आधीचा भाग:
२. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : इडयनगुडीत पोहोचल्यानंतर
शनारांची ही परिस्थिती जगासमोर मांडावी या चांगल्या हेतूने त्यांनी "तिरुनेलवेलीचे शनार्स" ही पुस्तिका प्रसिद्ध केली. यामुळे शनारांची दखल घेतली जाऊन त्याच्या मित्रांनी आणि इंग्लंडच्या लोकांनी मदत केली. पण हे करताना शनार समुदायाचाच काहीतरी गैरसमज झाला आणि ते दुखावले गेले. जड अंतःकरणाने पुस्तिका मागे घ्यावी लागली. त्यांच्या मते सवर्णांच्या काटकारस्थानामुळे शनारांच्या प्रगतीत बाधा आली. याचे काल्डवेल यांना वाईट वाटले.
… .. पुढे
या कालावधीत काल्डवेल यांचा द्रविडी भाषांचा (द्रविडी भाषा समुह) त्यात मुख्यत्वे तमिळ भाषेचा आणि इतर ज्ञानचा व्यासंग सुरूच होता.
द्रविड शब्द संस्कृतमधील द्रविद पासून तयार झालेला आहे. द्र म्हणजे द्रष्टा आणि विद म्हणजे ज्ञानी अथवा जाणकार.
द्रविडी भाषांमध्ये तमिळ, मल्याळम, तेलुगु, कन्नड या बरोबरच तुळू, ब्राहुई, गोंडी, कुड़ुख या सारख्या इतरही लहानमोठ्या ३० भाषांचा समावेश होतो. ब्राहुई ही भाषा पाकिस्तान मधील बलुचिस्तान, अफगाणिस्तानात बोलली जाते )
द्रविडी भाषाक्षेत्र:
काल्डवेल यांनी ताडपत्र हस्तलिखिते आणि १८०० वर्षे प्राचीन संगम साहित्याचा देखील अभ्यास केला. भाषाज्ञानासाठी त्यांनी कित्येक वर्षे पायपीट करून बरेच संदर्भ जमविले होते, वेळोवेळी त्याची टिपणे तयार करून ठेवली होती. बोलीभाषा, पोटभाषांच्या कंगोऱ्याचा विविध कोनातून वेध घेतला होता. यासाठी त्यांना भरपूर कष्ट घ्यावे लागले होते. पुडुचेरी, कुंभकोणम, तंजावूर, त्रिचीनोली, कोयंबतूर, मेटुपलायम, कोडईकनल, मदुरै इ ठिकाणी फिरून संकलित केलेल्या तामिळ आणि इतर द्रविडी भाषाज्ञानाला त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पुस्तकात मांडायला सुरुवात केली आणि त्यातून साकारले एक दर्जेदार ग्रंथ "द्रविडी अथवा दक्षिण भारतीय भाषांचे तुलनात्मक व्याकरण" ( A Comparative Grammar of the Dravidian or South-Indian Family of Languages ) आजही दक्षिण भारतीय भाषांच्या अभ्यासात या ग्रंथाचे महत्व मानले जाते.
इडयनगुडीमधील काल्डवेल यांच्या निवासस्थळी मृत्यूशताब्दी निमित्त लावण्यात आलेली त्यांच्या कार्याचा गौरव करणारी कोनशिला:
या कोनशिलेत त्यांच्या भाषा आणि इतिहास क्षेत्रातील कार्याचा गौरव करणारे वर्णन करण्यात आलेले आहे.
काल्डवेलना इतिहासात देखील खुप रुची होती, पण चर्च व्यवस्थापन आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे इतिहासासंबंधी काही व्यासंग करता आला नव्हता. पण जेंव्हा त्यांची मुलं-मुली आणि जावई त्या कामात मदत करू लागली तेव्हा त्यांना उसंत मिळायला सुरुवात झाली. तिरुनेलवेली जिल्ह्याच्या इतिहासासंबंधी त्यांना खुप जिज्ञासा होती, आता त्यांचा वेळ तिरुनेलवेली संदर्भात वाचन, लोकांशी भेटीगाठी, विविध ठिकाणांना भेटी यात जाऊ लागला. त्यावेळी भारतासंबंधीची बहुतेक प्राचीन माहिती ही जर्मन पुस्तकांमधूनच उपलब्ध होती. काल्डवेलना जर्मन भाषाही अवगत असल्यामुळे पुस्तक लिहिण्यासाठी फार काही अडचण आली नाही . (त्यांना एकूण १८ भाषा अवगत होत्या असे म्हटले जाते) सर्व संशोधन पूर्ण झाल्यावर मद्रास शासनाच्या साहाय्याने " तिरुनेलवेलीचा इतिहास (History of Tinnevelly) हे पुस्तक १८८१ मध्ये प्रकाशित केले. या पुस्तकातून त्यांचा तिरुनेलवेली बद्दलचा जिव्हाळा पानोपानी जाणवतो. त्यांनी इतरही धार्मिक पुस्तके लिहिली, बायबल आणि इतर धार्मिक पुस्तकांचेही त्यांनी भाषांतर करण्याचे मोठे काम केले.
रॉबर्ट काल्डवेल यांचे पुरातत्व संशोधन:
कॅल्डवेलना पुरातत्वशास्त्रात देखील रस होता. ग्रीक भूगोलशास्त्रज्ञांनी जवळच्याच किनारपट्टीतील कोरकाई आणि कयलपट्टणम या दोन ठिकाणांचा उल्लेख केलेला त्यांना आढळला होता. उत्सुकते पोटी उपलब्ध साधनांसह त्यांनी कोरकाई, कयलपट्टणम इथे उत्खनन करून पाण्ड्य साम्राज्यातील प्राचीन वस्तू, वास्तू आणि नाणी या संबंधी संशोधन केले., आणि पुढील निष्कर्ष सर्वात प्रथम मांडले:
१) कोरकाई एक प्राचीन व्यापारी बंदर होते २) तेथे बौद्ध धर्म प्रचलित होता.
कोरकाई, कयलपट्टणमचा स्थान-नकाशा:
काल्डवेल यांनी "तिरुनेलवेलीचा इतिहास" "कोरकाई-कयलपट्टणमचा इतिहास" आणि असे बरेच ग्रंथ लिहिले होते. ऑस्कर वाइल्डच्या “ इतिहास कोणीही घडवू शकतो, पण फक्त महान माणूसच तो शब्दबद्ध करू शकतो " या उक्तीनुसार काल्डवेल इतिहासावरील ग्रंथ लिहून यांनी आपले "महान"पण सिद्ध केले होते. त्यांनी पंच्याहत्तरी पार केली होती. शरीर थकत चालले होते, आरोग्याच्या तक्रारी सुरु झाल्या होत्या. १८९१ मध्ये त्यांनी बिशपपदाचा राजीनामा दिला आणि काही कुटुंबियांसमवेत कोडईकनलला प्रयाण केले. मदुरैचे उपजिल्हाधिकारी मि. क्लार्क यांनी पूर्वी बांधलेल्या घरातच त्यांच्या राहायची सोय झाली पण तिथेही तब्येतीला आराम पडेना. शेवटचे ६ महिने प्रकृती आणखी खालावत गेली. कुटुंबियांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या या "महान" देवदूतासाठी निकराचे प्रयत्न केले, पण यश आले नाही. २८ ऑगस्ट १८९१ रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सातासमुद्रा पलीकडून येऊन इथल्या मातीत मिसळून या भूमीवर सेवा करणारा हा महान देवदूत ख्रिस्तवासी झाला !
कोडईकनलहून काल्डवेल यांचे शव होली ट्रिनिटी चर्च, इडयनगुडीत आणण्यात आले. हजारो शोकाकुल लोकांच्या उपस्थितीत त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला.
रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल यांची प्रसिद्द अभ्यास मुद्रा:
द्रविडी अथवा दक्षिण भारतीय भाषांचे तुलनात्मक व्याकरण:
रॉबर्ट कॅल्डवेल यांनी त्यांच्या "द्रविडी अथवा दक्षिण भारतीय भाषांचे तुलनात्मक व्याकरण" या पुस्तकात दक्षिण भारतीय ब्राह्मण हे इंडो-युरोपियन या प्रकारात मोडत असल्याचे प्रतिपादन केले. इंडो-युरोपियन गृहितकानुसार इंडो-युरोपियन म्हणजे उच्च बुद्धिमत्ता आणि उच्च जातीतील लोक ! कॅल्डवेल यांनी पुढे जाऊन की ठामपणे प्रतिपादन केले की " चन्नार, शनार सारख्या तत्सम निम्न जाती-जमातीतील लोक हे मुळ रहिवासी अर्थात “मुळ देशी द्रविड" आहेत. आणि ते वांशिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्ट्या उच्च समजल्या जाणाऱ्या "आर्य / ब्राह्मण" लोकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. बाहेरून आलेल्या वर्चस्ववादी ब्राह्मण लोकांनी "आर्य / ब्राह्मण" लोकांनी त्यांचा धर्म, भाषा आणि संस्कृती या मुळ देशी लोकांवर लादून त्याचे शोषण केले आहे" असे प्रमेय मांडणे कॅल्डवेल दृष्टीने सोयीचेच होते, कारण भारतभूमीतून अश्या सामाजिक गटांना मानसिकदृष्टया विलग करुन त्यांना ख्रिस्ती धर्मात आणण्यात मोठे यश मिळाले. अर्थात काही चन्नार, शनार गटांना प्रस्थापित अश्या "आर्य / ब्राह्मण" संस्कृतीतूनही " फुटून " निघण्याची कल्पना पटली नाही, त्यांनी पुस्तकाला आणि त्यातल्या मांडलेल्या मतांना ठामपणे विरोध दर्शवला.
"विचित्र, अपमानकारक, हस्तक्षेपी" असे दोषारोप या पुस्तकावर झाले तरी द्रविड भाषाशास्त्राच्या संदर्भात हे पुस्तक महत्वाचे ठरले. या पुस्तकाने द्रविडी भाषेसंबंधी माहिती आणि संशोधनाची नवी दालने उघडून दिली.
तमिळ भाषा शिकल्यानंतर त्यांनी त्यातील साहित्यावर मनापासून प्रेम केले आणि त्याच्या वैशिष्ट्यावर संशोधन करण्यास सुरवात केली. " द्रविडी भाषा समुह " हा शब्दप्रयोग करणारे ते पहिले भाषा अभ्यासक होते. तमिळ बरोबरच त्यांनी तेलगू, कन्नड आणि मल्याळममधील समानतांबद्दल प्रचंड संशोधन केले. त्यांच्या संशोधनानंतर त्यांनी असे मत मांडले की, द्रविडी भाषांमध्ये तमिळ ही प्रमुख भाषा आणि संस्कृतोद्भव शब्द तमिळ मधून वगळल्यास तमिळ भाषा आणखी सशक्त होऊन आणि वाढू शकेल.
हाच तो ग्रंथ, ज्याने समाज ढवळून निघाला:
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश:
प्रचि आणि इतर संदर्भ आंजावरून साभार.
प्रतिक्रिया
15 Mar 2021 - 7:41 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
17 Mar 2021 - 12:14 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद,
🙏
मुवि साहेब !
15 Mar 2021 - 8:52 pm | सौंदाळा
छान
ब्राहुई ही भाषा पाकिस्तान मधील बलुचिस्तान, अफगाणिस्तानात बोलली जाते
विंट्रेष्टींग, इतक्या लांब कशी पोचली ही भाषा?
17 Mar 2021 - 12:46 pm | चौथा कोनाडा
हे विंट्रेष्टींगच आहे. एका थिअरीनुसार सिंध / बलोचिस्तान या प्रदेशांमध्ये इ.स. ७०० पर्यंत सेवा या द्रविड राज्यकर्ते घराणे सत्ता होती, तेंव्हा ही भाषा इथे वापरात होती मुस्लीम राज्यकर्ते आल्यानंतर ब्राहुई भाषीक प्रदेश आकसत गेला. दुसर्या थिअरीनुसार ७०० ते १००० वर्षांपुर्वी द्रविड भाषिकलोक इथे स्थलांतरीत झाले. जाणकार लोकच यावर जास्त प्रकाश टाकू शकतील.
धन्यवाद _/\_ सौंदाळा !
15 Mar 2021 - 10:01 pm | बापूसाहेब
माहितीपूर्ण लेखन.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
16 Mar 2021 - 8:28 am | सुखी
महाराष्ट्रात पण द्रविड भाषा family ची नोंद दिसते... महाराष्ट्रातली कुठली भाषा आहे ही?
खूप रोचक गोष्टी कळत आहेत... छान आहे लेखमाला.
16 Mar 2021 - 9:07 am | प्रचेतस
हा भागही खूप आवडला.
17 Mar 2021 - 12:49 pm | चौथा कोनाडा
👍
प्रचेतस, धन्यवाद _/\_