गुं फ ण

Primary tabs

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amगुं फ ण

पारिजातला एकदम छातीवर दडपण आल्यासारखं वाटलं. डोळ्यांत गर्द झोप होती. त्याने थोडं अंग हलवून पाहिलं - तो अंजलीचाच हात होता. त्याने तो हळूच बाजूला करून पाहण्याचा प्रयत्न केला. जोर लावल्याशिवाय ते शक्य नव्हतं. पण मग झोपमोड झाली असती. त्याने तो प्रयत्न सोडून दिला. नाइट लॅम्पच्या मंद प्रकाशात त्याने तिचा हात हातात घेऊन पाहिला. त्याच्या संसाराचा गाडा ओढताना तिचे हात निवून गेले होते. पण त्या हाताच्या छातीवर पडलेल्या विळख्यातली असोशी मात्र तशीच नवी कोरी, पहिलटकरीण होती.

तो कूस बदलून अंजलीकडे वळला. तिच्या चेहऱ्यावर समाधानी स्मित होतं. त्याच्या अचानक ध्यानात आलं - तिने भुवया, पापण्या कोरून आणलेल्या वाटत होत्या. फेशियलने आलेली चकाकी अंधारातही चमकत होती. आजकाल त्याचं लक्षच नसतं, जे आता तिच्या कपड्यांकडे गेलं. अंगावर त्याने हनिमूनला घेऊन दिलेली नाइटी होती. पण ती स्वयंपाकघरातून झाकपाक करून बेडरूममध्ये येईस्तोवर पारिजातचा डोळा लागला होता. त्याने तिचा हात बळेच सोडवला. तिच्या अंगावरची चादर दूर सारली. तिचं लांब मंगळसूत्र क्लिव्हेजमध्ये अडकलं होतं. ते त्याने सावकाश सोडवलं. कपाळावर आलेली बट बोटाने मागे सारली. कपाळावरची टिकली अलगद टिपून काढली, टिपकागदाने शाई टिपावी तशी.

“आपल्यामध्ये ही टिकली सुद्धा नको यायला अंजली!”

- पर्वतावरच्या त्या एकाट रिसॉर्टच्या फायरप्लेसजवळ एकाच दुलईत तिला ओढून घेताना तो म्हणाला होता… आणि तेव्हाची ती कविता...

... हा नि:शब्दाचा खेळ
ही चंद्रउदयिनी वेळ
उलगडू नये कधी ही
मलमली काळीजपीळ...

त्याने त्याच जुन्या आवेशाने तिच्या ओठांत आपले ओठ मिसळले.

ती जागीच होती.

दोघांमध्ये आता शर्वरी आली असली, तरी आपण आजही नवऱ्याला आकर्षित करू शकतो या समाधानाने अंजलीने पारिजातला घट्ट आवळून घेतलं.

****

स्वयंपाकीण बाईने करून ठेवलेल्या दोन पोळ्या अन बटाट्याची भाजी खाऊन झाली होती. नव्या वेबसिरीजही बिंजे वॉच करून संपल्या होत्या. करण्यासारखं काही नव्हतं. ती बेडवर उगाच मोबाइलशी चाळा करत लोळत पडली होती. रिसेन्ट कॉलमध्ये जाऊन पारिजातला कॉल लावण्याच्या इच्छेने शर्वरीची बोटं मोबाईलवर फिरली. पण मध्येच थांबली.

‘नको… आता नको. आज दुपारीच तर भेट झाली.’ तिचा ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर असलेला फ्लॅट त्या दृष्टीने फार सोयीचा होता. बाहेर लंच करण्याच्या बहाण्याने ऑफिसबाहेर पडून अनेकदा क्विकी सेशन्स त्यांनी एन्जॉय केली होती. शिवाय दर एखादा दिवस आड घरी जायच्या आधी पारिजात थोड्या वेळासाठी इथे येतो, हे एव्हाना डे शिफ़्टच्या सिक्युरिटी गार्डलाही माहीत झालं होतं. पण त्या रोजच्या भेटीतही एक नवेपणा होता. दोघांच्या मिळून चाळीस अधिक तीस अशा सत्तर वर्षांच्या आयुष्यात एकमेकांना सांगण्यासारखं खूप होतं. रोज नवे कपडे खरेदी करून इतरांना घालून दाखवावे तसे रोज आपल्या अंतरीचे नवनवे भाव ते एकमेकांना उलगडून दाखवत होते. त्याचे ते डोहासारखे खोल मोठे डोळे, ते दिलखुलास हसणं, ते चातुर्यपूर्वक बोलणं, मध्येच कधीतरी बासुंदीत चारोळीचा दाणा यावा तसा एखादा कवितेचा तुकडा फेकणं हे तिला मनस्वी आवडलं होतं, आवडत होतं.

