एका वेगळ्या धाग्यावर प्रतिसाद देत देत तो इतका मोठा झाला की वेगळा विषय काढावयास वाटला.. हे विचार बरेचसे विस्कळीत असल्यामुळे लेख न लिहिता काथ्याकूट काढत आहे, चर्चा करूया आणि समजून घेऊया..
भावातीत ध्यान हा पुर्वापार चालत आलेला आणि प्रचंड पब्लिक इंटरेस्ट असलेला विषय आहे. त्याचा मुख्य हेतू मनःशांती हा असला तरी देखील भावातीत ध्यानाच्या कोणत्यातरी टप्प्यावर अतींद्रिय शक्तींचा त्यात प्रवेश झाला.
लक्ष्यात घ्या,
अतींद्रिय शक्ती म्हणजे केवळ शिळा तरंगवणे नव्हे, ते कदाचित एखादे दृश्यमान स्वरूप असेल, पण तसले चमत्कार झाले होते की नाही याबाबत स्वतः देखील मी साशंक आहे, पण मला त्याची चिकित्सा करण्याची गरज वाटत नाही, कारण सामान्यपणे कोणताही सिद्ध "मी चमत्कार करतो" असे सांगत नाही. किंबहुना चमत्कार हे सिद्धीचे लक्षण नव्हेच.
ज्या विवेकानंदांना संपूर्ण भारत मानतो त्यांनी आपल्या आयुष्यात एकही चमत्कार केलेला ऐकिवात नाही.
पण,
त्याचबरोबर काहीवेळा असे लोक, की ज्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असतो, ते लोक काही चमत्कार घडल्याचे सांगतात, ज्यावर आपल्याला विश्वास ठेवणे भाग असते, जसे की मी पूर्वी मिपावर मंत्राने नाग बोलावण्याची गोष्ट सांगितली आहे, जी माझ्या वडिलांनी सांगितली मला.. वडील कधीच आजपर्यंत खोटे बोललेले मला माहित नाही, त्यामुळे ती गोष्ट खरी आहे असे मानणे मला भाग आहे. जरी त्यांना नजरबंदी केली असे म्हटले तरी संमोहन हे देखील छद्मविज्ञानच आहे.
या गोष्टी कुठेतरी धूर निघतोय हे सूचित करतात.
आता धाग्याचा मूळ विषय - भावातीत ध्यान किंवा विदेहत्व.
विदेहत्व म्हणजे काय, तर एक प्रकारे सविकल्प किंवा निर्विकल्प समाधी, योगशास्त्राच्या म्हणण्याप्रमाणे.. (दोघांमधला फरक मला माहित नाही) समाधी म्हणजे तरी शेवटी काय, तर स्थळ काळाचे भान विसरून जाणे, याला सामान्यपणे आपण स्वरूपाशी एकरूप होणे म्हणतो.
हे केव्हा होते, तर मेंदू मध्ये काही रासायनिक अभिक्रिया होतात तेव्हा. (संभव असंभव वाचा, त्यात भावातीत ध्यानासाठी एक मोठा लेख आहे).
मग योगशास्त्र म्हणजे काय? तर जी प्रोसेस या मेंदूमधल्या रासायनिक क्रिया घडवून आणते ती प्रोसेस कृत्रिमरीत्या आणि हुकुमी पद्धतीने ट्रिगर करणे. मग प्रत्येक जण हे करू शकतो का? आपल्या मेंदूच्या क्षमतेप्रमाणे प्रत्येक जण हे करू शकेल, पण त्यासाठी अभ्यास हा हवाच.
पण तरीही यात एक मेख असते, ती म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्हाला मेंदू शांत करायला एक ट्रिगर लागतो, म्हणजे तुम्ही कितीही अभ्यास केलात तरी मेंदू उभ्या उभ्या झोपत नाही, तर त्याला सूचना द्यावी लागते की आता तू झोपायचे आहेस..
ही सूचना कशी जाते?
अनेक प्रकार आहेत, काही लोक मंत्रशास्त्र वापरतात, काही लोक नामस्मरणात करतात, काही लोक नसते बसून ध्यान करतात, काही लोक हठयोग किंवा अष्टांग योग्य आदींच्या माध्यमातून शेवटी हे साध्य करायचा प्रयत्न करतात. काही सिद्धी पावतात, काही नाही पावत.
याव्यतिरिक्त अघोर संप्रदायात काही ठिकाणी संभोगाचा परमोच्च क्षण, किंवा काही अन्य पदार्थ जसे को भांग, गांजा वगैरे वापरतात. अन्य काही संप्रदायात अधिकारी व्यक्तींकडून दीक्षा मिळणे वगैरे.. पण हा केवळ ट्रिगर आहे. मुळात वीज नसेल तर बटन दाबून काही उपयोग नाही.
म्हणजेच तुम्ही किती काही केले तरी ही सगळी माध्यमे हा ट्रिगर असतो हे महत्वाचे आहे. म्हणजे साधन. मुळात तुमचा मेंदू जर त्या सूचना स्वीकारतच नसेल तर त्या ट्रिगर चा काही उपयोग नाही. त्या सूचना स्वीकारायला शेवटी लागतो तो अभ्यास.
मग इतके करून भावातीत अवस्था मिळवायची कशाला? कारण त्या अवस्थेत शरीरात काहीतरी वेगळे होते, अशी थिअरी आहे. भावातीत ध्यान करणाऱ्यांचा हृदयविकाराचा धोका बऱ्यापैकी कमी होतो असे संशोधन आहे. त्यासाठी ही सगळी धडपड असते (म्हणजे शांतीसाठी आणि आनंदासाठी). मृत्यूची भीती, अतींद्रिय शक्ती, समाधी वगैरे पुढच्या टप्प्यावर येतात.
आता इथे गंमत काय असते की, (यातले माझे आकलन सांगतो) लोकांना काही कारणाने भावातीत अवस्था प्राप्त होते, आणि त्याचा ट्रिगर कुठेतरी असतो, ज्याने काही विशिष्ट बिंदू उद्दीपित होतात आणि मेंदूला सूचना मिळते, आणि भावातीत ध्यान सहजसाध्य होते.
एकदा समाधीसुखाची गोडी लागली की माणूस कशाला बाहेर बघतोय? सर्वसामान्यपणे ज्याला समधीसुख प्राप्त होते त्याच्यादृष्टीने ते जीवनाचे अंतिम साध्य असते, आणि त्याने केलेली साधना हे नक्कीच परिपूर्ण साधना असते.. पण सगळे लोक सारखे नसतात, त्यामुळे ज्या मार्गाने तो सिद्ध झाला तोच मार्ग सगळ्यांना जमेल असे नाही.. पण आपल्या अवस्थेला पोचल्यावर पुन्हा बाहेर बघितले जात नाही.. तसे जर लोक बाहेर बघत असते तर जगात इतके संप्रदाय निर्माण झालेच नसते, वैष्णव आणि शैव लोकांच्यात इतकी टोकाची मतभिन्नता आलीच नसती की शंकराचार्यांना समन्वय घडवून आणावा लागावा.
अर्थात पूर्वी काही आचार्यांनी या सगळ्या ध्यानपद्धतींचा साकल्याने अभ्यास करून त्यातले एकत्व विदित करून ठेवले आहे, ज्यामुळे एकेकाळी भारतात होणारी सांप्रदायिक युद्धे थांबली.. अर्थात हे भारताच्या बाहेर ना झाल्यामुळे तिथे अजून हा एककल्लीपणा आहे. (विवेकानंद या विषयावर खूप बोलले आहेत, त्यांचे साहित्य वाचले असता याची माहिती मिळेल)
(पुढचा परिच्छेद विस्कळीत आहे, कारण याला अजून म्हणावा तसा शास्त्रीय आधार मिळालेला नाही)
आता गम्मत अशी आहे की हे सगळे आपण मन बुद्धी अहंकार वगैरेंच्या पातळीवर मोजत असलो तरी त्यात शेवटी असतात काही रासायनिक अभिक्रिया, ज्या मेंदूमध्ये होतात. भावातीत ध्यानात मेंदूचे काही विशिष्ट भाग बहुधा frontal लोब, शांत होतो असे वाचल्याचे स्मरते.. काही लोकांनी नाडी बंद करून दाखवल्याचे देखील वाचल्याचे आठवते. परंतु याचा एकत्रित अभ्यास करताना असे लक्षात येतेय की शेवटी या मेंदूलहरी आहेत काही प्रमाणात. त्यालाच काही लोक ऑरा म्हणतात.. तुमची frequency एखाद्याशी जुळली तर तुम्हाला त्रास होत नाही, एखाद्याशी नाही जुळली तर काही वेळा डोके दुखण्यापर्यंत तरी त्रास होतोच होतो..
