खजुराहो दर्शन!!!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in भटकंती
11 Mar 2020 - 5:29 pm

img {
padding: 10px;
border: 1px solid #ccc;
margin-top: 10px;
margin-bottom: 10px:
margin-left: auto;
margin-right: auto;
}
p {
text-align: justify;
}

जुराहो म्हंटल की एकतर आपण एकमेकांकडे बघून डोळा मारतो किंवा त्या विषयाला बगल देऊन दुसरंच काहीतरी बोलायला लागतो. का? कारण आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये कामशास्त्र या विषयावर उघडपणे चर्चा होऊच शकत नाही.... मात्र बहुतेक ज्या काळामध्ये खजुराहोची शिल्प बनली आहेत; त्या काळामध्ये कामशास्त्र हा विषय चोरून बोलण्यासारखा किंवा चर्चा न करण्यासारखा नसावा असा माझा कयास आहे. याव्यतिरिक्त ही मंदिरे आणि त्यातील शिल्पकला बघितल्यानंतर असं वाटतं की त्या काळामध्ये स्त्रियांना सामाजिक स्तरावर अनन्यसाधारण महत्व होतं. त्यांचं अस्तित्व, त्यांची मतं, त्यांचे विचार आणि त्यांचे सामाजिक स्थान हे अत्यंत आदरपूर्ण स्वीकारले गेले होते.

का वाटावं बरं असं? कारण या शिल्पकला बघताना एक गोष्ट लक्षात येते की केवळ पुरुषांच्या समाधानासाठी मैथुन क्रिया केली गेलेली नाही; तर स्त्रीच्या सुखाच्या परमोच्च क्षणाचा देखील विचार केला गेला आहे. तिला देखील शारीरिक सुख हे हक्काने आणि योग्य प्रकारे मिळाले पाहिजे असा त्या काळातील दृष्टिकोन होता... असं या शिल्पांवरून प्रतीत होतं.

या शिल्पांमध्ये दाखवल्या गेलेल्या स्त्री-पुरुषांच्या दोघांच्याही चेहेऱ्यावर एका अलौकिक आणि दैवी आनंदाची आभा सतत जाणवते. जरी ही शिल्पं कामकलेवर आधारित असली तरी त्यामध्ये जराही अश्लीलता नाही. तसे बघितले तर शरीरसुख हा विचार ना रहस्यपूर्ण आहे; ना त्यात कोणतीही पशुवृत्ती आहे. ते पाप किंवा पुण्याशी जोडलेले नाही; किंवा तोच एक आयुष्याच्या सुखाचा परमोच्च मार्ग आहे असा विचार कुठेही प्रतीत होत नाही. शरीरसुख अनुभवणे ही एक अत्यंत सामान्य कृती आहे. उलट याविषयी चर्चा होऊ न देणे, मुलांना प्रबोधन करताना देखील याविषयी एकप्रकारची गूढता निर्माण करणे, सर्वसामान्य सामाजिक व्यवस्थेमध्ये याविषयाची उदासीनता यामुळेच हा विषय केंद्रस्थानी असतो. अर्थात ही सर्व माझी मतं झाली... आता थोडं खजुराहोबद्दल... त्याच्या इतिहासाबद्दल.... पुरणकाळातील दाखल्यांबद्दल आणि नंतर तेथील शिल्पकलांच्या फोटोंसाहित तेथील गाईडने सांगितलेल्या माहितीबद्दल!!!

असं म्हणतात.....

काशीच्या राजपंडितांची मुलगी हेमावती अपूर्व सौंदर्यवती होती. एका रात्री ती कमलपुष्पांनी भरलेल्या तळ्यामध्ये स्नान करत असताना तिच्या अनन्यसाधारण सौंदर्यावर चंद्रदेव मोहित झाले आणि मानव रूप धारण करून पृथ्वीवर उतरले. ती रात्र त्यांनी एकत्रित व्यतित केली. परंतु पहाटे चंद्रदेव परत निघाले असता हेमवतीने त्यांना थांबण्याचे आर्जव केले आणि ती गर्भवती झाली असल्याचे संगितले. हे ऐकताच चंद्रदेवांनी हेमवतीला आशीर्वाद दिला की ती एका वीर पुत्राला जन्म देईल. त्याला हेमवतीने खजुरपुराला न्यावे. हा मुलगा पुढे एक महान राजा बनेल आणि उद्यान आणि तलावांनी घेरलेल्या अनेक मंदिरांचे निर्माण करेल.

