक व्यवस्थित करावे लागतात. स्वतःचे उच्चारण सुधारण्यासाठी एक रोचक सूचना मी एका साप्ताहिकातील लेखात वाचली होती. ती आता लिहितो. त्या लेखकाने असे म्हटले होते की, पुढील वाक्य सर्व वक्त्यांनी रियाज केल्यासारखे रोज अनेक वेळा स्वतःशी मोठ्याने म्हणावे :

“पश्चिमेकडून जो माझा मित्र आला तो माझा जीवश्च कंठश्च मित्र होता”.

वरील वाक्य वारंवार म्हटल्याने आपल्या स्वरयंत्राच्या विविध भागांना नियमित व्यायाम होत राहतो. त्यातून आपले उच्चार सुस्पष्ट राहतात. पूर्वी मी हे वाक्य स्नानगृहात असताना नियमित रोज १० वेळा म्हणायचो. अलीकडे मात्र अंगात आळस भरला आहे. नव्या लेखनाचा विषय सुचणे असो किंवा भाषणाची मोठ्याने तयारी करणे असो, त्यासाठी स्नानगृह हे खरोखरच उत्तम ठिकाण आहे असा (चर्चिलप्रमाणेच) माझाही अनुभव ! तिथे आपल्याला मिळणारा खाजगी अवकाश आणि निवांत मनस्थिती या गोष्टी दोन्ही कलांच्या विकासाच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहेत.
....
५.
एखाद्या समूहातील संभाषण हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो. व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी शालेय जीवनापासूनच होते. शालेय शिक्षकांचे संस्कार त्या दृष्टीने अर्थात महत्त्वाचे ठरतात. या संदर्भात आमच्या एका शिक्षकांची आठवण सांगतो. शिकवण्याच्या ओघात त्यांनी एकदा एक महत्वाची गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली. बऱ्याचदा समूहात वावरताना समाजातील एखादा कटू, अप्रिय किंवा गडबडघोटाळ्याचा विषय निघतो. अशा वेळेस, जर त्याच्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीचा आपण उल्लेख करणार असू तर त्या संदर्भात तारतम्य बाळगले पाहिजे असे त्यांचे मत होते. अशा वादग्रस्त घोटाळ्यासंदर्भात बोलताना कुठल्याही व्यक्तीचे थेट नाव घेऊ नका अशी शिकवण त्यांनी आम्हाला दिली. थेट नाव घेण्यापेक्षा त्या व्यक्तीचे अप्रत्यक्ष वर्णन करावे. ते जर हुबेहूब जमले तर तिचे नाव न घेताही श्रोत्यांना जे काही समजायचे ते बरोबर समजते ! नंतर मोठे झाल्यावर या शिक्षकांचा हा सल्ला अधिक उमजला. कोणावरही जर आपण पुराव्याविना काही जाहीर आरोप करत असू तर ते अत्यंत बिनबुडाचे ठरतात. उलट, जर का आपण नाव घेऊन कोणाबद्दल असे काही वावगे बोललो तर बदनामी केल्याचे किटाळ आपल्यावर येऊ शकते. त्यादृष्टीने आमच्या गुरुजींची ही शिकवण मौलिक होती. आज समाजात जेव्हा काही वाचाळवीर येता जाता काही व्यक्तींची नावे घेऊन खुशाल वाटेल ते बरळताना दिसतात तेव्हा आमच्या या शिक्षकांची वारंवार आठवण होत राहते.
...
६.
वयाची चाळिशी उलटल्यानंतर आम्ही काही सहकारी मित्रांनी मिळून एक ‘वाट्टेल ते’ या स्वरूपाचा भाषणकट्टा चालवला होता. त्याच्या संयोजनाची जबाबदारी मी आपण होऊन स्वीकारली होती. त्यासंबंधी एक स्वतंत्र लेख, ‘कथा एका कट्ट्याची’ यापूर्वीच इथे लिहिला आहे. त्या उपक्रमातूनही भाषणासंबंधी बरेच काही शिकता आले. त्यात आम्हा मित्रांपैकी क्रमाने प्रत्येक जण काही दिवसांच्या अंतराने सर्वांसमोर बोलत असे. या उपक्रमातून आपल्या अन्य सहकारी मित्रांच्या बोलण्याची लकब, देहबोली, संवादक्षमता, आवाजातील चढ-उतार आणि विनोदनिर्मिती अशा गुणांचे निरीक्षण मला जवळून करता आले. त्यातून स्वतःच्या वक्‍तृत्व विकासाला चांगली चालना मिळाली.

उत्स्फूर्त ( किंवा आयत्या वेळी विषय समजल्यानंतर ) बोलणे ही देखील एक वेगळी कला आहे. त्यासाठी संबंधित भाषणाची ' तयारी' हा भाग उद्भवत नाही. परंतु, एकंदरीत आपल्या आयुष्यातील वाचन, चिंतन, मनन आणि बहुश्रुतता या शिदोरीवर ते करता येते. जेवढी या गोष्टींची बैठक असेल त्यानुसार ते वठते.


७.
प्रत्यक्ष गुरु, पुस्तकरूपी ज्ञान आणि अन्य वक्त्यांचे निरीक्षण या सर्व प्रकारांनी आपण आपली वक्तृत्वकला घडवत जातो. वयानुसार जसे आपण या कलेत मुरत जातो तशी एक गोष्ट आपल्या लक्षात येते. वरील सर्वांपेक्षाही आपला सर्वोत्तम गुरु असतो तो म्हणजे स्वानुभव ! भाषणादरम्यान आपल्या हातून घडलेल्या चुका आपल्याला नंतर जाणवतात. अन्य वक्त्यांकडून वारंवार घडणाऱ्या चुकांचेही निरीक्षण होत राहते. विविध सभांमध्ये काही मूलभूत शिष्टाचार पाळले जातात किंवा नाही, हेही नजरेत भरते. अशा निरनिराळ्या चुका आपल्या पुढच्या भाषणात होणार नाहीत याची आपण खबरदारी घेऊ लागतो. समाजात काही सभांमध्ये वक्त्यांची ठराविक रटाळ छापील वाक्ये, बोलण्याच्या पद्धती आणि वेळखाऊपणा हे वर्षानुवर्ष चालू असलेले दिसते व ते खटकते. अशा काहींचा आता आढावा घेतो.

समजा, एखाद्या सभेत सात-आठ जण ओळीने बोलणार आहेत. सुरुवातीच्या दोन-तीन वक्त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे ते म्हणजे, आपल्याला नेमून दिलेली वेळ आपण पाळावीच. जर आपण त्या वेळेचे उल्लंघन करत राहिलो तर आपण तळाच्या क्रमांकाच्या वक्त्यांवर अन्याय करीत असतो. पण वास्तवात बहुतेकदा हे वरचे श्रोते वेळमर्यादा पाळत नाहीत. त्यामुळे बिचाऱ्या तळातील वक्त्यांची बोलण्याची वेळ येते तेव्हा बहुतेकदा श्रोते कंटाळलेले असतात ! श्रोत्यांच्या कंटाळलेपणाचे भान तळाच्या वक्त्यांनी (नाइलाजास्तव) बाळगणे गरजेचे आहे. पण इथेही तसे होत नाही. जेव्हा असा तळाच्या क्रमांकावरील वक्ता बोलायला उठतो तेव्हा उगाचच वेळ खाणारी काही रटाळ वाक्ये कशी बोलली जातात त्याची ही जंत्री :

• “माझ्या आधीच्या दिग्गज वक्त्यांनी सगळे काही बोलून ठेवल्याने खरंतर मला आता बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही..”

• “श्रोतेहो, तुम्ही सगळे आता कंटाळले असाल व चहापानासाठी/ घरी जायला उत्सुक असाल. तेव्हा मी काय तुमचा फार वेळ घेत नाही”... (असे म्हणून पुढे भाषणाचे रटाळ लांबण लावणे ! ).

• भाषण सुरू करताना व्यासपीठावरील सर्वांची नावे त्यांच्या हुद्दा व बिरुदांसकट सर्व वक्त्यांनी पुन्हा पुन्हा घेत बसणे, हे तर श्रोत्यांसाठी महाकंटाळवाणे.
....आणि शेवटी...

• आभार प्रदर्शन करणाऱ्याच्या तोंडचे ठराविक नकोसे वाक्य,
“तुम्ही जरी आता खूप कंटाळला असलात तरी आभार प्रदर्शनाचे ‘गोड काम’ माझ्याकडे आलेले आहे आणि मी ते अगदी थोडक्यात(?) करणार आहे ......”

असे अजून काही नमुने विस्तारभयास्तव टाळतो.
माझ्या मते वर नमुना म्हणून दिलेली घासून गुळगुळीत झालेली व वेळखाऊ वाक्ये तळाच्या वक्त्यांनी टाळावीत. आपल्याला जो काही निसटता वेळ मिळाला आहे त्यात स्वतःच्या मोजक्याच महत्वाच्या मुद्यांना हात घालावा आणि भाषण नेटके ठेवावे. श्रोत्यांचा उत्साह टिकून असेपर्यंतच वक्त्यांच्या भाषणाला अर्थ राहतो. त्या मर्यादेनंतर तो श्रोत्यांवर झालेला नकोसा भडीमार असतो !

असा हा माझा हौशी वक्तृत्वकलेचा आतापर्यंतचा अभ्यास व प्रवास. त्यातील सुखदुःखे आणि काही रोचक अनुभव तुमच्यासमोर मांडले. प्रतिसादांमधून आपणही आपले अनुभव जरूर लिहा. लेख आणि प्रतिसाद यांच्याद्वारे झालेल्या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून आपल्या सर्वांचाच मनोविकास घडावा ही सदिच्छा !
....................................

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

या विषयावर जाणकार लोकांकडून अधिक भर घातली जाईल याची खात्री आहे.

मी चार चौघात बोलताना खालील तीन चार गोष्टी कटाक्षाने पाळतो, आपला मुद्दा समोरच्या च्या गळी उतरवण्या करता या सवयींचा चांगला फायदा होतो.

१. आय कॉन्टॅक्ट - श्रोत्यांच्या थेट डोळ्यात बघून बोलणे

२. श्रोते कोण आहेत ह्याचा अंदाज घेउन त्या प्रमाणे विषयाची मांडणी करणे (माझा विषय सोडून मी दुसर्‍या कोणत्याही विषयावर बोलत नाही)

३. मधुन मधुन प्रश्र्ण विचारुन किंवा एखादा हलका विनोद करुन श्रोत्यांना जागे रहायला भाग पाडणे.

४. शक्य असेल तर थेट श्रोत्यांच्या मधे जाउन गप्पांच्या स्वरुपात बोलणे. (आपण एकाच जागी उभे राहून बोललो की लोक जास्त बोअर होतात)

अर्थात ह्या गोष्टी मी अनेक वेळा ठेचा खाल्ल्या नंतर शिकलो आहे.

पैजारबुवा,

सर टोबी's picture

20 Dec 2021 - 12:35 pm | सर टोबी

बोलण्याची पद्धत ही वक्तृत्वकलेशी बरेचसं साम्य दर्शवते. आवाजाचा चढ उतार, विद्यार्थ्यांना आपलंसं करणं, विषयानुरूप बोलण्याची कक्षा कमी जास्त ठरवणं या सर्व गोष्टी वक्तृत्व कलेत येतात. त्या खेरीज फळ्यावर व्यवस्थित लिहिणं हे देखील एक जास्तीचं काम त्यांना करावं लागते. माझे वैयक्तिक जे वक्तृत्वाच्या बाबतीत जे आदर्श आहेत ते सर्व माझे प्राध्यापक आहेत. आमच्या वर्गातील तीन फळ्यांचा ते इतका सुंदर वापर करायचे की बस. पहिल्या भागात व्याख्या, दुसऱ्या भागात उदाहरण आणि समिकरणं, आणि तिसऱ्या भागात सोडवून दाखवलेले प्रश्न. अगदी माठ मुलं देखील काहीतरी समजलं अशा समाधानात वर्गाच्या बाहेर पडत.

