महर्षी गीता - भगवान रमण महर्षी कृत गीता-सार

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
22 May 2020 - 11:08 am

एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी भगवद्गीता १०.२० या श्लोकाचा उल्लेख केला होता:

जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात
(श्री स्वामी स्वरूपानंद कृत श्रीमत भावार्थ गीता १०.२०)

पुढे महर्षींनी गीता-सार सांगण्यासाठी भगवद्गीतेतल्या निवडक ४२ श्लोकांची सुसंगत आणि क्रमवार मांडणीदेखील केली (त्यात हा श्लोक चौथ्या क्रमांकावर येतो). परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीमत भावार्थ गीतेतील श्लोक त्याच क्रमाने घेतले, तर महर्षींनी सुचवलेले गीता-सार असे होईलः

(1)
संजय सांगे धृतराष्ट्राते पार्थ तसा उद्वेगे
मान खालती घालुनी रथी बसला होता मागे
भरूनी आले नयन त्यातुनी घळघळ वाहे नीर
कारूण्ये अति दीन जाहला म्हणुनी सुटला धीर
(भावार्थ गीता २.१)

(2)
वदे श्री-पति, "क्षेत्र बोलती पार्था या देहाते
ह्याते जाणे तया बोलती 'क्षेत्रज्ञ' असे ज्ञाते"
(भावार्थ गीता १३.१)

(3)
सर्व क्षेत्री मी चि किरीटी, क्षेत्रज्ञ वसे जाण
क्षेत्र-क्षेत्रज्ञासी जाणणे ते चि मानितो ज्ञान
(भावार्थ गीता १३.२)

(4)
जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात
(भावार्थ गीता १०.२०)

(5)
दिवस उगवला जसा मावळे अस्तापाठी उदय
रिते चि भरते भरले सरते हा सृष्टीचा न्याय!
उपजे ते ते विनाश पावे नाश पावले निपजे
अटळ गोष्ट ही म्हणुनि अर्जुना, तुज हा शोक न साजे
(भावार्थ गीता २.२७)

(6)
होउनि गेला होणार पुढे असा न ह्याते जाण
जन्म न पावे न निमे अज हा शाश्वत नित्य पुराण
जाण विनाशी देह जाय परि भंग नसे आत्म्याते
शस्त्रे छाया तोडिली तरी काय रूते अंगाते?
(भावार्थ गीता २.२०)

(7)
न तुटे न जळे न भिजे न सुके असे सर्व-गत नित्य
तेवि स्थिर हा अचल सनातन हा अव्यक्त अचिंत्य
(भावार्थ गीता २.२४)

(8)
ते अविनाशी जाण जे असे अखिल जगा व्यापोनी
विनाश अव्यय तत्वाचा त्या करू शकेना कोणी
(भावार्थ गीता २.१७)

(9)
जे नाही ते असेल कुठुनी अभाव अस्तित्वाचा?
तत्वज्ञांनी निर्णय केला ह्या दोहींचा साचा
जसे वेगळे करी मिसळले राजहंस पय-पाणी
तद्वत विश्वी गुप्त सार ते शोधी तत्वज्ञानी
सुवर्ण आणिक हीण निवडिती बुद्धिमंत तावून
उपाधीतुनी तेवि काढिती संत सार शोधून
की पाखडुनी भूस टाकुनी केवळ दाणा घेती
तैसे ज्ञानी माया त्यजुनी ब्रह्मपदी स्थिर होती
(भावार्थ गीता २.१६)

(10)
सूक्ष्म म्हणूनि ते लिप्त न होते जसे सर्वगत गगन
भरला देही सर्वत्र तसा अलिप्त आत्मा जाण
(भावार्थ गीता १३.३२)

(11)
पद अविनाशी स्वयंप्रकाशी तेजोमय ते पूर्ण
प्रकाशित तया करू न शकती सूर्य चंद्र वा अग्न
पावता जिथे पुन्हा न परते स्वर्ग-नरक-संसारी
जीव समरसे ते चि मम असे परं-धाम अवधारी
(भावार्थ गीता १५.६)

(12)
विश्वी भरले विश्व जाहले जरी ते चि संपूर्ण
तरी लोपता विश्व तत्वता ते न लोपते जाण!
त्या अव्यक्ताक्षर तत्वाते 'परम गति' असे म्हणती
पावता चि मत्परंधाम ते जन्म-मरण ना पुढति
(भावार्थ गीता ८.२१)

(13)
सांडुनि जाती घन वर्षांती जसे स्वभावे गगन
तेवि जयाते सोडुनि गेले मोह आणि अभिमान
पदार्थमात्री अनासक्त जे अध्यात्मी तल्लीन
नितांत निर्मळ बुद्धि जयांची नसे वासनाधीन
सुख दु:खादि द्वंद्व-बंध ते आकळिती न जयांते
सहजे ज्ञाते पावती चि ते अव्यय परम-पदाते
(भावार्थ गीता १५.५)

(14)
विषय-विलासामाजी चि पिसा होउनि जो साचार
शास्त्र-विधीते त्यजुनी येथे करितो स्वैराचार
न च कल्पांती ती परम गती तया लाभते जाण
सुख हि न च मिळे मग ते कुठले तया ब्रह्म-निर्वाण!
(भावार्थ गीता १६.२३)

(15)
तरी अर्जुना, एक चि नाना नाशिवंत भूतांत
सम अविनाशी ईश्वर पाहे तो ज्ञाता निभ्रांत
(भावार्थ गीता १३.२७)

(16)
मिळे सागरा अखंड-धारा जशी जान्हवी जगती
तसा भक्त तो मला भेटतो अनन्य-भावे अंती
मिळता अनली इंधन जैसे अग्निरूप ते होते
साक्षात्कारी तेवि संपते देव-भक्त हे नाते
मजसी मिळता नुरे तत्वता 'मी-तो' ऐसे द्वैत
म्हणुनि राहे मी चि होऊनी मज माजी चि निवांत!
अनन्य-भक्ति करी भारता, तो चि तत्वता माते
असा जाणतो आणि पाहतो समरस होतो तेथे
(भावार्थ गीता ११.५४)

(17)
स्वभाव ज्याचा जसा तयाची श्रद्धा हि तशी मानी
श्रद्धा धरितो तसा चि होतो श्रद्धा-मय हा प्राणी
(भावार्थ गीता १७.३)

(18)
ब्रह्म-निष्ठ तो ज्ञान पावतो तत्पर संयम-शील
परम शांति मग ती मिळवाया तया न लागे वेळ
(भावार्थ गीता ४.३९)

(19)
सदा रंगले नित्य जे भले प्रेमे माझ्या ठायी
ज्ञान-भक्ति-सुख देवोनि तया निज-धामाते नेई
(भावार्थ गीता १०.१०)

(20)
जाण अर्जुना, करूनी करूणा स्वये प्रकटुनी हृदयी
तया दावितो तेजस्वी तो ज्ञान-दीप लवलाही
प्रकाश होता नुरे तत्वता भ्रांति-रूप अंधार
मद्भक्ताला तदा संपला जन्म-मरण-संसार
(भावार्थ गीता १०.११)

(21)
आत्म-ज्ञाने असे जयांचे हरपले अज्ञान
तया प्रकटवी पर-तत्वाते रवि-सम ते चि ज्ञान
जशी उजळता पूर्व दिशा ती दिशा उजळती दाही
आत्मानुभवे तया स्वभावे विश्वी न दुजे काही
जिथे पहावे तिथे दिसावे आत्म-रूप जगतात
आत्मरूपता अशी प्रकटता रंगुनि जाती त्यात
(भावार्थ गीता ५.१६)

(22)
थोर इंद्रिये त्याहुनी मन ते थोर त्याहुनी बुद्धी
त्या बुद्धीहुनी परमात्म जो तो चि थोर निरूपाधि
(भावार्थ गीता ३.४२)

(23)
त्या आत्म्याते जाणुनि राहे आत्म-बळे स्थिर तेथे
आणि संहरी अजिंक्य ऐशा काम-रूप शत्रुते
(भावार्थ गीता ३.४३)

