माझी रेल्वे यात्रा

मदनबाण's picture
मदनबाण in मिपा कलादालन
2 May 2015 - 1:48 pm

रेल्वे प्रवास... मला माझ्या लहानपणा पासुन हा प्रवास अत्यंत ओढ लावणारा,उत्कंठा वाढवणारा असा वाटत आला आहे... झुकझुक अगीन गाडी... लहानपणी कोळशाच्या इंधनावर चालणार्‍या गाड्या फार वेगळा प्रवासाचा अनुभव द्यायच्या... धूर,खिडकीतुन बाहेर पाहण्याचा प्रयत्न केल्यास डोळ्यात जाणारे बारीक कोळश्याचे कण ! आणि त्यामुळे डोळा लाल होउन पाणी यायचे... अश्या अनेक आणि अगणित आठवणी रेल्वे प्रवासाशी निगडीत आहेत. निरिक्षण करत प्रवास करणे ही माझी आवड आणि सवय सुद्धा आहे, त्यामुळे अनेक गोष्टी टिपण्यास,समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत होते.

आता डिझेल आणि इलेक्ट्रीक पॉवरवर धावणारी इंजिन्स आहेत... आणि यांच्या प्रवासातुन सुद्धा वेगळा आनंद मला मिळतोच ! :)
२०११ साली इंदुरला जाताना मी काही फोटो प्रवास करताना टिपले ते आज इथे देत आहे... तुम्हाला ते आवडली अशी अपेक्षा करतो. :)

