विपश्यना आणि रॅन्डम मी

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
21 Nov 2021 - 12:51 pm

(हे वाचणाऱ्यास विपश्यनेच्या दहा दिवसांच्या कोर्ससंबंधी अनुभवाने किंवा ऐकून वाचून माहिती असेल, असं गृहीत धरून लिहितोय.)

१. तर फारा वर्षांनी एकदाचा दहा‌ दिवसांच्या सुट्टीचा जुगाड करून, पद्धतशीर बॅग वगैरे घेऊन, ट्रेनमधून उतरलो.
रिक्षातून विपश्यना सेंटरच्या दिशेने जाताना 'कदम बंधू बिअर शॉपी' असा एक ओझरता बोर्ड दिसला.
म्हटलं, कोर्स संपल्यानंतर आपल्यासारख्यांसाठी ह्या कदम बंधूंनी जवळच 'सोय' करून ठेवली आहे, हे एक बरंय.

रिक्षातून उतरलो तर सेंटरच्या गेटवरच्या छोट्याशा हॉटेल कम् टपरीमध्ये दोन समवयस्क तरूण सिगरेट ओढत उभे. ते विपश्यनेसाठीच आले असणार, हे मला लगेच समजले.
कारण पुढचे दहा दिवस सिगरेट किंवा तत्सम पदार्थांची तीव्र निकड भासणार, म्हणून आधीच मनसोक्त तलफ भागवून घ्यावी, हा विचार मला नाही कळणार तर कुणाला कळणार!

२. बाहेरचा सगळा नजारा एकदा बघून घेतला आणि गेटमधून आत गेलो तर संपूर्ण परिसर एकदम शांत.

रजिस्ट्रेशन काउंटरवर डॉक्युमेंटस जमा.
प्रत्येकास सेपेरेट रूम. रूममधून आकाश दिसतंय. झाडं आणि पक्षी दिसतायत. आणि दूरवर डोंगरही दिसतायत. एवढं पुरेसं आहे.

नंतर मोबाईल, वॉलेट वगैरे त्यांच्याकडे जमा.
एक दोघांची तिथे हाय हॅलो पुरती ओळख.
तुम्ही कुठले. मी इथला. वगैरे टाईपची.
अशा औपचारिक अनोळखी ठिकाणी तरूण जे करतात ते म्हणजे, सहज इकडं तिकडं पाहिल्यासारखं करत क्राउडमध्ये जरा ॲस्थेटिकली चांगलं कुठे काही दिसतंय का वगैरे...
परंतु हे एकमेकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीची कसरत फार करावी लागते ह्यात.
बाकी माझे ॲस्थेटिक्सचे निकष हे तसे दारिद्र्यरेषेच्या साधारण वीस फूट खालचे असल्यामुळे मला त्याबाबतीत समाधानी होण्यात कधीच अडचण येत नाही. तिथेही आली नाही. पण ते एक असो.

मग संध्याकाळी सगळ्यांना एकत्रितपणे नियम वगैरे सांगण्यासाठी एक छोटासा सेशन.
तो सेशन संपल्या क्षणापासून नऊ दिवसांचं 'आर्यमौन' सुरू.
आता सगळ्यांची आयडेंटिटी एकच -'सा ध क'

३. झोप. पहाटे चारला घंटेचे टोल पडतायत. धम्मसेवक छोटीशी घंटी वाजवत रूमच्या पुढून निघून गेलेले ऐकू येतायत.
पापण्यांना बहुतेक लोहचुंबक बांधून ठेवलेयत. डोळे चुरचुरतायत. उघडायला ठाम नकार देतायत.. रोजच्या गणितात काहीतरी त्रासदायक बिघाड झाल्याचं संपूर्ण शरीराला कळतंय.
''साला हे पहाटे चार म्हणजे जरा जास्तच लवकर होतंय..! एवढ्या रात्री उठून कुठे कुणी ध्यानबिन करत असतं काय..! ही झोपायची वेळ आहे..! झोप नीट पूर्ण नाय झाली तर ध्यान कसं करणार..! शिवाय गारठाही किती आहे बाहेर..! झोप..! काय नाय होत..! कुणी बोलवायला आलं तर बघू..''
अशी माझी ड्रामेबाजी किंवा तत्सम पिरपिर वगैरे चाललेली असतानाच डॉट साडेचारला धम्मसेवकाकडून दारावर टकटक..!
मग उर्वरित काळात कधी वेळ चुकवली नाही.

४. ओह् नो..!
काही साधकांना पचनसंस्थेसंबंधी वगैरे विकार आहेत, असं दिसतंय. आणि ह्या विकारांनी बऱ्यापैकी जुनाट आणि दुर्धर किंवा तत्सम उग्र स्वरूप धारण केलेलं आहे, असंही दिसतंय.
कारण स्वतःच्या गॅसेसवर नियंत्रण ठेवणं, त्या बिचाऱ्यांना जमत नाहीये. ॲलोपॅथी,आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी किंवा तत्सम बंगाली बाबा वगैरे सर्व शाखांनी ह्यांच्यापुढे हात टेकले असतील काय?
की ह्या विकारापुढे ह्या साधकांनी स्वतःहूनच सपशेल हार मानलेली असेल?? कारण काळवेळेचे, स्थळाचे वगैरे बंधनही आता त्यांस क्षुद्र वाटते आहे..! की हे सगळे पहिल्याच दिवशी स्थलकालाच्या सीमा उल्लंघून जाण्यात यशस्वी झाले आहेत ?

बाकी काहीही असलं तरी तो विशिष्ट आवाज असा असतो की तो ऐकताक्षणी जगातला कोणताही मनुष्य गंभीर/तटस्थ राहू शकत नाही. हसू येणं अगदी स्वाभाविक.

आणि ध्यानासाठी हॉलमध्ये सगळे डोळे मिटून
बसलेले असताना समजा असे वेगवेगळे सूक्ष्म,अतिसूक्ष्म पिपाणीसारखे किंवा समजा आपटीबारांसारखे दीर्घ पल्लेदार मोकळेढाकळे आवाज कानावर आले, तर मग हसू दाबणं हीच एक मोठी खडतर साधना होऊन बसतेय..!
त्यामुळे ह्या पिपाणीवादक किंवा तत्सम ढोल किंवा पियानोवादक साधकांना आत्ताच कुणीतरी आवरलं पाहिजे.
नाहीतर पुढचे नऊ दिवस हे स्वतःच्या घरातच असल्याप्रमाणे निर्ढावत जातील आणि मग याहून मोठ्ठे स्फोट ऐकत बसावे लागेल नंतर नंतर...!

हे सगळं चालतच राहणार पाटला. तू इथं कशासाठी आलायस.! तू तुझा तुझा श्वास बघ.

५. मग सकाळी सहा ते साडेसहा गोयंका गुरूजींच्या
आवाजातले पाली भाषेतील तालबद्ध लयबद्ध जप. त्यातला एक शब्दही समजत नाही..! पण मन गुंगावतं..! झंकारत राहतं..!

नंतर आंघोळ करतोय. दुरून गुरूजींचे हिंदी दोहे कानावर पडतायत.. सुंदर आहेत अर्थातच.

सांस देखते देखते मन अविचल हो जाय,
सांस देखते देखते सत्य प्रकट हो जाय,
सत्य देखते देखते परम सत्य दिख जाय।

पहिले तीन दिवस आनापान. श्वास मेहसूस करत राहणं.
बाकी दिवसातले साताठ तास मांडी घालून बसणं काही सोपं नाही..!

खाली ऐसपैस कुशन असतंच.‌ पण मी त्यावर दोन एक्स्ट्रा उशा घेतल्या. मग उजव्या मांडीखाली एक छोटी दुमडलेली उशी. मग डाव्या मांडीखाली एक छोटी दुमडलेली उशी. मग गुडघ्याखाली छोटासा सपोर्ट..!
असा ऐसपैस राजेशाही ध्यानास बैसलो.
दुसऱ्या दिवशी कंबरदुखी, पाठदुखी, मांड्यादुखी, पायदुखी, डांगदुखी, हेदुखी, तेदुखी, सर्वदुखी.

आगायायायाssss करत करत गुरूजींना भेटण्याच्या वेळेत भेटलो. म्हटलं, 'मला बॅकरेस्ट किंवा चेअर मिळेल काय?'