(24)
प्रदीप्त अग्नि जसा जाळुनी टाकी काष्ठे पूर्ण
ज्ञानाग्नि तसा भस्मसात करी सर्व हि कर्मे जाण
(भावार्थ गीता ४.३७)

(25)
नसे अपेक्षा फली जयाची सकल हि कर्मे करिता
'मी कर्ता, हे करीन' न शिवे संकल्प असा चित्ता
ज्ञानाग्निने अशी जयाची कर्मे जळुनी जाती
सुजाण नर ते त्या पुरूषाते 'पंडित' ऐसे म्हणती
(भावार्थ गीता ४.१९)

(26)
आत्म-ज्ञानी निष्काम यती स्वाधीन अंतःकरण
क्रोध-रहित जे सर्वत्र तया असे ब्रह्म-निर्वाण
योगी-जन तो कस पावतो ह्या देही चि ब्रह्म
ऐक भारता, तुज सांगतसे संक्षेपे ते वर्म
(भावार्थ गीता ५.२६)

(27)
मग ह़ळूहळू उपरत व्हावे धैर्यऱ्युक्त बुद्धीने
आत्म-स्थित मन करूनी काही नच चिंतावे त्याने
(भावार्थ गीता ६.२५)

(28)
ज्या ज्या विषयाकडे धावते मन चंचल अस्थिर ते
तेथतेथुनी झणि आवरूनी स्व-वश करावे त्याते
जरी स्वभावे स्थिर न च होई तरी सुखे सोडावे
आणि पुनरपि तसे स्व-रूपी हळूचि परतू द्यावे
सवय लागता अशी सहज ते आत्म-रूपी रंगेल
आत्म-रूप ते होता स्थिरता कधी न मग भंगेल
(भावार्थ गीता ६.२६)

(29)
जये साधिला मनोलय असा पवनद्वारा गगनी
मोक्ष लक्षुनि तृष्णा-भीति-क्रोधरहित होवोनी
मन-बुद्धीसह इंद्रिय-वृत्ती रिगता चि महा-शून्यी
तो चि पावतो संयमी मुनी जीवन्मुक्ती निदानी!
(भावार्थ गीता ५.२८)

(30)
आत्म्याठायी भूतमात्र ते सकळा भूती आत्मा
सर्वत्र चि हे समत्व पाहे असे योगऱ्युक्तात्मा
(भावार्थ गीता ६.२९)

(31)
नित्य अंतरी चिंतन करूनी उपासिती जे भक्त
अनन्य-भावे अखंड माते होउनिया संयुक्त
निज-सायुज्या नेउनी तया अथवा भक्ति-प्रेम
देउनी असा मी चि तयांचा वाहे योग-क्षेम!
(भावार्थ गीता ९.२२)

(32)
नित्य जोडला एकनिष्ठ तो असे श्रेष्ठ सर्वात
मी अत्यंत प्रिय त्यासि तसा तो प्रिय मज अत्यंत!
अनन्य सहजे निरंतर भजे मी चि होउनी माते
असुनी देही आत्म-रूप तो त्यजी देह-भावाते
(भावार्थ गीता ७.१७)

(33)
योगी ज्ञानी भक्त भला तो बहु जन्मांती शरण
मज सर्वस्वी येउनि चुकवी जन्म आणखी मरण!
पाहे अथवा निवांत राहे तरी तयाते मीच
सबाह्य-अभ्यंतरी दिसतसे नसे दुजे काहीच
आत्मानुभवे जग चि आघवे वासुदेव-मय झाले
बहु दुर्लभ तो महंत विश्वी विश्व होउनी खे़ळे!
(भावार्थ गीता ७.१९)

(34)
सोडुनि नाना मन:कामना आत्म-तुष्ट जो राहे
आत्म-द्वारा, तया बोलती स्थित-प्रज्ञ तू पाहे
(भावार्थ गीता २.५५)

(35)
निष्कामत्वे जगी वावरे जो नि:स्पृह निरूपाधि
निरहंकारी निर्मम नर तो परम शांति संपादी
(भावार्थ गीता २.७१)

(36)
सर्वा भूती भगवंत असा भाव बाणला म्हणुनी
कवणाते तो नुबगे ज्याते तेवि नुबगती कोणी
विषय निमाला विश्वी झाला विश्व-रूप जो पाही
म्हणुनि जयाला चित्ती नुरला हर्ष-विषाद मुळी हि
जगती न दुजे ह्यास्तव सहजे निर्भय जो अक्रोधी
प्राणाहुनि तो प्रिय मज होतो पार्था सम्यग्बोधी!
(भावार्थ गीता १२.१५)

(37)
समान मानापमान मानी समान शत्रू-मित्र
निश्चल राहे विश्वी पाहे आत्म-रूप सर्वत्र
होता ब्रह्मावबोध कर्मारंभ खुंटला ज्याचा
जाण अर्जुना, तो चि त्रिगुणातीत बोलिला साचा
(भावार्थ गीता १४.२५)

(38)
परी रंगला आत्म-सुखी जो जया आत्म-संतृप्ती
आत्म्यात चि तो संतुष्ट तया कार्य उरे ना जगती
असुनि देही तया न राहे देह-धर्म-संबंध
म्हणुनि तयाचा कर्तव्याचा सुटला सहजे बंध
(भावार्थ गीता ३.१७)

(39)
कर्म तयाने केले अथवा न च केले ह्या जगती
तरि धनंजया, अ-संगा तया काय तयाची महती!
नसे तयाचा मोह गुंतला इथे भूत-मात्रात
देह विसरला अखंड रमला जो आत्मानंदात
परी अर्जुना, जोवरी मना भेटे ना हे ज्ञान
कर्म-साधना तोवरी जना उचित सर्वथा जाण
(भावार्थ गीता ३.१८)

(40)
आणि मिळे ते गोड मानितो जो निर्मत्सर झाला
सुख दु:खादि द्वन्द्वे ती ना स्पर्शू शकती ज्याला
मिळो यश तसे न मिळो तेथे असे सदा सम-भावे
जरी आचरे कर्म सकल तो कर्म-बंध न च पावे
(भावार्थ गीता ४.२२)

(41)
पार्था, पाहे ईश्वर राहे सर्व-भूतऱ्हृदयात
निज-मायेने तो चि खेळवी जगत्सुत्र निभ्रांत
घालुनी यंत्री माया-सूत्री तो परमेश नियंत्री
भूते सगळी जशी बाहुली सूत्र-धार कळसूत्री
(भावार्थ गीता १८.६१)

(42)
त्या हृदयस्था शरण सर्वथा जाई अर्जुना, भावे
जसे जान्हवी-जळ सर्वस्वी सागराकडे धावे
कृपा तयाची होता साची स्वानंदैकनिधान
पावशील तू परम शांतिचे दिव्य अव्यय स्थान
(भावार्थ गीता १८.६२)

भगवद्गीतेचे सारतत्व संक्षिप्त स्वरूपात ४२ निवडक श्लोकांमधून सांगून झाल्यावर फलश्रुती किंवा सांगता या स्वरूपात भगवान रमण महर्षींनी स्वतः एक श्लोक रचला, त्याचा भावानुवाद असा करता येईलः

ज्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असताना शाश्वत सत्याचा सहजतेने उपदेश केला, अर्जुनाच्या भवतापाचे लीलया निवारण केले, मानवी देहाच्या स्वरूपात अवतरलेल्या हे कृपासिंधू, तू आमचे रक्षण कर.

(संदर्भः https://ocoy.org/dharma-for-christians/sacred-texts/maharshi-gita/)

||श्रीकृष्णार्पणमस्तु||

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

22 May 2020 - 11:23 am | आनन्दा

मला गीता सार या अर्थाने बघायचे तर गीताई किंवा अठरा श्लोकी गीता जास्त भावते.. अन्य कोणत्याही रूपापेक्षा.

