बोंबललेल्या सुहागरातीची कहाणी (संपूर्ण)

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
6 Dec 2021 - 7:29 am

सृष्टीची रचना झाल्यापासून शेकडो वर्ष पृथ्वीतलावर राहिलेल्यांचा असा दृढ विश्वास आहे की इच्छाधारी साप कोणत्याही क्षणी कोणाचंही रुप धारण करु शकतात. असं माझं मत नाही बरं का, राजकुमार कोहली नामक मल्टीस्टारर सिनेमांचा कारखाना चालवणार्‍या महाभागाच्या एका सिनेमाची सुरवातच या अचाट वाक्याने होते. हा राजकुमार कोहली म्हणजे खंडीभर कलाकार घेऊन तीन तासाच्या सिनेमात त्यांना कोंबून कोंबून बसवण्यात पटाईत माणूस. याचा राजतिलक हा सिनेमा तर एंटीटी-रिलेशनशिप डायग्राम आणि फ्लो चार्ट काढणार्‍यात एक्सपर्ट असलेल्यांचंही डोकं गरगरेल असा प्रचंड कॉम्प्लेक्स प्रकार आहे. याच राजकुमार कोहलीला इच्छाधारी सापाबद्दल - खरंतर नागाबद्दल झालेल्या साक्षात्काराचा अचाट आणि अतर्क्य अर्क म्हणजे हा सिनेमा - नागिन

पहिल्याच सीनमध्ये एका बाजूने झिपर्‍या मोकळ्या सोडलेली रीना रॉय आणि दुसर्‍या बाजूने जंपींग जॅक शाळेतली मुलं 'मामाचं पत्रं हरवलं ते मला सापडलं' खेळताना ज्या वेगाने धावतील त्या वेगाने जंगलात धावताना दिसतात. आता हे दोघं भेटणार, बागडणार आणि गाणं सुरु होईल ही तुमची अपेक्षा असेल तर यू डोन्ट नो राजकुमार कोहली! रीना रॉयला शोधताना जॅकला एक ससाणा कम् गरुड दिसतो. धरम - वीर मधला वंडर बाझ शेरु याचा दूरचा भाऊबंद असावा (आठवा जंगमार की कुसूकू) असा तो ससाणा आणि जॅक यांच्या डोळ्यांचे क्लोजअप्स पाहिल्यावर यांच्यातच आता आखों ही आखों मे इशारा होणार आणि कहानीमें भलताच ट्वीस्ट येणार अशी शंका मला आली. जुन्या नागिनमध्ये नाग असलेली वैजयंतीमाला आणि सपेरा प्रदीपकुमार (आणि तो पण टॉपलेस) या हाडवैर्‍यांची लव्हस्टोरी पाहिली होती त्यामुळे नाग आणि गरुड यांच्यातली लव्हस्टोरीही अशक्य नाही, पण आपल्या नशीबाने राजकुमार कोहलीला हे सुचलं नसावं. त्यामुळे तो ससाणा जॅकवर अ‍ॅटॅक करतो. जॅकचा बचाव म्हणजे गवतात लोळण घेणे इतकंच. शेवटी ससाणा त्याला गाठतोच आणि चोचीने जखमी करणार इतक्यात ठो SS आणि ससाण्याचं अवतारकार्य समाप्त होतं.

मुन्नाभाईचे तीर्थरुप सुनिल दत्त ससाण्याला गोळी झाडून आपले प्राण वाचवतात हे पाहून जॅक त्याचे आभार मानतो. दत्तसाहेब इच्छाधारी सापांवर पुस्तक लिहित असतात आणि त्या रिसर्चसाठी हातात बंदूक घेऊन जंगलात फिरत असतात. त्याच्याकडून इच्छाधारींबद्दल ऐकल्यावर करोडो सापांपैकी एखादाच शंभर वर्षांच्या तपस्येनंतर इच्छाधारी होतो आणि कोणाचंही रुप धारण करु शकतो असलं अचाट ज्ञान त्याला देतो! बहुतेक नाग-नागिणींमध्ये आंतराष्ट्रीय स्तरावर मिस्टर युनिव्हर्स नाग आणि मिस युनिव्हर्स नागिण अशी स्पर्धा होत असावी आणि त्यातला विजेता नाग-नागिणच शंभर वर्षांनी इच्छाधारी बनत असावेत. जॅककडून इतकं कळल्यावरही दत्तसाहेबांची ट्यूबलाईट पेटत नाही, शेवटी जॅक त्याला नाग बनण्याचं लाईव्ह डेमो देतो आणि या शॉकमधून दत्तसाहेब आणि आपण बाहेर येण्यापूर्वीच पुढचे अडीच-तीन तास वेळोवेळी डोकं उठवणारं गाणं सुरु होतं - तेरे संग प्यार मै नही छोडना.....

