कोरोनासोबत जगायचे आहे...!

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
23 May 2020 - 2:57 pm

लॉकडाउन म्हणायलाच तेवढा राहिलाय. दैनंदिन रूटीन हळूहळू वळणावर येतंय. टीव्ही चॅनल्स चा धोशा आता कुणी फारसा मनावर घेत नाहीयेत. रेल्वे एष्ट्या सुरु झाल्या आणि आतापर्यंत लॉकडाऊन असलेल्या कोरोनाला पाय फुटू लागलेत. आतापर्यंत बंद डब्यात असलेल्या लहानलहान गावांतून कोरोना रूग्ण वाढू लागलेत.
आमच्या गावातही ४-५ निघाले.
आता तर सगळेच व्यवहार सुरु झालेत. सगळे म्हणतात, खबरदारी घ्या.
लहानपणी एकदा एकांच्या घरी गेले होते. तिथे घराच्या चार भिंतींच्या आत, मध- घरात एक मोठे च्या मोठे नागाचे वारूळ होते. होय, घरात !! आणि ते गेल्या कित्येक वर्षापासून असे घरातच आहे असे समजले .त्यातून क्वचित कधीतरी नाग सापांची ये जा ही होत असे पण त्या घरातल्या लोकांना त्याचे काहीच वाटत नसेल ते काय करतात आपल्या वाटेने निघून जातात. त्यांचं घर आहे, आमचं पण आहे असं म्हणाले.
आज आपण आणि कोरोना यांचं असंच झाला आहे. घरात रस्त्यात ऑफिसात दुकानात तो शेजारी आहेच. त्याला घेऊनच वावरायचं आहे. फार जवळ येऊ द्यायचं नाही सांभाळून राहायचं आहे. हे कसं करायचं हे आता शिकायला पाहिजे.
मास्क लावून बाहेर पडावं लागतं च. सॅनिटायझरची बाटली पर्समध्ये असतेच. ऑफिसमध्ये टचलेस सॅनिटायझर बाटल्या बसवल्या आहेत. बेसिन जवळ कधी नव्हे तो एक साबण दिसतो आहे एक माणूस रजिस्टर घेऊन टेबल टाकून दारात बसला आहे आल्यागेल्याची नाव व पत्ते कामाचे स्वरूप इत्यादी लिहून घेत आहे कागदपत्र गरज असेल तरच स्वीकारली जात आहेत.
माझ्या केबिन मध्ये रोज 100 माणसांची ये-जा. कागदपत्र घ्यावे लागतात. यामध्ये कपात कशी काय करता येईल विचार करते आहे. साइटवर गेल्यावर कामाच्या स्वरूपामुळे पर्सनल डिस्टसिंग पाळता येईलच असे नाही. ऑफिसकडून आर्सेनिक अल्बम नावाच्या गोळ्या फ्री मध्ये मिळाल्या आहेत. त्याचा काही फायदा होतो की नाही माहिती नाही.
याशिवाय अजून काय काय करता येईल ज्यामुळे या कोविड नावाच्या बलेपासून संरक्षण करता येईल ?
सुचवा तुमचे उपाय आणि शेअर करा अनुभव इथे.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

मोदक's picture

23 May 2020 - 3:42 pm | मोदक

झकास सुरूवात.. सवडीने प्रतिसाद देतो आहेच. तोपर्यंत हा व्हिडीओ पहा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 May 2020 - 3:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

आमच्या हापिसात पण अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या फुकट वाटल्या. शिवाय मास्क आणि सॅनिटायझर दिमतीला आहेतच.

हापिसात गेल्यावर पहिल्याच दिवशी एक फेसशिल्ड हातात दिले गेले आणि ते लावूनच हापिसात वावरायचे असे सिक्युरीटीने सांगितले. फेसशिल्ड म्हणजे प्लॅस्टीकचा एक जाडसर कागद आहे तो आपल्या चेहर्‍यासमोर लावण्यासाठी त्याला इलॅस्टीकची पट्टी लावली आहे. पण भलते तापदायक प्रकरण आहे. ते लावून संगणाकडे पहाताना मला गरगरायला लागले म्हणून काढुन ठेवले. स्टॉक टेकिंग साठी म्हणुन ते घालून माझे सहकारी शॉपफ्लोअर ला गेले तर उकाड्यामुळे आणि श्वासामुळे त्यावर बाष्प जमा झाले आणि समोरचे काही दिसेनासे झाले त्यामुळे ते काढूनच काम करावे लागले.