संजय क्षीरसागर's picture

22 May 2020 - 11:39 am | संजय क्षीरसागर

त्यातून निवडक काही काढणं त्याहून अवघडे

सांख्ययोगातले दोन श्लोक > नैनं च्छिंदंती शस्त्राणी आणि या निशा सर्व भूतानां, त्यातल्या त्यात बरे आहेत; म्हणजे साधकाला मार्गदर्शक ठरु शकतात.

जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात

हा सर्वोत्तम ष्लोक म्हणून निवडला गेला हे आश्चर्य आहे.

पहिली ओळ जरा तरी बरोबर आहे कारण ती काहीप्रमाणात का होईना सत्याच्या कालातीततेकडे निर्देश करते. पण दुसरी ओळ गंडली आहे. सत्य स्थानबद्ध नाही त्यामुळे हृदयाकडे निर्देश केवळ भावना जागृत करेल पण ती वस्तुस्थिती नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 May 2020 - 11:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले.

-दिलीप बिरुटे

राघव's picture

22 May 2020 - 3:38 pm | राघव

ब्लॉगवर वाचलेच होते.

तशी अनेकांनी अनेक भाषांतरे, अनुवाद केलेले आहेतच गीतेचे. आपापल्या परीने ते योग्यही असतीलच. पण अधिकारी व्यक्ती जेव्हा एखादं सुचवते ते खास असते.
भावार्थ दीपीका अशीच अतीव सुंदर. भावार्थ गीताही तशीच आहे.


ज्या ज्या विषयाकडे धावते मन चंचल अस्थिर ते
तेथतेथुनी झणि आवरूनी स्व-वश करावे त्याते
जरी स्वभावे स्थिर न च होई तरी सुखे सोडावे
आणि पुनरपि तसे स्व-रूपी हळूचि परतू द्यावे
सवय लागता अशी सहज ते आत्म-रूपी रंगेल
आत्म-रूप ते होता स्थिरता कधी न मग भंगेल
-- किती सहज सोप्या भाषेत मांडलंय! वाह!

बाकी गीतासार म्हणजे "मीच सर्वत्र व्यापून आहे" असंच महर्षी सुचवताहेत, नाही?

मूकवाचक's picture

22 May 2020 - 6:21 pm | मूकवाचक

आनन्दा, कुमाऊचा नरभक्षक, संजय क्षीरसागर, राघव आणि प्रा. डॉ. बिरूटे सर यांना मन:पूर्वक धन्यवाद.

प्रचेतस's picture

22 May 2020 - 8:44 pm | प्रचेतस

मूकवाचका, अनुवाद आवडला.

अर्धवटराव's picture

22 May 2020 - 10:28 pm | अर्धवटराव

अनुवाद आवडला.

अर्धवटराव's picture

22 May 2020 - 10:29 pm | अर्धवटराव

जे सर्वात जास्त आवडलं _/\_

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 May 2020 - 2:42 pm | ज्ञानोबाचे पैजार

गीतेवरची सगळीच भाष्ये विलोभनिय आहेत
पैजारबुवा,

मूकवाचक's picture

28 May 2020 - 12:01 pm | मूकवाचक

भगवद्गीतेतील सगळ्यात महत्वाचा श्लोक कोणता या बद्दल कित्येकांना कुतुहल असते. एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी पुढील श्लोकाचा उल्लेख केला होता:

हे पांडवा (अर्जुना), सगळ्या भूतांचा (सजीव सृष्टीचा) आदि, मध्य आणि अंत मीच आहे. सर्व जीवांच्या अंतःकरणात अहंस्फुरणेच्या रूपात वास्तव्य करून असलेला आत्मा मीच आहे. (भगवद्गीता १०.२०)

पुढे महर्षींनी गीता-सार सांगण्यासाठी भगवद्गीतेतल्या निवडक ४२ श्लोकांची सुसंगत आणि क्रमवार मांडणीदेखील केली (इथे हा श्लोक चौथ्या क्रमांकावर येतो). परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीमत भावार्थ गीतेतील श्लोकांचा त्याच क्रमाने संदर्भ घेत महर्षी गीता गद्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे:

(१ - भगवद्गीता 2.1)
संजयाने धृतराष्ट्रांना कुरूक्षेत्रावरील वृत्तांत कथन करताना सांगितले, "उद्विग्न झालेला पार्थ आपल्या रथामधे मान खाली घालून बसला आहे. त्याच्या अश्रूंचा बांध फुटलेला आहे. अवेळी करुणेचा पाझर फुटून सारासार विचारशक्ती गमावल्याने तो दीनवाणा झालेला आहे, तसेच त्याचे मनोधैर्य पूर्णपणे खचलेले आहे."

(२ - भगवद्गीता 13.1)
अर्जुनाची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण त्याला उपदेश करत आहेत, "हे पार्था, अध्यात्मातले जाणकार विद्वान या देहाला 'क्षेत्र', तसेच त्याला जो जाणतो त्याला 'क्षेत्रज्ञ' असे संबोधतात.

(३ - भगवद्गीता 13.2)
हे किरीटी (अर्जुना), सर्व क्षेत्रांमधे वसत असलेला क्षेत्रज्ञ मीच आहे असे जाण. तसेच हे लक्षात घे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणणे हेच खरे ज्ञान आहे असे मी मानतो.

(4 - भगवद्गीता 10.20)
हे पांडवा (अर्जुना), सगळ्या भूतांचा (सजीव सृष्टीचा) आदि, मध्य आणि अंत मीच आहे. सर्व जीवांच्या अंतःकरणात अहंस्फुरणेच्या रूपात वास्तव्य करून असलेला आत्मा मीच आहे. (भगवद्गीता १०.२०)

(5 - भगवद्गीता 2.27)
निसर्गाचा नियमच असा आहे की उगवलेला दिवस मावळतो आणि अस्तंगत झालेला सूर्य पुन्हा उगवतो. जन्माला आलेल्या प्रत्येक गोष्टीचा विनाश होतो आणि नाश पावलेली वस्तु पुन्हा उत्पन्न होते. हे अर्जुना, हा निसर्गनियम अटळ आहे हे लक्षात घेता अनाठायी शोक करणे तुला शोभत नाही.

(6 - भगवद्गीता 2.20)
आत्म्याचा जन्म होणे किंवा मृत्यु होणे संभवत नाही. तो अज, शाश्वत, नित्य आणि पुराणपुरूष आहे. त्यामुळे तो कधी काळी अस्तित्वात होता किंवा भविष्यात अस्तित्वात येईल असे घडत नाही. एखाद्या व्यक्तीच्या सावलीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले तर त्याच्या देहाला जखमा होत नाहीत. तद्वतच मरणधर्मा असलेला असलेला देह मृत्युमुखी पडला तरी आत्मा अभंगच राहतो.

(7 - भगवद्गीता 2.24)
आत्मा सर्वव्यापी तसेच नित्य असल्याने तुटणे, जळणे, भिजणे किंवा वाळणे असे क्रियाकलाप त्याच्या बाबतीत संभवत नाहीत. तो अचल (आपल्या स्थितीपासून न ढळणारा), स्थिर, सनातन (स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे असलेला), अव्यक्त (प्रकट स्वरूपात नसलेला) आणि अचिंत्य (ज्या विषयी चिंतन करता येत नाही) असतो.

(8 - भगवद्गीता 2.17)
आत्मा हे एक अव्यय (ज्यात कधीच घट होत नाही) तत्व आहे, ज्याचा विनाश करणे कुणालाच त्रिकाली शक्य नाही. सारे जग त्या अविनाशी तत्वाने व्यापलेले आहे असे जाण.

(9- भगवद्गीता 2.16)
अस्तित्वाचे नसणे तसेच नास्तित्वाचे अस्तित्वात येणे संभवत नाही. त्यामुळे तत्वज्ञ लोक या दोन्हींबाबत योग्य तो निर्णय घेतात. राजहंस जसे दूध आणि जल वेगळे करतो, तद्वतच तत्वज्ञानी लोक या विश्वात गुप्त स्वरूपात असलेल्या सारभूत तत्वाचा शोध घेताना दिसतात. एकाद्या बुद्धिमान व्यक्तीने सुवर्ण आणि हीण वेगवेगळे करावे, तद्वतच उपाधींमधून संतजन संतजन सार शोधून काढतात. धान्य पाखडून त्यातील भुस्सा टाकून देत आपण जसे फक्त धान्यकण वेगळे करतो, तद्वतच मायेचा त्याग करून ज्ञानी ब्रह्मपदी विराजमान होतो.