मनाबरोबरच शरीरंही परिचयाची झाली होती. त्याच्या वरच्या ओठावरचा तो तीळ आता तिच्या ओठांचा चांगलाच ओळखीचा झाला होता. मागच्या भेटीपासून आजपर्यंत त्याच्या छातीवरचा कुठला नवा केस पांढरा झालाय हेसुद्धा ती आता सहज सांगू शकत होती. फोरप्ले दरम्यान तिच्या पाठीच्या मणक्यावरून फिरणाऱ्या त्याच्या जिभेचा स्पर्श एक हवीहवीशी ओलसर शिरशिरी आणत होता. सुरुवातीला असलेला काहीसा अविश्वासाचा रबरी अडसर आता गळून पडला होता. सगळ्या खळग्या-उंचवट्या-सपाटी- गोलाईसकट दोघंही परमोच्च क्षणी एका विलक्षण अवस्थेत असताना ती आकृती आरशात पाहत राहणं हा तिच्या फॅन्टसीच्या पूर्ततेचा क्षण बनला होता. पारिजात त्याला ‘प्रेस फिट मोमेन्ट’ म्हणतो आणि कधी मग त्याची ती आवडती कविता…

... नकळत यावा मग तो क्षण
उत्कटतेचे तोडत कुंपण
तृप्तीचे हे कुंभ रितावे
आकळत अपुले अवघे गुंफण …

आणि असे क्षण वारंवार येत होते, याहून अधिक तिला काय हवं होतं?

पण आज त्याला कॉल करताना हात मागे का आला? थोडं अति झालंय का? पण या आधीही असं झालंय. पारिजात काही आपल्या आयुष्यात आलेला पहिला पुरुष नव्हे. कितवा तेसुद्धा तिला आता आठवत नाही. अठराव्या वर्षी शिक्षणासाठी बाहेर पडलो ते घरी म्हणून परत कधी गेलोच नाही. आज त्यालाही १२-१३ वर्षं झाली. सणासुदीला घरी जायला घरी जाणं म्हणत नाहीत. आपण त्याला नवरा समजू लागलोय का? पण कुणाला नवरा करायचंच कधीच मनात आलं नाही. पारिजात जे हवं ते देतोय, पैसाही खर्च करतोय, मग कशाला पाहिजे ते लग्नाचं लोढणं गळ्यात?

देवाने इतकं चांगलं शरीर दिलंय ते काय तरुणपणात पाय ठेवत नाही तोच बाळंतपण अंगावर घेऊन बेढब करायला? कालपर्यंत खेळकर असणार्‍या अठरा-वीस वर्षांच्या पोरसवदा मुली लग्न करून वर्ष-सहा महिन्यातच एवढालं पोट घेऊन फिरताना दिसल्या की तिला त्यांची कीव येत असे. हे वय काय जबाबदार्‍या घ्यायचं आहे? छे! तिची तर अजूनही जबाबदारी घ्यायची तयारी नव्हती, तिशी पार केली तरी. प्रत्येकाने ती जबाबदारी घेतलीच पाहिजे असं आहे का? आणि स्वयंपाक, नको रे बाबा! अजून रस आहे आपल्यात. अजून पाहिलंय तरी काय आपण? अजून कितीतरी गाणी ऐकायची आहेत; अजून कितीतरी समुद्रकिनारे बघायचे आहेत; अजून कितीतरी चित्रांचे रंग डोळ्यांत उतरवून घ्यायचे आहेत. प्रेमाचा रंग तरी पूर्ण कुठे बघितलाय?