सकाळी उठल्यावर रेल्वेच्या डब्यातुन फोटो काढण्यास सुरुवात केली, अर्थात पहिला फोटो रेल्वेच्या बोगीचा काढुन मग मी इतर फोटो काढण्यास सुरुवात केली...
A1
अनेक वेगवेगळे लोक,वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या स्थानकांवर उतरणारे आणि चढणारे...कधी सहकुटुंब प्रवास करणारे,तर कधी एखादा एकटाच प्रवास करणारा व्यक्ती... मधेच येणारे विक्रेते,भेळवाले,भीक मागणारे तर चेकींगसाठी अचानक चक्कर टाकुन जाणारे रेल्वे सुरक्षा दल. प्रत्येक प्रवास एक वेगळा अनुभव देणारा असतो...या प्रवासात भेटणारे,गप्पा मारणारे,भांडणारे परत या प्रवासात एकमेकांना भेटणार सुद्धा नाहीत... तरी सुद्धा काही काळ प्रत्येक जण या प्रवासाच्या अनुभवातुन एकत्रपणे जात असतो...
मला प्रवासात रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुंनी दिसणार्‍या अनेक गोष्टी पहायला फार आवडतात... शेत, रस्ते, नद्या, पूल आणि बरंच काही.
F1
वेगवेगळ्या पद्धतीने नांगरलेली, नुकतीच कापणी झालेली, हिरवीगार, मधेच एखादे झाड असणारी, भाजणी झालेली, एखादा मळा असलेली असे अनेक प्रकार या पळत्या प्रवास पहायला मिळतात.
F2
F3
F4
एकदा आमच्या बरोबर वाडीला बाबांचे शर्मा नावाचे त्यांचे डॉ.मित्र आले होते... माझ्या बरोबर दरवाज उभे राहुन समोरुन वेगात जाणारी हिरवळ आणि उसाची शेतं पाहुन त्यांनी ओ गॉड ब्युटिफुल ही एक इंग्रजी कविता म्हंटली होती... ती कविता अश्या प्रवासात शेतं आणि हिरवळ पाहिली की मला आठवुन जाते.
या दॄष्यांमधे गाडीच्या वेगा प्रमाणेच सातत्याने बदल होत असतो... कधी ओढे कधी नाले कधी घरे तर कधी अगदी वीट भट्ट्या सुद्धा दॄष्टी पथास पडतात...
F5
या गोष्टीं बरोबरच नजरेस पडतात ते म्हणजे वेगवेगळे टॉवर... कधी विजेचे तर कधी कुठलेसे मोबाइल टॉवर... ते या रेल्वेतुन जितक्या वेगाने मागे पळताना दिसतात तितकेच ते मनाला भावतात देखील.
F6
F7
F8
F9
रेल्वे ट्रॅकच्या बाजुने अनेकदा छोटी वाहतुक, पायवाटा आणि त्यातुन प्रवास करणारी माणसे,गुरे आणि वाहने सगळच कसं गमतीदार वाटतं... सकाळी सकाळी अशीच कामावर निघालेली ही मंडळी तर पहा...
F10
F11
F12
रेल्वेचे पुढ्चे इंजीन आणि रेल्वेचा शेवटचा डबा एखादा वळवणावर आपल्या नजरेस पडतो...
F13
F14
मधेच एखादा लाईनमन त्यांचे काम इमानेइतबारे करताना नजरेस पडतो... एक वाहतुक व्यवस्था आणि त्याच्यावर निर्भर असणारे लाखो करोडो लोक !
F15
रेल्वे क्रॉसिंग... इंजिन हे क्रॉसिंग जवळ येण्या आधीच विशिष्ठ प्रकारे हॉर्न वाजवुन गाडी येत असल्याची वर्दी देतात... अश्याच एका रेल्वे क्रॉसिंगला धूळ उडवत जाणारी आमची एक्सप्रेस...
F16
आता वेगवेगळी स्टेशन्स मार्गात येतात त्यांचा माहोल पाहुया.... धुक्यात वाट काढत स्टेशनवर पोहचताना अगदी असेच दिसते... रेल्वेची वाट पाहणारी प्रवांशांपासुन हमाला पर्यंत सर्व मंडळी लगेच लगबगीला लागतात, स्टेशनवर गाडीच्या घोषणा सुरु होतात...
F17
काही फलाटांवर अगदी सन्नाटा असतो तर काही फलाटांच्या दुसर्‍या बाजुला मालवाहतुकीचा फलाट असतो... कधी एखादी मालगाडी तिथे थांबलेली दिसते तर कधी पाठीवर सिमेंट किंवा धान्याची पोती लादुन नेणारे मजूर दिसतात.
F18
F19
स्टेशन आले... स्टेशन आले...
F20
F21
गाडी थांबली... मग लक्षात आले की दुसर्‍या बाजुनी अजुन एक गाडी येत आहे...मग पटकन दुसर्‍या दरवाजात गेलो.
F22
F23
आख्खे इंजिन एकाच फ्रेम मधे घेण्याचा हा एक प्रयत्न... पॉइंट अँड शूट कॅमेरा मधे झूम-इन आणि आउट करताना एक प्रॉब्लेम होतो...तो म्हणजे आपल्याला हवे तितके झूम हव्या त्या क्षणी करणे कठीण असते...कारण ही मूव्हमेंट कॅमेरा ठरवत असतो...पण या क्षणी हे करणे बर्‍यापैकी जमले मला.
F24
स्टेशनवरुन २ गाड्या बाहेर पडताना दिसत आहेत... या गाड्या एकमेकांना एकाच दिशेने समानांतर धावतील असे मला वाटले नव्हते, पण एक आगळा वेगळा नजारा मात्र यामुळे मला टिपता आला.
F25
F26
F27
इतका वेळ ट्रेन मधुन काढलेले फोटो पाहिलेत... आता रेल्वे ट्रॅकवरुन काढलेले फोटो पाहुया...
रेल्वे क्रॉसिंगवरुन रेल्वे मार्ग कसा दिसतो बरे ?
F28
रेल्वेच्या रुळावर कॅमेरा ठेवला आणि झोपुन हा व्हूव्ह पाहिला...
F29
मग गुढग्यांवर बसुन उजवीकडे सरळ समोर दिसणारा मार्ग टिपला... आता गाडी येणार याचा मला अंदाज आला.
F30
आता डाविकडे वळलो आणि दोन्ही ट्रॅकच्या मधे उभे राहुन एक व्हूव्ह घेतला...
F31
मग परत उजवीकडे वळलो, वरती गाडीचा अंदाज आला होता आता ती दॄष्टीक्षेत्रात आली.
F32
ही मालगाडी होती... जशी वेगाने आली तशीच ती निघुन सुद्धा गेली...
F33
F34

कॅमेरा :- निकॉन पी-१००
* फोटो प्रोसेस करुन कंप्रेस केले आहेत, कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.
{ हौशी प्रवासी फोटूग्राफर } ;)
मदनबाण.....

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

2 May 2015 - 2:00 pm | प्रचेतस

मस्त रे बाणा.