यात नेमके काय विज्ञान आहे मला देखील माहीत नाही.. पण मेंदूच्या आतले आपल्याला खूप कमी माहीत आहे.. एखाद्याच्या सुप्त मेंदूला त्याच्या नकळत सूचना देता येते का? तुमचा ऑरा वापरून तुम्ही दुसऱ्या एखाद्याचा ऑरा influence करू शकता का असे अनेक प्रश्न आहेत.
भौतिक चमत्कार काही काळासाठी सोडून देऊ.. अजून संमोहनाचे तरी शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण कोण देऊ शकले आहे? ते पण छद्मविज्ञानच आहे ना, पण तरीही संमोहनाचे प्रयोग सर्रास होतात..
सगळा मोठा घोळ आहे. कधीकधी वाटते , कशाला घालायची विज्ञान आणि अध्यात्माची सांगड? अध्यात्माचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा प्रत्यक्षात मेंदू काम करतच नसतो, म्हणजे जेव्हा बुद्धी झोपलेली असते तेव्हा येणाऱ्या अनुभवांची मीमांसा बुद्धीने कशाला करायची? पण शेवटी ऐकेल तर बुद्धी कसली?
तुमच्या दृष्टीने भावातीत ध्यान म्हणजे काय आहे? तत्वज्ञान वगैरे सध्या बाजूला ठेवू, पहिले ध्यान म्हणजे काय याची व्याख्या करू मग पुढे जाऊ.. कसे?
प्रतिक्रिया
29 Nov 2020 - 2:47 pm | शा वि कु
हा अगदी प्रामाणिक लेख वाटला.बऱ्याच गोष्टी पटल्या.निराकार पोकळीतल्या अध्यात्माला ग्राउंड रियालिटीवर आणले.
छानच. स्वरूप हा शब्द सोडला तर बाकी न पटण्यासारखं काहीच नाही. स्वरूप न पटण्यासारखा नाही, पण व्हेग आहे. अर्थ माहित नाही. पण देहाबाहेरचे अस्तित्व या संकल्पनेवर आजिबात जोर न देता केवळ "मेंदू शांत करणे" इत्यादी संज्ञा वापरल्यात, त्यामुळे आमच्यासारख्या नूबला काही तरी समजले. नाहीतर सिद्धी आणि विदेहत्व म्हणजे आत्तापर्यंत तरी अर्थहीन शब्दांची किंवा अर्थपूर्ण शब्दांची अर्थहीन भेळमिसळ वाटत होती.
हे मान्य करणारे बहुदा तुम्ही मिपावरील पहिलेच. नाहीतर "संक्षिच्या साधनेने येणारा अनुभव फक्त शारीरिक आहे" अशी टीका झाली, मग शारीरिक नसलेला अनुभव म्हणजे काय, असे वाटून गेलेले. पण विचारलं तर आणखी एक भेळेची डिश समोर येईल अशी शंका आली आणि विषय सोडून दिला. :)
एक्झाक्टली. आमचे आवडते वक्ते सॅम हॅरिस म्हणतातच, "When we are discussing God or spirituality, the other side shouldn't be mentioning quantum mechanics. These are two streams derived from completely different methodologies." प्रत्येक गोष्टीत विज्ञानाचा वरदहस्त असावाच असे आजिबात नाही. त्यामुळे जिथे होत नाही तिथे मारून मुटकून मेळ घालणे अयोग्य आहे. विज्ञान परिपूर्ण नसतेच, प्रत्येक ठिकाणी विज्ञानाशी सांगड घालणे तसे शक्यही नाही.त्यामुळे, "ग्रहणात खाल्लं तर आजार होतो, हि माझी श्रद्धा आहे त्यामुळे मी खाणार नाही" हे कशीही चांगलेच, "आधुनिक विज्ञानाने ग्रहणकाळात काही खाऊ नये हे सिद्ध केले आहे" यापेक्षा.
29 Nov 2020 - 11:01 pm | आनन्दा
धन्यवाद शाविकु.. मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात कट्टर आस्तिक आहे, पण मी या विषयात लिहिलेले अन्य साहित्य देखील वाचत असतो, त्यामुळे थोडासा अंतर्विरोध माझ्या बोलण्यात दिसून येतो, करण मी एकाच वेळेस अस्तिक्य आणि विज्ञानवादी चिकित्सा दोन्हीवर विश्वास ठेवतो.
अतींद्रिय शक्तींचे काही प्रमाणात स्पष्टीकरण केव्हातरी विज्ञान देईल याबद्दल मला खात्री आहे.. मला स्वतःला योगायोगाने त्याचा अनुभव देखील आहे, जरी त्यात माझे कर्तृत्व काही नसले तरी..
त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म ही दोन वेगळी प्रतले आहेत असे मी मानतो.
बाकी प्रतिक्रियेशी सहमत आहेच... पण अनुत्तरित प्रश्न इतके आहेत की त्यांची उत्तरे कशी शोधायची असा सध्या प्रश्न आहे.
29 Nov 2020 - 5:04 pm | सतिश गावडे
मी माझा एक अनुभव सांगतो.
सकाळची साडे अकराची वगैरे वेळ असेल. मी ऑफिसच्या बसने ऑफिसला जात होतो. घर ते ऑफिस हे तासाभराचे अंतर असल्याने मी बसमध्ये बसल्या बसल्या डोळे मिटून घेतो. थोड्याच वेळात झोप लागते ती अगदी ऑफिस येईपर्यंत. काही वेळा गाढ झोप लागते तर काही वेळा ना धड झोपेत ना धड जागे अशी अवस्था असते.
असेच एकदा बसमध्ये अर्धवट झोपेत असताना एक विचित्र अनुभव आला. मी माझ्या देहाच्या बाहेर असून माझ्याच देहाकडे त्रयस्थ म्हणून पाहतोय असे वाटले. अर्थात ही अवस्था काही क्षणच टिकली. या अवस्थेतून भानावर आल्यावर मला जोरात रडायला येत आहे असे वाटू लागले. असा अनुभव फक्त एकदाच आला.
मी अशा पद्धतीचा अनुभव लोकांना येतात का हे इंटरनेटवर शोधले. तसे अनुभव सापडले पण ते सारे मृत्यूसमीप अनुभव प्रकारचे Near Death Experience (NDE) होते. म्हणजे व्यक्तीने मृत्यू अगदी जवळून अनुभवून मुत्यूला हुलकावणी देऊन परत आलेल्यांचे होते.
मी मात्र हा अनुभव बसमध्ये पेंगत असताना घेतला होता. :)
कुणा मिपाकराला असा अनुभव आला आहे का?
धाग्याच्या अनुषंगाने हा अनुभव कदाचित अवांतर असेल. मात्र बरेच दिवस कुणाला तरी सांगावे/विचारावे असे वाटत होते म्हणून या धाग्यावर लिहीले.
29 Nov 2020 - 10:35 pm | Bhakti
हो मलापण एकदा आला असा अनुभव.. प्रवासात..वा प्रवासाला शिणून..
पण कदाचित मेंदूला आराम पाहिजे असतो ,पण शरीराबरोबर आपण त्याला ओढत असतो तेव्हा असे होत असावे. ..Or vica versa!
29 Nov 2020 - 10:55 pm | आनन्दा
मला वाटते याला आऊट ऑफ बॉडी अनुभव म्हणतात.
हे अनुभव देखील जागी वेळा काही औषधांनी induce होऊ शकतात असे वाचले आहे..
साधारण NDE मध्ये टनेल व्हिजन असतेच असते.
शक्य असेल तर संभव असंभव वाचाच.. कोणताही अभिनिवेश न ठेवता सुंदर विवेचन केले आहे.. मी जवळजवळ कट्टर आस्तिक आहे, पण तरी देखील मला ते पुस्तक आवडतंय.. म्हणजे अज्ञेयवादी आणि नास्तिकाना हमखास आवडेल ते, मला खात्री आहे.
