भाग ७ प्रतापगडाची उलटवलेली बाजी - जावळीतील सैन्य व्यूह

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
21 Mar 2020 - 12:37 am
गाभा: 

भाग ६


जावळीतील सैन्य व्यूह

जावळी नुसते एक गाव नसून त्या काळात विस्ताराने, लोकसंख्येने व मानाने मोठे संस्थान होते. भावाभावात ८ ठिकाणात वाटलेले असले तरी आदिलशाहीशी ईमान राखून होते.

(चंद्रराव पदावर) येसाजी मोरे जावळीचा संस्थानिक होता. त्याचे महाराजांशी संबंध जाने १६५६ पर्यंत बरे होते. आदिलशाहीतील गादीच्या वर्चस्वासाठी गोंधळाच्या परिस्थितीचा विचार करून जावळी आपल्याकडे करून घेण्यासाठी महाराजांनी मोहीम उघडली. त्या काळात मोरेच्या बाजूने महाराजांच्या सैन्यावर छुपे हल्ले होत होते. पुरंदरहून महाराज १० हजार सैन्यास घेऊन निघाले. सेनेचे दोन तुकडे करून घोडदळाची मोठी फौज रडतोंडी घाटातून जावळीत घातली. लहान पायदळाची तुकडी महाराजांच्या नेतृत्वाखाली म'श्वर मार्गे निसणीच्या अतीशय तीव्र उताराच्या घाटमार्गातून जावळी गावात घुसली. चकित झालेला चंद्रराव फारसा प्रतिकार न होता रायरीला पळाला. महाराजांनी जावळीचा कोट मिळवला. पण महाराजांच्या सैन्यावर चंद्ररावाकडून हल्ले करून हैराण करायची खेळी केली गेली. मात्र शेवटी महाराजांनी त्याचा बंदोबस्त केला. त्यानंतर साधारण (३ महिने ६ एप्रिल १६५६) महाराजांनी तिथेच तळ ठोकला होता. घनदाट जंगलात लपायला सोईचे असल्याने बलाढ्य शत्रूला लोळवायचे असेल तर जावळीच्या जंगलाचा फासच उपयोगी पडेल असे त्यांनी त्याच वेळी मनात ठरवले असावे. जवळच्या भोरप्या वा ढोरप्या नावाच्या प्राचीन गडाची सूक्ष्म पाहणी करून त्याचे दरवाजे, बुरुज, माच्यांच्या डागडुजी करून नव्या रूपात सजवायची आज्ञा दिली. भवानी माता मंदिरात रोज पुजाअर्चा, तेल पाण्याची सोय आपल्या स्वतःच्या खजिन्याकडून चालू केली. किल्ला बांधून तयार झाल्यावर गौरवाने त्याला प्रतापगड नाव दिले.

३ महिने जावळीत राहिल्यामुळे वेगवेगळ्या वाटा, घाटमाथे, नद्यांच्या काठावरून चढणीचे मार्ग वगैरे त्यांच्या मनात ठसले होते. काहींना एकदा पाहिले, ऐकले, वाचले की पक्के लक्षात राहते ही देणगी जन्मजात मिळते. महाराजांना ती मिळाली असावी. म्हणून जुन्या आठवणीतून महाराजांनी राजगडावरून मसलत करून नुकत्याच डागडुजी केलेल्या प्रतापगडाची निवड केली. समजा मधल्या काळात पुरंदरवर हल्ला झाला तर त्याच्या रक्षणासाठी घोडदळाचे सरनौबत नेतोजी पालकरना ठेवून दिले. जुलैच्या १० तारखेपर्यंत आपल्याबरोबर मोरोपंत पिंगळे, कान्होजी जेधे, बांदल, शिळीमकर, बाजी सर्जेराव, रंगनाथ पासलकर अण्णाजी दत्तो यांच्या छबीन्यातील पायदळाच्या साधारण ३ ते ४ हजार शिपायांच्या तुकड्यांना घेऊन भर पावसात प्रतापगडावर राहायला गेले. रघुनाथ बल्लाळ अत्रेंनी कोकण पट्टीतील घोडदळाचे २ हजार सैनिक आणायला आज्ञा दिली गेली. तुफान पावसाळ्यात सर्व सैनिकांची राहायची, खाण्याची सोय जावळीच्या गावात आणि आसपासच्या खेड्यात केली. पावसाचा जोर कमी होत गेला. त्यानंतर वाटाघाटीतून खानाने जावळी खोर्यात यायचे कबूल केल्यावर आपल्याला कडील सरदारांनी कुठे आपले सैनिक लपवून ठेवायचे याची चर्चा झाली.

खानाचे जावळी खोऱ्यात आगमन

वाईहून खान बिनकामाचे प्रचंड संख्येत असलेले लोक, जनावरे वाईतच तळावर सुरक्षित ठेवून निवडक स्वतःचे ५ हजार पायदळ आणि २ हजार घोडदळ सैन्यास घेऊन पहाटे निघाला. सैन्याच्या बरोबर त्याचे मोठे नामी सरदार आपापल्या सेनेच्या जत्थासह आज्ञापालन म्हणून येत होते. आपले सरदार सिवाच्या भेटीला जंगलात जायचे ठरवल्याने खट्टू आहेत हे तो जाणून होता. जावळीतील सापळ्यात सिवा आपणहून अडकलेला आहे. अशा वेळी माझ्यासारख्या अचाट साहसी, बलवान, शूरवीराने त्याच्या घरात जाऊन त्याचा निकाल लावला तर त्यात माझी इभ्रत आणि शान वाढणार आहे. या त्याच्या जोरदार म्हणण्याला कोणाकडेच उत्तर नव्हते! ही मोहीम फत्ते झाली की हेच आदिलशाहीशी सध्या इमानदार असलेले पण आत्ता माझ्यावर रुसलेले सरदार माझ्या नेतृत्वाखाली यायला उतावीळ होतील! अशी त्यांची खात्री होती!
हत्तीवरून जायची हौस असूनही तायघाटात चिंचोळ्या, वेड्यावाकड्या वाटा चढताना तो कधी घोड्यावर तर कधी आत्ता उतरून पायी चढत होता. पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही जंगलाच्या लढाईची यातायात जास्त काहीच नाही असे त्यांचे पक्के मत बनले होते.
चिखली गावातून तायघाट चढेपर्यंत तो सर्वात मागे होता. कोणी कुचराई करून मागच्या मागे सटकून जाऊ नये म्हणून त्याला ही दक्षता घेणे आवश्यक होते. आपण लावलेल्या बिगारांनी पाथरवट, गवंडीं बरोबर दुरुस्तीचे काम चांगले केले आहे, हे त्याच्या सूक्ष्म नजरेतून सुटले नाही. दुपारी घाट संपून भिलार गावाचा तिठा पार पडला. शस्त्रे व इतर सामान घेऊन जाणार्या बैलांच्या पाठीवरील झुलीप्रमाणे लादलेल्या कंठाळ्यातील पडशातून बरोबर आणलेल्या आणलेले खायचे पदार्थ खाऊन पुढच्या प्रवासाला निघाले.

