कीर्तन

Primary tabs

नूतन's picture
नूतन in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amकीर्तन

कलादर्शच्या सभागृहात आज बुवांचं कीर्तन होणार होतं. वेळ रात्रीची होती, तरी सभागृह भरलं होतं. बुवांच्या बोलण्याची खुमासदार शैली आणि जरा हटके असणारे विषय, यामुळे ज्येष्ठांच्या बरोबरीने तरुण मंडळींचीही हजेरी होती. एकीकडे तबलजींचं तबला लावणं चालू होतं, तर दुसरीकडे पेटीवाले 'वाॅर्म अप' केल्यासारखे उगाचच पेटीच्या पट्ट्यांवरून बोटं फिरवीत होते. बरोबर साडेनवाला बुवा सभागृहात दाखल झाले. करवतीकाठी धोतर-उपरणं, सुती सदरा, डोक्यावर पगडी, कपाळी केशरी गंधाचा टिळा. दोन्ही हातांच्या बोटात अडकवलेल्या चिपळ्यांसहित हात जोडून, मान किंचित झुकवून बुवांनी उपस्थितांना अभिवादन केलं आणि डोळे मिटून मंङलाचरणाला सुरुवात केली.

हममम..

स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम्
वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम् ।।१

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशी: विनायकः ।।२

धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।।३

विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ।।४

शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम्
प्रसन्नवदनं ध्यायेत्सर्वविघ्नोपशान्तये ।।५

हममम....
(चाल - रथचक्र उद्धरू दे)

जगतात सुख नांदो
नित बंधुभाव राहो
हेचि मागणे दीनाचे
पूर्ण करी रामा
रामा रामा रघोत्तमा रामा, रामा
रामा रामा रघोत्तमा रामा, रामा
राम राम राम राम सीताराम सीताराम
राम राम राम राम सीताराम सीताराम

सीताकांत स्मरण जय जय राम!
पुंडलीका वर दे हरी विठ्ठल!
श्री ज्ञानदेव तुकाराम!
बोला पंढरीनाथ महाराज की जय!

पेटी, तबला, चिपळ्या आणि टाळ्यांच्या गजरात भजन झालं. साथीदारांना थांबा अशी सूचना देणारे हात करत बुवा म्हणाले... "होओअ!" तबल्यावर शेवटची थाप मारून तबलजी आणि पेटीवाले उगी झाले.
बुवांनी सुरुवात केली..

नूतन कवी म्हणतो,

प्रेम हे देवाघरचे लेणे,
मुक्तहस्त ते द्यावे घ्यावे
मनी रुजवावे, बहरू द्यावे,
जीवनी नंदनवन फुलवावे॥

श्रोतेहो, नमस्कार. आज १४ फेब्रुवारी. प्रेमदिवस. सर्व उपस्थितांना प्रेमदिवसाच्या शुभेच्छा. पण महाराजा, प्रेमदिवस वेगळा साजरा करायची गरज आहे का हो?
अहो, आपले साने गुरुजी तर म्हणतात..
खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे.

प्रेम हे आपल्या आचरणाचाच एक भाग आहे. प्रेमाशिवाय आयुष्य म्हणजे सुगंधाविना फूल. नानाविध रूपांनी हे प्रेम आपल्याला दर्शन देत असतं.
म्हणजे बघा...
आईच्या प्रेमळ स्पर्शातून झरणारं वात्सल्यप्रेम..
भावांमधील बंधुप्रेम.. जिवलग मैत्रीतील मित्रप्रेम..
भावा-बहिणीचं अतूट प्रेम.. प्रियकर-प्रेयसीतील स्वर्गीय प्रेम.. पतिपत्नीतील जन्मांतरीचं प्रेम.. भक्ताचं ईश्वरावरील भक्तिरूप प्रेम.. कुणी निसर्गप्रेमी तर कुणी संगीतप्रेमी. नात्यातील व्यावहारिक प्रेमापलीकडे असतं ते निरपेक्ष प्रेम.
सर्व गुणदोष स्वीकारून केलेलं प्रेम.

सुप्रसिद्ध 'चिंधी'च्या गाण्यात प्रेमाचं विलक्षण लक्षण सांगताना कवी म्हणतो...

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण

बरं का? पटली पाहिजे अंतरीची खूण. मनं जुळायला हवीत, हे महत्त्वाचं!

अहो, माणसाच्या पायाशी इंद्रलोकीची सुखं जरी लोळण घेत असली, तरी अनेकदा प्रेमाच्या दोन शब्दांसाठी त्याचं मन तळमळत राहतं.