मित्रहो's picture

20 Dec 2021 - 2:27 pm | मित्रहो

खूप छान मुद्दे आहेत. नमूद करुन ठेवायला हवे.
सरावाशिवाय पर्याय नाही. सराव न करता बोललो तर खूप असंबद्ध बडबड होते. मी तर माझ्याच स्टाफ सोबत बोलणयाच्या मिटिंगचा सराव स्नानगृहात मनातल्या मनात करीत असतो. एकतर लिहून हवे किंवा मुद्दे लिहून ठेवायचे. लिहिल्याने विचारात सुस्पष्टता येते. मी जर सूत्रसंचालन केले तर खूपदा धन्यवाद म्हणतो. बायको त्यावर खूप खिल्ली उडवते ते आठवून टाळण्याचा प्रयत्न करतो.
कितीही गुळगुळीत वाक्ये टाळा म्हटले तरी असे न बोलणे म्हणजा याला भाषणाचे शिष्टाचार माहिती नाही असा समज होतो. मला तर दिवसेंदिवस गुळगुळीत वाक्यांचा वापर वाढताना दिसतोय. तिच गोष्ट कवितेच्या ओळी सांगायची काऱण त्यात विद्वत्ता दिसते असा भ्रम आहे. काही संचालन करणारे असे बघितले की चार मिनिटांच्या गाण्याआधी सात मिनिटे बोलतात. असे करुनही पुढच्या कार्यक्रमात ते दिसतात म्हणजे ते करतात ते योग्यच आहे असाच अर्थ होतो.
गुळगुळीत वाक्ये बोलणे ही परंपरा आहे आणि ते झालेच पाहिजे असा आग्रह धरणारे बरेच असतात. तिच गोष्ट कपड्यांची. मराठी कार्यक्रम असेल आणि झब्बे नाही घातले तर लोक फाऊल मानतात. इंग्रजीमधे असेल तर कोट हवा वगैरे. थोड काळानुरुप नैसर्गिक वागणे काही मंडळींना रुचत नाही.

हल्लीच्या ऑनलाइन जगात कॅमेऱ्यात बघून बोलायची सवय लावायला हवी. तितके सोपे नाही. यासाठी कॅप्टन रघुरामन यांनी एक टिप सांगितली होती. कॅमेऱ्याच्या तिथे लाल टिकली किंवा लाल शाईचा ठिपका लावायचा. तो रंग तुमचे लक्ष तिकडे ओढतो.

कुमार१'s picture

20 Dec 2021 - 2:57 pm | कुमार१

वरील तिन्ही प्रतिसाद उत्तम !

* थेट श्रोत्यांच्या मधे जाउन गप्पांच्या स्वरुपात बोलणे
* वक्तृत्वाच्या बाबतीत जे आदर्श आहेत ते सर्व माझे प्राध्यापक आहेत
* गुळगुळीत वाक्ये बोलणे ही परंपरा आहे

>>> आवडले.

अमर विश्वास's picture

20 Dec 2021 - 4:10 pm | अमर विश्वास

भाषण करण्याच्या पूर्वतयारीचा सर्वात मोठा भाग म्हणजे "Know your audiance"
तुमचे श्रोते कोण आहेत (त्यांचे संबधीत विषयाचे आकलन किती आहे ?, ते येथे का आले आहेत ? त्यांच्या अपेक्षा काय आहेत ? इत्यादी )

एकदा हे कळले कि भाषणाची तयारी त्याप्रमाणे करता येते ...

बाकी उत्तम भाषणासाठी पूर्वतयारी व तुमचे त्या विषयाचे आकलन ७०%, भाषेवरचे प्रभुत्व (२०%), प्रेझेंटेशन / बाकीची रंगरंगोटी फक्त १०% ... हे कायम लक्षात ठेवायचे

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Dec 2021 - 6:17 pm | चंद्रसूर्यकुमार

मस्त लेख. वक्तृत्व ही एक कला आहे. लोकांपुढे बोलायला सुरवातीला भिती वाटत असेल तर त्यावर उपाय एकच- जो सायकल चालवताना सुरवातीला तोल जाईल याची भिती वाटायची तेव्हा आपण सगळ्यांनीच वापरला आहे तो. सायकल शिकताना दोनचार वेळा पडायला झाले तरी नंतर सफाईदारपणे आपण सायकल चालवू शकतो. तेव्हा पडू ही भिती घालवायची असेल तर सायकलवर बसणे आणि चालवायला लागणे हाच उपाय. त्याप्रमाणेच लोकांपुढे बोलायची भिती वाटत असेल तर आपण चूकू/ आपले हसे होईल याची पर्वा न करता बोलायला सुरवात करायची. फार तर काय होईल? दोनचार वेळा चुकू पण पाचव्या वेळेला आपली भिती चेपली जाईल.

लेखात काही पुस्तकांचा उल्लेख आला आहे. ती पुस्तके मी वाचलेली नाहीत पण डेल कार्नेगींचे The art of Public Speaking हे पुस्तक वाचले आहे. त्या पुस्तकात भाषणाच्या पूर्वतयारीवर भर दिला आहेच. त्याप्रमाणेच आपला श्रोता कोण आहे, श्रोत्यांच्या अपेक्षा काय हे पण आधीपासून माहिती पाहिजे. त्याप्रमाणे आपण नक्की काय बोलायचे, कोणती उदाहरणे घ्यायची ही सगळी तयारी आधीपासून करू शकू. ५० ओव्हरमध्ये ३०० रन्स करायच्या या तयारीने खेळायला गेलो पण पीचच्या परिस्थितीवरून मग २५० पुरेसे होतील की ४०० लागतील हा निर्णय खेळायला लागल्यावर घेतला जातो त्याप्रमाणे श्रोत्यांच्या चेहर्‍यावरून कोणते मुद्दे मांडायचे आणि कोणते नाही हे आयत्या वेळेस ठरवायचे.

हॉल मोठा असेल तर श्रोत्यांशी कनेक्ट करायला एक उपाय वापरता येतो. माईक सुरू झाल्यावर सुरवातीला Am I audible at the back? हा प्रश्न विचारायचा. बहुतेक वेळा मागे बसलेल्यांपैकी कोणीतरी No असे म्हणतोच. तो धागा पकडून The answer to this question cannot be No. If you are answering my question, you are able to hear me then how can the answer be No? असे चेहर्‍यावर थोडे स्मित ठेवत बोलले की श्रोत्यांमध्ये थोडा तरी हशा पिकतो. हे बोलताना आपल्या चेहर्‍यावर स्मित असणे महत्वाचे. तसेच बोलताना मधूनमधून एखादा नर्म विनोद पेरणेही महत्वाचे.

वेगवेगळ्या प्रसिध्द वक्त्यांची भाषणे युट्यूबवर बघायला आवडते. ते भाषणे कशी करतात, आवाजात चढउतार कसे करतात वगैरे गोष्टी बघून बरेच काही शिकायला मिळते. अर्थात त्या सगळ्या गोष्टी अंमलात आणता येत नाहीत पण आपल्याला पुढच्या वेळेस काही बदल करायला हवेत का हे लक्षात येते. बिल क्लिंटन अध्यक्ष असताना मी त्यांची भाषणे किंवा अगदी व्हाईट हाऊसमधील प्रेस ब्रिफिंग पण सी.एन.एन वर बघायचो. अलीकडच्या काळातील त्यांच्याइतका प्रभावी वक्ता मला तरी माहित नाही. माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी क्लिंटन हे नाव घेतले होते त्याचे कारणही त्यांचे वक्तृत्व मला जबरदस्त आवडायचे आणि त्याच्या एखाद टक्का तरी आपल्याला कधीतरी बोलता यावे ही इच्छा होती/आहे. त्यांचे २००० सालचे स्टेट ऑफ द युनियन भाषण खाली देत आहे. आवाजातील चढउतार, आय कॉन्टॅक्ट, बोलताना कधी थांबायचे, हातवारे कसे करायचे वगैरे सगळ्या गोष्टी अगदी परिपूर्ण असलेले हे भाषण होते. बिल क्लिंटनची राजकीय मते आणि इतर प्रकार बाजूला ठेऊन वक्तृत्वकलेच्या विद्यार्थ्यांनी अगदी आवर्जून बघावे असे हे भाषण आहे. आतापर्यंत ते भाषण मी अनेकदा बघितले असावे. तसेच त्यांनी दिल्लीला संसदेत केलेले भाषण आणि ऑगस्ट २००० मध्ये डेमॉक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये केलेले भाषणही तसेच जबराट होते. पण दुर्दैवाने दिल्लीतील भाषणाचा व्हिडिओ कुठे बघायला मिळाला नाही.

तुषार काळभोर's picture

20 Dec 2021 - 10:33 pm | तुषार काळभोर

भाषण मस्त आहे. भाषणात एनर्जी आहेच, पण विनाकारण घसा ताणून केलेलं नाही. उच्चार पण अतिशय सुस्पष्ट आहेत.
पटकन आठवलेली अजून दोन प्रसिद्ध भाषणे म्हणजे जवाहरलाल नेहरूंचं 'नियतीसोबत केलेला करार' आणि चर्चिलचं 'We shall fight on the beaches' भाषण.

असंच एक आठवणारं आणि अंगावर रोमांच उभे करणारे भाषण १९९६ च्या Independence Day मधलं बिल पुलमनने अध्यक्ष म्हणून केलेलं 'Today we celebrate our Independence Day' भाषण

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Dec 2021 - 2:43 pm | चंद्रसूर्यकुमार

पटकन आठवलेली अजून दोन प्रसिद्ध भाषणे म्हणजे जवाहरलाल नेहरूंचं 'नियतीसोबत केलेला करार' आणि चर्चिलचं 'We shall fight on the beaches' भाषण.

नेहरूंचे भाषण वक्तृत्वापेक्षा भाषणाच्या मजकूरासाठी अधिक प्रसिध्द आहे असे वाटते. तसेही नेहरू वक्तृत्वासाठी खूप प्रसिध्द होते असे वाटत नाही. युट्यूबवर बघितलेल्या भाषणात नेहरू एकाच प्रकारचे चढउतार आवाजात करत आहेत असे वाटले. चुभूदेघे. चर्चिलच्या भाषणाचा ऑडियो उपलब्ध आहे.व्हिडिओ कुठे आहे का? नुसत्या आवाजापेक्षा वक्त्याही देहबोली, चेहर्‍यावरील हावभाव,हातवारे वगैरे गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात.

अ‍ॅब्रॅहॅम लिंकन एक उत्तम दर्जाचे वक्ते होते असे उल्लेख आहेत. त्यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येत नसल्याने दुर्दैवाने त्यांचे व्हिडिओ आपल्याला उपलब्ध नाहीत. तरीही लिंकन चित्रपटात त्यांनी गेटिसबर्ग या ठिकाणी केलेले ऐतिहासिक भाषण मला तरी खूप आवडले. अगदी दोन तीन मिनिटांचे हे भाषण खूप प्रसिध्द आहे. गेटिसबर्गच्या लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकांना श्रध्दांजली वाहणे आणि यादवी युध्द सुरू ठेवायचा निर्धार हा त्या दोन तीन मिनिटात अगदी प्रभावीपणे मांडला आहे- इतका की त्यात आणखी एक वाक्यही आणखी आणले असते तरी ते निरूपयोगी आणि निरर्थक वाटावे.