29 Nov 2020 - 11:30 pm | सतिश गावडे
होय, तुमचं बरोबर आहे. बरेच दिवसांपूर्वी मी हे वाचलं असल्याने दोन संज्ञांमध्ये गफलत झाली.
"संभव असंभव" हे पुस्तक मी जरुर वाचेन. लोकांच्या श्रद्धांबद्दल आदर असलेला नास्तिक असल्याने मला हे पुस्तक नक्की आवडेल. :)
30 Nov 2020 - 9:51 am | सुबोध खरे
मला एकदा असा अनुभव आला होता.
मी सुटीवर असताना दुपारी घरात झोपलो होतो आणि स्वप्नात कुणीतरी घराची बेल वाजवतंय असं वाटलं ( स्वप्न आता आठवत नाहीये) परंतु तेंव्हा जाग आली तर खरंच कुणी तरी बेल वाजवतंय असं समजलं. मी उठायचा प्रयत्न केला तर अगदी गलितगात्र असल्याचा अनुभव होता. थांबून थांबून तीन ते चार वेळेस बेल वाजवली तरी मला उठता येईना. अर्थात REM SLEEP मध्ये आपले स्नायू अत्यंत शिथिल पडतात हे मला माहिती असल्याने मला ताण आला नाही हे सत्य आहे.
साधारण २-३ मिनिटांनी मी उठलो आणि दार उघडलं तेंव्हा आई बाहेर उभी होती. तिनं एवढंच विचारलं कि गाढ झोपला होतास का?
ती शाळेत मुख्याध्यापिका होती आणि सकाळी ७ वाजता जात असे, ती साधारण ३ वाजेपर्यंत परत येत असे. तिच्या कडे गोदरेज च्या लॉकची चावी असे पण त्या दिवशी ती चावी विसरून गेली होती.
हे REM SLEEP आहे कि Sleep Paralysis हे सांगणं कठीण आहे. पण हे २-३ मिनिटे आपण पूर्ण गलितगात्र झालो होतो हा अनुभव चांगलाच लक्षात राहिला आहे.
29 Nov 2020 - 10:55 pm | गवि
@धवा,
याला स्लीप पॅरालिसिस आणि त्यादरम्यान होणारे भास कारणीभूत असतात.
https://www.sleepfoundation.org/parasomnias/sleep-paralysis
झोपेतून वारंवार अर्धवट जाग आल्यास अगदी चालत्या बसमध्येही हे होऊ शकतं. यात आपण आऊट ऑफ बॉडी तरंगतोय, किंवा कोणीतरी आपल्या छातीवर बसलंय, किंवा हाक मारतंय असे काहीही भास होऊ शकतात. पण आपण हलू शकत नाही. मसल कण्ट्रोल बंद असतो.
नंतर पूर्ण जाग आली की सुरळीत होते.
29 Nov 2020 - 11:26 pm | सतिश गावडे
स्लीप पॅरालिसिस या विषयावर आता वाचले थोडेफार. तुम्ही म्हणत आहात तसे मला आलेला अनुभव हा स्लीप पॅरालिसिसचाच भाग आहे.
किंबहूना एका आर्टिकलमध्ये असेही वाचले की तो लेखक ठरवून प्रयत्नपूर्वक या अवस्थेत जाऊन तो अनुभव घेतो. रोचक आहे हे. :)
29 Nov 2020 - 9:41 pm | अनिता
< मी माझ्या देहाच्या बाहेर असून माझ्याच देहाकडे त्रयस्थ म्हणून पाहतोय >
येस्स्.....सेम पि॑च..
30 Nov 2020 - 8:46 am | ज्ञानोबाचे पैजार
कोणतीही थिअरी न मांडता केलेले प्रंजळ लेखन आवडले.
बटण दाबले की टिव्ही सुरु आणि परत दाबले की बंद इतके हे सोपे नाही. तसेच पोहोण्याच्या कलेवरचे एखादे सुंदरसे पुस्तक वाचून कोणाला पोहता येणे अशक्य आहे.
मला सगा सरांसारखा कोणताही अतिंद्रिय अनुभव आलेला नाही, पण तरी सुध्दा एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो म्हणून मी नियमित साधना करत असतो. ज्याचे काही शारीरीक फायदे मला नक्कीच जाणवले आहेत. (बाकी मला ते कुंभक, मेंदु मधला केमिकल लोचा, विदेहत्व, समाधी वगेरे काही समजत नाही, जेव्हा मित्र मंडळी अशा विषयांवर हमरी तुमरीने बोलत असतात तेव्हा मी प्रेक्षकाची भुमिका घेणेच पसंत करतो)
इथे मिपावरच दोन तिन ठिकाणी चर्चा वाचनात आल्यामूळे आता ते "संभव असंभव" हे पुस्तक विकत घेणे आता जरुरीचे झाले आहे.
पैजारबुवा,
30 Nov 2020 - 8:49 am | अर्धवटराव
कारण त्यात सब्जेक्टिव्हेटी फार आहे.
पण मी ज्या काहि थोड्याफार ध्यानपद्धती एक्स्प्लोर केल्या, त्यात एक गोष्ट कॉमन दिसली... कि ध्यानाने एक 'डेल्टा' निश्चित निर्माण होतो. आणि तो काल्पनीक नसतो. हा डेल्टा निर्माण व्हायला एकच माध्यम उपलब्ध असतं... ते म्हणजे आपलं शरीर. त्यामुळे हे सगळे अनुभव शारीरीक, आणि म्हणुन मानसीक असतात, हे एक कन्क्लुजन नक्की निघतं.
आता या 'पलिकडे' देखील हा डेल्टा एक्झीक्युट होत असेल तर त्याचं माध्यम काय, हा एक सहाजीक प्रश्न पडतो. तुम्हाला शांत वाटेल, आनंद वाटेल, मोकळं वाटेल..असं कितीही म्हटलं तरी ते परिणामाचं डिस्क्रिप्शन झालं... ते ही मानसीक परिणामाचं. त्याबद्दल तर काहि वाद नसतोच. त्या 'पलिकडल्या' गोष्टीला 'मी', 'आपण', 'चेतना', 'जाणीव' वगैरे काहिही नावं दिली तरी प्रश्न तोच असतो... शरीराप्रमाणे 'आपल्यातही' डेल्टा निर्माण होतो का? याचं उत्तर 'हो' म्हणावं तर मग ते 'पलिकडलं' देखील एकप्रकारे शरीरच झालं, 'नाहि' म्हणावं तर परत प्रश्न उरतो... डेल्टा निर्माण व्हायला माध्यम काय?
'सूक्ष्म शरीर' नावाची एक लांबलचक थेअरी एका ध्यानयोग्याकडुन ऐकली होती. माणुस सच्चा होता. पण त्यातल्या टर्मीनॉलॉजी पारंपारीक ध्यानमार्गतल्या होत्या, त्यामुळे त्याचा भावार्थ खरच किती कळला हि शंकाच आहे. नव्हे, तो कळला अस म्हणणं हि स्वतःचीच फसवणुक आहे. त्यांच्या मार्गाने साधना करुन ते अनुभव प्रत्यक्ष घेणे हाच एक मार्ग उरला होता, पण त्याकरता आवष्यक तेव्हढा वेळ आणि कमिटमेण्ट माझ्याकडे नव्हतं. एक मात्र कळलं... इच्छा असेल तर हा विषय अभ्यासाला उपलब्ध आहे.
बघु कधि जमतय ते.
आता मूळ प्रश्न...
ध्यानाची व्याख्या माहित नाहि. पण ति (किमान) मनाची एक अवस्था आहे हे नक्की. शरीर, मन, बुद्धी वगैरे ज्या काहि माहित असलेल्या/नसलेल्या फॅकल्टी आहेत त्यांचं सिंक्रोनायझेशन म्हणजे ध्यान.
30 Nov 2020 - 9:35 am | सोत्रि
क्वांटम मेकॅनिक्समधे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. क्वांटम मेकॅनिक्समधलं क्वांटम फील्ड समजावून घेतलं तर शरिर आणि मन ह्यापलीकडची यंत्रणा समजायला मदत होईल. सुक्ष्म शरिराबद्दलची थियरी समजायलाही क्वांटम मेकॅनिक्सच्या संकल्पना मदतीला येऊ शकतील.