या नागोबा जॅकची नागिण कोण तर रीना रॉय. गाणं गायला येण्यापूर्वी नागिणबाई जंगलात कुठेतरी असलेल्या ब्यूटीपार्लरमध्ये जाऊन आलेल्या असाव्यात, कारण झिपर्या कशाही उडत असल्या तरी अगदी नेलपॉलीश, मस्करा, लिपस्टीक अस सगळा साग्रसंगित जामानिमा आहे. बहुतेक मेकपचं सगळं बजेट नागिणीवरच खर्च झाल्याने डोक्याला एक पट्टी लावलेला आणि मिनीस्कर्ट घातलेला नाग अगदीच गरीब दिसतो. हे दोघं नाग - नागिण असल्यामुळे त्यांना सर्वांगाने डोलण्याच्या अ‍ॅक्शन्स कराव्या लागतात. अर्थात त्यावेळेस नगिना आलेला नसल्याने श्रीदेवी स्कूल ऑफ स्नेक डान्सिंग निघालेलं नव्हतं, त्यामुळे दोन्ही हातांनी फणा काढण्याची स्टँडर्ड अ‍ॅक्शन यात नाही आणि त्यानंतरही काही वर्षांनी आलेल्या शेषनागमध्ये जॅक आणि माधवीला जिभा लपालपा करायला लावून त्यांचं नागपण जसं ठाकून ठोकून एस्टॅब्लिश केलं जातं, त्यापुढे हा डॅन्स बराच सुसह्य वाटतो. दत्तसाहेब स्थितप्रज्ञपणे आणि मध्येच चकीत झाल्याचे एक्स्प्रेशन्स देत हा डॅन्स बघत असतानाच जॅक आणि रीना गवतात आडवे होतात आणि दुसर्‍या शॉटमध्ये एकदम नागरुपात वळवळून निघून जातात.

इथे मला छळणारा एक प्रश्न म्हणजे जॅक किंवा रीनातैंचं मानव टू नाग कन्व्हर्शन झाल्यावर नाग निसर्गावस्थेत असतो तसाच दिसतो म्हणजे त्यांच्या अंगावरचे कपडे गळून पडले पाहिजेत की नाही? तसंच दुसर्‍या बाजूने नागरुपातून मानवरुपात येताना अंगावर अगदी बरोबर फिट बसणारे कपडे कसे येतात? बर्‍याच वर्षांनी मल्लिकातैनी हिस्स नामक सिनेमात हे पथ्य - निसर्गावस्थेत मानवरुपात येण्याचं पाळलं होतं. याचं क्रेडीट मात्रं मल्लीकातैंच्याही आधी प्रदीप कुमार, भारत भूषण या दगड परंपरेचा एक पाईक असलेल्या राहुल रॉयचं! जुनून नामक भटपट आठवा त्याचा! वाघोबाचा माणूस होताना तो आपला वाघोबासारखाच निसर्गावस्थेत मानवरुपात येतो. यासाठी बहुतेक ऑब्जेक्ट ओरीएंटेड प्रोग्रॅमिंगचा वापर करत असावेत. मानव टू स्नेक कन्व्हर्शनसाठी एक फंक्शन वापरुन त्याला कपडे हा पॅरामिटर पास करुन कन्व्हर्शन प्रोसेस पूर्ण झाल्यावर त्या सबरुटीनमध्ये ग्लोबल व्हेरीएबलमध्ये कपडे सेव्ह केले जातात आणि मग स्नेक टू मानव कन्व्हर्शनच्या सबरुटीनमध्ये तेच ग्लोबल व्हेरीएबल अ‍ॅक्सेस करुन कपडे परत येतात असा बहुतेक अल्गॉरीदम असावा.