त्याबरोबरच मी ज्या अर्थतज्ञांना फार मानतो आणि मी मिपावर वेगवेगळ्या चर्चांमध्ये जे मुद्दे मांडतो ते ज्यांच्या प्रेरणेतून आले आहेत ते मिल्टन फ्रीडमन पण उत्तम वक्ते होते. त्यांचीही अनेक भाषणे मी बघितलेली आहेत. त्यांची मते पटोत किंवा न पटोत पण एक वक्ता म्हणून ते कसे बोलत आणि आपले मुद्दे कसे मांडत हे नक्कीच बघण्यासारखे आणि अभ्यासण्यासारखे आहे.

कुमार१'s picture

21 Dec 2021 - 2:55 pm | कुमार१

चर्चिलच्या भाषणाचा ऑडियो उपलब्ध आहे.व्हिडिओ कुठे आहे का?

इथे आहे :
https://www.youtube.com/watch?v=CXIrnU7Y_RU

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Dec 2021 - 2:57 pm | चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

21 Dec 2021 - 6:01 pm | तुषार काळभोर

तो पिक्चर मधला सीन आहे :)
(पण that is the closest we can go)

चंद्रसूर्यकुमार's picture

23 Dec 2021 - 8:58 pm | चंद्रसूर्यकुमार

पण दुर्दैवाने दिल्लीतील भाषणाचा व्हिडिओ कुठे बघायला मिळाला नाही.

आजच युट्यूबवर बिल क्लिंटन यांच्या संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर केलेल्या भाषणाचा व्हिडिओ मिळाला. त्यावेळी मी ते भाषण लाईव्ह बघितले होते आणि खरं सांगायचं तर त्या भाषणाने अगदी मंत्रमुग्ध झालो होतो.

चंद्रसूर्यकुमार's picture

13 Jun 2022 - 1:00 pm | चंद्रसूर्यकुमार

बिल क्लिंटनच्या २००० सालच्या लॉस अँजेलिसमधील डेमॉक्रॅटिक नॅशनल कन्व्हेंशन मध्ये केलेल्या भाषणातील शेवटची ५ मिनिटे खालील व्हिडिओत बघायला मिळतील. भाषणात केलेल्या मुद्द्यांविषयी सगळे सहमत असतील असे नाही, विशेषतः जॉन केनेडी आणि लिंडन जॉन्सन यांच्याविषयी ते बोलले आहेत त्याविषयी. पण भाषण मात्र अगदीच जबराट होते. संवादकौशल्य कसे असावे याचे अगदी मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हे भाषण असेल. बिल क्लिंटन उमेदीच्या काळात वक्ता दशसहस्रेषु नाही तर वक्ता दशलक्षेषु होते हे नक्की.

कुमार१'s picture

13 Jun 2022 - 5:23 pm | कुमार१

चांगले आहे.
नेहमीप्रमाणेच शब्दफेक स्वच्छ आणि स्पष्ट.

कुमार१'s picture

20 Dec 2021 - 6:56 pm | कुमार१

१.

उत्तम भाषणासाठी पूर्वतयारी व तुमचे त्या विषयाचे आकलन ७०%, भाषेवरचे प्रभुत्व (२०%)

>>> +11

2.

लोकांपुढे बोलायची भिती वाटत असेल तर आपण चूकू/ आपले हसे होईल याची पर्वा न करता बोलायला सुरवात करायची.

>>> +11 अ-ग-दी !

* यासंदर्भात श्रीराम लागूंचा किस्सा वाचलेला आठवतो.
त्यांनी आयुष्यात प्रथम जेव्हा छोट्याशा नाटकात रंगभूमीवर पाऊल ठेवले तेव्हा ते अक्षरशः घाबरून गेले होते व रंगमंच सोडून पळाले होते !
बाकी पुढचा त्यांचा इतिहास सर्वज्ञात आहेच.

* क्लिंटन यांची चित्रफित सवडीने जरूर पाहतो.

कुमार१'s picture

20 Dec 2021 - 8:56 pm | कुमार१

या चित्रफितीतील क्लिंटन यांचे भाषण ऐकले.
खरंच छान बोलतात. अजून एक गोष्ट जाणवली.
एरवी इंग्लिश चित्रपट बघताना आपल्याला सबटायटल्सची गरज जाणवते.
आताच्या या भाषणात मात्र क्लिंटन यांचे सर्व उच्चार अगदी स्वच्छ आणि स्पष्ट समजत होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Dec 2021 - 9:57 pm | चंद्रसूर्यकुमार

खरंच छान बोलतात.

नक्कीच. त्यांनी दिल्लीला संसदेत केलेले भाषण म्हणजे अगदीच अफलातून होते. त्यावेळी त्यांचे स्वागत उपराष्ट्रपती कृष्णकांत यांनी केले होते आणि शेवटी आभार पंतप्रधान वाजपेयींनी मानले. वाजपेयींचे वक्तृत्व खूप उत्तम आहे असे ऐकत मी लहानाचा मोठा झालो पण संवादकौशल्याच्या बाबतीत बिल क्लिंटन कित्येक योजने पुढे होते हे त्या दिवशी प्रकर्षाने जाणवले. बिल क्लिंटनची अध्यक्षपदावर आठ वर्षे पूर्ण झाल्यावर ते निवृत्त झाले तेव्हा खरं तर मला वाईट वाटले होते कारण त्यांचे भाषण सारखे त्यापुढे बघायला मिळणार नव्हते. २०१६ च्या डेमॉक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये मात्र जुने बिल क्लिंटन दिसले नाहीत. तेव्हा केलेले भाषण त्यामानाने फारच फिके वाटले. दुसरे माजी अध्यक्ष रॉनाल्ड रेगन पण भाषणांच्या बाबतील बिल क्लिंटनसारखेच होते- कदाचित काकणभर सरसच होते. ते अध्यक्ष असताना मी खूप लहान होतो आणि इंग्लिश भाषाही तेव्हा समजायची नाही त्यामुळे त्यांची भाषणे लाईव्ह बघितली नाहीत पण नंतर युट्यूबवर भरपूर बघितली. जॉन केनेडींच्या भाषणात एकाच प्रकारचे चढउतार असायचे असे मला वाटते. आवाजातल्या जरबेमुळे त्यांचेही भाषण प्रभावी व्हायचे पण प्रत्येकवेळी एकाच प्रकारचे चढउतार असतील तर ऐकायला मजा येत नाही. बिल क्लिंटननंतरचे सगळे अध्यक्ष अगदीच बोरींग बोलतात. त्यात बुशबाबा सगळ्यात जास्त :)

एरवी इंग्लिश चित्रपट बघताना आपल्याला सबटायटल्सची गरज जाणवते.
आताच्या या भाषणात मात्र क्लिंटन यांचे सर्व उच्चार अगदी स्वच्छ आणि स्पष्ट समजत होते.

हो. इंग्लिश चित्रपटात इतके वेगाने का बोलतात समजत नाही. सामान्य अमेरिकन लोकही बोलताना खूप वेगाने बोलत आहेत किंवा त्यांचे उच्चार समजायला कठिण जात आहे असे एकदाही जाणवले नाही. पण चित्रपटात का इतके वेगाने बोलतात समजत नाही. की समोरच्या माणसाची मातृभाषा इंग्लिश नाही हे लक्षात घेऊन ते मुद्दामून समोरच्याला समजेल असे बोलतात का याची कल्पना नाही.

कुमार१'s picture

21 Dec 2021 - 8:45 am | कुमार१

इंग्लिश चित्रपटात इतके वेगाने का बोलतात समजत नाही

>>
या मुद्द्यावर मी जरा विचार केला तेव्हा काही असे सुचले.
चित्रपटातील इंग्लिश हे बोलीभाषेनुसार आणि अनौपचारिक किंवा काहीसे बिनधास्त स्वरूपाचे असते. म्हणून ते आपल्याला समजत नसावे.
याउलट राष्ट्राध्यक्ष यांचे भाषण हे 'पुस्तकी इंग्लिश'च्या अंगाने जाणारे असते. आपण शाळेमध्ये असताना जे इंग्लिश शिकलो ते पुस्तकी पद्धतीनेच होते. म्हणून आपल्याला औपचारिक भाषण समजते पण चित्रपटातील संवाद मात्र नीट कळत नाहीत, असे वाटते.

उत्तम वक्ता होणे ही खरोखरचं एक कला आहे. तुमच्या आवाजाचा पोत देखील तुमच्या संभाषण कलेत फार महत्वाची भर घालतो. अटलजी, सुषमा स्वराज एक से बढकर एक वक्ते झालेले आहेत आणि त्यांची भाषणे अभ्यासावीत अशीच आहेत.
बाळा साहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांची २ छोटी भाषणे इथे देतो आणि माझे टंकन कष्ट आवरते घेतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bullet Full Video Song :- George Reddy

कुमार१'s picture

21 Dec 2021 - 6:05 am | कुमार१

सर्व चित्रफिती शांतपणे ऐकेन .
प्रत्येकाच्या भाषणाचा बाज निराळा.

पाषाणभेद's picture

21 Dec 2021 - 9:13 am | पाषाणभेद

आचार्य अत्रे यांचा उल्लेख नसल्याने निषेध! ह. घ्या. :-)
माहितीपूर्ण लेख.

शेखरमोघे's picture

21 Dec 2021 - 9:20 am | शेखरमोघे

नेहेमीसारखेच मुद्देसूद, माहितीपूर्ण आणि रन्जक लिखाण.

मी (माझ्या व्यवसायातील गरज म्हणून) मुम्बईत काही नावाजलेल्या सन्स्थान्चे Public Speaking वरचे short courses केले होते, त्यातील काही (लक्षात राहिलेले) मुद्दे:

१. वक्त्याच्या आत्मविश्वासासंबंधी इथेही पहिल्या काही मिनिटात करण्याच्या गोष्टी: लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हातात ध्वनिवर्धक पकडता तेव्हा तुमच्या पुढे बसलेल्या सगळ्या लोकान्चे लक्ष तुमच्यावर केन्द्रित असते. म्हणून काहीही बोलणे सुरू करण्या आधी सगळ्या तर्‍हेने वक्ता म्हणून तयार होऊन - तुमच्या notes व्यवस्थित जुळवून, सगळ्या सभागृहावर एक नजर फिरवून, आपण आता सगळ्या प्रेक्षकाना आपल्याबरोबर आपल्याला हवे तिथे घेऊन जाणार आहोत अशासारखा विचार करत पूर्ण मानसिक तयारी करून - मगच बोलायला सुरवात करा.
२. बोलण्याची त्रिसूत्री लक्षात ठेवा - प्रथम काय सान्गणार आहात त्याची थोडक्यात ओळख, नन्तर काय सान्गायचे आहे ते सविस्तर आणि सोदाहरण आणि नन्तर काय सान्गितले याचा गोषवारा.
३. अधूनमधून विनोद, प्रेक्षकाना आपल्यापासून वेगळे पडू न देण्याकरता काही rhetoric प्रश्न, आधी झालेल्या भाषणामधील काही उपयोगी माहिती किन्वा विचार यान्ची (सन्दर्भासह) द्विरुक्ती आणि आवाजातील तसेच दृष्टीक्षेपातील बदल यावरही लक्ष ठेवा म्हणजे भाषण रटाळ, पाठ केलेले किन्वा कन्टाळवाणे वाटणार नाही.

