लपलेल्या जंगलातली शब्दचित्रं

यशोधरा's picture
यशोधरा in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

लपलेल्या जंगलातली शब्दचित्रं

दिवस लहान होताहेत. तसंही पहाडांत झुंजुमुंजु लवकरच. आता आणखीनच लवकर. रजई, पांघरूण ह्यामधून उठून बसणं कठीण होतंय. गर्द वृक्षराजीमुळे सभोवताली हाडं गोठवणारी थंडी. तरी दूर दूर पसरलेल्या घरांतून छपरांवरची धुराडी, घरं जागी झाल्याची खूण म्हणून अलगद स्वयंपाकाचा, पाणी तापवायचा इत्यादी धूर, वाफा वगैरे नि:शब्दपणें आसमंतात भिरकावतायत. निरव शांततेची लय न बिघडवता. सकाळचं वृक्षांवरून, झाडांझुडपांवरून, आसमंतात दाट सायीसारखं साचून राहिलेलं धुकं, त्यातच मिसळणारा उबदार धूर आणि हे सारं अंगावर पांघरत शिखरांटेकड्यांंफांद्यांंघरांवरून खाली जमिनीवर उतरत हलकेच दृश्यमान होणारी सूर्यकिरणं फार सुंदर दिसताहेत. सगळं चित्र कसं देखणं दिसतंय.. जंगलाच्या काठावरची ही एक छोटीशी वस्ती. जंगलदेखील फारसं प्रसिद्ध नाही. ते एक बरं आहे. गर्दी आणि पर्यायाने होणारा कलकलाट नाही.

FB-IMG-1568869050393

घरातली मोठी पुरुष मंडळीं आन्हिकं आटोपून, न्याहारी करून, थंडीचा मुकाबला करायला कानटोपी, काहीतरी गरम कोट, जाकीट किंवा शाल पांघरून, आपली खेचरं, एखादं गुर घेऊन बाहेर पडलीत. खेचरांच्या गळ्यांतल्या घंटा नाजूक, आश्वासक किणकिणत राहतात. आता बिड्या फुंकत, एकमेकांना हाकारे घालत, मध्येच कुठे बसून गप्पा छाटत, चाय पीत कामाच्या ठिकाणी पोहोचतील. कोणीतरी कचेरीत काम करणारा बाबू असला तर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचेल. लहानगी मुलं अनिच्छेने उठत, सगळं आवरून शाळेत जायला निघालीत. गणवेशातले लहानगे घोळके जवळ येताहेत, तसा आख्खा सभोवताल चिवचिवत जागा होतोय! घोळका दूर जातोय, तसा चिवचिवाटही मंद होत जातो आहे. जरा मोठी मुलं, मुली आपापल्या घोळक्यांमधून खुसपुसत वाट कापतायत. लहान-मोठे सर्वच समोरून येणाऱ्या व्यक्तीला हसत रामराम घालताहेत, नमस्ते म्हणताहेत. ती पद्धतच इथे. त्याचं प्रत्युत्तर देताना त्यांचा निर्मळ, प्रसन्न भाव एकमेकांना स्पर्शून जात असावा. इतकं सोपं आहे प्रसन्न असणं..

पहाडातल्या बायका आता कामाला लागल्यायत. त्यांचा कामाचा उरक अफाट आहे. घरी, शेतात, बाजारहाट, गुरं, त्यांचे गवत भारे आणणं, लाकूडफाटा, स्वयंपाक सगळे व्याप ह्यांच्या माथी. पण खमक्या आणि तितक्याच आनंदी आणि मायाळू. पटकन चहाचा कप पुढे करतात. प्रेमाने बोलतात. सगळं निरपेक्ष. त्यांना आयुष्याची खूप जाण आहे, हे नक्की. त्या कधीच हरत नसाव्यात. दिवस लख्ख उजाडलाय. निळंभोर आकाश, पायातळी गवत, गवतफुलं, शैवालयुक्त हिरवे पोपटी वृक्ष, आकाशात सूर मारणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट, माणसांची संथ लगबग, फूलपाखरांच्या नि:शब्द भराऱ्या, खारी, इतर छोटे छोटे इतस्ततः धावणारे प्राणी.. सगळं स्वप्नवत वाटतं खरं.