ते म्हणाले, ''स्पॉन्डिलायटिस, अर्थ्रायटीस, काही मेजर ऑपरेशन वगैरे झालेल्या लोकांसाठी मी ती सवलत दिलेली आहे. तुम्हाला मिळणार नाही. मणका, मान, डोकं सरळ एका रेषेत आणि जमिनीला काटकोनात ठेवा. अन्यथा इतर जागांवर तणाव येतो. आणि मग श्वासाचं आलंबन सोडून वेदनेकडेच सगळं लक्ष जातं तुमचं. आता अधूनमधून थोडा वेळ हार्ड श्वासांवर काम करा म्हणजे श्वासावर लक्ष टिकून राहिल.. या आता.''

६. साधनेच्या ह्या मार्गावर घोडदौड करण्यामध्ये एका विशिष्ट साधिकेचा मला अडथळा होतोय, ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे.
सदर साधिकेला समजा ह्या वस्तुस्थितीची बिलकुल
खबरबात नसली तरीही काही हरकत नाही.
सुरुवातीला अशी सुस्पष्ट खबरबात कुणालाच नसते.
ती हळूहळू होते.
त्याची एक भाषा असते. त्याचा एक रस्ता असतो.
ह्यामध्ये संयम आवश्यक. समतोल आवश्यक.
ते सगळं इथं शिकवतील बहुतेक.
तेवढं आत्मसात केलं की मग काही अडचण नाही.
कोर्स संपल्यानंतर ताबडतोब एखादं वादळी
प्रेमप्रकरण करून बघायलाही हरकत नाही.
म्हणजे मग आपल्यात कितपत साक्षीभाव आलाय ते
समजेल. आणि शिवाय हवापण गुलाबी गुलाबी
पडायला लागली आहे. ह्या हवेचाही मान राखला
पाहिजे.

बहुदा ह्या शतकातल्या एका महान आणि अद्भुत अशा
प्रेमकथेची बीजं, ह्या तपोभूमीत माझ्याकडून रोवली जाणार आहेत..! कालिदासानं मेघदूत लिहिलं.
टॉलस्टॉयनं ॲना कॅरेनिना लिहिलं.आपल्या हातूनही
त्याच दर्जाचं काहीतरी कांड होणाराय, असं दिसतंय..!
स्पष्ट लक्षणंच दिसतायत तशी..!
आता काही अडचण नाही. काही सवालच नाही. सगळीकडे आपलाच डंका.‌‌.! हार तुरे सत्कार पुरस्कार वगैरे नको म्हणून सांगायला पाहिजे सर्वांना...आपल्याला नै आवडत तसलं काही..
पै पाहुणे सहकारी वरिष्ठ परिचित वगैरे सगळे समजा आता आपल्याशी इज्जतीत बोलतील.. पण आपण काही जुने हिशेब विसरायचे नाय भौ.. कारण आपण काय अगदीच महात्मा गांधी नाय भौ..!
बापका, दादाका, भाईका, सबका बदला लेगा रेsss
तेरा फैजलवा..!
डोळे बंद करून, आत हे असलं चाललंय.

पुढून गुरूजी खूणेनं जवळ बोलावतायत.
"आप आंख क्यूँ खोलते हो बीच बीच में.. और मनभी
बहुत चंचल लगता है... पांच मिनट भी टिक नही
पाते है आप एक पोझिशनमें.. मैं ऑब्झर्वेशन करताय सबका... संकल्प किजीए और वापिस जगहपर जाकर सांस को जानने का अभ्यास जारी रखिए."

७. सामुहिक ध्यानासाठी धम्मसेवक प्रत्येक दारापुढे घंटी वाजवून सूचना देतात. परंतु लंच आणि ब्रेकफास्ट वगैरेसाठी असं कुणाला कळकळीचं आमंत्रण देऊन बोलवावं लागत नाही..!
भूकेच्या बाबतीत सगळे एकाच पद्धतीने विचार करतात.
प्रोफेशन, वय, धर्म, लिंग, देश, आर्थिक क्षमता वगैरे काही मॅटर करत नाही. ठरलेल्या वेळेस सगळे अचूकपणे भोजनालयापुढे आपोआप हजर..!
(आपोआप निरंजन सोई..!)

बाकी मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि लंच उत्तम.
रोज वेगळा मेन्यू. साधं. सात्विक.
कमी मसाले, कमी तेल. तरीही चव विसरता
विसरत नाही. अत्यंत रूचकर आणि स्वादिष्ट.
दोष काढायला काहीच वाव नाही..!
शिवाय मोबाईल/टीव्ही /पेपर/ गप्पा वगैरे नसल्यामुळे समग्र लक्ष फक्त जेवणात.‌‌.! त्यामुळे चवीचवीने एकेक घास खाल्ला जातो. अन्यथा नेहमी आपण सवयीने, घाईघाईने ढकलत असतो.

संध्याकाळी चहा/लिंबूपाणी आणि प्रत्येकी एक फळ. शिवाय चुरमुऱ्यांचा चिवडा असतो.. तो खाऊन खाऊन किती खाल? कितीही खा..! पोट रिकामंच..!

रात्री जेवण नाही. पहिल्या दोन रात्री भूकेची
जाणीव असते. पण तिसऱ्या दिवसापासून त्याचंही
काही वाटत नाही.
उलट एक वेळचं जेवण स्कीप केल्यामुळे शरीर
एकदम तल्लख आणि हलकं राहतं.
लखलखीत धारदार पात्यासारखं शरीर...!
सकाळी उठल्यावर जडपणा नाही. बधिरता नाही.
गुंगी नाही. ॲसिडिटी नाही. गॅसेस नाही. चीडचीड नाही. काही नाही.
चारी ठाव दाबून खाल्ल्यावर कसली विपश्यना होणार आणि कसलं आनापान..!
आणि शिवाय तिथे काही कामच नसल्याने
शरीरातली ऊर्जाही खर्च होत नाही.
त्यामुळे इव्हिनिंग ब्रेकफास्टही नको वाटतो नंतर नंतर.
संध्याकाळी फक्त लिंबू पाणीच पुरेसं.

८. उदाहरणार्थ समजा आपण शून्यागारामध्ये ध्यानाला बसलोय. शेजारच्या किंवा वरच्या कुठल्यातरी शून्यागारातून खोकण्याचा, खाकरण्याचा आवाज येतोय. मग हळूहळू सगळ्यांनाच घसा खाकरून, आपापल्या घशांमध्ये सगळं व्यवस्थित आहे का ते चेक करून बघण्याचा मोह होतोय..!
मग आलटून पालटून खोकण्याच्या लाटा 'पॅगोडा'भर
घुमतायत.
ह्या मनुष्यांच्या घशांतून टोचणी, खवखव, खरखर वगैरे दु:खद संवेदना 'संखारांच्या' रूपात बाहेर पडू इच्छितायत.
त्यांना वाट खुली करून दिल्याशिवाय ह्यांना चैन पडत नाही नाही. संखारांची एक संसर्गजन्य लाटच आलेली दिसतेय.

(रात्रीच्या वेळी समजा पुणे वगैरे शहरातल्या एखाद्या
गल्लीतलं एक कुत्रं उगाचच सहज टाईमपास म्हणून भुंकतं..‌ मग त्याला एकटं वाटू नये म्हणून लगेच आख्ख्या पुण्यातल्या कानाकोपऱ्यातली सगळी कुत्री एकसाथ कल्ला करायला लागतात, हे आपण ऐकलं असेलच कधीतरी.
माणसांमध्येही तसंच असतं काय?)

९. चौथ्या दिवशी गोयंका गुरुजी विपश्यना शिकवतात.
शरीराच्या या जागेवर या क्षणी काय होतं आहे याचं अवधान. असा टाळूपासून पायाच्या बोटांपर्यंतचा सजग प्रवास. With respect to time. With respect to space.
संवेदना जाणवली, तिला रिॲक्शन नाही दिली, संवेदना बदलतेय हे चेक केलं आणि या सर्ववेळी चित्त समतोल आहे की नाही ते चेक केलं. अशी प्रोसेस.

