अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
2 Oct 2020 - 1:11 pm

अफझलखानाचा वध ! शिवचरित्रातील एक सोनेरी पान. ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे महाराजांच्या युध्दशास्त्राला, रणधुरंधरांना दिलेलं एक अजोड देणं!
शिवचरित्र हे कितीही वाचल-ऐकलं तरी त्याची गोडी कधी संपतच नाही. विररसाने ओतप्रोत भरलेले स्वधर्म आणि स्वदेशाभिमान, तसेच स्वातंत्र्य प्रेरणेने प्रेरित होऊन, शीर हातावर घेऊन प्राणपणाने लढणारे लढवय्ये, तुटपुंज्या आयुधाने आणि कमीत कमी सेनेच्या साथीने, आपल्यापेक्षा तीनचार पटीने बलाढय असणाऱ्या शत्रूशी मुकाबला करून जास्तीत जास्त पराक्रम करून प्रचंड मोठा विजय मिळविणे हे चमत्कार ठायी ठायी पहावयास मिळतात.
या चरित्रातील सर्वच प्रसंग असे आहेत की, त्या प्रत्येक प्रसंगावर स्वतंत्र विचार व्हावा. परंतु त्यातील दोन प्रसंग अत्यंत महत्त्वाचे आहेत. असे मला वाटते. एक म्हणजे आ याहून सुटका, व दुसरा अफजलखान स्वारीचे प्रतापगड युध्द. या दोन्ही ठिकाणी श्रीशिवछत्रपतींच्या कुशल राजकारणाचा अत्यंत भेदक असा प्रभावी पैलू दिसून येतो. केवळ अंदाज बांधण एकवेळ सोप असेल, परंतु विचारपूर्वक अंदाज बांधून त्याची योग्य आखणी करणे, आणि ते सारं आपला जीव धोक्यात घालून बेमालूमपणे प्रत्यक्षात उतरवणे व त्यात विजयी होणे, आणि परत आनंदी मनाने स्वराज्याच्या पुढील कामास लागणे. इथे मन कुंठीत होते आणि मग हे सारंच अजब वाटू लागत.
श्री भवानीदेवीच्या तेजस्वी प्रेरणेने स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवाजीमहाराज आणि त्यांचे मावळे साकार करीत होते. त्या स्वातंत्र्याचा घास घ्यावयास, तो स्वातंत्र्याचा प्रयत्न पायाच्या टाचेखाली चिरडून टाकावयाच्या गर्जना करीत एक महाभयंकर झंझावात प्रचंड शक्तिनिशी चालून आला. त्याची कर्तबगारीही तेवढीच प्रचंड होती. त्याच्या समशेरीचा दरारा असा होता की, सारी दख्खन आणि लंका त्याच्या धाकाने थरकापत होती.
औरंगजेबासारख्या महापाताळयंत्री कर्दनकाळालाही बीदर कल्याणीच्या मोहिमेत त्याने आपल्या लष्करी करामतीचा तडाखा दिला होता.अशा या अफजलखानाचा फिरंगी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी मध्यान्ही शिवाजी महाराजांनी मोठया कौशल्याने वध करून, त्याच्या प्रचंड फौजेचा आपल्या क्षुल्लक मावळी फौजनीशी धुव्वा उडविला, आणि प्रचंड विजय मिळविला. त्यांच्या या राजनितीला, गनिमी युध्दनितीला आणि शौर्याला उभ्या जगात तोड नाही.
युध्द शास्त्राच्या दृष्टीने जगातील पांच महत्त्वपूर्ण युध्दात शिवचरित्रातील अत्यंत कठिण अशा समरप्रसंगाचा प्रतापगड युध्दाचा समावेश आहे. ‘गनिमीकावा’ या पध्दतीने खेळले गेलेले हे युध्द जगातील एकमेव व पहिलेच उदाहरण आहे.
आदिलशहाने महाराजांना जिवंत किंवा मारुन पकडण्यासाठी पाठविले, पण महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला खानाचा वध केला इतकाच इतिहास बहुतेकांना माहिती असतो.पण या संघर्षाची मुळ काय होती.नेमक्या अश्या कोणत्या घटनांची मालिका आधी घडली,युध्दाचे लढवलेले डावपेच आणि मुख्य म्हणजे प्रतापगडाच्या या युध्दाचे दीर्घकालीन परिणाम काय झाले, या सर्व मुद्द्यांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
    शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेचे प्रयत्न सुरु केल्यावर अपेक्षेप्रमाणे आदिलशाहीकडून विरोध झाला. आदिलशहाकडून ऑगस्ट १६४९ मधील फत्तेखानाच्या स्वारीनंतर मात्र थेट एप्रिल १६५९ मध्ये अफझलखानाला पाठविले गेले. अफझलखानाच्या पारिपत्यानंतर लगेच जानेवारी १६६० मध्ये फत्तेखान आणि रुस्तम ए जमान आणि त्यानंतर पाठोपाठ एप्रिल १६६० मध्ये सिद्दी जोहर अश्या तीन स्वार्या केल्या गेल्या.सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातलेला असतानाच औरंगजेबाने औरंगाबादवरुन शाहिस्तेखानाला स्वराज्यावर पाठविले.म्हणजे १६४९ ते १६५९ या दहा वर्षात स्वराज्यावर एकही आक्रमण झालेले नाही,अर्थात याचा फायदा शिवाजी महाराज न उचलतील तरच नवल. केवळ पुणे  परिसर्,सासवड्,पुरंदर्,राजगड्,तोरणा,हिरडस मावळ आणि चाकण या परिसरापुरते मर्यादित असलेले स्वराज्य पश्चिमेला कल्याण ते कुडाळ अशी संपुर्ण कोकणपट्टी ( जंजिर्‍याचा सिद्दी,राजापुरची ईंग्रजांची वखार,रेवदंडा आणि कोरलईचा पोर्तुगीज अधिपत्याखालील प्रदेश, वेंगुर्ल्याचा डच वखारीच्या अखत्यारीतील प्रदेश हा अपवाद ) तर जावळी, शिरवळ्,सुपे आणि चाकणचा परिसर यामुळे स्वराज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला. या संपुर्ण दहा वर्षात नेमकी काय राजकीय स्थिती होती आणि अफझलखानाच्या स्वारीची पार्श्वभुमी याचा आढावा या लेखात घ्यायचा आहे.