FB-IMG-1568878332248

'गर्द सभोती रान साजणी' असा मामला असला तरी रानवाटा तशा सुगम आहेत. पायांखाली रुळलेल्या असल्याने असाव्यात. पायाखाली खूप पाचोळा असला तरी चालताना खूप खुर्रsssफुर्रsss आवाज होत नाहीये, क्वचित एखादी वाळकी काडी वगैरे पायाखाली आली तरच. माथ्यावरच्या गर्द सावलीमुळे, पाचोळ्याचा दवाने, थंडीने भिजलेला नरमपणा तसा पथ्यावर पडलेला. शहरी पावलांना मांजरपावलांनी चालायची सवय नसते, पण हे ठीके, फार आवाज होत नाहीये. सोबतीला दोन भूभू उगवलेत कुठूनतरी. पहाडांत येणाऱ्या प्रत्येक भटक्या जिवाला इथे कोणीतरी भूभू वाटाड्या म्हणून लाभतोच. आता फिरा बिनधास्त जंगलात. तसंही हे फार घनघोर जंगल वगैरे नाहीये. भटकायची सवय आणि आवड असेल, तर शहरी जिवांनासुद्धा बऱ्यापैकी सोसेल असंच आहे.

जंगलात शिरल्यावर पक्षीबोली ऐकू येतायत, वेगवेगळ्या पद्धतीचे कुकारे, घातलेली शीळ, हाका. मिळणारे साद, प्रतिसाद. सोबतचा वाटाड्या भाई मज्जेत येऊन एक शीळ घालतोय आणि त्याला चक्क प्रतिसाद मिळतोय! हे भारीच! तेवढ्यात वरून कुठून तरी हुपहुपाट ऐकू येतोय. 'आली मेली माणसं' असं काहीसं असेल का? की, 'आली का नवीन टोळी? बघून घ्या! नाई तर क्काय!' असं? टोळीचा नर एकदम एका बाजूने खाली उतरून शांतपणे बसतोय, थोडेफार दात दाखवतोय. आक्रमकतेने नव्हे, हुकमी आत्मविश्वासाने.

'इथून जाताय ते ठीके, पण भूमी माझी आहे..' 'जो हुकूम' म्हणत आम्ही पुढे सरकायचा उत्तम, सावध मार्ग स्वीकारलाय.

"चौकन्ने चलो दीदी.. डरने की बात नहीं, बस, चौकन्ने चलो.." इति वाटाडे भाईसाहेब.

"चौकन्ने कसलं, इथे मिनिटामिनिटाला मी थक्क होतेय! बस, आपही सहारा!" मी मनातल्या मनात. बाकी, हो, हो म्हणत मान डोलावतेय. आणि ते वाटाडे भूभू? ते बहुधा पुढल्या वाटा शोधायला गेलेत. मागे राहिलेल्यांचं काय झालं, त्यांना चिंता नसावी. नवीन कोणी दोस्त भेटतीलच. त्यांचा हिशेब सोप्पा आहे! आहेत मात्र भलतेच प्रेमळ. समोर खायला काही असलं तर आणखीनच!

मध्येच मुंगसांची एक जोडी इथे तिथे फिरत फिरत आमच्याकडे मधून मधून कुतूहलपूर्ण कटाक्ष टाकत राहतेय. त्यांचं मध्येच स्वतःचं अंग उचलत दोन पायांवर उभं राहणं फार लोभसवाणं आहे.

FB-IMG-1568736583286
सशासारखा दिसणारा एक गोंडस जीव आहे, फार लाजाळू असतो म्हणे. हिमालयात सापडणारा पिका असावा का? तो धावतोय. थोडं पुढे जाता वाटाड्याच्या पहाडी नजरेला एक साळिंदर दिसतंय. "देखो दीदी.. " हे दबक्या आवाजात. बऱ्यापैकी नजरेस पडावं असं असलं, तरी माझ्या शहरी नजरेला पहिल्या फटक्यात दिसलेलं नाहीये. जरा खट्टू व्हायला होतंच आहे. इतकंही दिसू नये आपल्याला?