हे पुस्तक बुकगंगा.कॅामवर उपलब्ध आहे. अतिशय भन्नाट पुस्तक आहे. नक्की रेकमेंड करेन, वाचल्यावर बहुतांशी प्रश्नांची उत्तरं मिळण्यची शक्यता आहे असे म्हणेन. (क्लासिकल / न्युटोनियन फिजीक्स आणि क्वांटम मेकॅनिक्सबद्दल पूर्वाभ्यास असल्यास पुस्तक वाचताना जास्त मदत होईल)
- (क्वांटा असलेला) सोकाजी
30 Nov 2020 - 10:56 am | अर्धवटराव
बघतो किती उमजतं ते.
तुम्ही यावर रसग्रहण धागा काढाच ;)
30 Nov 2020 - 10:58 am | अर्धवटराव
हे संपादक विजय भटकर म्हणजे संगणक तज्ञ का?
30 Nov 2020 - 12:08 pm | आनन्दा
सोत्री तुम्ही एक लेख टाकाच त्या पुस्तकावर.
Quantam mechanics अजून तरी मला झेपलेले नाही, त्यामुळे आता ते पुस्तक वाचायच्या फंदात मी पडणार नाही.. आणि किंमत देखील माझ्या अपेक्षापेक्षा थोडी जास्तच आहे !!!
30 Nov 2020 - 12:20 pm | आनन्दा
माझ्यामते सूक्ष्म शरीर वगैरे सगळे अतींद्रिय विभागात येते.. त्याला अजून तरी वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही.
बऱ्याच अनाकलनीय गोष्टी वेळोवेळी समोर येत असतात, पण अजूनतरी निरपवाद किंवा स्पष्ट संशोधन यावर उपलब्ध मिळत नाही. त्यामुळे हा विषय व्यक्तीसापेक्ष आहे.
मी पूर्ण आस्तिक आहे, अगदी देव आणि भुते मानणारा. पण मला माझ्या अनुभवांमुळे माझी श्रद्धा आहे, असेच म्हणावे लागते, कारण मला जे अनुभव आले, ते समोरच्याला येतीलच यचो कोणतीही हमी मी देऊ शकत नाही.
बाकी खालच्या अवतारणाबद्दल काय बोलू, इतके स्पष्ट शब्दात क्वचितच कोणी मांडू शकेल..
>>>>>
हा डेल्टा निर्माण व्हायला एकच माध्यम उपलब्ध असतं... ते म्हणजे आपलं शरीर. त्यामुळे हे सगळे अनुभव शारीरीक, आणि म्हणुन मानसीक असतात, हे एक कन्क्लुजन नक्की निघतं.
आता या 'पलिकडे' देखील हा डेल्टा एक्झीक्युट होत असेल तर त्याचं माध्यम काय, हा एक सहाजीक प्रश्न पडतो. तुम्हाला शांत वाटेल, आनंद वाटेल, मोकळं वाटेल..असं कितीही म्हटलं तरी ते परिणामाचं डिस्क्रिप्शन झालं... ते ही मानसीक परिणामाचं.
>>>>>
यात दोन विचारप्रवाह असतात.. एक विचारप्रवाह असे मानतो की तुम्हाला जे काही होते ते केवळ शाररिक असते, आणि त्याचा परिणाम तुमचा मेंदू किंवा बुद्धी अधिक सुटसुटीत होण्याकडे असतो.. त्यांच्या मते भावातीत होणे हेच अंतिम प्रॉडक्ट आहे..
आणि दुसरा प्रवाह असे मानतो की तुमचे शरीर हेच मुळात तुमच्या आत्म्याचे representattion आहे.. त्यामुळे तुम्ही जे काही ध्यान वगैरे करता त्याचा परिणाम तुमच्या आत्म्यावर, म्हणजे सूक्ष्म शरीरावर होतो, आणि दृश्य शरीरावर फक्त तो दिसतो.. पण ते अंतिम साध्य नव्हे.. मुक्ती, किंवा ज्ञानोत्तर भक्ती हे अंतिम साध्य आहे.
मी जरी दुसऱ्या गटात मोडत असलो तरी तो गट खूपच व्यक्तीसापेक्ष आहे आणि सर्वकालीन वैज्ञानिक सत्य होण्याचे कोणतेही निकष अजून तरी त्या गटाला लागू होत नाहीत. पहिल्या गटाचे outcome मात्र मोजपट्टी लावून मोजता येते असे म्हणतात.
30 Nov 2020 - 10:09 am | प्रसाद गोडबोले
समाधी म्हणजे समबुद्धी . सुख दुःख यश अपयश संपत्ती वित्पत्ती अशा कोणत्याही स्थितीत समान राहणे म्हणजे समाधी. परिस्थितीचे तडाखे बसल्यावर चित्त चंचल होणारच, पण हळूहळू त्यावर कंट्रोल मिळवणे आणि अनुकूल प्रतिकूल असे जे आहे ते परिस्थिती आहे, आपण नाही, हे जाणणे हेच खरे समाधीसुख ! मुळातच सुख आणि दुःख ह्या द्वंद्वाच्या आपण परे आहोत हे लक्षात आल्यावर जी निवांतपणाची स्थिती आहे ती म्हणजे समाधी !
तैसें सुखा आतोनि निघणें । तें सुखीयें सुखी तेणें ।
हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥
म्हणजे दुःख तर नाहीच नाही पण सुखही नाही ! अशी प्युअर ब्लिसफुल स्टेट ! आणि ही निखळ सुखाची अवस्था आहे हे अनुभवायला तरी कुठे कोण आहे ! फक्त सुख आहे सुख बस्स बाकी काही नाही :)
हे इतकं स्पष्ट आणि सोप्प सांगून ठेवले आहे माउलींनी . उगाच हठयोग अन परलौकीक की काय अनुभव असल्या द्राविडीप्राणायामाचे लोकांना का कौतुक आहे हे मला समजत नाही.
बाकी अतींद्रिय बितींद्रिय असं काही नसतं हो. ( हां, ते पॉर्न मधील म्हणत असाल तर ती गोष्ट वेगळी. ;) )
30 Nov 2020 - 12:23 pm | आनन्दा
तरी देखील ही स्थिती अभ्यासाशिवाय साध्य होत नाही.. आणि ती स्थिती साध्य करण्याचा मार्ग कोणत्या तरी भावातीत ध्यानाच्या मार्गातूनच जातो असे वाटत नाही का?
1 Dec 2020 - 9:33 am | प्रसाद गोडबोले
नाही.
म्हणजे किमान मला तरी तशी गरज वाटत नाही. "भावातीत ध्यान" वगैरे ची आवश्यकता नाही.
तुम्ही ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास किंवा तुकोबा कोणालाही गुरुस्थानी धरा ( नामदेव एकनाथ किंवा अन्य कोणालाही धरले तरी चालेल मला त्यांचा अनुभव नाही) अन त्यांच्या वचनावर गाढ श्रद्धा ठेवा म्हणजे झाले!
माऊली :
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ १ ॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरीविण ॥ २ ॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥
निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी । इंद्रियांसवडी लपूं नको ॥ ४ ॥
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करीं ॥ ५ ॥
समर्थ :
ऐक शिष्या येथीचें वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म ।
ये विषईं संदेह भ्रम । धरूंचि नको ॥ ४५॥
संदेह हेचि बंधन । निशेष तुटला तेंचि ज्ञान ।
नि:संदेही समाधान । होये आपैसे ।। :)
आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धाचीं लक्षणें ।
मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजे ॥ ४०॥
सिद्धस्वरूपीं नाहीं देहो । तेथें कैंचा हो संदेहो ।
याकारणें सिद्ध पाहो । निःसंदेही ॥ ४१॥
तुकोबा :
नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरें॥1॥
न लगे सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥ध्रु.॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥2॥
रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ॥3॥
याहूनि आणीक नाहीं पैं साधन । वाहातसें आण विठोबाची ॥4॥
तुका ह्मणे सोपें आहे सर्वांहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथें ॥5॥
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥
निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥
मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें॥
तीर्थांसी तीर्थ जाला तो चि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥
मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥
हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥२॥
तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥
तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥३॥
खरंच खूप सोप्पे आहे हे सगळे. कोणत्याही भावातीत ध्यानाची वगैरे गरज नाही . फक्त विश्वास पाहिजे ! श्रध्दा पाहिजे !