यामागची फिलॉसॉफी अशी की शरीरावर सुखद संवेदना जाणवल्या तर आपल्या आसक्तीच्या 'संखारा' सरफेसवरती आलेल्या असतात.
शरीरावर दु:खद संवेदना जाणवल्या तर आपल्या
व्याकुळतेच्या 'संखारा' सरफेसवरती आलेल्या असतात.
दोन्ही प्रकारातल्या संवेदनांचा पॅटर्न सेमच आहे.
उत्पन्न होणे, वाढत जाणे, एका बिंदूनंतर कमी कमी
होत जाणे, आणि शेवटी नष्ट होणे...!
ह्या सगळ्याचा फर्स्ट हॅंड अनुभव घेऊन पाहणं
म्हणजे 'विपश्यना'..!
शारीर वेदनेला किंवा बोअरडमला फेस करताना
चीडचीड संताप दु:ख चिंता व्याकुळता बाहेर येते..
नकोसं होतं. मन संवेदनांवर टिकत नाही. भरकटायला लागतं...
विपश्यनेपेक्षा आनापान तसं सोपं आहे. पण गोयंका गुरूजी म्हणतात की, 'आनापान ही फक्त पूर्वतयारी आहे. प्रज्ञेच्या क्षेत्रात पाऊल टाकायचं असेल तर विपश्यनेकडं जावंच लागेल.'

१०. डिअर गोयंका गुरुजी, तुम्ही साक्षीभावाने
संवेदनांकडे बघा म्हणता. पण तीच तर मुख्य
गोम आहे.
साक्षीभाव एका रात्रीत तर पैदा होणार नाही.
तो डेव्हलप व्हायला वेळ लागणार. सराव लागणार.
विपश्यनेची प्रॅक्टिस असल्याशिवाय साक्षीभाव
येणार नाही आणि संवेदनांकडे साक्षीभावाने पाहिल्याशिवाय विपश्यना करू शकणार नाही, असा चक्राकार प्रॉब्लेम आहे..!
आणि वेदनांची कळ मेंदूपर्यंत जायला लागते
तेव्हा बोंबलायचं कळत नाही..!
कधी झटकन पोझ बदलून रिकामे होतो, कळतही नाही.
कुठला साक्षीभाव आणि काय घेऊन बसलाय..!
अशा वेळी आपला नेहमीचा 'भोक्ताभावच' बरा..!

११. पण पुढे अशाच एका सिटींगला जरा 'अधिष्ठान' मनावर घेतलं.. ठरवूनच बसलो की आता एकतास हालचाल करायची नाही. नाही म्हणजे नाही.
बिलकुल नाही. अजिबात नाही. किंचितही नाही..
काय व्हायचं ते होऊदे ***

मग एका अशाच क्षणी अवघडलेल्या मांडीतल्या घनीभूत ठणकत्या वेदनेला हळूहळू डीझॉल्व होत जाताना पाहिलं तेव्हा मलाच आश्चर्याचा धक्का बसला की साला हे असं पण होऊ शकतं..! आपल्याला हे जमू शकतं !
म्हणजे हे सांगतायत ते काही थापा मारत नाहीयेत तर..! आणि एवढं आनंददायी असतं हे? हे असं शारीर वेदनेपासून स्वतःचं विलग होणं.‌.! आणि कुठून हा असा थुईथुई आनंदकल्लोळ उसळायला लागलाय..! तोही असा अचानकच.!
कुठे लपला होता एवढे दिवस..! किती दशकं झाली
आपल्याला असा विनाकारण आनंद होऊन..!!

तर एखाद्या मिनिटाभरासाठीही अशा स्वरूपाचा
आल्हाद-क्षण तुम्हाला मिळाला तरी तुमचा पूर्ण
दिवस त्याच धुंद आनंदात जातो. तो एक मिनिटसुद्धा
एवढा ताकदवान असतो की संपूर्ण दिवसावर प्रभाव टाकतो !! पण हे काही नेहमी नेहमी होत नाही..
आणि शिवाय हे ही टेंपररी असतं‌, 'अनिच्च' असतं.
हे एक आहेच.

१२. बाकी इथे कुणी दिव्य अनुभूतीच्या शोधात वगैरे येऊ नये. ही टेक्निक शिकावी. पटली,आवडली तर पुढे आपापला सराव जमेल तसा चालू ठेवावा..बाकी आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे तपासून
पाहण्यासाठी काही फूटपट्ट्या सांगतात गुरुजी.
त्याप्रमाणे पहावे स्वतःस आजमावून.

अचानक 'सडन एनलाईटमेंट'चा हा मार्ग नाही.
किंवा ते युजी कृष्णमूर्ती सांगतात तशी 'कलॅमिटी'
वगैरे काही होणार नाही यात..
किंवा रजनीशांसारखा हसत खेळत करायचाही
प्रकार नाही.
ह्या दहा दिवसांत आपल्या आत काही रॅडिकल चेंजेस
होऊन आपण डायरेक्ट बुद्ध होऊनच गेटच्या बाहेर पडणार, असलंही काही होणार नाहीये...
जे काही आहे ते फ्लॅशेसमध्येच..!

अर्थात, आपल्याला ते मुक्ती मोक्ष सतोरी किंवा निर्वाण वगैरे काही नकोच आहे.
शांत वाटत राहिलं तरी पुरे. गोष्टींकडे नीटपणे बघता आलं तर पुरे...! शिवाय थोडंसं सर्व्हिसिंग. थोडंसं धार लावणं स्वतःला. थोडंसं आयसोलेशन.
मन ज्यांना लटकतं ते बाहेरचे सगळे आधार, सगळ्या खुंट्या काढून टाकणं आणि मनाला आत वळण्याशिवाय इतर काही मार्गच शिल्लक न ठेवणं. किमान थोडा काळ तरी..!

१३. प्रतिक्षण सजग.
शरीराबद्दल अवेअरनेस वाढत चाललाय. विचारांचा
गोंगाट कमी होत चालल्याने शारीर हालचालींतली घाई कमी होत जातेय.. सगळ्या कृती शांत संथपणे होतायत.. त्यात एक ठेहराव आहे... उठणं, बसणं, खाणं, आंघोळ, कॅंपसमध्ये फिरणं ह्या साध्या साध्या कृतीही फिलॉसॉफीकल वाटतायत..

१४. ह्या कोर्सच्या गुरूजींचं हिंदी मुंब्बैय्या आहे. काही
साधकांना जवळ बसवून सांगण्याची त्यांची पद्धत आहे.

"आप चुळबुळ बहोत करते हो. वैसा नय करने का. संवेदना, संखारा, धाराप्रवाह, अनिच्चबोध कुछ समझा
की नय आपको?.. गोयंका गुरूजीने क्या बोला
कल के प्रवचन में? अपनेको भीतरकी गांठें
खोलने का हय.. नई गांठें नही बांधने का हय
अपनेको... गांठें धीरे धीरे कमती होना मंगता हैं..
साक्षीभाव धीरे धीरे बढना मंगता हय..."

१५. एक साधक बहुदा महाबोअर होऊन एका ठराविक झाडाखाली बसलेला मला दिसायचा. त्याला मी मनातल्या मनात सल्ला दिला.
"अरे, तुम ऐसे खुले में पेड के नीचे मत बैठा करो.
तुमारा फोटू निकालके बादमें यहांपे टीव्हीपे दिखाते की ये आदमी येडा हो गया करके.. जाव.. जाके रूममें बैठो"

१६. नॉर्मल रूटीनमध्ये मनाला वेगाची चटक लागलेली असते. मनावर पुटं/गंज चढलेला असल्यामुळे इथं कॅंपसमधला सर्व काळ साचून राहिल्यासारखा वाटतो.

सकाळचा ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग ब्रेकफास्ट आणि
संध्याकाळी गुरूजींचे प्रवचन ह्या चार पिलर्सवर पूर्ण
दिवस तोललेला आहे. सकाळचा वेळ पटकन जातो.
संध्याकाळीही ब्रेकफास्ट, प्रवचन वगैरे मध्ये वेळ जातो.. पण दुपार सरता सरत नाही. बहुदा या कॅंपसमध्ये दुपारी बारा ते पाच या वेळेत पृथ्वी फार हळूहळू फिरते. सूर्याच्याही बहुदा ते लक्षात येत नाही. कारण तो स्वतःच पेंगत असतो.