(10 - भगवद्गीता 13.32)
आकाश सर्वव्यापी असले तरी सूक्ष्म असल्याने ते कुठेही लिप्त होत नाही, तद्वतच देहामधे सगळीकडे नांदत असूनही आत्मा अलिप्तच असतो.

(11 - भगवद्गीता 15.6)
माझे परंधाम (निवासस्थान) हे एक स्वयंप्रकाशित, तेजोमय आणि परिपूर्ण असे एक गंतव्य आहे. सूर्य, चंद्र किंवा अग्नि त्याला प्रकाशित करू शकत नाहीत. या ठिकाणी पोचलेला जीव स्वर्ग, नरक आणि संसाराची येरझार करण्यापासून कायमचा मुक्त होतो. हे अर्जुना, जिथे (द्वैताद्वैतविलक्षण असलेल्या) परतत्वाशी जीव सामरस्य साधतो, तेच माझे परंधाम आहे असे जाण.

(12 - भगवद्गीता 8.21)
या परतत्वाने अवघे विश्व व्यापून टाकलेले असले, ते स्वत:च विश्वरूपाने नांदत असले तरी संपूर्ण विश्व लयाला गेले तरी तत्वतः या परतत्वाचा नाश होत नाही! या अव्यक्त (प्रकट न झालेल्या) आणि अक्षर तत्वालाच 'परम गति' असे म्हणतात. हे अर्जुना, माझे परंधाम प्राप्त झाले की जीवाचा जन्म आणि मृत्युचा फेरा कायमचा टळतो.

(13 - भगवद्गीता 15.5)
मुसळधार वर्षा झाल्यावर मेघ जसे आभाळातून नाहीसे होतात, तितक्याच सहजतेने मोह आणि अभिमान ज्ञान्याला सोडून जातात. अध्यात्मात तल्लीन झालेला ज्ञानी स्वभावत:च सगळ्या भौतिक वस्तुंच्या बाबतीत अनासक्त होतो. त्याची बुद्धी अत्यंत निर्मळ असल्याने तो वासनांच्या आधीन होत नाही. सुख आणि दु:खासारखे द्वंद्व निर्माण करणारे आणि बंधनात टाकणारे अनुभाव ज्ञान्याला येत नाहीत. असे ज्ञाते अगदी सहजतेने माझ्या अव्यय अशा परमपदाला पोहोचतात.

(14 - भगवद्गीता 16.23)
भौतिक सुखांच्या मागे लागलेल्या, भोगविलासी जीवन जगण्यासाठी वेडेपिसे झालेल्या तसेच विधिनिषेधांची तमा न बाळगता स्वैराचारात रममाण झालेल्यांना कल्पांत होण्याची वेळ आली तरी परम गती प्राप्त होत नाही. अशा जीवांना ब्रह्म किंवा निर्वाण लाभणे तर दूरच, खरे सात्विक सुखदेखील कदापि प्राप्त होत नाही.

(15 - भगवद्गीता 13.27)
हे अर्जुना, या विविधतेने नटलेल्या जीवसृष्टीत देखील जो समत्वभावाने अविनाशी असलेल्या ईश्वरालाच पाहतो तोच खरा ज्ञानी आहे असे नि:संशयपणे जाण.

(16 - भगवद्गीता 11.54)
या जगात उगमस्थानापासून अखंड वाहत आलेली नदी जशी शेवटी सागरातच विलीन होताना दिसते, तद्वतच अनन्य भावाने भक्ती करणारा भक्त अंती माझ्यात विलीन होतो. आगीत टाकलेले इंधन जसे पृथकतेने न राहता अग्निरूप होते, तद्वतच साक्षात्कार झाल्यानंतर देव आणि भक्त हे नाते संपून अवघे अस्तित्वच हरिमय होते. हे अर्जुना, माझ्यात समर्पित झाल्यावर 'मी' आणि 'तो' (ईश्वर) असे द्वैत तत्वतः शिल्लकच उरत नाही, त्यामुळे तू मत्स्वरूप होउन माझ्याशी एकरूप होत मातेच्या गर्भात सुखेनैव पहुडावे तसा निवांत रहा!

(17 भगवद्गीता 17.3)
ज्याचा जसा स्वभाव त्याची तशी श्रद्धा असते हे लक्षात घे. तसेच श्रद्धामय असलेला कुठलाही जीव त्याची जशी श्रद्धा असते तसाच होतो असे जाण.

(18 भगवद्गीता 4.39)
संयमी असलेल्या, शीलवान असलेलेल्या आणि ब्रह्मनिष्ठ होण्यात तत्पर असलेल्या साधकाला ज्ञान प्राप्त होते. अशा साधकाला मग परम शांती प्राप्त करण्यासाठी फार वेळ लागत नाही.

(19 भगवद्गीता 10.10)
प्रेमभावाने माझ्या ठायी जे सतत रंगलेले असतात, अशा भक्तांना ज्ञान तसेच भक्तीचे सोलीव सुख देत निजधामाप्रत नेणे हेच माझे ब्रीद आहे.

(20 भगवद्गीता 10.11)
हे अर्जुना, अशा भक्तांविषयी करूणा असल्याने मी स्वतः त्यांच्या अंतःकरणात प्रकट होत त्यांना तत्क्षणी तेजस्वी अशा ज्ञानदीपाचे दर्शन घडवतो. भ्रांतीच्या स्वरूपात अस्तित्वात असलेल्या अंध:काराचा ज्ञानदीपाच्या प्रकाशात नाश झाल्याने तो तत्वतः मागे उरत नाही. अशा प्रकारे माझे भक्त जन्म, मरण तसेच संसारातून मुक्त होतात.

(21 भगवद्गीता 5.16)
आत्मज्ञान झाल्याने ज्यांचे अज्ञान हरपले आहे अशा भक्तांसमोर सूर्यप्रकाशासारख्या दीप्तीमान असलेल्या ज्ञानप्रकाशात परतत्व प्रकट होते. पहाटवेळी पूर्व दिशा उजळल्यावर जशा दाही दिशा उजळून निघतात, तद्वतच आत्मप्रचितीची पहाट झाल्यावर स्वभावतःच या विश्वाच्या प्रांगणात परके असे काही उरत नाही. जिथे पहावे तिथे आत्मरूपाचेच प्राकट्य अनुभवता येत असल्याने साधक त्यात तल्लीन होऊन जातात.

(22 भगवद्गीता 3.42)
इंद्रिये बलवान असतात, त्यांच्यापेक्षा मन बलवान असते आणि मनापेक्षाही बुद्धीचे सामर्थ्य मोठे असते. बुद्धीबरोबर तुलना केली असता उपाधी रहित असलेल्या ईश्वरी सत्तेचे किंवा आत्मिक सत्तेचे सामर्थ्य तुलनेने कित्येक पटीने जास्त असते.

(23 भगवद्गीता 3.43)
अशा आत्म्याला जाणून घे आणि आत्मबलाने आत्मस्वरूपातच स्थिर हो, तसेच ज्यांच्यावर मात करणे अशक्य आहे असे भासते त्या विषयवासनांचा देखील संहार करून टाक.

(24 भगवद्गीता 4.37)
प्रज्वलित झालेल्या आगीत लाकडी ओंडके जसे जळून भस्मसात होतात, तद्वतच ज्ञानरूपी वणवानलात सगळी कर्मे जळून जातात अशी खात्री बाळग.

(25 भगवद्गीता 4.19)
'मी कर्ता आहे' 'मी अमुक एक गोष्ट साध्य करेनच' असे संकल्प ज्याचा मनात उद्भवतच नाहीत, तसेच सगळी कर्मे पार पाडत असताना जो कर्मफलाच्या आशेत गुंतून पडत नाही, अणि परिणामस्वरूप ज्ञानरूपी अग्नित ज्याची सारी कर्मे जळून जातात, अशाच व्यक्तीला सुजाण लोक विद्वान असे म्हणतात.