मुहमंद आदिलशहा

    
  या संघर्षाचे मुळ जाते ते शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्याच्या केलेल्या प्रयत्नात. माहुली गडाला वेढा घालून शहाजहान व महमद आदिलशहा यांनी
शहाजीराजांच्या स्वराज्याच्या प्रयत्नाला मुठमाती दिली.शहाजीराजांसारखा पराक्रमी सरदार ठार मारण्यापेक्षा त्यांना आदिलशाहाने स्वताकडे घ्यावे आणि मावळच्या प्रदेशात न ठेवता, लांब कर्नाटकात बेंगळुरची जहागिरी द्यावी असे ठरले.शहाजीराजे जरी शरण आले असले तरी त्यांनी त्यांच्या जहागिरीचा प्रदेश पुणे व चाकण हे दोन परगणे आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळवले.
६ मे १६३६ रोजी मोघल आणि आदिलशाही यांच्या दरम्यान तह झाला.त्यामध्ये बरीच कलम असली तरी आपल्या दृष्टीने महत्वाची दोन कलमे लिहीतो.
१) विजापुरच्या आदिलशहाने दिल्लीपतीचे मांडलिकत्व मान्य करावे.
२) विजापुरच्या सुलतानाच्या मुळच्या मुलुखाला निजामशाहीपैकी खालील मुलुख नव्याने जोडण्यात यावा. पश्चिमेकडे  सोलापुर व परिंडा या किल्ल्यासह सोलापुर, वांगी महाल ( भीमा व सीना नद्यांमधील प्रदेश ). ईशान्येकडील भालकी व चिटगुपा हे परगणे,निजामशाही कोकण्,पुणे व चाकण हे दोन परगणे हा सर्व मुलुख मिळून दरसाल २० लक्ष होन किंवा ८० लाख रुपये वसुलाचे ५० परगणे होतात.राहिलेला निजामशाहीचा मुलुख निर्विवादपणे मोगलांच्या राज्यास जोडावा.
थोडक्यात मोंगली सरहद्दीची सीमारेषा जुन्नरच्या दक्षिणेकडून निघून पुर्वेकडे सरकत परांड्याच्या उत्तरेकडून जाई.म्हणजे परांडा हे आदिलशाहीत तर पुर्वेकडचे औसा,उदगीर्,नांदेड हे मोघली राज्यात होते. विजापुर आणि कुतुबशाहीत काही वाद झाल्यास ते सोडवण्याचे हक्क मोघलांना देण्यात आले होते.

    औरंगजेब

शहाजहानने आदिलशाहीशी केलेला तह त्याला एकंदरीत महाग पडला असे त्यातील कलमांकडे पाहिल्यास लक्षात येईल.निजामशाहीचा मोठा हिस्सा विजापुरकरांना मिळाल्यामुळे त्यांची दख्खनेत जवळ्जवळ बरोबरी झाली होती. त्यावेळी जरी शहाजहानने हा तह मान्य केला तरी पुढे त्याने कल्याण्,भिवंडी,सध्याचा रायगड जिल्ह्याचा भाग मिळवण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी शहाजहानने आपला मुलगा औरंगजेब याला दख्खनची जहागिरी दिली ( इ.स. १६५३ ). वास्तविक औरंगजेबाची हि दख्खनेत दुसरी नेमणुक होती.यापुर्वी १४ जुलै १६३६ ला शहाजहानने त्याला खडकीला पाठविले व त्याच्याच नावावरुन खडकी या मलिक अंबरने वसविलेल्या गावाचे औरंगाबाद असे नामकरण केले.

औरंगजेब जरी पराक्रमी आणि सैन्य दृष्टीने तुल्यबळ होता तरी विजापुरचा मुलुख एकट्याने ताब्यात घेणे शक्य नव्हते.

मीर जुमला

    
मग यासाठी औरंगजेबाने संधान बांधले ते कुतुबशाहीचा वजीर मीर जुमला याच्याशी.हा मीर जुमला कोण होता ? ग्रँट डफच्या "हिस्टरी ऑफ मराठा" म्हणजे मराठ्यांची बखरप्रमाणे मीर जुमला हा मुळचा जोहारी होता.हिर्‍याचा व्यापार करायला तो मोठमोठ्या दरबारी जायचा. आपले चातुर्य आणि द्रव्यसंपत्ती याच्या जोरावर तो कुतुबशाहीचा वजीर बनला. हा मुळचा ईराणचा म्हणजेच पर्शियाचा होता आणि त्याचे मुळ नाव महमद सय्यद अरदास्तनी..जेव्हा मोघलांनी आदिलशाहीशी तह केला तेव्हा कर्नाटकचा बराचसा प्रांत हिंदु पाळेगारांकडे होता.त्यातील पश्चिम कर्नाटक विजापुरकरांनी तर पुर्व कर्नाटक कुतुबशाहीने जिंकायचे असे ठरले.कुतुबशहातर्फे पुर्व कर्नाटकाचा प्रदेश जिंकायचे काम हा मीर जुमला करत होता. पण नंतर हाच मीर जुमला डोईजड झाला.

अब्दुल्ला कुतुबशहाला आपल्या या प्रबळ मंत्र्याचा संशय येउ लागला. त्यात विजापुर दरबाराच्या उपेक्षेने शहाजी राजांनी कुतुबशाहीत नोकरी पत्करण्याचा प्रयत्नचालवला.त्यामध्ये मीर जुमला याने मध्यस्थी केली. अर्थात शहाजी राजांना विजापुर दरबाराने सोडले नाही. हाच मीर जुमला औरंगजेबाला जाउन मिळाला आणि दोघांनी मिळून कुतुबशाही नष्ट करुन तो प्रदेश घशात घालण्याचा डाव रचला.मात्र असे झाले तर औरंगजेब दक्षिणेत प्रबळ होईल म्हणून शहाजहानने मध्यस्थी करुन कुतुबशाही वाचवली.
ह्या सर्व घडामोडी होत असताना ईकडे महाराष्ट्रात १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.सुरवातीची काही वर्षे शहाजी राजांबरोबर गेली असली तरी आपली पुणे जहागिरी सांभाळण्यासाठी शहाजी राजांनी त्यांना १६४२ मध्ये कर्यात मावळात पाठविले.शिवाजी राजांनी स्वताची मुद्रा करुन तोरणा,पुरंदर आदि प्रदेश ताब्यात घेउन आदिलशाहीविरुध्द बंड पुकारले.आदिलशाहीने पाठविलेल्या फत्तेखान आणि मुसेखान यांचा पुरंदरच्या उतारावर १० ऑगस्ट १६४९ ला हरविले.मात्र शहाजी राजांची सुटका करण्यासाठी कोंढाणा उर्फ सिंहगड आदिलशाहीला देउन टाकून तह केला आणि वडीलांना सोडविले.यादरम्यान शिवाजी महाराजांनी एक महत्वाचे राजकारण केले, ते म्हणजे जावळीतील आधीचा चंद्रराव मोरे मेल्यानंतर नवीन चंद्रराव मोरे कोण होणार असा वाद सुरु होता,त्यात शिवाजी राजांनी यशस्वी मध्यस्थी केली. चंद्रराव हे त्या पदाचे नाव होते.सत्ताधारी कोणीही असला तरी तो चंद्रराव हा किताब धारण करे.आधीच्या चंद्रराव मोरेंच्या पत्नी माणाकाईंनी शिवाजी राजांची मध्यस्थी घेउन नात्यातील यशवंतराव मोरेला नवीन चंद्रराव मोरे म्हणून मान्यता घेतली.शिवाजी राजांची हि चाल म्हणजे आदिलशाही दरबाराच्या अधिकारात ढवळाढवळ होती.
अर्थात यावेळी महमद आदिलशहा हा आजारी होता.पुढे ४ नोव्हेंबर १६५६ रोजी महमद आदिलशहा मृत्युमुखी पडला.या सर्व कालावधीत विजापुरच्या पुर्व सरहद्दीवर औरंगजेब, मीर जुमला संयुक्तपणे हल्ले करत असल्यामुळे विजापुर दरबाराचे बरेचसे लक्ष तिकडे होते.त्याचा फायदा होउन शिवाजी महाराजांना मावळात आपले बस्तान बसविणे सोपे गेले. एकदा १६४९ मध्ये आदिलशाहीशी तह झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुढे १६५५ पर्यंत कोणतीही फार मोठी हालचाल केलेली नाही.