बस मधे सुध्दा एका सीट वर एक जण बसतो. बस सुरु होताना आणि कंपनीत पोचल्यावर ती फवारा मारुन निर्जंतुक केली जाते.

या शिवाय ते बंदुकीसारखे दिसणारे थर्मामिटर आहेतच. जाता येता त्या बंदुका आमच्यावर रोखलेल्या असतातच. आधी पंचिंग करायला मशीन ला बोट लावावे लागायचे आता नवी कार्ड दिली आहेत जी मशिनला लांबूनच दाखवावी लागतात.

या शिवाय हेल्थ मॉनिटरींग नावाचा एक नवा रिपोर्ट रोज द्यावा लागतो. आणि तो रोज रिव्हु करावा लागतो. माझ्या कडे माझे डिपार्टमेंट सोडून रोज १० रिपोर्ट येतात. ज्यात कर्मचार्‍याची स्वतःची आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती रोज गोळा केली जाते. ती सगळी रोजच्या रोज वाचायची आणि त्यात काही विशेष बाब आढळली तर त्या मनुष्याला लगेच बोलवून जास्ती चौकशी करायची. जरा देखिल संशय आला की त्याला एच आर च्या सुपुर्द करायचे.

यातले एक कलम म्हणजे कुतुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या शरीराच्या तापमानाची नोंद रोज करायची. माझ्या गटात एक सिक्युरीटी गार्ड पण आहे. तो पण रोज आपल्या कुटूंबाचे शारीरीक तापमान नोंदवत होता. चार पाच दिवसांनी मी विचारले की तुमच्या कडे कोणता थर्मामिटर आहे? त्याने सांगितले घरी थर्मामिटर नाहीये. मग कुटुंबाचे तपमान रोज कसे नोंदवता? त्याने सांगितले माझे रोजचे तापमान इथे कंपनीत घेतले जाते त्या वरुन मग घरी जाउन मी प्रत्येकाच्या डोक्याला हात लावुन पहातो आणि किती तापमान आहे ते ठरवतो. मी डोक्यावर हात मारुन घेतला. दुसर्‍यादिवशी हापिसला जाताना ५ थर्मामिटर घेउन गेलो आणि त्यातला एक त्या गार्डला दिला, सोबत सॅनिटायझरची एक बाटली सुध्दा दिली. आणि आज पासून याने मोजलेले तापमान सांगायचे असे बजावले. त्याच्या कडुन एकदा प्रात्याक्षिकही करुन घेतले. बाकिचे ४ थर्मामिटरही इतर ग्रुप मधल्या काही लोकांना दिले .

वैयक्तीक पातळीवरची अजून एक खरेदी म्हणजे परवाच एक ट्रीमर विकत घेतला आणि चार महिने अस्ताव्यस्त वाढलेले जंगल कापून टाकले. आता डोके एकदम हलके हलके वाटते आहे. पाच मिनिटात होणार्‍या इतक्या सोप्या कामासठी आता पर्यंत दरमहिन्याला उगाच १५० रुपये आणि एक तास खर्च करत होतो असे वाटले.

लॉकडावून आधि डबा खाल्ला की तो तसाच पिशवीत भरायचो. आता जेवण झाले की डबा साबण लावून स्वच्छ धुतो आणि मगच तो पिशवीत जातो. त्या करता ससा लिक्वीड ची एक बाटलीच हापिसात नेउन ठेवली आहे.

एकंदर लॉकडावून नंतरचा काळ मोठा बदल घेउन आलेला मजेदार काळ आहे.

पैजारबुवा,

माझ्या व्यतिरिक्त पहिल्यांदा उत्पादन क्षेत्रातील प्रतिसाद वाचलाय.
आमच्या कंपनीत बहुतेक असाच आहे.
फेस शिल्ड आणि घरच्यांचं टेंपरेचर नाहीये.
बाकी मास्क, सॅनिटायझर, आत जाताना बाहेर येताना बंदूक रोखून तापमान मोजणं, बसमध्ये एका सीटवर एकजण, सकाळी ड्रायव्हर बास घेऊन निघताना - ऑफिसमध्ये पोचल्यावर - संध्याकाळी निघताना - संध्याकाळी ड्रायव्हर पोचल्यावर बसचे निर्जंतुक करणं, ऑफिसमध्ये सर्वत्र लावलेले पायाने दाबून वापरायचे सॅनिटायझर डिस्पेन्सर, आहेतच.
सहा मेला जाणं सुरू केल्यापासून कॅन्टीन मध्ये न जाता सर्वजण जागेवरच जेवताहेत. (डबा न आणणारे जातात कॅन्टीन मध्ये). सर्व कंत्राटी कामगार, ऑपरेटर, स्टाफ यांना एकेक बाटली दिली आहे, ग्लास शेअर करावा लागू नये म्हणून.