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९ ॥
अज्ञाश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
मायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥
हा रात्रिदिवसु पाहीं जैसा । जात्यंधा ठाउवा नाहीं ।
तैसे संशयीं असतां काहीं । मना न ये ॥ २०२ ॥
म्हणऊनि संशयाहुनि थोर । आणिक नाही पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥ २०३ ॥
असो, किती कॉपी पेस्ट करू तितकं कमीच आहे !
तात्पर्य इतकेच की गोष्टी अवघड करण्याची गरज नाही . संक्षि कितीही माजोराड्या भाषेत लिहीत असले तरीही एका क्षणात पक्षी फॉक्कन विदेहत्व ही फॅक्ट आहे. ज्याक्षणी तुमचा सद्गुरुवचनावरील संदेह निःशेष संपला त्याक्षणी तुम्ही सुटलेले आहात !!
जास्त काहीही करायची गरज नाही.
साधं नामस्मरण करत अलिप्तपणे आपले कर्म करा बस्स ! क्वांटम नामस्मरणाची गरज नाही.
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे॥२॥
इत्यलम
अधिकार नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ।। _/\_
1 Dec 2020 - 2:54 pm | आनन्दा
नामस्मरण देखील भावातीत ध्यानातच मोडते..
पण तुम्ही जी म्हणत आहात त्याला सामान्यपणे ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात..
त्यासाठो आधी ज्ञान हवे, त्यासाठी नामस्मरण हवे, त्याची गोडी हवी आणि त्यात भाव पण हवा..
नुसते जय श्रीराम म्हणून कोणी सिद्ध होत नाही.. पण भावाचाच आश्रय घेऊन भावातीत जाणे म्हणजे नामस्मरण!!
1 Dec 2020 - 4:07 pm | प्रसाद गोडबोले
हां तसं असेल तर मग ठीक आहे.
4 Dec 2020 - 3:03 am | अर्धवटराव
निटसं कळलं नाहि...
श्रद्धा ठेवा म्हणजे काय? ते जे काहि म्हणताहेत ते १००% खरं आहे असा विश्वास धरायचा ? तसा तो धरला तरी आपल्याला काय बोध होईल ?
विदेहत्व म्हणजे 'आपण देह नाहि' हा बोध कि 'देह अॅज सच काहि अस्तित्वातच नाहि' हा बोध ? 'आपण देह नाहि' हे श्रद्धेने, तर्काने, विवेकाने, कसंही जाणलं (थोडं आत्मपरिक्षण केलं तर ते सहज समजतं) तरी अंतीमतः ते मनाचं समाधान करेल (कदाचीत तेच सर्वात महत्वाचं देखील आहे)
उदा.
हे विश्व स्वतःच एक इंट्रीग्रेटेड ऑब्जेक्ट आहे, आणि ते स्वतःच स्वतःचं ट्रान्स्फॉर्मेशन करत असतं, हा सिद्धांत तत्वतः आपण सहज समजु शकतो. पण त्यामुळे ऊर्जेचं मूळ रुप, ज्याची हि रुपंतरं आहेत, ते अनुभवाला कसं येईल ?
4 Dec 2020 - 7:30 am | कानडाऊ योगेशु
असेच काहीसे माझेही मत होते. म्हणजे आपण देहविरहीत आहोत आणि आता एकही विचार मनात नाही आहे हे वाटणे हाही एक विचार आहेच जो मनात राहणार.
खाली मार्क्स ओरेलिएस नी समाधीची योग्य व्युत्पत्ती सांगितली आहे त्याप्रमाणे ध्यान करणे म्हणजे निर्विचारता नसुन विचारांवर नियंत्रण आणण्याची प्रक्रिया असावी.म्हणजे मनात असंख्य विचार आहे पण एकुणच मन बुध्दी व एकाही विचारात गुंतलेले नाही. निर्विचारता म्हटले कि मला एखादे आटलेले सरोवर समोर येते तेच ध्यान म्हटले कि तुडुंब भरलेले पण अतिशय शांत सरोवर दिसते. बर्याच ठिकाणी असेही वाचले आहे कि कुणी एक अमुक तमुक एखादा विचार मनात धरुन ध्यान लावतो व त्याला एखादे उत्तर गवसते. बुध्दालाही जे काही सत्य गवसले ते ध्यान लावल्यानंतरच असे काहीसे वाचल्याचे आठवते. म्हणजे एखाद्या विचाराचा पूर्ण सांगोपांगी अभ्यास हा ध्यान लावुन करता येतो. अप्रिय आठवणींच्या धाग्यात ही शाम भागवत सरांनी म्हटल्याप्रमाणे अप्रिय आठवणींमुळे येणार्या विचारांना निर्बीज कसे करायचे ह्याचा उपाय सांगितला होता आणि तो पटलाही होता.
4 Dec 2020 - 9:24 am | कोहंसोहं१०
श्रद्धा ठेवा म्हणजे काय? ते जे काहि म्हणताहेत ते १००% खरं आहे असा विश्वास धरायचा ? तसा तो धरला तरी आपल्याला काय बोध होईल ?>>>>>>>>>>
इथे श्रद्धा याचा अर्थ संदेहाचा पूर्ण अभाव असा आहे. श्रीकृष्ण म्हणतात संशयात्मा विनश्यन्ति. जोपर्यंत मी देह, मन, बुद्धी, अहंकार, चित्त यापैकी काही नसून त्या सर्वांना प्रकाशित करणारे पूर्ण चैतन्य आहेत यावर पूर्ण विश्वास ठेवून मार्गक्रमण करीत नाही तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. मी पूर्ण चैतन्य ब्रह्म आहे याविषयी संदेह म्हणजे मी त्याहून कोणीतरी वेगळा आहे यावर विश्वास आणि यातूनच आपसूकपणे देह किंवा मनोतलावर सर्व व्यापार चालू राहतात आणि आपण त्यातच अडकून राहतो.
"हे विश्व स्वतःच एक इंट्रीग्रेटेड ऑब्जेक्ट आहे, आणि ते स्वतःच स्वतःचं ट्रान्स्फॉर्मेशन करत असतं, हा सिद्धांत तत्वतः आपण सहज समजु शकतो. पण त्यामुळे ऊर्जेचं मूळ रुप, ज्याची हि रुपंतरं आहेत, ते अनुभवाला कसं येईल ?">>>>>>.
याचे उत्तर पतंजलींनी योगसूत्रात दिलेले आहे. ते म्हणतात योग: चित्तवृत्तिनिरोध: | तदा द्रष्टास्वरूपे अवस्थानम ||
चित्तवृत्तींचा पूर्ण निरोध झाला की द्रष्टा (आत्मा, परमात्मा, ब्रह्म, चेतना, चैतन्य, परमपुरुष जे काही म्हणाल ते) स्वस्वरूपात स्थित होतो. हे म्हणजे चिखलाने माखलेल्या हिऱ्यावरील चिखल काढले कि हिरा जसा आपोआप प्रकाशित होईल तसे काहीसे आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात तलावाचे स्वच्छ पाणी एकदम स्थिर झाले की तळ आपोआप दिसू लागतो वेगळे काही करावे लागत नाही. पण तेच पाणी हलले की तळ गायब. तसे चित्तवृत्तिनिरोध आणि ब्रह्मज्ञान यांचे आहे.
इथे पतंजली चित्तवृत्ती म्हणतात ना कि मनातले विचार. दोन्हीत फरक आहे. थोडक्यात निर्विचार झालेले मन म्हणजे ब्रह्मलिनता नव्हे. कारण मन किंवा मनातले विचार हा चित्तवृत्तीचा केवळ एक भाग आहे. मनाबरोबर बुद्धी, आणि अहंकार या वृत्तीचाही पूर्ण लय किंवा निरोध व्हावा लागतो. हे सर्व अत्यन्त जे अतिशय सूक्ष्म पातळीवर काम करतात. हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत सगळे जीव बद्ध. आणि हे सहज घडत नाही कारण चित्तवृत्तीचें बरेचसे काम सूक्ष्म पातळीवर चालते आणि त्याचा निरोध करणे हे सोप्पे काम नव्हे.
उगाच कोणत्याही सोम्यागोम्याने सांगितलेली ध्यानपद्धती अवलंबून २-३ सेकंदांकरिता निर्विचारता आली म्हणजे मुक्ती लाभली असे होत नसते.
