फार पूर्वी म्हणजे ज्या काळात इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता त्या काळात आपले पोलिसमामा सिग्नल तोडणाऱ्या चालकांना बाजूला घेऊन दंड वसूली (तोड-पाणी) करत असत. आता काळ बदलला त्याप्रमाणे आपले पोलीस-दल एकदम जागरूक झाले आहे, एक अनुभव:
झाल अस कि नवीन चुनाभट्टी – बी. के. सी. उड्डाणपुलावरून बी. के. सी. ला जात असताना आमच्या गाडीला पोलीस-मामाने बाजूला घेतले. आणि दारावर टकटक केली, काच खाली करण्यापूर्वी मी माझा मास्क लावला, आणि विचारले काय झालायं? तर म्हणे तुम्ही मास्क लावला नव्हता. इथे एक गोष्ट मान्य आहे कि त्या वेळेस गाडीत एकटाच असल्याने मी मास्क लावला नव्हता. मी म्हटले साहेब मी तर गाडीत एकटाच आहे, आणि तसही तुमच्याशी बोलण्यापूर्वी मी मास्क लावलाच आहे. साहेब म्हणाले ठीक आहे पण आता थांबलाच आहात तर तुमचे गाडीचे कागदपत्र दाखवाच. (जणू मला अंदाज अपना अपना मधला Crime Master GOGO च भेटला) नंतर माझे लायसन, गाडीची PUC, Insurance इत्यादी तपासून देखील काहीच मिळेना तेव्हा साहेब म्हणाले दोनच मिनिटे थांबा........
मग साहेबांनी त्यांच्याकडच्या यंत्रात गाडीचा क्रमांक टाकला, आणि साहेब एकदम उत्साहात म्हणाले कि तुमच्या गाडीवर दोन हजाराचा दंड आहे. हे माझ्यासाठी धक्कादायक होते, कारण अगदी मध्यरात्री देखील लाल सिग्नलवर गाडी थांबवणाऱ्या तसेच अगदी जवळपास जाताना देखील सीट बेल्ट लावणाऱ्या बंडू श्रेणीतला मी असताना, माझ्या गाडीवर दंड, तो पण दोन हजाराचा हे माझ्यासाठी पचायला खूप कठीण होते. माझ्या चेहर्यावरील भाव ओळखून साहेब म्हणाले, दादा तुम्ही Over Speeding केले आहे. मुंबईत द्रुत-गती मार्गावर कमाल वेग मर्यादा ७० आहे आणि तुम्ही ७२ ने गाडी चालवत होतात. द्रुत-गती मार्गावर मध्येच जे कॅमेरा दिसतात तिथेच त्याच्या शेजारी Speed – Gun देखील बसवल्या आहेत. प्रत्येक रस्त्याच्या कोपर्यात त्या – त्या रस्त्याची कमाल वेग मर्यादा लिहलेली असते आणि त्यापेक्षा तुमचा वेग जास्त असेल तर लगेच तुमचा फोटो घेतला जातो आणि तुमच्या गाडी क्रमांकावर “चलान” निघते.
तिथे दोन पर्याय होते, दंड भरा किंवा ........... मी पहिला पर्याय निवडून तिथून निघून गेलो.
आता अगदी परवाचीच गोष्ट आम्ही सह-कुटुंब रात्री एका आप्ताकडे प्रभा-देवीला गेलो होतो. परत येताना वरळी समुद्र-सेतुने परत यायचे ठरले. पण समुद्र-सेतुवर मला एक वेगळीच समस्या जाणवली, तिथे वेग मर्यादा काही ठिकाणी अगदी ३० ते ४० देखील होती. मला सारख्या माझ्या हजार मुद्रा दिसत असल्यामुळे मी ती वेग मर्यादा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. त्यात आमच्या बाजूने बाकीच्या गाड्या एकदम Night – Ride mode मध्ये सपासप जात होत्या. त्यामुळे आपल्या बाबाला वेगाचं भय वाटत अस माझ्या लेकीला वाटल्यामुळे तिच्या नजरेत एकदम सहानुभूतीने दाटू लागली. आणि त्याच वेळेला पोरगा आता जबाबदार वगैरे झाला अस वाटून माझ्या पालकांच्या आणि सौ च्या नजरेत एकदम कौतुकाचे भाव होते. अर्थात त्या वेळेला माझे लक्ष मात्र मी वाचवलेल्या हजार मुद्रांवर केंद्रित होत. पण जेव्हा सगळं पार करून आम्ही वांद्र्याला पोहोचलो तेव्हा मात्र माझे डोके एकदम भंजाळून गेल, कारण तिकडे एक सरकता फलक होता ज्यावर लिहले होते कमाल वेग मर्यादा ८०. पुढे तेच मध्येच आकडे २० पर्यंत खाली होते आणि मध्येच ८०.
आता तमाम जाणकारांनी एवढंच सांगावं कि मुंबईत साधारण किती वेगाने गाडी “चलान” फाड्ल्याशिवाय चालवणे योग्य होईल???
प्रतिक्रिया
11 Oct 2021 - 11:52 pm | प्रसाद गोडबोले
मला जुन महिन्यात असाच रादर ह्याच्यापेक्षाही वाईट अनुभव आलेला आहे . तुम्ही गाडी तरी चालवत होतात, मी तर पायी चाललो होतो तरी मला ओळखपत्र दाखवा असे सांगण्यात आले , आणि नंतर काहीही कारण नसताना ५०० रुपये दंड लावण्यात आला. सविस्तर अनुभव लिहित नाही कारण तुमचा विश्वासच बसणार नाही !
हा देश सोडुन दुसर्या कॅनडा , जर्मनी , ऑस्ट्रेलिया , अमेरिका किंव्वा तत्सम प्रगत देशात जावा , नाहीतर गप गुमान लाच देऊन आहात तिथं निर्लज्जपणे सुखाने रहा हेच दोन पर्याय तुमच्या आमच्या हातात आहेत .
त्रास होतो, उद्वेग होतो , पण त्रागा करुन घेण्यात अर्थ नाही हे देखील कळुन चुकलेले आहे . आमच्या आधीच्या पिढीने ईमोशनल ब्लॅकमेलिंग करत आपले पाय ह्या देशात अडकवुन ठेवले आहेत , आपण ही चुक न करणे ! पोरं कळती होई पर्यंत त्यांना हे असले भ्रष्ट्राचारी लोकं आणि व्यवस्था किळस येई पर्यंत दाखवत रहायचं !
पण तो पर्यंत काय करायचं ? ह्यावर ज्याला त्याला आपापले उत्तर शोधावे लागेल . मला सापडलेले उत्तर म्हणजे - स्वामी विवेकानंद म्हणाले - "दुर्जनांच्या सक्रियता पेक्षा सज्जनांची निष्क्रियते देशाला जास्त मारक असते " म्हणुन मी सर्व सामाजिक बाबतीत पराकोटीचे निष्क्रीय व्हायचे ठरवले आहे !
# भो@#$यात जाऊ दे सगळे .
12 Oct 2021 - 1:03 pm | शेर भाई
साहेब, तुमचा मुद्दा कुठे तरी चुकत आहे. मी भ्रष्टाचाराचे कुठेही समर्थन केले नाही.
विषय फक्त एवढाच आहे कि मुंबईत साधारण किती वेगाने गाडी चालावी?? तसही खड्डे आणि रस्त्यांची कामे यामुळे तसेही आपण मुंबईत गाडी चालल्यासारखी चालवतो हा भाग वेगळा.
12 Oct 2021 - 2:26 pm | प्रसाद गोडबोले
मुळ विषय कळलेलाच नाहीये असे दिसते !
वेग हा मुद्दच नाहीये , तुम्ही अगदी १० च्या स्पीड ने गाडी चालवत असतात तरी तुम्हाला पावती फाडायलाच लागली असती !
मी एकदा सिग्नल वर थांबलो होतो व्यवस्थीत हां , झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे जी लाईन असते तिथे, मला आरटीओ ने हाताचा इशारा करुन पुढे बोलावले , मला वाटलं गर्दी नाहीये म्हणुन तो म्हणत असेल जावा म्हणुन मी जरासा म्हणके फक्त ५० मीटर सुध्दा नसेल इतका पुढे गेलो अन लगेच तोच माणुस पळत पळत पुढे आला अन म्हणाला की तुम्ही सिग्नल मोडलात फाडा २०० ची पावती ! मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो कि तुम्ही हाताचा इशारा केलात म्हणुन मी आलो ! तो हसत हसत म्हणाला बरं ठीक आहे १०० द्या आणि जावा ! ही संपुर्णपणे सत्यघटना आहे , काहीही वाढीव नाही. माझ्या सोबत माझी संपुर्ण फॅमीली होती , चार प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत ! पुढील सिग्नल वर तोच प्रकार झाल्यावर माझी बहीण चिडुन आरटीओ ला म्हणाली की मागच्याच सिग्नल्वर १०० रुपये लाच दिलीये , असं प्रत्येक सिग्नलवर १०० १०० वाटत जायचं आहे का ? तो आरटीओ हसला अन जावा म्हणाला.
हा देश - "मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी फलकटे उचलणार नाही " असे म्हणणार्या लोकमान्य टिळकांचा नाहीये , "तुम्ही मारा , आम्ही सहन करु" असे म्हणणार्या गांधींचा आहे ! त्यामुळे जास्त विचार न करता एक दोन नोटेवरील गांधीबाबा सारायचे अन आपण ते गांधीबाबा हसतोय तसेच हसायचे अन पुढे जायचे !