आता कोरोना बरोबर जगायचंय तर काही गोष्टी पाळव्या लागतात.
बसमध्ये शक्य तितका किमान स्पर्श इकडे तिकडे होईल याची काळजी घ्यायची.
घरातून निघून घरात परत येईपर्यंत, खाणं पिणं सोडून मास्क काढायचा नाही.
घरी परत आल्यावर टेरेस वर बॅग काढायची. त्यातून डबा, बाटली काढायची. लॅपटॉप काढायचा, त्याच्याबरोबर मोबाईल वेगळा ठेवायचा. पाकीट, चावी, घड्याळ, पट्टा एका कोपऱ्यात घमेले ठेवलंय त्यात ठेवायचं. थेट बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करायची. युनिफॉर्म सहित सगळी कपडे एका बादलीत वेगळी ठेवायची. घरची कपडे घालून सॅनिटायझरने laptop ani mobile स्वच्छ करायचा आणि घरात न्यायचा. घमेल्यातल्या वस्तू तशाच रात्रभर ठेवून सकाळी घराबाहेर पडताना परत घ्यायच्या.
बसमध्ये मोबाईल हाताळायचा नाही. पोचल्यावर हात स्वच्छ करून मग मोबाईल ला हात लावायचा. मला लोकांच्या कॉम्पुटर वर काम करावं लागतं असल्याने, सॅनिटायझरची वेगळी बाटली खिशात ठेवतो. तिथे गेल्यावर हाताला सॅनिटायझर लावायचा. काम झाल्यावर परत सॅनिटायझर. जागेवर आल्यावर परत सॅनिटायझर.

दुकानातून packed वस्तू आणल्यानंतर त्या साबणाने धुऊन घ्यायचा.
ज्या धुण्या सारख्या नाहीत त्या दिवसभर उन्हात ठेवायच्या.
फळे फक्त अशी आणायची जी साबणाने स्वच्छ धुता येतील आणि साल फेकून खाता येतील. उदाहरणार्थ केळी आंबे संत्री.

घरात कोणालाही साधी सर्दी सुद्धा होऊ नये याची काळजी घ्यायची. उदाहरणार्थ या वर्षी उन्हाळा संपत आला तरी एकदाही सरबत केलेला नाही. फ्रीजमधलं पाणी वापरत नाही. द्राक्ष आणि कलिंगड नाही.
ब्रेड आणि बेकरीचे इतर पदार्थ अजून काही महिने तरी नाही.

हॉटेल, सिनेमा , मॉल चालू झाले तरी अजून काही महिने जाणे नाही.

पर्यटन, फिरायला जाणं, बाग, मंदिरात जाणं, विनाकारण मित्रांकडे नातेवाईकांकडे जाणं, गरज नसलेली शॉपिंग अजून तीन-चार महिने तरी बंद.

सलून अजून तीन-चार महिने तरी बंद. मी trimmer लावून गोटा केला आहे. मुलाचे केस यूट्यूब वर पाहून घरीच कापले.

इतर मिपाकरांचे आणखी अनुभव आणि कल्पना वाचण्यास उत्सुक.

ताप मोजण्याची आयड्या भारीये वॉचमनची.. =))
बाकी इतके पहारे किती दिवस टिकणार हे बघायचंय.

चौकटराजा's picture

24 May 2020 - 9:58 am | चौकटराजा

सेंट ,अत्तरे यान्चे फवारे मागे पडणार व सानिटयझर फवार्‍याला मागणी येणार ! लग्नात कर्यालयात दारातच सनिटयझरचे कारंजे ! हळदी़कुन्कवाला सानिटायझर लुटायचा !

गोंधळी's picture

24 May 2020 - 10:30 am | गोंधळी

स्टॉक टेकिंग साठी म्हणुन ते घालून माझे सहकारी शॉपफ्लोअर ला गेले तर उकाड्यामुळे आणि श्वासामुळे त्यावर बाष्प जमा झाले आणि समोरचे काही दिसेनासे झाले त्यामुळे ते काढूनच काम करावे लागले.