कुमार साहेब, एका महत्त्वाच्या विषयावरचे उपयुक्त लेखन इथे केल्याबद्दल व या विषयाला येथे मांडून अनेक जाणकारांना बोलते केल्याबद्दल धन्यवाद.
वक्तृत्व कौशल्य सुधारण्यासाठी लेखात सुचवलेल्या गोष्टी खूप मोलाच्या आहेत.

मी टिव्हीवर उत्तम वक्त्यांची भाषणे पाहिली आहेत. प्रत्यक्षात ऐकलेली प्रसिद्ध वक्त्यांची काही भाषणे म्हणजे २१ वर्षांपूर्वी डॉ. विजय भटकर, १८ वर्षांपूर्वी प्रा. शिवाजीराव भोसले अन सेमिनार पद्धतीचे डॉ. श्रीकांत जिचकार यांचे भाषण (करियर मार्गदर्शन विषयावरचे).

या लेखात लेखावरच्या प्रतिसादांत जगातल्या उत्तम वक्त्यांचा उल्लेख आला आहे. आचार्य अत्र्यांचा उल्लेख अजुन आला नसल्याचे जरा आश्चर्य वाटले.
अमेरिकेतल्या २०१२ च्या निवडणुकीत ओबामांचे प्रतिस्पर्धी मिट रॉमनी यांची काही भाषणे वतेव्हाच्या पहिल्या प्रेसिडेंशियल डिबेटमधली कामगिरी मला ओबामांच्या त्या काळातल्या भाषणांपेक्षा सरस वाटली होती.

गेल्या ९ वर्षांपासून मी आघाडीच्या प्रॉडक्ट कंपन्यांच्या लॉन्च इवेंट्स आवर्जून पाहत असतो.
सुरुवात ब्लॅकबेरी १० फोन्सचा या इवेंटने झाली.

यावर तेव्हा आलेला एक लेख
Presentation Skills: 5 Lessons From The BlackBerry 10 Keynote

नंतर अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, सॅमसंग, अ‍ॅमेझॉन यांच्याही बर्‍याच लॉन्च इवेंट्स पाहिल्या आहेत. कंपन्यांचे मोठे अधिकारी तर उत्तम बोलतातच त्या खेरीज त्या प्रॉडक्टवर काम करणारे बरेच (तुलनेत) कनिष्ठ अधिकारीही अगदी सहज शैलीने बोलतात. या सर्वांचे निरीक्षण केल्यास आपल्यालाही बरेच काही शिकायला मिळते.

सुबोध खरे's picture

21 Dec 2021 - 9:24 am | सुबोध खरे

सहमत

आचार्य अत्रे यांच्या मी कसा झालो या पुस्तकातील मी वक्ता कसा झालो हा लेख जरूर वाचावा.

* आचार्य अत्रे यांच्या मी कसा झालो
*बोलण्याची त्रिसूत्री लक्षात ठेवा
* प्रा. शिवाजीराव भोसले यांचे भाषण
* डॉ. श्रीकांत जिचकार यांचे भाषण

>>> हे सर्व उल्लेख छान ! आवडले.

कुमार१'s picture

21 Dec 2021 - 10:00 am | कुमार१

शिवाजीराव भोसले यांची मी मोजून तीन व्याख्याने ऐकली. त्यानंतर मात्र ऐकावीशी वाटली नाहीत. सुंदर बोलतात परंतु कालांतराने ते खूप अलंकारिक व मधाळ बोलणे फारसे भावत नाही हा माझा अनुभव.

मात्र त्यांच्या एका लेखात त्यांनी सांगितलेला एक मुद्दा खूपच आवडला आणि पटला होता. त्यांनी असे म्हटले होते की, आज समाजात जे काही लोक दिग्गज म्हणून कीर्ती मिळवलेले असतात, त्या सर्वांचे यश हे प्रयत्नसाध्य असते.

( म्हणजेच ‘आपल्याला’ ते जमणार नाही, ‘तो आपला पिंड नाही’, ‘त्यांच्या घराण्यातच / रक्तातच कला आहे’, अशा पळवाटा कोणी शोधत बसू नये.
कठोर परिश्रम महत्त्वाचे >> यश मिळते).

जेम्स वांड's picture

21 Dec 2021 - 11:15 am | जेम्स वांड

कुमार सरांच्या व्यासंगला साष्टांग दंडवत प्रणिपात. मी आधीच अबोल, मुखदुर्बळ नाही पण अबोल नक्कीच. त्यातही नोकरीत बहुसंख्य प्रकल्प सरकारी क्लायंट देतात, परदेशी, देशी, राज्य पण सरकारचे त्यामुळे नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट्स अन इतर बरेच काही गॅग्स असतात बोलण्यावर, ते आता अंगळवणी पडलं आहे भरपूरच. अर्थात उत्तमोत्तम भाषणं ऐकणं आवडतं, वाचन पण आवडतं, मला पर्सनली प्र के अत्रेंची भाषणे तुफान आवडतात, सडेतोड, अग्रेसिव्ह तरीही हास्यपूर्ण अन विलक्षण कोटीक्रम भरलेला एक बॉम्ब असत त्यांची भाषणे.

माझ्या आवडत्या भाषणांपैकी एक काळजाच्या खूप जवळ असणारे भाषण म्हणजे, १९४३ मध्ये सुभाषबाबू ह्यांनी केलेले निप्पोन रेडिओ उर्फ जपानी नभोवाणीवरील भाषण

कुमार१'s picture

21 Dec 2021 - 11:29 am | कुमार१

धन्यवाद
मात्र तुम्ही दिलेला दुव्यातील चित्रफित गंडलेली दिसते. सुभाषबाबूंना ऐकायचे म्हणून टिचकी मारली तर लता मंगेशकर यांची जुनी गाणी नजरेस पडत आहेत !
:))

जेम्स वांड's picture

21 Dec 2021 - 11:40 am | जेम्स वांड

माफी,

कृपया प्रसार भारती चॅनलवर सुभाषचंद्र बोस ओरिजिनल स्पीच सर्च करावे.

धन्यवाद.

मदनबाण's picture

21 Dec 2021 - 1:18 pm | मदनबाण

वरती आचार्य अत्रे यांचा उल्लेख करण्यात आला आहे, काही काळा पूर्वी इथेच मिपावर त्यांच्या एका भाषणाचा उल्लेख मी केला होता, पुण्या विषयी उत्तम माहिती आणि पुणे शहराच महत्व या भाषणातुन मला विशेष कळलं होतं.याच बरोबर पु.ल. देशपांडे यांच माझं ऑल टाईम फेव्हरेट भाषण देखील आहे. ही दोन्ही मी ऐकलेली भाषणं इथे देउन ठेवतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ye Mulaqat Ek Bahana Hai... :- Khandaan

कुमार१'s picture

13 Jun 2022 - 12:22 pm | कुमार१

आज आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन.
त्रिवार वंदन !

अत्र्यांची जन्मतारीख देखील १३ च आहे (ऑगस्ट). तारखेचा हा एक योगायोग :)

लग्नामधील आभार प्रदर्शन

• भाषण सुरू करताना व्यासपीठावरील सर्वांची नावे त्यांच्या हुद्दा व बिरुदांसकट सर्व वक्त्यांनी पुन्हा पुन्हा घेत बसणे, हे तर श्रोत्यांसाठी महाकंटाळवाणे.
....आणि शेवटी...
• आभार प्रदर्शन करणाऱ्याच्या तोंडचे ठराविक नकोसे वाक्य,

लग्नामधील आभार प्रदर्शन असेच कंटाळवाणे असते.
अगदी लग्न नको पण आभारप्रदर्शन आवर असे होउन जाते.

अत्रे यांचे दुर्मिळ भाषण

>> दुवा दिल्याबद्दल धन्यवाद ! त्यांच्या संदर्भात अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या’ हा पुलंनी लिहिलेला लेखसुद्धा सुंदर आहे.
एका विनोदाच्या राजाने दुसऱ्या विनोदसम्राटाला दिलेली ती सुंदर दाद आहे !
...

अगदी लग्न नको पण आभारप्रदर्शन आवर

अशी लग्ने माझ्यातरी पाहण्यात नाहीत. परंतु त्याबद्दल ऐकून आहे .
खरंय अगदी वैतागवाडी असणार…

मी अर्धा तास ते एक तास चाललेले आभारप्रदर्शन बघितले आहे. लग्नघटिकेच्या आधी सुरु होते आणि प्रत्येकाला श्रीफळ (नारळ) आणि टोपी (किंवा शाल) देण्यात येते.
घेतली तर सर्वांची नावे घ्यावी लागतात, नाहीतर नंतर रुसवे फुगवे. ज्यांचे नाव घेतले नाही, ते नंतर नेमके अडचणीत पकडुन आडवतात.
हा प्रकार पश्चिम महाराष्ट्रात खुप चालतो.
त्यात लग्नघटिका बर्‍याचदा टळुन जाते.

अशी लग्ने माझ्यातरी पाहण्यात नाहीत. परंतु त्याबद्दल ऐकून आहे .
खरंय अगदी वैतागवाडी असणार…

सर टोबी's picture

21 Dec 2021 - 3:48 pm | सर टोबी

पुण्या मुंबईत हा प्रकार पूर्वी नव्हता. इतकेच नाही तर मुहूर्ताची वेळ कटाक्षाने पाळली जायची. मला मूळचा पुणेकर नसल्यामुळे मुहूर्ताचे महत्त्व माहित नव्हते. पहिल्याच लग्नाला उशिरा पोहोचलो तेव्हा मित्रांनी "वराती मागून येतात ते आले" अशी संभावना केली.

आताशा, खास करून, लॉनवर होणाऱ्या लग्न समारंभात आभार प्रदर्शनाचा प्रकार घुसला आहे. लग्न लागल्यानंतर सगळे जेवायला धावतील यासाठी मंगलाष्टकं थांबवून आभार प्रदर्शन पार पाडले जाते.

कुमार१'s picture

21 Dec 2021 - 4:12 pm | कुमार१

लॉनवर होणाऱ्या लग्न समारंभात आभार प्रदर्शनाचा प्रकार घुसला आहे.

बहुधा अशा लग्नाच्या निमंत्रितांमध्ये 'माननीय नामदारांचा' भरणा असावा !!

लग्नात किती नामदार आलेत, त्यावरुन ठरते किती लग्न जोरात झाले.
अमका तमका आला कि लग्न जोरात असा सगळीकडे समज आहे. सगळा प्रतिष्ठेचा मामला आहे.

बहुधा अशा लग्नाच्या निमंत्रितांमध्ये 'माननीय नामदारांचा' भरणा असावा !!

मित्रहो's picture

21 Dec 2021 - 4:43 pm | मित्रहो

मूळ धागा भरकटतोय तरी
लग्नात आभार कुणाचे मानतात, काहीही उद्योग न कणाऱ्या मुलाला मुलीने हो म्हटले म्हणून तिचे मानतात. कुणाचे

वरील प्रतिसादात जे भाषणांचे दुवे आहेत ती भाषणे मस्त आहेत.

कुमार१'s picture

24 Dec 2021 - 4:09 pm | कुमार१

अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या’
याबद्दल अजून काही :

लेखात अत्र्यांच्या बोलण्यातील दांडगेपणाचे पुलंनी छान वर्णन केले आहे. अत्रे एक ‘अजस्त्र वाङमयीन यंत्र’ असल्याचे ते लिहितात. अत्र्यांनी विनोदाचा शस्त्र म्हणून छान उपयोग केला तसेच विनोदासाठी लागणारा हजरजबाबीपणा हा गुणही त्यांच्याकडे जबरदस्त होता. अत्र्यांची निवडणुकीतील भाषणे म्हणजे श्रोत्यांना मेजवानीच असायची.