"इधर ये दिखता हैं?" ये म्हणजे साळिंदर. हिंदीतलं त्याचं नाव मला ऐन वेळी आठवत नाहीये. थोड्या वेळाने लक्षात येतंय, आपल्याला बहुतेक माहीतच नाहीये हिंदी नाव. घ्या!

"हाँ दीदी, दिखता हैं ना, इसे खाने बाघ भी आता हैं.. " बाघ म्हणजे बिबट्या. पट्टेरी वाघ, बिबट्या सगळे बाघ. सर्वप्राणिसमभावाचं उदाहरण.

"आपने देखा हैं कभी?"
"ना! मैंंने तो नहीं देखा, पर इतनी आसानीसे नहीं दिखता दीदी। वैसे दिनमें दिखेगा भी नहीं.." त्याने न म्हटलेलं, 'घाबरायची गरज नाही', हे मला ऐकू येतंय.

तसाच एक मृगसुद्धा बघायचा निसटला आहे माझ्या नजरेतून. वाटाड्या भाईने बरोब्बर बघितलंय. मध्येच ऐकू आलेली खुसपुस त्याचीच. सोन्यासारखी संधी गेली, म्हणून मन हळळतंय.

पुढे मग वृक्षराजी बघत, शांत रानवाटांचा अनुभव घेत भटकंती करणं झालंय. थोडंफार जंगल अनुभवायला मिळालंय. बाळशिखरांवरून सभोवतालची वृक्षराजी दृष्टीत साठवताना हिरव्याकच्च रानाचा ओला वास नाकाला अनुभवायला मिळालाय, आणि एक स्मृती म्हणून, आठवण म्हणून आता कायमचा मनात स्थिरावलाय. वाटेत बैठक मारायला, विश्रांतीसाठी टेकायला मोठासा सपाट खडक, वृक्षांची सावली मिळालीय. रानवाऱ्या-झुळकांसंगतीत सोबत नेलेलं अन्न संपवून शेवटी परतीच्या प्रवासासाठी वेगळी वाट धरणं झालंय.

FB-IMG-1568869018160

वाटेवर एका ठिकाणी साळिंदराला मारलेलं बघायला मिळालंय. रक्त बऱ्यापैकी ताजं वाटतंय. आठवण म्हणून साळिंदराचे दोन काटे घेऊन, झपाझप पावलं उचलत सूर्यास्ताला मुक्कामी पोहोचलोय.

***

राहायची सोय साध्या, अंगण असलेल्या घरात. ते बघताना कोकणातल्या घरासमोरचं अंगण असोशीने आठवतंय. खळं म्हणतात तिथे. ह्या अंगणात फक्त तुळस कमी आहे. घर जरासं खाली. रस्त्यावरून खाली उतरून जावं लागतंय.

भवतीने फूलझाडं आहेत, जराशा अंतरावर भाज्यांचे वाफे. भवताल अंधारात डुंबत चालला आहे. वृक्षवल्लींंचा हिरवा रंग काळा दिसायला लागलाय. येतो न येतो असा पाण्याचा खळाळ ऐकू येतोय. सुखावणारा आवाज. एखादी गत पकडून चालल्यासारखा. जवळपास नळातून थेंब ठिबकताहेत.

IMG-20190919-WA0020

रातकिडे चारही बाजूंनी वेगवेगळ्या सुरात जयघोष लावून आहेत. कुठेतरी झाडावर फांद्यांच्या बेचक्यातून बसलेलं घुबड हू sss हू ss करत हूल देतंय. सोबतीला आमच्या गप्पांचा आवाज. खेचरांंच्या, गुरांच्या गळ्यातल्या घंटेचा मधूनच येणारा आवाज. शहरी कान बरेच आवाज टिपतायत, त्यांना शाबासकी! किती आवाज टिपायचे राहिले, कोण जाणे.