साधा मास्क लावुनही जास्त वेळ नाही राहु शकत आहे. ऑक्सिजन कमी घेतला जातो त्यामुळे अस्वस्थ वाटते.

साधा मास्क लावुनही जास्त वेळ नाही राहु शकत आहे. ऑक्सिजन कमी घेतला जातो त्यामुळे अस्वस्थ वाटते *****
अगदी अगदी ! मी तर मास्क घालून काम करण्याचा भयंकर प्रयत्न केला, पण नाही जमत अजून ! कोरोनाच्या आधी गुदमरल्यानेच मरण येईल की काय, असे वाटते... :(

माहितगार's picture

23 May 2020 - 6:25 pm | माहितगार

पैजारबुवांच्या खुसखुशीत प्रतिसादामुळे पुन्हा गंभीर होणे कठीण जातय पण मुख्य विषया कडे आलेले बरे.

१) एखाद्या विषयाची चर्चा खूप झाली म्हणजे दर्जेदार झालीच असे होत नाही. आणि बरेच लोक सोनाराने कान टोचे पर्यंत ऐकत नाहीत. हे लक्षात घेऊन नित्याचे कर्मचारी आणि व्हिजिटर्स यांचा लंग्स स्पेशालीस्ट्शी कॉन्फरंसीगने चर्चा घडवून सेफ डिस्टन्सिंगचे महत्व स्पेशालिस्ट कडून गळी उतरवणे अधिक सयुक्तीक.

२) एक मिस्ड कॉल देऊन अपॉईंटमेंट मॅनेजमेंटचा फ्री अ‍ॅप पिंपरी चिंचवड मध्ये कुणी डेव्हेलप केला आहे व्हिजीटर्स मध्ये दहा मिनीटाचा स्पेस ठेवता येतो. अ‍ॅप मध्ये समस्या जाणवल्यास विशेष अ‍ॅप बनवून घेणे दवाखान्याच्या खर्चा पेक्षा नक्कीच कमी असावे.

३) शक्य झाल्यास कागदपत्रांची कॉपी आणि काम याची माहिती आधीच व्हॉट्सअ‍ॅपवर मागवून मग अपॉईंंटमेट देणे.

४) अनावश्यक कागदपत्रे जोडून पाठवली जाणार नाहीत याची दक्षता सूचना देणे

५) कागदपत्रे आणि नोटांना युव्ही लँप मधून सॅनिटाईज करता येऊ शकेल का हे तपासणे. अधिक शंकास्पद कागदांपत्रे सरळ सरळ इस्त्रीने गरम केलेल्या कागदांमध्ये किंवा कपड्यात ठेवणे

५) कागदपत्रे हातात घेण्यापुर्वी आणि नंतर सॅनीटायझर ओघाने आलेच.

६) सिसि टीव्ही कॅमेरा तपासण्यास विशेष व्यक्ती नेमून किमान अंतर पाळले जाते आहे ना पहाणे.

७) शक्य असल्यास व्हिजीटर्स आणि स्टाफसाठी मोफत गरम पाणी / सुप्स तसेच घसा खव खवू नये म्हणून ओव्हर द काऊंटर मिळणार्‍या विविध प्रकारच्या गोळ्या जसे कंठ सुधा हॉल्स स्ट्रेप्सिल्स उपलब्ध करुन ठेवणे जेणे करुन शिंक आणि खोकला अचानक येण्याच्या शक्यता कमी होतील .

८) अती भेटीची त्यामुळे कोरोना दृष्टीने जोखीमीची जागा असल्याने ६ फुटांचे शारिरीक अंतर पाळण्याचे आवाहनाचे बोर्ड ऑफीस पासून ३०० मीटर अंतरा पासून लावणे

९) ऑफीस मध्ये एका वेळी किती व्हिजीटर असतील आणि त्यांच्या कामाचा किती वेळात निपटारा होईल यावर बंधन घालणे .

९) बाहेरील व्यक्ती दुरुस्ती इत्यादीसाठी असेल आणि रुम मध्ये किमती वस्तू न ठेवता कामाची जागा जास्तीत जास्त मोकळी ठेवणे

७) घरी नाजूक तब्येतीची व्यक्ती नसेल तरी तशी आहे असे सांगून अधिकतम अंतर पाळले जाण्याची तुमची अपेक्षा असेल असे जिथे जात आहात तिथे आधीच पुर्वसुचना देऊन अधिकतम अंतर पाळले न जाणारा वेळ कमीत कमी असेल असे पहाणे.

८) बाहेर जाताना पायात सॅनिटाईज केलेले मोजे, हात कव्हर करणारे सनकोट, डबल मास्क म्हणजे एक मास्क व वर रुमालाने किंवा ओढणी पदर प्लस्टीक शिल्ड पैकी सोईस्कर न गुदमरणार्‍या पद्धतीने लपेटून घेणे काही कारणाने एक लूज झाले तर दुसरे काम करत रहाते. प्लास्टीक शिल्ड मास्क नसेल तर चष्मा किंवा गॉगल

९) सोबत पुरेसे पेपर नॅपकीन व सॅनिटायझर असा किमान जामा निमा असावा

माहितगार's picture

23 May 2020 - 6:31 pm | माहितगार

तुम्ही रोज करोना ग्रस्तांना मदतीस जाता असे सांगितले तरी मी मी म्हणणारे दूर पळतील. :)

चौथा कोनाडा's picture

24 May 2020 - 11:04 am | चौथा कोनाडा

एक मिस्ड कॉल देऊन अपॉईंटमेंट मॅनेजमेंटचा फ्री अ‍ॅप पिंपरी चिंचवड मध्ये कुणी डेव्हेलप केला आहे व्हिजीटर्स मध्ये दहा मिनीटाचा स्पेस ठेवता येतो.

याचा खुपच उपयोग होईल !

चौकटराजा's picture

24 May 2020 - 10:05 am | चौकटराजा

कोरोना सोबत तोच जगू शकतो जो 100% फिट आहे त्यातही तो इतरांना लागण होण्यास कारणीभुत ठरू शकतोच... एक बळी तरी हो नाहीतर बळी घेणारा वाहक तरी हो ..... चॉईस इज युवर्स अशी वेळ आली नव्हे येणार आहे ! असे झाले तर लोकशाही प्लस लोकसन्ख्या म्हण्जे सर्वनाश हे भारताबाबत घडू शकते.

बऱ्याच दुकानांत पुरवठा नसल्याने एका ठिकाणी सगळे मिळत नव्हते
सगळ्या दुकानात(मेडिकलसकट आणि भाजीवाले सुद्धा ) एक जाणवले कि लोकांना (दुकानदारांना )मास्क चा थोडाफार त्रास होतोय
सगळ्यांचे हात सारखे मास्क ला जात होते नाकाच्या बाजूला आणि एका वेलनेस (मेडिकल चे मॉल सारखे रूपांतर केले असते )च्या दुकानात तर विक्रेतीने मास्क काढून ठेवला होता
एका किराणा दुकानात एका दुकानदाराने एका ग्राहकाला सामान दिल्यावर हात sanitizerne स्वच्छ केले मास्क होताच पण त्या वासानेच त्याला खोकल्याची उबळ आली दुकानातच एका कोपऱ्यात बसून मास्क काढून खोकून त्याने पाणी प्यायले मला सामान देणारा अर्थातच दुसरा होता (पण तो त्याच्या बाजूला होता)
असो
मास्क उपलब्ध नसल्याने एका ठिकाणी विक्रेत्याने रुमाल लावला होता
वरील सर्व उदाहरणांत मास्क लावण्याचा उद्देश fail झाला
आज एका वृत्तवाहिनीवर मास्क चे side इफेक्ट्स दाखवत होते
मास्क न वापरता आपण फैलाव रोखू शकत नाही का ? मास्क मुळे श्वास अडकल्यासारखे वाटते
कारण एकदम सुरवातीला (साधारण मार्च च्या ३ ऱ्या आठवड्यात) आरोग्यमंत्र्यांनी सगळ्यांना मास्क ची गरज नाही असे सांगितले होते पण आत्ता उगाचच रिस्क नको
मास्क पेक्षा मुली ओढणी /स्ट्रोल ने पूर्ण चेहरा झाकतात तशाच पद्धतिने चेहरा झाकायला हवा असे वाटते

मराठी कथालेखक's picture

25 May 2020 - 5:24 pm | मराठी कथालेखक

मास्क मुळे श्वास अडकल्यासारखे वाटते

ज्यांन सवय नाही त्यांनी थोडा थोडा वेळ मास्क खाली घ्यावा म्हणजे तो फ्क्त तोंड झाकेल नाक नाही असा. तसाही तोडावाटे तुमच्या खोकण्या व शिंकण्यातून वा काहींच्या बाबत बोलण्यातुनही तुषार इतरत्र उडतात. मग सवयीने जमेल हळू हळू. दुकानदारांनी ग्राहक नसताना मास्क खाली घ्यायला हरकत नाही.

करोना आणि इन्शुरन्स पॉलिसी यांचे नक्की कसे गणित आहे..?

आपल्या सगळ्या चालू पोलिसी करोनाला बाय डिफॉल्ट कव्हर करणार आहेत का..?

चौकटराजा's picture

24 May 2020 - 6:31 pm | चौकटराजा

हा अत्यंत महत्वाचा मुद्दा माझ्या मनात पण इतके दिवस का कुणास ठाउक राहून गेला. तुझी पॉलिसी वाचून पहा ! साथीचे रोग असे काही जनरल स्टेटमेंट आहे का ? एव्हाना इन्सुरन्स कम्पन्या आपल्या वकिलाला भेटायला गेल्या देखील असतील !

होय आपल्या सगळ्या चालू पोलिसी करोनाला बाय डिफॉल्ट कव्हर करणार आहेत मला माझ्या विमा कंपनीकडून तसा मेसेज पण आला आहे लेखी (युनिवर्सल सोम्पो - सेमी गव्हरमेंट आहे)

सुबोध खरे's picture

24 May 2020 - 6:32 pm | सुबोध खरे

होय
विमा नियमन प्राधिकरणाच्या पत्रकाप्रमाणे करोना विषाणूमुळे होणाऱ्या रोगामुळे झालेल्या खर्चाचा परतावा आपल्या आरोग्य विम्यातून मिळू शकतो असे माझ्या आकलनाप्रमाणे आहे
IRDAI asks insurance companies to cover coronavirus
Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) has asked insurers to expeditiously attend to claims for treatment of coronavirus
https://www.google.com/amp/s/m.businesstoday.in/lite/story/irdai-insuran...

https://www.policybazaar.com/health-insurance/articles/irdai-issues-guid...

सुबोध खरे's picture

24 May 2020 - 6:35 pm | सुबोध खरे

माझ्या वैद्यकीय माहीतीनुसार आरोग्य विम्यात संसर्गजन्य रोग सुद्धा कव्हर होतात आणि कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आशा कंपन्यांना हा दावा नाकारता येणार नाही.
एकंदर कंपन्यांची ख्याती पाहता ते त्यात काड्या घालण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही परंतु काटछाट करून का होईना बऱ्यापैकी रक्कम ग्राहकांना द्यावीच लागेल असे वाटते.

Rajesh188's picture

24 May 2020 - 7:05 pm | Rajesh188

मेडिकल पॉलिसी मुळे हॉस्पिटल चे उपचार खर्च काही तरीच वाढला आहे ते एक दृष्ट चक्र आहे.
जसे कमी व्याज दरा मुळे घरांच्या किमती भरमसाठ वाढल्या .
तसाच हा प्रकार आहे.
कॉरोना हा साथीचा आजार आहे.
त्याच्या सोबत जगणे म्हणजे भीती च्या छायेत जगणे.
Santizer चा वास भयंकर येतो नकोसा वाटतो जास्त दिवस तो वापरला तर नवीनच कुठला रोग व्हायचा ही भीती वाटते.
मास्क तुमचे खात्री नी संरक्षण करू शकत नाहीत .
श्वास बरोबर व्हायरस आत मध्ये जाण्याची काही टक्के तरी शक्यता असणार.
साथी येतात आणि जातात तो निसर्गाची प्रक्रिया आहे.
तशी ही साथ पण जाईल.

सुबोध खरे's picture

24 May 2020 - 10:53 pm | सुबोध खरे

Santizer चा वास भयंकर येतो नकोसा वाटतो जास्त दिवस तो वापरला तर नवीनच कुठला रोग व्हायचा ही भीती वाटते.

सॅनिटायझर च्या वासाने काहीही होणार नाही
त्यात फक्त आयसो प्रोपाईल अलकोहोल (३ कार्बन) असतं. त्याचे शरीरात क्रेब (ग्लुकोज) सायकल मध्ये ज्वलन होऊ शकतं.

मास्क तुमचे खात्री नी संरक्षण करू शकत नाहीत .

मास्क येऊ हेल्मेट सारखे आहेत.
१०० टक्के नाही तरी दोघांनी मास्क घातला असेल तर संसर्ग ( संक्रमण) ९५ % टाळला जातो

मास्कचे वेगवेगळे आकार बदलून बघीतल्यास आपाप्ल्या चेहर्‍याच्या आकाराला सुटेबल मास्क जमावयास हवा. शिवाय रुमाल, ओढणी हे प्रकार १०० % अ‍ॅडज्स्टेबल असतात . मी स्वतः मास्क + रुमाल एक घसरले तर दुसरे रहावे म्हणून वापरतो. तसे नाही तरी केवळ रुमाल, ओढणी नेही नाक तोंड किमान स्वरुपात झाकले जाते तेवढेही न करता एक्सक्युजेस देणे टाळणे श्रेयस्कर नसावे का ? कारण एकाने टाळून शूर होण्याचा प्रयत्न केला की इतरांनाही मुक्तनासिकामुखशौर्याकर्षण होण्याची शक्यता असावी. मुक्तनासिकामुखशौर्याकर्षण म्हणजे जिवाणू वीषाणू प्रदुषित हवेस मुक्त वाव नव्हे काय >

मॉल बहुदा 15जून पासून सुरु होणार आहेत, पण स्टोरमधील 50 स्टाफ तसेच कस्टमर म्हणल्यावर सतत लोकांच्यात राहिल्यामुळे संसर्गाची शक्यता आणि भिती वाढते, पण बहुदा पूर्वीसारखी गर्दी होण्यासाठी अजून दोनएक महिने वेळ लागेल.

पावसामुळे कोरोनाची वाटचाल कशी असेल हे सांगणे कठीण आहे.

एक म्हणजे हवेतील प्रदूषण कमी होईल ( तरंगणारे कां पाण्याने खाली बसतात आणि धुतले जातात).

शिवाय उघड्या जागेत असलेले विषाणू धुतले जातात.

परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्दी खोकल्याचे आणि फ्लूचे इतर विषाणू कार्यरत होतात त्यामुळे तुमची सर्दी (खोकला किंवा ताप) हि अशा सध्या विषाणूंची आहे कि कोव्हिडची आहे हे सांगणे कठीण आहे.

पावसाळ्यात एकंदर बाहेर भटकत फिरणारे लोक कमी होतात त्यामुळे लॉक डाऊन सारखा परिणाम मिळेल.

या सर्वांचा एकत्रित परिणाम काय होईल हे सांगणे कठीण आहे.

त्यातून या रोगाचा जगभरातील अनुभव फारच त्रोटक आहे त्यामुळे तज्ञ सुद्धा हातचे राखून बोलताना आढळतील.

कागदपत्रे हाताळण्याकरता काही शक्यता: आपल्याकडे काही Cashier Booth मधल्या व्यवस्थेपासून कल्पना घेऊन

१. कागदपत्रे सरळ देणार्‍याकडून घेणार्‍याकडे हातबदल होण्याऐवजी एका दोन तोन्डाच्या Acrylic पेटीत (म्हणजे पारदर्शक असल्यामुळे कागद पत्रे नेहेमीच नजरेत रहातील) देणार्‍याने आपल्या बाजूकडच्या तोन्डातून ठेवायची. पारदर्शक असण्याची जरूर नसल्यास stainless steel चा वापर करून, निर्जन्तुकीकरण जास्त सोपे होईल.
२. त्या पेटीत झटपट निर्जन्तुकीकरण कसे व्हावे याकरता काहीतरी व्यवस्था : जसे UV light, गरम हवेचा फवारा (या करता काहीतरी जरूरीप्रमाणे "जुगाड" करणे आवश्यक)

३. अशी निर्जन्तुक झालेली कागदपत्रे घेणार्‍याने आपल्या बाजूकडच्या तोन्डातून घ्यायची.

या करता जो वेळ आणि पैसा यान्ची गुन्तवणूक लागेल, ती अर्थातच ही अडचण नक्की किती मोठी, कठीण आणि critical आहे त्यावर ठरवावी लागेल.

कागदपत्रे हाताळण्याकरता काही शक्यता: आपल्याकडे काही Cashier Booth मधल्या व्यवस्थेपासून कल्पना घेऊन

१. कागदपत्रे सरळ देणार्‍याकडून घेणार्‍याकडे हातबदल होण्याऐवजी एका दोन तोन्डाच्या Acrylic पेटीत (म्हणजे पारदर्शक असल्यामुळे कागद पत्रे नेहेमीच नजरेत रहातील) देणार्‍याने आपल्या बाजूकडच्या तोन्डातून ठेवायची. पारदर्शक असण्याची जरूर नसल्यास stainless steel चा वापर करून, निर्जन्तुकीकरण जास्त सोपे होईल.
२. त्या पेटीत झटपट निर्जन्तुकीकरण कसे व्हावे याकरता काहीतरी व्यवस्था : जसे UV light, गरम हवेचा फवारा (या करता काहीतरी जरूरीप्रमाणे "जुगाड" करणे आवश्यक)

३. अशी निर्जन्तुक झालेली कागदपत्रे घेणार्‍याने आपल्या बाजूकडच्या तोन्डातून घ्यायची.