मंडळी, महाभारतामध्ये ययाती आणि देवयानीची कथा सर्वश्रुत आहे.
संजीवनी विद्येच्या प्राप्तीसाठी कच असुरगुरू शुक्राचार्यांकडे शिष्य होऊन राहिला. त्यासाठी त्याने ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं होतं. पण गुरुकन्या देवयानी त्याच्यावर लुब्ध झाली आणि तिने त्याला विवाहासाठी आग्रह केला. जो साहजिकच कचाने स्वीकार केला नाही. आता या निर्णयामुळे कचासाठी सर्व काही सोडायला तयार असलेल्या देवयानीचं मन सूडाने पेटलं. सर्व भौतिक सुखं आणि जगाला आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावण्याची ईर्षा तिच्या मनात जागी झाली. या ईर्षेतूनच तिने वृषपर्वा महाराजांची मुलगी आणि आपली सखी असलेल्या राजकन्या शर्मिष्ठेला आजन्म आपली दासी व्हायला भाग पाडलं. ययाती महाराजांशी विवाह करून ती प्रतिष्ठानची सम्राज्ञी झाली. पण आपल्या अहंकारी आणि दुराग्रही स्वभावाने आयुष्यात सुखापासून, आपल्या माणसांपासून दूर गेली. कचासमोर आपण सुखी असल्याचं जरी ती भासवत राहिली, तरी कच तिला पूर्णपणे ओळखत होता. म्हणूनच यापुढे तरी तिने आयुष्यात सुखी व्हावं, म्हणून तिचा निरोप घेताना तो म्हणतो,

प्रेम वरदान।
स्मर सदा।
असे भवा हेचि वरदान॥

स्नेह सुगंधित करि संसारा
दाहि गरल वैर अभिमान|

तेव्हा, सूडबुद्धीला दूर ठेवा. प्रेमाने दुसर्‍याला जिंका.

म्हणून मूळ पद्यात कवी म्हणतो,
जीवनी नंदनवन फुलवावे.
आपल्या किंवा आपल्या संपर्कात येणार्‍या माणसांचं जीवन आनंदी करण्याचा आपण प्रयत्न करू या. असो.

आता थोडा वेळ ईश्वराचं भजन करू.
बोला,
रघुपती राघव राजाराम,
पतीत पावन सीताराम
रघुपती राघव राजाराम,
पतीत पावन सीताराम

भजन चालू असताना एकीकडे बुवांना बुक्का लावून हार घातला आणि बुक्क्याचं ताट श्रोत्यांमधे फिरवलं गेलं. भजन संपलं.
बुवांनी घसा खाकरला आणि पुन्हा सूर लावला.

तुम रूठी रहो, मैं मनाता रहूँ
के इन अदाओंसे और प्यार आता है
मजा जीने का और भी आता है
थोडे शिकवे भी हो, कुछ शिकायत भी हो
तो मजा जीने का और भी आता है

(हलकेच हसत) मंडळी, तुम्हाला वाटेल बुवांचा विचार तरी काय आहे आज? बुक्क्याचा परिणाम झाला की काय? उत्तररंगात हा भलताच रंग कसा आला? तर तसं काही नाही. पूर्वरंगात प्रेमाचे इतके प्रकार आपण पाहिले. पण प्रेम म्हटलं की चटकन आठवतं ते प्रियकर-प्रेयसीतील किंवा पती-पत्नीतील प्रेम, प्रणयाराधन. मंडळी, या प्रणयाराधनात अनुनयाचं, मनधरणीचं स्थान फार वरचं आहे, बरं! प्रेमात रुसवेफुगवे नसतील, तर काय मजा? आपणही ही मजा चाखली असणार? खरं ना? अहो, एव्हाना चित्रपटातील नाना दृश्यं आणि गाणी तुमच्या मनश्चक्षूंनी पाहिली असणार आणि खचितच आपल्या आयुष्याचा चित्रपटही तरळून गेला असणार!
मंडळी, मनधरणीचा प्रसंग आपल्यासारख्या मर्त्य मानवाला तर चुकला नाहीच, पण प्रत्यक्ष भगवान कृष्णालाही हे चुकलं नाही.
संगीत सौभद्रमध्ये... नाव काढताच काकांचे ओठ गुणगुणायला लागले बघा... (श्रोत्यांच्या चेहर्‍यावर हसू.)

तर मंडळी, इकडे बलरामदादांनी सुभद्रेचं लग्न ठरवलं आहे दुर्योधनाशी. तिकडे सुभद्रेचं मन जडलं आहे अर्जुनावर! यासाठी कृष्णाचे प्रयत्न गुप्तपणे चालू आहेत. पण हे रुक्मिणीला ठाऊक नाही आणि या खटपटीत कृष्णाची तिची बरेच दिवसात गाठभेट नाही. आपल्या एकुलत्या एका बहिणीच्या लग्नाविषयी तो (कृष्ण) दाखवत असलेली अनास्था, कृष्णाचं न भेटणं यामुळे ती अतिशय संतापलेली आहे. आज रात्री तिच्या महालात कृष्ण आलाय खरा, पण आधीच रुष्ट झालेल्या रुक्मिणीची मनधरणी केल्याशिवाय काही खरं नाही, हे कृष्णाने ओळखलं आहे . तेव्हा बोलूनचालून 'मनमोहन' असलेला तो कृष्ण म्हणतो,
नच सुंदरि करूं कोपा।
मजवरि धरिं अनुकंपा ।
रागानें तव तनु ही पावत कशि कंपा ॥
नच सुंदरी करू कोपा॥

पण इतक्याने का रुसवा जाईल?
मग पुढचा डाव... सवतीमत्सर !

नारी मज बहु असती।

अरे देवा! ( रुक्मिणी चपापते)
नेम बरोबर लागला म्हणायचा (कृष्णाचं स्मितहास्य)

अगं, नारी मज बहु असती।
परि प्रीती तुजवरती।
जाणसि हे तूं चित्तीं।
मग कां ही अशि रीती।
करिं मी कोठे वसती।
तरि तव मूर्ती दिसती।
प्रेमा तो मजवरिचा नेऊं नको लोपा ॥
मजवरी धरी अनुकंपा॥

लोणी तर वितळू लागलंय, पण अजून माफी आणि गुन्ह्याची सजा नको?
इथे गुन्हेगार स्वतःच शिक्षा फर्मावतो आहे!

करपाशीं या तनुला।
बांधुनि करि शिक्षेला।
धरुनियां केशांला।
दंतव्रण करि गाला।
कुचभल्ली वक्षाला।
टोंचुनि दुखवीं मजला।
हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा ।
मजवरी धरी अनुकंपा॥

आता बघा, आधी विनंती, मग खुशामत आणि शेवटी अपराधासाठी शासन एवढं मान्य केल्यावर तिची कळी खुलणार नाही असं कधी होईल?
म्हणून म्हणतो, प्रणयामध्ये महत्त्वपूर्ण अशा अनुनयाची ही कृष्णनीती नीट लक्षात ठेवा, बरं का! फाऽर उपयोगी आहे.

(हसत हसत म्हणतात,)
जाता जाता एक सांगतो... सुखी दांपत्याचं... बरं का?
द्वारकाधीश हा माझ्या अर्ध्या वचनी... हे खरं मर्म!

असो! तर प्रेमदिवस एक दिवसासाठी नाही, तर जन्मभर साजरा करण्याचा संकल्प करून या कृष्ण परमात्म्याचं अल्प काळ नामस्मरण करू या.
बोला,

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे।
हे नाथ, नारायण वासुदेव ॥
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे।
हे नाथ, नारायण वासुदेव ॥
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे।
हे नाथ, नारायण वासुदेव ॥

भजन संपलं. बुवांनी "हेचि दान देगा देवा" सुरू केलं. आरतीचं तबक फिरलं आणि टाळ्यांच्या गजरात कीर्तनाची समाप्ती झाली.


प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

14 Nov 2020 - 3:27 pm | सिरुसेरि

छान लिहिलं आहे . मराठी संगीत नाटक आणी किर्तनांमधुन श्रीकृष्णाच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचे सुरेख दर्शन घडवले आहे . या संदर्भात पुर्वी एका धाग्यावर लिहिलेला प्रतिसाद खाली डकवीत आहे .

कृष्ण आणी मराठी नाट्यसंगीत म्हणले की "सौभद्र " , "स्वयंवर" , "देव दिनाघरी धावला " , "सुवर्णतुला " अशी अनेक गाजलेली संगीत नाटके आठवतात . श्रीकृष्णाच्या खेळकर , चतुर व तितक्याच बलशाली व्यक्तीमत्वाच्या अनेक छटा या संगीत नाटकांमधुन पहायला मिळतात .

नाटकाचा पहिला अंक संपला आहे . तीर्थयात्रा करत असलेल्या अर्जुनाला नारदमुनींकडुन बलरामाने सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी ठरवल्याची वार्ता कळते . अत्यंत निराश झालेला अर्जुन एक शेवटचा प्रयत्न म्हणुन यतीवेश धारण करुन मथुरेला निघाला आहे . त्याचे सुभद्रेशी लग्न होईल का याची प्रेक्षकांनाही काळजी वाटु लागली आहे . अशा चिंतामय वातावरणात नाटकाचा दुसरा अंक सुरु होतो . आणी रंगमंचावर श्रीकृष्णाचे आगमन होते . प्रेक्षकांना हसतमुखाने विश्वासात घेउन कृष्ण त्यांना आपण चतुराईने रचलेल्या नाट्याची कल्पना देतो - "तस्करा हाती द्विज गोधन हरिले ..तयां पार्थाशी शरण आणिले ..नारदा ते मी त्यास भेटविले ..इकडचे वृत्त जाणविले ..".

सर्व काळजी दुर झालेला प्रेक्षक मोकळ्या मनाने श्रीकृष्णाचे नाट्य अनुभवु लागतो . श्रीकृष्णाच्या "कोण तुजसम सांग गुरुराया " , "लाल शालजोडी ", " बहुत दिन नच भेटलो सुंदरीला " , " नच सुंदरी करु कोपा " , "नभ मेघांनी आक्रमिले " , "प्रिये पहा ..रात्रीचा समय सरुनी" अशा स्वरांच्या , सुरांच्या जादुमधे हरवुन जातो . अखेर या नाट्यामधे बलरामही सापडतो आणी अर्जुन सुभद्रेच्या लग्नास "नांदा सौख्यभरे" अशी मान्यता देतो . पडदा पडतो आणी प्रेक्षक "सौभद्र"चे , मास्तर कृष्णरावांचे आणी श्रीकृष्णाचे कौतुक करत आनंदाने बाहेर पडतो .

सुखी's picture

14 Nov 2020 - 4:39 pm | सुखी

प्रतिसाद तर अजून सवाई

सुखी's picture

14 Nov 2020 - 4:39 pm | सुखी

लेख झकास झालाय

टर्मीनेटर's picture

14 Nov 2020 - 9:18 pm | टर्मीनेटर

'कीर्तन' आवडले 👍
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सोत्रि's picture

15 Nov 2020 - 8:59 am | सोत्रि

अतिशय सुंदर!

प्रबोधनात्मक बहारदार कीर्तन. वाचतना बुवांच्या समोर बसून ऐकतो आहोत असा फील येत होता इतक लेखन परिणामकारक झालंय!

- (कीर्तन ऐकणार्‍या श्रोतावृंदातला एक) सोकाजी

नूतन's picture

15 Nov 2020 - 12:47 pm | नूतन

सिरूसेरी,सुखी,टर्मीनेटर,सोत्रि ...आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद.

कुमार१'s picture

17 Nov 2020 - 6:45 pm | कुमार१

'कीर्तन' आवडले

स्मिताके's picture

17 Nov 2020 - 9:03 pm | स्मिताके

छान रंगले कीर्तन.

तुषार काळभोर's picture

17 Nov 2020 - 9:31 pm | तुषार काळभोर

कीर्तन छान रंगलंय..

प्राची अश्विनी's picture

23 Nov 2020 - 5:30 pm | प्राची अश्विनी

+११

नूतन's picture

25 Nov 2020 - 10:55 pm | नूतन

धन्यवाद प्राची अश्विनी

नूतन's picture

17 Nov 2020 - 9:40 pm | नूतन

धन्यवाद..कुमार१ स्मिताके,पैलवानजी

मित्रहो's picture

23 Nov 2020 - 10:31 pm | मित्रहो

छान रंगले कीर्तन, आवडले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2020 - 12:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

फारच मस्त लिहिले आहे.
"नच सुंदरी करु कोपा" तर फारच चपखल वापरले आहे, या निमित्ताने परत एकदा ऐकले.
पैजारबुवा,

नूतन's picture

25 Nov 2020 - 3:31 pm | नूतन
नूतन's picture

25 Nov 2020 - 3:31 pm | नूतन
नूतन's picture

25 Nov 2020 - 3:32 pm | नूतन

धन्यवाद....मित्रहो...ज्ञानोबाचे पैजारबुवा

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 5:28 pm | चौथा कोनाडा

'कीर्तन' आवडले !

👌

कीर्तन वाचतना कानात घुमायला लागले, आपल्या समोरच सुरु आहे असं वाटून संपुर्ण वातावरण मंगलमय झाले !

नूतन's picture

25 Nov 2020 - 10:53 pm | नूतन

धन्यवाद

सुबोध खरे's picture

26 Nov 2020 - 9:41 am | सुबोध खरे

सुन्दर

नूतन's picture

26 Nov 2020 - 6:49 pm | नूतन

धन्यवाद

अनिंद्य's picture

30 Nov 2020 - 4:43 pm | अनिंद्य

कीर्तन छान रंगवलय.

श्लोकांवरुन बुवा एकदम ‘तुम रूठी रहो, मैं मनाता रहूँ’ कडे येतात तेव्हा फिस्सकन हसू आले.

गम्पू बाप्पांसाठी ‘शुक्लाम्बरधरं’ ! - याकडे आधी कधीच लक्ष गेले नाही. सर्वत्र ‘पीतांबरधरं’च दिसतो :-)

नूतन's picture

30 Nov 2020 - 5:17 pm | नूतन

धन्यवाद अनिंद्यजी.