भाग ७ प्रतापगडाची उलटवलेली बाजी - जावळीतील सैन्य व्यूह
भाग ६
जावळीतील सैन्य व्यूह
जावळी नुसते एक गाव नसून त्या काळात विस्ताराने, लोकसंख्येने व मानाने मोठे संस्थान होते. भावाभावात ८ ठिकाणात वाटलेले असले तरी आदिलशाहीशी ईमान राखून होते.
(चंद्रराव पदावर) येसाजी मोरे जावळीचा संस्थानिक होता. त्याचे महाराजांशी संबंध जाने १६५६ पर्यंत बरे होते. आदिलशाहीतील गादीच्या वर्चस्वासाठी गोंधळाच्या परिस्थितीचा विचार करून जावळी आपल्याकडे करून घेण्यासाठी महाराजांनी मोहीम उघडली. त्या काळात मोरेच्या बाजूने महाराजांच्या सैन्यावर छुपे हल्ले होत होते. पुरंदरहून महाराज १० हजार सैन्यास घेऊन निघाले. सेनेचे दोन तुकडे करून घोडदळाची मोठी फौज रडतोंडी घाटातून जावळीत घातली. लहान पायदळाची तुकडी महाराजांच्या नेतृत्वाखाली म'श्वर मार्गे निसणीच्या अतीशय तीव्र उताराच्या घाटमार्गातून जावळी गावात घुसली. चकित झालेला चंद्रराव फारसा प्रतिकार न होता रायरीला पळाला. महाराजांनी जावळीचा कोट मिळवला. पण महाराजांच्या सैन्यावर चंद्ररावाकडून हल्ले करून हैराण करायची खेळी केली गेली. मात्र शेवटी महाराजांनी त्याचा बंदोबस्त केला. त्यानंतर साधारण (३ महिने ६ एप्रिल १६५६) महाराजांनी तिथेच तळ ठोकला होता. घनदाट जंगलात लपायला सोईचे असल्याने बलाढ्य शत्रूला लोळवायचे असेल तर जावळीच्या जंगलाचा फासच उपयोगी पडेल असे त्यांनी त्याच वेळी मनात ठरवले असावे. जवळच्या भोरप्या वा ढोरप्या नावाच्या प्राचीन गडाची सूक्ष्म पाहणी करून त्याचे दरवाजे, बुरुज, माच्यांच्या डागडुजी करून नव्या रूपात सजवायची आज्ञा दिली. भवानी माता मंदिरात रोज पुजाअर्चा, तेल पाण्याची सोय आपल्या स्वतःच्या खजिन्याकडून चालू केली. किल्ला बांधून तयार झाल्यावर गौरवाने त्याला प्रतापगड नाव दिले.
३ महिने जावळीत राहिल्यामुळे वेगवेगळ्या वाटा, घाटमाथे, नद्यांच्या काठावरून चढणीचे मार्ग वगैरे त्यांच्या मनात ठसले होते. काहींना एकदा पाहिले, ऐकले, वाचले की पक्के लक्षात राहते ही देणगी जन्मजात मिळते. महाराजांना ती मिळाली असावी. म्हणून जुन्या आठवणीतून महाराजांनी राजगडावरून मसलत करून नुकत्याच डागडुजी केलेल्या प्रतापगडाची निवड केली. समजा मधल्या काळात पुरंदरवर हल्ला झाला तर त्याच्या रक्षणासाठी घोडदळाचे सरनौबत नेतोजी पालकरना ठेवून दिले. जुलैच्या १० तारखेपर्यंत आपल्याबरोबर मोरोपंत पिंगळे, कान्होजी जेधे, बांदल, शिळीमकर, बाजी सर्जेराव, रंगनाथ पासलकर अण्णाजी दत्तो यांच्या छबीन्यातील पायदळाच्या साधारण ३ ते ४ हजार शिपायांच्या तुकड्यांना घेऊन भर पावसात प्रतापगडावर राहायला गेले. रघुनाथ बल्लाळ अत्रेंनी कोकण पट्टीतील घोडदळाचे २ हजार सैनिक आणायला आज्ञा दिली गेली. तुफान पावसाळ्यात सर्व सैनिकांची राहायची, खाण्याची सोय जावळीच्या गावात आणि आसपासच्या खेड्यात केली. पावसाचा जोर कमी होत गेला. त्यानंतर वाटाघाटीतून खानाने जावळी खोर्यात यायचे कबूल केल्यावर आपल्याला कडील सरदारांनी कुठे आपले सैनिक लपवून ठेवायचे याची चर्चा झाली.