अत्र्यांचे विनोद ऐकताना प्रेक्षक कधीच गालात वगैरे हसले नाहीत; प्रेक्षागृहामध्ये श्रोत्यांच्या हास्याचा प्रचंड स्फोटच व्हायचा ! अत्र्यांच्या व्याख्यानातून आबालवृद्ध उदंड तकवा घेऊन जातात असे पुढे त्यात लिहिले आहे. (इथे पुलंनी वापरलेला कवा हा शब्द प्रचंड आवडला).

मुक्त विहारि's picture

21 Dec 2021 - 2:41 pm | मुक्त विहारि

वाखूसा

कुमार१'s picture

21 Dec 2021 - 6:32 pm | कुमार१

लेखात माइकच्या वापर बाबत काही लिहिले आहे. यासंदर्भात घडलेला एक प्रसंग सांगतो.

मागच्या महिन्यात आमचे शालेय मित्रांचे संमेलन झाले. त्यासाठी माझा एक सहकारी डॉक्टर इंग्लंडहून इथे आला होता. आमच्या कार्यक्रमांमध्ये सलग सोळा जणांना प्रत्येकी पाच मिनिटे बोलायला दिले होते. माझा हा मित्र कान नाक घसा तज्ञ आहे. त्याचा बोलण्याचा क्रमांक ८ वा होता.

त्याच्या आधीचा प्रत्येक वक्ता बोलायला येई, तेव्हा तोंडावरची पट्टी काढे आणि मग माईकमधून भाषण करे. जेव्हा त्याचा क्रमांक आला, तेव्हा त्याने एका हातात माईक घेतला, तोंडाची मुखपट्टी काढून त्या माईकवर धरली आणि मग बोलायला सुरुवात केली.

तेव्हा तो सर्वांना उद्देशून म्हणाला, “ मी आत्ता युरोपमधून आलो असल्याने माझ्या पासून तुम्हाला धोका संभवतो. म्हणून माईक मुखपट्टीने झाकण्याची कृती मी करत आहे. या नंतरच्या सर्व वक्त्यांनीही असे करावे “

त्याची ही कृती कितपत गरजेची/ उपयुक्त यावर चर्चा होऊ शकेल.

मला असे वाटते की, त्याने असे केल्यानंतर जेव्हा तो माईकवरची पट्टी काढून घेईल, त्यानंतर ती त्याने बिलकुल वापरता कामा नये. त्याने लगेच खिशातून दुसरी नवी मुखपट्टी वापरण्यासाठी काढायला हवी. तरच या कृतीचा पूर्ण उपयोग होईल.
काय वाटते ?

नचिकेत जवखेडकर's picture

22 Dec 2021 - 9:00 am | नचिकेत जवखेडकर

माझी उंची खूप कमी आहे. त्यामुळे शाळेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना माइकची उंची कायम ऍडजस्ट करावी लागायची. ४ थीत असताना एकदा भाग घेतला होता तेव्हा का माहित नाही, पण त्या माइकची उंची काही केल्या कमी होत नव्हती. मला पूर्ण चवड्यावर उभं राहून बोलावं लागलं होतं. सगळे जण सुरुवातीला खूप हसले पण नेटाने सगळं बोललो आणि पहिला क्रमांक पटकावला!

टर्मीनेटर's picture

22 Dec 2021 - 10:30 am | टर्मीनेटर

अरे वाह! मस्त लेख.
प्रतिसादही छान माहितीपूर्ण आहेत 👍

छान लेख आणि प्रतिसाद. आता या सर्व भाषणांची youtube प्लेलिस्ट बनवून ठेवली पाहिजे म्हणजे कधीही ऐकता येईल.

कुमार१'s picture

22 Dec 2021 - 11:01 am | कुमार१

* माइकची उंची कायम ऍडजस्ट करावी लागायची
* प्रतिसादही छान माहितीपूर्ण
* या सर्व भाषणांची youtube प्लेलिस्ट

>>> +११

भाषण या विषयावरील धागा असल्यामुळे बऱ्याच अभ्यासू लोकांनी इथे ध्वनीचित्रफिती चढवल्या आहेत.
त्या शांतपणे रोज एक अशा मी ऐकत आहे
सर्वांचे आभार !

जेम्स वांड's picture

22 Dec 2021 - 11:05 am | जेम्स वांड

आणि चक्क देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख नाही ??

त्यांचे राजकीय विचार, चाली, डाव प्रतिडाव कोणाला आवडो न आवडो तो मुद्दा वेगळा, पण हा माणूस प्रचंड उत्तम बोलतो, कोट्या विनोदाची उत्तम पखरण, ज्या विषयावर बोलतोय त्याचे प्राथमिक ज्ञान, आकडेवारी, आकडेवारी वापरुन मुद्दा रेटणे, आवाजातील आरोह अवरोह आणि अगदी चिमटे काढण्याची रीत, सगळे पाहता फडणवीसांचे नाव ह्या धाग्यात असायला हरकत नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Dec 2021 - 4:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

+१ .. विरोधी पक्ष नेता म्हणून फडणवीसांचे हे भाषण फारच प्रभावी झाले आहे

https://www.youtube.com/watch?v=3pN3VEeLQMw

कुमार१'s picture

22 Dec 2021 - 5:13 pm | कुमार१

सहमत.
भाषण दमदार आहे

Nitin Palkar's picture

22 Dec 2021 - 7:46 pm | Nitin Palkar

नेहमी प्रमाणेच अतिशय अभ्यासपूर्ण लेख. सर्व प्रतिसादकांचे वाचनीय प्रतिसाद आणि खूपच प्रेक्षणीय, अभ्यासनीय चित्रफिती (या आता सवडीने पाहणे आहेत).

जेम्स वांड's picture

22 Dec 2021 - 7:55 pm | जेम्स वांड

वक्ता तितकासा आदराने बघितला जात नाही, किंबहुना तो एक नरपशु म्हणून जास्त कुप्रसिद्ध आहे (सार्थपणे) पण त्या पशुतुल्य वागण्याला जनसामान्य लोकांतून समर्थन मिळवून घेणे त्याला जमले त्याच्या अमोघ वक्तृत्वशैलीने, उत्कट हातवारे, भयानक आक्रमक आवाज अन त्या आवाजात पण आर्जव असणारा हा महाभाग म्हणजे एडॉल्फ हिटलर, खालील भाषण त्याने महायुद्ध सुरू होण्याच्या एक वर्ष अगोदर एस्सेमध्ये क्रुप्पच्या कारखान्यात दिले होते (थिसेनक्रुप्प मधली क्रुप्प असावी का ही ?) असे म्हणतात हे भाषण ऐकून कैक मजूर घळाघळा रडू लागले होते, खरेखोटे देवजाणे पण ह्या नराधम माणसाने काहीकाळ जर्मनी आपल्या मागे आणून उभा केला तो वक्तृत्वाच्या जोरावरच, एडॉल्फ हिटलर वस्तुनिष्ठ विचार केला तर उत्तम वक्ता होताच ह्यात काही दुमत नसावं.

हिटलर एक सर्वसामान्य युरोपियन होता. जर गेल्या वर्षातील युरोपियन इतिहास पाहिला तर त्याचे वागणे वेगळे जाणवत नाही.
त्यांच्यामुळे खुप युरोपियन मेले. जर तेच युरोपियनेतर असते तर त्याला युरोपियन लोकांनी डोक्यावर नक्कीच घेतले असते.
उदा: जर्मनीने दुसर्‍या महायुध्यातील हिंसेबद्दल लगेच माफी मागितली पण नामिबियातील नरसंहराबद्दल अजुन माफी मागितली नाही.

डच : इंडोनेशिया
फ्रान्सः अल्गेरिया
स्पेनः दक्षिण अमेरिका
पोर्तुगाल: भारत
इंग्रजः बहुतेक सगळे जग
अजुन बरीच उदाहरणे सापडतील.

वक्ता तितकासा आदराने बघितला जात नाही, किंबहुना तो एक नरपशु म्हणून जास्त कुप्रसिद्ध आहे

कुमार१'s picture

22 Dec 2021 - 8:17 pm | कुमार१

अभ्यासनीय चित्रफिती (या आता सवडीने पाहणे आहेत).
>>अगदी !
मी पण सावकाशीने तेच करतो आहे.
…..
हिटलर >>>
छान भाषण. अगदी स्फोटक असावे !

सहमत. हिटलरबद्दल अजून थोडे. हिटलर अगदी हाडाचा वाचक होता. त्याच्या या गुणावर प्रकाश टाकणारे ‘हिटलरस प्रायव्हेट लायब्ररी : द बुक्स that shaped हिज लाइफ’ हे T Ryback या लेखकाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. तसेच नितीन रिंढे यांचा ‘हिटलर :पुस्तक जपणारा आणि जाळणारा’ हा लेखही सुंदर आहे. तो त्यांच्या लीळा पुस्तकांच्या या पुस्तकातील शेवटचा लेख आहे.

अजुन ट्रंप आणि मोदी यांची नावे आली नाहीत हे पाहुन आश्चर्य वाटले.

भाषण जास्त विद्वत्ताप्रचुर करण्यापेक्षा, आपला श्रोतावर्ग कोण आहे त्यानुसार बोलणे जास्त महत्वाचे. नाही गेला बाजार मनमोहन सिंग आहेतच.
ट्रंप आणि मोदी श्रोतावर्गाला सतत मनोरंजित ठेवुन आपला संदेश बरोबर पोचवतात.

कुमार१'s picture

22 Dec 2021 - 8:54 pm | कुमार१

अहो ट्रम्प हे नाव तर तुमच्या प्रतिसादागणिक झळकते आहे ना !!
:))))

चामुंडराय's picture

22 Dec 2021 - 9:41 pm | चामुंडराय

वक्ता दशसहस्त्रेषु

छान विषय कुमार सर. सगळे व्हीडिओ एक एक करून बघतो आहे. काही लोकांसाठी वक्तृत्व कला उपजत असते तर बहुसंख्य लोकांसाठी कष्टसाध्य असते.

बहुसंख्यांना व्यासपीठाची भीती वाटते (stage fright) आणि वक्तृत्व कला शिकण्याची इच्छा असते असे एका सर्वेक्षणात वाचल्याचे आठवते.

वरील सर्व प्रतिसादांमध्ये toastmasters चा उल्लेख केलेला नाही. कोणास toastmasters club चा अनुभव आहे का? कोणी मिपाकराने toastmasters ice breaker केले आहे काय?

ह्या संदर्भात अधिक वाचायला आवडेल.

राघवेंद्र's picture

23 Dec 2021 - 1:11 am | राघवेंद्र

कुमार सर,

खूप चांगला लेख आणि त्यावरील प्रतिसाद. Toastmaster International या संस्थेचे सर्व जगात क्लब आहेत आणि तिथे आपण भाषणाची तयारी करू शकतो. मी या क्लब बद्दल लिहिलेला लेख.

कुमार१'s picture

23 Dec 2021 - 9:09 pm | कुमार१

पथिक या संस्थेतर्फे चालवला जातो. त्यात समूहापुढे भाषण हे पण शिकवतात.
बरेच उद्योजक लाभ घेतात.