बसल्या जागेवरून जाईचा वेल बहरल्यागत चांदण्या दिसतायत. अगदी फिकुटलेल्या आहेत, त्या पण चक्क डोळ्यांना दिसतायत! आकाशात हे असं वैभव बघताना हरखायला होतं आहे. तिथल्यांना तसं म्हटलं, तर उत्तरादाखल एक समजूतदार हसू पदरात पडलंय. त्यांनी ही अशी दिवाळी कितीदा पाहिली असेल, आणि आणखी कितीदा बघतील... प्रत्येकाच्या पदरातलं दान वेगळं.

आणीत होती। माणिक मोती।।
वरतुनी राजस रात।।
नाव उलटली। माव हरपली।।
चंदेरी दरियांत।।
ती ही वरची। देवाघरची।।
दौलत लोक पहात।। ... आठवल्याशिवाय राहिलेलं नाही. त्या दिवशी आमचाही पुण्यप्रभाव जोरावर असणार आहे! गाण्याला जोडून आजोबा, त्यांचा लाडका ग्रामोफोन अशा आठवणीसुद्धा फेर धरून गेल्यात.

जेवायला साधं, चविष्ट पहाडी खाणं. त्यात ताटात 'रोतरू' म्हणून एक पहाडी पदार्थ आलाय, पानात गुंडाळलेला असा. अतिशय चवदार. कसा बनवतात, विचारलंय. एकदम सोपी कृती! मक्याचे कोवळे दाणे भरडायचे, एकत्र करून, चिमूटभर मीठ घालून एका पानावर थापायचे आणि वाफवायचे. आमच्या कोकणातल्या पातोळ्यांचा पहाडी मैतर की हा. खाताना तूप घेऊन खायचं. बघा आता! मैत्रीवर शिक्कामोर्तब झालंय की नाही!

जेवणखाणानंतर घुबडाच्या हूss हूssच्या सोबतीने भुतांच्या गप्पा निघाल्यात. पहाडी भुतांना दऱ्याखोऱ्या, पहाड खूप आवडत असल्याने जंगल सोडून इथे वस्तीवर कुठे येणार, म्हणून निर्धास्त होतोय. तसंही, ही भुतं काही भयानक वाटत नाहीयेत, निसर्गासोबत राहून मवाळ झाली असणार. आमच्या कोकणातली भुतं कशी ड्येंजर. ती असताना ह्यांची काय भीती! मनातल्या मनात हूंss असं नाक उडवून झोपायला जायचा विचार पक्का होतो आहे. बिबट्या वस्तीवर येतो का, विचारायचं राहून गेलं आहे... हू sss हू ss हू sss.

पाणी, घुबड आणि सुस्तावल्या रातकिड्यांना ऐकत दमले डोळे नकळत, अलगद मिटू पाहताहेत...

***

पहाटेच डोळा उघडला आणि दव पडताना चक्क ऐकू येतं आहे. खिडकीवरला पडदा जरासा बाजूला करून पाहिलं तर अंधार फिकुटतोय, धुक्याच्या रजईतून हिरवी वनराई हळूहळू डोकं वर करतेय. आज, असाच दिवस घालवायचा आहे, निवांत.

इथल्या भूमिपुत्रांचा दिवस नेहमीसारखाच सुरू झालाय. संथ लयीची लगबग. त्याहून संथ लय माझ्या दिवसाला. विलंबित ख्यालासारखी. निवांत न्याहारी, गप्पा संपवून आज निरुद्देश भटकायचं आहे. जंगलात एकटं न घुसण्याचा सल्ला मिळालाय, त्यामुळे असंच पायवाटांनी, वस्तीतून, जंगलाकडेकडेने भटकत, जाईन विचारीत रानफुलां, करत जायचं आहे.