कॉलेजला असताना रणधीर होता सोबत. त्याच्याबरोबर हॉस्टेलमध्ये घालवलेले ते घाईघाईतले ओले क्षण... लायब्ररीच्या त्या कोपर्‍यात त्याने आपल्या टी-शर्टमध्ये खालून वर सरकवत आणलेला हात... ते कोणी बघेल की काय याची चोरटी भीती... ती नव्हाळी उत्कटता... एकाच वेळी तो अनुभव कधीही न संपण्याची, तर दुसरीकडे त्याच वेळी पटकन मोकळं होण्याची जीवघेणी जाणीवघाई नंतर कधीच जाणवली नाही. फायनल इयरला सुकेशबरोबर नाही की इंटर्नशिप करताना मेहता सरांबरोबर नाही. इतर वेळी कोणासोबत झालेल्या कॅज्युअल संबंधांबाबत तर काही अपेक्षाच नव्हती. पिझ्झासोबत पेप्सी ऑर्डर केल्यासारखं ते. मेकॅनिकल. काही खास नाही. पण आजकाल पारिजातसोबत सतत काही ना काही नवं करत राहावं लागतं. कधी फेक व्हावं लागतं. नाहीतर तो खट्टू झाला तर मूड जातो दोघांचाही. इट्स नथिंग बट लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स!

रणधीर असो की सुकेश की आणखी कोणी.. शेवटी लग्नाचं विचारतात आणि मग आपला इंटरेस्ट संपतो. हे पुरुष सगळं झालं की शेवटी लग्नावरच का येतात, देव जाणे? आपल्यासारखा दुसरा प्राणी तयार करण्याची किती ती ऑफिशियल घाई! तोच पुरुषार्थ वाटतो त्यांना, ऑफिसमध्ये बॉससमोर भिजकं मांजर का असेना. पारिजातही मध्येच कधीतरी लग्नाचा विषय काढतो. वर म्हणतो - दोघींनाही मेण्टेन करेन. मुलं-घर सांभाळायला अंजलीच्या मॅनेजरियल स्किल्स आवश्यक आहेत, वा रे वा! म्हणजे आय विल जस्ट रिड्यूस्ड टू बी अ कीप! बुलशिट! शर्वरीने मोबाइल गादीवर जोरदार आपटला आणि झटकन पालथी होऊन उशीत तोंड खुपसलं. पण बाहेर प्रकाश असताना डोळे कितीही गच्च मिटून घेतले, तरी थोडी आभा बंद पापण्यातूनही डोकावतेच, तसं तिच्या डोक्यात दुरूनच विचार टिमटिमत होते.

शेवटी आपल्यालाही वाटलंच ना की 'तसंच' राहणं इन्सल्टिंग आहे ते. यालाच पीअर प्रेशर म्हणत असावेत. चारचौघं वागतात तसंच वागावसं वाटणं - मग ते मनाविरुद्ध का असे ना. पण पारिजात उगाच चेष्टा करत असावा. तो सिरिअस कधी असतो आणि चेष्टा कधी करत असतो, कधीकधी कळतंच नाही. खरंच लग्न करेल असं काही वाटत नाही. तो एक स्मार्ट इन्व्हेस्टर आहे. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाइड कसा ठेवायचा हे त्याला चांगलं कळतं. अंजली ही त्याची लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. माझं काय, माझ्यात पैसा टाकून प्रॉफिट काढेल, पण वेळ आली की स्टॉप लॉस करून बाहेर निघायला मोकळा! निर्विकार!. बट गुड... गुड! म्हणूनच तर आवडतो तो आपल्याला. नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड!

ती पुन्हा सरळ झाली. मनाशीच हसली आणि मोबाइलमधले त्यांच्या इंटिमेट सेल्फी चाळू लागली.

***

"पण माझी काही तक्रार नाहीये ना त्याबद्दल!"