खानाचे जावळी खोऱ्यात आगमन
वाईहून खान बिनकामाचे प्रचंड संख्येत असलेले लोक, जनावरे वाईतच तळावर सुरक्षित ठेवून निवडक स्वतःचे ५ हजार पायदळ आणि २ हजार घोडदळ सैन्यास घेऊन पहाटे निघाला. सैन्याच्या बरोबर त्याचे मोठे नामी सरदार आपापल्या सेनेच्या जत्थासह आज्ञापालन म्हणून येत होते. आपले सरदार सिवाच्या भेटीला जंगलात जायचे ठरवल्याने खट्टू आहेत हे तो जाणून होता. जावळीतील सापळ्यात सिवा आपणहून अडकलेला आहे. अशा वेळी माझ्यासारख्या अचाट साहसी, बलवान, शूरवीराने त्याच्या घरात जाऊन त्याचा निकाल लावला तर त्यात माझी इभ्रत आणि शान वाढणार आहे. या त्याच्या जोरदार म्हणण्याला कोणाकडेच उत्तर नव्हते! ही मोहीम फत्ते झाली की हेच आदिलशाहीशी सध्या इमानदार असलेले पण आत्ता माझ्यावर रुसलेले सरदार माझ्या नेतृत्वाखाली यायला उतावीळ होतील! अशी त्यांची खात्री होती!
हत्तीवरून जायची हौस असूनही तायघाटात चिंचोळ्या, वेड्यावाकड्या वाटा चढताना तो कधी घोड्यावर तर कधी आत्ता उतरून पायी चढत होता. पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही जंगलाच्या लढाईची यातायात जास्त काहीच नाही असे त्यांचे पक्के मत बनले होते.
चिखली गावातून तायघाट चढेपर्यंत तो सर्वात मागे होता. कोणी कुचराई करून मागच्या मागे सटकून जाऊ नये म्हणून त्याला ही दक्षता घेणे आवश्यक होते. आपण लावलेल्या बिगारांनी पाथरवट, गवंडीं बरोबर दुरुस्तीचे काम चांगले केले आहे, हे त्याच्या सूक्ष्म नजरेतून सुटले नाही. दुपारी घाट संपून भिलार गावाचा तिठा पार पडला. शस्त्रे व इतर सामान घेऊन जाणार्या बैलांच्या पाठीवरील झुलीप्रमाणे लादलेल्या कंठाळ्यातील पडशातून बरोबर आणलेल्या आणलेले खायचे पदार्थ खाऊन पुढच्या प्रवासाला निघाले.
त्यानंतर तो पुढे - बाकीचे मागे, असे करत मेटगुताड, गुरेघर, लिंगमळा, वेण्ण्या तलावाच्या काठाने रडतोंडी घाटापाशी आला. आपल्या सैन्याचे मनोधैर्य उंचावायला ३ महिने खाऊन पिऊन सुस्त पडलेल्या सैनिकांना उद्देशून खणखणीत मोठ्या आवाजात म्हणाला, 'माझी प्रचंड शरीरयष्टी, माझी पराक्रमी कारकीर्द, माझी युद्धात कधीच पळून न जायची वृत्ती तुम्ही ओळखता. मी म्हणजे जय असे खुद्द आदिलशाहनी मला या मोहिमेवर जाताना गौरवले होते. आता तुम्हाला तुमचे शौर्य, साहस पणाला लावून मोठ्या कष्टाने ही मोहीम फत्ते करायची संधी अल्लाच्या मेहेरबानीमुळे आली आहे. जंगलातील लढाई या पैकी अनेकांनी पहिल्यांदाच खेळली असणार आहे. पण मी अशा या जंगलात दिवस रात्री ना खाता न पिता, मोहिमांमध्ये यशस्वी झालो आहे. तुम्हीही उमदेपण दाखवा. तुमच्या पराक्रमाची शर्थ करा. तुम्हारे हाथों से दुश्मन काफिरोंकी मौत इन्शाह अल्ला इंतजार करती हैं. तरक्की आपके पांव चूम रही हैं. फिर ७२ हूरें तुम्हें यही मिलेंगी!’
