मानसिक आरोग्यातील स्टिग्मा

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
21 Jun 2021 - 5:43 pm
गाभा: 

मध्यंतरी सा या मानसोपचार या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेच्या मिटिंगला हितचिंतक या नात्याने गेलो होतो. डॉ अनिल वर्तकांशी फोन व ईमेलवर भेटलो होतो पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मिटिंग मधे stigma towards mental illness हा विषय होता. आंतरजालावर वर मानसिक आरोग्य या विषयावर असलेल्या चर्चांची माहिती मी तिथे दिली. खर्‍या नावाने तिथे वावरत नसल्याने लोक तिथे मोकळे होतात. अनेकांना व्यक्त व्हायचे असते पण लोक काय म्हणतील? या भीतीपोटी ते व्यक्त होत नाहीत व मनात गोष्टी तशाच राहतात. वर्षानुवर्षे त्या तशाच राहतात. आपण मनातल्या त्रासदायक गोष्टी जर मोकळेपणा बोललो तर समोरची व्यक्ती आपल्याला कमकुवत समजेल का? विकृत समजेल का? अरे तुम्ही पण असा विचार करता? वाटले नव्हते तुम्ही असे असाल हा विचार तर समोरचा करणार नाही ना? गैरफायदा तर घेणार नाही ना? ज्या व्यक्तिजवळ तुमचे मन मोकळे करायचे आहे ती व्यक्ति तुम्हाला जवळची वाट्ली पाहिजे. म्हणजे तुम्हाला संकोच वाटणार नाही. तुमची हितचिंतक आहे असा विश्वास तुम्हाला वाटला तर तुम्ही मोकळेपणाने बोलाल. तुमच्यावर झालेले संस्कार, तुमचे विचार हेच तुमच्या व्यक्त होण्यात अडथळा निर्माण करतात. सुख हे वाटल्याने वाढते व दु:ख हे वाटल्याने कमी होते. तरी लोक आपली दु:ख आपल्यापाशी इतरांना काय त्याचे? असा विचार करुन फक्त सुखात सहभागी होतात वा इतरांना सहभागी करुन घेतात.आपला त्रास इतरांना कशाला हा त्यामागे विचार असतो. भूतकाळातील घटनांचे पडसाद त्याच्या मनात उमटत असतात. झालेले अपमान, चुका, अपयश त्याला डाचत असतात. कधी इगो आड येतात तर कधी भीती. आत्मसन्मान जपताना त्याची कसरत होते. भूतकाळातील गोष्टी भुतकाळात जाउन दुरुस्त करता येत नाहीत हे त्यालाही कळत असत पण त्या त्रासदायक स्मृती स्वरुपात रहातात. जालीय जगतात जेव्हा तुम्ही आयडेंटीटी लपवून लिहिता त्या वेळी आता आपल्याला कुणी ओळखत नाही या भावनेने तुम्हाला सुरक्षित वाटत व तुम्ही बिनधास्त पणे लिहिता. मोकळे होता. खर्‍या नावाने वापरताना ज्या अडचणी येतात त्या टोपण नावाने वा डुप्लिकेट आयडीने लिहिताना येत नाही. मी मिटिंग मधे आंतरजालावरील अशी अनेक उदाहरणे दिली. जालीय वर्तुळात माणसे खरीच असतात पण प्रतिष्ठा, प्रतिमा या मोकळेपणात आड येत असल्याने त्यांना पुराणातल्या किंदम ऋषी सारखे मृगरुप घेउन कामक्रीडा करावी लागते. आंतरजालावरच्या या विषयी असलेल्या लिंक्स ही त्यांना मी नंतर पाठवल्या. त्यामुळे प्रतिक्रियांचाही अभ्यास होतो. कधी कधी तर प्रतिक्रिया याच मूळ विषयापेक्षा रंजक व प्रभावी असतात. या चर्चांमधून वाचकांनाही आपल्या मनात असालेल्या प्रश्नांची उत्तरे कधी कधी मिळून जातात तर कधी कधी व्यक्त होण्याची प्रेरणा मिळते. पुर्वी मोकळे व्हा, ताईचा सल्ला अशी सदरे नियतकालिकांमधे असायची. त्यात अनामिक असे नाव धारण करुन प्रश्न विचारले जात. जे प्रश्न सामाजिक अवरोधामुळे विचारण्यास संकोच वाटत असे अ्शा मनोलैंगिक विषयावर प्रश्न विचारले जात. त्याची उत्तरेही तिथे दिली जात. अशी सदरे चवीने वाचली जात. नियतकालिकाच्या खपावर पण त्याचा सुपरिणाम होत असे. मानवीनातेसंबंधात प्रायव्हसी वा गोपनीयता या मुळे अनेक व्यक्तिंच्या भावजीवनात प्रवेश करण्यास सामाजिक संकेत आड यायचे. संवेदनशील अवस्थेत कधी कधी अशा बाबी दु:खावर मीठ चोळल्यासारख्या व्हायच्या. हितचिंतक हळुवारपणे त्याच्या भावजीवनात प्रवेश करुन त्याची द्खल घेत असे. त्यावर फुंकर मारत असे. त्यातूनच लोकसाहित्य तयार झाले. आता या हितचिंतकांच्या जागा समुपदेशक व मानसतज्ञ घेउ लागले आहेत. शारिरिक स्वास्थ्यासाठी व फिटनेससाठी आपण डॉक्टर कडे जातो, जिम मधे जातो. योगा करतो डाएट करतो. प्रसंगी सेकंड ओपिनियन घेतो. पण मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही असे काही केले तर ते अजून आपल्या पचनी पडत नाही.
मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही जर या क्षेत्रातील तज्ञांची मदत घेतली तर तुम्ही मानसिक दृष्ट्या दुर्बल आहात व अशी मदत घेउन तुम्ही स्वत:चे परावलंबित्व वाढवत आहात असा समज देखील काही लोकांमधे आहे.सुसंस्कृत वर्तुळात सुद्धा मूर्खासारखा खर्च अशी संभावना होते. करोना काळात मानसिक आरोग्याच महत्व अधोरेखित झाल आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या संस्था या काळात बर्‍याच समाजाभिमुख व कार्यान्वित झाल्या आहेत. मानसमैत्र अशा हेल्पलाईन चालू झाल्या आहेत.लोक आता व्यक्त होउ लागले आहेत. हळू हळू समाजात सकारात्मक बदल दिसू लागला आहे.

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

21 Jun 2021 - 6:01 pm | गॉडजिला

stigma towards mental illness मुळात जर पिडीत व्यक्तीमधे असेल(असतोच बहुतांशवेळा) तर गोष्टी खर्‍या त्रासदायक वाटायला सुरुवात होते. अनेकदा वरवर नॉर्मल म्हणुन वावरणार्‍या व्यक्तीही stigma towards mental illness च्या फार मोठ्या शिकार असतात, त्यातुनही त्या स्वताला दाबुन ठेवायला शिकतात एखाद्या विशीष्ठ सर्कलबाहेर व्यक्त व्हायला कचरतात.

पराभव, नुकसान, हे होणारच हे बिंबवले गेले नसले तर सतत चांगले होत असताना अचानक असे विरूद्ध प्रकार झाल्याने अवरोध ( stigma) उत्पन्न होत असावा.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Jun 2021 - 9:26 am | प्रकाश घाटपांडे

मिपाचे ही संदर्भ दिले. एखाद्या क्षेत्रात हवी असलेली माहिती विस्कळीत स्वरुपात असते. ती जर संकलित करुन दिली तर ती अभ्यासकांना संशोधकांना उपयोगीच ठरते. आंतरजालावर काही फक्त टवाळक्या होत नाहीत उपयुक्त कामही होत असते फक्त ते साधन आपल्याला वापरता आले पाहिजे हे मी आवर्जून सांगितले

सुबोध खरे's picture

23 Jun 2021 - 12:01 pm | सुबोध खरे

stigma towards mental illness मुळात जर पिडीत व्यक्तीमधे असेल (असतोच बहुतांशवेळा)

यात सत्याचा भाग फार कमी आहे.

"लोक काय म्हणतील" या तीन शब्दांमुळे बरेच जण मनोविकार तज्ज्ञाकडे जाण्यास कचरतात.

यात आपण मनोरुग्ण आहोत असे कळले तर आपली नोकरी बढतीवर गदा येईल, आपले/ आपल्या मुलीचे लग्न होणार नाही हि ( बहुंतांशी खरी) भीती त्यांना वाटत असते.
मुलगा किंवा मुलीला मनोविकार असेल तर किती माणसे आपल्या मुलाचे / मुलीचे त्याच्याशी/ तिच्याशी लग्न करून देतील?

मुलाच्या आईला मनोविकार असेल तर कितीतरी माणसे आपल्या मुलीचे त्या मुलाशी लग्न करून द्यायला अजिबात तयार होत नाहीत.

वास्तव फार ज्वलंत/ भयंकर आहे. त्यामुळे मनोविकाराला गुलदस्त्यातच ठेवणे सामान्य जन पसंत करतात.

त्यातून मनोविकाराबद्दल प्रचंड अज्ञान सर्वच समाजात आहे. यात सुद्धा मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यात काही आजारात उदा. स्किझो फ्रेनिया त्या व्यक्तीला आपल्याला आजार आहे हे माहितीच नसते (lack of insight). अशा रुग्णांना नातेवाईकांनी मनोविकार तज्ज्ञाकडे घेऊन जाणे गरजेचे असते.

तर काही आजारात उदा नैराश्य दारुचे/ गर्दचे व्यसन यात रुग्णाला जाणीव असते कि आपल्याला आजार आहे पण मनोविकार तज्ज्ञाकडे गेल्यास आपल्यावर मनोरुग्ण/ वेडा असा शिक्का बसेल काय हि भीती सतावत असते.

इतकेच काय मनोविकार तज्ज्ञ सुद्धा "थोडे वेगळेच' असतात पासून ते "अर्धे वेडे"च असतात अशा तर्हेचे बरेच गैरसमज समाजात आहेत.

त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थी सुद्धा मनोविकार हा पदव्युत्तर विषय एम डी ला घेण्यात कचरतात

मुक्त विहारि's picture

23 Jun 2021 - 12:09 pm | मुक्त विहारि

हे डाॅक्टर श्रीकांत जोशी यांच्या पुस्तकांत हेच सांगीतले आहे ...

तर काही आजारात उदा नैराश्य दारुचे/ गर्दचे व्यसन यात रुग्णाला जाणीव असते कि आपल्याला आजार आहे पण मनोविकार तज्ज्ञाकडे गेल्यास आपल्यावर मनोरुग्ण/ वेडा असा शिक्का बसेल काय हि भीती सतावत असते.

बरोबर, मला हेच सांगायचे होते की शिक्का बसण्याची भिती मुळ प्रश्न जास्त गंभिर बनवते. माझ्या माहितीमधील ए ए चा जुना सदस्य केवळ याच कारणाने मानसोपचार घेत नाहीये. वस्तुतः मला खात्री आहे की त्याने कितीही रॉकबॉटम गाठले तरी शष्प फरक पडनार नाही पण ६ महिने योग्य रसायने त्याच्या मेंदुत गेली तर गोळी घेउन डोकेदुखी थांबावी तशी त्याची सवय बदलुन जाइल... पण विषय जरी काढला तरी इतका उसळतो की विचारता सोय नाही...

असे लोक बघीतले की संत नामदेव महाराजांच्या पुढील ओळी मला नेहमी स्फुरतात

अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी।।

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, मानसोपचारांची मदत, मला तरी फायदेशीरच ठरली ...

कंजूस's picture

23 Jun 2021 - 1:22 pm | कंजूस

एका ओळखीच्या माणसाकडे गेलेलो. आजारी होते, यांना आता बिपीच्या गोळ्या सुरू झाल्यात पण जास्ती विचारू नका असे बायकोने सांगितले. योगा शिकवायला जात त्यांना बीपीचं कळेल काय अशी त्यांना भीती आहे.

पाषाणभेद's picture

26 Jun 2021 - 4:13 am | पाषाणभेद

परेड, घाटपांडे काका को सलामी देंगे, सलामी दो!

असे समजा की, एखादी व्यक्ती stigma towards mental illness नसलेली व मानसिकदृष्ट्या खंबीर आहे पण तिला कसले दु:ख आहे आणि ते कमी करायचे आहे, भूतकाळातील घटनांचे पडसाद कमी किंवा संपवायचे आहेत, झालेले अपमान, चुका, अपयश, आत्मसन्मान राखायचा आहे किंवा त्यातून सुटका मिळवायची आहे, तर अशा (तुलनेने मानसिक खंबीर ) व्यक्तीने काय केले पाहीजे? कसे वर्तन केले पाहीजे?

किंवा ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या खंबीर असेल तर मानसोपचाराच्या भाषेत त्या व्यक्तीला mental illness चा stigma नाही असे ठरते काय?

मग ती व्यक्ती दुसर्‍या कोणत्या आजाराने ग्रस्त अशी संबोधली जाते?

प्रकाश घाटपांडे's picture

26 Jun 2021 - 12:48 pm | प्रकाश घाटपांडे

समजा एखादी व्यक्ती स्वत: जरी खंबीर असली तरी एकूण या विषयाबाबत व्यक्त होण्यासाठी स्टिग्मा असतो. मानसिक आरोग्य हा विषयच सामाजिक अवरोधाचा आहे. जेव्हा मानसिक अनारोग्य हे फारच त्रासदायक असते त्यावेळी त्याच्या स्टिग्माची कोंडी फोडण्यासाठी आधारगट उपयोगी पडतात. हे विचार केवळ आपल्या मनात घोळत नसून अन्य लोकांच्या मनात देखील असे विचार असतात ही बाब त्याला दिलासादायक वाटते. मग तो मोकळेपणाने बोलण्यास प्रवृत्त होतो.