शिक्षणाचे मानसशास्त्र: परीक्षार्थी शिक्षण - जमेची बाजू

राजा वळसंगकर's picture
राजा वळसंगकर in जनातलं, मनातलं
6 Jan 2021 - 6:33 pm

मागच्या लेखात Teaching to the test किंवा परीक्षार्थी शिक्षणाचे दोष बघण्याचा प्रयत्न केला. पण शास्रोक्त (scientific) आणि न्याय (logical) विचार करून निर्णयाकडे यायला हवे आणि त्या निर्णयाला सारासार (practical and pragmatic) विवेक बुद्धीची जोड हवी. शिक्षणाचा हाच तर अंतस्थ हेतू आहे ना? (Critical thinking).

परीक्षा पद्धतीवर जास्त लिहिले आहे, पण परीक्षार्थी शिक्षणावर माझे विचार कुठून येतात हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

सार्वजनिक परीक्षा पद्धतीची सुरुवात
परीक्षार्थी शिक्षण पद्धत ही सार्वजनिक निवड/पात्रता परीक्षेच्या अनन्यसाधारण महत्वामुळे अस्तित्वात आली हे सांगायला नको, पण सुरुवात इथून होते.
Who Invented Public Examinations? विकिपीडीया

चीनच्या सुई घराण्याच्या राजवटीने सातव्या शतकात जगातली पहिली सरकारी राजपत्रित (गॅझेटेड) अधिकारी पासून कारकुना पर्यंतच्या भरतीसाठी सार्वजनिक परीक्षा आयोजित केली (आजची IAS, MPSC, UPSC परीक्षा) पुढे टांग घराण्याच्या राजवटीतील महाराणी वू झाओ (Wu Zhao) ह्यांनी प्रचलित पद्धत सुधारून रूढ केली. (यु ट्युब वर महाराणी वू वर मस्त विडिओ आहेत.) कालांतराने ह्या परीक्षा पद्धतीला आजच्या सारखाच करप्शन रोग झाला हे दुर्दैव.
पाश्चिमात्य देशात एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधे शालांत परीक्षा पद्धत राबवली गेली आणि ओघाने भारतातही आली. इतिहास मनोरंजक तर आहेच पण आजही अशाच पद्धतीने राष्ट्र / राज्य प्रशासकीय यंत्रणेची निवड प्रक्रिया अशीच आहे. असो!

How have school exams changed over the past 150 years - The Cambridge Assessment

शिक्षणाची "सिस्टीम"
परीक्षा आणि परीक्षार्थी शिकवणाकडे जाण्याआधी आपली आजची शिक्षणाची "सिस्टीम" काय आहे ही माहिती हवि. ह्यावर तोंडसुख घेणार्‍यांची संख्या बरीच असली तरी "सिस्टीम" काय आहे हे नेमकं सांगणारे फार थोडे आहेत. माझ्या वाचनातून आणि अनुभवातून मला "सिस्टीम" समजली ती अशी.
शिक्षण प्राप्तिचे तीन मार्ग आहेत , आणि त्यांची अशी ढोबळ मांडणी करता येईल (आत्म प्रयास सोडून):