पुढे चंद्रदेव हेमवतीला म्हणाले की राजा झाल्यावर तुझा वीर पुत्र एका विशाल यज्ञाचे आयोजन करेल; ज्यामुळे तुझी सर्व पापे नष्ट होतील. बदनामी होऊ नये म्हणून आणि आपल्या पुत्राला जन्मदेण्यासाठी हेमवतीने पित्याचे घर सोडले आणि ती एका लहान गावामध्ये जाऊन राहिली. यथावकाश तिला पुत्रप्राप्ति झाली. हेमवतीचा पुत्र चंद्रवर्मन आपल्या पित्याप्रमाणे तेजस्वी, शक्तिशाली आणि वीर होता. असे म्हणतात की तो सोळाव्या वर्षीच कोणतेही आयुध न घेता वाघाची शिकार करत असे. चंद्रवर्मनने अनेक युद्धे जिंकली. त्यानंतर हेमवतीच्या सांगण्यावरून त्याने सुंदर उद्याने आणि तलावयुक्त अशी एकूण पंच्याऐशी अद्वितीय मंदिरे निर्माण केली. त्यानंतर त्याने एक मोठा यज्ञ केला; ज्यायोगे हेमवतीचे सर्व पाप नष्ट झाले. पुढे चंद्रवर्मनच्याच नावाने निर्माण झालेल्या चंदेलवंशाच्या राजांनी खजुराहोमध्ये अनेक मंदिरे निर्माण केली.

आजही ही पौराणिक कथा या भागातील प्रत्येक व्यक्ती सांगते. कदाचित ही कथा अशीच पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगितली गेली आहे आणि म्हणूनच ती जिवंत राहिली आहे. खजुराहोचा इतिहास देखील इतकाच रोचक आहे. ऐतिहासिक दाखल्यांप्रमाणे चंदेलवंशाच्या राजानी दहा ते बाराव्या शतकात मध्य बारावर राज्य केले आहे. त्याचप्रमाणे याच ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे हे सिद्ध झाले आहे की खजुराहो येथील मंदिरांचे निर्माण इ. स. ९५० ते इ. स. १०५० दरम्यान चंदेल राजांकरवी झालेलं आहे. मात्र असे म्हणतात की या मंदिरांना निर्माण केल्यानंतर चंदेल राजांनी त्यांची राजधानी महोबा येथे स्थलांतरित केली. मात्र तरीही त्याकाळात देखील खजुराहोच्या मंदिरांचे महत्व अबाधित होते.

ही एकूण पंच्याऐशी मंदिरांची शृंखला असून ही मंदिरे लक्ष्मण, शिव आणि पार्वती यांना समर्पित आहेत. कंदारिया महादेवाचे मंदिरावरील शिल्पकला विशेष आहे. हे मंदिर खजुराहोमधील सर्वात विशाल आणि उत्तम शिल्पकला असलेले आहे. याची उंची एकशे सतरा फूट असून लांबी देखील तेवढीच आहे. या मंदिराची रचना सप्तर्थ शैलीमधील आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस सहाशे सेहेचाळीस शिल्प असून आतमध्ये दोनशे सव्वीस शिल्पे आहेत. सर्वसाधारणपणे एका मंदिरामध्ये इतकी शिल्पे सापडणे अवघड आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार नऊ शाखांचे आहे. या मंदिराचे विशेष महत्व म्हणजे त्यावेळच्या राजा विद्याधर याने मोहम्मद गजनीला दुसऱ्यांदा हरवल्यानंतर इ.स. १०६५ दरम्यान बांधले.

या मंदिरांचा शोध साधारण इ.स. १८५२ ते इ.स. १८८५ या काळात इंग्रजानी लावला. तोपर्यंत याप्रदेशामध्ये घनदाट जंगल होते आणि हिंस्त्र प्राण्याचा प्रभाव खूप मोठा होता. आज या पंच्याऐशी मंदिरांपैकी केवळ बावीस मंदिरे आपण बघू शकतो. बाकीच्या मंदिरांचा ह्रास काळाच्या ओघात झाला. अर्थात जी मंदिरे आजही आहेत त्यांच्यावरील शिल्पकलेच्या सौंदर्यावरून या मंदिरांचा सुवर्णकाळ किती उज्वल असेल याची आपण कल्पना करू शकतो. सर्वसाधारणपणे या शिल्पकलेमधून कामसूत्रात वर्णन केलेल्या अष्ट मैथुनचे चित्रीकरण आहे. कदाचित प्राचीन काळातील स्त्री-पुरुष देव, धर्म, नैतिकता याचा फार विचार न करता मुक्तपणे शरीरसुखाचा अनुभव घेत असावेत असे या शिल्पकलेवरून वाटते.


