कोविड महासाथीच्या निमित्ताने बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमध्ये पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाचे आगमन झालेले आहे. या आजारात काही रुग्णांना श्वसन अवरोध होऊ शकतो. परिणामी शरीरपेशींना रक्ताद्वारे मिळणाऱ्या ऑक्सीजनचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. या परिस्थितीचा प्राथमिक अंदाज घरच्या घरी घेता यावा, या उद्देशाने या घरगुती उपकरणाचे उत्पादन केलेले आहे. सध्या त्याचा लाभ बरेच जण घेत आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आरोग्य सर्वेक्षणातही त्याचा चाळणी चाचणीसारखा वापर होत आहे. या उपकरणातून ऑक्सीजन संबंधीचे जे मापन दिसते त्याबद्दल सामान्यांत कुतूहल दिसून आले. “ ९८, ९५, ८८ इत्यादी आकड्यांचा नक्की अर्थ काय?” असेही प्रश्न अनेकांनी संपर्कातून विचारले. त्यातूनच हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.
यानिमित्ताने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन, त्याचा ऑक्सिजनशी असलेला संबंध आणि यासंदर्भातील तांत्रिक मापने यांचा आढावा घेत आहे. हिमोग्लोबिनचे मूलभूत कार्य विशद करणारा लेख मी यापूर्वीच इथे लिहिलेला आहे.
शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यरत राहण्यासाठी सतत ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. आपण श्वसनाद्वारे जो अक्सिजन शरीरात घेतो तो हिमोग्लोबिन या प्रथिनाशी संयोग पावतो. हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे वाहक आहे. त्याच्यामार्फत पुढे रोहिणीतील रक्तप्रवाहाद्वारे सर्व पेशींना ऑक्सिजन सोडला जातो. म्हणजेच रोहिणीतून जे रक्त वाहत असते, ते ऑक्सिजनने समृद्ध असते. सर्व पेशी हा ऑक्सिजन शोषून घेतात व नंतर त्यांच्या कार्याद्वारे कार्बन डाय-ऑक्साइड तयार करतात. हा वायू देखील पुन्हा हिमोग्लोबिनच्या माध्यमातून रक्तात शिरतो. आता हे रक्त नीला वाहिन्यांद्वारा छातीच्या दिशेने पाठवले जाते. अर्थातच नीलेमधल्या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण बरेच कमी असते.
वर वर्णन केलेल्या दोन रक्तवाहिन्यांमधील जे हिमोग्लोबिन आहे त्याचे दोन प्रकार म्हणता येतील :
१. रोहिणीतल्या रक्तातले हिमोग्लोबिन ऑक्सिजनसमृद्ध आहे तर,
२. नीलेतल्या रक्तातले हिमोग्लोबीन हे ऑक्सिजनन्यून आहे.
या दोन्हींचे तुलनात्मक प्रमाण काढणे हे पल्स ऑक्सीमीटर या तंत्राचे मूलभूत तत्त्व आहे.
आता पुढील लेखाची विभागणी अशी आहे:
१. उपकरणाची कार्यपद्धती
२. मापनांचा अर्थ
३. तंत्राचे उपयोग
४. मापनावर बाह्य घटकांचा परिणाम
५. मापनाच्या मर्यादा
कार्यपद्धती :
शरीरातील रोहिणीमधल्या रक्तप्रवाहातील एकूण हिमोग्लोबिनचा किती भाग ऑक्सिजनने व्यापलेला आहे हे जाणण्यासाठी या तंत्राचा वापर होतो. त्यासाठी शरीरातील रक्तप्रवाहाचे स्पंदन जाणवेल अशी जागा निवडली जाते. यामध्ये मुख्यत्वे हाताचे अथवा पायाचे बोट किंवा कानाच्या पाळीचा समावेश आहे.
वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे शरीरावर ठरलेल्या जागी उपकरण लावले जाते. त्यामध्ये असलेल्या एलईडी यंत्रणेमधून प्रकाशाचे झोत शरीरात सोडले जातात. या प्रकाशामध्ये बऱ्याच तरंगलांबीच्या लहरी असतात. त्यातील दोन विशिष्ट लहरी हिमोग्लोबिनचे दोन प्रकार शोषून घेतात. त्यातून प्रकाशाचा काही भाग बाहेर सोडला जातो आणि तो उपकरणात मोजला जातो.
वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे शरीरावर ठरलेल्या जागी उपकरण लावले जाते. त्यामध्ये असलेल्या एलईडी यंत्रणेमधून प्रकाशाचे झोत शरीरात सोडले जातात. या प्रकाशामध्ये बऱ्याच तरंगलांबीच्या लहरी असतात. त्यातील दोन विशिष्ट लहरी हिमोग्लोबिनचे दोन प्रकार शोषून घेतात. त्यातून प्रकाशाचा काही भाग बाहेर सोडला जातो आणि तो उपकरणात मोजला जातो.
इथे दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात: १. ऑक्सिजनसमृद्ध हिमोग्लोबिन मुख्यतः अवरक्त प्रकाश शोषते, तर २. ऑक्सीजनन्यून हिमोग्लोबीन मुख्यतः लालरंगी प्रकाश शोषते.
या दोन्हींचे तुलनात्मक गणित उपकरणात होते आणि आपल्याला त्याच्या पडद्यावर SpO2 हे मापन दिसते. त्याचा अर्थ असा असतो : S = saturation p = peripheral ( हे बोटावर मोजले जाते म्हणून peripheral). O2 = oxygen निरोगी व्यक्तीत (समुद्र सपाटीवरील ठिकाणी) याचे प्रमाण ९५ – ९९ % या दरम्यान असते. अति उंचीवरील ठिकाणी राहताना यात फरक पडतो. ही मोजणी करण्यापूर्वी खालील मूलभूत काळजी घेणे आवश्यक ठरते : १. तपासणी करावयाची व्यक्ती आरामात बसलेली हवी. २. तपासणीचे बोट अगदी स्वच्छ असले पाहिजे तिथे धूळ वा मळ असता कामा नये. तसेच बोटाच्या नखाला नेलपॉलिश लावलेले नको. बोटांवर सूज नसावी. ३. व्यक्तीच्या शरीरावर प्रखर प्रकाश पडता कामा नये, कारण ही मोजणी ‘प्रकाशशोषण’ या तत्त्वावर होते. बाह्य घटकांचा परिणाम आरोग्यशास्त्रातील बऱ्याच घरगुती उपकरणांची अचूकता तशी मर्यादित असते. आजूबाजूच्या बाह्य घटकांचा त्याच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जरी रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असले, तरीदेखील काही बाह्य घटकांमुळे या मापन पद्धतीत चूक होऊ शकते. परिणामी हे मापन विश्वासार्ह राहत नाही. असे काही घटक याप्रमाणे आहेत : १. मापन चालू असताना व्यक्तीचा हात अस्थिर असणे २. व्यक्तीच्या त्वचेचा रंग हा एक महत्त्वाचा घटक आहे. जर त्वचेचा रंग खूप काळा असेल तर त्याचा मापनावर बर्यापैकी परिणाम होतो. त्यामुळे विशिष्ट वंशाच्या लोकांसाठी उपकरणातील तांत्रिक प्रमाणीकरण बदलण्याची शिफारस आहे. ३. काही कारणामुळे व्यक्तीच्या रक्तातील कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढलेले असणे. तंत्राची उपयुक्तता ज्या आजारांमध्ये रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते अशा प्रसंगी या मापनाचा उपयोग केला जातो. असे काही नेहमीचे आजार आणि परिस्थिती अशा आहेत : १. प्रौढातील श्वसन अवरोध (ARDS). सध्याच्या कोविडमध्ये ही परिस्थिती उद्भवू शकते. २. दमा अथवा दीर्घकालीन श्वसन-अडथळा ३. हृदयक्रिया तात्पुरती बंद पडल्यास (arrest) ४. काही प्रकारच्या झोपेच्या समस्या ५. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांमध्ये काही विशिष्ट शल्यक्रिया करताना. मापनाच्या मर्यादा एखाद्याचे मापन 95 ते 100 टक्के दरम्यान आले याचा अर्थ इतकाच असतो, की श्वसनातून मिळालेला ऑक्सिजन रक्तप्रवाहात योग्य प्रमाणात मिसळला जात आहे. परंतु याचा अर्थ असा नाही, की शरीरातील सर्व पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळालेला आहे. ही तफावत का असते आणि कुठल्या प्रसंगात तिचे महत्त्व आहे ते आता पाहू. १. समजा, आपण रक्तक्षयाच्या (anemia) रुग्णात हे मापन करीत आहोत आणि संबंधिताचे हिमोग्लोबिन बरेच कमी आहे. जर या व्यक्तीला कुठलाही श्वसन अवरोध नसेल तर saturation हे मापन अगदी नॉर्मल ( कदाचित 100% सुद्धा) दाखवले जाईल. परंतु तिच्या रक्तात मुळात हिमोग्लोबिनच कमी असल्याने रक्तातील एकूण ऑक्सिजन वाहण्याचे प्रमाण कमीच राहील. परिणामी पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही. २. सध्या प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण बरेच वाढलेले असते. काही विशिष्ट व्यावसायिकांमध्ये ( उदाहरणार्थ वाहतूक पोलीस) त्याचे प्रमाण लक्षणीय असू शकते. हिमोग्लोबिनचे जितके रेणू कार्बन मोनॉक्साईडशी संयोग पावतात, ते ऑक्सीजन स्वीकारू शकत नाहीत. परिणामी ते पेशींना ऑक्सिजन पुरवण्याचे दृष्टीने अकार्यक्षम ठरतात. ३. काही जनुकीय आजारांत संबंधित व्यक्तीत हिमोग्लोबिनची रचना बिघडलेली असते. त्याचाही त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. वरील सर्व परिस्थितीत या उपकरणाने दाखविलेल्या मापनाचे चिकित्सक विश्लेषण करावे लागते. मापनाचा आकडा जरी नॉर्मल दिसला तरी त्याचा अर्थ सर्व पेशींमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असतोच असे नाही. या उपकरणात SpO2 च्या जोडीला आपल्या नाडीचे प्रती मिनिट ठोकेही दर्शविलेले असतात. काही उपकरणांत मध्यभागी PI % असाही एक निकष दाखवतात. त्याची निरोगी अवस्थेतील रेंज 0.02% - 20% या दरम्यान असते. हा निर्देशांक शरीराच्या टोकापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत आहे असे दर्शवितो. त्याकडे सामान्य माणसाने लक्ष द्यायची गरज नाही. तर असे हे घरगुती वापराचे सुटसुटीत उपकरण. एखाद्याला कुठलाही श्वसनाचा त्रास होत नसेल आणि इथले ऑक्सिजनचे मापन नॉर्मल दाखवत असेल, तर चिंता नसावी. मात्र SpO2 90% चे खाली दाखविल्यास अथवा श्वसनाचा काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. सध्याच्या परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक तसेच दीर्घकालीन आजार असलेल्यांनी हे उपकरण जरूर जवळ बाळगावे. त्याचा चाळणी चाचणी म्हणून अधूनमधून वापर ठीक आहे. मात्र चाळा म्हणून ऊठसूट मापन करणे टाळावे. मापनाचे आकड्यांत किरकोळ बदल झाल्यास अस्वस्थ होऊ नये. या उपकरणाची उपयुक्तता, अचूकता आणि मर्यादा लक्षात घेऊन त्याचा तारतम्याने वापर करावा. *********************************
वाचने
14724
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद डॉक्टर
अगदी खरे
शास्त्रीय माहिती बद्द्ल धन्यवाद
नेहमीसारखाच माहितीपूर्ण आणि
उत्तम माहिती !
धन्यवाद !
हा लेख अतिशय आवडला, सध्याच्या
उपयुक्त लेख डॉक
धन्यवाद !
चांगली माहिती
छान ....
वाह! सुंदर माहितीपूर्ण लेख!!
धन्यवाद !
आभार.
खूप छान माहिती दिलीत कुमार साहेब
धन्यवाद !
खूप छान माहिती डॉक्टर साहेब. बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या.
चामुंडराय,
२.
छान माहीती