4 Dec 2020 - 9:53 am | अर्धवटराव
पण ते केवळ निर्देशाचे काम करतात.
बघु.
4 Dec 2020 - 9:58 am | शा वि कु
मुक्ती आणि ब्रह्मचैतन्य म्हणजे काय ? ते का हवे आहे ?
30 Nov 2020 - 1:28 pm | सोत्रि
झक्कास! एकदम साधी सरळ, सोप्पी आणि मूलभूत व्याख्या!!
ह्या कोणत्याही स्थितीत समान राहता येण्याचा सराव म्हणजे साधना आणि त्या सरावाचा मार्ग म्हणजे ध्यान, कारण तशी स्थितप्रज्ञता (समाधी) येणं एका रात्रीत शक्य नसतं.
१००% सहमत. एकदा का क्वांटम फिल्ड समजू लागलं की अध्यात्म ह्या शब्दाचं कसं अवडंबर माजवून ठेवून, तत्वज्ञानाच्या, शास्त्रिय अंगाने अभ्यासाला उगाचंच कसं समजण्याच्या पलीकडे नेऊन ठेवलंय ह्याची अनुभूती येते.
- (क्वांटा असलेला) सोकाजी
30 Nov 2020 - 10:57 am | मराठी_माणूस
"संभव असंभव" ह्य पुस्तकाची अजुन माहीती मिळेल का ?
30 Nov 2020 - 11:59 am | आनन्दा
हे घ्या -
https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5204425155696328227
मला हे पुस्तक खूपच आवडलं होतं, माझ्याकडे जी मोजकी प्रिंट पुस्तके आहेत त्यात हे आहे.
ईबुक मिळते का कल्पना नाही.
30 Nov 2020 - 2:18 pm | कानडाऊ योगेशु
मला एक बेसिक प्रशन पडलाय.
माझ्या मनात जे विचार येतात ते मराठीतच येतात.
जर एखाद्याला कुठलीही भाषाच येत नसेल तर त्याला विचार करता येईल का?
30 Nov 2020 - 7:34 pm | सुबोध खरे
मनात जे विचार येतात ते मराठीतच येतात.
विचार येतात ते विद्युत प्रवाहाच्या(impulse) स्वरूपात असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन इकडून तिकडे जातात. इलेक्ट्रॉनला भाषा नसते.
आपण त्या प्रवाहाच्या विशिष्ट समूहाला एक नाव दिलेलं असतं.
उदा. चेष्टा हा शब्द घ्या तुम्ही मराठीत विचार करता तेंव्हा जो इलेक्ट्रॉनचा संच(impulse) इकडून तिकडे जातो त्याचा अर्थ मेंदूला थट्टा असा अभिप्रेत असतो पण तोच संच एखाद्या हिंदी भाषिकाच्या मेंदूला प्रयत्न म्हणून अभिप्रेत असतो.
एक गम्मत म्हणून सांगतो- भारतीय वैमानिक रशियाच्या गुप्त विमानाच्या (कदाचित सुखोई ५७ च्या) प्रकल्पात सहभागी होणार होते तेंव्हा त्यात हेल्मेट मध्ये संवेदक लावलेले होते. त्यात तुमच्या विचाराच्या विद्युत प्रवाहाचा उपयोग करून रडार क्षेपणास्त्रे इत्यादी ला वेध घेण्यासाठी तयार करण्याचे प्रयोग करत होते त्यात भारतीय वैमानिक विचहर करत ते संवेदकाना समजत नव्हते. याचे कारण भारतीय वैमानिकी प्रथम भारतीय भाषात विचार करून मग मेंदूत त्याचे रशियन भाषांतर करत. त्या संवेदकाना भारतीय भाषांचे विदयुत प्रवाह समजत नसत
3 Dec 2020 - 6:25 am | कोहंसोहं१०
मार्कस आणि आनंदा छान प्रतिसाद. चर्चेशी सहमत.
मुक्ती (किंवा कायमचे विदेहत्व म्हणा) जरी एका क्षणाला होत असली तरी तो क्षण येण्यासाठी तपश्चर्या ही लागतेच. ती कोणी ध्यानाच्या मार्गाने करेल तर कोणी भक्तीच्या, कर्माच्या किंवा ज्ञानाच्या. आणि ते सोप्पे नक्कीच नाही.
संक्षी सांगतात त्याप्रमाणे काही क्षणासाठी एखादे ध्यान करून क्षणात विदेहत्व मिळाले असे शक्य नाही. ते काही क्षणासाठी असेल पण तो क्षण अत्यंत छोटा असेल आणि त्या क्षणाचा आवाका वाढवायचा असेल तर साधना कठोर हवीच. त्याशिवाय गत्यंतर नाही.
एका क्षणात विदेहत्व किंवा मुक्ती मिळवणे खूप सोप्पे आहे असे म्हणणे म्हणजे १०० घावानंतर दगड फुटत असेल तर मी डायरेक्ट १००वाच घाव मारतो म्हणण्यासारखे आहे. १०० वा घाव निमित्त झाले आणि निर्णायक ठरला म्हणून ९९ घावांचे महत्व कमी होत नाही. ९९ घाव घालण्याचे कष्ट केल्याशिवाय मुक्ती नाही.
बाकी ध्यानपद्धतींबद्दल बोलायचे झाल्यास ज्यांचा अध्यात्माचा अभ्यास आहे त्यांना संक्षींनी सांगितले त्यात काहीच विशेष वाटणार नाही. अश्या हजारो पद्धती सापडतील ज्या २-४ क्षणापुरत्या विदेहत्वचा अनुभव देतील.
काश्मिरी शैवीजम पंथामध्ये शिवाने पार्वतीला अश्या १०८ ध्यानपद्धती सांगितल्या आहेत. त्यातली कोणतीही एक अवलंबली तरी काही क्षणापुरता का होईना विचार थांबायचा अनुभव येईल.
लोकेषणा आणि वित्तेषणा - अध्यात्मिक वाटचालीतील दोन मोठे अडसर. नेहमीप्रमाणे संक्षींच्या मीच सर्वज्ञ, बरोबर आणि बाकी सगळे चुकीचे हा गर्विष्ठपणा या लेखातही दिसला. जोपर्यंत हे अडसर दूर होत नाहीत तोपर्यंत संक्षी बद्धच आहेत, मुक्त नाहीत हे सांगणे फार कठीण नाही.
बाकी अध्यात्मात खरीच प्रगती करायची असेल तर उगाच अमक्या तमक्याने सांगितलेल्या नवीन मार्गाचा वापर करण्याऐवजी अध्यात्मिक ग्रंथ आणि मुक्त ज्ञानी गुरु (महाराष्टरातील संत तसेच योगानंद, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, आदी शंकराचार्य, रमण महर्षी वगैरे) यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे पुरेसे आहे.
3 Dec 2020 - 6:30 am | कोहंसोहं१०
प्रतिसादातले शेवटचे ३ परिच्छेद वेगळ्या लेखाच्या संदर्भात आहेत या नाही. चुकीसाठी क्षमस्व.
4 Dec 2020 - 12:05 am | दुर्गविहारी
आधीच्या धाग्यापेक्षा या धाग्यात स्पष्टता आहे. एकंदरीत दर्जेदार चर्चा.
7 Dec 2020 - 5:30 pm | राघव
अतिंद्रीय अनुभवांबद्दलची ही दोन पुस्तके खूप वेगळी ठरतात. दोन्ही पुस्तके रीईन्कार्नेशन बद्दल बोलतात.
१. मेनी मँशन्स - द एडगर केसी स्टोरी ऑफ रीईन्कार्नेशन
२. मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स
यातले दुसरे पुस्तक एका मानसोपचारतज्ञाने स्वतःचे अनुभव मांडताना लिहिलेले आहे.
दोन्ही पुस्तके मुळातून वाचण्यासारखी आहेत.
आणि एकवेळ हे रीईन्कार्नेशन वगैरे पण जाऊं देऊ, पण त्या पुस्तकांतला मतितार्थ ध्यानात घेतला तर - ते शेवटी एक माणूस म्हणून आपल्या चित्त-वृत्तीच्या उन्नती बद्दलच आहे. आपल्या संतांनीही या आत्मोन्नती बद्दलच सांगितलेले आहे.
अतिंद्रीय अनुभव खरे की खोटे हे बघण्यापेक्षा आत्मोन्नतीचं महत्त्व अधिक!