 

 अलि आदिलशाह

महमद आदिलशहा मेल्यानंतर त्याचा मुलगा अलि आदिलशाही सत्तेवर आला. हा अवघा अठरा वर्षाचा होता.आणि ईथूनच खर्‍या संघर्षाला सुरवात झाली.मुळात विजापुर दरबारात या नवीन बादशहाच्या बाजुने असलेले आणि त्याला नसलेले पठाण असे दोन गट पडले. हा घरचा संघर्ष थोडा म्हणुन कि काय,याच संधीची वाट पहात असलेल्या औरंगजेबाने १६३६ च्या तहाचा आधार घेउन अली आदिलशाहीच्या राज्यारोहणाला आक्षेप घेतला.त्याने दोन मुद्दे काढले.
१) अली आदिलशहा हा मुहमद आदिलशहाचा मुलगा नव्हे,
२) अलि आदिलशहा याचे राज्यारोहण घोषीत करण्यापुर्वी मोघल सत्तेची परवानगी घ्यायला पाहिजे होती.
यावेळी अलि आदिलशहा जरी गादीवर बसलेला असला तरी खरी सत्ता चालवत होती ती बडी बेगम.वास्तविक हिचे नाव बडी बेगम नव्हते. हिचे नाव ताज उल मुखद्दीरात किंवा उलिया जनाबा असे होते.पण विजापुरात तीला बुबुवाजीखानम बेगम किंवा सरळ बडी बेगम म्हणत. या पाताळयंत्री बाईला विजापुरचे सर्व सरदार टरकून असत. अलीशहाची हि सख्खी आई नव्हती, पण आपल्या या सावत्र मुलावर तीचा विलक्षण जीव होता. ही मुळची कुतुबशहाची मुलगी. दरबारात असलेला गोंधळ आणि एकंदरीत वचक नसल्याचा फायदा घेउन औरंगजेबाने विजापुरची आदिलशाही बुडविण्याचा निश्चय केला.मीर जुमला मदतीला होताच,पण ईकडे मावळात शिवाजी महाराज जे स्वराज्यस्थापनेचे प्रयत्न करत होते,त्यात ते आदिलशाही मुलुख ताब्यात घेत होते,त्यामुळे विजापुर दरबाराजाच्या सैन्याला दोन आघाड्यावर लढावे लागत होते. मीर जुमला उत्तरेतून १८ जानेवारी १६५७ ला आला.

बसवकल्याणचा भुईकोट

 बिदरचा भुईकोट

आदिलशाही सैन्याचे बळ विभागलेले पाहून औरंगजेबाने आधी बिदरचा किल्ला २१ मार्च १६५७ ला ताब्यात घेतला आणि कल्याणीचा किल्ला उर्फ सध्याच्या बसवकल्याणचा किल्ला ताब्यात घेउन त्याने विजापुरवर हल्ला करण्याची तयारी सूरु केली.३१ जुलै १६५७ ला कल्याणीचा किल्लाही त्याच्या ताब्यात आला. फक्त लष्करी ताकदीचा उपयोग करुन औरंगजेब थांबला नाही तर त्याने विजापुर दरबारातील सरदारांना पैशाची लाच देउन फितुर करुन घेतले.रणदुल्लाखानाचा मुलगा आणि कित्येक सरदार फितुर होउन मोघलांशी पत्रव्यवहार करु लागले.यामुळे विजापुर दरबारात दुफळी पडून वजीर खानमहमद याच्याशी स्पर्धा करणारा गट निर्माण झाला.अहमदनगर येथील मोघली अधिकारी मुलतफखान याच्याकडे रक्कम देउन जो आदिलशाही अधिकारी मोघलांना फितुर होईल त्याला ती रक्कम देण्यास औरंगजेबाने हुकुम सोडला.याचवेळी आदिलशाहीचे गोवळकोंडा व पोर्तुगीजांबरोबर वाद सुरु होते.हे सर्व कमी म्हणून कि काय विजापुर राज्यातही अंतर्गत गोंधळ माजला होता. अथणी येथे लिंगायत व जैन यांची एकमेकांच्या देवास शिव्या देण्यावरुन वाद सुरु होता.
त्याचवेळी ईकडे मावळात शिवाजी महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे. १६५४ च्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी नीळकंठराव किल्लेदार याच्या मुलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली. पुढे महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला (१६५६). विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही महत्त्वाची ठिकाणे. जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यांना प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली (१६५६).
“राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहानमोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. तसेच विजापूरशी संपर्कही कमी होऊ लागला. पोर्तुगीज अंमलाखाली असलेला ठाणे, वसई हा भाग वगळता जव्हारपासून गोव्यापर्यंतचा बहुतेक कोकण प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे होता.
तिकडे औरंगजेब विजापुरवर हल्ल्याच्या तयारीत गुंतला आहे हे पाहून त्याच्याही अचुक फायदा घेतला. विजापुर दरबाराचा कल्याण येथील अधिकारी मुल्ला महमद आपली जहागिरी सोडून विजापुरला जाउन बसला होता. त्यात १६५७ च्या तहाप्रमाणे कल्याण्,भिवंडी हा प्रांत आदिलशहाने मोघलांना द्यायचा होता.मात्र या तहाची अंमलबजावणी अद्याप व्हायची होती.रायगडासारखे महत्वाचे लष्करी ठाणे हातात आल्यामुळे शिवाजी महाराजांनी श्यामराज निळकंठ रांजेकर यांचे चुलत बंधु दादाजी बापुजी यांना कल्याणवर आणि सखो कृष्ण लोहकरे यांना भिवंडीवर पाठवून कल्याण-भिवंडी हि दोन्ही ठिकाणे ताब्यात घेतली. जेधे करीन्यात सांगितल्याप्रमाणे "कल्याणजवळी बंदरी दुर्गाडीचा कोट बांधला.ते समयी राजश्री स्वामीस कल्याणात हरजिनस मता द्रव्य सापडले.फते झाली".याच वर्षी पौष महिन्यात माहुलीचा दुर्ग जिंकून तिथे आबाजी महादेव यांना कल्याणवर नेमणूक करुन देखरेखीला ठेवले.अश्याप्रकारे विजापुर विरुध्द मोंघल यांच्या संघर्षाचा फायदा घेउन शिवाजी राजांनी चौल ते कुडाळपर्यंतचा प्रांत हाती घेतला.

औरंगजेबाची काही फारसी पत्रे सातार्‍याच्या दफ्तरात आहेत्,त्यापैकी एका पत्राचे भाषांतर "शिवछत्रपतींची बखर" या मथळ्याखाली प्रसिध्द झालेली आहेत्,त्यातील हे एक पत्र

शिवाय औरंगजेब यावेळी विजापुरवर हल्ला करायच्या तयारीत होता, त्याला शिवाजी महाराजांनी पत्र पाठविले, "आम्ही दिल्लीपतीचे नोकर आहोत.या मोहिमेत आम्ही तुम्हाला लागेल ते सहाय्य करण्यास तयार आहोत.आम्ही विजापुरकरांचे जे प्रांत व किल्ले हस्तगत केले ते आम्हाकडे राहु द्यावेत.विजापुरकरांचे दाभोळ वगैरे समुद्रकिनार्‍याचे जे प्रांत आहेत ते आम्ही तुमच्यासाठी हस्तगत करतो आहोते". शिवाजी महाराजांनी अहमदनगरचा सुभेदार मुलताफखान याच्यामार्फत औरंगजेबाशी स्नेहाचे बोलणे लावले.औरंगजेबासाठी शिवाजी महाराजांचे हे पत्र फायद्याचे होते. शिवाजी महाराजांची योग्यता औरंगजेब जाणून होता.त्याने २२ एप्रिल १६५७ रोजी शिवाजी राजांना पत्र पाठविले,"वास्तविक पहाता युमच्या ताब्यात असलेले विजापुरकरांचे सगळे किल्ले आणि महाल हे पुर्वीप्रमाणे तुमच्याकडे कायम करण्यात आलेले आहेत.दाभोळचा किल्ला आणि दाभोळच्या खालील प्रदेश यांचे उत्पन्न तुम्ही ईच्छील्याप्रमाणे मी तुम्हास देत आहे.तुमच्या उरलेल्या मागण्याही मान्य करण्यात येतील आणि तुमच्या कल्पनेबाहेर तुमच्यावर मर्जी आणि कृपा दाखविण्यात येईल."
अर्थात औरंगजेबाने महाराजांना वश करुन घेण्याचा वारंवार प्रयत्न केला,मात्र शिवाजी राजांनी त्याला बिलकुल दाद लागु दिली नाही.उलट आज औरंगजेब विजापुरवरच्या स्वारीने अडचणीत सापडला आहे,उद्या तो आपले वचन पाळेलच असे नाही याची कल्पना शिवाजी राजांना होती.त्यातच शहाजहानचे औरंगजेबाला पत्र आले कि "तुम्ही (औरंगजेबाने ) विजापुरवर स्वारी करुन सर्व राज्य खालसा करावे,ते जमण्याजोगे नसल्यास १६३६ तहाप्रमाणे जो निजामशाहीचा मुलुख विजापुरकरांच्या मुलुखाला जोडण्यात आला, तो तरी जिंकून मोगलांच्या राज्याला जोडा. आणि दिड कोटी रुपये खंडणी देउन मांडलीक होण्याची तयारी असेल तर त्यांच्याशी तह करा आणि सैन्य घेउन गोवळकोंड्यावर आक्रमण करुन कुतुबशाही खालसा करा".
या सगळ्या प्रकारात मोघलांचे लष्करी सामर्थ्य विजापुरच्या सरहद्दीवर एकवटलेले असल्यामुळे जुन्नर.अहमदनगर हा मुलुख मोकळा पडला होता.याच वेळी विजापुरचे सरदार मीनाजी ( कि मंबाजी) व काशी हे दोन सरदार मोघली मुलुखावर चालून आले.तर शिवाजी महाराज जुन्नरवर हल्ला केला,त्याचे वर्णन सभासदाच्या बखरीत असे आहे"जुन्नर शहर मारिले.घोडे दोनशे पाडाव केले.तीन लक्ष होनांची मत्ता,खेरीज कापडजिन्नस,जडजवाहिर हस्तगत करुन पुण्यास आले.त्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जेष्ठात शिवाजी महाराजांनी अहमदनगरवर स्वारी केली.तेव्हा तिथे मोगल सरदार नासिरखान होता,त्याचाही पराभव केला."नगर शहर मारिले,सातशे घोडे पाडाव केले.हत्तीही पाडाव केले,द्रव्यही बहुत सापडले."
हि बातमी समजताच औरंगजेब अर्थातच भयंकर चिडला,त्याने आपल्या सरदारांना जळजळीत पत्र पाठविले,"तुम्ही आता शिवाजीची हकालपट्टी तर ताबडतोब केली पाहीजे.पण एवढ्याने काम भागणार नाही.शिवाजीच्या मुलुखात शिरुन तुम्ही तो बेचिराख करा.लोकांची कत्तल करताना किंवा लुटताना यत्किंचितही दया दाखवू नका.पुणे व चाकण प्रांत यांची राखरांगोळी झाली पाहिजे.तेथील लोक हातात सापडतील त्यांना गुलाम बनवा,आणि मोघली मुलुखातील जे पाटील किंवा रयत जे शिवाजीला गुप्तपणे मदत करेल त्यांचा नायनाट करा".
अर्थात या पत्रामुळे मोघली सरदार खडबडून जागे झाले तरी पावसाला सुरवात झाल्यामुळे नदी,नाले ओसंडून वाहु लागले.तेव्हा शिवाजीच्या मुलुखावर पावसानंतरच स्वारी करु असा विचार करुन हे सरदार गप्प बसले.
या सगळ्यात जो विजापुर आणि मोघल संघर्ष सुरु होता,त्यात या हल्ल्याचा मोठा मुद्दा होता.कारण या हल्ल्यामुळे औरंगजेबाला फटका बसून शिवाजी महाराजांनी विजापुर दरबाराला अप्रत्यक्ष मदत केली होती. मात्र याचवेळी विजापुर दरबाराचे मुत्सदी शहाजहानला भेटून त्याच्याशी तह करायला राजी झाले. शिवाय मोघल दरबारात शहजादा दाराच्या बाजुचे सरदार होते,त्यांना औरंगजेब नको होता,त्यांनी शहाजहानचे मन वळविले. सहाजिकच शहाजहानने हुकुम सोडला "देखत हुकुम विजापुरकरांशी चाललेले युध्द बंद करा" शिवाय औरंगजेबाच्या हाताखालील सरदारांना त्याने माळव्यात हजर रहाण्याचा हुकुम दिला.अर्थात पुढे महिनाभर औंगजेबाने युध्द सुरु ठेवले,मात्र नंतर त्याला तह करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.तहात ठरल्याप्रंमाणे "विजापुरकरांनी दिड कोटी रुपये खंडणी भरावी.बेदर्,परांडा,कल्याणी हे किल्ले व निजामशाही कोकणातील किल्ले,शिवाजीच्या ताब्यातील सुपे व पुणे प्रांत मोघलांनी घ्यावेत". अर्थात हा तह अंमलात आलाच नाही.औरंगजेब बिदरला निघून गेला तर मोघली फौज माळव्यात निघून गेली.विजापुरकरांचा मुलुख जाणार असल्यामुळे त्यांना तहाची अमंलबजावणी करण्याची काहीही घाइ नव्हती.
याप्रकाराने शिवाजी राजे चांगलेच अडचणीत आले कारण विजापुरकरांना मदत करण्यासाठी औरंगजेबावर स्वारी केली तर आदिलशाही दरबार तह करुन रिकामे झाले.आता औरंगजेबाशी बोलणी करायची तर तो अपमानास्पद अटी लादणार.मोठा आणिबाणीचा प्रसंग उत्पन्न झाला.पण ईतक्यात एक महत्वाची बातमी आली.

शहाजहान आणि दारा

दिल्लीत शहाजहान आजारी असल्याच्या बातम्या दख्खनेत आल्या होत्या.औरंगजेबाची बहीण रोशनआराने हे पत्र औरंगजेबाला पाठविले.त्याच्यामागे सर्वात थोरला राजपुत्र दारा हाच मोघल बादशहा होणार हे नक्की होते. औरंगजेबाला याचा आधीच अंदाज आलेला होता.विजापुर किंवा कुतुबशाही बुडवून ते राज्य ताब्यात घेण्याचा त्याने जो प्रयत्न केला त्याच्यामागे हे एक कारण होते.जर दारा सत्ताधीश झाला असता आणि दिल्लीची गादी आपल्याला मिळणार नाही हे जाणून किमान दख्खनचा प्रदेश आपल्या ताब्यात रहावा हा त्याचा या स्वारीमागे मुळ हेतु होता.अर्थात कदाचित आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवण्यात औरंगजेबाला यश मिळाले असते तर त्याने पुढचा मोहरा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याकडे वळविला असता हे नक्की होते.याच भावी राजकारणाचा विचार करुन शिवाजी महाराजांनी विजापुर दरबाराला मदत करायचा निर्णय घेतला, जो आदिलशहाने तह केल्याने चांगलाच फसला.पण विजापुरची गादी बुडविण्यात अपयश आल्याने औरंगजेबाला उत्तरेत जाउन दाराशी मुकाबला करुन दिल्लीची गादी बळकावण्याखेरीज पर्याय राहीला नाही.नेमक्या याच परिस्थितीचा फायदा शिवाजी राजांना झाला असे म्हणता येईल.
शाहजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे लागलेले लक्ष, हे पाहून महाराजांनी सरळ कल्याण व भिवंडी ही स्थळे हस्तगत केली (२४ ऑक्टोबर १६५७). पुढे १६५८ मध्ये माहुलीचा किल्लाही काबीज केला
शिवाजी महाराजांनी उत्तरेत जायच्या गडबडीत असलेल्या औरंगजेबाला पत्र पाठविले."आम्ही दिल्लीपतीचा जो अपराध केला त्याबध्दल आम्हाला फार पस्तावा आहे.आम्ही इकडे पुष्कळ घोडेस्वार जमा केले आहेत.प्रस्तुतसारख्या प्रसंगी आपणास जरुरी असल्यास सहाय्य करण्यास आम्ही तयार आहोत.आणि दक्षिणेकडील तुमच्या मुलुखाचे रक्षण तुमच्या पश्चात करण्याचे काम आमच्यावर सोपवले असता आम्ही ते मोठ्या खुषीने पत्करु. परंतु आपल्या हाती गेलेल्या प्रांतात आमचे काही वंशपरंपरागत आलेले हक्क आहेत,ते आपण चालु करावेत.आमच्या घराण्याच्या जहागिरीचा काही भाग आपल्या कबजात गेला आहे तो आम्हास परत मिळावा.व जुन्नर आणि अहमदनगर प्रांतातील आमची देशमुखी आम्हास परत मिळावी.म्हणजे आम्ही आपल्या लोकानिशी दिल्लीपतीची जी नोकरी बजावू तीचा मोबादला आम्हास मिळाल्यासारखे होईल.त्याप्रमाणे कोकण प्रांत आदिलखानाच्या ताब्यात दिला आहे त्याची व्यवस्था त्याच्याकडून तितकीशी चांगली लागलेली नाही. हा प्रांत आमच्याकडे दिल्यास पुष़्कळ फायदा होणार आहे".( यातील आदिलखान हा शब्द लक्षवेधी आहे)
हे पत्र शिवाजी राजांचे वकील घेउन गेले, त्यावेळी औरंगजेब घाईत होता.शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेला कल्याण,भिवंडी ह्या ताब्यात घेतलेल्या प्रदेशाला मोघलांनी मान्यता द्यावी असा आग्रह धरला होता,शिवाय तळकोकण जिंकल्यास त्याचा ताबाही शिवाजी राजांकडे राहील असा आग्रह धरला होता.या जाचक मागण्या मान्य करण्याशिवाय औरंगजेबापुढे दुसरा पर्याय नव्हता.अर्थात शिवाजी महाराज असाही विजापुरचा मुलुख ताब्यात घेणार आहेत आणि मोगली मुलुख सुरक्षित राहील असा विचार करुन त्याने या पत्राला मान्यता दिली.२४ फेब्रुवारी १६५८ रोजी उत्तरेला जाण्यासाठी औरंगजेबाने औरंगाबाद सोडले. त्यावेळी त्याने शिवाजी महाराजांना पत्र लिहीले.ते खाली दिलेले आहे.