त्यानंतर तो पुढे - बाकीचे मागे, असे करत मेटगुताड, गुरेघर, लिंगमळा, वेण्ण्या तलावाच्या काठाने रडतोंडी घाटापाशी आला. आपल्या सैन्याचे मनोधैर्य उंचावायला ३ महिने खाऊन पिऊन सुस्त पडलेल्या सैनिकांना उद्देशून खणखणीत मोठ्या आवाजात म्हणाला, 'माझी प्रचंड शरीरयष्टी, माझी पराक्रमी कारकीर्द, माझी युद्धात कधीच पळून न जायची वृत्ती तुम्ही ओळखता. मी म्हणजे जय असे खुद्द आदिलशाहनी मला या मोहिमेवर जाताना गौरवले होते. आता तुम्हाला तुमचे शौर्य, साहस पणाला लावून मोठ्या कष्टाने ही मोहीम फत्ते करायची संधी अल्लाच्या मेहेरबानीमुळे आली आहे. जंगलातील लढाई या पैकी अनेकांनी पहिल्यांदाच खेळली असणार आहे. पण मी अशा या जंगलात दिवस रात्री ना खाता न पिता, मोहिमांमध्ये यशस्वी झालो आहे. तुम्हीही उमदेपण दाखवा. तुमच्या पराक्रमाची शर्थ करा. तुम्हारे हाथों से दुश्मन काफिरोंकी मौत इन्शाह अल्ला इंतजार करती हैं. तरक्की आपके पांव चूम रही हैं. फिर ७२ हूरें तुम्हें यही मिलेंगी!’
अफझलखानाची ललकारी देणारे त्याची पदवी म्हणून शेवटी झिंदाबाद असे वदवून घ्यायला तत्परतेने भोंग्यावरून पुकारत राहिले. पहिल्या नमाजानंतर उद्या पहाटे निघालेच पाहिजे असे बजावून बजावून सांगितले गेले. एरव्ही टंगळमंगळ करून नमाज़ी टोपी शोधत नमाज़ाची वेळ साजरी करणारे उद्याच्या नमाज़ाची बांग ऐकताच पहाटे लवकर उठून तयार झाले. निघाल्यावर वाटेतील भीषण निसर्ग पहात रडतोंडी घाटातील वेडी वाकडी वळणे पार करताना त्यांना आपण नक्की कोणत्या दिशेने जातोय याचा विसर पडला होता! पावसाळा संपल्यानंतर घनदाट वाढलेल्या वेली, गर्द हिरव्यागार झुडपाच्या फांद्या वारंवार बाजूला करत खानाच्या नौबतखान्याची, हत्तीच्या माहुताची त्रेधा उडत होती. त्यांच्या चेंगटचालीला कंटाळून खान आपल्या आवडत्या घोड्यावर स्वार होऊन पटापट पुढे सरकत गेला.
सरदारांच्या सेना सावकाश, सावधपणे खाली उतरून कोयनेच्या काठावरील वेळूच्या बनात आपापल्या टोळ्यांचे कोंडाळे करून तळ ठोकला. तिथून जवळ जावळीच्या मुख्य कोटाकडून येणारे कोयना नदीचे पात्र होते. प्रतापगडावर चढून जायला नेणारी वाट तिथून पुढे सुरू होत होती.