या करता जो वेळ आणि पैसा यान्ची गुन्तवणूक लागेल, ती अर्थातच ही अडचण नक्की किती मोठी, कठीण आणि critical आहे त्यावर ठरवावी लागेल.

कागदपत्रे हाताळण्याकरता काही शक्यता: आपल्याकडे काही Cashier Booth मधल्या व्यवस्थेपासून कल्पना घेऊन

१. कागदपत्रे सरळ देणार्‍याकडून घेणार्‍याकडे हातबदल होण्याऐवजी एका दोन तोन्डाच्या Acrylic पेटीत (म्हणजे पारदर्शक असल्यामुळे कागद पत्रे नेहेमीच नजरेत रहातील) देणार्‍याने आपल्या बाजूकडच्या तोन्डातून ठेवायची. पारदर्शक असण्याची जरूर नसल्यास stainless steel चा वापर करून, निर्जन्तुकीकरण जास्त सोपे होईल.
२. त्या पेटीत झटपट निर्जन्तुकीकरण कसे व्हावे याकरता काहीतरी व्यवस्था : जसे UV light, गरम हवेचा फवारा (या करता काहीतरी जरूरीप्रमाणे "जुगाड" करणे आवश्यक)

३. अशी निर्जन्तुक झालेली कागदपत्रे घेणार्‍याने आपल्या बाजूकडच्या तोन्डातून घ्यायची.

या करता जो वेळ आणि पैसा यान्ची गुन्तवणूक लागेल, ती अर्थातच ही अडचण नक्की किती मोठी, कठीण आणि critical आहे त्यावर ठरवावी लागेल.

बिगबास्केट वरून मागवण्याचा कोणाला अनुभव आहे का?

किती दिवसात डिलिव्हरी होते? आणि भाज्या वगैरे पण मिळतात का?
भाज्या महाग वाटल्या
आमच्या इथे रेड containment झोन असल्यामुळे बहुतेक डिलिव्हरी नाहीचे

अवांतर - आत्ता news वर लॉक डाऊन मध्ये शिथिलता दिल्यावर रुग्ण वाढले अशा headingchya बातम्या दाखवतायेत
तसेच विमानसेवा ,बस सेवा चालू करण्याची घाई करत आहेत असे वाटते

सस्नेह's picture

26 May 2020 - 9:13 am | सस्नेह

विमानसेवा इ. सुरु करायला इतकी गडबड नको आहे. विशेषत: ग्रामीण व निमशहरी भागातली वाढती रुग्णसंख्या आणि अपुर्या वैद्यकीय सुविधा लक्षात घेता हे घातक आहे.

माझे २ व्यवसाय आहे त्यातला एक गेले ४ महिने आपल्या लॉकडाऊन च्या आधी दीड एक महिन्यापासून ठप्प आहे आणि पुढील निदान ६/८ महिने तो फारतर १०% क्षमतेने चालू होईल.

दुसरा व्यवसाय म्हणजे स्टेशनरी आणि व्हरायटी शॉप आणि सिजनल फूड चे आहे. १७ मे पासून स्टेशनरी दुकान सकाळी ८ ते २ चालू ठेवत आहे.

दुकान चालू करायच्या आधी पूर्ण दुकानं साफ केले आम्ही (dettol आणि इतर काही समान वापरून) तसेच दुकानाबाहेर प्रवेश मार्गावर आडवे टेबल टाकून मार्ग बंद आहे, तसेच बाहेर लोकांना उभे राहण्यासाठी ४ गोल आखले आहेत त्यातच उभे राहण्यास सांगतो आम्ही त्यांना जेणेकरून distance पाळला जातोय.
मुख्य म्हणजे आम्ही वस्तू देऊन झाली कि प्रत्येक वेळी sanitizer वापरतोय.

सध्यातरी इतकेच हातात आहे बाकी जसे सुचेल तसे बदल करतोय छोटे मोठे.