(26 भगवद्गीता 5.26)
निष्काम वृत्तीच्या तसेच यतीप्रमाणे आचरण असलेल्या आत्मज्ञान्याचे अंतःकरण त्याच्या स्वाधीन असते. जो निरंतर क्रोध रहित भावनेने विहरत असतो अशा ज्ञानियाला सर्वत्र ब्रह्मनिर्वाणच प्रचितीला येत असते. हे भारता, योगी जन 'याचि देही याचि डोळा' ब्राह्मी स्थिती कशी प्राप्त करतात या मागचे मर्म मी आता तुला थोडक्यात सांगतो.

(27 भगवद्गीता 6.25)
योगारूढ होण्यासाठी जसजशी उपरती होत जाईल तसा बुद्धीचा निग्रह करून मनाला आत्मस्थित करणे, तसेच इतर कुठलेही चिंतन करणे थांबवणे आवश्यक आहे.

(28 भगवद्गीता 6.26)
मन हे जात्याच अस्थिर आणि चंचल असल्याने ते ज्या ज्या विषयाकडे धाव घेईल, त्या त्या विषयातून तत्क्षणी त्याला परावृत्त करत आपल्या ताब्यात आणावे लागते. असे प्रयत्न करत असता ते सहजतेने स्थिर होत नसल्याने त्याला काही काळ सुखेनैव विहार करायला मोकळे सोडावे आणि हळुवारपणे पुन्हा निजस्वरूपाकडे परत वळू द्यावे. अभ्यासाची अशी सवय अंगी बांणवली की मन हळूहळू आत्मरंगात रंगायला लागेल, ते पूर्णपणे आत्मरूपच झाले की मग त्याचे स्थैर्य कधीच भंगणार नाही.

(29 भगवद्गीता 5.28)
ज्याने वायुने अवकाशात विलीन व्हावे तसा मनाला आत्मस्वरूपात विलीन करण्याचा योग साधला; ज्याने एकाग्र चित्ताने मोक्षप्राप्ती हेच ध्येय मानून तहान, भूक, भय अथवा क्रोध या सारख्या आवेगांपासून मुक्ती मिळवली; मन आणि बुद्धीसहित इंद्रियांच्या उर्मींना महाशून्यात विलीन केले; अशा संयमी सत्पुरूषालाच अंती जीवन्मुक्त अशी ब्राह्मी स्थिती प्राप्त होते.

(30 भगवद्गीता 6.29)
असा योग साधलेल्या जीवन्मुक्त सत्पुरूषाला त्याच्या आत्म्यातच सारे जीव नांदत आहेत, तसेच प्रत्येक जीवात तोच आत्मा नांदतो आहे अशी प्रचिती येत असल्याने तो समत्व भावनेनेच सगळ्या जीवसृष्टीकडे बघत असतो.

(31 भगवद्गीता 9.22)
जे भक्त अंतर्यामी सतत माझेच अनुसंधान ठेवत माझी उपासना करतात; क्षणभराचाही खंड पडू न देता अनन्य भावाने माझ्याशी समरस होतात; त्यांच्या भक्ती आणि प्रेमभावामुळे त्यांना मी आपल्या सायुज्य सदनी घेऊन जातो. अशा अनन्य भक्तांचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी देखील मी आपल्या शिरावर घेतो!

(32 भगवद्गीता 7.17)
एकनिष्ठपणे नित्य अनुसंधान साधणारा भक्तच सर्वश्रेष्ठ असतो. अशा भक्तांना जसा मी प्रिय असतो, तितकेच ते देखील मला प्रिय असतात! जो निरंतर तसेच अनन्य भावाने सहजतेने मत्स्वरूप होत मला भजतो, असा भक्त 'देहि असोनि विदेहि' अशा आत्मस्थितीत स्थित होतो.

(33 भगवद्गीता 7.19)
कित्येक जन्म लोटल्यावर मला सर्वभावे शरण आलेला भक्तच योगी तसेच ज्ञानी होतो, अशा भक्ताचीच जन्म आणि मृत्युच्या येरझारीतून कायमची सुटका होते! अशा भक्ताला डोळे उघडून बघताना किंवा डोळे मिटून निवांत पहुडलेले असताना सबाह्य-अभ्यंतरी मी सोडून इतर काहीही दिसत नाही. अशा आत्मानुभवी भक्तासाठी अवघे विश्व वासुदेवमय होते. अत्यंत दुर्लभ असलेला असा महंत या विश्वात विश्वरूप होत लीलया विहार करत असतो.

(34 भगवद्गीता 2.55)
नानाविध मनःकामनांचा त्याग करून जो आत्म्याद्वारे आत्मरूपातच संतुष्ट राहतो त्या 'स्थितप्रज्ञ' असे म्हणतात.

(35 भगवद्गीता 2.71)
असा स्थितप्रज्ञ नि:स्पृहतेने, निष्काम वृत्तीने तसेच कुठल्याही उपाधीने लिप्त न होता जगात वावरत असतो. अहंकारापासून तसेच माया ममत्वाच्या पाशापासून मुक्त असलेल्या अशा व्यक्तीलाच परम शांती संपादन करता येते.

(36 भगवद्गीता 12.15)
सर्व भूतमात्रात (प्रत्येक जीवात) भगवंत आहे असा भाव अंगी बाणलेल्या अशा व्यक्तीचा इतरेजनांना उबग येत नाही, तसेच अशा व्यक्तीला तिच्या सहवासात येत असलेल्या कुठल्याही व्यक्तीचा उबग येत नाही. विषय वासना शांतवल्याने तसेच आत्म्याच सर्वव्यापी आहे हे जाणल्याने अशा व्यक्तीच्या मनात हर्षोन्माद किंवा विषाद या भावनांना थाराच मिळत नाही. हे पार्था, आत्मस्वरूप सोडून जगात काहीच नाही हे जाणल्याने जो भय आणि क्रोध या विकारांपासून मुक्त होत सहजतेने वावरत असतो, असा सम्यक बोध असलेला योगी मला प्राणापेक्षाही प्रिय होतो!

(37 भगवद्गीता 14.25)
मान आणि अपमान यांना समान मानणारा, शत्रु आणि मित्र यांच्याविषयी समभाव ठेवणारा; निश्चल राहून विश्वात आत्मरूपच कोंदाटले आहे असे अनुभवणारा, ब्राह्मी स्थितीचा बोध झाल्याने ज्याने नव्या कर्माचा प्रारंभ करणे थांबवले आहे; अशा योग्यालाच हे अर्जुना, त्रिगुणातीत (सत्व, रज आणि तमोगुणांच्या बंधनापासून मुक्त) असे म्हणतात.

(38 भगवद्गीता 3.17)
जो आत्मसुखात रंगलेला आहे, जो निजस्वरूपातच पूर्णपणे तृप्त आणि संतुष्ट आहे अशा ज्ञानियाला या जगात कुठलेच कर्तव्य कर्म उरत नाही. 'देहि असोनि विदेहि' अशा स्थितीत असलेला आत्मतृप्त ज्ञानी कर्तव्यांच्या बंधनांपासून सहजतेने मुक्त होतो.

(39 भगवद्गीता 3.18)
अशा ज्ञानियाने जगात वावरत असताना कर्म केले काय किंवा न केले काय, हे धनंजया अशा नि:संग व्यक्तीच्या दृष्टीने त्या गोष्टीचे काही महात्म्यच उरत नाही! जो देहतादात्म्य विसरून अखंड आत्मानंदात रंगलेला असतो असा ज्ञानी कुठल्याही जीवाबद्दल मोह, ममत्व आणि आसक्तीने बांधला जात नाही. असे असले, तरी हे अर्जुना, जोवर हे ज्ञान प्राप्त होत नाही, तोवर जनसामान्यांसाठी कर्म-साधनाच योग्य आहे असे माझे ठाम मत आहे.