अफझलखानाची ललकारी देणारे त्याची पदवी म्हणून शेवटी झिंदाबाद असे वदवून घ्यायला तत्परतेने भोंग्यावरून पुकारत राहिले. पहिल्या नमाजानंतर उद्या पहाटे निघालेच पाहिजे असे बजावून बजावून सांगितले गेले. एरव्ही टंगळमंगळ करून नमाज़ी टोपी शोधत नमाज़ाची वेळ साजरी करणारे उद्याच्या नमाज़ाची बांग ऐकताच पहाटे लवकर उठून तयार झाले. निघाल्यावर वाटेतील भीषण निसर्ग पहात रडतोंडी घाटातील वेडी वाकडी वळणे पार करताना त्यांना आपण नक्की कोणत्या दिशेने जातोय याचा विसर पडला होता! पावसाळा संपल्यानंतर घनदाट वाढलेल्या वेली, गर्द हिरव्यागार झुडपाच्या फांद्या वारंवार बाजूला करत खानाच्या नौबतखान्याची, हत्तीच्या माहुताची त्रेधा उडत होती. त्यांच्या चेंगटचालीला कंटाळून खान आपल्या आवडत्या घोड्यावर स्वार होऊन पटापट पुढे सरकत गेला.
सरदारांच्या सेना सावकाश, सावधपणे खाली उतरून कोयनेच्या काठावरील वेळूच्या बनात आपापल्या टोळ्यांचे कोंडाळे करून तळ ठोकला. तिथून जवळ जावळीच्या मुख्य कोटाकडून येणारे कोयना नदीचे पात्र होते. प्रतापगडावर चढून जायला नेणारी वाट तिथून पुढे सुरू होत होती.
खानाचा शाही हत्ती डुलत यायला वेळ लागला, तोवर खानाच्या राहण्याची सोय जावळीच्या मोऱ्यांनी आपल्या महालात केली. भेटीची तारीख १० नोव्हेंबर ठरली होती. त्याआधी २ रात्री म्हणजे ७ तारखेला रात्री उशिरापर्यंत दिवट्यांच्या प्रकाशाच्या अनुरोधाने सैनिकांचे जथ्थे येत राहिले. खान जातीने लक्ष घालून कोण सरदार कुठे तळ ठोकून हवेत यावर आपले निर्णय देत होता. खानाने रात्रीची विश्रांती घेऊन आपल्या सरदारांशी पुढील हालचाालींसाठी चर्चेला ८ तारखेला सकाळी नमाज़ नंतर बोलावले. त्यात चार प्रमुख प्रस्ताव होते.
१. मला १५०० कसलेले बंदे पाहिजेत. जे पटापट डोंगर चढून माझा मोठा मुलगा फाज़ल खानाच्या हुकुमाची वाट पहात वाटेत दबा घरून बसतील. ते मी निवडले आहेत.
२. आपल्यापैकी सरदारांनी मी सिवाला भेटून येई पर्यंत मुख्य सेनापती मुसाखान यांच्या आज्ञा पाळाव्यात. अंकुश खान आणि अन्य पठाण सरदारांची सेना, सिद्दीचे सैनिक, मराठा सरदार सरदारांची नेमणूक कुठे करावी याचा निर्णय मूसाखान घेतील.
३. पंत गोपीनाथ वकीलांना बोलवून सिवाला इथे जावळीतील कोटात बोलवायचे म्हणून आदेश दिले होते. तुम्ही प्रतापगडावर यावे तिथे आपल्या आगमनानिमित्त शामियाना उभारून ठेवून आम्हाला आपल्या मेहमाननवाजीसाठी बडदास्त ठेवायला सिवाला संधी द्यावी तर मेहेरबानी होईल. असा त्यांचा प्रस्ताव आला आहे. त्यावर मी मोठ्या मनाने मान्यता दिली आहे.