अंजलीने हे आज पुन्हा कितव्यांदातरी मानसीला सांगितलं होतं आणि थोडं चिडतच फोन ठेवला होता. मुलं शाळेत गेली आणि पारिजात ऑफिसला गेला की रोजच दुपारी मानसीचा फोन येतो. मैत्रीण असली म्हणून काय झालं? इतकी लुडबुड कशाला करावी दुसर्‍याच्या संसारात? कदाचित तिच्या ढेरपोट्या नवर्‍याकडे बायका ढुंकूनही पाहात नाहीत, म्हणून आतल्या आत जळत असेल. पारिजात आणि शर्वरीबद्दल लोक काय काय बोलतात हेच सांगत असते. तेच ते अन तेच ते. जसं काही मला माहीतच नाही. पण आपल्याइतकं कोणी ओळखत नाही त्याला. ही इज नॉट अ वन वुमन मॅन!

पण हे झाले तिचे आजकालचे विचार. सुरुवातीला चारचौघींसारखी तीसुद्धा असल्या गोष्टी ऐकून दु:खी होत असे. आपल्या तोंडावर ह्या बायका इतकं बोलतात तर मागे काय बोलत असतील? पण बाहेरख्याली नवरे लग्नाच्या बायकांना कसं वागवतात, त्यांच्या संसाराची कशी वाताहत होते याचे जे किस्से त्या सांगत, तसला एकही अनुभव अद्याप तरी तिला आला नव्हता. तिला कळून चुकलं होतं, शेवटी व्यभिचार हा मानण्यावर असतो. त्याने काही आपल्यावरचं, मुलांवरचं प्रेम कमी केलेलं नाही. तो काही आपला अपमान करत नाही. आपली काही आबाळ करत नाही. हां.. थोडा वेळ कमी देतो आजकाल. पण ठीक आहे. नॉट बॅड! आपण सर्वसाधारण आहोत. आपल्याला नाही कळत त्याच्या मोठमोठ्या गोष्टी, त्याची कवितेची आवड, तोंड वेडवाकडं करत आ आ करत गाणार्‍यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत जाणं वगैरे वगैरे. मग त्याचीही घुसमट होते आपल्या साधारण संसारात. तेव्हा आणखी चिरडत राहण्यापेक्षा अधूनमधून शर्वरीजवळ जर मोकळा होत असेल, तर बरंय ना! शिट्टीतून जास्तीची वाफ बाहेर गेल्याशिवाय कुकर शिजत नाही. शिवाय ती हुशार आहे, स्मार्ट आहे, तरुण आहे, रसरशीत आहे हे तर मान्य करावंच लागेल.

तिला बघितलंय तसं काही कार्यक्रमानिमित्त, पण घरी कधी आणलं नाही त्याने अजून. पण कधी काही लपवलंदेखील नाही. अगदी त्यांच्या पहिल्या भेटीपासून.... सगळी टीम कुठल्याशा सेमिनारला मनालीला गेली होती. रात्री तो कशासाठी तरी तिच्या रूममध्ये गेला होता. तिचा दरवाजा किलकिलाच होता. तेव्हा ती म्हणे इनर्समध्येच होती, वॅक्सिंग करत होती. जराही न बिचकता तिने त्याचं स्वागत केलं म्हणे. मग पारिजात दुसर्‍या दिवशी सकाळीच तिच्या रूममधून बाहेर आला... सगळं सांगितलं त्याने. कुठलाही आडपडदा न ठेवता, कुठल्याही अपराधभावाशिवाय. नेहमीच्याच शांत मुद्रेने.

तेव्हा धक्काच बसला होता ते ऐकून. पण मग विचार केला की लग्न तोडून आपण स्वतंत्र राहू शकतो का? तर नाही. पदरात दोन लहान मुलं आहेत. ना आपलं शिक्षण काही विशेष आहे, ना नोकरीचा अनुभव आहे, ना पाठीमागे उभं राहायला कुणी खंबीर नातेवाईक आहे आणि वर असल्या सुखवस्तू आयुष्याची लागलेली सवय. आता आपण कुठे जाणार? तो दारू पिऊन मारझोड तर करत नाही ना, पत्ते तर खेळत नाही ना, तंबाखू-सिगरेटच्या तोंडाने किस तर करत नाही ना, उपाशी तर ठेवत नाही ना? मग काय हरकत आहे थोडा त्याग करायला? तसंही प्रामाणिकपणा हा फारच दुर्मीळ गुण आहे. आपल्याला तोच तर आवडतो.