जाता जाता, उन्हाला शेकत बसलेल्या आज्ज्यांच्या हातातलं लोकरकाम अचंब्याने पाहिलंय. चक्कर मारायला निघालेल्या आजोबांना हात जोडत नमस्कार घालत, आदराने दोन शब्द बोललेय. इथे तिथे उगवलेली फुलं, उतरणीवर जिथे उभं राहायलाही जमणार नाही, अशा ठिकाणी चक्क गप्पा मारत, दिलखुलास हसत, विळ्याकोयत्याने गवत कापणाऱ्या पर्वतकन्या लाल, पिवळ्या पेहरावात सुरेख दिसतायत. ह्या युगातल्या पार्वत्या. त्यांचं मला सगळं आवडतंय. स्वभाव, हिम्मत, पेहराव, चटपटीतपणा, हसरे चेहरे, नाकातल्या नथीदेखील. त्या नथीला काहीतरी नावही आहे. बायकांचे शंकर हाताला काम असलं तर कामाला गेले असतील, नाहीतर आहेच मटरगश्ती.

निरुद्देश भटकताना रानफुला गातानाचा किशोरीताईंचा आवाज आठवत राहतोय..

FB-IMG-1568878369594

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरूंचे दाट पुढे बन
तरुवेली करितील गर्द झुला..

या इथे, खुल्या आकाशाखाली, खुळा जीव बुडाला तरी काही हरकत नाही...

दिवस असाच, मटरगश्ती करत मजेत संपलाय. संध्याकाळ आलीय आणि रात्रीने मुक्काम संपल्याची आठवण करून दिलीय. रात्रीच्या जेवणाच्या गप्पांंमधून निरोपाचे सूर उमटू लागलेत. मन जड झालंच आहे. निघावं अशी इच्छा होत नाहीये. हा त्रास नेहमीचाच आहे. प्रत्येक वेळी तितकाच त्रासदायक.

'कोई बात नहीं, वापस आना। सब ऐसेही मिलेगा।' कोणीतरी दिलासा देतंय. तितकीच मलमपट्टी.

***

कालच्या मिळालेल्या दिलाशाच्या भरवंशांवर आज परतीच्या प्रवासाची सुरुवात केलीये. निरोपादाखल हललेले हात आणि निर्मळ हसणारे चेहरे मनात अनंत दिवस रुंजी घालणारेत.

प्रकाशचित्रे श्रेयनिर्देश:

१. हिमालयीन पिका : श्री. उपमन्यू घोष.
२. घुबड : श्री. विनायक जोशी.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

25 Oct 2019 - 3:50 pm | चौकटराजा

हे सर्व वाचताना मारुती चितमपल्ली , व्यंकटेश माडगूळकर , ना,धों . महानोर या साहित्यकाची तर जॉन फर्नांडिस, ए ए अलमेलकर अशा चित्रकारांची आठवण नक्कीच यावी इतके उचच दर्जाचे लेखन आहे हे ! आन त्या फटूचा काय रुबाब ! वा !

वेळ काढून जायला पाहिजे इथं.
( पण नक्की कुठं? नैनीताल, देवप्रयाग,जोशीमठ?)

सुधीर कांदळकर's picture

25 Oct 2019 - 7:41 pm | सुधीर कांदळकर

या क्षणी भन्नाट पाऊस पडतो आहे, केळीच्या पानावरच्या ताशामधून घरालगतच्या मोठ्ठ्या व्हाळीचा मस्त आवाज कानीं येतो आहे आणि हा कवितेकडे झुकलेला हा लेख वाचतोय. मस्तझकास लेखन. जिम कॉर्बेटचे माय इंडिया आणि मारुती चितमपल्लीचे कुठलेसे लेखन आठवले.

अनेक अनेक धन्यवाद.

जॉनविक्क's picture

25 Oct 2019 - 11:47 pm | जॉनविक्क

मस्त वाटले वाचायला. चला आता दिवाळी संपली म्हणजे दोन तीन महिने ट्रेकचा मोसम सुरू.