इच्छाधारी नागांची ही कहाणी दत्तसाहेब आपल्या मित्रांना सांगतात तेव्हा ते अपेक्षेप्रमाणे त्यांची खिल्ली उडवतात. आता हे मित्र कोण तर विनोद मेहरा, कबीर बेदी (याला पाहिल्यावर नागिण असली तरी तिचं काही खरं नाही हे मला वाटलंच!), फिरोज खान, एकावर एक फ्री म्हणून संजय खान आणि यांच्यात ऑड मॅन आऊट असलेला अनिल धवन! आपण पोटतिडीकीने इच्छाधारी नागाबद्दल यांना सांगतोय पण तरीही हे आपली खिल्ली उडवतात हे पाहून वैतागलेले दत्तसाहेब त्यांना आपल्याबरोबर जंगलात येण्याचं आव्हान देतात तेव्हा ही भानगड नक्की आहे तरी काय हे पाहण्यासाठी सगळे जंगलत जातात तो तिथे पुन्हा ते 'तेरे संग प्यार...' कानावर आदळतं. यावेळी रीना रॉय एकटीच नाचत असते आणि जॅक अद्याप 'स्नेक टू मॅन' कमांड प्रोसेस न झाल्याने वळवळत असतो. हा वळवळणारा नाग रीनाच्या अगदी चेहर्‍यासमोर असताना अनिल धवन त्याला गोळी घालतो. दत्तसाहेब नागाला शोधून पुरण्याचा प्लॅन करतात, कारण काय म्हणे तर नागाच्या डोळ्यात गोळी मारणार्‍यांचे फोटो असतात!

दत्त आणि कंपनी जॅकला शोधत असतानाच तो धड्पडत रीनाकडे येतो. गोळी लागण्यापूर्वी प्रोसेस न झालेली स्नेक टू मॅन कमांड एव्हाना प्रोसेस झालेली असल्याने तो मानवरुपात आलेला आहे. (नाहीतर डायलॉग कसे बोलणार ना?) हिंदी सिनेमातल्या माणसं गप मरत नाहीत, काहीतरी सांगूनच मरतात या अमर सिद्धांताला जागून तो टिपीकल सेंटी डायलॉग मारायला लागतो. ही रात्र म्हणे हजारो वर्षांनंतर आलेली त्यांच्या मिलनाची सुहागरात असते. अरे सुहागरात होती तर मुख्य कार्यक्रमाला सुरवात करायचीस ना लेका, गाणी कशाला गात बसतो! पुरेसे आचके दिल्यानंतर अखेर जॅक एकदाचा आटपतो. आता वास्तविक त्या 'तेरे संग प्यार....' गाण्यची दुसरी ओळ 'चाहे तेरे पीछे जग पडे छोडना' अशी असल्याने रीनातैनी जॅक गचकल्यावर आत्महत्या करुन आपले शब्द खरे करावेत की नाही? तसं झालं असतं तर पिक्चर तरी लवकर आटपला असता, पण नाही! थोडीफार रडारड केल्यावर रीनातै प्रत्येकाचा बदला घेण्याचं डिक्लेअर करतात. हेच का तुझं प्रेम? असो! जॅकच्या डोळ्यात त्यांना दत्त आणि कंपनीचे चेहरे दिसतात. आता आम्ही भरदिवसा डीएसएलआर कॅमेर्‍याने काढलेले फोटोही कधीकधी ब्लर येतात पण रात्रीच्या अंधारात जॅकच्या डोळ्यात मात्रं अगदी ईस्टमनकलरमध्ये फोटो! बहुतेक इच्छाधारी नागोबाच्या डोळ्यात टेलीफोटो झूमलेन्सचा कॅमेरा असावा असं मी स्वत:चं टेक्निकल समाधान करुन घेतलं.

सगळ्यात ऑड मॅन आऊट अनिल धवन असल्याने तो पहिल्यांदा टपकणार हे उघड होतं. त्याप्रमाणे रीनातै त्याला गाठतात आणि आपण सपेरन असून आपल्याला त्या नागाने जबरदस्तीने आपल्याला जखडून ठेवलं होतं आणि तूच मला सोडवलंस आणि मी स्वत:ला तुझ्या स्वाधिन करायला आले आहे अशी थाप मारुन त्याला व्यवस्थित घोळात घेतात. अनिल धवन अर्थातच पाघळतो आणि इतर सगळेजण येण्यापूर्वी रीनातै त्याचा गेम वाजवून पसार होतात.