हे पत्र घेउन रघुनाथपंत गेले होते तरीही ईथे कुष्णाजी भास्कर यांचा उल्लेख दिसतो.अर्थात हे कृष्णाजी भास्कर आणि अफझलखानातर्फे आलेले कृष्णाजी भास्कर निराळे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यापत्रातील सोनोपंत म्हणजे बहुधा सोनोपंत डबीर असावेत. ( अर्थात सोनोपंत डबीर कि आबाजी सोनदेव हा गोंधळ आहेच)पुढे यांनाच औरंगजेबाला द्यायचा नजराना घेउन शिवाजी महाराजांनी दिल्लीला पाठविले.
फेब्रुवारी १६५८ मध्ये औरंगजेब औरंगाबादेहून आगऱ्याकडे जाण्यास निघाला आणि २१ जुलै १६५८ मध्ये तो दिल्लीच्या तख्तावर बसला.अर्थात औरंगजेबाने वरकरणी शिवाजी राजांशी तह केल्याचे दाखविले असले तरी जाण्यापुर्वी त्याने मुलतफखान ,नौसिरीखान आणि मीर जुमला या तिघांनाही शिवाजी राजांपासून सावध रहाण्यासाठी पत्र लिहीले.तो मीर जुमल्याला लिहीतो,"नैऋत्येकडील प्रांतावर चांगले लक्ष ठेवा.तो कुत्र्याचा पोर टपून राहिला आहे".
त्याचप्रमाणे औरंगजेबाने आदिलशहाला लिहीले,"या देशाचे रक्षण करा.शिवाजीने गुपचुपपणे या देशातील काही किल्ल्यांचा ताबा घेतला आहे.त्याला हाकलून लावा.त्याला तुमच्या चाकरीत ठेवायची तुमची इच्छा असली तर त्याला जहागिरी द्या ती लांब कर्नाटकात.मोघल साम्राज्याच्या सीमेपासून लांब.म्हणजे सीमांना त्याच्यापासून उपद्र्व होणार नाही.".
स.न. १६५८ च्या आरंभी औरंगजेब वारसा युद्धांत सहभागी होण्यासाठी उत्तरेत रवाना झाला. तोपर्यंतची मोगलांची स्थिती अशी होती :- स. १६५७ च्या डिसेंबरमध्ये गुजरातचा सुभेदार शहजादा मुरादने स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत लष्करी तयारीकरता सुरतेची लुट केली. तिकडे बंगालमध्ये सुजानेही स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत गडबड उडवून दिली होती. दिल्लीला दारा शुकोहने बादशाही पद वा तख्त हाती न घेता फक्त सर्वाधिकार हाती घेऊन पडद्यामागील सूत्रधाराची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. जो त्याच्या अंगी आला. त्याउलट औरंगजेबाने आपलं धोरण आगाऊ जाहीर न करता परिस्थितीनुसार वागण्याचा निर्णय घेतला.
या चार शहजाद्यांच्या महत्त्वाकांक्षा, भूमिका काहीही असल्या तरी त्यांपैकी आपल्या बंडखोरीचा --- यशस्वी झाल्यास न् झाल्यास हा भाग वेगळा --- मोगल साम्राज्याला अधिक फटका बसू नये याची सर्वधिक काळजी औरंगजेब घेत असल्याचे दिसून येते. असो.औरंगजेबाने दख्खन सोडताना आपल्या पाठीमागे शिवाजी - आदिल परस्परांशी झुंजत बसतील असाही सोय केली होती असं म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही. कारण शिवाजी राजांची नव्याने उदयास येणारी सत्ता मोगल - आदिलच्या सरहद्दी दरम्यान असल्याने व शिवाजी राजांचा प्रमुख उद्योग आपल्या ताब्यातील भूप्रदेशास सलग असलेला भाग जिंकून घेण्याचा --- विशेषतः आधीच्या निजामशाहीत मोडणारा प्रदेश ताब्यात घेण्याचा असल्याने आदिल व शिवाजी यांचा झगडा जुंपणे अपरिहार्य होते.
या संपुर्ण कालावधीत शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यात काही घटना झाल्या.माघ १६५७ महिन्यात शिवाजी महाराजांची कन्या सखुबाई उर्फ सखवारबाई व फलटणचे बजाजी नाईक यांचे पुत्र महादजी नाईक यांचा विवाह पार पडला.स्वतः महाराजांनी गायकवाड घराण्यातील सोयरिक केली( सकवारबाई ). पुढे इ.स. १६५८ मध्ये जेष्ठात यांचा जन्म शुध्द १२ गुरुवार घटीका १० या वेळी संभाजी महाराजांचा पुरंदरावर जन्म झाला. यावेळी सईबाईंना दुध कमी पडल्याने कापुरहोळच्या गाडे पाटील घराण्यातील धाराउंना दाई म्हणून ठेवले गेले व प्रतिवार्षीक १६ होनांची नेमणूक दिली गेली.त्या धाराउंच्या दोन मुलांपैकी एक पन्हाळ्यास व एक राजगडाच्या सुवेळा माचीवर नेमले होते.
औरंगजेब गेल्यामुळे आदिलशाही आणि शिवाजी महाराज यांच्यावरचा मोठा लष्करी दबाव नाहीसा झाला. आता शिवाजी महाराजांकडे पुरेसे लक्ष द्यायला विजापुरकरांना वेळ मिळाला.अर्थात शिवाजी महाराजांनी या गोंधळात जावळी सारखा लष्करीदृष्ट्या महत्वाचा प्रदेश हस्तगत केलाच होता शिवाय सिंहगड किल्ला आणि खेडेबारे प्रांतसुध्दा ताब्यात घेतले.शिवाजी महराजांनी जावळी जिंकल्याबरोबरच रायरीचा गड जिंकला,त्यामुळे उत्तर कोकणात हालचाल करायला त्यांना एक ठाणे मिळाले,त्यातच मुल्ला महमदने कल्याणची सारा वसुली विजापुरला पाठविली होती जी मध्येच अडवून लुटण्यात आली.हाच तो कल्याणचा खजिना.पुढे याच पैशाचा उपयोग करुन रायरीच्या डोंगरावर बांधकामे केली गेली आणि त्याला नाव दिले "रायगड". त्याचवेळी महाराजांनी दंडा राजापुरीवर आक्रमण करुन सिद्दी फत्तेखानाला शह दिला व त्याचा बराचसा मुलुख ताब्यात घेतला.मात्र जंजिरा मिळाला नाही.हा फत्तेखान विजापुर दरबाराचा सरदार बनला. यानंतर महाराजांनी सरसगड्,सागरगड्,सुधागड,कर्नाळा,प्रबळगड हे उत्तर कोकणातील गड ताब्यात घेतले तर मावळातील राजमाची,लोहगड्,तुंग्,तिकोना,कोराईगड हे किल्ले घेतले. शिवाय तळगड्,घोसाळगड हे किल्ले घेउन जंजिर्‍या सिद्दीला शह दिला शिवाय बहुधा बीरवाडीचा किल्ला उभारुन तिथे एक लष्करी हालचालीचे केंद्र निर्माण केले.लोहगड्,राजमाची या गडावर आणि परिसरात कृष्णाजी भास्कर ( अफझलखानाचे वकील कृष्णाजी भास्कर वेगळे) यांची नेमणुक केली.एकंदरीत चौलपासून कुडाळपर्यंतच्या प्रदेशावर महाराजांचा अमंल सुरु झाला.इ.स.१६४६ ते १६५७ या ११ वर्षाच्या काळात शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार बऱ्यापैकी केला होता. त्यावेळी स्वराज्यात तळकोकणातील ३००० ताली, २४ बंदरे, २१ किल्ले होते. किल्ल्यांची संख्या अजुन जास्त असती पण १६४८ ला अफझलखानाने शहाजीराजांना अटक केली, आणि त्यांच्या सुटकेसाठी शिवरायांनी आदिलशाहीला ८ किल्ले सोडले. आणि चाकण, पुणे व सुपे या प्रांतात स्वराज्याचा बऱ्यापैकी विस्तार केला.
त्या काळात म्हणजे १६५७ साली, आदिलशाही ही तत्कालीन स्वराज्याच्या जवळपास २१ पट होती. अन मुघलसाम्राज्य हे विजारपूरच्या आदिलशाहीच्या जवळपास ३३ पट होते, म्हणजेच हिंदुस्थानच्या दोन तृतीयांश एवढा भाग मुघलांच्या अधिपत्याखाली होता. यावरुन आपल्याला मुघल सामर्थ्याची कल्पना येईल.