म्हणजे जसं पेन ५ रुपयांचा असो वा ५० लाखांचा, लिहिलं जाणं जास्त महत्त्वाचं असायला हवं! :-)
8 Dec 2020 - 7:07 pm | पॉइंट ब्लँक
माझे एक तमिळ सहकारी कधीकाळी टि आय फ र मध्ये गणित विभागात कामाला होते, ते बहुतेक पोस्टडॉक करत होते. तिथे एकदा कँटिनमध्ये एकदा रामानुजन ह्यांच्यावर चर्चा झाली. रामानुजन ह्यांना त्यांच्या कुळदेवतेचे ध्यान करताना नवीन सुत्रांचा शोध लागते असे ( त्यांना आपोआप ती सुचत कि देवी त्याना ती सांगे ह्या वादात नको पडायला, कारण विषय भरकटेल). ह्या विषयावार बराच वाद झाला, पुरोगामींनी आणि नास्तिकवाद्यांनी " हा काही तरी कल्पनाविलास आहे, आणि हे असनं शक्यच नाही" असा त्यांचा नेहमीचा युक्तीवाद मांडला आणि त्यांची नेहमीची मागणी समोर ठेवली- " पुरावा द्या नाहि तर माफी मागा" हे ब्रह्मास्त्र ते सगळीकडे वापरतात. पण कधी कधी ब्रम्हास्त्र विफल होत.
तिथल्या एका धार्मिक असनार्या गणिततज्ञाने युक्तीवाद मांडला- "एखादी गोष्ट खरी असण्याचा पुरावा नसने ही ते गोष्ट खोटी आहे असे वैज्ञानिक द्रूष्टीने म्हणन्यास पुरेशी नाही, ती खोटी ठरवायला , ती खोटी असल्याचा पुरावा द्यावा लागेल. तुमच्याकडे तसा पुरावा असेल तर द्या, मग आम्ही माफी मागु. जोपर्यंत तुम्ही तसा पूरावा देत नाही तोपर्यंत लोकांना त्यांना आवडेल त्या बाजुवर विश्वास ठेवायचा अधिकार आहे"
पुरोगामी - "पुराव्याची काय गरज आहे इथे. सगळी़कडे जस संशोधन होत , पद्धत्शीरपणे तसेच रामानुजान ह्यांनी ही केलं असनार."
धार्मिक- " जर खरच तस असेल आणि भारतातील ह्या अग्रगण्य संशोधन संस्थेत काम करनारे सर्वजन तुम्ही सर्व संशोधक नक्कीच सर्वात उत्तम पद्धात नक्कीच काटेकोरपणे पाळत असनार."
पुरोगामी - " हो तर"
धार्मिक- " मग इथले इतके सर्व गणिततज्ञ मिळून रामानुजच्या हजारो सुत्रांमधल्या एका तरी सुत्राच्या जवळपास जान्याच्या लायकीचा शोध का नाही लावु शकलात? विज्ञानात पुनरावृतीला खुप जास्त महत्व आहे, जर तुमची आणि रामानुजन ची संशोधनाची पद्धत एकच असेल तर सर्वांना रामानुजन च्या तोडीचे संशोधन करता आले पाहिजे"
ही आठवण इथे नमुद करायचा उद्देश असा- माझा आत्तापर्यंतच्या आयुष्याचा बराच भाग विज्ञान शिकन्यात आणि पोटापान्यासाठी त्याच उपयोग करन्यात गेला, पण मुलभुत असं शोध काही लावता आला नाही, तुमच्या मधल्या बहुतांशी लोकांची अशीच परिस्थिती असेल. आता आपल्या संगळ्यांचा अनुभव पाहता , मुलभुत संशोधन होउच शकत नाही असा निष्कर्ष काढला तर हास्यास्पद होईल ना? कारण विज्ञान समजन्याच्या आणि ते हाताळण्याच्या अनेक पातळ्या असतील आणि त्यातला काही आपल्या कुवती बाहेरही असती, म्हणुन त्यांच अस्तीत्व अमान्य नाही करता येत आपल्याला.
अध्यात्माचं तसंच असु शकेल कदाचित, दुसर्याला आलेला एखादा अनुभव आपल्याला आला नाही म्हणुन तो सांगनारा माणुस चुकीचा ठरतं नाही. त्याच्या मताशी सहमत होने गरजेच नाही पण त्याला चुक ठरवायाचं असेल तर असं काही असुच शकत नाही हे सिद्ध करावं लागेल. दुसरी गोष्ट अध्यात्म ही आंतर्मुख करनारी गोष्ट आहे आणि त्यात येणारे अनुभव कदाचित शब्दातीत असतील त्यामुळे ते नीट समजावुन सांगता येने शक्य नसेल कदाचित, किंव तो अनुभव खुप वैयक्तीक असल्यामुळे दुसर्यालाही तसाच अनुभव येईल ह्याची खात्री नाही.
मुळात अध्यात्म हा सिध्द करायाचा विषय नाही आहे, त्यामुळे केमीकल किंवा क्वाँटम वगैरे पद्धती वापरून तो कसा वैज्ञानिक आहे हे खटाटोप म्हणजे विज्ञान आणि वेळ दोन्हीचा दुरुपयोग. तसचं विज्ञानामध्ये सगळंच सिद्ध करण्याची क्षमता आहे असं वाटणे सुद्धा एकप्रकारची अंधश्रद्धा आहे कारण विज्ञानाला अजुन एका पेशीचं पुर्णे विश्लेषण करता आलेल नाही आजतागायत.
गेल्या ५०० वर्षांत विज्ञाने सामाजिक जीवनात सगळीकडे शिरकाव केलाय , पण "टेक्नो युटोपिया " अजुन तरी काय आलेला नाही. उलटं विज्ञानाची वरदान वापरुन ग्लोबल वार्मिंग, लाईफस्टाईल डिसिजेस मिळाले. अनेक प्रजाती लुप्त होन्याच्या मार्गावर आहेत. तरीही विज्ञान हाच एक रामबान उपाय आहे सगळ्या समस्यांवर असं म्हणन आणि ते सगळ्यांवर थोपवनं किती योग्य आहे?
विज्ञान जीवन सोपं करु शकतं , पण आपल्या जगण्याला अर्थ देवु शकतं का ते? कदाचित नाही, म्हणुन ज्यांना तो शोधायचा आहे त्यांच्यासाठी अध्यात्म हा एक पर्याय उपलब्ध आहे.
8 Dec 2020 - 7:53 pm | अर्धवटराव
प्रतिसाद आवडला.
8 Dec 2020 - 8:26 pm | राघव
सहमत
8 Dec 2020 - 8:31 pm | शा वि कु
काही भाग पटला, काही नाही.
शंभर टक्के सहमत.
असहमत. ह्यात कसलीही अंधश्रद्धा नाही. सिद्ध करणे ही संपूर्ण विज्ञानाची मक्तेदारी आहे. 'सिद्ध' हि पूर्णपणे वैज्ञानिक मेथडोलॉजी मधली संकल्पना आहे.
चालायचंच. हजारो वर्षात अध्यात्मिक युटोपीया तरी कुठे आलाय ? "विज्ञानामुळे" ग्लोबल वार्मिंग आले हे योग्य तर आहे, पण संपूर्ण म्याटर कव्हर होत नाही यातून. माणसाने काही गोष्टी शिकल्या ज्याने माणसाच्या आयुष्यमानावर दृष्ट परिणाम होत होता, त्यातून काही नवीन समस्यां उदभवल्या. पण ह्या ज्ञानाचा अभाव असलेला काळ किंवा विचार करण्याची पद्धतीपेक्षा विज्ञान कनिष्ठ आहे, किंवा त्याच पातळीवर आहे, हे काय पटत नाही.
8 Dec 2020 - 9:08 pm | पॉइंट ब्लँक
ह्याचा पूरावा किंवा विज्ञाननिष्ठ दुवा देवू शकाल का एखदा?

चार एक वर्षापूर्वी मी मिपावर एक लेख लिहिला होता. (http://misalpav.com/node/35060), त्यात एका चर्चासत्रात कुठल्या पातळी पर्यंतच्या गोष्टी विज्ञान सिद्ध करु शकते ह्यावर काढलेल्या काही निष्कर्षाबद्दल लिहिलं होतं. तिथलं एक चित्र इथे परत छापत आहे.