(40 भगवद्गीता 18.61)
जे मिळेल त्यातच जो संतुष्ट राहतो, ज्याला कुणाचाही मत्सर वाटत नाही अशा ज्ञानियाला सुख दु:खासारखी द्वंद्व भावना स्पर्श देखील करू शकत नाही. यश प्राप्त झाले किंवा अपयश मिळाले तरी ज्याची समतोल वृत्ती कधीच ढळत नाही, असा ज्ञानी सगळ्या कर्मांचे आचरण करूनही कर्मबंधापासून मोकळाच राहतो.

(41 भगवद्गीता 18.61)
हे पार्था, सगळ्या जीवांच्या अंतःकरणात वसलेल्या ईश्वराचे दर्शन घे. या जगात घडत असलेल्या सगळ्या कार्यकलापांचा खेळ आपल्या मायेने रचणारा सूत्रधार तोच तर आहे. सगळे जीव कठपुतळ्यांच्या खेळातल्या बाहुल्याप्रमाणे आहेत, आणि आपल्याच मायेच्या धाग्याने त्यांना बांधून आपल्या तालावर तो परमेश्वरच नाचवतो आहे हे लक्षात घे.

(42 भगवद्गीता 18.62)
हे अर्जुना, नदीतल्या पाण्याचा प्रवाह जसा सागराच्या दिशेने सतत धाव घेत असतो, तसा हृदयस्थ असलेल्या त्या ईश्वरालाच काळ वेळ न पाहता सर्वभावे शरण जा. त्याची कृपा संपादन करताच तू स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होशील. परम शांती असलेले दिव्य आणि अव्यय असे अढळ ध्रुवपद देखील तुला प्राप्त होईल.

भगवद्गीतेचे सारतत्व संक्षिप्त स्वरूपात ४२ निवडक श्लोकांमधून सांगून झाल्यावर फलश्रुती किंवा सांगता या स्वरूपात भगवान रमण महर्षींनी एक श्लोक स्वतः रचला, त्याचा भावानुवाद असा करता येईलः

ज्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असताना शाश्वत सत्याचा सहजतेने उपदेश केला, अर्जुनाच्या भवतापाचे लीलया निवारण केले, मानवी देहाच्या स्वरूपात अवतरलेल्या हे कृपासिंधू श्रीकृष्णा, तू आमचे रक्षण कर.

संजय क्षीरसागर's picture

28 May 2020 - 12:57 pm | संजय क्षीरसागर

लेखात पहिला अनुवाद असा होता

> जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात(भावार्थ गीता १०.२०)

आता प्रतिसादात तो असा दुरुस्त केला आहे

> हे पांडवा (अर्जुना), सगळ्या भूतांचा (सजीव सृष्टीचा) आदि, मध्य आणि अंत मीच आहे. सर्व जीवांच्या अंतःकरणात अहंस्फुरणेच्या रूपात वास्तव्य करून असलेला आत्मा मीच आहे. (भगवद्गीता १०.२०)

हेच मी सुरुवातीला सांगत होतो:

आपण सर्व ज्याला मी म्हणतो तो आपल्या सर्वांचा मी एकच आहे
तो स्थानबद्ध नाही, त्यामुळे :

नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात
ही पहिल्या अनुवादात चूक झाली आहे

पण मजा अशी की मी हा शब्द आला की सगळे बिथरतात !

इतर श्लोकांचं नंतर बघू

Prajakta२१'s picture

29 May 2020 - 12:01 am | Prajakta२१

आहे कुठे हे परंधाम?

माझे परंधाम (निवासस्थान) हे एक स्वयंप्रकाशित, तेजोमय आणि परिपूर्ण असे एक गंतव्य आहे. सूर्य, चंद्र किंवा अग्नि त्याला प्रकाशित करू शकत नाहीत. या ठिकाणी पोचलेला जीव स्वर्ग, नरक आणि संसाराची येरझार करण्यापासून कायमचा मुक्त होतो. हे अर्जुना, जिथे (द्वैताद्वैतविलक्षण असलेल्या) परतत्वाशी जीव सामरस्य साधतो, तेच माझे परंधाम आहे असे जाण.>>>>>>>>>प्रत्येक देवाचे exclusive आहे का?
शिवाचे कैलास,विष्णूचे वैकुंठ ,ब्रह्म्याचे ब्रह्मलोक,इंद्राचा स्वर्ग एवढे असतील तर ते एकच परंधाम कसे??????????
सगळ्या स्तोत्रात शेवटी अशीच गाजरे दाखवतात सुखसंपत्ती दीर्घायुष्य लाभेल आणि शेवटी त्या त्या देवासोबत त्याच्या लोकात आनंदाने वास करता येईल मग परंधाम कसे काय ? परंधामे आहे कि काय भारंभार?

आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आला नाहीये

माणसांनी दुःख सहन करण्यासाठी (दुःख हे तुमच्या पूर्वकर्माचे फळ आणि त्या परंधामाचे ध्येय ठेवले कि दुःखाचा विसर पडतो म्हणून )अशी गाजरे दाखवली जातात
काही काही श्लोक वाचून तर झगा मगा मला बघा नाहीतर मला पहा फुले वहा असाच थाट वाटतो (देवाचा, लेखकाचा नव्हे)
कृ ह घ्या
भाषांतर चांगले केलेय धन्यवाद पु ले शु
अवांतर -मागे अन्यत्र एका संस्थळावर अशीच चर्चा होती त्यात एक प्रश्न होता कि देव जर आहे तर तो इतका सॅडीस्ट कसा काय?सध्याची परिस्थिती बघून असेच वाटतेय

मूकवाचक's picture

29 May 2020 - 12:55 pm | मूकवाचक

कुठे आहे हे परंधाम ... माझी साधी १ बी एच के सदनिका आहे. त्यामुळे पास. पण संत साहित्यातील काही गोष्टी या 'अमूर्त संकल्पना' असू शकतात, तदनुषंगिक विचार केल्याने मन आणि बुद्धीच्या एका वेगळ्याच पैलूचा विकास होऊ शकतो अथवा होतो एवढेच विनम्रपणे सुचवतो. अर्थातच एखादी अमूर्त संकल्पना आपण नमूद केल्याप्रमाणे दु:ख सहन करण्यासाठी उपयुक्त ना वाटता ती त्रासदायक वाटली तर ती दुर्लक्षीत करणेच श्रेयस्कर आहे. तिचा त्रास करून घ्यावा असा माझा तरी अजिबात आग्रह नाही.

शिवाचे कैलास,विष्णूचे वैकुंठ ,ब्रह्म्याचे ब्रह्मलोक,इंद्राचा स्वर्ग ... ही इष्टदैवते आहेत. त्यांची परंधामे ही आगळेवेगळे सौंदर्य असणारी प्रतिकात्मकता आहे. (व्यक्तीपरत्वे असे भेद असतात हे लक्षात घेत सुसंवादित्व येण्यासाठी आचार्यांनी पंचायतन पूजा सुचवली असावी असे वाटते). व्यक्तीपरत्वे 'परसेप्शन' वेगळे असले (उदा. आंधळ्या व्यक्ती आणि हत्तीची गोष्ट) तत्वतः परंधाम एक असायला काय हरकत आहे? माझ्या अनुभवाप्रमाणे अद्वैताचा अर्थ एकच गोष्ट मग ते इष्टदैवत असेल, निर्गुण निराकार असेल किंवा जावा/ पायथॉन भाषा असेल ती सगळ्यांवर लादण्याचा अनुदार दृष्टीकोन स्वीकारणे असा नसून विभिन्न वाटत असलेल्या गोष्टीतले एकत्व पाहणे आणि त्यात सुसंवादित्व स्थापन करणे असा होतो. सगळ्या व्यक्ती कितीही वेगवेगळे वर्णन करत असल्या तरी त्या एकाच हत्तीबद्दल बोलत आहेत असा डोळस दृष्टीकोन यावा या साठीच सत्पुरूषांचे मार्गदर्शन मोलाचे असते. असो.

आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आलेला नाहिये ... अमूर्त संकल्पनांचे तसेच असते. तदनुषंगिक मते व्यक्तिनिष्ठ असतात, वस्तुनिष्ठ असू शकत नाहीत.

देवाच्या/ ईश्वरी शक्तीच्या निव्वळ अस्तित्वात असण्याने विनाअट आणि सरसकट सगळे आलबेल होईल असे असते तर त्याला 'संभवामी युगे युगे' असे का म्हणावे लागले असते? त्याउपर सगळे 'आलबेल' असणे म्ह़णजे काय या बद्दल प्रत्येक व्यक्ती (उदा. साम्यवादी, हिंदुत्ववादी, समाजवादी, इहवादी, भोगवादी, शून्यवादी, अस्तित्ववादी वगैरे तसेच बायपोलार, नार्सिसिस्ट, बॉर्डरलाईन वगैरे व्यक्तिमत्व दोष असलेल्या व्यक्ती, गरीब बिचार्‍या व्यक्ती) आपापले वेगळेच मत व्यक्त करेल हे आलेच. असो.

सतिश गावडे's picture

29 May 2020 - 1:26 pm | सतिश गावडे

छान स्पष्ट केला आहे मुद्दा. आवडले.

मराठी_माणूस's picture

29 May 2020 - 3:23 pm | मराठी_माणूस

पण संत साहित्यातील काही गोष्टी या 'अमूर्त संकल्पना' असू शकतात, तदनुषंगिक विचार केल्याने मन आणि बुद्धीच्या एका वेगळ्याच पैलूचा विकास होऊ शकतो अथवा होतो एवढेच विनम्रपणे सुचवतो.

धन्यवाद, ह्या संकल्पने कडे एका वेगळ्या दृष्टीकोनातुन पहाण्याचा परिचय करुन दिल्याबद्दल.

> संत साहित्यातील काही गोष्टी या 'अमूर्त संकल्पना' असू शकतात, तदनुषंगिक विचार केल्याने मन आणि बुद्धीच्या एका वेगळ्याच पैलूचा विकास होऊ शकतो ?

देव या निराधार कल्पनेचा मन आणि बुद्धीच्या विकासाला काय उपयोग आहे ?

> अद्वैताचा अर्थ एकच गोष्ट मग ते इष्टदैवत असेल, निर्गुण निराकार असेल किंवा जावा/ पायथॉन भाषा असेल ती सगळ्यांवर लादण्याचा अनुदार दृष्टीकोन स्वीकारणे असा नसून विभिन्न वाटत असलेल्या गोष्टीतले एकत्व पाहणे आणि त्यात सुसंवादित्व स्थापन करणे असा होतो ?

अद्वैताचा अर्थ सत्यापरता इथे काहीही नाही असा होतो.

अद्वैत म्हणजे तुम्ही वर्णन केलेला समन्वयवाद नाही.

ती वस्तुस्थिती आहे.

> सगळ्या व्यक्ती कितीही वेगवेगळे वर्णन करत असल्या तरी त्या एकाच हत्तीबद्दल बोलत आहेत असा डोळस दृष्टीकोन यावा या साठीच सत्पुरूषांचे मार्गदर्शन मोलाचे असते

हत्ती आणि आंधळे या गोष्टीचा इथे काहीही संबंध नाही.
सत्य एक आहे
आणि फक्त दोनच शक्यता आहेत : उलगडा झाला किंवा नाही झाला.
सत्यात तिसरी शक्यता नाही
आणि फालतू टाइमपास नाही.

> आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आलेला नाहिये ... अमूर्त संकल्पनांचे तसेच असते. तदनुषंगिक मते व्यक्तिनिष्ठ असतात.

कल्पनेचा अनुभव येणं याला भ्रम म्हणतात.

> देवाच्या/ ईश्वरी शक्तीच्या निव्वळ अस्तित्वात असण्याने विनाअट आणि सरसकट सगळे आलबेल होईल असे असते तर त्याला 'संभवामी युगे युगे' असे का म्हणावे लागले असते?

ही Waiting for the Godot थिअरी आहे.

अशी फार युगं गेली कुणी काही येत नाही आणि येण्याची शक्यताही नाही.

संजय क्षीरसागर's picture

29 May 2020 - 5:24 pm | संजय क्षीरसागर

सगळा निव्वळ भोंगळ कारभार आहे.
असे परमधाम वगैरे कुठेही नाही.

> प्रत्येक देवाचे exclusive आहे का?

देवही कल्पना आहे आणि मानवाच्या मेंदूपलिकडे ती कुठेही अस्तित्वात नाही.

> सगळ्या स्तोत्रात शेवटी अशीच गाजरे दाखवतात...

प्रत्येकी एक पोलीस नेमणं शक्य नसल्यानं, प्रत्येकाच्या मनात एक मॉरल पोलीस उभा करण्याचं काम देवही संकल्पना करते.
गाजरामुळे लोक त्या पोलीसाचा स्वीकार करतात.
यामुळे देवभोळे लोक कायम दबून राहतात आणि बेरकी त्यांना नडून आपलं जीवन बिनधास्त जगतात.

> आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आला नाहीये

कल्पना सत्य वाटणं या भ्रमाला लोक देवाचा अनुभव म्हणतात.
बुद्धी शाबूत असणार्‍याला असे अनुभव येत नाहीत.

> माणसांनी दुःख सहन करण्यासाठी (दुःख हे तुमच्या पूर्वकर्माचे फळ आणि त्या परंधामाचे ध्येय ठेवले कि दुःखाचा विसर पडतो म्हणून ) अशी गाजरे दाखवली जातात.

एकदम बरोब्बर !

देव-देव करणार्‍यावर आपत्ती ओढवली तर तो स्वतःची समजूतही घालून घेतो, देवामुळे इतकाच राडा झाला नाही तर यापेक्षा जास्त वाट लागली असती.

> काही काही श्लोक वाचून तर झगा मगा मला बघा नाहीतर मला पहा फुले वहा असाच थाट वाटतो

अत्यंत योग्य निरिक्षण !

> देव जर आहे तर तो इतका सॅडीस्ट कसा काय ?

देवही माणसाची निराधार कल्पना आहे.
त्या कल्पनेत काहीही घडवण्याचं किंवा थोपवण्याचं सामर्थ्य नाही.

प्रत्येकाला स्वतःची बुद्धी, वस्तुनिष्ठता, विज्ञानवादी दृष्टीकोन, जे काही असेल ते शारिरिक सामर्थ्य आणि जमेल तशी इतरांची मदत घेऊन आयुष्याला बिनधास्त सामोरं जायचं आहे.
______________________________________

तुमचा दृष्टीकोन योग्य आहे. लगी रहो !

अर्धवटराव's picture

1 Jun 2020 - 8:02 pm | अर्धवटराव

आजपर्यंत तर कोणाला काही अनुभव आला नाहीये

त्याविषयी कुणी आपले अनुघव सांगितले तर तो केवळ कल्पनाविलास म्हणुन अगोदरच कन्क्लुड केले आहे काय? सर्वात मुख्य म्हणजे त्यावर केवळ विश्वास न ठेवता तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष्य अनुघव घ्यायची इच्छा आहे का? त्याकरता थोडे प्रयत्न करायला लागतील... आर यु ऑन फॉर दॅट ?

माणसांनी दुःख सहन करण्यासाठी (दुःख हे तुमच्या पूर्वकर्माचे फळ आणि त्या परंधामाचे ध्येय ठेवले कि दुःखाचा विसर पडतो म्हणून )अशी गाजरे दाखवली जातात

गाजरांची कमी नाहि. अनेक आकार, उकार, इकार, निराकारांची गाजरं बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येकाची चव अणि मजा वेगळी आहे. आपल्याला फक्त एण्टरटेन्मेण्ट हवे असल्यास अक्खं आयुष्य कमी पडेल इतकी मजा आहे.