विंजिनेर's picture

26 Oct 2019 - 8:44 am | विंजिनेर

हा लेख वाचून मला शेल्लार, कॉर्बेट आणि चित्तमपल्लींच्या लेखन शैलीची आठवण झाली - विशेषत: कॉर्बेट... उत्तम लेखन, नेमकी वातावरण निर्मिती आणि सुरेख प्रकाशचित्रे... वा वा! दर्जेदार वाचन करायला संधी दिल्याबद्दल दुवा घ्या!

एकूण, देखणा अंक, चवीने, पुरवून पुरवून वाचण्यासारखा - संकल्पना,मांडणी, लेखांची निवड - प्रत्येक वर्षी चढत्या भाजणीने मिपाकरांसमोर आणणार्‍या सगळ्या चमूचे मनापासून अभिनंदन आणि कौतूक! ऑनलाईन अंक इतका नितांत सुंदर असेल तर छापील अंक सुद्धा दृष्ट लागण्या सारखाच असणार यात शंका नाहीये. आता सावकाश वाचून प्रतिक्रिया देईन

काय लिहलंय, काय लिहिलंय, काय लिहिलंय.....आणी शिवाय ते फोटो. नजर निवली अगदी. धन्स यशोधरा!

पुढे मग वृक्षराजी बघत, शांत रानवाटांचा अनुभव घेत भटकंती करणं झालंय. थोडंफार जंगल अनुभवायला मिळालंय. बाळशिखरांवरून सभोवतालची वृक्षराजी दृष्टीत साठवताना हिरव्याकच्च रानाचा ओला वास नाकाला अनुभवायला मिळालाय, आणि एक स्मृती म्हणून, आठवण म्हणून आता कायमचा मनात स्थिरावलाय.

मलाही नाकात जाणवला तो वास, अहाहा.... लवकरच रानात, डोंगरात गेलं पाहिजे.

पद्मावति's picture

26 Oct 2019 - 1:42 pm | पद्मावति

हे फार सुरेख आहे.

तुम्हां सर्वांचे खूप आभार!

खूप मोठ्या लेखकांची नावे चौराकाका, कांदळकरकाका आणि विंजीनेर तुम्हीं घेतली आहेत, ह्या दिग्गजांच्या लेखनाची आठवण तुम्हांला आली, हे वाचूनसुद्धा मी खरं तर अवाक झाले आहे, खरंच. अनेक आभार! माझी दिवाळीच साजरी झाली तुमचे अभिप्राय वाचून!

कंकाका - त्ये शिक्रेट हाय. १-२ जागा अशा शिक्रेटच बऱ्या.

मनिष, पद्मावति - आभार, धन्यवाद.

जॉनविक्क - आभार. ट्रेकिंगचा काळ पहाडांत सरत आला जवळपास.

कुमार१'s picture

26 Oct 2019 - 5:50 pm | कुमार१

छान ओघवते वर्णन. आवडले.
दिवाळी शुभेच्छा !

नाखु's picture

26 Oct 2019 - 6:25 pm | नाखु

चित्रदर्शी वर्णन आणि सोबत सुंदर काव्य.
मैय्या खरं सांगितले तर थोडासा आगाऊ पणा वाटेल पण हि हिमालयाची असोशी, आच आतुन आली तर आणि तरच जाणे आणि अनुभवणं होते अन्यथा फक्त अल्बममध्ये अडकलेली सहल.
हवा पुण्यात घेत असलात तरी श्वास हिमालयातील प्राणवायूचा आहे हे पदोपदी जाणवते.

घरकोंबडा वाचकांची पत्रेवाला नाखु

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 8:29 pm | जेम्स वांड

हिमाचल मध्ये एकदा फिरायला गेलो असता गाडी पंक्चर झाली म्हणून अंधाऱ्या रात्री एका वाटेवर थांबलो होतो, इकडे तिकडे पाहता एकदम वर नजर गेली तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा "ताऱ्यांचा सडा" काय असतो ते बघितले अन ठसठशीत अश्या आकाशगंगेच्या पट्ट्याने तर पार मंत्रमुग्ध झालो होतो! ती जागाच वायली. ते दृष्य मनात साठवायचे म्हणून पंक्चर काढून झाल्यावरही गाडी तिथेच साईडला पार्क करून बसून राहिलो होतो कित्येक मिनिटे

हो! काय दृश्य असते ते! आकाशात नुसता तारकांचा जल्लोष चालल्यासारखे वाटते. आयुष्यात न विसरण्यासारखे दृश्य असते. सुंदर.