फोतो खूप छान आणि लिहिलंयस पण सुरेख.

कंजूस's picture

2 May 2015 - 2:12 pm | कंजूस

किती छान फोटो,लाइनमनचा तल्लीनतेने काम करतानाचा फोटो अगदी जमलाय आणि इथे ते हवाच. सर्व टॅावर आवडले .एका साध्या कॅम्राचा पूर्ण उपयोग केला आहे. रेल्वेतले प्रवासातले सर्व क्षण निसटते असतात आणि ते पकडलेत.

तुषार काळभोर's picture

2 May 2015 - 2:19 pm | तुषार काळभोर

२००८-२००९ मध्ये ११ महिने चेन्नैला राहिल्यामुळे, दर महिन्याला एकदा पुण्याला यायचो आणि परत जायचो. पुण्यातनं संध्याकाळी ६.१० ची चेन्नै एक्स्प्रेस्स पकडायची. येताना चेन्नैच्या सेंट्रलवरून मुंबई एक्स्प्रेस्स पकडायची. असेच आणि याच गोष्टी पाहयचो. वेगवेगळे विचार यायचे. रेल्वेतनं बाहेर जी माणसे क्षणार्धासाठी दिसायची, त्यंच्याबद्दल (क्षणभरच) कुतुहल वाटायचे. त्याच्यात एक असे असते की, इतक्या दूरच्या प्रदेशात क्षणासाठी दिसणारी ही माणसे परत कधीच दिसणार नसतात.

प्रवासात काही फरक जाणवायचे तर काही सारखेपणा दिसत राहायचा. पुण्यातून निघताना वडापाववाले फिरायचे. सोलापूरच्या जवळ गेल्यावर डाळवडावाले. कर्नाटकच्या पुढे इडली-मेदूवडा.. आणखी एक फ्फरक जाणवायचा तो देवळांमध्ये, खरंतर देवळांच्या कळसांमध्ये. परत येताना स्टेशनवरचे फलक कन्नड-इंग्लिश-हिन्दी ऐवजी मराठी-इंग्लिश-हिन्दी (मोहोळ-Mohol-मोहोल) असे दिसायला लागले, की लई भारी वाटायचं. 'आपल्या' घरी आल्यागत वाटायचं. त्याच वेळी इडलीवाले जाऊन डाळवडा अन वडापाववाले ऐकू यायचे. स्टेशनवर मराठी उद्घोषणा कानी पडायच्या. सोलापूरला बर्‍याचदा मोठा स्टॉप असायचा. तिथे आख्खी गाडी धुतली जायची.

माणसांमध्येपण फरक पडायचा. जाताना गाडीत अर्धी-एक मराठी माणसे असायची. त्यातली बरीच सोलापूरपर्यंत उतरायची. उरलेली रेणिगुंट्याला उतरायची. आणि बहुतेक चेन्नैला जाणारा मी एकटा मराठी असायचो. मग प्रत येताना उलटा क्रम.

सतिश गावडे's picture

2 May 2015 - 2:30 pm | सतिश गावडे

मस्त प्रकाशचित्रे !!!

हे सारे फोटो धावत्या गाडीतून काढले आहेत का? असल्यास चालू गाडीतून फोटो काढल्यास त्यातील मोशन ब्लर कसा टाळतात?

हे सारे फोटो धावत्या गाडीतून काढले आहेत का? असल्यास चालू गाडीतून फोटो काढल्यास त्यातील मोशन ब्लर कसा टाळतात?
हो हे धावत्या गाडीतुनच काढले आहेत...फोकस लॉक झाल्या झाल्याच पटकन क्लीक करणे हेच काय ते कौशल्य ! ;) तसेही वरील काही फोटों मधे मोशन ब्लर आहेच... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुलुप लावून सोडा... ;) { टपाल }

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2015 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

Anti-shake किंवा Super SteadyShot सिस्टिम असलेल्या कॅमेर्‍याने टार्गेट फार जवळ (साधारणपणे ५-७ मीटरपेक्षा कमी) नसेल तर चालत्या चारचाकीतून १००-१२० किमी/तास वेगाने जातानासुद्धा छान प्रचि काढता येतात.