मंदिराचा संध्याकाळचा देखावा


दहाव्या शतकातील गणपती मूर्ती


राजाला रिझवणारी नर्तकी आणि दरबारी


त्या काळात समूह मैथुन प्रथा असावी असं या शिल्पावरून वाटतं


युद्धावर असताना योध्याना शरीरसुखाची इच्छा झाली असता ते अनेकदा घोड्यांचा पर्याय निवडायचे


राजा आणि दरबारी नृत्य आणि गायनात मग्न आहेत


विविध कामशास्त्र क्रिया


कामकलेची सुरवात चुंबनाने होते हे इथे प्रतीत होते


स्त्री अत्यंत प्रेमाने प्रियकराला रिझवत आहे. दोघांच्याही चेहेर्यावरील भाव अत्यंत आनंदी आहेत


पुरुष स्त्रीला प्रेमाने आलिंगन देऊन कामक्रियेसाठी उद्युक्त करतो आहे


एक रुपगर्वीता पायाला अल्ता लावते आहे. या शिल्पातील खासियत ही की तिला अल्ता लावायला मदत करणाऱ्या स्त्रीकडे सुंदर बॅग आहे....


कामक्रीडेतील अजून एक शिल्प


मंदिरातील छत


लक्ष्मण मंदिराच्या समोरच वराह शिल्प आहे.


साजशृंगार करणारी सौंदर्यवती


पार्वती मंदिराबाहेरील हत्तीचे शिल्प


या प्राण्याचे निरीक्षण केले असता शिर हत्ती प्रमाणे आणि धड घोड्याचे दिसते. कदाचित त्या काळात युद्धावरील प्राण्यांना मुखवटे घालून त्यांचे रूप उग्र करत असतील. शत्रू सैन्याला भिती वाटावी म्हणून


एक महत्वाची माहिती. त्याकाळातील मंदिरे locking systim ने जोडलेली होती. सर्वच मंदिरातील दगड हे तुम्हाला आशा प्रकारच्या क्लिप्स नी जोडलेले दिसतील


घोड्याला राक्षस मुखवटा दिसतो आहे


सर्वसाधारणतः सर्व मंदिरांच्या भिंतींवरील शिल्पांची सुरवात अशा प्रकारच्या राक्षस चेहेऱ्यानी झालेली आहे


हत्ती, घोडे हे प्राणी माणसाळवून त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे


संध्याकाळच्या सुमाराच मंदिर परिसर


दहाव्या शतकातील बुद्ध मूर्ती


खरंच या शिल्पाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. स्त्री आणि पुरुषाच्या चेहेऱ्यावरील तृप्ततेचे भाव दाखवत असतानाच दोघांचेही एक पाय वर आणि एका पायाचे आलिंगन इतक्या उत्कृष्ट रीतीने कोरणे अवघडतच आहे.


या शिल्पातील स्त्रीच्या पारदर्शक आणि मांडीपर्यंतच असलेल्या वस्त्राचा आभास कितीतरी सुदंर प्रकारे दाखवला आहे. त्याचबरोबर कदाचित अंघोळ करून बाहेर आल्यानंतर ती तिचे अंग पुसते आहे त्यामुळे तिच्या गळ्यातील हार मानेच्या बाजूला उलटा झाला आहे; हे देखील प्रतीत केले आहे


प्रियकर आणि प्रेयसीची प्रणायक्रिडा चालू असताना चोरून बघणाऱ्या पुरुषाला देखील प्रणय इच्छा झाली असल्याने तो हस्तमैथुन करत आहे. अस तर नसेल ना की हजारो वर्षांपूर्वी प्रणय केवळ बंद दाराआडच करावा असे नाही हा विचार मान्य असेल?