१७. कधीतरी सगळी निगेटिव्हीटी अंगावर चाल करून येतेय. मनातला खाली बसलेला सगळा गाळ ढवळून वर आलाय.
जुने अपमान. चुका. जुन्या काही प्रसंगातलं आपलं शरमनाक वागणं. निष्कारण लोकांना शब्दांनी बोचकारलेलं. आपल्या आत्मसन्मानाच्या चिंध्या झालेल्या वेळा. गैरसमज. मुजोरी. बालिशपणा.
ह्या सगळ्याच्या थपडा बसतायत. नव्हे, ठोसे बसतायत.
ह्यातलं नव्वद टक्के भूतकाळातलं आहे.
वरचा उथळ स्तर खरवडून काढला की खाली
सगळी बोंबाबोंबच आहे ***.
अमुक गोष्टी करायला नको होत्या, तमुक गोष्टी आता कधीच जमणार नाहीत. गेला तुझा चान्स. आता बस बोंबलत.

सातव्या-आठव्या दिवशी हे असे प्रचंड स्विंग होणारे मूड्स.
चांगले आणि खराब मूड्स. उत्साही आणि मलूल मूड्स. हतबल मूड्स.
दिवसातून तीन वेगवेगळ्या वेळी सहा-सात वेगवेगळे
मूड्स.
कोणता चांगला कोणता वाईट ठरवणं मुश्किल.
झाकोळ..! खस्ता हालत..!
पण हे 'वादळ' कायम टिकत नाही. ते ओसरतंच कधी ना कधी. मग हलकं वाटतं.

१८.मागच्या आठ दिवसांत डोक्यात नवीन काहीच कचरा शिरलेला नसल्याने ह्या खूप प्राचीन आठवणी येतायत.
अगदी लहानपणापासूनच्या ज्या गोष्टी, घटना आपण
बिलकुल विसरून गेलेलो होतो, त्याही वरती येतायत.
आश्चर्य आहे.

चित्त पूर्ण बहिर्मुख. दोन मिनिटंसुद्धा एका जागी टिकत नाही.
साधनेच्या प्रक्रियेतले दोष काढणारं मन..
साला ह्या 'संखारांना' माझी पाठ आणि मांड्याच
फार आवडतायत की काय?
तिथेच नेमक्या 'संखारा' कशा काय प्रकट होतायत.‌.!

आठवा दिवस रद्द करून नऊच दिवसांचाच हवा
होता हा कोर्स, असंही म्हणतंय मन..!
मोठं फिलॉसॉफर वगैरे झालेलं मन..!

किंवा मग प्लॅनिंग करणारं मन..! इथून अकराव्या
दिवशी कसं कसं जायचं.. नंतर काय काय अडचणी येतील... त्या अडचणी कशा कशा सोडवायच्या...
अमुकचं काय करायचं... तमुकला काय सांगायचं..!

प्लॅनिंग करायला किती आवडतं मनाला..!
भले ते प्लॅनिंग उद्याचं असू द्या, तासाभरानंतरचं
असू द्या किंवा लॉंग टर्मचं असू द्या.
साला प्लॅनिंग कमिशनचा उपाध्यक्ष करायला पाहिजे मला ताबडतोब..!
किंवा ते नाही शक्य झालं तर ॲटलीस्ट भारतातील सगळ्या महानगरांच्या पुढच्या वीस वर्षांच्या नियोजनाची जबाबदारी माझ्यावर सोपवायला पाहिजे. काही अडचणच येणार नाही. काही प्रश्नच नाही..!

१९. गुरुजींची प्रवचनं एकदम सही आहेत.
त्यांची सांगण्याची, एक्सप्लेन करण्याची शैली
खरोखरच सुंदर आहे.. अतिशय बुद्धिवादी तरीही
करूणेनं ओतप्रोत.
तर्ककठोर, कट्टर नास्तिक माणसालासुद्धा हे सहज कन्विन्स करतील.
दिवसभर प्रॅक्टिस आणि संध्याकाळी त्या दिवसभरात
केलेल्या प्रॅक्टिसची सैद्धांतिक थेरी प्रवचनातून असते.
मी त्यांची प्रवचनं फार पूर्वी यू-ट्यूबवर ऐकली होती.
पण कोर्समध्ये एकेक दिवस संपल्यानंतर संध्याकाळी
त्या त्या दिवसाचं प्रवचन ऐकलं की मग लक्षात
येतं ह्यांच्या बोलण्यात किती मज्जा आहे ते..!
किती खाचाखोचा आहेत ते..!
बाकी गोयंकांकडे उच्च दर्जाचा सेन्स ऑफ ह्युमर आहे, ह्यात काही वादच नाही.
समोरचे ऐकणारे लोक कसा कसा विचार करत असतील ह्याबद्दल त्यांनी आधीच फार खोलात जाऊन विचार केलाय.

ही रेकॉर्डेड प्रवचनं जुनी आहेत. त्या वेळच्या साधकांपुढे दिलेली.
पण आपलं मनही डिट्टो तसंच जुनं आहे, त्यामुळे
आपल्याला हे लागू पडतं.. कदाचित आणखी शंभर
वर्षांनी कुणी हे ऐकलं तर त्यालाही हे लागू पडेल.

एका प्रवचनात ते म्हणतात,
"व्याकुळतेच्या लहरी येतच राहतील आयुष्यात.
त्यांच्यासोबत जे काही जुनं इंधन असेल तोपर्यंत त्या
जळत राहतील. नंतर आपोआप विझून जातील.
फक्त तुम्ही त्यात स्वतःचं पेट्रोल ओतू नका.
आता हे सगळं वरवर बुद्धीला पटेल.. पण सराव नसेल तर कायमस्वरूपी खोलवर आत घुसणार नाही.. मग व्याकुळता आली की तुम्ही पेट्रोलपंपाच्या सगळ्या टाक्या, पाईप्स खोलून ठेवणार..! आणि आतल्या आत धुमसत राहणार..!"

२०. दहाव्या दिवशी सकाळी मंगलमैत्री.
तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे..!!
जन-जन मंगल, जन-जन मंगल,
जन-जन मंगल होय रे.. !!
ह्यांच्या आवाजातून कशी कणव झरत असते..!
आपल्याला ती कळतेय कारण आपल्यातूनही
ती झरत आहे.
नऊ दिवसांतील घावांवर मलमपट्टी कशी होत असते,
हे शेवटच्या दिवशीच्या मंगलमैत्रीतून एकदा
अनुभवूनच पहायला पाहिजे..
सांगून ते कळण्यास मर्यादा आहेत.

मग मौन खुलं झालं.
जेव्हा बोलायला लागलो तेव्हा सुरूवातीला
पाच-दहा वाक्यं सलग बोलताना टाळूमध्ये
आणि घशात स्वरयंत्रामध्ये मजेशीर गुदगुल्या
होत होत्या, हे एक आठवतंय.
शब्दांनाही स्वतःचा नाद असतो, ध्वनी असतो हे प्रकर्षानं जाणवलं.
आपल्याला बोलून व्यक्त होता येतं, ही किती
आश्चर्याची गोष्ट आहे, हे नऊ दिवसांच्या मौनानंतर
समजलं..!

२१. दहाव्या दिवशी मोबाईल आणि बाकी गोष्टी रिटर्न.
मोबाईल सुरू केल्यानंतर स्क्रीनवर शे-पाचशे
नोटीफिकेशन्स बदाबद कोसळणं..
बाकी आपण नाहीसे झालो तरी जग आपापल्या
गतीने चालूच राहिलेलं असतं.

बाकी ह्या दहा दिवसांत खर्च काही नाही. शेवटच्या
दिवशी डोनेशनचं काउंटर असतं, दानपेटी असते.
काही कंपल्शन असं नाही.

अकराव्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता
सेंटरच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर आपण
जणू कोमातून किंवा गाढ निद्रेतून ह्या वेगळ्याच
जगात प्रवेश करत आहोत, असं एक जादूई फिलींग..! आणि सोबतच ह्या दहा दिवसांत कमावलेल्या काही इनसाईट्स दुनियादारीत फार काळ टिकवून ठेवता येणार नाहीत, ही धाकधूकही..!
बघूया कसं जमतंय ते..!

डिस्क्लेमर : व्यक्तीनुसार अनुभव/मतं वेगवेगळी असणार. शिवाय लिहिण्याची, अनुभवांची माझी मर्यादा असल्याने त्यात काही दोष हे असणारच आहेत.
हे लिखाण म्हणजे काही विपश्यनेवरचं अंतिम सत्य नाहीये. तेवढा कुणाचा अधिकारही नसतो. फक्त काही शेअर करणं एवढाच उद्देश. त्यामुळे ह्या लेखाकडे मनोरंजन म्हणून पहावे, ही विनंती.
ह्या लेखावरून समजा कुणी काही मत बनवलं किंवा जनरलायझेशन केलं तर ते फारसं योग्य होणार नाही. आपापल्या अनुभवाअंतीच काही निष्कर्ष काढला तर बरं होईल, असं वाटतं. बाकी चूकभूल द्यावी घ्यावी.