४. या शिवाय आपल्या बरोबरच्या सरदारांच्या मानपानसाठी भारी कापडाची, रत्नजडित शस्त्रांची भेट देण्यासाठी सिवाने आपल्या बरोबर आलेल्या सराफ, कापड व्यापारी बजाजांना गडावर बोलावले आहे. त्याला मान्यता द्यावी असे मी ठरवले आहे. यातून गडावर काय सैनिकी तयारी चालवली आहे याची माहिती ते परतल्यावर सांगतील.
सर्व सरदारांची संमती आहे असे मी मानतो, “खुदा हाफ़िज़" म्हणून सभा दहा मिनिटांत बरखास्त झाली!
८ तारखेला खानाने आपल्या सेनेची शिरगणती करायला आपल्या सरदारांना आदेश दिले. त्याने प्रत्येक सरदारांची आपणहून चौकशी करून कारवाई कशी करायची. यावर आपले मत सांगितले. शिपायांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आपलेसे करायची संधी त्याने गमावली नाही.
आपल्या १५ शे निवडकांना उद्देशून तो म्हणाला, 'खरे तर मी तुमच्यावर अवलंबून आहे. माझ्या सिवाच्या भेटीनंतर लगेच कर्णा, तुतारी वाजेल. तेव्हा तुम्ही प्रतापगडावर चाल करून जायचे आहे. मी सिवाला निपटणार आहे. तुम्ही फाज़ल खानाच्या बरोबर जाऊन गड काबीज करायचा'. 'रात तक हमें यहां रुककर बिजापूरको रवाना होना पडेगा.' आपल्या अगदी जवळच्या अंगरक्षकांना वेगळे बोलावून खान म्हणाला, 'तुम्ही घुडसवारों के साथ कोंकणात उतरून राजगड पर जाकर सिवाच्या आई आणि मुलाला जीवंत पकडून माझ्या समोर आणायचे. जो हे काम पूर्ण करेल त्याला प्रतापगडचा किल्लेदार म्हणून नेमणूक करीन.'
दिवसभरात सिवाच्या सैन्याकडून कोणताच हल्ला झाला नाही यावरून सैनिकांना सिवा 'डर गया' असे वाटून हाय से वाटले. मात्र काही सरदारांच्या राहुट्यात चर्चा सुरू झाली की काही तरी गडबड आहे. आपण येण्याच्या आधी सिवाचे लोकांनी शरारत करायला डाव रचला आहे. आपल्याला त्याचे सैन्य कुठे लपवले आहे याचा शोध घेण्यासाठी आपले हेर आजूबाजूला पाठवले पाहिजेत.
नेतोजी पालकरचे घोडदळ पुरंदरला आहे कि या गडावर आहे? आपल्यावर अचानक हल्ला आज रात्री होऊ शकतो. त्यामुळे सरदारांनी आपापल्या हाताखालच्या सेनानींना सतर्क रहा म्हणून इशारा दिला.
९ तारखेला व्यापारी लोक गडावर गेले ते परत आले नाहीत. यामुळे चिंता वाढली. चंद्रराव मोरे किल्लेदारावर काम दिले, 'खंडोजी खोपडेला शोधून समोर आणा. तो सिवा कडून मिळाला होता. त्याचे वर लक्ष ठेवा. कान्होबा नाईक जेधे कुठे लपला आहे ते शोधून काढा. तुला जर जमले नाही तर तुझी किल्लेदारी गेली आहे असे समज. जा कामाला लाग'.
खानाने आपल्याबरोबर आलेल्या मराठा सरदारांची भेट घेतली. 'तुम्ही जर सिवाला मदत केली तर तुमचे मुंडके मी माझ्या हाताने कापीन' असा सज्जड दम भरला!
अजगराप्रमाणे आवळत आणलेल्या विळख्यातून सिवा सटकता कामा नये यासाठी त्याने विचारपूर्वक सर्वांना कामाला लावले.