:)
12 Oct 2021 - 2:49 pm | चौकस२१२
मी तर पायी चाललो होतो तरी मला ओळखपत्र दाखवा असे सांगण्यात आले , आणि नंतर काहीही कारण नसताना ५०० रुपये दंड लावण्यात आला.
कायआय ! हे असे शक्य आहे ? कारण काय सांगितलं सांगाच आता साहेब उत्सुकता शिगेला पोचली आहे
12 Oct 2021 - 2:37 pm | Rajesh188
Police वर होणारे हल्ली हा त्याचाचाच परिणाम आहे.
गुंड,टवाळखोर लोकांनी किती ही नियम मोडले तरी त्यांना रोखण्याची हिम्मत पोलिस दलात नाही.
मुंबई मध्ये होणाऱ्या बाईक रेस.
नळबाजार किंवा तशाच भागात बिन्धास्त तोडले जाणारे नियम.
ही त्याची उदाहरण आहेत..
सभ्य,कायद्याचा मन राखणारी लोक च पोलिस च्या मनमानी चे शिकार होतात.
12 Oct 2021 - 2:46 pm | चौकस२१२
दादा तुम्ही Over Speeding केले आहे. मुंबईत द्रुत-गती मार्गावर कमाल वेग मर्यादा ७० आहे आणि तुम्ही ७२ ने गाडी चालवत होतात
हा हे जरूर कि आपण वेग तोडून कॅमेऱ्याने टिपले असले तर ते झालेले आपल्याला कळणार नाही जोपर्यंत ते प्रेमपत्र येत नाही
असे त्याची नोटीस तुम्हाला पोस्टाने किंवा आजकाल काही आप वैगरे असेल तर येत असायची सोय असेल ना ? ( भारतातातील माहित नाही ) आणि तशी सूचना आल्यावर तो दंड लागू होतो असे मध्येच रस्त्यात जरी त्यांचं "सिस्टीम" मध्ये दिसत असले तरी दंड वसुली करता येते?
नक्की काय परिस्थिती आहे भारतात !
12 Oct 2021 - 5:54 pm | शेर भाई
ते वसूल करूच शकतात कारण ते तुम्हाला तुमच्या गाडीचा फोटू पण दाखवतात. माझ्या मते प्रेम पत्र तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही तुमचा mail ID, link केलेला असतो.
मी Over Speeding केल हे मला मान्य आहे, आणि पोलीस मामाने केलेली सूचना पण मान्य आहे.
त्याला अनुसरून प्रश्न फक्त एवढाच कि समजा जर तुम्ही ठाण्याहून दादरला निघाला आहात तर वाटेत किमान चार ते पाच ठिकाणी हे पोलीसी डोळे आहेत. आता काही ठिकाणी कमाल वेग ८० आहे तर काही ठिकाणी कमाल वेग अगदी ३० देखील आहे. जस लेखात म्हटले आहे कि राजीव गांधी समुद्र सेतूवर काही ठिकाणी वेग मर्यादा अगदी २० पर्यंत आहे आणि शेवटी तिथला सरकता फलक सांगत होता कमाल वेग मर्यादा ८०. मग अशा ठिकाणी औपचारिक वेग मर्यादा कोणती ग्राह्य धरावी.
12 Oct 2021 - 2:58 pm | चौकस२१२
या बाबतीतला माझा अनुभाव असा कि ज्यात चूक माझीच होती पण ती तेव्हा काही केलया मला जाम कळली नवहती आणि मी पोलिसांशी वाद घालत बसलो शेवटी तो पोलीस जाम वैतागला.. शेवटी गप्प बसला आणि म्हणाल घरी जावा आत्ता आरटीओच्या येऊन लायसॅन घेऊन जावा पर्वा
झालं काय नवीन मोपेड घेतली होती आणि त्याचे मडगार्ड साधारण पांढर/ फिकट पिवळे रंगाचे होते, नंबर तेवहा त्यावर पेंटर कडून लिहिला तरी चालत असे, आणि मोपेड चाय मागील मडगार्ड वर एक काळी पाटी होती त्यावर मी पांढऱ्या रंगाने नंबर लिहिला आणि पुढचे त्या फिक्या रंगाच्या मडगार्ड वर काळ्या रंगाने! लिहला ... तो समजावून सांगत होता कि अहो साहेब खाजगी वाहन असेल तर काल्यावर पांढरा लिहावा लागतो .. मला ते "लॉजिक " काही केलया समजत नवहते .. जॅम कल्हई केली मी त्याच्या डोक्याची .. बिचारा सभ्य होता ...