Point and shoot कॅमेर्‍यांत बर्‍याचदा शटर बटन अर्धवट दाबून फोकस लॉक करायची व्यवस्था असते, नंतर बोट वर न उचलता तसेच खाली दाबले की लॉक्ड-फोकस अवस्थेत शटर उघडतो आणि प्रचि स्पष्ट येते.

नाखु's picture

2 May 2015 - 2:52 pm | नाखु

अगदी सफर घड(व)ली रेल्वे प्रवासाची नाहीतर आवर्जून असेही डोळे उघडे ठेऊन प्रवास करीत नाहीच आपण !

सफरनवाज
नाखु

पैसा's picture

2 May 2015 - 4:34 pm | पैसा

खूप छान लेख आणि फोटो!

क्लिंटन's picture

2 May 2015 - 5:26 pm | क्लिंटन

फोटू आवडले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2015 - 6:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

रेल्वे सफरीचे मस्त चित्रिकरण ! त्यावरचे निवेदनही खुमासदार आहे !!

रोचकता आणि सौंदर्य आजूबाजूला पसरलेले असते... नजर असली तर ते दिसते याचे हे उत्तम उदाहरण !!!

एक एकटा एकटाच's picture

2 May 2015 - 9:20 pm | एक एकटा एकटाच

फ़ोटो आणि त्याचे संदर्भ ही आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2015 - 10:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाना, सध्या फक्त फोटो पाहिलेत येऊ दे अजुन.

-दिलीप बिरुटे

नूतन सावंत's picture

2 May 2015 - 10:19 pm | नूतन सावंत

कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेक्सने जाताना जयासिंग्पुरच्या पुढे शेतात मोर पाहिल्याचे आठवते.बाकी लेख आणि प्रचि सुरेखच.

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2015 - 11:21 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त मस्त मस्त!!!

calling चौरा काका!

सुबोध खरे's picture

3 May 2015 - 12:18 am | सुबोध खरे

सर्वसाधारणपणे रेल्वे बद्दल आकर्षण नसलेला माणूस सापडत नाही. पण माझ्यासारखे फारच जास्त आकर्षण असलेले लोक खूप जास्त नाहीत. सुदैवाने लष्करात असल्याने मी रेल्वेचा प्रवास भरपूर केला आहे. त्यातून रेल्वे इंजिनातून प्रवास करणे हा एक वेगळाच अनुभव आहे ब्रॉड गेज मीटर गेज आणि नैरो गेज च्या कोळशाच्या आणि डीझेल इंजिनात आणि ब्रॉड गेज च्या इलेक्ट्रिक इंजिनात बसूनहि प्रवास केला आहे. आजही रेल्वेने प्रवास करणे हे फार आनंददायी वाटते. माझ्यापेक्षा जास्त रेल्वे वेडे बरेच आहेत आणि त्यांनी एक क्लब स्थापन केलेला आहे http://www.irfca.org/ हे गुगलून पहा भारतीय रेल्वेची इत्यंभूत माहिती येथे मिळू शकेल. WDM २ इंजिन किंवा WAM ४ A (वर फोटो मध्ये असलेली इंजिने) म्हणजे काय? BOXN व्यागन म्हणजे काय? या सर्व गोष्टींची माहिती रेल्वेतून केलेला प्रवास त्याचे असंख्य फोटो यातून एक वेगळा भारत उलगडत येतो.एकदा भेट देऊन तर पहा

फारएन्ड's picture

3 May 2015 - 9:05 am | फारएन्ड

इंजिनातून प्रवास करण्याचे पहिल्यापासून आहे. जमल्यास त्याबद्दल लिहावे. मलाही लहानपणापासून प्रचंड वेड आहे रेल्वेचे.

ती साईट अनेक वेळा बघितली आहे. जबरी फोटो आहेत तेथे. पूर्वी मुंबई-पुणे लाईन वर असलेली डीसी ट्रॅक्शन वाली इंजिने तेथे पाहिल्यावर एकदम नॉस्टॅल्जिया आला होता. लहानपणी अनेक वेळा (आधी जनता एक्स व नंतर) सिंहगड, डेक्कन वगैरे नी त्याच इंजिनाने प्रवास केलेला आहे.

ही इंजिने
http://www.irfca.org/gallery/Locos/Electric/wcm1_to_6/wcm5_pune_trip_she...