अथांग आकाश's picture

23 Dec 2021 - 1:20 am | अथांग आकाश

भाषणे ऐकायला आवडत नाही! पण हा लेख आवडला!!
A

कुमार१'s picture

23 Dec 2021 - 7:54 am | कुमार१

राघवेद्र
तुमचा संबंधित दुव्यातील उपक्रम खूप आवडला. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
त्या धाग्यावर प्रतिसाद दिला आहे.
..
अ आ ,
नेहमीप्रमाणेच सुंदर आणि विषयानुरूप चलतचित्र.
धन्यवाद !

मित्रहो's picture

23 Dec 2021 - 10:46 am | मित्रहो

काही मुद्दे आठवले. मागे एकदा कंपनीत याविषयावर ट्रेनींग झाले होते. साधारणतः असले ट्रेनींग तेच तेच सांगणारे कंटाळवाणे असतात. इथे ट्रेनर न्यूयार्क मधे नाटकात काम करणारी व्यक्ती होती.
१. Do not start from comfortable or mental equilibrium position. त्याच्या मते तो मानसिक समतोल साधण्यासाठी वक्ता काही क्लृप्त्या करतो. उदा. हात खिशात घालून बोलणे, एक हात टेबलवर ठेवणे, तळहातावर दुसऱ्या हाताची मूठ मारीत राहणे. भाषण सुरु असतानाही वक्ता मग समतोल साधायला तेच करीत राहतो. त्याऐवजी दोन्ही पाय विश्राम अवस्थेत ठेवून ताठ उभे राहून हात बाजूला ठेवून बोलावे. कॉलर माइक नसेल तर डायसच्या मागे देखील समतोल उभे राहावे. अशी सुरवात केल्यानंतर मन समतोल साधायला याच पोझिशनला येतो. हळूहळू डायस ठेवून भाषण देणे बंद होईल कारण वायरलेस माइक, कॉलर माइक याचा प्रभावी वापर करणारे वक्ते येतील. फक्त राजकीय भाषण कदाचित त्याला अपवाद असेल
२. भाषण देत असताना उगाच फिरु नये. एकाच जागी उभे राहून भाषण दिले तर ते कंटाळवाणे होऊ शकते म्हणून जेंव्हा तुम्ही मुद्दा बदलता तेंव्हा जागा बदला.
३. हल्लीचा श्रोता दिवसेंदिवस हुषार होत चालला आहे. बऱ्याचदा श्राते वर्गात बसणाऱ्याला उत्तम भाषण कसे द्यायचे याची थिअरी माहित असते. अशावेळी उत्तम भाषणसाठी वापरलेल्या काही ट्रिक्सचा तितका परिणाम होणार नाही. उदा. सुरवातीली काहीतरी अगम्य फॅक्ट सांगणे वगैरे. शेवटी श्रोते बघून भाषण महत्वाचे. काही अशा ट्रिकचा सुंदर वापर करतात.एकदा एका वक्त्याने विचारले जेवणात खीर कुणाला आवडली, मग विचारले चिकन कुणाला आवडले. गुड याच अर्थ या उरलेल्या मंडळींचेच भाषणात लक्ष असणार आहे. लंचनंतर भाषण देणे हे किती कठीण काम असते असले गुळगुळीत बोलण्यापेक्षा ते छान होते.

कॉलेजला असताना विजय भटकर यांचे भाषण ऐकले होते आणि ते आजही लक्षात आहे. ऑनलाइनच्या काळात कंपनीने कॅप्टन रघुरामन यांचे ट्रेनींग आयोजित केले होते ते कंटेन्ट आणि पद्धत दोन्ही साठी आवडले

कुमार१'s picture

23 Dec 2021 - 10:54 am | कुमार१

वरील सर्वांच्या प्रतिसादातून उत्तम स्वानुभव आणि पूरक माहिती येत आहे.
सर्वांचे आभार !
..
*

बहुसंख्य लोकांसाठी कष्टसाध्य असते.

>>> +११

*

हळूहळू डायस ठेवून भाषण देणे बंद होईल कारण वायरलेस माइक, कॉलर माइक याचा प्रभावी वापर करणारे वक्ते येतील.

>>> +११
थोडेसे अवांतर..
नाट्यप्रयोगाच्याबाबतीतही बिनारंगमंचाची नाटके काही प्रमाणात होत असतात.

मदनबाण's picture

23 Dec 2021 - 9:16 pm | मदनबाण

ज्यांचं भाषण ऐकुन आणि भाषणातील कविता ऐकुन देखील खळखळात होतो, असे रामदास आठवले. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In A World Full Of Fish Be A Shark.

चंद्रसूर्यकुमार's picture

23 Dec 2021 - 9:21 pm | चंद्रसूर्यकुमार

अहाहा. काय आठवण करून दिली आहेत. २०१६ मध्ये ट्रम्पतात्या निवडून आल्यानंतर रामदास आठवलेंचा हा व्हिडिओ बघून अगदी हहपुवा झाली होती. ती बातमी देताना एबीपी माझावरील ज्ञानदाला हसायला कसे आले नाही तेच समजत नाही :)

कुमार१'s picture

23 Dec 2021 - 9:30 pm | कुमार१

लय भारी भारी ध्वनिफिती देताय बुवा तुम्ही ऐकायला !
आमची दमछाक होऊ लागली की.......

आता पुढचे चार-पाच दिवस त्यासाठी राखीव ठेवावे लागणार वो
😍

एकतर्फी भाषण करणे एकवेळ सोपे पण समोरुन येणार्‍या प्रश्नांना तोंड देणे हे अवघड असते.
माझ्या माहितीप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे श्रोत्यांबरोबर प्रश्नोत्तरे नेहमी शेवटी घ्यावीत. आक्रमक प्रश्नांना कसे हाताळावे आणि त्याची मानसिक तयारी असावी.
ट्रंप कशी उत्तरे देतात त्याचा एक नमुना

कुमार१'s picture

24 Dec 2021 - 9:41 am | कुमार१

समोरुन येणार्‍या प्रश्नांना तोंड देणे हे अवघड असते.

>> +१११
................................................

कला ही प्रयत्नसाध्य असते या मुद्द्याला अनुसरून माझाच ‘अपयशातून यश’ या प्रकारचा अनुभव लिहितो.

शाळेपासून ते थेट पदवी मिळेपर्यंत मी वक्तृत्व किंवा अन्य कुठल्याही स्पर्धांमध्ये भाग घेतलेला नव्हता. पुढे पदव्युत्तर शिक्षण चालू झाले. एकदा एका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेसाठी कॉलेजने चार जणांचा चमू निवडला होता. परंतु आयत्या वेळेस त्यातील एक जण गळाला. जो वक्तृत्व सचिव होता त्याला काही करून ती जागा फुकट घालवायची नव्हती. मग त्याने मला गळ घातली की तू स्पर्धेत भाग घे. क्षणभर मी गांगरलो. पण तोच म्हणाला, बिंदास बोल.
स्पर्धेसाठी निघालो. प्रवासात माझ्या लक्षात आले की बाकीचे तिघे हे या कलेत मुरलेले आहेत आणि आपणच नवखे आहोत. आमच्या सचिवाने एक तोडगा काढला. तो म्हणाला, “आयत्या वेळचा विषय हा जो स्पर्धेतला भाग आहे त्यासाठी तुझे नाव देतो”. म्हटलं, बर बघू काय होतय.
आता स्पर्धेच्या दिवशी त्यांनी पंधरा मिनिटे आधी आम्हाला विषय सांगितला. विचार केला पण फार काही मनासारखे सुचेना. तेवढ्यात एक भन्नाट कल्पना डोक्यात आली. स्वतःला म्हटलं, आपण बोलण्याची सुरुवात विक्रम आणि वेताळाच्या गोष्टी सारखी करूया म्हणजे ती आकर्षक होईल. पुढे मग जमेल तसे बोलायचे चार-पाच मिनिटं.

स्पर्धा सुरू झाली. माझा क्रमांक आला. मोठ्या आवेशात मी मंचावर गेलो आणि विक्रम-वेताळ पद्धतीने बोलायला सुरुवात केली. पहिली दोन मिनिटे मी बोलू शकलो आणि श्रोतेसुद्धा स्तिमित झाल्याचे मला जाणवले. पण पुढे मला काही मुद्दाच सुचेना आणि सुन्न झालो. मग,“ माफ करा” असे म्हणून मंच सोडून निघून आलो.

आता हे माझे अपयशच. पण यातून मला एक धडा मिळाला की, भाषणाची सुरुवात आकर्षक करणे हा भाग आपल्याला चांगला जमतोय. मग त्यानंतर मी वरील लेखात लिहिल्याप्रमाणे बराच अभ्यास आणि थोडेफार परिश्रम घेऊन ही कला विकसित करीत राहिलो.

पुढे काही वर्षानंतर मला त्यात बर्‍यापैकी गती आली. सध्या म्हणाल तर अशी परिस्थिती आहे. कौटुंबिक मेळावा मित्रांचे संमेलन किंवा एखाद्या (आरोग्य, पर्यावरण किंवा अन्य) विशेष दिनानिमित्त मला आमंत्रित म्हणून बोलावले जाते आणि तेव्हा श्रोत्यांना आवडेल असे मुद्देसूद आणि रंजक भाषण मी करू शकतो.

Trump's picture

24 Dec 2021 - 5:37 pm | Trump

सगळी तयारी संपणे, असे बरेचदा होते. त्यासाठी भरपुर पाणी घालता आले पाहीजे.

साधारणतः १ पान लिखाण = १ मिनिटे बोलणे असे ग्रुहीत धरावे.

ह्या धाग्यातुन पुढे वादविवाद (आंतरजालावरील नव्हेत, ;( ), मुलाखती कश्या द्याव्यात, आणि तयारी कशी करावी असे धागे होउ शकतील.

विषयाच्या तयारी + दिर्घकालीन केलेली मानसिक तयारी बरोबरच, तात्कालीन तयारीपण आवश्यक आहे.
उदा.
१. वेळेवर पोचणे. अचानक आलेली अड्चण (वाढलेली रहदारी, बंद रस्ते इ.) सोडवणे. त्यामुळे होणारी चिड्चिड टाळावी, कमीत कमी तोंड कसे द्यावे त्याची तयारी ठेवावी.
२. मुख्य दिवसापर्यंत योग्य शारीरीक क्षमता ठेवणे. मी बरेच जण बघितले आहेत, भरपुर तयारी करणार पण ऐनवेळी आजारी पडतात. उपायः योग्य आहार घ्यावा, शांतपणे झोपावे, भ्रमणध्वनी आणि आंतरजालाचा अतिरीक्त वापर टाळावा, सकारात्मक संगीत ऐकावे.
३. पुरेसे सैल आणि योग्य मापाचे, वातावरणानुसार, प्रंसगानुसार कपडे घालावेत. जर मंचकावर खुप हलचाल करायची असेल आणि कपडे योग्य नसतील तर मानसिक ताण निर्माण होते, मुख्य विषयाकडे दुर्लक्ष होते.
४. व्यसने. मुलाखतीला जाण्याआधी २ कप कॉफी किंवा तत्सम मादक पदार्थ साधारणतः दोन तास घ्यावेत. हे उद्योग करण्याआधी स्थानिक कायदे आणि होणारे दुष्परीणाम जाणुन घ्यावेत.
५. मुख्य दिवशी हलकेच खावे. भाषणाआधी, मुलाखतीआधी संडासला आणि लघवीला जाउन यावे. पादवायु तयार होईल असे पदार्थ टाळावेत.
६. छोटी वही आणि लेखिका (पेन) बरोबर बाळगावी. अचानक आठवलेल्या गोष्टींची नोंद करायला उपयोगी पडते.
७. स्वतांचा भ्रमणध्वनी (मोबाईल) बंद करावा, आणि इतरांना पण सांगावे. जर अचानक कोणाचा संदेश किंवा संपर्क (कॉल) येउ शकत असेत तर त्याची व्यवस्था करावी.