खानाचा शाही हत्ती डुलत यायला वेळ लागला, तोवर खानाच्या राहण्याची सोय जावळीच्या मोऱ्यांनी आपल्या महालात केली. भेटीची तारीख १० नोव्हेंबर ठरली होती. त्याआधी २ रात्री म्हणजे ७ तारखेला रात्री उशिरापर्यंत दिवट्यांच्या प्रकाशाच्या अनुरोधाने सैनिकांचे जथ्थे येत राहिले. खान जातीने लक्ष घालून कोण सरदार कुठे तळ ठोकून हवेत यावर आपले निर्णय देत होता. खानाने रात्रीची विश्रांती घेऊन आपल्या सरदारांशी पुढील हालचाालींसाठी चर्चेला ८ तारखेला सकाळी नमाज़ नंतर बोलावले. त्यात चार प्रमुख प्रस्ताव होते.
१. मला १५०० कसलेले बंदे पाहिजेत. जे पटापट डोंगर चढून माझा मोठा मुलगा फाज़ल खानाच्या हुकुमाची वाट पहात वाटेत दबा घरून बसतील. ते मी निवडले आहेत.
२. आपल्यापैकी सरदारांनी मी सिवाला भेटून येई पर्यंत मुख्य सेनापती मुसाखान यांच्या आज्ञा पाळाव्यात. अंकुश खान आणि अन्य पठाण सरदारांची सेना, सिद्दीचे सैनिक, मराठा सरदार सरदारांची नेमणूक कुठे करावी याचा निर्णय मूसाखान घेतील.
३. पंत गोपीनाथ वकीलांना बोलवून सिवाला इथे जावळीतील कोटात बोलवायचे म्हणून आदेश दिले होते. तुम्ही प्रतापगडावर यावे तिथे आपल्या आगमनानिमित्त शामियाना उभारून ठेवून आम्हाला आपल्या मेहमाननवाजीसाठी बडदास्त ठेवायला सिवाला संधी द्यावी तर मेहेरबानी होईल. असा त्यांचा प्रस्ताव आला आहे. त्यावर मी मोठ्या मनाने मान्यता दिली आहे.
४. या शिवाय आपल्या बरोबरच्या सरदारांच्या मानपानसाठी भारी कापडाची, रत्नजडित शस्त्रांची भेट देण्यासाठी सिवाने आपल्या बरोबर आलेल्या सराफ, कापड व्यापारी बजाजांना गडावर बोलावले आहे. त्याला मान्यता द्यावी असे मी ठरवले आहे. यातून गडावर काय सैनिकी तयारी चालवली आहे याची माहिती ते परतल्यावर सांगतील.
सर्व सरदारांची संमती आहे असे मी मानतो, “खुदा हाफ़िज़" म्हणून सभा दहा मिनिटांत बरखास्त झाली!
८ तारखेला खानाने आपल्या सेनेची शिरगणती करायला आपल्या सरदारांना आदेश दिले. त्याने प्रत्येक सरदारांची आपणहून चौकशी करून कारवाई कशी करायची. यावर आपले मत सांगितले. शिपायांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आपलेसे करायची संधी त्याने गमावली नाही.
आपल्या १५ शे निवडकांना उद्देशून तो म्हणाला, 'खरे तर मी तुमच्यावर अवलंबून आहे. माझ्या सिवाच्या भेटीनंतर लगेच कर्णा, तुतारी वाजेल. तेव्हा तुम्ही प्रतापगडावर चाल करून जायचे आहे. मी सिवाला निपटणार आहे. तुम्ही फाज़ल खानाच्या बरोबर जाऊन गड काबीज करायचा'. 'रात तक हमें यहां रुककर बिजापूरको रवाना होना पडेगा.' आपल्या अगदी जवळच्या अंगरक्षकांना वेगळे बोलावून खान म्हणाला, 'तुम्ही घुडसवारों के साथ कोंकणात उतरून राजगड पर जाकर सिवाच्या आई आणि मुलाला जीवंत पकडून माझ्या समोर आणायचे. जो हे काम पूर्ण करेल त्याला प्रतापगडचा किल्लेदार म्हणून नेमणूक करीन.'
दिवसभरात सिवाच्या सैन्याकडून कोणताच हल्ला झाला नाही यावरून सैनिकांना सिवा 'डर गया' असे वाटून हाय से वाटले. मात्र काही सरदारांच्या राहुट्यात चर्चा सुरू झाली की काही तरी गडबड आहे. आपण येण्याच्या आधी सिवाचे लोकांनी शरारत करायला डाव रचला आहे. आपल्याला त्याचे सैन्य कुठे लपवले आहे याचा शोध घेण्यासाठी आपले हेर आजूबाजूला पाठवले पाहिजेत.
नेतोजी पालकरचे घोडदळ पुरंदरला आहे कि या गडावर आहे? आपल्यावर अचानक हल्ला आज रात्री होऊ शकतो. त्यामुळे सरदारांनी आपापल्या हाताखालच्या सेनानींना सतर्क रहा म्हणून इशारा दिला.
९ तारखेला व्यापारी लोक गडावर गेले ते परत आले नाहीत. यामुळे चिंता वाढली. चंद्रराव मोरे किल्लेदारावर काम दिले, 'खंडोजी खोपडेला शोधून समोर आणा. तो सिवा कडून मिळाला होता. त्याचे वर लक्ष ठेवा. कान्होबा नाईक जेधे कुठे लपला आहे ते शोधून काढा. तुला जर जमले नाही तर तुझी किल्लेदारी गेली आहे असे समज. जा कामाला लाग'.
खानाने आपल्याबरोबर आलेल्या मराठा सरदारांची भेट घेतली. 'तुम्ही जर सिवाला मदत केली तर तुमचे मुंडके मी माझ्या हाताने कापीन' असा सज्जड दम भरला!
अजगराप्रमाणे आवळत आणलेल्या विळख्यातून सिवा सटकता कामा नये यासाठी त्याने विचारपूर्वक सर्वांना कामाला लावले.
खानाचा एक जुना बुढ्ढा सेवक सर्व पहात होता. गुसलखान्यापासून ते खानाच्या हत्यारांची तपासणी, धार करणे, अंगरखे धुणे, गुडीगुडी तयार करणे, खाण्याचे पदार्थ आधी खाऊन विषबाधा न होऊन देणे, रात्री बिछाना लावून पाय चेपणे कामात तत्पर त्याच्या नजरेत एक बात खटकत होती. खानाकडे संपूर्ण छातीभराचे चिलखत नव्हते. जी होती ती जुनी, आडमाप होती. खानाने चिलखत घालावे असे सुचवले तर तो आपल्यावरच ओरडेल की तू का नाही बरोबर घेऊन आलास? म्हणून तो गप्प बसला!
१० तारखेला सकाळी नमाज़ अदा करून नाश्त्याला त्याने कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला बोलावले. त्याने दोघांच्या बाजूने तयार केलेला तहाचे मसौदे वाचून दाखवले. भेट घ्यायला काय रीत (प्रोटोकॉल) सांभाळायची? तहावर सही शिक्के मारून झाल्यावर काही खास खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे का? वगैरे विचारून घेतले. अंगावर शेरवानी चढवताना तिथे ठेवलेले चिलखत त्याने पाहिले. घालावे कि न घालावे असा विचार करत असताना, 'मी असा बलवान, कधी ना हार जाणारा, मला कोणाची भिती?' असा स्वतःच्या शक्तीवरील गर्व झाला.

महाराजांच्या कडून खान जावळीत आल्यापासून २ दिवसात काही सैनिक हालचाली झाल्या नाहीत. फक्त पंत खानाची योग्य बडदास्त ठेवली जाते आहे, मसौदा तय्यार आहे, वगैरे माहिती घेत होते. नेतोजी नेमका कुठे असेल? त्याने वाईच्या खानाच्या तळावर तुफान हल्ला करून पूर्ण नाश करायचा आहे. मोरोपंत पिंगळे यांनी पार तिठ्याकडून हल्ला करून कोयनेच्या पात्रात खानाच्या सेनेला दाबून धरले पाहिजे. तोफांच्या आवाजानंतर त्यांनी गडावर येऊन गड हातातून जाऊ नये म्हणून शिकस्त करायची. बाकी सर्व सरदारांची सेना गेले ३ दिवस झाडीत लपून राहिलेले आहेत त्यांनी आपल्या पोटा पाण्याची सोय केली असेल का? बाबा भोसलेंना महाबळेश्वरच्या मंदिर परिसरात लपायचा सांगितले आहे, त्यांच्या हातून काही गफलत होणार नाही ना, नारायण बामण, अत्रे, कान्होजी जेधे यांच्या कडून जबर शौर्याची अपेक्षा आहे, असे महाराजांनी सहकाऱ्ऱ्यांना बोलून दाखवले.

१० तारखेला सकाळी भवानी मंदिरात पूजा करताना, त्यांच्या मनात तीन पर्याय आले.
आम्ही दोघेही मरू.
खान मरेल मी जखमी.
मी मरेन खान जबर जखमी होऊन पुन्हा परत येणार नाही.
माझ्या पश्चात सुरू केलेला लढा मां साहेबांनी चालू ठेवावा, बाकी तो श्रींची इच्छा!

भेटीचा वृतांत

पंतांनी खालून पाठवलेला निरोप ऐकून १५ शे हशम जनीच्या टेंभावरून गड घेण्यासाठी वर आले तर आपल्या सेनेला खानाच्या सैनिकांना कापून काढायला अवसर मिळणार नाही हे जाणून महाराज गडावरून खाली यायला तयार होईनात. १५शे हशमांना कोयनेच्या पात्राकडे पाठवा म्हणून तक्रार केली. खानाच्या कानी पडल्यावर 'आता हे काय नवे लचांड?' म्हणून वैताग वाढला. 'ठीक आहे! पण सिवाला बोलवा', असा निरोप कृष्णाजी भास्कर कुलकर्णींतर्फे दिला व हशम परत गेले!
शामियान्याची शोभा पाहून खान खूष झाला. 'चूहेने बड़े चाव से बिल सजाया है!'
सिवा आला. रीतीने दोघांची ओळख वकीलांनी करून दिली. मंचावर चढून जाऊन तहनाम्यावर शिक्कामोर्तब करायला म्हटले गेले. रीत न पाळता खानाने प्रेमाने सिवाला जवळ करायला हात पसरले. महाराजांना पर्याय नव्हता. त्यांना जुजबी जवळीक निर्माण होईल इतपत जवळ जाणे भाग पडले. खानाच्या हातांचा विळखा घट्ट होत गेला. पाठीवरून सरकन शस्त्र चालल्याने धक्का बसला. आता संधी आहे म्हणून महाराजांनी खानाच्या पोटात शस्त्र खुपसले. आणि पोट फाडले. खान हातातील शस्त्र टाकून 'या खुदा' म्हणून, जखमी पोटाला आवरून धरून मंचावरून धडपडत खाली आला. तेव्हा वकिलांनी मदत केली. महाराज गडाकडे धावत सुटले. खानाला भोयांनी पालखीत घालून न्यायला सुरूवात केली. खानाच्या, महाराजांच्या बाजूच्या शिपायांच्यात हातघाईची मारकाट सुरू झाली. पळणार्या पालखीतून खाली पाडून खानाचे मुंडके धडा वेगळे झाले. अचानक शामियान्याकडून कर्णे, तुतारीचे आवाज येताना ऐकून खानाच्या सरदारांना काम सहजपणे झाले आहे असे वाटत राहिले.


खानाच्या सैन्याची वाताहत

शिवाजी महाराज वर आल्यावर गडावरून तोफांचे आवाज ऐकून लपलेल्या शिवाजी महाराजांच्या सेनेने 'हर हर महादेव' अशी रणगर्जना करून हल्ला बोल केला. गडावरून तोफाबारी का चालू झाली? आता काय करायचं? म्हणून गोंधळलेल्या खानाच्या सरदारांना आपल्या सेनेला काय आदेश द्यावेत हे कळेना. १५ शे हशम गडावर चढायच्या चिंचोळ्या वाटेत अडकून पडले. गर्द झाडीतून एकाएकी आलेल्या मावळ्यांचे प्रहार त्याना सहन करता येईनात. मुसाखानाला खान अजून पालखीतून वरून खाली का येत नाही म्हणून काहीतरी गडबड आहे असे वाटून आपल्या बरोबर सहकार्यांना घेऊन जावळी गावातील कोटाकडून आला. काही तासात खान गारद झालेल्याची बातमी लगेच पसरली. दुपारच्या ४ पर्यंत खानाच्या बाजूने लढणाऱ्या सेनेला भगदाड पडून कुठे पळून जावे ते कळेना. काही वेळाने त्यांना कळले की खानाचा घात करून मारले गेले आहे. 'आपल्याला आता लढण्यात अर्थ नाही' असे लक्षात घेऊन त्याने माघार घ्या म्हणून आदेश दिले. आपल्या महत्त्वाच्या सरदारांना बोलावून या इथून परत वाईला कसे जायचे यावर खल केला. चंद्रराव मोरेला धरून आणले गेले. त्याने आपले काही वाटाडे देऊन कोयनेच्या उगमाकडून निसणीच्या घाटातून वर चढून गेल्यावर महाबळेश्वर पठार लागेल म्हणून बरोबर दिले. फाज़ल खानाला बापाची लाश शोधावी का पळून जावे समजेना. आपल्या दोन भावांना, १५ शे हशमांबरोबर मारले हे ऐकून आता इथे थांबले तर आपणही जगणार नाही असा विचार करून निराश होऊन कोयनेच्या काठाने उगमाकडे निघाला. बाकीचे सरदार त्याला भेटले, कोणी काही बोलत नव्हते. १० तारखेची अंधारातील ती रात्र सर्वांना कायम लक्षात राहिली.


खानाच्या_कबरीचे_सध्याचे_रूप
….

पुढे चालू…

प्रतिक्रिया

> १० तारखेला सकाळी भवानी मंदिरात पूजा करताना, त्यांच्या मनात तीन पर्याय आले.

इथे फोटो तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर इथला आहे, तो त्याऐवजी प्रतापगडाच्या भवानी मंदिराचा पाहिजे का? कारण महाराजाना त्या वेळी तेच मंदिर सहज पूजा करता येण्याजोगे होते.

> १५०० इथे कापले गेले, इथे अडकले ते मेले, इथले शरण आले

ही माहिती कोणत्याच साधनात मला सापडली नाही, त्यावरून बहुतेक ते तुमचे निष्कर्ष असावेत. जर मूळ माहिती वेगळी, त्यावरून तुमचे निष्कर्ष वेगळे आणि ते तसे का असावेत असं जर थोडं लिहिता आलं तर समजून घेणं सोपं पडेल. नाहीतर मग कादंबरी स्टाईल सर्वच काल्पनिक मानायचे असेल तर तसेही चालेल.

> १० तारखेला सकाळी भवानी मंदिरात पूजा करताना, त्यांच्या मनात तीन पर्याय आले.
> आम्ही दोघेही मरू.
> खान मरेल मी जखमी.
> मी मरेन खान जबर जखमी होऊन पुन्हा परत येणार नाही.
> माझ्या पश्चात सुरू केलेला लढा मां साहेबांनी चालू ठेवावा, बाकी तो श्रींची इच्छा!

महाराजांच्या मनातले विचार कुठेच लिहिलेले नाहीत, त्यावरून हा भाग तुम्ही कादंबरीकाराच्या भूमिकेत कल्पनेने लिहिला आहे असं धरून चालतो.

दुर्गविहारी's picture

21 Mar 2020 - 2:17 pm | दुर्गविहारी

या लेखमालेचा प्रमुख भाग संपला आहे असे धरुन सविस्तर प्रतिसाद आता देतो.
सर्वात आधी हे लक्षात घेतले पाहिजे की महाबळेश्वरच्या मुंबई पॉईंट किंवा लॅडविक पॉईंट्वर उभारल्यास समोर प्रतापगड आणि कोयनेचे खोरे पुर्ण नजरेत येते. याचा संपुर्ण आकार एखाद्या वाडग्यासारखा आहे. त्यामुळे या खोर्‍यात उतरलेल्या माणसाला सहजासहजी सुटणे कठीण आहे. युध्दशास्त्राचा विचार केला तर अश्या सैन्यसंख्या विषम असल्याने गनिमी काव्याच्या युध्दासाठी हि अत्यंत आदर्श जागा आहे.
अफझलखान वाईवरुन प्रतापगडाच्या पायथ्याशी कसा आला हे वर्णन रंजक आहे. पण
खानाच्या राहण्याची सोय जावळीच्या मोऱ्यांनी आपल्या महालात केली.
या वाक्याचा अर्थ समजला नाही. वास्तविक चंद्रराव मोरेचा पराभव करुन जावळी हा प्रदेश शिवाजी महाराजानी ताब्यात घेउन या परिसरातील भोरप्याच्या डोंगरावर प्रतापगडाची उभारणी केली असा ईतिहास असताना, या प्रतापगड युध्दात चंद्रराव मोरे कोठून आला ? हा प्रश्न मला पडला आहे.
महाबळेश्वरच्या लॅडविक पॉईंटखाली जावळी नावाचे गाव आहे, इथे चंद्रराव मोरेचा वाडा आहे, हे बरोबर. पण दुसर्‍या दिवशी गडवर शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी प्रतापगडावर जायचे असल्याने तो आजच्या हिशेबाने सात ते आठ कि.मी. वरच्या जावळीत उतरेल असे वाटत नाही. त्याची व्यवस्था वाडा कुंभरोशी किंवा पार या गावच्या हद्दीत केली असावी असे मला वाटते, कारण प्रतापगडावरुन इथे लक्ष ठेवणे सोयीचे होते. उलट उंचीचा फायदा मिळून खानाच्या छावणीवरुन प्रतापगडावरील हालचाली सहजासहजी दिसणार नाहीत. खानानेही बरोबर हेर आणले असणार, पण प्रत्येक वेळा त्याना खानापर्यंत बातमी पोहचवायला, या उंचीच्या फरकामुळे बराच वेळ लागत असणार. तेव्हा हि जागा मला चुकीची वाटते आहे.

१० तारखेला सकाळी भवानी मंदिरात पूजा करताना, त्यांच्या मनात तीन पर्याय आले.

या वाक्याचा अर्थही मला समजला नाही. कारण प्रतापगडाचा प्रसंग १६५९ ला झाला तर महाराजांनी प्रतापगडावर भावानीची स्थापना केली १६६१ मध्ये . मग महाराज भवानी मातेचे दर्शन घेतील हे शक्य वाटत नाही. कदाचीत त्यावेळी गडावर असलेल्या केदारेश्वर मंदिरा दर्शन घेतले असणे शक्य आहे.

१५०० इथे कापले गेले, इथे अडकले ते मेले, इथले शरण आले

हा भाग कल्पना करुनच लिहीला आहे. तरी वाचकांच्या सोयीसाठी थोडी रंजकता ठिक आहे. एक नवीन दृष्टीकोण हि मालिका देती आहे.
बाकी या विषयावर ईंग्लिशमध्ये माहिती देणार्‍या दोन लिंक देतो. उत्सुकता असणार्‍यांनी त्या वाचून घ्याव्यात.

Strategic Movements in the Afzhal campaign

Chhatrapati Shivaji vs Afzal Khan: Pratapgad,1659

पुढील भागाच्या उत्सुकतेत.

शशिकांत ओक's picture

22 Mar 2020 - 12:39 pm | शशिकांत ओक

खालील वक्तव्य कोणाला पटवून द्यायला करत नाही. मात्र माझे विचार कळणे महत्वाचे वाटले म्हणून लिहित आहे.
मनो म्हणतात...

> १० तारखेला सकाळी भवानी मंदिरात पूजा करताना, त्यांच्या मनात तीन पर्याय आले.
> आम्ही दोघेही मरू.
> खान मरेल मी जखमी.
> मी मरेन खान जबर जखमी होऊन पुन्हा परत येणार नाही.
> माझ्या पश्चात सुरू केलेला लढा मां साहेबांनी चालू ठेवावा, बाकी तो श्रींची इच्छा!

महाराजांच्या मनातले विचार कुठेच लिहिलेले नाहीत, त्यावरून हा भाग तुम्ही कादंबरीकाराच्या भूमिकेत कल्पनेने लिहिला आहे असं धरून चालतो.

इतिहासाच्या कुठल्या पानावर काय लिहिलेले आहे किंवा नाही याचा संदर्भ माझ्या सादरीकरणात असेल असे नाही. किंबहुना मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून पाहताना ज्या ठिकाणी पुरावे मिळत नाहीत अशा दुव्यांचे ठिपके जोडून चित्र उभे करायचा प्रयत्न आत्तापर्यंत गेला आहे. म्हणून महाराज प्रतापगडावरून खाली उतराच्या आधी देवी समोर बसलेल्या अवस्थेत मृत्यूच्या दरबारात जायचा प्रसंग आहे अशा मानसिक अवस्थेत जे विचार येतील ते मांडले आहेत. कादंबरीकारांची भूमिका न घेता लेखन करताना या सारख्या प्रसंगातील व्यक्ती - अफ़झलखान असेल किंवा कोणी अन्य मनात काय विचार करतात ते दाखवायला लागेल इतपत कलात्मक स्वातंत्र्य घेणे वास्तववादी आहे. असे वाटते.

शशिकांत ओक's picture

21 Mar 2020 - 8:44 am | शशिकांत ओक

मनो,
आपल्यातर्फे केलेल्या अशा तर्‍हेच्या विचारणा खरे तर इतरांकडून देखील यायला हव्या होत्या.
आणखी कोणाला काही म्हणायचे असेल तर एकत्रित प्रतिसाद द्यायला आवडेल.

एकूण माहितीवरून हे जानवते की अफझलखान हा व्यवस्थित डाव बांधून आला होता. एक चूक " चिलखत न नेसण्याची" झाली आणि डाव उलटला.
शिवाजी महाराजांचे दैव बलवत्तर म्हणून फासे त्याचंया बाजूने पडले.

शशिकांत ओक's picture

21 Mar 2020 - 10:38 am | शशिकांत ओक

तसेच सुचवते...

शशिकांत ओक's picture

22 Mar 2020 - 12:21 pm | शशिकांत ओक

नमस्कार मित्रांनो, मनो आणि दुर्गविहारींनी आपली मते मांडली. आणखी कोणाला काही म्हणायचे असेल तर म्हणून थांबलो होतो. असो.

खालील वक्तव्य कोणाला पटवून द्यायला करत नाही. मात्र माझे विचार कळणे महत्वाचे वाटले म्हणून लिहित आहे.
मनो म्हणतात...

१.

१० तारखेला सकाळी भवानी मंदिरात पूजा करताना, त्यांच्या मनात तीन पर्याय आले. इथे फोटो तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर इथला आहे, तो त्याऐवजी प्रतापगडाच्या भवानी मंदिराचा पाहिजे का? कारण महाराजाना त्या वेळी तेच मंदिर सहज पूजा करता येण्याजोगे होते.

आधीचा एक फोटो काढून तुळजा भवानीचा फोटो मी सादर केला. तेंव्हा नेमके हेच मनात आले की प्रतापगडावरील मंदिरातील मूर्तीचा फोटो ठेवणे योग्य राहील. पण विचारांती तो फोटो काढून सध्याचा फोटो लावला. माझे असे मनात आले की जरी आपण प्रत्यक्षात एका ठिकाणी असलो तरी अनेकदा डोळे मिटले की जिथे आपण नसलो तरी आपल्याला अशा मुर्ती, देखाव्यांशी जवळीक वाटते तिथे आपला श्रद्धाभाव घेऊन जातो. स्वामीसमर्थांचे प्रेमींना त्यांचा फोटो, मुर्ती आठवेल, स्वामी नारायण मंदिरात एखाद्याला रामलल्लाची मूर्ती आठवेल वगैरै वगैरे... आपल्या सारख्या सामान्यांना असे होते तर मग महाराजांच्या संदर्भात त्यांना तुळजा भवानीचा दृष्टांत झाला होता ते लक्षात ठेवून तसे वाटणे साहजिक असेल. म्हणून तुळजा भवानीला मनात स्मरण करतानाचे शिवाजी महाराज मला जास्त त्या प्रसंगाला सुयोग्य वाटले.
विचाराल तो काढून टाकलेला फोटो कोणता होता?


तो हा प्रतापगडावरील भवानीमातेचा होता

शशिकांत ओक's picture

22 Mar 2020 - 7:34 pm | शशिकांत ओक

खालील वक्तव्य कोणाला पटवून द्यायला करत नाही. मात्र माझे विचार कळणे महत्वाचे वाटले म्हणून लिहित आहे.
मनो म्हणतात...

१५०० इथे कापले गेले, इथे अडकले ते मेले, इथले शरण आले... ही माहिती कोणत्याच साधनात मला सापडली नाही, त्यावरून बहुतेक ते तुमचे निष्कर्ष असावेत. जर मूळ माहिती वेगळी, त्यावरून तुमचे निष्कर्ष वेगळे आणि ते तसे का असावेत असं जर थोडं लिहिता आलं तर समजून घेणं सोपं पडेल. नाहीतर मग कादंबरी स्टाईल सर्वच काल्पनिक मानायचे असेल तर तसेही चालेल.

या ठिकाणी गजानन भास्कर मेहेंदळेंच्या बाबतीतील उदाहरण आठवते. ते प्रस्तावनेत भाग १ पान ४ वर म्हणतात, ' केवळ सुसंगती म्हणजे सत्य नव्हे. केवळ तर्क करून इतिहास लिहिता येत नाही. ... आपल्याला जे तर्कशुद्ध वाटते, ते वाजवी वाटते, तशाच प्रकारे माणसे वागतात असेही नाही... इतिहास नेमका कोणत्या मार्गाने गेला ते निव्वळ तर्क करून ठरवता येत नाही. विश्वसनीय अशा साक्षिदारांकडे म्हणजेच इतिहासातील साधनांकडे चौकशी करूनच ते ठरवावे लागते. पण कित्येकदा या साक्षीदारांनाच अधलीमधली काही माहिती नसते. अशा ठिकाणी, नेमके काय घडले ते माहित नाही असे सांगणे म्हणजे इतिहास सांगणेच आहे. ... कल्पनेच्या वारूवर स्वार होऊन मनःपूत संचार करण्याचा मोह तर अगदी कटाक्षाने टाळला पाहिजे.... कित्येक घटनांचे रंजक तपशील किवा युद्ध शास्त्रीय दृष्टीकोनातून ज्या प्रकारे तपशील मिळावेत असे वाटते त्या प्रकारचे तपशील, बखरांसारख्या निकृष्ठ दर्जाच्या साधनातूनच मिळतात...पण ... (त्या) हकीकती बखरीकारांनीही कल्पनेनेच रंगवलेल्या असतात.... इतिहास म्हणून त्या कल्पनाचित्राचा काही उपयोग नसतो. आणि सत्याधिष्ठित नसल्याने युद्ध शास्त्रीय अभ्यास म्हणूनही तेे निरुपयोगी असते. ...
नाव न घेता त्यांनी 'वेध महामानवाचा' या ग्रंथातील दोन अवतरणे देऊन म्हटले, 'जे निर्णय शिवाजीमहाराजांनी घ्यायचे आहेत ते उपर्युक्त चरित्राच्या लेखकांनी स्वतःच घेतलेले आहेत'....असे म्हणले आहे.

त्यांच्या सारख्या निस्पृह इतिहासकांचे विचार लक्षात ठेऊन मांडणी करण्याची दक्षता घेतली आहे. याउप्पर काही ठिकाणी दोषात्मकता आली असेल तर जरूर कळवावे त्याला दुरुस्त करायचा प्रयत्न राहील.
...
मेहेंदळ्यांचे वरील विचार मला अत्यंत सुयोग्य वाटले म्हणून वाचकांच्या लक्षात असावे असेल की सेनेच्या संख्या, जनावरांच्या संख्येचे तपशील जिथे मान्यता प्राप्त वाटत नाहीत तिथे ते देण्याचे मी कटाक्षाने टाळले आहे. कधी कधी अशावेळी कमीत कमी संख्या देण्याकडे कल आहे. खानाच्या हत्येत वाघनखांचा वापर कि तलवारीचा ? कृष्णाजी भास्करांना मारले की सोडले? अशा नक्की निष्कर्ष नसलेल्या बाबींना फाटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे मार्ग सेनेच्या जाण्या-येण्याचे तयार केले आहेत ते आजच्या काळातील रस्ते, सुविधा, पूल, महामार्ग, गावांची विस्तारलेल्या कक्षा यांना शक्यतो वगळून किंवा ध्यानात ठेऊन काढले आहेत. फक्त संदर्भासाठी आता तिथे काय दिसेल म्हणून गोल फोटोत स्थळे, हॉटेल्स, वास्तू दाखवल्या आहेत. सेनेच्या चालीची गती, संख्या, वाटेतील आपल्या आखत्यारीतील असलेले किंवा नसलेले, किल्ले, जनावरांच्या गवत, पाण्याची सोय होईल अशा नद्यांचे तीर असे बरेच बिंदू लक्षात ठेवून नकाशे सादर केले आहेत तरीही त्यात खूप सुधारणांना वाव आहे. त्या त्या भागातील दुर्ग प्रेमींच्या ग्रुपमधे सामिल होऊन किंवा त्यांना आपल्या ग्रुपवर सामिल करून जंगल वाटा, खिंडींतून आजही कसे मार्ग सापडतात यावर तरुण गिरिप्रेंमींचे सहकार्य घेत राहावे लागते.
आता वरील शंका - मी तयार केलेल्या चित्रातून दाखवलेल्या काही जागांविषयी आहे. त्या त्या ठिकाणी महाराजांच्या फौजेचे कोण सरदार होते? किती सेना होती? त्यांची तैनातगी, खानाच्या फौजेतील शिपायांची हारलेली मानसिकता वगैरेतून त्या भागातील सैन्य मारले गेले असेल असे दाखवले आहे. खानाचे १० रक्षक मारले गेले, त्याशिवाय १५शे पेक्षा जास्त मेल्याच्या संख्यांचे संदर्भ आहेत पण म्हणून १५शे ही कमीतकमी संख्या दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. जे त्या ठिकाणापासून दूर होते असे दाखवले आहेत त्यांना पळून जायला शक्य होते म्हणून त्या भागातील वाचले किंवा शरण आले. असे दाखवले आहे. हे फक्त सांकेतिक आहे.

शशिकांत ओक's picture

22 Mar 2020 - 8:13 pm | शशिकांत ओक

खालील वक्तव्य कोणाला पटवून द्यायला करत नाही. मात्र माझे विचार कळणे महत्वाचे वाटले म्हणून लिहित आहे.
दुर्ग विहारी म्हणतात...

"खानाच्या राहण्याची सोय जावळीच्या मोऱ्यांनी आपल्या महालात केली."
या वाक्याचा अर्थ समजला नाही. वास्तविक चंद्रराव मोरेचा पराभव करुन जावळी हा प्रदेश शिवाजी महाराजानी ताब्यात घेउन या परिसरातील भोरप्याच्या डोंगरावर प्रतापगडाची उभारणी केली असा ईतिहास असताना, या प्रतापगड युध्दात चंद्रराव मोरे कोठून आला ? हा प्रश्न मला पडला आहे.
महाबळेश्वरच्या लॅडविक पॉईंटखाली जावळी नावाचे गाव आहे, इथे चंद्रराव मोरेचा वाडा आहे, हे बरोबर. पण दुसर्‍या दिवशी गडवर शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी प्रतापगडावर जायचे असल्याने तो आजच्या हिशेबाने सात ते आठ कि.मी. वरच्या जावळीत उतरेल असे वाटत नाही. त्याची व्यवस्था वाडा कुंभरोशी किंवा पार या गावच्या हद्दीत केली असावी असे मला वाटते, कारण प्रतापगडावरुन इथे लक्ष ठेवणे सोयीचे होते. उलट उंचीचा फायदा मिळून खानाच्या छावणीवरुन प्रतापगडावरील हालचाली सहजासहजी दिसणार नाहीत. खानानेही बरोबर हेर आणले असणार, पण प्रत्येक वेळा त्याना खानापर्यंत बातमी पोहचवायला, या उंचीच्या फरकामुळे बराच वेळ लागत असणार. तेव्हा हि जागा मला चुकीची वाटते आहे.

आपण म्हणता ते बरोबर आहे. महाराजांंनी जावळी १६५६ मधे जिंकली होती. ते जावळीच्या नकाशापाशी केलेल्या लेखनातून दाखवले आहे. पण त्यांनी चंद्रराव मोरेला मारलेले नव्हते. तो खानाशी वाईत आल्यावर संपर्कात असावा. खानाला राहायची सोय त्याचा दर्जाला शोभेल अशा जावळीच्या कोटातील महालात मुद्दाम केली असावी. खानाच्या हत्येनंतर झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीत मूसाखान मोरेना धरुन आणतो आणि त्याने दिलेल्या वाटाड्यांच्या बरोबर कोयनेच्या उगमाकडून महाबळेश्वरच्या पठारावर जातो असा उल्लेख मेहेंदळे कृत श्री राजा शिवछत्रपती ग्रंथाच्या भाग १ पान ९४० व ९४१ वर आला आहे.

आपण दिलेले संदर्भ तपासून पाहिले. मेहंदळे सरानी दिलेल्या पृष्ट क्रमांकावर शिवभारत तसेच सभासदाची बखर ह्या दोन्ही अस्सल साधनात दिलेल्या माहितीत तफावत आढळली. एकतर जेवढे संदर्भ तपासले त्यात शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे ईतकेच नव्हे तर त्याचा भाउ हणमंतराव मोरे या दोघांचा पुर्ण निर्दालन केले हेच सांगतात. प्रतापराव मोरे हा चंद्रराव मोरेचा भाऊ अली आदिलशहाला मिळतो आणि अफझलखानाबरोबर शिवाजी महाराजांवर चालून येतो. ( बाबासाहेब पुरंदरेच्या "राजा शिवछत्रपती" मध्ये मात्र हे काम खंडोजी खोपडे करतो असे दिलेले आहे )याचा सरळ अर्थ अफझलखान जावळीतील मोरेच्या वाड्यात उतरला असा नक्कीच नाही. महराजांनी त्याची व्यवस्था गडाच्या पायथ्याशी म्हणजे वाडा कुंभरोशी येथेच केली असणार. खानाचे पुर्ण निर्दालन करायचे हे नक्की असताना, त्याला गडापासून लांब उतरू देण्याचे कारणच काय ?
तेव्हा आपण पुन्हा एकदा या मुद्द्याचा विचार करावा हि विनंती.

शशिकांत ओक's picture

26 Mar 2020 - 11:39 pm | शशिकांत ओक

महराजांनी त्याची व्यवस्था गडाच्या पायथ्याशी म्हणजे वाडा कुंभरोशी येथेच केली असणार.

मला यात पडायचे नाही. आपल्याला तसे वाटत असेल तर तुमच्या दृष्टीने ते बरोबर आहे. बखरी, पोवाडे. अन्य साधने यातून आकलन व्हायला मदत होते...