14 Oct 2021 - 5:38 pm | विवेकपटाईत
लेख आवडला. दिल्लीत तर एकाच रस्त्यावर अनेक जागी वेगवेगळी वेग मर्यादा असते.(रिंग रोड वर तर दर दोन किमी नंतर वेगळी वेग मर्यादा तीही 30 ते 80 पर्यन्त ) रोज जाणार्यांना माहीत असते कुठे कॅमेरे लागले आहे. पण अनोळखी माणसाला शंभर टक्के दंड बसणार. या वेग मर्यादांचे कारण कुणीच सांगू शकत नाही. बहुतेक सरकारी अधिकार्यांचा सनकीपणा.
16 Oct 2021 - 12:18 am | शेर भाई
रिंग रोड असेल तर ठीक आहे, तुमचा मुद्दा देखील मान्य आहे. पण, म्हणूनच पूर्व द्रुतगती मार्गाचे उदाहरण दिले आहे. मुलुंड टोल नाक्यापासून सुमन नगर पर्यंत सगळीकडे उड्डाणपूल आहेत, तरीही वेग मर्यादा ७० पासून सुरु होऊन मध्येच ४० पर्यंत खाली येते, तेव्हा काय बरे करावे??
दुसरा आजच बघितलेला मुद्दा असा आहे कि एकाच ठिकाणी दोन फलक पाहिले, एक RTO चा आणि दुसरा MMRDA चा. पहिला म्हणतो ४० दुसरा म्हणतो ७०, मग नक्की करावे काय??
14 Oct 2021 - 6:12 pm | सुरिया
हा ना राव. लिंक येते एसेमेस द्वारे. लिंकमध्ये आपल्याच गाडीचा फोटो असतो. टाइम बॅज असतो आणि नंबरप्लेट एन्लार्ज किंवा स्पष्ट केलेली असते.
आपल्याच गाडीचा फोटो बघायचा आणि हजार रुपये पाठवायचे. अन्याव आहे हा. ;)
14 Oct 2021 - 9:14 pm | अकिलिज
वेग मर्यादा एका रस्त्याला एकच असावी असं कुठे आहे. जर पुढे चौक येणार असेल किंवा रस्ता अरुंद होणार असेल तर ती कमी करावी लागते. पण पुढचा मोठा पट्टा जर कुठला रस्ता आडवा येणार नसेल तर मर्यादा वाढवू शकतात. जिथे मर्यादा लिहीलेली असते तिथे ती सुरू होते पुढे कमी करेपर्यंत.
बाकी पोलिसांचा अनुभव सारखाच आहे. सगळे कागदपत्र तपासून काही नाही मिळाले तर थातूर मातूर कारण पुढे करून दंड वसूल करत बसतात. ''फॉन्ट'' बरोबर नाहीये म्हणून माझ्याकडे दंड मागितला होता. त्याला समोरून जाणार्या पुष्कळ गाड्या दाखवल्या ज्यांचा नंबर बारीक मोठा कसाही लिहीला होता. त्यावर मला काम करायला शिकवू नकोस म्हणून हुज्जत घातली.
बाकी यांना डावीकडून पुढे जाणार्या गाड्या आणि सगळ्यात उजव्या मार्गिकेतून हळू हळू जाणारे मालवाहू ट्रक यांच्याशी काहीही घेणं देणं नाही बघून त्रास होतो. सुधारणेची शष्प आशाच दिसत नाही.
14 Oct 2021 - 10:00 pm | बापूसाहेब
ट्रॅफिक पोलीस / अधिकारी हे फक्त जनतेला लुटून सरकारची तिजोरी भरण्यासाठी तयार केलेली दुभती गाय आहे. यांना दर महिन्याचे किँवा क्वार्टर चे एक स्पेसिफिक टार्गेट दीले जात असावं. तेवढे जोवर जमा होत नाही तोवर शांत बसायच नाही. त्याच टार्गेट सोबत त्यांचं स्वतःच असं टार्गेट देखील असतंच....
यांचा जास्त जोर हा transport vehicles वर असतो. एखाद्या टेम्पो ड्रायव्हर किंवा ट्रक ड्रायव्हर शी बोलून पहा. दिवसभर transport गाडी चालवणारा किमान २००-५०० रुपये यांच्या खिशात घालत असतो. लांब पल्ल्याची ड्रायव्हिंगकरणारे ट्रक ड्रायव्हर कमीतकमी १०,००० घेतल्याशिवाय ट्रीप वर निघत नाहीत कारण प्रत्येक ठिकाणी यांचे खिसे गरम करावे लागतात. आणि सरतेशेवटी या सगळ्याचे पैसै हे ग्राहकाकडून ( एंड युजर) घेतले जात असतात. सगळं काही व्यवस्थीत असले तरी मग शेवटी खुशीने काहीतरी दे अशी मागणी करायला ही हे पोलीस मागे पुढे पहात नाहीत. निर्लज्ज... !!!!!