हा एक चांगला आदर्श आहे.

कुमार१'s picture

24 Dec 2021 - 4:22 pm | कुमार१

छान उपयुक्त सूचना.

वेळेवर पोचणे.

>>> +११११११
या संदर्भात माझ्या आमची भारतीय प्रमाणवेळ ! या लेखातील काही भाग डकवतो :

... कार्यक्रम मात्र वेळेवर सुरू न होता पाहुण्यांच्या येण्याच्या वेळेनुसार सुरू होतो व त्यांच्याच इच्छेनुसार संपतो. आपण वेळ न पाळल्यामुळे आपण हजारो लोकांच्या वेळेचा अपव्यय करतो याची जाणीव अशा मंडळीना कधी होणार?

हां, पण अशा मंडळीना सरळ करणारे काही मोजके संयोजक असतात. त्यासंबंधीचा हा एक घडलेला किस्सा. सुमारे २० वर्षांपूर्वीचा. महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था. तिचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम ठरला होता. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण होते. कार्यक्रमाचे सूत्रधार होते संस्थेतील एक कठोर शिस्तप्रिय गृहस्थ. कार्यक्रमाची वेळ होती सकाळी १० वाजता. हळूहळू सभागृह भरत होते. ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत पाहुण्यांचा पत्ता नव्हता. ९.५५ ला सूत्रधारांनी घोषणा केली की सर्वानी शांत बसावे, कार्यक्रम बरोबर १० वाजता सुरू होईल. १० वाजले. पाहुण्यांचा पत्ता नव्हताच. तसेच काही निरोपही नाही. १० च्या ठोक्याला सूत्रधारांनी कार्यक्रम सुरू केला. त्यांच्यापुढे बोलण्याची संस्थेतील कोणाची हिम्मत नव्हती.

आता कार्यक्रम चालू झाला होता. सुमारे दीड तासाने बाहेर मुख्यमंत्री अवतरले. कार्यक्रम सुरू झाल्याचे त्याना कळले. त्यावर त्यांनी फक्त स्मित केले आणि त्याच क्षणी बाहेरच्या बाहेर निघून जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर संध्याकाळी त्यांनी संस्थाप्रमुखाना फोन करून दिलगिरी व्यक्त केली.तो कार्यक्रम यथासांग पार पडला, हे सांगणे नलगे. असे वक्तशीर सूत्रधार व त्यांचा आदर करणारे मुख्यमंत्री हा योग दुर्मिळच मानावा लागेल! अन्यथा पाहुणा जेवढा अधिक प्रसिद्ध आणि वलयांकित तेवढा तो जास्तच उशीर करणार असे एक विचित्र समीकरण रूढ झालेले आढळते.......

कुमार१'s picture

29 Dec 2021 - 9:01 am | कुमार१

प्रंसगानुसार कपडे घालावेत

>>>
यावरून एक छान अवतरण आहे. ते अ‍ॅलिसन लुरी यांच्या ‘द लँग्वेज ऑफ क्लोज’ या पुस्तकातून घेतले आहे.

“कोणाकडेही आणि कुठेही तुम्ही गेलात, तरी तुमचं तोंड बोलण्यासाठी उघडण्यापूर्वी तुमचे कपडे समोरच्याशी बोलतात. तुमच्याविषयी बरच काही सांगतात”.

Trump's picture

29 Dec 2021 - 12:25 pm | Trump

बरेचदा लोक, अश्या प्रसंगासाठी ठेवणीतले कपडे वापरतात. ते कपडे नेहमीच्या वापरात नसल्यामुळे, एकतर घट्ट किंवा सैल होतात, अजुन बटणे तुटणे, काजे ढिले होणे, खिसा फाटणे असले प्रकार अचानक होतात, आणि मन त्यात गुंतुन जाते. त्यामुळे कपड्यांची आधी चाचणी घ्यावी.
जर टाय बांधायची असेल, नेमक्या त्या वेळी जास्त वेळ लागतो. त्यामुळे एकदा मार्गदर्शक चित्रमालिका जवळ असणे महत्वाचे.

अमर विश्वास's picture

24 Dec 2021 - 6:37 pm | अमर विश्वास

मी आठ वर्षे MBA कोर्स साठी शिकवत होतो ...

त्यात एक विषय Presentation Skills हा पण होता ...

presentation (किंवा भाषण) ची तयारी करताना संभाव्य प्रश्न (आणि त्याची उत्तरे) हा सुध्दा तयारीचाच एक भाग असणे आवश्यक.

काही वेळा मुद्दाम असे काही मुद्दे योग्य जागी तोडायचे कि आपल्याला आवश्यक ते प्रश्न येतील ...

विशेषतः प्रेझेंटेशन करताना योग्य जागी थांबून काही प्रश्न ? असे विचारणे योग्य ठरते ..

श्रोत्यांचा "attention span" हा २० मिनिटांपेक्षा कमी असतो त्यामुळे सलग मोठे प्रेझेंटेशन टाळून प्रश्नोत्तरे वगैरे रुपी ब्रेक देणे श्रेयस्कर ठरते

मदनबाण's picture

24 Dec 2021 - 9:59 pm | मदनबाण

२ वर्षां पूर्वी जे भाषण लोकसभेत गाजले ते लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी केले होते. हे भाषण वेळ काढुन ऐकावे असेच आहे.

जाता जाता :- सोसायटीत जे काही खेळ किंवा इतर उपक्रम व्हायचे त्यात मी लहान असताना भाग घ्यायचो. लोकमान्य टिळक यांच्यावर मी छोटे से भाषण दिले होते. माईक समोर दोन शब्द बोलल्यावर समोरचे लोक अचानक ते भाषण ऐकण्यासाठी शांत झाले होते आणि लोकांच्या गजबजण्याचा आवाज असा शांततेत बदलल्यामुळे माझा गळाच त्या वेळी सुकुन गेला होता. :))) काय बोलावे ते सुचेना... भाषणात पुढे काय पुढे बोलायचे ते आठवेना ! पण नंतर बोलु लागलो... जरासे घाई घाईतच पुढचे भाषण केले [ जसा काही वाघच माझ्या पाठी लागला असावा. ] आणि 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' ही लोकमान्यांनी दिलेली घोषण देऊन ते शेवटी संपवले. दुसरे पारितोषक म्हणुन डिक्शनेरी मिळाली होती, ती अजुन माझ्याकडे आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अच्छा लगता है मुझे उन लोगों से बाते करना, जो मेरे कुछ भी नही लगते...पर फिर भी मेरे बहुत कुछ है |

कुमार१'s picture

24 Dec 2021 - 10:13 pm | कुमार१

१.

प्रेझेंटेशन करताना योग्य जागी थांबून काही प्रश्न ? असे विचारणे योग्य ठरते

>>> +११
..................
२. '

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' ही लोकमान्यांनी दिलेली घोषण

>> हे मूळ वाक्य टिळकांनी इंग्लिशमध्ये उच्चारले होते. त्याचा मराठी अनुवाद करताना कित्येक वर्षांपूर्वी एक मूलभूत चूक झालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या असंख्य पिढ्यामध्ये ती पुढे चालू राहिलेली आहे.
यासंदर्भात एक चांगला लेख मागे मी वाचला होता. त्यात याचे स्पष्टीकरण आहे.
आपण इंग्लिश वाक्याकडे नीट पाहिले असता
"Swaraj is my birthright, and I shall have it!"

योग्य भाषांतर :
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच
असे आहे.
"स्वराज्य" साठी 'ते' असे सर्वनाम आहे
दुसरा मुद्दा.
जी गोष्ट जन्मसिद्ध अधिकार असतो ती झगडून मिळवण्याचा प्रश्नच येत नाही !
म्हणजेच,
वाक्याचे दोन भाग स्वतंत्रपणे विचारात घ्यायचे आहेत :

१. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि
२. ते स्वराज्य मी मिळवणारच

मराठी अनुवाद करताना कित्येक वर्षांपूर्वी एक मूलभूत चूक झालेली आहे
ओह्ह हे माहित नव्हते. यापुढे लक्षात ठेवीन.
जन्मसिद्ध अधिकार असल्यानो तो अधिकार मिळवणारच असे ते झाले असावे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अच्छा लगता है मुझे उन लोगों से बाते करना, जो मेरे कुछ भी नही लगते...पर फिर भी मेरे बहुत कुछ है |

कुमार१'s picture

26 Dec 2021 - 8:43 am | कुमार१

आजच्या छापील सकाळच्या सप्तरंग पुरवणीत ' नेहरु विरुद्ध मुखर्जी : अविस्मरणीय शाब्दिक द्वंद्व" हा चांगला लेख आहे.
भारताची पहिली घटना दुरुस्ती 1951 मध्ये झाली. तेव्हा संसदेमध्ये अनेकांची आक्रमक भाषणे झाली. ती चर्चा हा संसदेच्या इतिहासातील हे एक उत्कृष्ट वाद-विवाद मानला जातो.
चर्चेदरम्यान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले घणाघाती भाषण गाजले.
सोळा दिवस चाललेल्या चर्चेत संदर्भात दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत ती अशी :

1. Nehru : The debates that defined India
2. Sixteen stormy days

कुमार१'s picture

26 Dec 2021 - 10:50 am | कुमार१

आतापर्यंतच्या चर्चेत आपल्यातील काहीजणांनी जगातील विविध चांगल्या आणि दखलपात्र वक्त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी काहींच्या भाषणांचे दुवे/फिती सुद्धा दिलेल्या आहेत.

अशा वक्त्यांची एकूण संख्या २५ झालेली आहे ! मी सहज त्या नावांचे विश्लेषण केले. त्या सर्व वक्त्यांची विभागणी खालील प्रमाणे करता येईल :

१. राजकारणी : अब्राहम लिंकन, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, ॲडॉल्फ हिटलर, विन्स्टन चर्चिल, बिल क्लिंटन, जवाहरलाल नेहरू, श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, बराक ओबामा, नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, ज्यामयांग नामग्याल.

२. साहित्यिक : आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, माधव गडकरी, शिवाजीराव भोसले.

३. अभिनेता : बिल पुलमन
४. अर्थतज्ञ : मिल्टन फ्रीडमन
५. काल्पनिक पात्र : Dwight Schrute.

वरील क्रमांक १ व २ च्या गटांपैकी काही जणांचे योगदान त्या दोन्ही क्षेत्रांमध्ये आहे. एखादे नाव राहून गेले असल्यास क्षमस्व.

आतापर्यंतच्या चर्चेत अतिशय उत्साहाने भाग घेऊन वरील नामवंत वक्त्यांचे सर्वांना स्मरण करून दिल्याबद्दल मी सर्व संबंधित सभासदांचा मनापासून आभारी आहे !

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Dec 2021 - 10:59 am | चंद्रसूर्यकुमार

यात लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन/सेल्फ हेल्पवाल्यांचा पण समावेश करायचा असेल तर त्या विषयातील माझे आवडते वक्ते आहेत-
१. वेन डायर
२. गॅब्रीएल (गॅबी) बर्नस्टिन
३. बॉब प्रॉक्टर
४. नॉर्मन व्हिन्सेंट पील

जेम्स वांड's picture

26 Dec 2021 - 12:02 pm | जेम्स वांड

सुंदरबाई हॉलला पुस्तक प्रदर्शन लागले होते, तिथं सहज डोकावलो तर हे खालील पुस्तक दिसले होते, अर्थात मी हे विकत घेतले नाही कारण मला इतके अपील झाले नाही. पण असे स्पीच कलेक्शन्स वाचायला मजा येत असेल नाही एकंदरीत ?