शशिकांत ओक's picture

22 Mar 2020 - 8:32 pm | शशिकांत ओक

या वाक्याचा अर्थही मला समजला नाही. कारण प्रतापगडाचा प्रसंग १६५९ ला झाला तर महाराजांनी प्रतापगडावर भावानीची स्थापना केली १६६१ मध्ये . मग महाराज भवानी मातेचे दर्शन घेतील हे शक्य वाटत नाही. कदाचीत त्यावेळी गडावर असलेल्या केदारेश्वर मंदिरा दर्शन घेतले असणे शक्य आहे.

प्रतापगडावर भवानीचे मंदिर केंव्हा निर्माण झाले या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही. साधारणपणे प्रत्येक गडावर ईश्वराचे म्हणजे शिवाचे मंदिर स्थापण्याचा प्रघात प्राचीन आहे. शिवाबरोबर पार्वती वेगवेगळ्या रुपाने तिथे असावी असा संकेत ही असावा. म्हणून केदारेश्वरासमावेत भवानी ही असावी. महाराजांनी त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला असे मानणे सुयोग्य राहील.

१५०० इथे कापले गेले, इथे अडकले ते मेले, इथले शरण आले.
हा भाग कल्पना करुनच लिहीला आहे.

यावर आधीच उत्तराचे लेखन केले आहे...

या विषयावर ईंग्लिशमध्ये माहिती देणार्‍या दोन लिंक देतो. उत्सुकता असणार्‍यांनी त्या वाचून घ्याव्यात.
Strategic Movements in the Afzhal campaign...
Chhatrapati Shivaji vs Afzal Khan: Pratapgad,1659

धन्यवाद वरील लिंक दिल्याबद्दल...
लिंक दिलेल्या चिन्मय दातार आणि अशीश गोखले यांच्या संपर्कात राहायला आवडेल म्हणून त्यांना ईमेल केली आहे. पैकी अनीश गोखले यांनी वाचून कळवतो म्हटले आहे. पाहू ते काय म्हणतात ते...
मी इतिहासकार नाही. त्यांच्यातील मता-मतांतरात मला गुंतायचे नाही.
तरीही सादरीकरणात काही चुका वाटल्या असतील तर जरूर कळवावे. समजून घ्यायला मला आनंद वाटेल. या धाग्याचा भाग ७ असा उल्लेख चुकुन पडला आहे तो भाग ६ समजावा.

याबाबत माझे मत इतकेच आहे कि सभासदाची बखर ,शिवभारत आणि शिवचरित्रप्रदीप हि तिन्ही साधन हेच सांगतात कि आई तुळजा भवानीने महाराजांना दृष्टांत दिला. अफझलखानाने येताना तुळजापुरात भवानी मातेच्या मंदिराला उपद्रव दिल्याने त्यांनी त्याची आठवण रहावी म्हणुनच कदाचित प्रतापगडावर नेपाळ मधील गंडकी नदीतील शिळा मागवून भवानी मातेची स्थापना केली. लक्षात घ्या शिवाजी महाराजांचा अर्धा आयुष्यकाल राजगडावर जाउनसुध्दा भवानी मातेची स्थापना प्रतापगडावर केली याचा अर्थ त्याना त्या घटनेची आठवण रहावी हाच कदाचीत हेतू होता.

शशिकांत ओक's picture

26 Mar 2020 - 11:56 pm | शशिकांत ओक

भवानी मातेची स्थापना प्रतापगडावर केली याचा अर्थ त्याना त्या घटनेची आठवण रहावी हाच कदाचीत हेतू होता.

सध्याच्या भवानीमातेच्या मंदिरा ऐवजी केदारेश्वर शिवमंदिराच्या गाभाऱ्यात ते बसले होते असे मानले तरी चालेल...
त्यांना मनोमन तुळजा भवानीचा दृष्टांत आठवला असे मला सुचवायचे होते.
आपण इतक्या सुक्ष्म रितीने धाग्यातील कथनाचे वाचन आणि मनन करता आहात म्हणून मला आपल्या गहनशील व्यासंगाचे कौतुक आहे. आपण आपले प्रतिसाद विविध ग्रंथांचे परिशीलन करून लिहिता, असेच इतरांना वरील धाग्यातील माहिती वाचताना वाटावे अशी मनोमन इच्छा आहे.
धाग्यातील लेखनाला इतिहासाची पृष्ठभूमी आहे. परंतु तो इतिहासाला सध्या तरी अज्ञात काही लष्करी लढ्यांच्या ठिपक्यांना जोडायचा प्रयत्न आहे. लढायांच्या जागा, मार्गांच्या शक्यता दाखवतात. पण म्हणून मी म्हणतो तसेच घडले असा दावा करणे मलाही मान्य नाही...
नवीन माहिती मिळवून त्यात भर घालत राहणे आपले कर्तव्य आहे...

शशिकांत ओक,

जबरदस्त लेखनमालिका आहे. सैनिकी दृष्टीने विचार करून लिहिल्याबद्दल कौतुक आहे. :-) प्रतिभाशाली म्हणजे घटना थेट डोळ्यासमोर उभी करणारं कथन.

एक दुरुस्ती सुचवू इच्छितो. खानाची सैन्यरचना या शीर्षकाखाली दिलेला नकाशा बुचकळ्यात टाकणारा आहे. कारण की त्यात वरची बाजू दक्षिणदिशेस असून खालची बाजू उत्तरदिशा आहे. त्यामुळे खुणांचे संदर्भ नेमके उलटे झालेत. तेव्हा उत्तर दिशेचा दर्शक बाण दाखवावा ही विनंती. अथवा दुसऱ्या कुठल्याही यथोचित दिशेचा बाण दाखवलेला चालेल.

आ.न.,
-गा.पै.

शशिकांत ओक's picture

2 Apr 2020 - 11:16 pm | शशिकांत ओक

उत्तर दिशेचा दर्शक बाण दाखवावा ही विनंती

नकाशावर खानाची सैन्यरचना नजरेला ठसावी म्हणून त्या ठिकाणी दिशा दर्शन कमी महत्वाचे होते. गूगल अर्थ वरून गोल फिरत असताना ती दिशा भावली. असो. पुढे लक्षात ठेवले जाईल.

गामा पैलवान's picture

3 Apr 2020 - 2:25 am | गामा पैलवान

शशिकांत ओक,

विनंती विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद! :-)

निरीक्षकाने जावळीतून प्रतापगडाकडे बघितलं असतांना सदर चित्रं दिसतं. म्हणून बहुधा तुम्हास ही दिशा भावली.

आ.न.,
-गा.पै.