अभियांत्रिकीचे दिवस-३.. सबमिशन्स

Primary tabs

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
20 Aug 2021 - 7:15 pm

पहिल्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षेच्या तडाख्यात, निम्मी-अर्धी जनता जबर जखमी व्हायची. पण कसेतरी बॅकलॉग घेऊन, रडत खडत दुसऱ्या वर्षाचा जुगाड लागायचा. उरलेली जी जनता गचका खायची त्यांची व्हॅकन्सी डिप्लोमाच्या पोरांनी भरून काढली जायची.

ज्याप्रमाणे घरात नवीन आलेल्या सुनेला तिची सासू वेगवेगळ्या आयडिया काढून, घरात मिसळून घ्यायची टाळाटाळ करते, त्याच प्रकाराची एक आवृत्ती रेग्युलरची पोरं ह्या डिप्लोमाच्या पोरांच्या बाबतीत सादर करायची.

"आम्ही तुमच्या आधीपासून इथं आहोत. त्यामुळं इथल्या सगळ्या रिसोर्सेसचा लाभ घेताना आधी आम्हाला विचारलं गेलं पाहिजे", असा ह्या रेग्युलर पोरांचा दावा असायचा.

पण डिप्लोमाची पोरं बारा गावचं पाणी पिऊन आलेली असल्यामुळं ह्या चाळ्यांकडे दुर्लक्ष करून, सबमिशनच्या वेळी कळेल कोण सासू आणि कोण सून ते, म्हणून त्यांचं त्यांचं चालू ठेवायची.

अर्थात हे फ्रिक्शन जास्त वेळ टिकायचं नाही.

दिवस निवांत, आपोआप जात राहायचे.

हा आळसावलेल्या गोगलगायीसारखा निवांतपणा सदैवच असायचा असं नाही.

मढ्यासारखं सुस्त पडलेल्या हॉस्टेलला सेमिस्टरच्या शेवटी हळू हळू जाग यायला लागायची.

अंगाला लागलेली वाळवी खरवडायला आणखी थोडा वेळ जायचा.

तोपर्यंत सबमिशन्सच्या महापूराचे पाणी गळ्याशी आलेलं असायचं. मग सगळ्यांची जीवाच्या आकांतानं हातपाय मारायला सुरुवात व्हायची.

भांडवल-कॉपी शोधणं, ही पहिली आणि तातडीची टास्क..!

गर्ल्स होस्टेलवर सगळ्याच विषयांच्या भांडवल कॉप्या नेहमीच तयार असायच्या. मग त्यांच्याशी सलोख्याचे संबंध असलेल्या एका मध्यस्थाला त्या मोहिमेवर पाठवलं जायचं किंवा हौसेखातर तो स्वतःच जायचा.

तिथं जाऊन तो,
'' वाढा वो sss माय '' '' काय शिळं- पाकं सबमिशन आसलं तर द्या वो माय sss ''
अशा पद्धतीनं मन लावून भीका मागायचा.

आणि ते रेडीमेड फायलींचं बोचकं पाठीवर बांधून होस्टेलवर आणायचा.
तोपर्यंत होस्टेलवर सगळीकडे बुभूक्षित आदिमानव त्याची वाटच बघत बसलेले असायचे.

मग जे काही आपल्याला सुरुवातीला झेपेल, ते उष्टं खरकटं सबमिशन हातात घेऊन सगळे जीव तोडून लिहित सुटायचे. कारण टर्म एन्ड आठवड्यावर आलेली असायची.

अशाच काळात लोकल पोरांचा होस्टेलवर बाजार उठायला सुरुवात व्हायची.

'' भावाsss तूच आहेस!! ''

असे आणि वेगवेगळ्या बाइक्सचे आवाज अहोरात्र, होस्टेलच्या कॉरिडॉरमधून घुमायला लागायचे आणि मागची सगळी खुन्नस विसरून तात्पुरते गळ्यात गळे घातले जायचे.

गर्ल्स होस्टेलवरून सबमिशन आणायला गेलेल्या मध्यस्ताबरोबर खंडीभर गाईडलाईन्सही आलेल्या असायच्या.

या गाईडलाईन्स मुख्यतः काळजीयुक्त आणि किनऱ्या आवाजातल्या असायच्या.

उदारणार्थ..

"असाइन्मेंट्स चुरगाळू नकोस हं "
"फाईलवर डाग पडू नकोस हं"
"फाईल कुणाला देऊ नकोस हं"

अर्थात सूचनांकडे ताबडतोब दुर्लक्ष व्हायचं. कारण त्या फाईलीतली पानं नंतर सतरा ठिकाणी फिरत राहायची.