याच दरम्यान औरंगजेबाचा दुसरा राज्याभिषेक ५ जुन १६५९ ला झाला.त्यासंदर्भात पत्र आणि पोषाख शिवाजी महाराजांना राजगडावर मिळाला.

   आदिलशाहीसाठी हि धोक्याची घंटा होती.आता काही हालचाल केली नाही तर त्यांचा विनाश अटळ होता.इ.स. १६५८-५९ या कालावधीत बडी बेगमेने खानमहमद या विजापुरच्या वजीराला वेशीतच मारेकरी घालून मारले तर फत्तेखानास विष देउन मारले,तर श्रावण महिन्यात बहलोलखान मारला.( जेधे शकावली ) यावेळी मुल्ला अहमद हा विजापुर दरबाराचा सुत्रधार बनला आणि अफझलखान त्याचा पक्षाचा असल्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले.याच वेळी शिवाजी महाराजांनी मासुर प्रांतावर ( हा प्रदेश धारवाडच्या दक्षिणेस आहे) स्वारी करुन तिथे थोडीफार लुटालुट केली.या स्वारीचा महाराजांना काही फार मोठा फायदा झाला नाही तरी त्यांनी या परिसरातील वाटांची माहिती घेतली ज्याचा उपयोग करुन पुढे अथणी-हुबळी लुटले.आदिलशाहीला हे एक प्रकारे आव्हान वाटले.त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या जावळीच्या सरहद्दीवरुन कुरबुर सुरु केली. शिवाजी राजांच्या मताप्रमाणे जावळीची सरहद्द वाईच्या दक्षिणेला बावधन गावापर्यंत होती.त्यात शिवाजी राजांनी नुरखान बेगला ओझर्डे गाव ईनाम म्हणून दिला होता.हे गाव आदिलशाही हद्दीत येते असे विजापुर दरबाराचे मत होते.त्यासाठी दिनायत राउ या विजापुरच्या अधिकार्‍याने शिवाजी राजांचा मुजुमदार निळो सोनदेव यांना पत्र लिहीले.

 एकुणच विजापुर दरबार आणि शिवाजी राजे यांचा संघर्ष टोकाला गेला आणि शिवाजी महाराजांचा कायमचा नायनाट हेच आदिलशाही दरबाराचे लक्ष राहिले.शिवाय आदिलशाही-मोघल यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे कल्याण-भिवंडी हा भाग मोघलांना द्यायचा होता जो शिवाजी राजांनी ताब्यात घेतला होता.त्यामुळे यावेळी शिवाजी महाराजांच्या मदतीला मोंघल येणार नव्हते.उलट शिवाजी राजांचा पराभव व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न असणार होता.( शाहिस्तेखानाला पुढे स्वराज्यावर पाठविण्याची बीजे ईथे आहेत)
अर्थात महाराजांची इतकी दहशत पसरली होती कि कोणी सरदार सहजासहजी शिवाजी राजांवर चालून जायला तयार होईना आणि ईथेच प्रवेश होतो तो अफझलखानाचा.

क्रमश:

माझे सर्व लिखाण आपण येथे एकत्र वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

इतिहाससमीक्षामाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

Gk's picture

2 Oct 2020 - 4:56 pm | Gk

छान

नीलस्वप्निल's picture

2 Oct 2020 - 5:32 pm | नीलस्वप्निल

मेजवानी..... धन्यवाद दुर्गविहारीजी....._/\_

आनन्दा's picture

2 Oct 2020 - 5:35 pm | आनन्दा

वाचत आहे

दुर्गविहारी's picture

2 Oct 2020 - 8:37 pm | दुर्गविहारी

100

हा माझा शतकी धागा. मिसळपाव परिवा,, सर्व सदस्य आणि असंख्य वाचकांचे मनापासून धन्यवाद !

अनन्त अवधुत's picture

3 Oct 2020 - 11:43 am | अनन्त अवधुत

चांगले सहस्त्रकी धागे येवोत.
आणि ह्या धाग्याचे काश्मिर न होता, चांगली साधक बाधक चर्चा घडो.

नीलस्वप्निल's picture

2 Oct 2020 - 9:38 pm | नीलस्वप्निल

दुर्गविहारीजीचे अभीनन्द्न

शशिकांत ओक's picture

2 Oct 2020 - 10:08 pm | शशिकांत ओक

नमस्कार दुर्गविहारी अभिनंदन,
आपल्या टोपण नावाने ऐतिहासिक वास्तूंवरील संचार करून धागे सादर केल्यामुळे अनेक मिपाकरांना दुर्गम भागातील किल्ले व ऐतिहासिक वास्तूंचे निरीक्षण करायची गोडी वाढवली.
आपल्याशी संभाषणातून, चर्चेतून मलाही नवीन विचार, करायची प्रेरणा मिळत राहते.
द्विशतकाकडे आपली घोडदौड चालू राहो ही शुभेच्छा.

आपण महाराजांच्या आधीच्या काळातील घटनक्रमाचा आढावा घेऊन त्या काळातील भौगोलिक राजकारणांचे डावपेच समजून घ्यायला सोपे गेले आहे.
राजसत्तांच्या साठमारीचा आवाका समजून त्यात आपले घोडे कसे पुढे दामटायचे याचा वस्तुपाठ महाराजांच्या आकलनशक्तीतून दिसून येतो.
पुढे घटना कशा घडतील याचा विचार करून साहसी निर्णय घेण्यात महाराजांच्या दूरदर्शितेचे रहस्य समजून घ्यायला सोपे पडते.
सध्याच्या काळात चीन, अमेरिका यांना झुलवत ठेवून चीनचा लडाख, अरुणाचल भागातील तणाव कमी करण्यासाठी समुद्रीय लढाईला तोंड फोडून काय साधता येईल यावर निर्णय घेण्यात भारतीय परराष्ट्रीय आणि मिलिटरीचे धोरण ही सध्याची गरज आहे.

कंजूस's picture

3 Oct 2020 - 3:32 am | कंजूस

लेख पुन्हा वाचणार आहे. खूप ऐतिहासिक माहिती दिली आहे.

उत्तम आणि माहितीपूर्ण लेख !!! शतकासाठी शुभेच्छा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Oct 2020 - 10:51 am | ज्ञानोबाचे पैजार

तुम्ही असेच लिहिणार असाल तर मिपावर तुमच्या धाग्यांचे सहस्त्रक होवो हीच इश्र्वरचरणी प्रार्थना.

"यातील आदिलखान हा शब्द लक्षवेधी आहे" हा आदिलखानाचा संदर्भ निटसा कळला नाही.

"नैऋत्येकडील प्रांतावर चांगले लक्ष ठेवा.तो कुत्र्याचा पोर टपून राहिला आहे".
हा हा हा महाराजांची औरंग्याला किती दहशत वाटत असावी हे वरील वाक्यातून समजते

लेख वाचताना असे लक्षात येते की शिवाजी महाराज म्हणजे एक अष्टावधानी व धुरंधर राजकारणी राजा होता, ज्याने दिल्लीकर व अदिलशाही मधील राजकारणाचा स्वराज्य उभारणीसाठी अचूक उपयोग करुन घेतला. या दोन्ही शाह्यांची बलस्थाने व कमजोर्‍या त्यांना अचूक माहिती होत्या. याचाच अर्थ महाराजांचे सल्लागार मंडळ व हेर खाते अतिशय प्रबळ असले पाहिजे.

पैजारबुवा,

अनन्त अवधुत's picture

3 Oct 2020 - 11:41 am | अनन्त अवधुत

आदिलशाहला खान असे संबोधून , आपण त्याला राजा मानत नाही कदाचित असे महाराजांना सांगावयाचे होते. असा माझा अंदाज.

अर्धवटराव's picture

7 Oct 2020 - 8:19 pm | अर्धवटराव

आदिलशाहाला आदिलखान हे संबोधन औरंगझेब वापरायचा. एका यःकश्चीत राजाला 'शाहा' म्हणणं औरंगझेबला आवडायचं नाहि. औरंग्याला खुष करायला म्हणुन शिवजीने देखील ते संबोधन वापरले असावे.

चांदणे संदीप's picture

3 Oct 2020 - 11:54 am | चांदणे संदीप

दुर्गविहारी, आपल्या लेखांचे सहस्त्रक होवो हीच सदिच्छा. ___/\___

सं - दी - प

नावातकायआहे's picture

4 Oct 2020 - 8:20 pm | नावातकायआहे

+१०००

गामा पैलवान's picture

3 Oct 2020 - 7:41 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

तो कुत्र्याचा पोर टपून राहिला आहे

हाहाहा! कुत्तेकी औलाद औरंग्याच्या वेळेपासनं आहे तर!

बाकी, आढावा छान घेतला आहे. बरीच माहिती मिळते आहे. धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

कुत्तेकी औलाद औरंग्याच्या वेळेपासनं आहे तर!

वाईट वाटते... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा म्हटले तर मुस्लिम समाजाने 'ते आम्हांला उद्देशून म्हणाले`असा गवगवा केला गेला.
तो 'कुत्ते का पिल्ला' वाक्प्रचार मुस्लिम समुदायाने गैर मुस्लिमांना उद्देशून वापरायचा असतो. तो 'आम्हाला'उद्देशून मोदींच्या तोंडून काढला आहे असे म्हटले गेले. याची आठवण झाली.

काँग्रेसवालो इन कुत्तो से वफादारी सीख लो

कर्नाटकात

बेकार तरुण's picture

4 Oct 2020 - 1:48 pm | बेकार तरुण

नेहमीप्रमाणे उत्तम लेख.. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत आहे....

शतकाबद्दल अभिनंदन आणी खरं तर मनापासुन आभार.... खूप छान लिखाण आम्हाला वाचायला मिळत आहे..

.शहाजीराजे जरी शरण आले असले तरी त्यांनी त्यांच्या जहागिरीचा प्रदेश पुणे व चाकण हे दोन परगणे आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळवले.

पण पुण्यात तर गाढवच नांगर फिरवला होता जगदेव ने

गामा पैलवान's picture

5 Oct 2020 - 5:46 pm | गामा पैलवान

हस्तर,

पुणे एक गाव म्हणून नष्ट झालं असलं तरी पुणे परगणा म्हणजे आसपासचा प्रदेश काही उत्पन्न राखून असणार.

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

5 Oct 2020 - 10:16 pm | दुर्गविहारी

मुरार जगदेवाने आदिलशहाच्या आदेशावरून पुणे लुटून उध्वस्त केले आणि गाढवाचा नांगर फिरवला हि घट्ना खरी आणि सन १६३० ची आहे.नंतर सन १६३६ साली माहुलीच्या पायथ्याशी शहाजी राजे शरण आले आणि त्यांना कर्नाटक प्रांतात पाठविले.पण त्यांची पुणे,सुपे जहागिरी कायम ठेवली.स्वतः शहाजी राजे बंगळुरला असले तरी त्यांच्या वतीने सुपे जहागिरी धाकट्या राणीसाहेब तुकाबाईंचे बंधु संभाजी मोहिते ( शिवाजी राजांचे सावत्रमामा ) यांच्याकडे व थोडी गावे चुलत भाउ मंबाजी भोसले यांच्याकडे होती.जहागिरीतील गावे उध्वस्त झाल्यामुळे पुढे सन १६४२ मध्ये शिवाजी महाराज पुणे जहागिर सांभाळायला आले.पुढे काय घडले ते सर्वांना माहिती आहे.

पहिले दोनच भाग वाचून झालेत, उरलेले धागे सविस्तरपणे वाचणार आहेच. तूर्तास ही पोच.