आज दुपारीच ती पार्लरमध्ये आणि स्पामध्ये जाऊन आली होती. आजकाल ती ग्रूमिंगकडे जास्त लक्ष देत होती. आपण शर्वरीसारखं निदान दिसावं तरी अशी खोल इच्छा कुठेतरी होती. दोघांमध्ये आता ती आली असली, तरी आपण आजही नवऱ्याला आकर्षित करू शकतो याचा तिला विश्वास होता. ती बेडरूममध्ये येईस्तोवर तो शांत निजला होता. मग तिने संध्याकाळीच शोधून ठेवलेली तिची हनिमून नाइटी घातली. दिवे घालवले. हळूच बिछान्यात शिरली आणि पारिजातच्या छातीला हाताचा विळखा घातला.

... तिला आठवत होता त्या पर्वतावरच्या त्या एकाट रिसॉर्टच्या फायरप्लेसजवळ एकाच दुलईत लपेटलेल्या त्यांना खिडकीतून चोरून पाहणारा समोरचा निळागर्द डोंगर आणि त्याला बघून त्याने म्हटलेली कविता...

... खिडकीमधुनी मग डोकावत
जळका नाजूक हळवा डोंगर
सवे त्याच्या सखी दरीही
देखाव्यावर त्या लाजत हेवत…

त्याने थोडी चूळबूळ केली. मग तिचा हात बळेच सोडवला. तिच्या अंगावरची चादर दूर सारली. तिचं लांब मंगळसूत्र क्लिव्हेजमध्ये अडकलं होतं. ते त्याने सावकाश सोडवलं. कपाळावर आलेली बट बोटाने मागे सारली. कपाळावरची टिकली अलगद टिपून काढली, टिपकागदाने शाई टिपावी तशी…

आणि मग तिने त्याच जुन्या आवेशाने त्याच्या ओठांत आपले ओठ मिसळले.

*समाप्त*

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 5:12 pm | टर्मीनेटर

@ए ए वाघमारे

'गुं फ ण '

ही तुमची कथा आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

ए ए वाघमारे's picture

16 Nov 2020 - 3:45 pm | ए ए वाघमारे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद टर्मिनेटर साहेब.

तुमची स्क्राच कार्ड्ची आयडीया फारच आवडली.

धीट पण संयत शैली आवडली. कथा छान आहे.

आंबट चिंच's picture

16 Nov 2020 - 8:37 pm | आंबट चिंच

दोन्ही बाजू तोलत मस्त लिहलंय.

किरण नगरकर यांच्या जंगल कादंबरीची आठवण आली.

मित्रहो's picture

16 Nov 2020 - 9:00 pm | मित्रहो

धीट पण संयत लिखाण
दोन्ही बाजूने विचार करुन लिहिले. दोघांचीही बाजू पटवून द्यायचा प्रयत्न केला.
अंजलीने त्याला घेऊनच संसार सुरु ठेवायचा हे पूर्णपणे पटले नाही.

सोत्रि's picture

19 Nov 2020 - 9:48 am | सोत्रि

चांगला प्रयत्न आहे दोन्ही बाजूच्या भावना टिपण्याचा.

-(‘गुंफण’ आवडलेला) सोकाजी

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 10:37 am | ज्ञानोबाचे पैजार

पण शेवट पटला नाही,
असाही विचार करणारेही लोक असू शकतात याची जाणीव आहे.
पैजारबुवा,

ए ए वाघमारे's picture

21 Nov 2020 - 3:24 pm | ए ए वाघमारे

गवि, मित्रहो, आंबट चिंच, पैजारबुवा, सोकाजी आपण आवर्जून दिलेल्या प्रतिसादबद्दल धन्यवाद! लोक ही कथा कशी काय रिसीव्ह करतील याबाबत मी सुद्धा जरा साशंक होतो/आहे.

पात्रांनी व्यक्त केलेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असं नाही. त्यामुळे शेवट असाच का याबद्दल जास्त बोलण्यात अर्थ नाही. असो

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2020 - 4:40 pm | टवाळ कार्टा

आवडेश

ए ए वाघमारे's picture

12 Feb 2021 - 11:57 am | ए ए वाघमारे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद