कोकणदीवा

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
14 Aug 2020 - 9:23 pm

शिवतीर्थ रायगडावर गेले लि अपरिहार्यपणे भेट देण्यापैकी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे "टकमक टोक". गडापासून निघून भेदकपणे पुढे घुसलेल्या या टकमकाच्या थेट टोकावर जाउन उभारले की भर्राट वारा छतीत भरुन समोर गगनचुंबी सह्याद्रीची शिखरे बघायची. त्यात एक त्रिकोणी आकाराचे शिखर चटकन नजरेत भरते. टकमक टोकाची दिशा थेट या शिखराकडेच आहे.हाच आहे "कोकणदिवा". जणु रायगडानेही टकमकाचे बोट आपल्या या दुर्गसख्यावर रोखले आहे.

महाड बंदरातून थेट देशावर जाणारा माल याच परिसरातून बैल आणि गाढवावर लादून नेला जायचा. अर्थात किंमती माल, मौल्यवान कापडचोपड सोबत असल्याने या मालाचे संरक्षण हि महत्वाची आणि अत्यावश्यक बाब होती. सहाजिकच ह्या मालाची ने-आण केली जाई, त्या घाटांवर नजर ठेवण्यासाठी दुर्गांची उभारणी केली गेली. अश्याच एका घाटावर म्हणजे कावळ्या घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकणदिव्याची उभारणी झाली. रायगडाच्या परिसरात असलेल्या वाटापैकी सर्वात जवळची वाट म्हणजे कावळ्या घाट. सहाजिकच या घाटावर नजर ठेवणारा कोकणदिव्याला निश्चित महत्व असणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी उपदुर्गांची साखळी तयार केली व जुने गड मजबुत केले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण झाले होते. या उपदुर्गांपैकी एक असलेला कोकणदिवा रायगडचा संरक्षक दुर्ग म्हणुन रायगडाच्या उत्तर दिशेला पुणे आणि रायगड जिल्ह्य़ाच्या सीमेवर उभा आहे. आजही इथून लोक महाडपर्येंत पायपीट करत व्यवहार करतात, त्यांच्या गरज भागवण्यासाठी त्यांना महाड पर्येंत या घाटाचा वापर करावा लागतो. दोन्ही गावातून येणाऱ्या वाट मळलेल्या आहेत.

एकुण कोकणदिवा शिखराचा आकार बघीतला कि ज्याने कोणी या गिरीदुर्गाचे नामकरण केले, त्याने अगदी नेमके वर्णन एकाच शब्दात केले असे म्हणावे लागेल. सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून एखाद्या ज्योतीच्या आकाराचे हे शिखर लवलवत उठावले आहे. खाली कोकणातून तळातून निरखल्यास हा आकार स्पष्ट जाणवतो.रायगडाचे एक नाव आहे नंदादीप. राजघरातील रायगड हा नंदादीप असेल तर सह्याद्रीच्या गिरीपुत्रांचा हा कोकणदिवा.