चार वर्ष जुनं जरी असलं तर विज्ञानाच्या तपासणीच्या मर्यादा ह्य चित्रात स्पष्ट दिसता आहेत. तपासणी करता येणं हे सिद्धा करण्याची पायाभुत गरज आहे. त्यामुळे विज्ञानाची सिद्धा करण्याची भौतिक जगात तरी मर्यादा आहे अस शास्त्रज्ञांच तरी म्हणनं आहे. जे जग अभ्यासन्याचं विज्ञान हे साधन आहे तिथे त्याला इतक्या मर्यादा आहेत, मग सगळीकडे मक्तेदारी कशी चालेल बरं?
अध्यात्मानं युटॉपिया येवू शकत नाही, कारण त्याचा उद्देश समाजाचा उद्धार करणे हा नाही, ते काम किंवा तसा प्रयत्न करने हे धर्माचं काम आहे, अध्यात्माचं नाही. अध्यात्म ही खुप जास्त वैयक्तीक गोष्ट आहे, कुणी उपदेश केला म्हणुन करायची किंवा तसा नियम किंवा प्रथा आहे म्हणुन करायचीही गोष्ट नाही. त्यामुळे युटोपिया आणि अध्यात्म ह्यांचा संबंध नाही. ते मनःशांती किंवा आंतरीक समधान मिळवायचं साधन असु शकत. विज्ञान किंवा धर्म इतर मार्गाने मिळवलेल्या ऐहिक सुखामध्ये जेव्हा काही कमतरता भासते त्यांच्यासाठीचा एक पर्याय आहे तो. विज्ञान कनिष्ठ आहे असं मला म्हणायचं नाही आहे. ते योग्य पद्धतीने वापरलं तर नक्कीच फायद्याचं आहे आणि त्याचे फायदे आपणही उपभोगतोय- जस की समोरासमोर नसतानाही आपण करत असलेली चर्चा. पण त्याचे काही फायदे आहेत म्हणुन सगळीकडेचं ते कामाला येतं अस म्हणन, थोडं अतिशयोक्तीचं होईल अस सुचवायचं होत.
सगळंच पटावं हा अट्टाहास ही नाही. आणि सगळ्यांच मत एकसमान झालं तर चर्चा कुठुन होईल. हि विचारातली विविधताच ज्ञानवर्धन करन्यास खुप गरजेची आहे :)
9 Dec 2020 - 7:31 pm | शा वि कु
नाही. हे माझे स्वतःचे विचार आहेत. मला ते तार्किक वाटतात.
नक्कीच. विज्ञानाच्या तपासणीत मर्यादा आहेत, म्हणजे , सर्व गोष्टी आपल्याला माहित नाहीत, निरखता येत नाहीत, तपासता येत नाहीत. मान्य.
पण
हे mott and bailey प्रकारचे आर्ग्युमेन्ट वाटले, ज्या context मध्ये तुम्ही मांडले आहे. एखाद्या गोष्टीची एखादी कमतरता दाखवणे, म्हणजे त्याच्या पर्यायांची उपयुक्तता सिद्ध करणे नसते. विज्ञानाच्या मर्यादा मान्य करणे आणि विज्ञान/तर्क यांच्या आधाराची अपेक्षा न करणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.
सहमत.
9 Dec 2020 - 3:42 pm | आनन्दा
या बाबतीत एक मत मांडू इच्च्छितो..
एखादी गोष्ट सिद्ध करण्याचे काम तंत्रज्ञानाचे आहे.. विज्ञान हे संगती लावणे वगैरे थिअरीपुरते मर्यादित असते.. तंत्रज्ञान पुरेसे प्रगत झाले की विज्ञान एखादी गोष्ट "सिद्ध" करते.. त्यामुळे त्यात शक्यतो गल्लत करू नये असे मला वाटते.
9 Dec 2020 - 3:44 pm | आनन्दा
मुद्दा असा आहे, की उद्या एखादा नवा मूलभूत वैज्ञानिक सिद्धांत आला आणि त्याने सगळी परिमाणे बदलून टाकली तर हे सिद्ध करणेदेखील शक्य होईल..
सध्याच्या मर्यादा या प्रचलित तंत्रज्ञानाच्या मर्यादा आहेत.. विज्ञानाच्या नव्हे.
9 Dec 2020 - 3:28 pm | उपयोजक
वाचनीय प्रतिसाद!
9 Dec 2020 - 5:07 pm | मूकवाचक
+१
(शा वि कु यांचे प्रतिसाद देखील आवडले)
8 Dec 2020 - 8:41 pm | कंजूस
मला अनुभव येत नाही म्हणजे खोटे असं म्हणता येणार नाही.
20 May 2025 - 8:28 pm | शाम भागवत
या धाग्याच्या विषयाशी संबंधीत एक ऑडिओ ऐकला.
हिंदीमधे आहे. १०-१२ दिवसांपूर्वीच आलााय.
20 May 2025 - 10:03 pm | मारवा
भावातीत ध्यानात जाण्यात काहीही गैर नाही. पण तत्पूर्वी यामागे पलायनवाद असेल तर तो अगोदर तो टप्पा नीट पार पाडला पाहिजे.
भावाला भिडलं पाहिजे. सिद्धार्थ या हर्मन हेस च्या कादंबरीत जसे
तो म्हणतो
The reason why I do not know anything about myself, the reason why Siddhartha has remained alien and unknown to myself is due to one thing, to one single thing--I was afraid of myself, I was fleeing from myself.was seeking Atman, I was seeking Brahman, I was determined to dismember myself and tear away its layers of husk in order to find in its unknown innermost recess the kernel at the heart of those layers, the Atman, life, the divine principle, the ultimate. But in so doing, I was losing myself.
म्हणून स्पिरिचुअल बायपासिंग अगोदर समजून घेणे आवश्यक आहे. जे कृष्णमूर्ती हे या बाबतीत फार सुंदर मार्गदर्शन करतात.त्यांच्या साहित्यातून हा मुद्दा उत्तमरित्या मांडला जातो अर्थात या विवेचनात हा विशिष्ट शब्द जरी ते वापरत नसले तरी.
Spiritual bypassing ची ही व्याख्या
Spiritual bypassing, coined by John Welwood, is the tendency to use spiritual ideas, practices, or beliefs to avoid facing unresolved emotional issues, psychological wounds, or unfinished developmental tasks. It involves using spirituality to sidestep difficult emotions and experiences, rather than fully engaging with them.
24 May 2025 - 6:42 pm | सस्नेह
धाग्याची मांडणी आनंदा यांनी अगदी नीटस केली आहे.
शाविकु, प्रगो, अर्धवटराव, कोहंसोहं आणि पॉइंट् ब्लॅंक यांचे प्रतिसादही वाचनीय !
याबाबतीत एक गोष्ट खरी आहे की ध्यान, समाधी आणि एकूणच अध्यात्म हा चर्चेचा विषय नसून अनुभूतीचा आहे. आता अनुभूती मिळावी कशी ? कारण श्रद्धेशिवाय अनुभूती नाही आणि अनुभूती शिवाय श्रद्धा नाही. कोंबडी आधी की अंडे आधी ?
यावर तूनळीवर ब्रम्हाकुमारी शिवानी यांचा एक व्हिडिओ आहे. त्या म्हणतात की आपण सायन्स/ गणित शिकताना कित्येकदा काही गृहितके मुळात समजून मग त्यावर आधारित प्रमेय मांडतो. Let A = B
Then .....
.....
Hence A = B. Proven.
तसेच एक दैवी अस्तित्व गृहित धरा आणि स्वत: त्यावर प्रयोग करा. प्रयत्न प्रामाणिक असतील तर अनुभूती येईलच येईल.
व्हिडिओ ची लिंक सापडली तर देईन इथे.
दुसरे म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म यांची कुस्ती लावण्याचा प्रयत्न निरर्थक आहे. हे म्हणजे hardware versus software असे होईल. दोन्ही आपापल्या जागी पूर्णतया खरे आहेत पण दोन्हींची परिमिती वेगवेगळी आहे. हे म्हणजे CT SCAN वर मन बुद्धी चित्त विचार दाखवा असे म्हणण्यासारखे आहे.
ही माझी वैयक्तिक मते आहेत, काहीही सिद्ध करण्याचा ऊहापोह नाही.
स्नेहा