अनिल धवन टपकल्यावर पुढचा नंबर विनोद मेहराचा. नागिण आपल्याला डसते आहे असं स्वप्न पडून तो जागा होतो आणि समोर त्याला दिसते योगिता बाली आणि सुलोचना मातोश्री. विनोद मेहराच्या सततच्या नागिणीच्या स्वप्नाला वैतागून त्यांनी गारुडी आणलेला असतो. हा गरुडी कोण तर जगदीप! जगदीप आपला टिपीकल आचरटपणा करुन एका सापाला पकडून बाहेर काढतो. सुलोचना मातोश्री विनोद मेहरा आणि योगिता बाली दोघांनाही उंडारायला बाहेर पाठवतात. हे दोघं नेमके फिरायला जातात तिथे नेमका हुकूमी पाऊस सुरू होतो. आता हे दोघं रंगात येणार तोच खरी योगिता बाली सुलोचना मातोश्रींकडे येते. विनोद मेहराचा गेम वाजवणार इतक्यात अरुणा इराणी टपकते आणि रीनातैचा प्लान बोंबलतो. पार्टीतल्या गाण्यात दत्तसाहेबांना सुलोचना आणि खर्‍या योगिता बालीला घेऊन तिथे येण्याइतका वेळ दिला जातो. अखेर व्यवस्थित वेळ साधून योगिताबालीच्या रुपातली रीना विनोद मेहराला रुममध्ये नेते आणि त्याचा गेम करतेच. विनोद मेहराचा मृतदेह पाहून सुलोचनाबाई ओक्साबोक्शी रडतात पण खर्‍या योगिताबालीच्या डोळ्यातून मात्रं टिपूसही येत नाही हा एक भलताच रिएलिस्टीक सिन बघायला मिळतो.

दोन मर्डर केल्यावर रीनातै पुन्हा एकदा जंगलात. इथे विधवा म्हणून त्या पाच सेकंद पांढर्‍या साडीत दिसतात आणि लगेच फ्लॅशबॅक सुरु! फ्लॅशबॅकमध्ये जॅक रीनातैना किस करणार तोच एकदम फ्लॅशबॅक अ‍ॅबरप्टली संपतो. दरम्यान दत्तसाहेब त्यांच्या ओळखीच्या एका मांत्रिकाकडे नेतात. हा मांत्रिकबाबा कोण तर प्रेमनाथ! प्रेमनाथबाबा आधी यांना धुडकावूनच लावतो. यांना कलटी दिल्यावर आता हा रीना रॉयला पकडून तिची पद्मा खन्ना करणार आणि पुन्हा एकदा 'हुस्न के लाखो रंग' वर कॅब्रे करायला लावणार असा भलताच कीडा माझ्या डोक्यात वळवळला, पण सुदैवाने एक-दोन सेंटी डायलॉग्ज ऐकवून दत्त आणि कंपनी प्रेमनाथला पटवतात. प्रेमनाथ त्यांना ॐ चे ताईत देतो. या सगळ्यांमध्ये कबीर बेदी प्रॅक्टीकल असतो. त्याचा या ॐ वर वगैरे विश्वास नसतो. मग ॐ चा अँटीव्हायरस हा नागोबा व्हायरसपेक्षा पॉवरफूल असल्याचा त्याला डेमो देण्यात येतो आणि नास्तिक कबीर बेदी एकदम आस्तिक!

घरी आलेला कबीर बेदी बायकोबरोबर रंगात आलेला असतानाच तिचा भाऊ आजारी असल्याची बरोबर नेमक्या वेळी तार येते. टॉपऑर्डर बॅट्समनने बराच वेळ शील्ड केल्यानंतर टेलएण्डरला विरुद्ध टीमच्या टॉप बॉलरसमोर एक्सपोज करावा अगदी त्या थाटात प्रत्येक मित्राच्या घरी कोणत्याही वेळेस पोहोचण्याचं टायमिंग असलेले दत्तसाहेब तिथे येतात आणि कबीर बेदीच्या बायकोला गावी नेण्याची जबाबदारी घेऊन त्याला रीनातैंसाठी मोकळा करतात. कबीर बेदी एकटा असलेला पाहून प्रेमा नारायण तिथे येते आणि बेदीसाहेब अर्थातच पाघळतात! त्यातच प्रेमा नारायण शादी का जोडा घालून त्याला आणखीन सिड्यूस करते. कबीर बेदीच्या दारुच्या ग्लासात विष थुंकून (हॉस्टेलवरच्या अनिष्ट प्रथा आठवल्या?) ती त्याला तो ग्लास देते, पण दत्तसाहेब नेमके वेळेवर येतात. ग्लासमध्ये विष होतं हे भिंतीवरच्या निळ्या द्रवाने सिद्ध होतं आणि निदाय या वेळेपुरतातरी सुनिल दत्तरुपी डीआरएस वेळेवर मिळाल्याने कबीर बेदीची विकेट जात नाही.