रायगडाच्या थेट समोर असलेल्या पण भौगोलिक दृष्ट्या पुणे जिल्ह्यात असणार्‍या या कोकणदिव्यावर जाण्यासाठी तीन पर्याय आहेत.
१) कोकणदिव्याच्या देशाकडच्या बाजुला पायथ्याचे गाव आहे, गारजाईवाडी. मात्र आपली गाडी असेल तर पक्का डांबरी रस्ता घोळ या गावापर्यंतच आहे. घोळ गावं पानशेतपासुन सुमारे तीस कि.मी.वर आहे. पानशेत पर्येंत बसने येऊन खाजगी जीपने ,ट्रॅक्सने घोळ गावापार्येंत जाता येते.पुण्या पासून ७५ किमी अंतरावर असणारं वेल्हा तालुक्यातील शेवटच्या एस. टी. थांब्याचं गावं.या घोळ गावासाठी थेट स्वारगेटवरुन बस आहे. या गावापासून घोळ-गारजाईवाडी-कावले खिंड-कोकणदिवा अशी भटकंती करत यायचे.स्वताची गाडी असेल तर पहाटे लवकर पुण्यातून निघून कोकणदिवा पाहून रात्री उशीरापर्यंत परतता येते.
२) दुसरी वाट सांदोशी मधुन आहे. महाडमार्गे सांदोशी गाव गाठायचे. तेथील विरगळी व उध्वस्त शिवमंदिर पाहुन कावळ्या घाटाचा खडा पहाड चढून वर खिंडीत जायचे व तेथुन पठार व उभा चढ चढुन कोकणदिव्यावर दाखल व्हायचे .सांदोशी गावामधुन कावळ्या घाटमार्गे किल्ल्यावर पोहोचायला साधारण ३ तास लागतात.
महाडवरुन सांदोशीला जाण्यासाठी एस.टी.बसच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत. सकाळी ४.४५, ८.१५,दुपारी १.००,आणि ३.२०
३) हा तिसरा मार्ग मात्र अस्सल दुर्गभटक्यांसाठीच आहे. ज्यांना चढाई-उतराईची रग जिरवायची आहे, खास त्यांच्यासाठी. या डोंगरयात्रेत कोकणदिव्याबरोबर जिते गावाजवळचा कुर्डूगड उर्फ विश्रामगडदेखील पहाता येतो. त्यासाठी आधी रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ्च्या निजामपुरला जाउन तिथून जिते गाव गाठायचे. गावामागची टेकडी चढून कुर्डुगड पहायचा आणि जिते गावात पुन्हा येउन पुर्वेकडचा सह्यपर्वत चढून कुंभलमाच गावामार्गे तेल्याच्या नाळेतून घोळ गाव गाठायचे. यामार्गे सह्याद्रीची मस्त चढाई होते. वाटेत वेळ झाल्यास कुंभलामाचला कोणाच्या तरी पडवीत मुक्काम करता येईल किंवा उत्तम म्हणजे घोळ गाव गाठणे. कुंभलमाच हि नावाप्रमाणेच सह्याद्रीच्या कुशीतील सपाटीवर वसलेली डोंगरवस्ती आहे. ईथून सह्याद्री चढायला दोन मार्ग आहेत. एक आहे ठिपठिप्या घाट, जो दापसरला जातो. या घाटाच्या सुरवातीला एक टाके आहे, त्यात थेंबा थेंबाने पाणी पडते. त्याच्या आवाज ठिप ठिप म्हणुन हा घाट ठिपठिप्या. दुसरी वाट थोडी खडी, तेल्याची नाळ. हि वाट थेट घोळ गावात जाते.घोळ गावात शाळा आहे, तिथेच आपला डेरा टाकता येईल. म्हणजे सकाळी लवकर उठून कोकणदिवा पाहून कावळ्या घाट उतरुन रायगड बघता येईल किंवा सांदोशीतून थेट महाड आणि तेथून आपल्या घरी.

घोळमधून कोकणदिव्याला जाण्यासाठी अर्ध्या तासाची पायपीट करत गरजाईवाडीमध्ये पोहचतायचे. एकेकाळी नांदते असणारे हे गाव आज उजाड झाले आहे, गावातील बहुतेक तरुण नोकरीनिमीत्ताने पुणे किंवा मुंबईला आहेत. गावातले बरेचसे विद्यार्थी कोकणदिवा - कावळ्या घाटाच्या पायथ्याच्या म्हणजेच रायगड जिल्ह्यातल्या सांदोशी गावात शिकत आहेत. सुट्टीत ही सगळी पोरं कावळ्या घाटाचा बेलाग पहाड चढून गारजाईवाडीत आपापल्या घरी येतात.

गावात काही वृध्द मंडळी दिसतात, त्यांच्यापैकी कोणाला तरी वाटाड्या म्हणून येण्याची विनंती करायची. कारण गडावर फार राबता नसल्याने गारजाईवाडीतुन नेमकी वाट आपल्याला सापडेल याची शक्यता नाही.अतिशय सुंदर ठिकाणी वसल्याने आणि संपूर्णपणे जंगलाने वेढल्याने गारजाईवाडीत रानमेव्याची प्रचंड समृद्धी आहे, उन्हाळ्यात या भागात गेल्यास जांभळं आणि करवंदाचा मनसोक्त आस्वाद घेता येतो. गारजाईवाडीत पाणी चांगले नसल्याने सोबत भरपूर पाणी बाळगावे.