कोण कंट्रोल ठेवणार ? आणि एवढा वेळ कुणाकडे असणार होता..!

कुणालातरी लिहिता लिहिता त्यावर डुलकी लागू शकते, त्यांच्यावर कुणाच्या वडापावचा डाग पडू शकतो..

कुणी लिहिता लिहिता बसल्या जागेवरून खिडकीच्या दिशेनं तोंड करून मारलेली पिचकारी त्या पानांवर रिटर्न उडू शकते..

कधी कधी त्यातली गहाळ झालेले ग्राफ्स सहा- सात महिन्यांनी कुणाच्यातरी गादीच्या किंवा कपाटाच्या कोपच्यात सापडलेले आढळू शकतात..

अशा हजारो शक्यता..!

आपण काय काय बघणार ? आपलं आपलं सबमिशन झाल्याशी मतलब.

अशी जबाबदारी झटकण्याची ट्रेनिंग तिथं सगळ्यांनाच आपोआप मिळालेली असायची.

"कंझ्युमर्स स्टोअर उघडलंय काय बे ?" असा एक लाखमोलाचा रोकडा सवाल याच काळात उपस्थित व्हायचा.

मग एकजण एका खटारा स्कूटीवरून कोऱ्या फायली, इंडेक्स, पेजेस, ग्राफ्स, शीट्स सगळ्यांसाठी आणायचा.

सबमिशन लिहिताना " काय लिहितोय " कशासाठी लिहितोय" "कुठल्या प्रॅक्टिकलचे रीडींग्ज लिहितोय" असले फालतू प्रश्न कुणालाच पडायचे नाहीत.

कारण ते कागद ऑल-रेडी सतरा ठिकाणांवरून झिरपत झिरपत त्यांच्यापर्यंत आलेले असायचे.

आणि प्रत्येकाने आपापल्या परीने त्यातला मजकूर गाळून गाळून आणि हक्कानं १५-२० चुका करूनच पुढच्यांपर्यंत पोचवलेला असायचा.

आणि चुकून एखाद्याला लिहिताना समजा काही डाउट आलाच तर "मरू दे च्यायला !! चेकिंगच्या टायमाला मास्तरनं पकडलंच तर बघू पुढच्या पुढं!! " असं म्हणायची पद्धत होती.

स्वतः उठून रेफरन्स बुक्स शोधून करेक्शन करायचा दम कुणातच नसायचा...!

कारण उघड आहे !! त्यावेळेपर्यंत त्या सेमिस्टरला "नेमके विषय कुठले कुठले आहेत" ह्याचाच पत्ता नसायचा.

याच काळात काही मोक्याच्या ठिकाणी GT चा (ग्लास ट्रेसिंगचा) सेट लावून ठेवलेला असायचा.

ते लोक जाडजूड रेफरन्स बुक्सचा उपयोग फक्त GT च्या ग्लासला दोन्ही बाजूला सपोर्ट लावायला करायचे..

शेकडो जणांच्या शीट्सची भेंडोळी जोपर्यंत ट्रेस होऊन बाहेर पडत नाहीत तोपर्यंत ही GT ची भट्टी दिवसरात्र सेवा देत राहायची.

शेवटी शेवटी दिवसरात्र GT मारून मारून झिंगलेले डोळे, आंघोळीला आठवडेच्या आठवडे वेळ न मिळाल्यामुळे सगळ्यांनाच येणारा सूक्ष्म वास, त्यात सिगरेटींचा वास मिक्स झाल्यामुळं तयार होणारं एक "डेडली कॉम्बिनेशन"... असा सगळा वैताग माहौल सबमिशन्सच्या काळात सगळ्या होस्टेलभर पसरलेला असायचा..!

मुक्तकविनोदशिक्षणअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

20 Aug 2021 - 7:21 pm | टवाळ कार्टा

तिथं जाऊन तो,
'' वाढा वो sss माय '' '' काय शिळं- पाकं सबमिशन आसलं तर द्या वो माय sss ''
अशा पद्धतीनं मन लावून भीका मागायचा.

कहर लिहिले आहे =))

खेडूत's picture

20 Aug 2021 - 10:46 pm | खेडूत

=))
एकदम सचित्र!

आमचा एक हिरो फक्त कोऱ्या बाजूचे डाएग्राम, तक्ते काढून दिले की बाकी सगळा कल्पना विस्तार मनाने करत असे.

गुल्लू दादा's picture

20 Aug 2021 - 9:34 pm | गुल्लू दादा

मस्त आहे.

अमर विश्वास's picture

20 Aug 2021 - 9:44 pm | अमर विश्वास

आम्ही डिप्लोमा वाले .... त्यामुळे सबमिशनला सरावलेले ...

त्यातून GPP (Govt Polytechnic Pune ) चे .. त्यामुळे GT च्या विरुद्ध .. कारण आमच्या वेळी मराठे मास्तर होते. त्यांना जर GT चा संशय जरी आला तरी पेनाने मोठ्या अक्षरात ड्रॉईंग शीट वर GT असं लिहायचे आणि मग विचारायचे .. परत कढतोयस का सबमिट करू ?

त्यामुळे डिग्री ला मी अनेकांची "चित्रे" काढून दिली आहेत ...

बाकी शेवटच्या दिवशी (रात्री) सबमिशन करायची सवय अजूनही सुटत नाही

सुखी's picture

20 Aug 2021 - 10:13 pm | सुखी

भारी... तुच रे भावा

श्रीरंग_जोशी's picture

20 Aug 2021 - 11:12 pm | श्रीरंग_जोशी

खासंच लिहिलंय. वेगवेगळी दृश्ये डोळ्यासमोर स्पष्ट उभी राहिली. पुभाप्र.

सुक्या's picture

20 Aug 2021 - 11:34 pm | सुक्या

GT ला काय बोलायची नाय हा सांगुन ठेवतो. मशिन डिझाइन केवळ GT मुळे तरलो आहे.

-- GT बाज सुक्या

गॉडजिला's picture

21 Aug 2021 - 12:59 am | गॉडजिला

क्लिशेअसुनही...

चौकस२१२'s picture

21 Aug 2021 - 7:52 am | चौकस२१२

सबमिशन बनवण्याची ची रात्र अशी असायची
- संध्याकाळी क्रिकेट ग्राउंड जिमखान्यात कॅरम , टेबल टेनिस खे ळून ७.३० ला मेस मध्ये जेवयाला
- आज मोठी रात्र आहे म्हणून बिडी वाले स्टोक आहे ना याची तयारी करून ठेवणार
- कॉलेज च्या हॉस्टिल मध्ये राहात नसाल आणि जवळ च्या कॉलनीत राहत असाल तर हॉस्टेल ग्रुप मध्ये या रात्री साठी बुकिंग करून ठेवणे कारण हॉस्टेल मध्ये वीज गेली तरी कॉलेज या काळात जनरेटर लावून १२ पर्यंत वीज देत असे
- काम सुरु झाल्यावर १० वाजता पहिली चहा बिडी काडी सुट्टी ,
- १२ ला टपरी बंद होन्या आधी / ऑम्लेट / चहा सुट्टी / तेवहा बिस्कीट चा पुडा ना विसरत टपरी वरून घेऊन ठेवणे / रूम वर कोईल हिटर काम करतो ना बघून ठेवणे
- १.३०. ला एक जण सायकल ने पुढे मार्केट यार्ड च्या जवळ उशिरापर्यंत उघडी असणारी टपरी वर जाऊन चहा आणणार ( कारण बरेचदा कोईल हिटर वापरणे धोक्याचे मग कसा करणार खोलीत चहा?
- पहाटे पहाटे बादली घेऊन बॉयलर रूम नामक हॉस्टेल च्या खास गरम पाणी मिळणार्या ठिकाणी जाणे
- कँटीन ला जाऊन गरम उप्पीट किंवा गोड शिरा खाणे, त्यावर मस्त कोफी
( इंजिनीरिंग कॉलेज असल्यामुळे स्वतःचा बॉयलर , जनरेटर , या सोयी होत्या सरकारी कॉलेज असून सुद्धा )
मग हि गरम पाण्याची अंघोळ + जागरण + भरलेले पोट या मुळे जी काही सुस्ती यायची कि खोलीच्या सर्व खिवडक्या बंद करून ताणून देणे

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार ... _/\_ :-))

१.५ शहाणा's picture

22 Aug 2021 - 1:00 pm | १.५ शहाणा

GT फार महत्वाचे साधन होते, आमच्यात एकाला फक्त GT चे काम दिले जायचे बिचारा रात्र भर ३-४ शिट मारायचा मधून दिवा बंद करणे मागील बाजूने खोड रबर फिरवणे असे करून मास्तर ला कळू न देणे हे प्रकार चालायचे. आमच्यात एक मुलगी मास्तरची सही पण बेमालूम करायची

रावसाहेब चिंगभूतकर's picture

23 Aug 2021 - 8:14 am | रावसाहेब चिंगभूतकर

हे सगळं ठीक आहे, पण असं करून पास होणारे विंजिनर्स पुढे काम करताना काय दिवे लावत असतील? प्रश्न तात्विक आहे, पण महत्वाचा आहे.
A study in 2014 found that there is a large mismatch in the aspirations of graduating engineers and their job readiness. 97% engineers aspire for a job in IT and core engineering. However, only 18.43% employable in IT & 7.49% in core engineering.