आता इथे कोणी अतिशहाणा किंवा पोलीसप्रेमी माणूस बोलेल की ते त्यांचे काम करतायेत. लोकांनीं नियम पाळले पाहिजेत .. रस्त्यावर जीव जाऊ शकतो म्हणून सुरक्षेसाठी हे नियम आहेत..ब्ला ब्ला ब्ला.
मान्य.. तुमचे सगळे युक्तिवाद मान्य. पण ... पण आपण जिथे राहतोय तो भारत आहे. अमेरिका किंवा uk नव्हे. सरकारला लोकांनीं हेल्मेट घालावं वाटतं कारण त्याने जीव वाचतो.. त्यामुळें हेल्मेट घातले नाही तर ५०० रुपये दंड... पण रस्त्यावरील खड्डे आणि अशास्त्रीय पद्धतीने बनवले जाणारे रस्ते यांच्यामुळे आजवर लाखो, कोट्यवधी लोकांचा जीव गेलाय किंवा अपंगत्व आलेय तरी सरकार वर किंवा भ्रष्ट व्यवस्थेवर ५ पैश्यांचा देखील दंड झाल्याचे ऐकिवात नाही.
नो पार्किंग मध्ये गाडी लावली की १०००, २००० कीतीही दंड घेतात.. पण इतका पैसा गोळा करून कधी कुठे ऑफिशियली यांनी सुसज्ज अशी पार्किंग ची सोय देण्याची तत्परता दाखवलीय का??
जेव्हा दंड, पावत्या इ चा विषय येतो त्यावेळी अगदी कडक नियम लावायचे. अगदी अमेरिकेला मागे टाकेल असे नियम अमलात आणायचे.. पण अमेरिकेतल्या सारखे रस्ते, सोयीसुविधा मात्र द्यायच्या नाहित. ही म्हणजे एक प्रकारे खंडणी वसूल केल्यासारखे आहे.
म्हणजे सरकारनं काहीही केलं तरी सगळं योग्य पण जनेतेन नियम पाळले पाहिजेत आणि मोडले की दंड पण भरला पाहिजे.
सामान्य माणसाची गाडी असेल तर एक दिवस देखील PUC नसेल तर लगेच दोन हजार दंड द्या.. पण सरकारी गाडी ( ST, Bus, इतर सरकारी वाहने ई) रस्त्यावर अगदी काळाकुट्ट धुर ओकत जरी गेली तरी यांची काहीच जबाबदारी नाही. तेव्हा प्रदूषण होत नसते..
कोणी मला अत्यंत अमानवीय, असुरी किंवा माणुसकीहिन म्हटले तरी हरकत नाहीं पण खर सांगायचं तर एखादा अधिकारी , पोलीस , ट्रॅफिक पोलीस यांना वैतागून पब्लिक यांनामारहाण करते त्यावेळी खुप बरे वाटते...
असो.
एवढं सगळं लिहायचं कारण की धागलेखकला ७० ऐवजी ७२ च्या स्पीड ने गाडी चालवली म्हणून दंड भरावा लागला.. पण आम्हीं रोज मंत्र्यांचे आणि ईतर सरकारी अधिकाऱ्यांचे ताफे येताना जाताना पाहतो. साध्या रस्त्यावर डेखील ८०-९० च्या स्पीड ने गाड्या पळवत अस्तात. आणि त्यात त्यांना साथ देण्यासाठी पुढें आणि मागें अश्या दोन गाड्या पोलिसांच्या स्वतःच्या असतात. तेव्हा कुठे जातो हा ओव्हर स्पीड चा नियम ?? यांची चलन कोण फडणार?? यांच्यामुळे कोणाच्या जीवाला धोका नसतो का??.. पण आमच्यासारख्या लोकांनीं एक्स्प्रेस वे वर ७० चे ७२ केले की लगेच दंड भरा..
वा रे सरकार.. वा रे नियम.. वा रे तुमचा दंड.. !!
14 Oct 2021 - 11:20 pm | उगा काहितरीच
हा भाग सोडला तर बाकी पटलं ! निश्चितच या गोष्टींचा विचार व्हायला हवा.
बाकी हे overapeeding च दंड खूप चुकीचं वाटतो. काही ठिकाणी रस्ते अतिशय खराब असतात. अगदी १०-२० च्या स्पीड ने जावं लागतं .असा रस्ता पार केला आणि थोडा चांगला रस्ता लागला की स्पीड वाढली जाणारच ना. जर १००% स्पीड लिमिट नुसार जायचं म्हटलं तर कधी पोचणार? कितीही फास्ट जायचं म्हटलं तरी सरासरी स्पीड ४०-६० च्य आसपासच असणार.