चालत्या आगगाडीतून बाहेर वाकू नका.

पैसा's picture

3 May 2015 - 8:39 am | पैसा

खरे आहे. खूपच धोक्याचे आहे.

स्पंदना's picture

3 May 2015 - 2:35 am | स्पंदना

कूऽऽऽऊऽऽऽऊ!!

जुइ's picture

3 May 2015 - 4:58 am | जुइ

चालत्या गाडीत काढून देखील खूप सुस्पष्ट आले आहेत.

कंजूस's picture

3 May 2015 - 8:35 am | कंजूस

चालत्या गाडीतून--
सुचना चांगली आहे. काही इलेक्ट्रीक मार्गांवर खासकरून प॰रे॰ ,मुंबई -दिल्ली इ॰ तारेंचे आधार खांब फारच डब्यांजवळ येतात इकडे उत्साहाच्या भरात कैम्रा आपटू शकतो अथवा पडू शकतो याबाबतीत दक्षिण रे बरी कारण डिजलचे ट्रैक आहेत खांबांचा प्रश्न नाही. लोंढा ,अलमट्टी ,नीरा वाल्हा येथे गाडी फार सुरेख वळणे घेत सावकाश जाते फोटोला छान शिवाय हवा कोरडी.

श्रीरंग_जोशी's picture

3 May 2015 - 8:51 am | श्रीरंग_जोशी

रेल्वेप्रवासाविषयीचे विचार अन फोटोज खूप आवडले. मलाही रेल्वेप्रवास खूप आवडतो. बसपेक्षा खूप निवांत असतो. लांबचा प्रवास करताना स्टेशन्सची रचना सारखी भासत असली तरी माणसं, खाद्यपदार्थ, बोलीभाषा बदलत राहतात.

यानिमित्ताने गेल्या वर्षी मी खफवर लिहिलेले एक स्फुट इथे डकवतो.

~ जरासे स्मरणरंजन ~

गेल्या जून महिन्यामध्ये मी भारतवारी केली. यावेळी अनेक वर्षांनी मी माझ्या आवडत्या महाराष्ट्र एक्सप्रेसने पुणे – अकोला प्रवास केला. या ट्रेनबरोबर माझा जुना ऋणानुबंध आहे. बारामतीला शिकत असताना सत्रांमधील व दिवाळीच्या सुटीमध्ये घरी जायला महाराष्ट्र एक्सप्रेस फार सोयीची होती.

तर यावेळी ट्रेन सकाळी जळगावला पोचल्यावर मी अप्पर बर्थवरून खाली उतरलो व खिडकी शेजारी बसलो. थोड्या वेळाने भुसावळ स्थानक आल्यावर फलाटावरील विक्रेते नजरेस पडले. माझे तिकिट एसीचे असल्याने अशा विक्रेत्यांना माझ्या बोगीच्या आत प्रवेश नव्हता. पण या दृश्यामुळे माझ्या स्मृतीपटलावर एक जुनी आठवण परतली. दहा बारा वर्षांपूर्वी दरवेळी घरी जाताना भुसावळ स्थानकानंतर एका अंध विक्रेत्याशी हमखास गाठ पडायची. अतिशय सचोटीने तो आपल्या वस्तू विकायचा. त्याच्या चेहऱ्यावर अगतिकतेचे भाव कधीही दिसले नाहीत. योगायोगाने दरवेळी मी त्याच्याकडून काही ना काही खरेदी करायचो. पाच दहा रुपयांचेच का होईना नक्की विकत घ्यायचो.

दुसऱ्या तिसऱ्या वेळेपासून तो मला ओळखू लागला. मी विद्यार्थी आहे हे कळल्यावर दर वेळी न चुकता तो मला अभ्यासासाठी शुभेच्छा देत असे. शेवटच्या सुटीच्या वेळी माझी एका नावाजलेल्या कंपनीमध्ये निवड झाली आहे हे सांगितल्यावर त्याला फार आनंद झाला होता.