सुबोध खरे's picture

24 Aug 2021 - 12:15 pm | सुबोध खरे

अभियांत्रिकी महाविद्यालयात तुम्ही जे शिकता त्याचा व्यवहारात/ उद्योगधंद्यात उपयोग होतो हि मुळात एक अंधश्रद्धा आहे.

त्यामुळे अभियंता मुळात हुशार आहे कि नाही आणि आपल्याला त्याला शिकवून तयार करता येईल का असेच उद्योगधंद्यातील व्यक्ती पाहत असतात.

माझ्या भावाचा जावई आय आय टी मधून एरोस्पेस इंजिनियर झालेला आहे आणि सिप्ला सारख्या औषध निर्मिती कंपनीत फुफुसाची क्षमता वाढवणाऱ्या औषधाच्या निर्मिती आणि विपणनात काम करतो.

माझा स्वतः चा जावई बिट्सचा यांत्रिक अभियंता असून नंतर एम बी ए करून आता के पी एम जी या कंपनीत विश्लेषण शास्त्रात( analytics) काही तरी करतो. आणि फावल्या वेळात शेअर बाजारात काही तरी करण्याचा अल्गोरिदम तयार करतो ज्याची एकंदर कामगिरी सध्या बरीच चांगली आहे ( कदाचित बाजार उच्चीत आहे यामुळे असू शकेल)

अर्थात माझा मुलगा स्थापत्य अभियंता असून तो मुम्बईतील मोठ्या प्रकल्पाच्या व्यवहार्यता पासून त्याची प्रत्यक्ष अमलबजावणीकशी होते यावर देखरेख करण्याचे काम करतो ज्यात त्याने शिकलेले बरेचसे उपयोगात येते.

सिरुसेरि's picture

23 Aug 2021 - 7:31 pm | सिरुसेरि

मजेशीर अनुभव . मिशन इम्पॉसिबल च्या धर्तीवर सबमिशन इम्पॉसिबल -१ , २ ,३... असे चित्रपट निघाले पाहिजेत .

Nitin Palkar's picture

23 Aug 2021 - 8:25 pm | Nitin Palkar

मजेशीर लेखन.. बाकी हे विंजिनेर कसे आहेत/असतील याचा ताप आपण कशाला करून घ्यायचा. आपण इथे केवळ पिंक मात्र आहोत हे भान न सोडले की झाले.

सुबोध खरे's picture

24 Aug 2021 - 12:21 pm | सुबोध खरे

जी टी वर अभ्यास करून अभियंता झालेल्या दोन पिढ्या मी पाहत आलो आहे.

पहिल्या पिढीत माझा भाऊ आणि त्याचे मित्र व्ही जे टी आय ला होता तसेच माझे मित्र व्ही जे टी आय सी ओ इ पी मध्ये होते.

दुसऱ्या पिढीत माझा मुलगा आणि भावाच्या दोन्ही मुली हे अभियंता झालेले पाहिले आहेत.

सबमिशन काय प्रकरण असते हे व्ही जे टी आय च्या हॉस्टेल वर फार जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे वाचताना खूप मजा आली.

मेडिकल कॉलेज मध्ये सबमिशन चं एवढं लफडं नसतं तरीही काही लोकांची फार असूया वाटायची.

कारण त्यांना गर्ल फ्रेंड असण्याबद्दल असूया वाटण्यापेक्षा त्यांच्या गर्ल फ्रेंड्स त्यांची जर्नल पुरी करून देताना पाहून फार जळफळाट होत असे.

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

टवाळ कार्टा's picture

24 Aug 2021 - 1:05 pm | टवाळ कार्टा

त्यांच्या गर्ल फ्रेंड्स त्यांची जर्नल पुरी करून देताना पाहून....

इंजीनीयरने अशी गफ मिळाल्यास लगेच लग्न उरकून टाकावे...अशी गफ मिळण्यापेक्षा लॉटरी लागणे जास्त सोपे असते =))

डिप्लोमाच्या पोरांना डी ए म्हणायचे (डायरेक्ट अ‍ॅडमिशन). ती पोरं मेन प्रवाहात कां मिक्सअप व्हायची नाहीत माहित नाही. पण सिव्हीलला पहिल्याच वर्षी गचकण्याचं प्रमाण फारच जास्त होतं. त्यामुळे डी ए भरपूरच होते. होस्टेलला गरम पाण्याची आंघोळ वगैरे प्रकार मजेशीर होते.
बाकी चित्र डोळ्यासमोर छान उभं केलंय. पुलेशु.