.

कुमार१'s picture

26 Dec 2021 - 12:33 pm | कुमार१

* वाचायला मजा येत असेल नाही एकंदरीत ?
>>
नक्कीच. असे पुस्तक सावकाशीने सहा महिने घेत वाचल्यास अधिक छान वाटेल.

सुधीर कांदळकर's picture

28 Dec 2021 - 8:10 am | सुधीर कांदळकर

अनेक प्रकारे करतां येईल. मी मुख्य चार प्रकार केले आहेत.
१. शैक्षणिक आणि प्रशिक्षणविषयक. या भाषणात माहिती खच्चून भरलेली असते. कन्टेन्ट रिच. शिस्तबद्ध मांडणी आणि कमी शब्दात सत्याचा शोध घेत जास्तीत जास्त माहिती. तपशिलांना बर्‍याच वेळां उदाहरणांची, आकृत्यांची आणि ध्वनीचित्रांची जोड; यामुळे क्लिष्ट विषय सोपे केलेले असतात. नारळीकर, काकोडकर, माशेलकर, जे आरडी, रतन टाटा, टाटा समूहाचे पेंडसे, मुळगांवकर यांची भाषणे विचारप्रवर्तक असत. वाचून आश्चर्य वाटेल पण अर्थशास्त्र विषयातल्या एम एच्या विद्यार्थ्यांसाठी जॉर्ज फर्नांडीस यांना आमंत्रित केले जात असे.

प्रशिक्षणातील भाषणात पालखीवाला यांची ब्रेबॉर्न स्टेडियममधील भाषणे प्रख्यात आहेत. कायद्यात झालेले नवे बदल समजून त्याची औद्योगिक क्षेत्रात व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी भाषणसत्रे, परिषदा भरवल्या जातात. तीही उत्कृष्ट असतात. ठक्कर नावाचे एक तज्ञ वकील कामगार कायद्यात झालेल्या बदलांवर मुंबईला सेन्ट झेविअरमध्ये भाषणे आयोजित करीत. गुणशेखरन नावाचे एक तज्ञ एक्साईज कायद्यावर भाषणे आयोजित करीत. दोन्ही छानच असत.

औषध उद्योग नवीन आलेल्या औषधांवर उत्पादन विभागातील व्यक्तींसाठी प्रशिक्षण भाषणे ठेवीत. जागतिकीकरणानंतर औषध उत्पादनविषयक कायदे बदलले. तेव्हाही प्रशिक्षणे आयोजित केली गेली.

सरकारतर्फे कांही उत्साही अधिकारी कामगार कायद्यांविषयक तसेच औषध उत्पादन कायद्यांविषयक भाषणे आयोजित करीत.

रिचर्ड फेनमन यांचे सन १९५९ सालातले नॅनो तंत्रज्ञानावरील भाषण जगविख्यात आहे.

अमेरिकेत सभागृहात तिकीट लावून भाषणे ठेवली जात असत आणि अनेक वेळा सर्व तिकिटे विकली गेल्यावर उभे राहून भाषण ऐकायला कमी दरात तिकीट मिळत असे. असे अनेक वेळां होत असे.

चांगल्या भाषणात अपेक्षित प्रश्न, त्यांची उत्तरे बहुधा असतात. नवीन प्रश्नांसाठीही वेळ ठेवलेला असतो. अनेक वेळां मूळ भाषणापेक्षां प्रश्नोत्तरे जास्त रंगतात.

२. प्रचारकी भाषणे आणि
३. तत्त्वज्ञानावरील आणि धार्मिक भाषणे.
या प्रकारांवर वर बरेच आलेले आहे. मी कधी गेलों नाही म्हणून त्यांबद्दल काही लिहू शकत नाही.

४. ललित विषयांवरील व्याख्याने. यात वसंत व्याख्यानमालेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. म. वा. धोंड, विद्याधर गोखले इ.ची भाषणे ऐकायला बरीच गर्दी जमत असे.

छान लेखाबद्दल धन्यवाद.

कुमार१'s picture

28 Dec 2021 - 9:51 am | कुमार१

सुधीरभाऊ
सुंदर वर्गीकरण आणि विश्लेषण ! धन्यवाद.

वसंत व्याख्यानमालेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

सहमत. यावरून या व्याख्यानमालेचा एक जुना अनुभव.
तेव्हा बी जी कोळसे पाटील यांचे व्याख्यान होते. तरुणांसह अनेक जण त्यासाठी उत्सुकतेने आले होते. सगळ्यांचा अंदाज होता की ते मानवत हत्याकांड यासंबंधी बरच काही बोलतील.
प्रत्यक्षात त्यांनी भाषणात त्याचा फारसा काही उल्लेख केला नाही आणि ते एकंदरीत कायदा आणि समाज या विषयावरच बोलले.

गतवर्षी ही व्याख्यानमाला ऑनलाइन पद्धतीने झाली. त्यात एका दिवशी दिलीप माजगावकर यांची मुलाखत घेतली होती. ती छान होती.
काही वेळेस नुसते भाषण ऐकण्यापेक्षा मुलाखतीतून अधिक रंजक माहिती मिळते. अर्थात ते मुलाखत घेणारा व देणारा या दोघांच्या कौशल्यावर ठरते.

भाषणे जगभर लोकप्रिय होती. त्यांच्या भाषणांचा संग्रहही पाहिल्याचे आठवते आहे.

आल्बर्ट आईनस्टाईन यांच्या नोबेलसन्मानार्थ दिलेल्या सर जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफीत गेल्यावर्षी कायप्पावर आली होती. ते भाषण सुरेखच होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

28 Dec 2021 - 9:24 am | चंद्रसूर्यकुमार

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची इंग्रजी भाषणे जगभर लोकप्रिय होती.

ते काय बोलायचे ते श्रोत्यांना समजायचे का? हा खोचक प्रश्न नाही तर हा प्रश्न विचारायचे एक कारण आहे. एकदा मी त्यांचे भारतीय तत्वज्ञानावरील पुस्तक ग्रंथालयातून वाचायला आणले होते. त्यातील इंग्लिश भाषा फारच वेगळ्या आणि खूपच वरच्या पातळीवरील होती. जी.आर.ई ची वर्डलिस्ट करून त्यावेळी थोडाच काळ झाला असल्याने मला इंग्लिश शब्द बरेच येतात असा त्यावेळी गैरसमज झाला होता. पण कुठचे काय. दर वाक्यावाक्याला डिक्शनरी उघडावी लागत होती. असले शब्द बहुतेक शशी थरूरच वापरत असतील. स्वल्पविराम वापरून किंवा nevertheless, albeit, yet वगैरे उभयान्वयी अव्यये वापरून पाचसहा ओळींची मोठी मोठी वाक्ये होती. त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे समजून घ्यायला एकेक वाक्य तीनचार वेळा तरी कमितकमी वाचावे लागले होते. या प्रकारात पुस्तक वाचायचा आनंदच गेला. त्यानंतर हे पुस्तक वाचायची आणि समजून घ्यायची आपली लायकी नाही हे लक्षात आले आणि तो नाद सोडून दिला.

राधाकृष्णन वगैरेंपुढे आपण अगदी छोटे लोक आहोत. अगदी चिलटंच आहोत. तरीही एक गोष्ट जाणवतेच की कोणत्याही प्रकारच्या संवादाचे (लिखित किंवा भाषण) महत्वाचे उद्दिष्ट असते की आपले म्हणणे समोरच्यापर्यंत पोचले पाहिजे. एकदम मोठेमोठे शब्द वापरल्याने किंवा जड वाक्यरचना केल्याने त्यातच अडचण निर्माण झाली तर ते चांगले संवादकौशल्य म्हणावे का? सामान्य लोक-अगदी इंग्लिश मातृभाषा असलेले लोकही जी.आर.ई वर्डलिस्टमधील शब्द दररोजच्या व्यवहारात कधी वापरत नाहीत. त्यापेक्षा दहापट अधिक कठीण शब्द वापरले जात असतील तर संवादात नक्कीच अडचण निर्माण होईल ना? राधाकृष्णन हे खूप 'पोचलेले' आणि सामान्य माणसाच्या पातळीपेक्षा खूप वर होते. एखादी गोष्ट त्यांनी कितीही सोपी करून सांगितली तरी माझ्यासारख्याच्या झेपेपलीकडील असेल कदाचित. पण त्यामुळे लेखक आणि वाचक (किंवा कदाचित वक्ता आणि श्रोता) यांच्यात एक दरी निर्माण होते हे पण तितकेच खरे.

कुमार१'s picture

28 Dec 2021 - 10:27 am | कुमार१

लिखित किंवा भाषण) महत्वाचे उद्दिष्ट असते की आपले म्हणणे समोरच्यापर्यंत पोचले पाहिजे. एकदम मोठेमोठे शब्द वापरल्याने किंवा जड वाक्यरचना केल्याने त्यातच अडचण निर्माण झाली तर ते चांगले संवादकौशल्य म्हणावे का?

>>>> अगदीच सहमत.

श्रोत्यांना समजणारे बोलणे हे सर्वात महत्त्वाचे. यासंदर्भात एक अनुभव. महाराष्ट्रातील एक बुजुर्ग आहेत. ते तज्ञ असलेल्या कलेचा प्रांत एकदम वेगळा आहे. परंतु ते बऱ्यापैकी लेखन व भाषण या प्रांतातही लुडबूड करीत असतात. त्यांच्या कुठल्याही लेखनातील पहिल्या पाच सहा ओळी वाचल्या किंवा भाषणाची पहिली दोन मिनिटे जरी ऐकले, तरीसुद्धा त्यातील क्लिष्टता आणि रुक्षपणा जाणवतो. पुढचे वाचावे/ऐकावेसे वाटत नाही. कुठलीतरी टोकाची विचार सरणी रटाळपणे मांडून श्रोत्यांना प्रभावित करता येत नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Dec 2021 - 10:57 am | ज्ञानोबाचे पैजार

या वरुन अजून एक थोर व्यक्तीमत्व आठवले

आपले सर्वांचे लाडके म्हागृ...

कोणत्याही समारंभात यांच्या हाती माइक आला की ते जे सुरु होतात त्याला काही तोडच नाही.

पैजारबुवा,

कुमार१'s picture

1 Jan 2022 - 9:03 pm | कुमार१

म्हागृ.

>>> +११
....

ओबामा यांचे त्यांना निवडणूक जिंकून देणारे भाषण व त्याचे विश्लेषण .
आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2022 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय सर्व.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2022 - 11:36 am | कर्नलतपस्वी

लेख आणी प्रतीसाद एक व्हर्च्युअल ब्रेन स्टाँर्मीग झाल्या सारखे वाटले. लेखकांचे अभिनंदन.
शीव खेरा यांचे पण वक्तृत्व आवडले. प्रो चक्रवर्ती यांनी क्रिकेटचा सामना घेत मॅनेजमेंट कौशल्य यावर जवळपास तीन तास भाषण दिले होते.

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2022 - 11:39 am | कर्नलतपस्वी

लेख एकपट तर प्रतीसाद दसपट यशस्वी झाले आसे म्हणायचे आहे म्हणून शुद्धिप्रतीसाद. चुक भूल सुधारून घेणे.