खानाचा एक जुना बुढ्ढा सेवक सर्व पहात होता. गुसलखान्यापासून ते खानाच्या हत्यारांची तपासणी, धार करणे, अंगरखे धुणे, गुडीगुडी तयार करणे, खाण्याचे पदार्थ आधी खाऊन विषबाधा न होऊन देणे, रात्री बिछाना लावून पाय चेपणे कामात तत्पर त्याच्या नजरेत एक बात खटकत होती. खानाकडे संपूर्ण छातीभराचे चिलखत नव्हते. जी होती ती जुनी, आडमाप होती. खानाने चिलखत घालावे असे सुचवले तर तो आपल्यावरच ओरडेल की तू का नाही बरोबर घेऊन आलास? म्हणून तो गप्प बसला!
१० तारखेला सकाळी नमाज़ अदा करून नाश्त्याला त्याने कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला बोलावले. त्याने दोघांच्या बाजूने तयार केलेला तहाचे मसौदे वाचून दाखवले. भेट घ्यायला काय रीत (प्रोटोकॉल) सांभाळायची? तहावर सही शिक्के मारून झाल्यावर काही खास खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे का? वगैरे विचारून घेतले. अंगावर शेरवानी चढवताना तिथे ठेवलेले चिलखत त्याने पाहिले. घालावे कि न घालावे असा विचार करत असताना, 'मी असा बलवान, कधी ना हार जाणारा, मला कोणाची भिती?' असा स्वतःच्या शक्तीवरील गर्व झाला.
महाराजांच्या कडून खान जावळीत आल्यापासून २ दिवसात काही सैनिक हालचाली झाल्या नाहीत. फक्त पंत खानाची योग्य बडदास्त ठेवली जाते आहे, मसौदा तय्यार आहे, वगैरे माहिती घेत होते. नेतोजी नेमका कुठे असेल? त्याने वाईच्या खानाच्या तळावर तुफान हल्ला करून पूर्ण नाश करायचा आहे. मोरोपंत पिंगळे यांनी पार तिठ्याकडून हल्ला करून कोयनेच्या पात्रात खानाच्या सेनेला दाबून धरले पाहिजे. तोफांच्या आवाजानंतर त्यांनी गडावर येऊन गड हातातून जाऊ नये म्हणून शिकस्त करायची. बाकी सर्व सरदारांची सेना गेले ३ दिवस झाडीत लपून राहिलेले आहेत त्यांनी आपल्या पोटा पाण्याची सोय केली असेल का? बाबा भोसलेंना महाबळेश्वरच्या मंदिर परिसरात लपायचा सांगितले आहे, त्यांच्या हातून काही गफलत होणार नाही ना, नारायण बामण, अत्रे, कान्होजी जेधे यांच्या कडून जबर शौर्याची अपेक्षा आहे, असे महाराजांनी सहकाऱ्ऱ्यांना बोलून दाखवले.
१० तारखेला सकाळी भवानी मंदिरात पूजा करताना, त्यांच्या मनात तीन पर्याय आले.
आम्ही दोघेही मरू.
खान मरेल मी जखमी.
मी मरेन खान जबर जखमी होऊन पुन्हा परत येणार नाही.
माझ्या पश्चात सुरू केलेला लढा मां साहेबांनी चालू ठेवावा, बाकी तो श्रींची इच्छा!
भेटीचा वृतांत
पंतांनी खालून पाठवलेला निरोप ऐकून १५ शे हशम जनीच्या टेंभावरून गड घेण्यासाठी वर आले तर आपल्या सेनेला खानाच्या सैनिकांना कापून काढायला अवसर मिळणार नाही हे जाणून महाराज गडावरून खाली यायला तयार होईनात. १५शे हशमांना कोयनेच्या पात्राकडे पाठवा म्हणून तक्रार केली. खानाच्या कानी पडल्यावर 'आता हे काय नवे लचांड?' म्हणून वैताग वाढला. 'ठीक आहे! पण सिवाला बोलवा', असा निरोप कृष्णाजी भास्कर कुलकर्णींतर्फे दिला व हशम परत गेले!