मंगल हो _/\_

मुक्तकजीवनमानप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

21 Nov 2021 - 1:23 pm | शानबा५१२

'विपासना' २१ दीवसांची असते. विपासनेच्या काळात त्या व्यक्तीला रक्त शुध्द करणारा आहार घ्यायचा असतो व मुख्यता फक्त पाणी प्राशन करायचे असते. विपश्यना व ती ही १० दीवसांची असे. सुदैवाने माझ्या माहीतीत नाही.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2021 - 1:36 pm | मुक्त विहारि

पारदर्शी मन मोकळं लिहिलंत ....

विपश्यना, वाईट अजिबात नाही.

पण आमच्या सारख्या काकाजींना, हे प्रकरण झेपणारे नाही.

इथेही काही जणांनी विपश्यना केलेली आहे.

दुनिया रंगरंगिली बाबा ... दुनिया रंगरंगिली ...

चांदणे संदीप's picture

21 Nov 2021 - 5:07 pm | चांदणे संदीप

पहिल्या बॉलवर सिक्स बसल्यावर जसा स्कोरचा अंदाज येतो आणि आपण सरसावून बसतो पुढची इनिंग बघण्यासाठी तसा काहीसा फील आला आणि खरोखरीच स्कोर जबरदस्त झालाय.

सं - दी - प

पाटिल's picture

22 Nov 2021 - 3:40 pm | पाटिल

संदीप, मुक्त विहारि
अभिप्रायाबद्दल धन्यवाद :-)

शानबा५१२'s picture

21 Nov 2021 - 6:31 pm | शानबा५१२

विपासना बोलेल का कोणी? विपश्यना नसतं व नसले पाहीजे.

तुर्रमखान's picture

22 Nov 2021 - 1:25 am | तुर्रमखान

म्हणेल म्हणेल का कोणी? बोलणे (एखादा शब्द) नसतं व नसले पाहिजे.

चौकस२१२'s picture

22 Nov 2021 - 4:48 am | चौकस२१२

झोप नीट पूर्ण नाय झाली तर ध्यान कसं करणार.
ध्यान हि गोष्ट करायचा प्रयत्न केला कि बरोबर उलट होतं ... जगात सर्वत्र मन भटकत राहतं .. आपल्या जन्मात आपल्या कडून हे होणार नाही ..

सामान्यनागरिक's picture

22 Nov 2021 - 12:47 pm | सामान्यनागरिक

विनासनेबद्दलन बरेच ऐकुन आहे. पण चारला उठल्यावर ध्यानाच्या वेळी नक्की झोप येणार प्रचंड.
दुसरे तासंतास एकाच जागी मांडी घालुन बसणं कसं जमतं .

याच दोन कारणांसाठी कधी गेलेलो नाही. आपण ते कसं हाताळलंत? झोपेला कसा आवर घातलात ? किती दिवसांनंतर मांडी घालुन दिवसभर बसता आलं पायांना कळ न लागता ?

पाटिल's picture

22 Nov 2021 - 3:42 pm | पाटिल

सामान्यनागरिक
दोन दिवस त्रास वाटतो. पण नंतर सवय होते मांडी घालून बसायची :-)

चौकस२१२'s picture

22 Nov 2021 - 4:52 am | चौकस२१२

त्यामुळे ह्या पिपाणीवादक किंवा तत्सम ढोल किंवा पियानोवादक साधकांना आत्ताच कुणीतरी आवरलं पाहिजे.
नाहीतर पुढचे नऊ दिवस हे स्वतःच्या घरातच असल्याप्रमाणे निर्ढावत जातील आणि मग याहून मोठ्ठे स्फोट ऐकत बसावे लागेल नंतर नंतर...!

हे सगळं चालतच राहणार पाटला. तू इथं कशासाठी आलायस.! तू तुझा तुझा श्वास बघ.
हहपुवा
पाटील: हो तेच बघतोय माझया श्वासाची काळजी आहे म्हणूनच तर .. मला श्वसात ऑक्सिजन पाहिजेय म्हणून आणि हे इकडे फुसकुल्या

चौकस२१२'s picture

22 Nov 2021 - 5:16 am | चौकस२१२

"कसं काय पाटील बरा हाय का आम्ही काय ऐकलं ते खरं हाय का ? तुम्ही म्हनं जत्रा ला गेला ... तमाशात काळीज इसरून आला ...!

मग पाटील फूड त्या "विशिष्ट साधिकेचं " काय झालं ? ते सांगितलंच नाहीत?

बर थट्टा जाऊदे .. खरंच उत्तम शैलीत अनुभव कथन केल आहेत ...
( राहून राहून का कोण जाणे तुम्ही संस्थेचे वर्णन केलात तेवहा सेक्रेड गेम्स मधील "गुरुजींच्या" त्या आश्रमाची आठवणी झाली ....गोयंका गुरुजी पंकज त्रिपाठी सार्केहक होते का हो दिसायला ? एक वात्रट विचार म्हणून विचारतोय .)

पाटिल's picture

22 Nov 2021 - 3:51 pm | पाटिल

चौकस २१२,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
गोयंका गोड आहेत..!
पंकज त्रिपाठी बापमाणूस आहे..!
" गssणेस.. हमें सतयुग में ले चलो गणेस..." हे आठवतोय..! :-)

बाकी सुदैवाने दोन्ही आश्रमात काहीही साम्य नाही..!

धर्मराजमुटके's picture

22 Nov 2021 - 1:30 pm | धर्मराजमुटके

छान अनुभव ! पुढे काय झालं ? अरण्यातून शहरात आल्यावर मनात अरण्य राहिले की परत शहराने कब्जा घेतला ?

पाटिल's picture

22 Nov 2021 - 3:57 pm | पाटिल

धर्मराज,
मला हा कोर्स करून फार काळ झाला नाही, त्यामुळे अजूनतरी अरण्य टिकून आहे..
पुढे बघूया आता कसं कसं जमतं ते.. शहर कितपत बुडवून टाकतं ते..! रोजच्या रूटीनमध्ये ते सगळं किती मेंटेन करू शकतो, त्यावरच सगळा खेळ आहे.
आणि प्रतिसादाबद्दल तुमचे आभार :-)

शाम भागवत's picture

22 Nov 2021 - 4:13 pm | शाम भागवत

वयाची अट असते का?
जेष्ठ नागरिकांना टेकून बसायला परवांगी मिळते का?
बुकिंग करून प्रवेश मिळायला किती दिवस लागतात?
पैसे किती कुठे भरायचे असतात?

पाटिल's picture

22 Nov 2021 - 4:34 pm | पाटिल

@ शाम भागवत,

दहा दिवसांचा कोर्स १८वर्षांपेक्षा जास्त वयाचा कुणीही करू शकतो.

ज्येष्ठांना चेअर/बॅकरेस्ट देतात. ऑनलाईन फॉर्म भरताना सगळे डिटेल्स दिसतील तुम्हाला.
आणि ह्याचे पैसे वगैरे काही नाही. शेवटच्या दिवशी डोनेशनसाठी काउंटर असते, दानपेटी असते.
कंपल्शन असं काही नाही.

बुकींग महिनाभर आधी वगैरे ओपन होते.. आपल्या सोयीनुसारच्या सेंटरचा स्लॉट बुक करायचा.
काही सेंटर्सना, इगतपुरी वगैरे ला, खूप रश/ वेटिंग असते, काही ठिकाणी लगेच मिळून जाते..

खालील लिंक वापरून पहा
https://www.dhamma.org/en/index

खालील लिंकवर तुम्हाला तुमच्या भागातील विपश्यना सेंटर्स, तारखेनुसार कोर्सेसची उपलब्धता पहायला मिळेल.
https://www.dhamma.org/en-US/courses/search

धर्मराजमुटके's picture

22 Nov 2021 - 4:50 pm | धर्मराजमुटके

खुप चांगली माहिती.
तिथे आपली नित्यपुजा / धार्मिक कर्मे करु दिली जात नाही असे ऐकले आहे. यात कितपत तथ्य आहे ? या एकाच गोष्टीमुळे इच्छा असून देखील हजर राहू शकत नाही.