दरम्यान प्रेमनाथने दत्त आणि कंपनीला ॐ चा ताईत दिल्याने वैतागलेली रीना त्याच्या गुहेत येऊन त्याला चॅलेंज देते. इथे जगदीप प्रेमनाथचा शिष्य असल्याचा शॉक आपल्याला मिळतो. दरम्यान ४-५ रँडम लोकांना बडवणारा रणजीत पाहून प्रेमा नारायण त्याला घोळात घेण्याचा प्लान करुन आपली इमोशनल स्टोरी त्याला भैया म्हणून ऐकवते. जन्मभर व्हिलनचे रोल्स केलेल्या रणजीतला आपल्याला भैया म्हटल्यावर शॉकच बसतो. इथे 'तू मला दरवेळेस भैया का बनवतेस?' असं रणजीतने नक्कीच रीना रॉयला वैतागून विचरलं असणार कारण हाच प्रकार ती पुढे लक्ष्मी नामक सिनेमातही करते. रणजीतला भैया बनवून प्रेमा नारायण त्याला कबीर बेदीकडे आणते आणि दोघांच्या मारामारीत कबीर बेदीच्या गळ्यातला ओमचा ताईत तुटल्यावर पर्फेक्ट टायमिंगने आणि दत्तसाहेबांचा डीआरएस पंधरा सेकंदं संपल्यानंतर आल्याने कबीर बेदीची विकेट पडते.

तिघांना उडवल्यावर पुन्हा एकदा रीनातैं जंगलात फ्लॅशबॉकमध्ये जॅकबरोबर तेरे संग प्यार मै... करुन बागडत असताना प्रेमनाथबाबा येतात आणि परत तो फ्लॅशबॅक अ‍ॅबरप्टली संपतो. प्रेमनाथच्या अखंड पुंगी वाजवण्याने डोकं उठलेली रीना अखेर नागरुपात येते आणि प्रेमनाथ तिला पकडून पेटार्‍यात ठेवतो. प्रेमनाथने पेटार्‍यात ठेवलेल्या रीनातैना घेऊन संजय खान पळ काढतो पण वाटेत धडपडल्याने रीनातै मोकळ्या होतात आणि त्याचा गेम करतात. आता दोनच उरले आणि हिंदी सिनेमाच्या परंपरेप्रमाणे दत्तसाहेब मेन हिरो असल्याने ते काय मरत नाहीत याची खात्री असल्याने एक फिरोज खान खपला की एकदाचं प्यार नै छोडना संपणार असा सुटकेचा नि:श्वास टाकण्यापूर्वीच संजय खान धाड्कन जागा होतो आणि हे सगळं स्वप्नं होतं याची कल्पना आल्यावर मी कपाळावर हात मारुन घेतो.

दत्तसाहेब आणि खानबंधू प्रेमनाथचा असिस्टंट असलेल्या जगदीपला पैसे चारुन त्याच्याकडून पकडलेली नागिण घेतात आणि तिला गोळ्या घालतात. अर्थात अद्याप तासभराचा सिनेमा बाकी असल्याने रीनातै आटपलेल्या नसणार हे उघड आहे. संजय खानच्या पोरीला ओलीस धरुन त्याच्या गळ्यातला ताईत काढायला लावून रीना त्याचा गेम वाजवते. वैतागलेला फिरोज खान जंगलात रीनाला शोधत फिरतो आणि तिला गोळ्या घालतो, पण अर्थातच ती सुमडीत निसटून जाते. दरम्यान फिरोज खानची हिरवीण म्हणून गुटगुटीत मुमताज प्रगटते. आधी फिरोजभाई तिला नागिणच समजतात पण पुन्हा दत्तसाहेबांचा डीआरएस कामाला येतो आणि मुमताज नागिण नसल्याचं सिद्ध होण्यासाठी ती ओमचा ताईत फिरोजच्या गळ्यात घालते. दोघांचं एक गाणंबिणं गाऊन झाल्यावर रीनातै तिथे टपकतात आणि मुमताजला एक कराटे चॉप मारुन बेशुद्ध करतात आणि मुमताजचा अवतार घेऊन पद्धतशीरपणे फिरोज खानचा गेम वाजवतात.