काही काही श्लोक वाचून तर झगा मगा मला बघा नाहीतर मला पहा फुले वहा असाच थाट वाटतो (देवाचा, लेखकाचा नव्हे)

राखी सावंत सर्वत्र असते. इथे मिपावर पण आहे :)

अवांतर -मागे अन्यत्र एका संस्थळावर अशीच चर्चा होती त्यात एक प्रश्न होता कि देव जर आहे तर तो इतका सॅडीस्ट कसा काय?सध्याची परिस्थिती बघून असेच वाटतेय

अवांतरावर अवांतर :) :-
अंतु बर्वा उवाच... "अहो दिडशे वर्षे तुमचे... ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचेतला काटा सेकंदाने हलन नाहित हज्जर वर्ष झाल्या शिवाय..."

Prajakta२१'s picture

2 Jun 2020 - 11:54 pm | Prajakta२१

धन्यवाद
अवांतरावर अवांतर :) :-
अंतु बर्वा उवाच... "अहो दिडशे वर्षे तुमचे... ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचेतला काटा सेकंदाने हलन नाहित हज्जर वर्ष झाल्या शिवाय...">>>>>>>

मग त्या ब्रह्मदेवाचा उपयोग काय ????
कृ ह घ्या

सुरेख .

एका वाक्यात काम तमाम !

अर्धवटराव's picture

3 Jun 2020 - 3:27 am | अर्धवटराव

ब्रह्मदेवाने तसे बरेच उद्योग केले... पण माणसाला सर्वात जात उपयोगी ठरणार्‍या दोन गोष्टी..
एक म्हणजे चार पायांचे गाढव
दुसरे म्हणजे माणसासारखे दिसणारे दोन पायांचे गाढव.

चार पायांचे गाढव तसं उपयोगी. निदान त्याला हे कळतं कि आपण केवळ भार वाहायच्या कामाचे आहोत.

दोन पायांच्या गाढवांना हे कळतच नाहि कि त्यांना ज्ञानाचे ओझे झालेय. मग ते आपल्या खिंकाळण्याला 'एकसोएक बहारदार' गायकी समजतात, आणि लाथा झाडण्याला मुक्तीच्या मार्गावरचं पदलालित्य (ते ही 'अफलातुन' वगैरे विशेषणांनी नटलेलं)

एव्हढं मनोरंजन करुन ठेवलय ब्रह्मदेवाने आपल्यासाठी ;)

संजय क्षीरसागर's picture

3 Jun 2020 - 10:37 am | संजय क्षीरसागर

किती मनोरंजक प्रतिसाद !

अर्धवटराव's picture

3 Jun 2020 - 5:28 pm | अर्धवटराव

आपलं योगदान मोलाचं आहे.

सतिश गावडे's picture

29 May 2020 - 1:27 pm | सतिश गावडे

या धाग्यावर दोन ब्रम्हास्त्रे वाया गेली.

सोत्रि's picture

30 May 2020 - 8:26 am | सोत्रि

मिपावरील वाचक कवचधारी (प्रगल्भ) झाला आहे असे म्हणता येइल का?

- (मुमुक्षू) सोकाजी

मूकवाचक's picture

29 May 2020 - 7:32 pm | मूकवाचक

भगवद्गीतेसारखा विषय चर्चिला जात असेल तर मतमतांतरे असणे साहजिकच आहे, नव्हे ते गृहीतच धरावे लागते.

महर्षी गीतेचा शेवटचा श्लोक १८.६२ आहे. भगवद्गीतेतल्या त्याच्या पुढच्याच श्लोकाचा संदर्भ घेतला तर वक्त्याची श्रोत्याबद्दलची, सद्गुरूंची शिष्याविषयी (तसेच भगवद्गेतीविषयी मिपावर धागा काढलेल्याची वाचकांबद्दल) भूमिका कशी असावी या बद्दल दिशा मिळते:

इति ते ज्ञानमाख्यानं गुह्यादगुह्यतरं मया, विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरू (भगवद्गीता १८.६३)
- याचा ढोबळमानाने अर्थ असा होतो की हे अर्जुना, गुह्यात गुह्य असे हे ज्ञान मी तुला कथन केले, आता त्यावर सांगोपांग विचार करून तुला उचित वाटेल ते तू कर.

माझी भूमिका आता साधारण या प्रकारची झालेली आहे. असो. ज्या प्रतिसादांविषयी मी काहीच लिहीलेले नाही त्यात व्यक्त झालेली मते माझ्या समन्वयवादी विचारसरणीत नानाविध विचारप्रणालींपैकी एक या दृष्टीने फक्त स्वीकारार्हच नव्हेत तर स्वागतार्ह आहेत असे जाणावे.

कोविड - १९ च्या संकटातून सुखरूप पार पडंण्यासाठी तसेच नजिकच्या कालखंडात सर्व मिपाकरांच्या जीवनात यश, मांगल्य आणि सौख्य यावे अशा शुभेच्छा!

संजय क्षीरसागर's picture

29 May 2020 - 8:08 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही आवरतं घेतलंय !

> ज्या प्रतिसादांविषयी मी काहीच लिहीलेले नाही त्यात व्यक्त झालेली मते माझ्या समन्वयवादी विचारसरणीत नानाविध विचारप्रणालींपैकी एक या दृष्टीने फक्त स्वीकारार्हच नव्हेत तर स्वागतार्ह आहेत असे जाणावे.

सत्य सर्वसमावेशक आहे, समन्वयवादी नाही
आणि पलायनवादी तर नक्कीच नाही !

@मुकवाचक-शंकानिरसनाबद्दल धन्यवाद
@संजय क्षीरसागर सर-धन्यवाद
अवांतर -ह्याबाबतीत एकेश्वरवाद असल्यामुळे अब्राहमीक धर्म आणि सिख जास्त पुढारलेले वाटतात पण निर्गुण निराकाराची उपासना अवघड असल्याने आपल्या पद्धतीत सगुण साकार आणि त्यांचे वेगवेगळे ऑपशन्स (तुम्हाला जो आवडेल त्याची पूजा करा ) दिले आहेत आणि हेच आपले महान वैशिष्ट्य आहे
असे माझ्या परिचयातील बऱ्याच लोकांचे मत आहे
चांगल्या चर्चेबद्दल सर्वांचे धन्यवाद
रमण महर्षींचे काही निवडक श्लोक चांगले आहेत (निवड चांगली आहे)

संजय क्षीरसागर's picture

30 May 2020 - 2:21 pm | संजय क्षीरसागर

> निर्गुण निराकाराची उपासना अवघड असल्याने आपल्या पद्धतीत सगुण-साकारा आणि त्यांचे वेगवेगळे ऑपशन्स (तुम्हाला जो आवडेल त्याची पूजा करा ) दिले आहेत आणि हेच आपले महान वैशिष्ट्य आहे. असे माझ्या परिचयातील बऱ्याच लोकांचे मत आहे

निराकराची उपासना करायला लागत नाही. तो उलगडा आहे.
__________________________________

हा उलगडा न झालेले लोक सगुण-साकाराचा गोंधळ माजवून आहेत.

या सगुण-साकारामुळेच मानवता अनेक धर्मात विभागली गेली आहे आणि
मानवी इतिहासात धर्मविस्तारास्तव आजपर्यंत अनेक युद्धे होऊन नाहक प्राण हानी आणि संपती विनाश झाला आहे.
त्यामुळेच शतकानुशतके झालेली प्रगती पुन्हा धुवून काढली गेली आहे.

____________________________

लेखक म्हणतो त्याप्रमाणे सगुणोपासकात समन्वय असंभव आहे.
उभे गंध लावणारे, आडवं गंध लावणार्‍यांच्या विरुद्ध आहेत.
भगवे हिरव्यांच्या विरुद्ध,
हिरवे, पांढर्‍या आणि भगव्यांच्या विरुद्ध,
पांढरे पैश्याच्या जोरावर या दोघांना आपल्यात सामिल करतायंत !
असा सगळा सावळा गोंधळ आहे.
_____________________________

थोडक्यात, सगुण-साकार हा भंपक कल्पनाविलास आहे.
हटवादी निराकर हा सुद्धा पराकोटीचा विचार आहे.
आणि निराकाराचा उलगडा होत नाही म्हणून हा सगळा उत्पात चालू आहे.