खालील लिंकवर त्यांचे नियम दिलेले आहेत.
त्यामध्ये "Other Techniques, Rites, and Forms of Worship" ह्या हेडिंगखाली, तुम्ही म्हणता ते धार्मिक कार्ये इत्यादी संदर्भातील नियम दिले आहेत.

https://www.dhamma.org/en/about/code

शाम भागवत's picture

22 Nov 2021 - 6:27 pm | शाम भागवत

धन्यवाद.

विपश्यनेवरचं अंतिम सत्य

म्हणजे हा लेख.
टिपटिप टिपणं काढून इतकं चांगलं कुणीच सांगितलं नव्हतं. खूप स्तुती केली नाही, खूप हेटाळणी केली नाही तरी नेमकं पोहोचलं.

आपल्याला जमणार नाही आणि आपल्यासाठी नाही .

बोलघेवडा's picture

22 Nov 2021 - 5:45 pm | बोलघेवडा

खूपशा लोकांनी ऑलरेडी ठरवून टाकलेलं असत कज ही गोष्ट जमणार नाही. मग ती कधीच जमत नाही कारण रो मनुष्य ट्रायच करत नाही. ध्यान हे त्यातलाच एक. बऱ्याच लोकांना वाटते की ध्यान म्हणजे concentration of mind, तासंतास एका जागी बसणे. मग डोळ्यांसमोर प्रकाश दिसतो, आवाज ऐकू येतात, देवाची मूर्ती, आणि बराच काही. प्रत्यक्षात तसं काहीच होत नाही.
शरीर, मन आणि आत्मा हे एक नसून वेगवेगळे आहेत याचा अनुभव येणे म्हणजे ध्यान. यासाठी खाली बसा, खुर्चीवर बसा आणि फक्त एकच गोष्ट करा ती म्हणजे श्वास आत बाहेर येतो त्यावर लक्ष ठेवा. बास!!!

मुक्त विहारि's picture

22 Nov 2021 - 6:18 pm | मुक्त विहारि

आमची ज्ञान साधना असते ....

McDowell एक नंबर, बरोबर 4 जपाच्या माळा ओढायच्या.

एखादे उत्तम पुस्तक सोबतीला असते, सध्या दिवाळी अंक वाचतो...

मन शांत करायचे असेल तर, प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतात..

कुणी धृवा सारखे, तर कुणी वाल्या कोळ्या सारखे...

आम्ही आपले काकाजीं सारखे...

Nitin Palkar's picture

22 Nov 2021 - 9:44 pm | Nitin Palkar

खूप छान प्रतिसाद मुवि काकाजी

कंजूस's picture

22 Nov 2021 - 6:23 pm | कंजूस

खूपशा लोकांनी ऑलरेडी ठरवून टाकलेलं असत कज ही गोष्ट जमणार नाही. मग ती कधीच जमत नाही कारण रो मनुष्य ट्रायच करत नाही. ध्यान हे त्यातलाच एक. बऱ्याच लोकांना वाटते की ध्यान म्हणजे concentration of mind, तासंतास एका जागी बसणे.
हो.

तुषार काळभोर's picture

22 Nov 2021 - 11:08 pm | तुषार काळभोर

हळूहळू शरीरात, मनात, काय बदल होत गेले ते जाणवतं, इतका मनापासून लेख लिहीलाय पाटीलसाहेब.
अधून मधून अपडेट नक्की द्या. रोजच्या दिनचर्येत काही फरक पडलाय का, विचारात, स्वभावात काही फरक पडलाय का, पुन्हा जाण्याची इच्छा होते का.. इत्यादी इत्यादी इत्यादी..

सुक्या's picture

23 Nov 2021 - 7:04 am | सुक्या

माझा एक बॅचमेट (बी टेक / एम बी ए झाल्यावर ) विपासना शिबीराला जाउन आला .. त्याला ती इतकी आवडली की त्यानंतर तो पुर्णवेळ साधक झाला. आता तो विपासना शिकवतो. त्याने सार्‍या मित्रांना अगदी जबरदस्ती विपासना शिबीरे करायला लावली. एकानेही त्याविषयी तक्रार केली नाही ...

शिबीर करुन आल्यावर माणुस बर्‍यापैकी शांत होतो हे बघितले आहे. मी तरी अजुन शिबीर केले नाही.

फक्त मला काही बाबी खटकल्या . . म्हणजे साधकाने सदा सर्वकाळ गंभीर असायला हवे. विनोद केला की खदाखदा हसु नये ही अट खुपच जाचक आहे ..

मुक्त विहारि's picture

23 Nov 2021 - 8:04 am | मुक्त विहारि

झोपण्यापुर्वी, स्वतः साठी फक्त 5 मिनिटे काढा

आणि दीर्घ श्र्वास घेता घेता, दिवसभरात काय चुकीचे वागलो आणि किती चांगले काम केले, हे आठवा

खूप फरक पडतो

आपणच आपले शिल्पकार असतो....

सुक्या's picture

25 Nov 2021 - 3:05 pm | सुक्या

हे मात्र खरे आहे . .
रोज झोपण्यापुर्वी जर दिवसाचा गोषवारा मनन करत काय चुक काय बरोबर याचे चिंतन केले तर बराच फरक पडतो.
स्वःतशी मात्र प्रामाणिक रहावे लागते ...

nanaba's picture

23 Nov 2021 - 1:18 pm | nanaba

एकदम प्रामाणिक. आवडले!

आपल्याला लई बोअर होईल आणि नकोच त्यामुळे अस वाटतय..
१० दिवस बोलायचं नाही!

काही प्रश्नः
१. व्यायाम केलेला चालतो का?
२. नामस्मरण केलेले चालते का?
३. दुपारी झोपता येत नाही का?
४. मेडिसिन्स बद्दल काय अ‍ॅप्रोच आहे? (उदा. थायरॉईड सप्लिमेंट्स)
५. अशक्य वाटलं तर मधून पळून येता येतं का? (वाईट प्रश्न! :प)

एकाच वेळेस कुतुहल आणि झेपणार नाही असं दोन्ही वाटतय!

पाटिल's picture

23 Nov 2021 - 3:51 pm | पाटिल

नानबा,
वरती शाम भागवत आणि धर्मराज यांना दिलेल्या प्रतिसादात दोन लिंक दिलेल्या आहेत. त्यात त्यांची नियमावली, सूचना, इतर धार्मिक कार्ये, तसेच रजिस्ट्रेशनसंबंधी माहिती आहे.

तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर: रेस्टसाठी टाईम असतो. बाकी झोपणारे कधीही कुठेही बसल्या बसल्याही डुलक्या काढू शकतातच की... फक्त धम्महॉलमध्ये ध्यानाला बसून ढाराढूर घोरण्याचा आवाज येऊन आपल्यामुळे इतरांचे लक्ष विचलित होऊ नये, एवढं पुरे.. आणि झोप मिळते पुरेशी..! आपोआपच पहाटे चार वाजता जाग यायला लागते तिसऱ्या दिवसापासून... नंतर घरीसुद्धा मी आपोआप चारला उठून बसायचो... :-)

व्यायाम, काही स्ट्रेचिंग एक्सरसाईझेससाठीही काही अडचण नाही.. त्यांचं शेड्यूल सांभाळून तुम्ही हे करू शकता.. फक्त आपल्या कोणत्या कृतीमुळे इतर साधकांना काही डिस्टर्ब होणार नाही, एवढी काळजी घेतली की पुरे..

आणि मौनाचंही तसंच आहे.. शरीर मन आपोआप त्या नियमांशी, वातावरणाशी ॲडजस्ट होतं दोन दिवसांनंतर, नियम तोडायला नको वाटतं.. शिवाय आपण बोलणार कुणाशी हा ही प्रश्न असतोच.. वाटतं की कशासाठी इतर साधकांचं मौन तोडायचं!.. आणि शिवाय तिथे काही कुणी हंटर घेऊन उभे नसतात की सगळे नियम सगळे साधक पाळतायत की नाही ते बघायला...! तरीही सगळेजण आपोआपच ते साधकाचं जगणं फॉलो करतात, असा अनुभव येतो..‌काही जबरदस्ती, बळजबरी अशी काही नसते.. ते धम्मसेवक वगैरेही पूर्वी एखादं शिबिर केलेलेच आपल्यासारखे लोक असतात, सेवा द्यायला आलेले असतात ते शिबिरात..