इथे मुकद्दर का सिकंदरमध्ये ट्रान्सफॉर्म्ड अवतार घेण्यापूर्वीच्या गोलमटोल आणि गुटगुटीत रेखातै दत्तसाहेबांना प्रपोज करतात पण दत्तसाहेब आपल्यावर मौतका सायाचा लंबाचौडा डायलॉग ठेवून नकार देतात. इथे सत्यवान - सावित्रीचाही एक अचाट संदर्भ येतो. दत्तसाहेबानी नकार दिल्याने रेखा वैतागलेली असतानाच रीनातै तिथे टपकतात आणि थोड्याफार डायलॉगबाजीनंतर दोघींची झकासपैकी प्रचंड विनोदी कॅटफाईट बघायला मिळते. कॅटफाईट सुरु असतानाच रीनाची अचानक नागिण झालेली पाहून रेखाला फेफरं येतं आणि रीनातै आरामात तिथून सटकतात. या कॅटफाईटला एन्जॉय करणारी रेखाची मैत्रिण रेखा अचानक बेशुद्ध झालेली पाहून 'च्यायला इतक्यात काय यार, अजून तर मी पॉपकॉर्नपण आणले नाहीत' असा चेहरा करुन दत्तसाहेबाना फोनवरुन ही खबर देते तोच त्याच्या दाराबाहेर रेखा हजर!

दत्तसाहेब मेन हिरो असल्याने ते रीनातैना ओळखतात आणि चाणाक्षपणे तिला नागिण म्हणून एक्सपोज करतात आणि डोंगराच्या कड्यावरुन ढकलून देतात. रीना अर्थातच मरत नाही पण ती मेल्याची समजूत झाल्याने दत्तसाहेब ॐ चा ताईत प्रेमनाथला परत करतात. तो जाण्याची वाटच बघत असलेली रीना प्रेमनाथच्या गुहेत प्रगटते. संपूर्ण सिनेमाभर लांब केस घेऊन फिरत असलेली रीना इथे मात्र बॉबकटमध्ये दिसते. बहुतेक पुन्हा जंगलातल्या पार्लरमध्ये जावून आली असावी. दोन-चार डायलॉग्ज मारल्यावर प्रेमनाथ तिचा कायमचा बंदोबस्त करण्याची धमकी देतो पण त्यापूर्वीच ती त्याचाही गेम करते. मरता मरता गप्प मरायचं नाही या हिंदी सिनेमातल्या सनातन सिद्धांताला जागून इतर कोणीच न उरल्याने प्रेमनाथ नागाशी बोलतो आणि त्याला रीनाच्या मागे सोडतो. रीनातै रेखाचं रुप घेऊन दत्तसाहेबांकडे येतात आणि पद्धतशीरपणे त्याच्याकडून प्रेमनाथच्या नागाचा गेम वाजवून घेतात.

सगळे प्रश्न संपले या आनंदात दत्तसाहेब प्यायला बसतात आणि पुन्हा एकदा रेखाने ग्लासात विष थुंकल्याचा सिन बघायला मिळतो. आरशात रेखाऐवजी नागिण दिसल्याने सावध झालेले दत्तसाहेब दारु न पिता मेल्याची अ‍ॅक्टींग करत पडतात. रेखा त्याच्या पाठीवरुन पाय टाकून नाचताना पाहून बिचार्‍या सुनिल दत्तची कीव येते. तो मध्येच उठून गाणं कंटीन्यू करतो तेव्हा रेखाचे एक्स्प्रेशन्स बघण्यासारखे आहेत, पण तो डीआरएस मध्ये एक्स्पर्ट असल्याने आपल्याला आश्चर्य वाटत नाही. गाणं संपल्यावर संजय खानच्या मुलीला वाचवताना दत्तसाहेब तिच्यासकट दोरावर लटकतात. इथे नागिणीला दारालाअ कडी घालता येते हे ज्ञान राजकुमार कोहली आपल्याला देतात. शेवटी एकदाची दोरावर लटकलेली नागिण दत्तसाहेब खाली पाडतात आणि स्वत:सकट नको त्या वेळेस मध्ये कडमडलेल्या पोरीला वाचवतात.

आतापर्यंतच्या सगळ्या चमत्कारांवर कडी करणारा प्रकार म्हणजे क्लायमॅक्सच्या सीनमध्ये लोखंडाच्या फेन्सवर पडलेल्या रीनातै नागरुपातून मानवरुपात येतात. आजूबाजूचं तमाम पब्लीक 'हे तर काय, अगदी रोजचंच आहे' असे निर्विकार चेहरे करुन तिथे तसंच उभं! एक सेंटी डायलॉग मारुन रीनातै एकदाच्या आटपतात. त्यांच्या स्वागताला स्वर्गातून किंवा नागलोकातून जॅक पुन्हा तेरे संग प्यार नही छोडना म्हणायला हजर!

थोडक्यात काय,
करोडो वर्षांतून येणारी सुहागरात असेल तर गाण्याबिण्याच्या भानगडीत न पडता मुख्य कामाला सुरवात करा कारण स्नेक टू मॅन कन्व्हर्शनची कमांड योग्य वेळी प्रोसेस न झाल्यास सुहागरात बोंबलते.

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

6 Dec 2021 - 9:21 am | संजय पाटिल

मेलो........
=)))))

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Dec 2021 - 10:25 am | ज्ञानोबाचे पैजार

सालटी काढली आहेत सिनेमाची..
काही काही पंचेस तर कहर आहेत.
इतक्या बारकाईने सिनेमा बघायचे आमच्यात पेशन्स नाहित.
पैजारबुवा,

अनन्त अवधुत's picture

6 Dec 2021 - 10:26 am | अनन्त अवधुत

वारल्या गेलो आहे. ते ऊप्स चे फंडे तर खतरनाक__/\__

अनिंद्य's picture

6 Dec 2021 - 11:30 am | अनिंद्य

जबरी !

मिस्टर युनिव्हर्स नाग आणि मिस युनिव्हर्स नागिण स्पर्धा :-)
ऑब्जेक्ट ओरीएंटेड प्रोग्रॅमिंग :-)
मरताना गप्प मरायचं नाही असा हिंदी सिनेमातला सनातन सिद्धांत :-)

खूप हसलो.

जेम्स वांड's picture

6 Dec 2021 - 11:38 am | जेम्स वांड

&#129315 &#129315 &#129315 &#129315

एक फारेण्ड आणि दुसरे स्पार्टनएण्ड.

अभिजीत अवलिया's picture

6 Dec 2021 - 1:39 pm | अभिजीत अवलिया

खूप हसलो आज. जबरदस्त.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2021 - 2:25 pm | मुक्त विहारि

हा सिनेमा बघीतला आहे ....

घंटा काही म्हणता काही आठवत न्हवते ...

आपल्या स्मरणशक्तीला दंडवत

राघव's picture

6 Dec 2021 - 3:15 pm | राघव

दंडवत घ्यावा राव.. किती तो पेशन्स! =))

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Dec 2021 - 3:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

जबरदस्त चिरफाड केली आहे राव. वाक्यावाक्याला पंचेस, एव्ह्ढे सगळे लक्षात ठेवायचे म्हणजे ३-४ वेळा तरी चित्रपट बघावा लागला असेल नै?
आणि स्टोरीचे कन्क्लुजन तर झकासच :)

सरनौबत's picture

6 Dec 2021 - 4:00 pm | सरनौबत

नुसता धुमाकूळ! हसण्यावर टॅक्स असता तर हा लेख वाचून कर्जबाजारी झालो असतो

तुषार काळभोर's picture

6 Dec 2021 - 9:54 pm | तुषार काळभोर

लई वर्षांपूर्वी डब्ब शिनुमा यायच्या आधीच्या काळात, झी सिनेमावर हा पिक्चर दर आठवड्याला लागायचा. तेव्हा इतर जास्त पर्याय नसल्याने दोन चार वेळा हा पिक्चर बघितलाय. तेव्हा मजा यायची. तेव्हाही बरेच प्रश्न पडायचे. पण ते सोयीस्कररीत्या बाजूला ठेवून बघून आनंद घेतलाय. बाकी नक्की कोणता हिरो काय करतो अन् कोणती हिरविन कोणत्या हिरोबरोबर नाचणार हे दिग्दर्शक कसा लक्षात ठेवत असेल, याचं कोडं अजून उलगडलेलं नाही.

सोत्रि's picture

7 Dec 2021 - 5:46 am | सोत्रि

क ड क!

- (सिनेमाप्रमी) सोकाजी

कर्नलतपस्वी's picture

7 Dec 2021 - 10:41 am | कर्नलतपस्वी

सिनेमा बघताना प्याला भरून प्याला सोमरस आसेल तर आनंद द्विगुणित होतो अन्यथा डोक्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नीलस्वप्निल's picture

7 Dec 2021 - 8:42 pm | नीलस्वप्निल

खूप हसलो आज... मस्तच :)

तुम्ही सिनेमागली वर आहात काय ?

स्पार्टाकस's picture

9 Dec 2021 - 7:09 am | स्पार्टाकस

आहे, तिथेही टाकलंय हे

lakhu risbud's picture

8 Dec 2021 - 10:24 pm | lakhu risbud

परीक्षण लिहिण्यासाठी फारच कष्ट घेतलेत.

उत्तम पिसे काढली आहेत.
आता जानी दुष्मन या सदाबहार चित्रपटाची पिसेच काय स्कीन ही काढा लवकर !