शामियान्याची शोभा पाहून खान खूष झाला. 'चूहेने बड़े चाव से बिल सजाया है!'
सिवा आला. रीतीने दोघांची ओळख वकीलांनी करून दिली. मंचावर चढून जाऊन तहनाम्यावर शिक्कामोर्तब करायला म्हटले गेले. रीत न पाळता खानाने प्रेमाने सिवाला जवळ करायला हात पसरले. महाराजांना पर्याय नव्हता. त्यांना जुजबी जवळीक निर्माण होईल इतपत जवळ जाणे भाग पडले. खानाच्या हातांचा विळखा घट्ट होत गेला. पाठीवरून सरकन शस्त्र चालल्याने धक्का बसला. आता संधी आहे म्हणून महाराजांनी खानाच्या पोटात शस्त्र खुपसले. आणि पोट फाडले. खान हातातील शस्त्र टाकून 'या खुदा' म्हणून, जखमी पोटाला आवरून धरून मंचावरून धडपडत खाली आला. तेव्हा वकिलांनी मदत केली. महाराज गडाकडे धावत सुटले. खानाला भोयांनी पालखीत घालून न्यायला सुरूवात केली. खानाच्या, महाराजांच्या बाजूच्या शिपायांच्यात हातघाईची मारकाट सुरू झाली. पळणार्या पालखीतून खाली पाडून खानाचे मुंडके धडा वेगळे झाले. अचानक शामियान्याकडून कर्णे, तुतारीचे आवाज येताना ऐकून खानाच्या सरदारांना काम सहजपणे झाले आहे असे वाटत राहिले.
खानाच्या सैन्याची वाताहत
शिवाजी महाराज वर आल्यावर गडावरून तोफांचे आवाज ऐकून लपलेल्या शिवाजी महाराजांच्या सेनेने 'हर हर महादेव' अशी रणगर्जना करून हल्ला बोल केला. गडावरून तोफाबारी का चालू झाली? आता काय करायचं? म्हणून गोंधळलेल्या खानाच्या सरदारांना आपल्या सेनेला काय आदेश द्यावेत हे कळेना. १५ शे हशम गडावर चढायच्या चिंचोळ्या वाटेत अडकून पडले. गर्द झाडीतून एकाएकी आलेल्या मावळ्यांचे प्रहार त्याना सहन करता येईनात. मुसाखानाला खान अजून पालखीतून वरून खाली का येत नाही म्हणून काहीतरी गडबड आहे असे वाटून आपल्या बरोबर सहकार्यांना घेऊन जावळी गावातील कोटाकडून आला. काही तासात खान गारद झालेल्याची बातमी लगेच पसरली. दुपारच्या ४ पर्यंत खानाच्या बाजूने लढणाऱ्या सेनेला भगदाड पडून कुठे पळून जावे ते कळेना. काही वेळाने त्यांना कळले की खानाचा घात करून मारले गेले आहे. 'आपल्याला आता लढण्यात अर्थ नाही' असे लक्षात घेऊन त्याने माघार घ्या म्हणून आदेश दिले. आपल्या महत्त्वाच्या सरदारांना बोलावून या इथून परत वाईला कसे जायचे यावर खल केला. चंद्रराव मोरेला धरून आणले गेले. त्याने आपले काही वाटाडे देऊन कोयनेच्या उगमाकडून निसणीच्या घाटातून वर चढून गेल्यावर महाबळेश्वर पठार लागेल म्हणून बरोबर दिले. फाज़ल खानाला बापाची लाश शोधावी का पळून जावे समजेना. आपल्या दोन भावांना, १५ शे हशमांबरोबर मारले हे ऐकून आता इथे थांबले तर आपणही जगणार नाही असा विचार करून निराश होऊन कोयनेच्या काठाने उगमाकडे निघाला. बाकीचे सरदार त्याला भेटले, कोणी काही बोलत नव्हते. १० तारखेची अंधारातील ती रात्र सर्वांना कायम लक्षात राहिली.
खानाच्या_कबरीचे_सध्याचे_रूप
….