शिवाय बाकी सगळी दुनियादारी आयुष्यभर चालतच राहणार असते.. आयुष्यातले दहा दिवस म्हणजे काही जास्त नाहीत.. तेवढे दिवस ह्या कोर्सला द्यायला काही हरकत नाही, असं मला तरी वाटतं.

रोज मेडिसिन घ्यावी लागत असतील, तर ऑनलाईन फॉर्म भरताना ते मेन्शन करायचे.. शिवाय प्रीस्क्रीप्शन आणि मेडिसिन्स सोबत घेऊन जायचे.. मग गुरूजींच्या परवानगीने अशा संध्याकाळी जेवणही उपलब्ध करून दिले जाते..

पाचव्या प्रश्नाचे उत्तर त्या त्या कोर्सचे गुरूजीच देऊ शकतील. :-))

पण मला वाटते की मीही असाच साशंक होतो.. मला विपश्यनेच्या कोर्सेसबद्दल कळले होते २००९ साली, एका कादंबरीत वाचले होते बरेचसे... पण टाळाटाळ, वेळ, जबाबदारी, सबबी, जमेल का, झेपेल का, वगैरे सगळ्या अडचणी पार करून आत्ता जमलं ते...
हे आधीच करायला हवं होतं, म्हणजे मधली काही वर्षं जरा बरी गेली असती, असं वाटलं.

त्यामुळे तुम्हाला कुतूहल असेल तर तुम्ही जरूर जाऊन या बिनधास्तपणे, असंच माझं सांगणं राहिल.

बाकी माझा लेख म्हणजे ते, एक हत्ती आणि चार आंधळ्यांच्या गोष्टीसारखं आहे... एकेक जण हत्तीला चाचपडून बघतो आणि हत्तीचं वेगवेगळं वर्णन करतो...
त्यामुळे स्वतः अनुभव घेऊन बघितलेला केव्हाही चांगलं.

(प्रतिसाद कृपया हळू घ्या) :-)

मुक्त विहारि's picture

23 Nov 2021 - 5:05 pm | मुक्त विहारि

चपखल उपमा

राघव's picture

24 Nov 2021 - 9:19 pm | राघव

अधिकेक.

शाम भागवत's picture

23 Nov 2021 - 4:19 pm | शाम भागवत

अटींमधे तसं काही लिहिलेलं जाणवलं नाही.
मात्र मोठ्याने नामस्मरण करणे नक्कीच चालणार नाही.
मनातल्या मनात केल्यास, आपण स्वत:हून सांगितल्याशिवाय ते कोणाला कळणार आहे?

त्यांचा मुख्य मुद्दा श्वासावर लक्ष ठेवण्याचा आहे. जप करताना श्वासावर लक्ष ठेऊन जप करता येतो. त्यामुळे श्वासावर लक्ष ठेवण्याची त्यांची अट पाळली जात असल्याने काही हरकत नसावी.

आता फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते. ती म्हणजे श्वासावर लक्ष ठेवण्याव्यतिरिक्त मनाने बाकी काही करू नका असं सांगितलं असेल तर मात्र जप करता येणार नाही. मात्र ज्यांचा जप आपोआप चालू असतो ते मात्र याही अटीतून सुटू शकतील.
किंबहुना इथंपर्यंत ज्यांचा जप पोहोचलेला असेल ते नेहमीच्या जीवनातही अनेक तासांचे मौन पाळणे, ७-८ तास जप करणे, पहाटे लवकर उढणे वगैरे करतच असणार. अशांची झोपही कमी झालेली असते. भूकही कमी झालेली असते.

त्यामुळे अशांना ही विपश्यना म्हणजे नामस्मरणासाठी पर्वणीच वाटायची शक्यता आहे असे माझे मत आहे.

शाम भागवत's picture

23 Nov 2021 - 4:20 pm | शाम भागवत

अटींमधे तसं काही लिहिलेलं जाणवलं नाही.
मात्र मोठ्याने नामस्मरण करणे नक्कीच चालणार नाही.
मनातल्या मनात केल्यास, आपण स्वत:हून सांगितल्याशिवाय ते कोणाला कळणार आहे?

त्यांचा मुख्य मुद्दा श्वासावर लक्ष ठेवण्याचा आहे. जप करताना श्वासावर लक्ष ठेऊन जप करता येतो. त्यामुळे श्वासावर लक्ष ठेवण्याची त्यांची अट पाळली जात असल्याने काही हरकत नसावी.

आता फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते. ती म्हणजे श्वासावर लक्ष ठेवण्याव्यतिरिक्त मनाने बाकी काही करू नका असं सांगितलं असेल तर मात्र जप करता येणार नाही. मात्र ज्यांचा जप आपोआप चालू असतो ते मात्र याही अटीतून सुटू शकतील.
किंबहुना इथंपर्यंत ज्यांचा जप पोहोचलेला असेल ते नेहमीच्या जीवनातही अनेक तासांचे मौन पाळणे, ७-८ तास जप करणे, पहाटे लवकर उढणे वगैरे करतच असणार. अशांची झोपही कमी झालेली असते. भूकही कमी झालेली असते.

त्यामुळे अशांना ही विपश्यना म्हणजे नामस्मरणासाठी पर्वणीच वाटायची शक्यता आहे असे माझे मत आहे.

बोलघेवडा's picture

23 Nov 2021 - 8:13 pm | बोलघेवडा

माझ्या अल्प द्यानानुसार विपासने मध्ये जपाला परवानगी नाही. ध्यानाची सुरुवात जप किंवा मंत्राने होऊ शकते पण मग काही काळाने ते आपोआप बंद होतं.

ध्यान म्हणजे तुम्ही अक्षरशः स्पेस मध्ये काही काळासाठी विरघळून जाता. मंत्र किंवा जप हा निव्वळ शारीरिक किंवा मानसिक पातळीवरील क्रिया आहे. ध्यान या पुढे एक पाऊल आहे.

शाम भागवत's picture

23 Nov 2021 - 11:01 pm | शाम भागवत

जपाला परवानगी नाही.

जप करायला परवांगी नसावी. हे मान्य केलेच आहे.
पण आपोआप होणाऱ्या जपाला हा नियम कोणी लावू शकेल असे वाटत नाही.

ध्यान म्हणजे तुम्ही अक्षरशः स्पेस मध्ये काही काळासाठी विरघळून जाता.

बरोबर.

जप होत असतानाच कधीतरी ध्यान लागतं व काहीही शिल्लक राहात नाही. पण काहीही शिल्लक राहीलेलं नव्हतं, अगदी नामसुध्दा नव्हतं, हे सगळं ध्यान संपल्यावरच लक्षात येतं.

पण आपोआप होणाऱ्या जपाला हा नियम कोणी लावू शकेल असे वाटत नाही.

आपोआप जप होणार्‍याला विपश्यनेसारखी निराळी गरज काय असावी असा विचार करून हसू आले! :-)

बाकी पाटीलबुवा, लेखन अप्रतीम आहे. चपखल आहे. आणि मूळ विषयात उत्सुकता जागवणारं आहे. खूप खूप धन्यवाद. लिहिते रहा.
कोणताही एक मार्ग, जो स्वतःला पटतो आणि पाळता येईल असा, मनःपूर्वक पत्करून साधन करणे महत्त्वाचे. अनुभव हा ज्याचा त्याचा स्वतःलाच घ्यायचा यायचा असतो. चालू ठेवा साधन. _/\_

शाम भागवत's picture

24 Nov 2021 - 9:53 pm | शाम भागवत

आपोआप जप होणार्‍याला विपश्यनेसारखी निराळी गरज काय असावी असा विचार करून हसू आले! :-)

निवांत जप करायला अनुकूलता खूप कमी झालीय. सात्विक जेवण, झोपण्याची व्यवस्था, मौन याचबरोबर आपल्याशी कोणीही बोलणार नाही याची खात्री. आणखीन काय पाहिजे.
आपोआप जप व अजपाजप वेगळे बरका!
अजपाजप खूप पुढची पायरी आहे. तिथे कायमचा जपही असतो व कायमचे स्मरणही असते.
असो. इथेच थांबतो कारण हा धाग्याचा विषय नाही.
_/\_

राघव's picture

24 Nov 2021 - 11:34 pm | राघव

निवांत जप करायला अनुकूलता खूप कमी झालीय. सात्विक जेवण, झोपण्याची व्यवस्था, मौन याचबरोबर आपल्याशी कोणीही बोलणार नाही याची खात्री. आणखीन काय पाहिजे.