अनन्त अवधुत's picture

9 Dec 2021 - 3:55 am | अनन्त अवधुत

आता जानी दुष्मन या सदाबहार चित्रपटाची पिसेच काय स्कीन ही काढा लवकर !

+१

रावसाहेब चिंगभूतकर's picture

9 Dec 2021 - 12:48 pm | रावसाहेब चिंगभूतकर

http://misalpav.com/node/21940

इथे पिसे काढलेली दिसतायत.

स्पार्टाकस's picture

10 Dec 2021 - 12:21 am | स्पार्टाकस

हा नवीन जानी दुष्मन
या अरमान कोहलीच्या बापानेच - ज्याने हा काढलाय - त्याने जुना जानी दुष्मनही काढला होता.
संजीवकुमारला झपाटणारं भूत जे लाल साडीतल्या नव्या नवरीचा खून करतं.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

9 Dec 2021 - 1:11 pm | ॲबसेंट माइंडेड ...

भारीच लिहिलंय.

गामा पैलवान's picture

10 Dec 2021 - 10:25 pm | गामा पैलवान

हाहाहा, मस्तं लिहिलंय. पिच्चरात केवल शेणसडा होऊन गेला. ही सुहागरात कसली सुसुहागरात म्हणायची.
-गा.पै.

फारएन्ड's picture

13 Dec 2021 - 3:25 am | फारएन्ड

मायबोलीवर पूर्वी या विषयावर अनेकांनी लिहीले होते. त्यातील कोणता आयडी तुमचा आहे का? त्या चर्चेतील अनेक वाक्ये या लेखात आली आहेत.
चर्चेचा धागा
https://www.maayboli.com/hitguj/messages/644/131487.html
https://www.maayboli.com/hitguj/messages/644/131536.html?1189540652

काही उदाहरणे:
- "पण मरताना ती रीना रॉयच्या रूपात परत येते व आजूबाजूची गर्दी "हे नेहमीचंच आहे अशा आविर्भावात ते पाहते"
- मि नाग व मिस नागिण स्पर्धा
- हॉस्टेल मधल्या अनिष्ट प्रथा
- "डोके उठवणारी" ट्यून
- "हेच का तुझं प्रेम" (त्या चर्चेतील "नगीना" चा पॅरा)
- जुनून चा संदर्भ - "निसर्गावस्थेत तसाच जागा होतो/मानवस्वरूपात परत येतो"

जेम्स वांड's picture

13 Dec 2021 - 11:46 am | जेम्स वांड

कठीण आहे राव हे सगळं एकंदरीत.

स्पार्टाकस's picture

13 Dec 2021 - 5:35 pm | स्पार्टाकस

बर्‍याच वर्षांपूर्वी आयडी होता, त्यावेळी काही लेख नजरेखालून गेले होते.
त्यातल्या काही गोष्टी आठवलेल्या इथे आलेल्या आहेत.
सिनेमाच्या परिक्षणात तू, श्रद्धा आणि पायस हे गुरु!

मी पण स्टीव बकनरच्या लीला असा प्रतिसाद दिला होता आणि नंतर तुमचा उपप्रतिसाद वाचल्यावर आठवले की तुमच्या लेखातला काही भाग, वाक्यरचना माझ्या प्रतिसादात होती. तुमचा लेख वाचून बरेच महिने किंवा वर्षे झाली होती. :)

विजुभाऊ's picture

13 Dec 2021 - 6:34 pm | विजुभाऊ

एक सिनेमा आहे असाच बहुतेक रामसे चा असावा.
त्यात हीरॉईन लाल रंगाचा खिळा घेऊन हीरोचा सतट पाठलाग करत असते.
आठवतोय का कोणाला

स्पार्टाकस's picture

15 Dec 2021 - 8:54 pm | स्पार्टाकस

रामसेचा माहित नाही पण बीस साल बाद मध्ये डिंपलतै मिथुनदांना दोन खिळे लावतात.

सौंदाळा's picture

13 Dec 2021 - 7:09 pm | सौंदाळा

गुंडा या अजरामर मिथुनपटाचे परीक्षण कोणी लिहिले आहे का? असल्यास कृपया लिंक शेअर करावी.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2021 - 7:20 pm | मुक्त विहारि
मुक्त विहारि's picture

13 Dec 2021 - 7:20 pm | मुक्त विहारि
अमरेंद्र बाहुबली's picture

29 Dec 2021 - 12:40 am | अमरेंद्र बाहुबली

लेख आधी कुठेतरी वाचल्या सारखा वाटतोय.