  1. कौटुंबिक - वैयक्तिक स्वच्छता, सभ्यता, आदरातिथ्य, धर्म, परंपरा ई. ज्ञान + संस्कार हे बहुतांश घरी, पण थोडेसे प्राथमिक शाळेतही शिकवले जातात.
  2. सामाजिक - समाज सदस्यत्व, सामाजिक वर्तन, परस्परांतर्गत नाते संबंध, व्यवहार, (inter-personal relation and interaction) ई. ज्ञान + संस्कार हे आणि घरी , आप्तेष्ट नातेवाईक-मित्र मंडळी आणि सामाजिक प्रसंग - social events आणि प्रसार माध्यमातून "शिकले" जातात. शाळेत (प्राथमिक, माध्यमिक) इतिहास, नागरिक शास्त्राच्या औपचारिक अक्षता टाकल्या जातात.
  3. औपचारिक - प्राथमिक साक्षरता पासून शास्त्र, गणित, तंत्रज्ञान, कौशल्य आणि सबंधीत व्यावसायाभिमुख शिक्षण हे शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांमधून प्राप्त होते. प्राथमिक शाळेसाठी अक्षर आणि अंक ज्ञान (भाषा + गणित), तर माध्यमिक शाळांना साक्षरता आणि सामाजिक ज्ञान अशी प्रमुख उद्दिष्ट आहेत. उच्च माध्यमिक हे चरितार्थ व्यावसायिक शिक्षणाची प्रथम पायरी आहे. बँकेच्या कारकुनाला पायथागोरसचा काय उपयोग हे चुटुकदार वाक्य असले तरी विद्यार्थ्याला गोडी आणि गती कशात आहे हे पाहण्यासाठी आहेत. व्यावसायिक शिक्षणाची पूर्वतयारी शाळा (माध्यमिक, उच्च माध्यमिक) करते आणि पुढे कॉलेज, विद्यापीठ, तंत्र शिक्षण संस्था आणि कार्य विशिष्ट संस्थांमधे प्रत्यक्ष शिक्षण दिले जाते. काही ज्ञान कौशल्य वैयक्तिक पद्धतीने (apprenticeship, tuition) शिकवतात, पण परीक्षा बहुतेक वेळा संस्था घेतात. (10+2+3 इ. व्यवस्थापन सोयीसाठी आहेत.)

पहिले दोन मार्ग हे शैक्षणिक मानस शास्त्रात वर्तनात्मक विचारसरणीवर (Behavioural school) आधारित आहे. वर्तनात्मक शिक्षण ह दैनंदिन वर्तनातून दिसते म्हणून त्याची वेगळी परीक्षा फारशी आवश्यक नाही (observed normal behaviour). त्यामधील फक्त संज्ञानात्मक (बौद्धिक) प्रकार लेखी/तोंडी परीक्षेने पडताळले जातात.

औपचारिक किंवा तिसरा मार्ग संज्ञात्मक दर्शनावर (Cognitive school) आधारित आहे. (आजकाल एक्सपिरिएन्शल लर्निंग प्रकार फॅशनेबल / प्रसिद्ध होतोय. हा रचनात्मक किंवा constructive school मधून येतो. पण अजून वेळ आहे पूर्ण यायला.)

Cognitive किंवा संज्ञानात्मक शिक्षणाचे यशापयश पडताळून पाहावे लागते म्हणून पूर्व निश्चित परीक्षेचा प्रपंच.

पण कितीही परिक्षण केले तरी डोक्यात नक्की काय किती आहे हे कसे सांगणार? मेंदूच्या पेशी रंग बदलतात म्हणे (पांढर्‍या पेशी भुरे होतात), पण पाहणार कसे? परीक्षा घेऊन "स्मृती" आहे का आणि स्मृती आधारित "श्रुती" आणि "कृती" पाहता येते. परीक्षेत श्रुती-कृती दिसली नाही म्हणजे स्मृती नाही अस अर्थ होत नाही. प्रासंगिक किंवा क्षणिक विस्मृतीचा अनुभव कुणाला येत नाही? (आर्कीमिडीजला अंघोळ करताना उत्तर सुचले - वर्गात, परीक्षा देताना नव्हे :-) )

आजची सार्वजनिक प्रमाणित परीक्षा पद्धत Standardized assessment in education

निष्पक्ष त्रयस्थ परीक्षेची मागणी समाजातून आणि शाळांमधूनच आली.
How have school exams changed over the past 150 years - The Cambridge Assessment

परीक्षेचे उद्दिष्ट व्यापक आहेत.

  1. विद्यार्थी शिकले आहेत का हे तपासणे (पुढे जाण्यासाठी) आणि त्याचा पुरावा (evidence of learning) प्राप्त करणे
  2. विद्यार्थ्यांचे ज्ञान / विद्या / कौशल्य प्राप्तीचे मोजमाप मिळवणे, गुणांकन करणे
  3. शिकवण्यासाठी ज्या योजना, यंत्रणा आणि संस्था आहेत त्यांची कार्यक्षमता आणि विहित उद्दिष्ट साधताहेत का हे पाहणे
  4. शिक्षकांची आणि शिकवण्याचा पद्धतीचे गुणवलोकन करून गुणवत्ता राखण / सुधारणे
  5. प्रशासकीय व्यवस्थेने स्थापना केलेल्या विशिष्ट आणि त्रयस्थ यंत्रणेकडे परीक्षेची जबाबदारी दिली जाते (बोर्ड, विद्यापीठ, कायद्याने मान्यता दिलेली संस्था, ई.) अधिकृत परिक्षण संस्थांना जाहीर कार्यक्रम, नियम आणि अभ्यासक्रमानुसार परीक्षा घ्यावी लागते. परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेवर सुद्धा नियमांचे बंधन असते (पॅटर्न, काठिण्य पातळी, ई.)