हे फार आवडले. अर्थात् कोनात आणि वनात जप व्हायला [करायला नव्हे] तो मनात होणे [करणे नव्हे] प्राथमिक.

आपोआप जप व अजपाजप वेगळे बरका!
अजपाजप खूप पुढची पायरी आहे. तिथे कायमचा जपही असतो व कायमचे स्मरणही असते.

हे तर मान्यच आहे. पण आपोआप जप होणे हेही काही कमी नाही की. आता त्यात केवळ अनुसंधान व्हावयाचे राहिले. ते प्रेमाने होते, श्वासावर नाम घेतल्याने नाही. तेवढे झाले की मग गोंगाटाने खच्चून भरलेल्या जागेत असा किंवा वनांत... काहीच फरक पडत नाही.. कारण तिकडे लक्षच जात नाही. श्रीमहाराजांच्या आठवणींत सांगितल्याप्रमाणे, विश्वेश्वराच्या दर्शनाच्या [प्रेमळ] आसेने गेलेल्याला आजुबाजूचा त्रास प्रत्ययास येत नाही.. तसे.

मी पण थांबतो. नाहीतर धाग्याचा उगाच खफ व्हावयाचा. :-)

शाम भागवत's picture

25 Nov 2021 - 12:42 pm | शाम भागवत

तेवढे झाले की मग गोंगाटाने खच्चून भरलेल्या जागेत असा किंवा वनांत... काहीच फरक पडत नाही.. कारण तिकडे लक्षच जात नाही.

हो. हेच धेय्य आहे. पण हा खूप लांबचा पल्ला आहे.
पण त्यासाठी करावयाचे प्रयत्न जास्तीत जास्त अनुकूल स्थितीत करावयास मिळाल्यास प्रगती लवकर होण्याची शक्यता असते. यालाच नेट प्रॅक्टीस म्हणतात. ही नेट प्रॅक्टीस करण्यासाठी विपश्यना ही चांगली सोय असे वाटले.
:)

मला फक्त एवढंच सुचवायचं होतं की अनुसंधान प्रयत्नानं साधणारी गोष्ट नाही. :-)

पाषाणभेद's picture

24 Nov 2021 - 8:26 pm | पाषाणभेद

छान लिहीले आहे.

खूप छान लिहिले आहे. वाचून करण्याची इच्छा झाली.

विपश्यनेबद्दल टोकाची मते ऐकली आहेत. लेख मात्र फार आवडला, आलेला अनुभव तुम्ही सुरेख शब्दांत मांडला आहे. दिलखुलास आणि नो अभिनिवेश :-)

स्मरणशक्ती उत्तम आहे तुमची, अकरा दिवसांचे अनुभव सुसूत्रपणे आठवतात हे भारी आहे (तुम्ही डायरी-फोन सोबत नसतो असे सांगितले त्यावरून)

मी देखील ...

त्यामुळे, मन शांत करणे आणि एखाद्या गोष्टीकडे, स्थितप्रज्ञ दृष्टीने पाहणे, ही तारेवरची कसरत आत्मसात करण्यासाठी, अशा गोष्टी आवश्यक आहेत...

वेगळा धागाच काढतो...

गुल्लू दादा's picture

2 Dec 2021 - 10:56 pm | गुल्लू दादा

छान लिहिलंय. आवडलं. धन्यवाद.

तनिश's picture

3 Dec 2021 - 11:15 am | तनिश

लेख वाचून माझा इन्नर enginnnering चा अनुभव आठवला.

स्वधर्म's picture

3 Dec 2021 - 12:52 pm | स्वधर्म

पाटीलसाहेब, लेख खरोखरच अतिशय चांगला झाला आहे, आणि विपश्यनेबद्दल लोकांचे कुतुहल आणि इच्छा जागृत झाली आहे, ही त्याची सर्वोत्तम फलश्रुती होय.
याबाबत लिहावेसे अनेकदा वाटले, पण लिहिले नाही. मी सुध्दा दोन वेळा विपश्यना केलेली आहे. २००८ साली एकदा आणि ऑगष्ट २०२१, म्हणजे तीन महिन्यांपूर्वी दुसर्यांदा. जमेल तशी ध्यानसाधना चालू आहे. विपश्यनेबाबत सर्वात महत्वाच्या काही गोष्टी मला जाणवल्या, त्याबाबत लिहावेसे वाटले.
मी विपश्यनेआधी काही अध्यात्मिक साधना (हा शब्द थोडा जड आहे) उर्फ प्रयत्न केले होते. त्यामुळे ते करणार्या आधिकारी लोकांशी चांगली मैत्रीही झाली होती. उदा. भगवद्गीता अभ्यास, सुदर्शन क्रिया, इ. मला ज्ञान व तंत्राबरोबरच हे लोक आपल्या रोजच्या आयुष्यात वागतात कसे, याबद्दल जबरदस्त कुतुहल होते. त्या सर्वात जास्त मला विपश्यना करणारे लोक रोजच्या व्यक्तिगत आयुष्यात निर्मळपणे वागतात, शीलपालनाबाबत तडजोड करत नाहीत असे आढळून आले. तसेच अहंकार, स्वत:विषयी, स्वत:च्या साधनेविषयी, अध्यात्माविषयी विद्वत्तापूर्ण बोलणे, दुसर्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे, हे कधी आढळले नाही. त्यामुळे जे नियमित निष्ठेने ही साधना करतात, ते सकारात्मकपणे बदलतात असे मी म्हणू शकतो. पण मी स्वत: मात्र तेवढ्या निष्ठेने करू शकत नाही, हेही मान्य करतो. असे असले तरीही इतर कोणत्याही साधनामार्गापेक्षा हा जास्त अनुकूल मार्ग आहे असे मत झाले आहे.
दुसरे म्हणजे, कोणत्याही मार्केटींगचा अभाव, पैशांवरतर आजिबातच लक्ष नाही, साधा गुरूजींचा फोटोसुध्दा कुठे लावत नाहीत. ते किती महान होते, त्यांच्या आठवणींचा कढ काढून सद्गदीत होणे वगैरे असले काहीही नाही. आपल्या पंथात (?) आधिकाधिक लोक यावेत, आधिकाधिक केंद्रे काढावीत अशा प्रेरणा नाहीत. हे मला फार मोलाचे वाटते. मी फारसा श्रध्दाळू नाही, विद्वत्तेवर किंवा वक्तृत्वावर भुलून त्याच्या मागे जाण्याचे माझे दिवस कधीच सरले, त्यामुळे असलाच काही मार्ग, तर तो हाच अशी माझी समजूत आहे. लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

रश्मिन's picture

14 Dec 2021 - 9:39 pm | रश्मिन

दोन खासंखास दोस्तांच्या मैफिलीत सुरुवातीला सगळी खेचाखेच करून झाल्यावर हळू हळू सगळं मनातलं बाहेर यावं असा रंग चढलेल्या मैफिलीचा माहौल उतरलाय ह्या लेखात !
ह्या विपश्यनेच्या कोर्सबद्दल आधीपासून थोडी कुतूहलजन्य माहिती होती. पण १० दिवस सुट्टी घेऊन कोर्स करण्यापेक्षा 'कुठेतरी बाहेर जाऊन उंडारू मस्त' ह्या विचाराने कधी फारसे लक्ष दिले नाही. आता प्रकर्षाने करावा वाटतोय. सगळे अनुभव बारकाईने लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सगळ्या प्रातिसादातून बऱ्याच शंका मिटल्या. वाखूसाहेवेसांनल !

रंगीला रतन's picture

14 Dec 2021 - 10:44 pm | रंगीला रतन

कारण स्वतःच्या गॅसेसवर नियंत्रण ठेवणं, त्या बिचाऱ्यांना जमत नाहीये. ॲलोपॅथी,आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी किंवा तत्सम बंगाली बाबा वगैरे सर्व शाखांनी ह्यांच्यापुढे हात टेकले असतील काय?
की ह्या विकारापुढे ह्या साधकांनी स्वतःहूनच सपशेल हार मानलेली असेल?? कारण काळवेळेचे, स्थळाचे वगैरे बंधनही आता त्यांस क्षुद्र वाटते आहे..!

खरं सांगा इथे जायची दुर्बद्धी तुम्हाला कशी झाली? की Rehab मधी जायचा टाळायला इकडे गेलात :=)