गावाच्या दक्षीणेला टेकडी आहे, त्या टेकडीच्या डाव्या बाजूने एक शॉर्टकट आपल्याला थेट कोकणदिव्याच्या पायथ्याशी घेउन जातो. दुसरा मार्ग म्हणजे टेकडीच्या उजवीकडून जाणारी कावळ्या घाटाची वाट.मात्र या वाटेने थोडा जास्त वेळ लागतो. शिवाय कोकणदिवा या वाटेच्या डाव्या हाताला झाडीत असल्याने नेमक्या जागी वाटेला असणारा फाटा लक्षात आला पाहीजे. ईतकी दगदग करण्यापेक्षा गारजाईवाडीतून वाटाड्या घेतला तर सोयीचे पडते. मी एकटाच या कोकणदिव्यासाठी गेलो होतो. तेव्हा अर्थातच वाडीत बर्‍यापैकी वर्दळ होती. श्री. भिकाजी गेनु पोळेकर मला सोबत आले.

टेकडीला उजवी घालून आम्ही पलीकडच्या खोर्‍यात उतरलो आणि कोकणदिव्याने पहिले दर्शन दिले. अर्थात गरजाईवाडी मधुन किल्ल्यावर पोहोचायला २ तास लागतात. वाट फार मोडलेली नसल्याने बरोबर असलेल्या कोयत्याने वेली, फांद्या तोडत आमची वाटचाल सुरु होती. ईथून गर्द झाडीचा पट्टा सुरु झाला.

कोकणदिव्याचा पायथा जवळ येत असतानाच हे दगडात खोदलेलं मंदिर लागलं.ईथला देव या परिसरासारखाच अनगड. याला ना नियमित गंध्,अक्षता ना मंत्रपुष्पांजली ना कोण्या भाविकाचा देखला दंडवत. क्ववित कोणी गावकरी या राउळात येणार आणि ईथल्या निरव शांततेचा भंग घंटानादाने होणार. गर्दीत वाहून जाणार्‍या शहरी श्रीमंती देवस्थानांपेक्षा खरी मानसिक शांतता आणि परमेश्वराशी तादत्म्य व्हायचे असेल तर ईथे या. बरोबर आलेल्या भाऊंनी लगेच दंडवत घातला.

आणि आम्ही कोकणदिव्याच्या पायथ्याशी अखेर पोहचलो. कावले घाटाच्या अस्तित्वाच्या खुणा आजही इथे सापडतात. इथे खिंडीत एका दगडाला शेंदूर फासुन त्याची देव म्हणुन स्थापना केली असुन येन खिंडीत वरील बाजुने घसरून येणारी माती अडवण्यासाठी दोनही बाजुला दगडी भिंत घातलेली आहे.

येथुनच गडावर जाणारी वाट सुरु होते. कारवीच्या झाडांच्या दाट जंगलातुन गडावर जाणारी मुरमाड व घसरडी पायवाट आहे.

 

या घसार्‍यावरुन माथ्यावर चढायचे म्हणजे दिव्य आहे, एक पाउल रोउन पुढे टाकावे तो मुरमाड घसारा आपल्याला दहा पावले खाली नेतो.

सापशिडी खेळाची आठवण व्हावी अशी हि चढाई! वाटेवर असलेया कारवीच्या झाडांचा आधार घेतच गडावर जाता येते.

वाटेत बरीच झाडी असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही.

 गडमाथ्यावर जाताना अर्धा तास चढाईनंतर वाटेत एक कातळटप्पा लागतो.

 

या कातळ टप्प्यातच पुर्व बाजुला एक गुहा आहे. या गुहेत ७-८ जणांना सहजपणे रहाता येईल.

मुंबईचा एकजण कोकणदिवा पहायला आला असताना या गुहेत एकटाच राहिला होता, असा किस्सा पोळेकरांनी सांगितला. त्या अज्ञात दुर्गप्रेमीच्या वेडाला केवळ सलाम. गुहेशेजारीच पाण्याची ४ टाकी आहेत.

 

 यातील एका टाक्यातील पाणी स्वच्छ असुन पिण्यायोग्य आहे.

 

हे टाके उघडे असुन त्यातुन पाणी काढायला कडयाच्या बाजुने हात जाण्याइतपत दगडात छिद्र ठेवलेले आहे.

उर्वरीत ३ टाक्यांपैकी एक टाके जोडटाके असुन या टाक्याकडे जाण्याची वाट मात्र बरीच कठीण आहे. गुहेच्या पुढे वाटेला लागुनच अजुन एक कोरडे पडलेले टाके आहे. येथुन १० फूटाचा कातळटप्पा चढून गेल्यावर थोडीशी घसाऱ्याची वाट लागते.

ईथेच थोडीफार सपाटी आहे.

 

अर्थात बरोबर स्थानिक व्यक्ती असुनही आमचा मात्र हा टप्पा कसा कोण जाणे चुकला आणि थोडे पुढे कड्यावर मिळणार्‍या पावठ्यांचा आधार घेउन शिखरावर पोहचलो. अर्थात मागे वळून बघीतल्यानंतर कावळया घाटाच्या बाजुला असलेली पाताळ दरी पाहून आपण कोणते साहस केले, याची कल्पना आली. नशीब म्हणूनच आम्हा दोघांना कोणताही धोका झाला नाही. अर्थात गड खाली उतरुन आलो तरी अंगाचा कापरा गेला नव्हता.

मुळ कडा उंच असल्याने ईथे काही दगड रचाई करुन ठेवलेत. हि वाट पार केल्यावर आपण गडमाथ्यावर प्रवेश होतो.कोकणदिव्याची समुद्रसपाटीपासुन उंची २५०० फुटाच्या आसपास आहे. एकदा सर्व सायास पार करुन ईथे पोहचल्यानंतर आणि आजुबाजुच्या निसर्गावर नजर फेकल्यानंतर एकच भावना मनी येते, "याच्यासाठी केला होता अट्टाहास !".

  वास्तविक या गडाच्या माथ्याचे क्षेत्रफळ जेमतेमच आहे. मात्र ईथून जे दृष्य दिसते, त्याला तोड नाही.वर्णनासाठी शब्द तोकडे पडावेत.

 ईथून होणारे दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे दर्शन आपल्याला सभासद बखरीतील वर्णनाचा नेमकेपणा पटवून देतात.

डावीकडे जगदीश्वर व शिवसमाधी तर उजवीकडे टकमक टोक अश्या एका वेगळ्या कोनातून रायगडाचे दर्शन होते.

उत्तम दर्जाचा कॅमेरा किंवा दुर्बीण असेल तर कोकणदिव्यावरुन थेट राजसभा आणि नगारखाना दिसू शकतो. भान हरपून कोकणदिव्याच्या माथ्यावरून ही सह्याद्रीची किमया पाहत होतो.

कोकणदिव्याच्या माथ्यावरून दिसणारं जगदीश्वर मंदिर
समोरच भगवा डौलाने फडकताना दिसतो. गडमाथ्यावरून दक्षिणेकडे किल्ले रायगडावरील भवानी कडा, टकमक टोक, नगारखाना हि ठिकाणे,पुर्वेला तोरणा किल्ला तर आग्नेयेला लिंगाणा व पश्चिमेला कावळ्या घाट ह्यांचे सुरेख दर्शन होते.

रायगड व त्यावरील अवशेष लांबुनही स्पष्ट दाखवणारा कोकणदिवा हा पुणे जिल्ह्यातला एकमेव किल्ला असावा.

शेजारीच कावल्या गावाचा सुळका दिसतो.यालाच वारंगीचा "कणा" असेही नाव आहे. ईथे मला गो.नि.दांडेकर उर्फ अप्पा यांनी मांडलेल्या कल्पनेची आठवण आली, या सुळक्यातून थेट रायगडाकडे नजर रोखलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा या सुळक्यात कोरावा. एखाद्या अस्सल दुर्गप्रेमीलाच सुचावी अशी हि कल्पना !
माथ्यावर फार अवशेष नाहीत,फक्त खांब रोवायला काही खड्डे दिसतात. एकुण हा काही फार बळकट दुर्ग नाही, फक्त एक निरीक्षणाचे ठाणे असले पाहिजे.

समोर सांदोशीचा तावली डोंगरही उठून दिसत होता. कितीही वेळ या शिखरावर उभारले तरी मन भरत नाही.मात्र मागे असलेली असंख्य व्यवधाने मनाला टोचतात, घड्याळ वास्तवतेची आठवण करुन देते आणि नाईलाजाने जड पावलाने कोकणदिव्याला निरोप देउन पायथ्याशी आलो.
कोकणदिव्याचे किल्ला म्हणुन इतिहासात संदर्भ कुठेही सापडत नाही. मात्र याच कावले घाटाच्या तोंडाशी असणारी कावला-बावला खिंड हि मराठयांच्या इतिहासात लढलेल्या एका रणसंग्रामाची साक्ष आहे. शिवाजी राजांच्या निधनानंतर आणि शंभुराजांच्या दुर्दैवी शेवटानंतर औरंगजेबाने आपला मोहरा राजधानी रायगडाकडे वळवला. गडावर राजाराज महाराज आणि येसुबाई राणिसाहेब होत्या. ईदीकतखानाने रायगडाभोवती वेढ्याचा फास आवळला. मात्र उत्तरेच्या बाजुला कुमक कमी असल्यामुळे शहाबुद्दीनखानाने कावळ्या घाटाने सैन्य उतरवून वेढा पक्का करायचे ठरविले. हि खबर लागताच २५ मार्च १६८९ या दिवशी गोंदाजी जगताप आणि सरकले नाईक यांनी शहाबुद्दीन खानाचे तीनशे सैन्य याच रणक्षेत्री कापून काढले. सांदोशी गावच्या या वीरपुत्रांनी अक्षरशः चार हातांनी हि खिंड लढवली. हा ईतिहास किती जणांना माहिती असतो? पावनखिंड आणि उंबरखिंडीसारखीच हि आणखी एक वीरभुमी कावल्या-बावल्या खिंड ! या प्रतिकारामुळे मोघल सैन्य कावळ्या घाटाने खाली उतरु शकले नाही, आणि रायगडाचा वेढा कमकुवत राहिला. परिणामी राजाराम महाराजाना रायगडाहुन सुरक्षित जिंजीला जाता आले.

अशी हि इतिहासप्रसिध्द खिंड बघीतली आणि मी कावळ्या घाटाने निघालो. घाट असल्यामुळे अपेक्षेप्रमाणेच सुरवतीला थोडा वेगवान उतार सोडला तर नंतर मंदपणे वाट खाली उतरू लागली. पुर्ण वाटेवर घनदाट जंगल असल्याने उन्हाची काळजी नव्हती.

एक-दोन ठिकाणी झाडी विरळ झाल्यावर कोकणदिव्याने दर्शन दिले. धडसफडस करीत दीड तासात सांदोशीत दाखला झालो. जगतापांच्या प्रशस्त घरासमोरच्या पडवीत टेकून पाणी मागितले. गावकर्‍यांची वास्तपुस्त झाली, " वर हौदाजव़ळ काउन आलास का?" म्हणजे कोकणदिवा किंवा गड यांच्यापोक्षा यां लोकांना संदर्भ होता, तो त्या पाण्याच्या टाक्यांचा. पाण्याची टंचाई जाणविणार्‍या प्रदेशात दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणा?

सांदोशी हे रायगडाच्या घेर्‍यातील गाव. सहाजिकच ईथेही अनेक योध्दयांनी जन्म घेतला असणार. आणि समरांगणात धारातिर्थी पडलेल्या वीरांच्या स्मृती गावाने वीरगळीच्या रुपात जपल्या आहेत.
सांदोशी हे रायगडाच्या घेर्‍यातील गाव. सहाजिकच ईथेही अनेक योध्दयांनी जन्म घेतला असणार. आणि समरांगणात धारातिर्थी पडलेल्या वीरांच्या स्मृती गावाने वीरगळीच्या रुपात जपल्या आहेत. 

 

थेट
गावातून कोकणदिव्याचे मोठे रौद्र दर्शन होत होते. त्यादिवशी नेमकी त्या
भागात कोणती तरी निवड्णुक असल्यामुळे एका जीपमध्ये थेट महाडपर्यंत लिफ्ट
मिळाली. थेट आउसाहेबांच्या समाधीपर्यंत कोकणदिवा मला जीपच्या मागच्या
काचेतून साद घालत होता.

याशिवाय ज्यांना कोकणदिवा पाहुन रायगड पहायचा आहे, ते दुर्गारोही ईथेच वाटचाल थांबवत नाहीत. सांदोशीपासून साधारण दोन तासाच्या चालीवर रायगड आहे.

तळटीपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार
काही फोटो मि.पा.कर स्वच्छंदी मनोज यांचे आहेत.
माझा हा लेख आणि भटकंतीवरील इतर लेख माझ्या या ब्लॉगवर वाचू शकता
भटकंती सह्याद्रीची

संदर्भः-

१) राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे

२) रायगड जिल्हा गॅझेटीयर

३) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर

४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे

५) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स.

प्रतिक्रिया

गणेशा's picture

15 Aug 2020 - 1:31 am | गणेशा

निव्वळ अप्रतिम..
दुसरे शब्द नाहीतच... हेवा वाटावे असे लेखन..अशी भटकंती...

तुषार काळभोर's picture

15 Aug 2020 - 6:44 pm | तुषार काळभोर

प्रत्येक शब्दाला प्लस वन

Bhakti's picture

15 Aug 2020 - 1:59 pm | Bhakti

खुपचं छान भटकंती.खुप सुटसुटीत मस्त लिहीलय.
**
या कातळ टप्प्यातच पुर्व बाजुला एक गुहा आहे. या गुहेत ७-८ जणांना सहजपणे रहाता येईल.
ह्याच्याविषयी अजून काही माहिती​ आहे..कशा निर्माण झाल्या या..
मस्त कोकणदिवा.. अफलातून

अभिजीत अवलिया's picture

16 Aug 2020 - 12:10 pm | अभिजीत अवलिया

सुंदर आहे.

बेकार तरुण's picture

16 Aug 2020 - 12:15 pm | बेकार तरुण

नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख....

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Aug 2020 - 4:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद दुर्गविहारी!!
जराशा अपरिचित किल्ल्याची मस्त भटकंती आणि माहिती लिहिल्याबद्दल. नेमक्या वर्णना बरोबरच कुठुन आणि कसे पोचावे वगैरे तपशील छान दिलेले असल्याने प्रत्यक्ष जाउन बघण्याची इच्छा झाली. करोनाचा प्रभाव कमी झाला की हा ट्रेक करणारच.

बादवे--सुमार,रसाळ,महिपत दुर्गत्रयीने सुद्धा डोक्यात कधीपासुन ठाण मांडले आहे. त्याबद्दल मिपावर काही माहिती आहे का?

स्वच्छंदी_मनोज's picture

19 Aug 2020 - 8:02 pm | स्वच्छंदी_मनोज

तुम्हाला खरड टाकली आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Aug 2020 - 2:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद

वा! खूप जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. कावल्या-बावल्या खिंडीतील ती लढाई मात्र माहीत नव्हती. आता पुन्हा एकदा इथे जाऊन यावे लागणार. घोळ गावी खाल्लेल्या नाचणीच्या भाकऱ्या आणि पिठल्याची चव अद्याप जिभेवर रेंगाळते आहे.

दुर्गविहारी's picture

28 Aug 2020 - 8:01 pm | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांना आणि वाचकांना मनापासून धन्यवाद._/\_