बहुदा त्याकाळात मोठ्या गुन्ह्याची शिक्षा ही हत्तीच्या पायी देणे ही असावी असं वाटतं आणि मनात येतं आजच्या काळात स्त्रियांवर जे अन्याय करतात त्यांना देखील हीच शिक्षा झाली पाहिजे


या शिल्पामध्ये दोन खास वैशिष्ट्य दिसून येतात. एकतर या स्त्रीने परिधान केलेले वस्त्र पारदर्शी आहे हे अत्यंत सुंदर पद्धतीने तिच्या पायाकडील नाजूक रेषेवरून दिसून येते. दुसरी खास गोष्ट म्हणजे या स्त्रीच्या उजव्या मांडीवरील विंचवाचे कोरीव काम. याचा अर्थ त्या काळात देखील टॅटू म्हणजेच शरीरावर गोंदवून घेण्याची पद्धत असावी. असे म्हणतात की विंचू हा उत्तम शरीरसौख्याचे प्रतीक आहे. कदाचित असे तर नसेल ना की त्याकाळात स्त्रिया अत्यंत मोकळेपणी आपली इच्छा अशाप्रकारे शरीरावर गोंदवून घेत असतील!


एका श्रीमंत सुखी कुटुंबाचे शिल्प! त्यांच्या बसण्याच्या आसनावरून त्यांची सांपत्तिक स्थिती लक्षात येते. त्याचप्रमाणे चेहेऱ्यावरील सुखी आणि आनंदी भाव देखील उत्तम रीतीने कोरलेले आहेत

याशिल्पकला बघताना माझ्या मनात सारखा एकच विचार येत होता की कसे असेल त्याकाळातील आयुष्य? या शिल्पांमधून एक गोष्ट खूपच स्वच्छ प्रतीत होते की त्याकाळात स्त्रीला आणि तिच्या भावनांना अनन्यसाधारण महत्व होते. त्याचबरोबर तिला बरोबरीची वागणूक मिळत असावी. समाजातील तिचे स्थान दुय्यम नव्हते. तिला तिची मते सांगण्याचा पूर्ण अधिकार होता आणि कदाचित त्याकाळात आपला शरीरसुखासाठीचा जोडीदार निवडण्याचा मोकळेपणा देखील तिला होता.

पण मग हा प्रश्न खरच मनात सतत येतो की पुढे जाऊन आपला इतिहास का बरं बदलला? आजदेखील आपण स्त्रीला दुय्यम दर्जा देतो. तिच्या घराबाहेरील कर्तृत्वाचा खूप गाजावाजा होत असला तरी तिचं घरातच असणं; घर आणि संसार सांभाळणं यात टी काही कौतुकास्पद करते आहे असं आपल्याला वाटतच नाही; हे किती दुर्दैवी! एक 'की और का' सिनेमा येऊन जातो.... आणि शेवटी केवळ लिंग बदलून तोच प्रश्न तोच विचार आपल्यासमोर ठेऊन जातो. स्त्री स्वातंत्र्याबद्दल बोलताना देखील तिने समजून उमजून योग्य कपडे घालावेत; असं मत स्त्रियांचं असतच न! मुलींना सालसपणे वागण्याचे वेगळे धडे नाही दिले जात.... मात्र दुर्दैवाने मुलांना स्त्रीसन्मान केला पाहिजे हे सांगावं लागतं!!!

आज आपली संस्कृती पुढारलेली आहे असं आपण मानतो.... हे खरं आहे की हजार वर्षांपूर्वी कदाचित आजच्यासारखे मोबाईल्स नसतील, गाड्या किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नसतील.... मात्र मला वाटतं की ती संस्कृती विचारांनी आणि आचारांनी आपल्यापेक्षा जास्त प्रगत होती.

मनापासून सांगते.... प्रत्येकाने या सुंदर मंदिरांना भेट द्यावीच. आपला सोनेरी इतिहास आणि त्याकाळातील श्रीमंत संस्कृती जाणून घेणे खूप महत्वाची आहे. त्याव्यतिरिक्त देखील खूप काही आहे खजुराहोमध्ये पाहण्यासारखे.