पुढे चालू…
वर्गीकरण
वाचने
10495
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
> १० तारखेला सकाळी भवानी
In reply to > १० तारखेला सकाळी भवानी by मनो
सविस्तर प्रतिसाद आता देतो
खानाच्या राहण्याची सोय जावळीच्या मोऱ्यांनी आपल्या महालात केली.या वाक्याचा अर्थ समजला नाही. वास्तविक चंद्रराव मोरेचा पराभव करुन जावळी हा प्रदेश शिवाजी महाराजानी ताब्यात घेउन या परिसरातील भोरप्याच्या डोंगरावर प्रतापगडाची उभारणी केली असा ईतिहास असताना, या प्रतापगड युध्दात चंद्रराव मोरे कोठून आला ? हा प्रश्न मला पडला आहे. महाबळेश्वरच्या लॅडविक पॉईंटखाली जावळी नावाचे गाव आहे, इथे चंद्रराव मोरेचा वाडा आहे, हे बरोबर. पण दुसर्या दिवशी गडवर शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी प्रतापगडावर जायचे असल्याने तो आजच्या हिशेबाने सात ते आठ कि.मी. वरच्या जावळीत उतरेल असे वाटत नाही. त्याची व्यवस्था वाडा कुंभरोशी किंवा पार या गावच्या हद्दीत केली असावी असे मला वाटते, कारण प्रतापगडावरुन इथे लक्ष ठेवणे सोयीचे होते. उलट उंचीचा फायदा मिळून खानाच्या छावणीवरुन प्रतापगडावरील हालचाली सहजासहजी दिसणार नाहीत. खानानेही बरोबर हेर आणले असणार, पण प्रत्येक वेळा त्याना खानापर्यंत बातमी पोहचवायला, या उंचीच्या फरकामुळे बराच वेळ लागत असणार. तेव्हा हि जागा मला चुकीची वाटते आहे. या वाक्याचा अर्थही मला समजला नाही. कारण प्रतापगडाचा प्रसंग १६५९ ला झाला तर महाराजांनी प्रतापगडावर भावानीची स्थापना केली १६६१ मध्ये . मग महाराज भवानी मातेचे दर्शन घेतील हे शक्य वाटत नाही. कदाचीत त्यावेळी गडावर असलेल्या केदारेश्वर मंदिरा दर्शन घेतले असणे शक्य आहे. हा भाग कल्पना करुनच लिहीला आहे. तरी वाचकांच्या सोयीसाठी थोडी रंजकता ठिक आहे. एक नवीन दृष्टीकोण हि मालिका देती आहे. बाकी या विषयावर ईंग्लिशमध्ये माहिती देणार्या दोन लिंक देतो. उत्सुकता असणार्यांनी त्या वाचून घ्याव्यात. Strategic Movements in the Afzhal campaign Chhatrapati Shivaji vs Afzal Khan: Pratapgad,1659 पुढील भागाच्या उत्सुकतेत.In reply to > १० तारखेला सकाळी भवानी by मनो
शंका निरसन २
धन्यवाद
एकूण माहितीवरून हे जानवते की
In reply to एकूण माहितीवरून हे जानवते की by विजुभाऊ
शीर्षक
शंका निरसन १
शंका निरसन ३
शंका निरसन ४ दुर्ग विहारी
In reply to शंका निरसन ४ दुर्ग विहारी by शशिकांत ओक
तेव्हा आपण पुन्हा एकदा या मुद्द्याचा विचार करावा हि विनंती.
In reply to तेव्हा आपण पुन्हा एकदा या मुद्द्याचा विचार करावा हि विनंती. by दुर्गविहारी
जर तर च्या गोष्टी
शंका निरसन ५ दुर्ग विहारी
In reply to शंका निरसन ५ दुर्ग विहारी by शशिकांत ओक
आई तुळजा भवानीने महाराजांना दृष्टांत दिला
In reply to आई तुळजा भवानीने महाराजांना दृष्टांत दिला by दुर्गविहारी
भवानीमाते ऐवजी ...
माहितीपूर्ण व प्रतिभाशाली मालिका
सूचना लक्षात आली...
In reply to सूचना लक्षात आली... by शशिकांत ओक
धन्यवाद