त्यानंतर त्याच्याशी माझी पुन्हा कधीही गाठ पडली नाही. अन ट्रेनचा फारसा प्रवास न झाल्याने त्याची फारशी आठवणही आली नाही. परंतु यंदाच्या सुटीतील ट्रेनच्या प्रवासामुळे मनाच्या कोपऱ्यात खोलवर दडून बसलेली त्याच्याबद्दलची स्मृती परत वर आली. त्याची प्रत्यक्ष भेट होण्याचा योग जरी आला नाही तरी त्याची आठवण होणे हेच मला सुखावणारे होते. तो जिथे कुठे असेल तिथे तो बरा असावा अशी मी मनातल्या मनात प्रार्थना केली. अन या आठवणीबाबत देवाचे आभार मानले.

फारएन्ड's picture

3 May 2015 - 9:01 am | फारएन्ड

मस्त फोटो व वर्णन! रेल्वे फॅन्स मधे मलाही धरा :)

फोटू आवडले व जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
यापूर्वीही एकदा तू ट्रेनमधून वाकून फोटू काढले होतेस व त्यावर आम्ही काही मिपाकर रागावलो होतो. त्यावर तू इतका जास्तही वाकला नव्हतास असे तुझे म्हणणे होते.
अजूनही तुझ्यात सुधारणा झालेली नाही. यावर वाद घालायची खुमखुमी असेल तर व्यनि करणे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 May 2015 - 12:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

रेलवे चा प्रवास खरेच मस्त असतो, सहसा मला पोस्टिंगहुन घरी पोचायला रेल्वेच कामी येते, इंजन चे आकर्षण अनिवार असते अगदी लहान पोर ते आजोबा लोक साऱ्यांना मस्त प्रवास असतो, अलाहाबाद ते जबलपुर रूट वर मैहर हे शारदा मातेचे जागृत गडस्थान आहे तो भाग बघणे फारच मस्त वाटते, एम्पी मधुन होणारा प्रवास हा "ट्रैंक्विल" असतो फार संध्याकाळी जोधपुर सेक्शन मधे किंवा बीकानेर रूट वर प्रवास करणे जगावेगळा अनुभव असतो, रांगड़े रौद्र सौंदर्य आवडणाऱ्या लोकांसाठी मेजवानी असते ती, संध्याकाळी रेल्वेच्या दारात उभे राहयचे, मैलोंमैल पसरलेले अथांग वाळवंट वाऱ्यात घरंगळत जाणारी सावरीची झुडपे त्या विशाल वाळवंटाच्या एका कोपर्यात क्षितिजावर अस्ताचलाला जाणारा सूर्य तंद्री लागते नुसती!!!

@ सर्व प्रतिसादकांना मनापासुन धन्स ! :)
आपले मोलाचे अनुभव कथन करणार्‍या सर्व मंडळींचे लयं लयं आभार... बाकीच्यांचे ही रेल्वे संबंधी अनुभव वाचावयास नक्कीच आवडेल. :)
@ डॉक :- लिंक बद्धल धन्यवाद. मला या साईट बद्धल माहित नव्हते... एक चक्कर टाकुन आलो तिकडे, मस्त आहे साईट. :)
@आदूबाळ / पै तै...
मी योग्य काळजी घेउनच फोटू काढतो...पण यापुढे अधिक काळजी घेइन. :)
@ आज्जे :-
देवी कॄपया क्रोधाचा त्याग करुन आपली "कॄपादॄष्टी' मज पामरावर अशीच ठेवावी. :)
अजूनही तुझ्यात सुधारणा झालेली नाही.
हो. हे मात्र खरं आहे, माझ्यात याबाबतीत काहीच सुधारणा झालेली नाहीये ! ;)
यावर वाद घालायची खुमखुमी असेल तर व्यनि करणे.
नारायण ! नारायण ! देवी, वाद आणी आपणाशी ? आपल्याशी तर वार्तालाभ करणे
ही बर्‍याच काळात झालेले नाही, तेव्हा वाद घालण्याची वेळ तरी कशी येणार ? सांगा तर... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shakalaka Baby... ;)

दिपक.कुवेत's picture

3 May 2015 - 6:53 pm | दिपक.कुवेत

फारच छान आलेत सगळे फोटु.

चाणक्य's picture

3 May 2015 - 11:27 pm | चाणक्य

मस्त फटु रे बाणा.....रेल्वेचा प्रवास खरच खूप भारी असतो

हर्शरन्ग's picture

10 May 2015 - 8:29 pm | हर्शरन्ग

छान आहेत फोटो…. आणि 'स्टेशन आले स्टेशन आले' हा फोटो तर अप्रतिम आहे

पाषाणभेद's picture

10 May 2015 - 10:17 pm | पाषाणभेद

फारच छान फोटो अन वर्णनही

अनिरुद्ध प's picture

11 May 2015 - 10:36 pm | अनिरुद्ध प

सुंदर प्र. चि.

@हर्शरन्ग ,दफोराव , अनिरुद्ध प
ठांकु.

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.

मुक्त विहारि's picture

12 May 2015 - 7:57 pm | मुक्त विहारि

आणि तितकेच सुंदर प्रतिसाद. विशेषतः रंगा शेठ यांचा.

कुमार१'s picture

16 Jul 2020 - 10:44 am | कुमार१

किती छान फोटो !
झकास .

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2020 - 12:35 pm | चौथा कोनाडा

सुंदर फोटो, सुंदर रेल्वे प्रवास ! मदनबाण +१

मलाही माझे मोजके चार-आठ रेल्वे प्रवास आठवले !

मदनबाण's picture

16 Jul 2020 - 12:57 pm | मदनबाण

@ कुमार१ / चौथा कोनाडा
धन्यवाद...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

अनिंद्य's picture

17 Jul 2020 - 3:58 pm | अनिंद्य

हे वाचायचे राहिले होते, 'जाहिरातीमुळे' इकडे आलो :-) फोटो खास आहेत आणि निवेदनही.

रेल्वे प्रवासात वाटेतली शेते, रोवणी-कापणी-मळणी बघणे मलाही फार आवडते.

एक फोटो देवासचा आहे, देवास तर कुमार गंधर्वांचे गाव !

मदनबाण's picture

17 Jul 2020 - 4:51 pm | मदनबाण

@अनिंद्य
धन्यवाद... जाहिरातीचा फायदा झाला म्हटायचे ! :)

एक फोटो देवासचा आहे, देवास तर कुमार गंधर्वांचे गाव !
होय, त्यांची निर्गुण भजनं मला आवडतात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Mera Pyar Amar... :- Asli Naqli

मदनबाण,

मस्त वर्णन व प्रचि आलीत. निवांतपणे केलेला रेल्वे प्रवास माझ्याही आवडीचा.

तुमच्या गाडीला डिझेल गतीकोष ( = इंजिन) जोडलं होतं का? वर विजेच्या तारा दिसताहेत तरीपण खाली डिझेलचा गतीकोष कशासाठी, अशी शंका आली.

आ.न.,
-गा.पै.

पुन्हा पुन्हा पाहिलं तरी कंटाळा येत नाही.

मदनबाण's picture

19 Jul 2020 - 9:15 am | मदनबाण

@ गापै

तुमच्या गाडीला डिझेल गतीकोष ( = इंजिन) जोडलं होतं का? वर विजेच्या तारा दिसताहेत तरीपण खाली डिझेलचा गतीकोष कशासाठी, अशी शंका आली.
अनेक ठिकाणी विजेचा तारा असल्या तरी त्यात वीज नसणे, तसेच ट्रॅक्शन सबस्टेशन्सची [ traction substation (TSS) ] उपलबधता जी इलेक्ट्रीक लाइन्ससाठी गरजेची असते. [ या विषयावर अधिक तांत्रिक माहिती इथे मिळेल :- Railway Traction System: Current Status and Apportunities ]
मोदी सरकार ने १००% इलेक्ट्रीक इंजिन चे उद्दिष्ठ्य ठेवले असल्याच्या बातम्या मागच्या काही वर्षात आल्या होत्या परंतु असे करणे योग्य नाही असे मला व्यक्तिगत रित्या वाटते, कारण पॉवर फेल्युअर, ओव्हर हेड वायर मेंटेनन्स / ग्रीड फेल्युअर मध्ये त्या त्या भागातील रेल्वे वाहतुक पूर्णपणे ठप्प होउ शकते, त्यामुळे डिझेल इंजिन्स देखील धावत राहणे हे अत्यंत गरजेचे आहे.

@ कंजूस मामा
धन्यवाद...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Moh Moh Ke Dhaage... :- Dum Laga Ke Haisha

गामा पैलवान's picture

19 Jul 2020 - 12:43 pm | गामा पैलवान

माहितीबद्दल धन्यवाद मदनबाण! :-)
आ.न.,
-गा.पै.