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

12 Mar 2020 - 5:09 am | चौकस२१२

मंदिरांवर संभोगाची शिल्पे हि प्रथा म्हणून पुढे पडली कि काय कोण जाणे कारण मध्यप्रदेश / उत्तरप्रदेश सीमेवरील चित्रकूट येथे गणेशबाग नावाचे स्थळ आहे हे बिठूर च्या अमृतराव पेशव्याच्या काळात बांधले गेले असावे म्हणजे खजुराहो इतके प्राचीन नाही .. हे उन्हाळ्यातील "ऐषोआरामचे निवासस्थान" असे सांगितले जाते,, तिथे तलाव पुष्करणी ( आजकाल चे स्पा ) आणि इतर शौक ( पक्षी पाळणे वैगरे ) यासाठी इमारती, ५ कि सात माजले भुयारे आणि विहीर ..अश्या वस्तू आहे आहेत त्यात एक सुंदर असे ५ कळसाचे मंदिर आहे आणि तेथील रखवालदाराने .. या तुम्हाला गंमत दाखवतो .. म्हणून एक भिंतीवर एक छोटंसंच शिल्प दाखवले कि जे सामुदायिक संभोगाचे होते ! म्हणजे एखादा चित्रकार जसे हळूच आपली निशाणी खुबीने .. चित्रात घालून ठेवतो तसेच काहीसे
हे असे एकच ते सुद्धा छोटे शिल्प का? देवळाचं मालकाने शौक म्हणून कि स्थापत्य विशारदाने चावटपणा कि किंवा शकुनाचे म्हणून केले असावे काय?
आंतरजालावर गणेशबाग करवी , चित्रकूट असे शोधल्यास काही विडिओ दिसतात ..

प्रचेतस's picture

12 Mar 2020 - 8:58 am | प्रचेतस

छान लिहिलं आहे.
बाकी खजुराहोतील मंदिरांवरील एकूण मूर्तीपैंकी मैथुन मूर्तींचे प्रमाण १५/२० % पेक्षा अधिक नाही.

घोड्याला राक्षस मुखवटा दिसतो आहे

हा व्याल नामक काल्पनिक प्राणी आहे.

सर्वसाधारणतः सर्व मंदिरांच्या भिंतींवरील शिल्पांची सुरवात अशा प्रकारच्या राक्षस चेहेऱ्यानी झालेली आहे

ह्या मुखांना किर्तीमुख म्हणतात. हे व्याघ्रसदृष प्राण्याचे मुख आहे. हे नेहमी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या अग्रभागी किंवा उंबर्‍यावर असते. ह्याच्या दर्शनाने दुष्ट शक्ती पळून जातात असे मानतात.

दहाव्या शतकातील बुद्ध मूर्ती

ही बुद्धमूर्ती नसून गोमटेश्वर मूर्ती आहे. दिंगंबर.

दुसरी खास गोष्ट म्हणजे या स्त्रीच्या उजव्या मांडीवरील विंचवाचे कोरीव काम

ही विषकन्या.

कंजूस's picture

12 Mar 2020 - 11:27 am | कंजूस

पहिली आठ दहा चित्रे ही लक्ष्मणा मंदिरावर डावीकडे (मातंगेश्वराच्या बाजूला )आहेत.
खजुराहो यासाठी प्रसिद्ध झाले पण कोणार्कलाही यापेक्षा अधिक आणि मोठी शिल्पे आहेत. काही मोठ्या योगासनमुद्रा केरळातल्या पद्मनाभ मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर आहेत.
कसे गेलात आणि इतर काय पाहिले? कलिंजर,पन्ना वगैरे?

अनिंद्य's picture

12 Mar 2020 - 11:46 am | अनिंद्य

लेख छान. खजुराहो म्हणजे भारताच्या कलावैभवाचे, इथल्या रसिक संस्कृतीचे सुंदर उदाहरण.

पहिल्यांदा गेलो तेंव्हा कुटुंबासह आलेल्या लोकांना 'यहाँ कुछ नही है, चलो चलो बाहर' असे म्हणत तेथून भरभर बाहेर पडतांना बघितले, हसू आवरले नव्हते. आता थोडा मोकळेपणा आला आहे लोकांमध्ये पण तरी स्वतःच्या मुलांसोबत भेट देणारे कमीच.

खजुराहोची मंदिरे मुक्कामी राहून वेगवेगळ्या प्रहरी किमान ३ ते ४ वेळा पाहावीत. अनेक बारकावे लक्षात येतात.

जालिम लोशन's picture

12 Mar 2020 - 2:55 pm | जालिम लोशन

सुरेख.

सुधीर कांदळकर's picture

13 Mar 2020 - 4:13 pm | सुधीर कांदळकर

वर्णन आणि चित्रे दोन्ही सुंदर. प्रतिसाद पण छान. अनेक, अनेक धन्यवाद.