जाहीर नियमाधिष्टीत तपासणी आणि तपासणीची फेर तपासणी (मॉडरेटर) सारख्या प्रक्रिया मुळे निष्पक्ष, निरापेक्ष आणि न्याय्य तपासणी मिळते.
एक मोठा सामाजिक फायदा असा की सर्वांना एकाच पद्धतीने तपासल्यामुळे येणार निकाल आणि त्याचे विश्लेषण अर्थपूर्ण होते आणि शिक्षकांना, संस्थांना, राज्य प्रशासनाला उपयुक्त मार्गदर्शन मिळते.

परीक्षा पद्धतीची मर्यादा

गुणांकन हे परीक्षेच्या दिवशी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर किती प्रमाणात योग्य आणि नमुना उत्तराशी जुळत होते याचे मोजमाप आहे आणि तेवढ्या पुरतेच मर्यादित आहे. संपूर्ण विषयाचे ज्ञान, कौशल्य आहे / नाही असे कसलेही वक्तव्य नाही. There is no license to practice or recognition as an expert implied in any examination.

परीक्षा पास होणे कुणाला कसलाही अधिकार, परवानगी किंवा तज्ञ म्हणून ओळख देत नाही. हा अधिकार, परवानगी किंवा ओळख केवळ आणि केवळ संविधान (लोकसभेत बिल पास करून) देऊ शकत. त्यासाठी अतिरिक्त अटी आणि नियमाचे निकष असतात.

अतिरिक्त निकष आणि मान्यता पद्धत पूर्वी पासून आहे. गुरुकुलातील शिक्षण संपल्यावर काशी-पैठण सारख्या नामांकित शास्त्र सभेतून (College of scholars) "शास्त्री" ही डिग्री मिळवावी लागत होती! अनेक नामांकित शास्त्री मिळून अर्जदाराला "शास्त्री" ही डिग्री द्यावी का नाही हा "निर्णय" देत होते. (इंग्लंड मधे कॉलेज शब्दाचा अर्थ ज्ञानी लोकांची सभा असा होतो. शिक्षण देणाऱ्यांना सरसकट “स्कूल” म्हणतात.)

त्यामुळे परीक्षा पास झाल्याचे सर्टिफिकेटचा अर्थ केवळ अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे निर्देश आहे, अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाण आहे. प्राप्त गुण त्या अभ्यासक्रमात प्राप्त केलेलं ज्ञान आणि विद्या (स्किल्स) परीक्षेच्या दिवशी किती प्रमाणात शिकणारा दाखवू शकला याचे मोजमाप आहे.
परीक्षेतल्या मार्कावर काही दुषितागृहीत निष्कर्ष:

  1. जितके जास्त गुण, तितके जास्त ज्ञान
  2. ज्या शाळेतले विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवतो ती चांगली शाळा
  3. ... ... ... (तुम्हाला माहीत आहेतच)

परीक्षार्थी शिक्षणाचा जन्म

अशा आणि अनेक निष्कर्षातून आजच्या परिक्षासुराचा आणि पर्यायाने त्याचा निष्ठवान कार्यकर्त्यांचा ("Teaching to the test" - परीक्षार्थी शिक्षण देणार्‍या क्लास चालकांचा) जन्म झाला.

"मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो" असे करेक्ट उत्तर देऊन 100% मार्क मिळाल्यानंतरच पुढे जाता येत हे कळल्यावर "Teaching to the test" किंवा परीक्षार्थी शिक्षण पद्धतीचा जन्म अपरिहार्य होता. त्यात भर घातली निर्बुद्ध द्वारपालानी! विशिष्ट गुणसंख्या (कट-ऑफ) असल्या शिवाय आत सोडू नको हा त्यांना हुकूम! पुढे तुटवड्याचे राज + अर्थकारण! मर्यादित "शीटं" मुळे कट-ऑफ टक्केवारी महत्त्वाची झाली. (93 टक्के असलेली व्यक्ती डॉक्टर, 92.9 टक्के असलेली नालायक कसा?)

पण लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की ना प्रश्न विचारणाऱ्या गुरुनी काही चूक केली, ना असे उत्तर देण्यास शिकवणारे काही चुकीचे करतात.

प्रश्न विचारणारे गुरू तयारी पाहत होते, परिपक्वता पाहत होते. पण त्याचा उपयोग रोखण्यासाठी झाला असे दिसले. चुकीचे उत्तर पुढची पायरी नाकारण्यासाठी कारणीभूत ठरले! चुकीचे उत्तर देणारा विद्यार्थी नेम चुकलेच हा हट्ट कशासाठी होता? कदाचित प्रश्न कळला नाही, विचारण्याचा रोख कळला नाही आणि चुकीचे उत्तर दिले गेले. तात्काळ पुढची कृती थांबवून, बाण सोडण्यास परवानगी नाकारणे योग्य होतं? अजून थोडं खोलात विचारणे हवे होत? मग बरोबर उत्तर द्यायला शिकवणारे त्या वाक्याचा घोकंपट्टी करवितात तर त्याला चूक कसे म्हणता येईल? उत्तर लक्षात राहावे म्हणून कारण समजावून सांगतात ना? मग परीक्षार्थी शिक्षण चुकीचे कसे?

परीक्षार्थी शिक्षण पद्धत

परीक्षार्थी शिकवणीचा सहज सोपा अर्थ असा की परीक्षेत जे विचारलं जाण्याची शक्यता जास्त आहे त्यावर लक्ष केंद्रात करून शिकवणे. ह्या शक्यता पूर्व घोषित पॅटर्न, आधीच्या प्रश्न पुत्रिकेचे विश्लेषण, विषयांचे अभ्यासक्रमातले वजन ई. संदर्भावरून शिक्षक ठरवतात. एकंदरीत शिक्षण प्रश्नोत्तराच्या अनुषंगाने चालवला जातो. उत्तर कसे आणि काय द्यावे हे सांगीतले जाते. बरोबर उत्तराचा, लिहिण्या, सांगण्याच्या पद्धती सरावावर भर दिला जातो. पॅटर्न, पूर्व परीक्षा पत्रिका ई.चा उपयोग उदाहरणाने पाहू.

  • दहावी मधे "डीटरमीनंटस्" प्रकार शिकवतात. समजा, हया गणित प्रकारावर सहसा मल्टिपल चॉईस सदृश किंवा 2 मार्काचे साधे सोपे प्रश्न विचारतात. 10 मार्काचे "अनसिन" अवघड प्रश्न क्वचित येतात आणि आले तरी त्याला दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नांचे (बीज गणित?) ऑप्शन असतात हे पॅटर्न दिसले तर ते लक्षात घेऊन शिक्षक ह्या गणित प्रकारावर फारसा जोर देत नाहीत. दुसरा प्रकार पाठांतराचा होतो. पाठ्य पुस्तकात किंवा मॉडेल आन्सर मधे दिलेली व्याख्या, उदाहरण, स्पष्टीकरण शब्दशः पाठ करवून घेण्यावर जोर दिला जातो. बरोबर आहे का पेक्षा चूक नकोवर जोर असतो.

परीक्षार्थी शिक्षणाचे गुण

  • परीक्षार्थी शिकवणीत शिक्षकांना जबाबदारी स्वीकारावी लागते, (Keeps teachers accountable.) म्हणून किमान परिक्षेपुरते तरी चांगले शिकवण्याचे काम करावेच लागते. शिक्षकांमधे बेजबाबदार, कामचुकार वृत्तीला आळा बसतो. व्यवस्थापनाला शिकवणाऱ्यांच्या कुवतीचा मापदंड मिळतो. (टीव्ही सीरिअल्स पण उद्बोधक असतात. पहा: तेनाली रामा सिरीयल मधले तथाचार्य आणि त्यांचे शिष्य!).
  • परीक्षा ही केवळ शैक्षणिक संस्था घेतात असे नाही. इंटर्व्हियु सुद्धा एक परीक्षा असते आणि विद्यार्थी त्यासाठी परीक्षार्थी शिकवणीने चांगले तयार होतात. आपल्या कामावर (नियोजित किंवा पूर्ण), कुणीतरी प्रश्न विचारणार आहेच, त्याचे उत्तर देता आलेच पाहिजे. (Develops real world skills.) अजून पुढे प्रश्न पाठांतराचा. वेळप्रसंगी महत्वाचे मंत्र, तंत्र, नीती किमान आठवले तर पाहिजे! यशापयश नंतरची पायरी. महाभारतातला कर्ण मंत्र विसरला. आश्वत्थामाला शस्त्रास्त्र वापराचे नीती नियम आठवले नाहीत. आयुष्याची फायनल परिक्षेची दोघांची तयारी कमी पडली?
  • परीक्षार्थी शिकण्यामुळे विद्यार्थ्याला स्वतःच्या प्रयासाचे वेळोवेळी मूल्यांकन करता येते आणि त्याला प्रगतीचे मापदंड मिळतात. (Self assessment and progress planning) अधिक नियोजनबद्ध अभ्यास होतो. यशाची शिडी पायरी पायरीने चढण्याची शिकवण, अनुभव आणि एकंदरीत प्रोत्साहन मिळते.
  • (वरील मुद्दे https://wellsoneducation.wordpress.com/2007/05/16/3-pros-and-3-cons-of-t...)
  • परीक्षार्थी शिक्षणात संदिग्धता नसते! शिकवणारे आणि शिकणारे का आणि कशासाठी शिकवताहेत / शिकताहेत हे अत्यंत स्पष्ट असते. त्या उलट "ज्ञानार्जन" करणारे अति व्यापक उद्दिष्टांमुळे दिशाहीन भरकटू शकतात.
  • शिक्षकांना दिशा, वेळ आणि विषय व्याप्तीचे बंधन घालून शैक्षणिक प्रवासात मुद्द्यांना, चर्चेला, अभ्यासाला भरकटण्या पासून वाचवते. सर्व मुद्द्यांचा सर्व पैलुंवर अनाठायी चरवीचरण करण्यापासून, आणि काही मुद्दे बाजूला ठेवून पुढे जायला प्रवृत्त करते. ("बाल की खाल", "काथ्याकूट" "किस पाडणे" - हे सद्गुण का अवगुण?)
  • परीक्षार्थी शिक्षण विषय व्याप्तीचे मर्यादा घालून विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. काय येते काय नाही याचा अंदाज घेऊन, नेमके कशावर जोर द्यावा हे कळते. जे येते त्यात अधिक प्राविण्य मिळवावे का जे अवघड जाते त्यावर अधिक परिश्रम करावे (व्यावहारिक) निर्णय घेता येतो आणि परिश्रम वाया जाण्याची शक्यता कमी होते.
  • गुणांकन हे प्रोत्साहित आणि उत्तेजना देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे हे सांगायला कुणा मानस शास्त्रज्ञाची आवश्यकता नाही.
  • परीक्षार्थी शिक्षण हे प्रश्नोत्तराच्या साहाय्य घेते त्यामुळे संवादात्मक होते. (Interactive dialogue not one-way monologue).विद्यार्थ्याला गुंतवून घेऊ शकते, विचार करायला उद्युक्त करू शकते. कुठल्याही मुद्द्याची व्याप्ती परिपूर्ण करू शकते. जितके म्हणून प्रश्न/शंका विचारले जाऊ शकतात तेव्हडे शिकवले जातात.

गुणवलोकन करताना दोषांचे अनाठायी अवडंबर बाजूला केल्याने गुण दिसून येतात. (दोष: पहा मागचा लेख). आता दोन्ही बाजूंचे गुणवलोकन करून निर्णय घेतला पाहिजे, किंवा काही वेगळं केलं पाहिजे का?

शेवटी - जाता जाता

विचार आणि चर्चा अजून बरीच होऊ शकते. (बहुतेक महत्वाचे मुद्दे कव्हर झालेत असे वाटते.)

  • सर्व ठिकाणी केवळ लेखी परीक्षा घेऊन निर्णय घेणे योग्य नाही हे जितके स्पष्ट आहे तितकेच गुणांचा आणि सर्टिफिकेटच्या भस्मासुराचा वध केला पाहिजे हे कालत्रयी सत्य आहे हे पटते. (मला.)
  • परीक्षेची व्यापकता वाढवून सर्व अभ्यासक्रम आणि थोडे मागचे ज्ञानही तपासले पाहिजे हे पटते. 100 मारकाचे तीन तासात एकदाच का? ठराविक वेळेलाच का? पूर्वी योजना बोजड होण्याची भीती होती, पण आता संगणक युगात अवघड नाही.
  • नुसती निर्देशित परीक्षा नव्हे, तर सर्वांगीण आणि व्यापक परिक्षण हवे हे पटते.
  • निरंतर परीक्षणाने पात्रता फेर तपासणीची गरज आह हे ही पटतेे. (License renewal करताना पुन्हा परीक्षा? वाहतूक नियम आणि वाहनं तसेच चालक वयाने बदलताहेत ह्याची दखल हवी का?)
  • परीक्षार्थी शिक्षण योग्य आहे का नाही ह्या चर्चेच्या पुढे जायला हवे हे पण पटते. शिक्षणाच्या पद्धतींचा अभ्यास करून चांगले गुण एकत्र करणे आणि दोष कमी करणे हे जास्त महत्वाचे.
  • परीक्षार्थी शिक्षणाचे उद्दिष्ट परीक्षेतले प्राप्त गुणसंख्या आहे त्यामुळे सहज पडताळून पाहता येते. व्यापक शिक्षण उद्दिष्ट साध्य झाले का नाही हे कळणे अवघड आहे. (अर्थशास्त्र व्यवसायाच्या गणितात मार्क मिळाले पण गुंतवणूक चिट फ़ंडात केली आणि “बुडाले पैसे” असे झाले तर काय समजावे?) त्यासाठी शिक्षणाचे उद्दिष्ट वारंवार तपासून व्यापकता आणि संकुचितपणा साठी दुरूस्त केली पाहिजेत. प्रगतीचा आणि बदलाचा वेग पाहता त्यांचे नूतनीकरण आवश्यक आहे. केवळ शास्त्र आणि तंत्रज्ञान बदलत नाही, तर रहाणीमान, सामाजिक, वैयक्तिक विचारही थिजून राहात नाहीत. “संपले शिक्षण” ते “निरंतर शिक्षण” हा बदल महत्त्वाचा वाटतो.
  • नवीन शैक्षणिक धोरण आले आहे. कधी कुणी केव्हा कसे केले कुणास ठाऊक, पण पचवायचं तुम्हा-आम्हाला (सामान्य माणसाला) आहे. "परख" किंवा परफॉर्मन्स एव्हॅल्यूएशन अँड रिव्हिऊ अर्थात परीक्षा, परिक्षण आणि निष्कर्ष यावरही संशोधन होणार आहे (NCERT कडून). पुन्हा एकदा पचवायचं मला-तुम्हालाच आहे (सामान्य माणसाला). मग ते काय आहे हे समजून घ्यायला नको?

स्वार्थी राजकारण भावनिक मुद्दे सांगून भुलावते, पण पोटातली खळगी आणि स्पर्धा चरितार्थाची काळजी वाढवते. रिझर्वेशनमुळे ऍडमिशन / नौकरी न मिळालेले वाढताहेत का कमी होताहेत? का? प्रश्न रिझर्वेशननी सुटतील?

धोरण आणि अंमलबजावणी - काही शंका असतील, पटत नसेल तर त्याची यंत्रणा आहे असं म्हणतात - आता ती शोधली पाहिजे, वापरली पाहिजे. अन्यथा आहेच:
नेमेची येतो मग पावसाळा,
सृष्टीचे जरी हे कौतुक लडिवाळा,
कुंपणावर बसून जात्या काळा,
बघणे नुसते नको रे बाळा,
खाणार काय पाला पाचोळा?

राजा वळसंगकर
4.01.2021

संदर्भ - अधिक माहिती:

A guide to standardised tests
Public Examination-Means or Ends of Evaluation (2006) SREEKANTH, Yagnamurthy Lecturer, Department of Educational Measurement and Evaluation, National Council of Educational Research and Training, India

शिक्षणलेख

प्रतिक्रिया

नालंदा, तक्षशिला, हे IAS च्या तोडीचे होते.

सर्वात जुनी आणि उत्तम शिक्षण पद्धती, आपल्याच देशांत होती