मागच्या एका वर्षात मी ४-५००० रुपये भरला दंड. गाडी फक्त ६-७००० किमी चालली असेल. (दसऱ्याला १ वर्ष होईल पूर्ण गाडीला)
16 Oct 2021 - 10:18 am | सुबोध खरे
माझ्या जावयाने माझी गाडी मुलुंड पश्चिम ला रुणवाल प्लाझा शी पार्क केली होती ती टो करून नेली. ती सोडवायला जगेल असताना त्याला जुना १००० रुपये दंड (बहुधा माझ्या मुलाने कुठे तरी सिग्नल तोडला असावा) आणि आताचे ६०० असे १६०० रुपये भरायला लावले.
असे थोडेसे पैसे मी साडे सात लेखाला गाडी घेतली त्यात अजून पैसे जाणार आहेत असे मनाला समजावले.
तसेच तुम्ही दर वर्षी २-३ हजार रूपये कुठेतरी जाणार आहेत ( नको असले तरी गणेशोत्सवाची वर्गणी भरावी लागते तसे) हे गृहीत धरा म्हणजे मनाला त्रास होणार नाही.
16 Oct 2021 - 3:43 pm | उगा काहितरीच
खरं आहे डॉक्टर साहेब. असे अक्कल खात्यात २-५००० हजार रुपये जाणारच आहेत असं गृहीत धरून चाललं तर डोक्याला त्रास कमी होतो.
अवांतर विषयाबद्दल क्षमस्व , मागे असंच कोणत्या तरी धाग्यावर वाचलं होतं की क्रेडिट कार्ड वाले / insurence वाले कॉल आले की असच शांतपणे नाही पाहिजे म्हणुन कॉल ठेवून द्यायचा. तेव्हापासून खरंच या गोष्टीचा त्रास नाही झाला. नाहीतर अगोदर उगाच भांडण चिडचिड होत होती.
16 Oct 2021 - 6:38 pm | सुबोध खरे
आताशा असे फोन आले कि मी काहीही न बोलता फोन खिशात ठेवतो आणि त्याने चार वेळेस हॅलो हॅलो करून फोन कट केला कि त्याचा कॉल ब्लॉक करतो. हळू हळू काही महिन्यांनी हे कॉल कमी होत जातात कारण प्रत्येक कंपनीचे चार पाच नंबर असतात ते सगळे ब्लॉक झाले कि हा त्रास कमी होतो.
16 Oct 2021 - 5:46 pm | चौथा कोनाडा
असेच आपण मनाला समजवत राहतो आणि आरटीओची म्हातारी सोकावत राहते !
माझ्या एका मित्राच्या दुचाकीला नियम चुकवला म्हणुन दंड बसवला. नियम चुकवल्याच्या फोटो म्हणुन रिक्षाचा फोटो दाखवला. मग त्याने दंड्च भरला नाही पण त्यासाठी खुप भांडावे लागले. आम्च्या इथे एमएचचौदावाडीत "पांढर्या रंगाच्या मोठ्ठ्या गाडीवाले" सर्रास नियम पायदळी तुडवतात, पण त्यांना दंड होत नसतो !
16 Oct 2021 - 6:46 pm | सुबोध खरे
कधी तरी सहा आठ महिन्यांपूर्वी चुकून झालेल्या किंवा न केलेल्या गुन्ह्याबद्दल झालेला डोक्याला त्रास न करून घेता दंड भरून मोकळे होणे हाच एक उपाय आहे आपल्याकडे.
कारण सत्तेपुढे शहाणपण नसते आणि अशा लुंग्यासुंग्या सरकारी माणसाशी भांडत बसण्यात जाणारा वेळ आणि होणारा मनस्ताप याची काय किंमत आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
एके काळी सरकारी नोकरी करत असताना मी भावाचे काही सामान आणण्यासाठी लोहार चाळ येथे गेलो होतो. तेथे एका ठिकाणी मोटार सायकल उभी केल्याबद्दल वाहतूक हवालदाराने मला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मी का विचारल्यावर त्याने येथे नो पार्किंग आहे असे सांगितले. मी त्याला बोर्ड कुठे आहे ते विचारले. त्याने सांगितले बोर्ड नाही पण येथे नो पार्किंग आहे.
मी स्वच्छ शब्दात त्याला सांगितले तुमच्या बापाची जहागीर आहे का? मी अजिबात गाडी बाजूला घेणार नाही आणि तुम्हाला लायसन्स सुद्धा दाखवणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा. अर्थात मी पूर्ण गणवेशात असल्याने मला हात लावायची त्याची हिम्मत झाली नाही.
असंच असतं.
16 Oct 2021 - 10:30 pm | रावसाहेब चिंगभूतकर
तुम्हाला संधी असताना त्या चिलटाला हाणून घ्यायचं ना.
16 Oct 2021 - 10:54 pm | श्रीगुरुजी
मला ३ वर्षांपूर्वी Activa स्कूटर झेब्रा क्रॉसिंगवर उभी केल्याचा गुन्हा केल्याचं समन्स आलं. त्याबरोबर एक फोटो होता. त्यात झेब्रा क्रॉसिंगवर उभे असलेले वाहन एक मोटरसायकल आहे. माझ्या स्कूटरचा क्रमांक 9161 आहे. त्या मोटरसायकलचा क्रमांक 9164 आहे. त्यातील 4 हा अंक काहिसा अस्पष्ट झाल्याने 1 असा वाटतोय.
चुकीच्या गाडीचे समन्स कसे रद्द करावे यासाठी मी चौकातील एका पोलिसाला विचारल्यावर त्याने कमिशनर कार्यालयात जायला सांगितले जे माझ्या घरापासून १० किमी अंतरावर आहे. त्यामुळे मी पुढे काहीच केले नाही.
एका RTO App ची नुकतीच माहिती मिळाल्यावर मी गाडीचा क्रमांक टाकून पाहिले तर ते समन्स व तो फोटो अजूनही आहे. तेथील ग्रिव्हन्स हा पर्याय निवडून चुकीच्या समन्सबदल तक्रार केली आहे. तक्रार २५ सप्टेंबरला केली. तक्रारीचे स्टेट्स अजूनही in progress असेच आहे.
17 Oct 2021 - 12:55 pm | चौथा कोनाडा
सरकारी म्हटल्यावर कायमच "काम चालू आहे" अर्थातच in progress !
अश्या गोष्टींकडे लक्ष का देत नाहीत कोण जाणे !
16 Oct 2021 - 3:58 pm | बापूसाहेब
सहमत .. ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या स्वीकारणे योग्य.
माझे याबाबतीत( आरटीओ ला दिलेले वेगवेगळे प्रकारचे दंड ) सर्व मिळून 2200 रुपये अक्कल खात्यात जमा झालेत. गेल्या 5 वर्ष्यामध्ये.
17 Oct 2021 - 6:18 pm | विलासराव
मला दोन महिन्यापूर्वी बारामतीमध्ये असा अनुभव आला.
माझा भाऊ गाडी चालवत होता. मी एक दिवसाचे ध्यान शिबीर घेतले. पाच वाजता शिबीर संपले, गाडीत बसलो, भावाने गाडी वळवली, स्पीड घेतले आणी समोर २ पोलीस.
एक ट्राफिक पोलीस आणी एक पोलीस.
भावाने हनुवटीचा मास्क नाकावर ओढला. मी खिशातला रुमाल काढला पण मला बांधता आला नाही.
गाडी बाजूला घेतली, बंधू म्हणाले काय झाले? पोलीस : बाजूच्याने मास्क लावला नाही. बंधू : माझा काही प्रॉब्लेम नाही ना?
पोलीस : नाही ते बाजूचे.
बंधुला बऱ्याचदा फाईन झाला, मी वाचलो होतो. पण आज त्याला आनंद झाला मी सापडल्याने. असो.
पोलीस : तुम्ही मास्क लावला नाही, पाचशे रु दंड भरा.
मी : साहेब मी दंड भरतो पण फक्त्त माझे ऐकून घ्या. उतरून त्यांच्याकडे गेलो. मी आताच ध्यान शिबीर घेऊन बाहेर पडलो. तीन चारशे मिटर पुढे आलो आणी तुम्ही समोर.
मी मास्क लावला नव्हता हे खरे आहे. तितकेच मी सांगितले हेही खरे आहे. तुम्हाला चेक करायचे असेल तर आयोजकांशी बोलणे करू शकता. दिवसभर ध्यान केल्याने चेहऱ्यावर जराही त्रागा नव्हता आणी मनही शांत होते.
पोलीस : ठीक आहे. तुमच्या मनाने काय द्यायचे ते दया. पावती देतो.
मी : तुम्हीच सांगा तेवढे मी देतो.
पोलीस : बरं राहूद्या. पुन्हा मास्क लावायला विसरू नका.
आता माझ्या चेहऱ्यावर आनंद आणी भावाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
खरेतर मी फक्त्त फाईन वाचवण्यासाठी रुमाल बांधतो. पण अचानक सापडलो आणी सुटलोही.
17 Oct 2021 - 7:16 pm | सुरिया
पण ट्राफिक पोलिसांनी मास्क का चेक करायचा?
उद्या ते तुमचा पॅन नंबर विचारुन मशीनीत टाकून इन्कमटॅक्स विचारतील. आधारकार्ड विचारुन तुमची काही कर्जे राहिली आहेत का? हप्ते राहिलेत का विचारतील?
वाहने आणि वाहतूक संबधित कर्तव्ये करावीत ना त्यांनी व्यवस्थित. का पैशासाठी काहीपण.