ज्योति अळवणी's picture

13 Mar 2020 - 5:18 pm | ज्योति अळवणी

आपले सर्वांचेच प्रतिसाद माहितीपुर्ण आणि चांगले आहेत. आपले सर्वांचेच मनापासून आभार

ज्योति अळवणी's picture

13 Mar 2020 - 5:19 pm | ज्योति अळवणी

आपले सर्वांचेच प्रतिसाद माहितीपुर्ण आणि चांगले आहेत. आपले सर्वांचेच मनापासून आभार

ज्योति अळवणी's picture

13 Mar 2020 - 5:19 pm | ज्योति अळवणी

आपले सर्वांचेच प्रतिसाद माहितीपुर्ण आणि चांगले आहेत. आपले सर्वांचेच मनापासून आभार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2020 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साहित्यात जसं समाजाचं वास्तव चित्रण असतं तसं शिल्पकलेतही समाजाचं चित्रण आलं असावं. वेरुळच्या लेणीत की मंदिरातही अशी काही चित्र आहेत पण ती शिल्पे शोधावी लागतात. मंदिरातच अशी चित्र का कोरली असतील याचं काही कारण माहिती नाही. पण, इतकी बेधडक कलाकृती बघून आश्चर्य वाटतं. बाकी लेखन छान.
लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

14 Mar 2020 - 7:04 am | प्रचेतस

वेरुळ लेणीतील मैथुन शिल्पं कैलास एकाश्ममंदिराच्या सभामंडपातील स्तंभांवर आहेत. अंधार असल्याने कृत्रिम प्रकाशाच्या साहाय्यानेच ती बघता येतात.

तंत्र पूजेसाठी साधने साठी हि मंदिरे बांधली असावीत

प्रकाश घाटपांडे's picture

14 Mar 2020 - 4:40 pm | प्रकाश घाटपांडे

उत्तम लेख व चित्रे

चौथा कोनाडा's picture

15 Mar 2020 - 12:45 pm | चौथा कोनाडा

खुप सुंदर माहिती आणि फोटो.
खजुराहो दर्शनापूर्वी हा धागा अवश्य वाचून जाण्यासारखा.

हा प्रश्न खरच मनात सतत येतो की पुढे जाऊन आपला इतिहास का बरं बदलला?
त्या काळच्या सामाजिक व्यवस्थेला हे आवश्यक वाटले असावे, काही तरी ठोस कारण असणार.

Jayant Naik's picture

16 Mar 2020 - 9:50 pm | Jayant Naik

चित्रे आणि तुमचे त्यावरील भाष्य खूप सुंदर आहे.

मंदिरे locking systim ने जोडलेली होती. सर्वच मंदिरातील दगड हे तुम्हाला आशा प्रकारच्या क्लिप्स नी जोडलेले दिसतील

यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा ही विनंती...

मदनबाण's picture

20 Mar 2020 - 2:49 pm | मदनबाण

माहितीपूर्ण लेख...
खजुराहो ची बरीच शिल्प पाहिली होती,पण एक शिल्प काय म्हणावं ते... हं फारच इन्होवेटिव वाटलं होत ! त्यामुळे ते कायमच लक्षात राहिले !

P1

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Na Karo Corona virus ko Na Karo Stay Home Stay Safe Lead India

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2020 - 1:08 pm | चौथा कोनाडा

या वरून "उत्सव" या सिनेमाची आठवण झाली. वात्सायन ऋषी कामशास्त्रावरील ग्रंथ लिहिण्यासाठी विविध स्थितीचा अभ्यास करत असतात, काही लोकांकडून अश्या विविध स्थिती यांची व्यवहार्यता तपासात असतात.

खुप वर्षे झाली हा सिनेमा पाहून. अश्या क्लासिक सिनेमाची निर्मिती करणे यात स्व. शशी कपूर यांचे थोरपण लक्षात येते.

टर्मीनेटर's picture

24 Mar 2020 - 4:33 pm | टर्मीनेटर

बोल्ड & ब्युटीफुल लेख!
फोटोज, माहिती सर्वच छान.

अर्धवटराव's picture

25 Mar 2020 - 11:12 am | अर्धवटराव

कॉमेण्ट्री पण छान झाली.

इतकी प्रयोगशीलता दिसते या कामशिपांत. यात समलैंगीक संमंधाचे शिल्प देखील आहेत का ? ग्रुप सेक्स तर अमाप दिसतोय.

Nitin Palkar's picture

25 Mar 2020 - 6:52 pm | Nitin Palkar

खूपच छान लेख आणि अनेक तितकेच माहितीपूर्ण प्रतिसाद.

ज्योति अळवणी's picture

25 Mar 2020 - 11:16 pm | ज्योति अळवणी

आपणा सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार

ज्योति अळवणी's picture

25 Mar 2020 - 11:16 pm | ज्योति अळवणी

आपणा सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार