इकडचं तिकडचं

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
5 Jan 2021 - 10:24 pm

नोकरीची सुरवातीची वर्ष मुंबई पुण्यात घालवली. मग काही वर्ष परदेशात काढली. आता इकडे गावी येऊन सेटल झालेय. पण कधी ना कधी काही घटना घडतात आणि जुन्या आठवणी येतात. आठवणी म्हणण्यापेक्षा ते ठिकाण आठवतं. आणि साहजिकच इकडचं नि तिकडंच असं होत राहतं.

आता आजचच घ्या ना. इकडे दोन दिवसापासून मळभ आलय. प्रकाश दिसतो म्हणून सूर्य उगवला म्हणायचा इतकं मळभ येतंय. सकाळी सायकल चालवायला गेले तेव्हा मळभ तर होतच पण हवा पण एकदम कोरडी होती. जरा देखील वारा नाही कि काही नाही. जणू सगळ्या वातावरणाला एक प्रकारची मरगळ आलेय. मला अगदी पटकन परदेशाची आठवण आली. तिकडे ढगाळ वातावरण हे कायमचंच. सनी वेदर म्हणजे लॉटरी. क्वचित तिथे देखील अगदी असच वातावरण असायचं. फॉल सिझन असायचा. झाडांची पानं गळून पडत असायची. कधीतरी असाच वाऱ्याचा मागमूस नसायचा आणि पाऊस कधी येईल सांगता येणार नाही असे ढग जमून आलेले. एक प्रकारचा वेगळाच वास अशा वेळी भरून असायचा. आज मला तिकडची खूपच आठवण आली या वातावरणाने.
मी मुंबईला असताना लाईफ इन मेट्रो नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ऑफिसला जाता येता कानात इअरफोन घालून एफएम वर गाणी ऐकत जायचे. या चित्रपटाची गाणी खूप वेळा ऐकून पाठ झाली होती. मेट्रो शहरांमधील धावपळीचं जीवन त्यात दाखवलं होतं.. मी सुद्धा तेव्हा बऱ्यापैकी धावपळीचं जीवन जगत होते. या चित्रपटातील "इन दिनो दिल मेरा " हे माझं आवडत गाणं होत तेव्हा आणि अजूनही. "हे तुझे भी इजाजत, खुदसे करलें मोहब्बत " हि ओळ माझी आवडती आहे. कधीतरी स्वतःवर प्रेम करायला शिक, कधीतरी स्वतःला वेळ दे अस सांगणारा साधासा तरीही खोल आशय असलेल्या या ओळी खूप काही शिकवून जातात. आजही जेव्हा केव्हा मी हे गाणं ऐकते मी मनाने मुंबईत पोहचते, त्या गर्दीचा एक भाग होऊन जाते, त्या लोकल मध्यल्या गर्दीत घुसमटल्याची जाणीव सुद्धा मनाला होते. काही गाणी गोष्टी केव्हातरी तुम्हाला कुठून कुठे नेऊन ठेवतात ना हे त्यापैकीच एक.

असाच पावसाळयात रस्त्याच्या कडेने असलेल्या गवताचा ओला वास इतका भरभरून येत असतो. परदेशात असताना रस्त्याच्या कडेला लावलेल्या गवताची कापणी करणारी गाडी येऊन गेली कि असाच वास तिथेही वातावरणात दरवळत राहायचा. तिकडे खूप प्रकारची,विविध रंगांची फुल असायची पण वास एकही फुलाला नाही. तेव्हा मला एवढी सुंदर फुल असून एकालाही वास नाही याच वाईट वाटायचं. आणि आपल्याकडे अगदी साध्या रानात वाढणाऱ्या फुलाला सुद्धा किती सुंदर सुगंध असतो ते आठवून तो सुगंध सुद्धा दरवळल्यासारखा वाटायचं.

मध्यंतरी इथे २ दिवस खूपच थंडी पडली. अगदी मस्त गारठून जायला झालं. सकाळी सूर्य उगवल्यावर सूर्यप्रकाशात उभं राहावं तरी त्या प्रकाशाची उब काही लागत नव्हती. याने देखील मला तिकडची अर्थात परदेशातली आठवण आली. हिवाळ्यात तिथे देखील अशीच अवस्था व्हायची. सूर्य नावाला येऊन प्रकाश पसरवून जायचा. त्याच्या प्रकाशाने ऊब यायचीच नाही. अगदी लख्ख प्रकाशात उभे राहील तरीही थंडी जराही कमी व्हायची नाही. उलट घराबाहेर उभं राहणं हीच शिक्षा वाटायची. सूर्य नुसताच चमकत असायचा पण त्याने जमीनीवरच्या तापमानात जराही फरक पडायचा नाही. इथे २ दिवस सकाळी असच वातावरण होतं. अगदी मस्त शेकोटी पेटवून आम्ही शेकत बसलो होतो इतकी थंडी पडली होती.

मध्ये निसर्ग वादळ येऊन गेलं. मी इथे किनारपट्टीपासून दूर राहत असल्याने इथे वादळाचा फटका नाही बसला पण वातावरण मात्र चांगलंच वादळी झालं होत. सुसाट वेगाने वारे वाहत होते. पाऊस थैमान घालत होता. असाच पाऊस मी तिकडे देखील अनुभवाला. सिग्नलला उभी असताना सोसाट्याचा वारा सुटला होता. हातात अगदी मजबूत अशी छत्री होती पण त्या वार्यापुढे तिचादेखील टिकाव लागला नाही. ती इतकी वेडीवाकडी होऊन मोडून पडली कि तिथेच कचरापेटीतटाकुन आले तिला. हीच हालत माझ्या आजूबाजूच्या अनेक जणांची झाली होती.

कधीतरी मस्त लख्ख ऊन पडत आणि त्याचबरोबर मंद असा वारा वाहत असतो. तर कधीतरी सोसाट्याचा वारा सुटतो आणि बरीच पानगळ होते. तिकडं देखील फॉल सिझन आला कि जोराने वारे वाहायला लागत आणि पानगळ होऊन झाड उघडीबोडकी होत. कधीतरी इकडच्या आणि तिकडच्या परिस्थितीत खूपच साम्य आढळतं. तिकडे असताना इकडच्या आठवणी यायच्या. आता इकडे असताना तिकडच्या आठवणी येतात. मनाचा वेग प्रचंड असल्याने मन केव्हाच इकडून तिकडे फिरून येत. ऋतूचा अंदाज घेऊन आता तिकडे काय असेल याची आठवण काढली जाते. मैत्रीणींबरोबरच्या संवादात मी तिकडची चौकशी करते आणि त्या इकडची. थोडक्यात दोघंही दोन्ही बाजूनं मिस करत असतो.

यात देखील मजा आहेच. इकडचं तिकडंच हि तुलना नसते तर तो आठवणींचा मजेशीर खेळ असतो. आणि मला हा खेळ खेळायला खूप आवडतो.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Jan 2021 - 12:30 pm | मुक्त विहारि

कधीकधी, मन असेच वार्यावर सोडून द्यायचे