17 Oct 2021 - 7:29 pm | बबन ताम्बे
पुण्यात वहातुक पोलिसांचा अनुभव अजिबात चांगला नाही. तरुण पोरं ही त्यांची नेहमीची गिऱ्हाईक. एखाद्याचं अर्जंट काम असेल वगैरे त्यांना काही घेणं नसतं. झुंडीने उभे रहातात आणि एकेकाला बाजूला घेतात. ट्रॅफिक गेलं तेल लावत. यांचं तोडपाणी सर्रास चालू असतं. वन वे म्हणजे तर बकरे पकडायला लावलेले सापळेच .कुठे तरी बारीकसा नो एंट्रीचा बोर्ड असतो जो सहजी दिसत नाही. दुसऱ्या टोकाला हे महाराज असतातच सावज पकडायला.
18 Oct 2021 - 12:28 pm | Rajesh188
ही फक्त एक बाजू झाली .
की वाहन चालक हे सर्व नियम पाळून गाडी चालवतात आणि पोलिस तरी त्रास देतात.
हे खरेच आहे
पण ह्याची दुसरी बाजू खूप काळी कुट्ट आहे.
वाहन चालक हे अत्यंत बेशिस्त वर्तन करत असतात.
रहदारी च्या रस्त्यावर पण वेगाने गाडी चालवणे.
मूर्खा सारख्या lane बदलत राहणे .
चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे.
कुठे ही गाड्या पार्क करणे.
गाडीच्या क्षमते पेक्षा जास्त माणसं किंवा सामान भरणे.
गाड्या ची अवस्था अतिशय खराब असणे.
बाईक वाले ही सर्वात जास्त मूर्ख जमात पुण्या .मुंबई चया रस्त्यावर मिनिटं मिनिटाला रस्त्यावर दिसेल..
वाहन चालवणारे जितके बेशिस्त पुणे शहरात आहेत तेवढे मुंबई मध्ये पण नाहीत.
21 Oct 2021 - 7:14 pm | कर्नलतपस्वी
उगीचच पैसे दंड किवा लाच म्हणून भरण्यासाठी लागले तर मानसिक त्रास खुप होतो पण अनेकवेळा गत्यंतर नसते आता हल्ली हे सर्व दानधर्म या कलमा खाली घालून मानसिक त्रास वाचवण्याचा प्रयत्न करतो.
एक सत्यघटना, मुलीचे लग्न झाले एका आठवड्यात अमेरीकेला परत जायचे, विवाह प्रमाण पत्र अनिवार्य म्हणून लाच दिली. सरकारी नियमानुसार पंचेचाळीस दिवस लागतील म्हणून हा सर्व खटाटोप. नतंर मनाप, सरकारी तंत्राला रितसर विचारार्थ निवेदन दिले कदाचित काही सुधारणा करतील ,वाटले इथून पुढे मुलांना त्रास होणार नाही पण निर्लज्ज लोक आपल्याच पायावर का धोंडा पाडून घेतील. पण RTO चा अनुभव सुखकर होता.
22 Oct 2021 - 11:59 am | चौथा कोनाडा
वेगे वेगे धावू .... अन वेगे वेगे भ्रष्ट करू
आजच्या मटातली ही बातमी पहा.
हे लोक कोणती यंत्रणा कितीही आणि कशीही भ्रष्ट करू शकतात, बरं पण मग दोषी कुणीच नसतं,
तांत्रिक कारण किंवा इतर टुकार कारणांना दोष द्यायचा आणि पुढील भ्रष्टाकार करायला मोकळे !
22 Oct 2021 - 12:55 pm | Rajesh188
जुनाट,कालबाह्य कायदे रद्द करण्याचा मानस माननीय प्रधानमंत्री ह्यांनी व्यक्त केला होता.
ब्रिटिश कालीन जुने ,कालबाह्य कायदे युद्ध पातळीवर रद्द करणे खरेच गरजेचे आहे
अगदी आयएएस,आयपीएस ह्यांचे अधिकार आणि निवड आणि पोस्टिंग ज्या विषयी असणारे जुनाट कायदे रद्द करून नवीन करावेत.
नोकरशाही ही कायद्या बरोबर सरकार आणि लोकांशी पण बांधील पाहिजे.
त्यांना असलेले कायद्या चे संरक्षण काढून टाकले पाहिजे.
तेव्हाच हे सुधारतील.
22 Oct 2021 - 1:30 pm | सुबोध खरे
Centre's clean-up act: Modi government terminates 1,500 archaic laws
While successive governments could remove just 1,301 obsolete laws which came in the way of smooth administration and economic growth in 66 years, the present central government has managed to weed out as many as 1,500 Acts in just three years.
And the Narendra Modi government is terminating them at record speed to fulfill a poll promise. If things go according to plan, the government would have removed nearly 3,500 old, redundant, archaic and bizarre laws from the statute books by the end of its five-year term.
https://www.indiatoday.in/mail-today/story/centre-s-clean-up-ct-modi-gov...
अजून किती काम बाकी आहे हे लक्षात घ्या.