अगदी, अगदी. नेमके हेच मी माझ्याही अनुभवात लिहिले आहे. (जाहिरात नाही. लिंकचा रंग पाहतोय.)

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 8:52 pm | यशोधरा

गडद लाल!

मनिष's picture

26 Oct 2019 - 10:29 pm | मनिष

नाही. डार्क ग्रे. (#333333) इन्हेरीट होतोय. गडद लाल (#900) कुठेतरी ओव्हरराईड होतोय.

चौकटराजा's picture

27 Oct 2019 - 9:18 pm | चौकटराजा

मी कौसानी रीजवरून तो तारकांचा सडा अनेक वर्षांनी पाहिला होता. माझया मुलींना तर आकाशगंगा म्हणजे काय हे ठाऊकच नव्हते ! त्यांना ही तो दूधसागर प्रत्यक्ष दिसला . लय भारी. असाच अनुभव माऊंट अबू जवळचे गुरूशिखर ( प. भारतातले सर्वात उंच ठिकाणं ) येथे येऊ शकतो.पण रात्री रहायाला परवानगी नसावी बहुदा . कारण तो परिसर सेनादलांच्य ताब्यात आहे . तिथे एक आकाशीय वेधशाळा मात्र आहे !

जातीवंत भटका's picture

27 Oct 2019 - 12:00 am | जातीवंत भटका

हिमालयातल्या ट्रेक्सची मजा वेगळीच असते ... फारच सुंदर झालाय लेख !

स्मिताके's picture

27 Oct 2019 - 11:43 pm | स्मिताके

खूप सुंदर, तरल लिखाण आणि सुरेख फोटो. पहाडांची सफर घडवल्याबद्दल आभार.

पाषाणभेद's picture

28 Oct 2019 - 11:00 am | पाषाणभेद

सुंदर लेख. प्रत्यक्ष तेथे जावून आल्याचा भास झाला. अन ते ठिकाण अज्ञातच राहू देत. ज्याच्या नशिबात असेल तो तेथे गेला की समजेलच.

अत्यंत सुंदर. हे सर्व अनुभवायला मिळणं म्हणजे भाग्य..

सोत्रि's picture

28 Oct 2019 - 5:02 pm | सोत्रि

अतिशय सुन्दर!

- (निसर्गप्रेमी) सोकाजी

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 3:00 pm | किल्लेदार

रोजनिशी शैलीतला हा लेखनप्रकार खूप आवडतो पण लिहायला जरा अवघडच. कारण फार बारकावे टिपावे लागतात.

छान वाटतंय वाचून.

व्यंकटेश माडगूळकरांचं "नागझीरा" हे तर अनंतवेळा वाचून झालंय पण प्रत्येकवेळी तेवढंच फ्रेश वाटतं...

Jayant Naik's picture

31 Oct 2019 - 7:47 am | Jayant Naik

निसर्गाचे इतके सुंदर वर्णन अनेक अनेक दिवसांनी वाचायला मिळाले. तुमचे अभिनंदन. तुमची जाणीव उच्च दर्जाची आहे त्या शिवाय अशी अनुभूती आणि शब्द रचना होणे नाही .

ऋतु हिरवा's picture

31 Oct 2019 - 3:50 pm | ऋतु हिरवा

सुंदर...तुमच्याबरोबर आम्हीही फिरतोय असे वाटले. फोटोही सुंदर

कुमार१ - आभार! तुमची दिपावलीही आनंदात गेली असेल, अशी आशा आहे.
नाखु - अगदी खरंय, हिमालयातील प्राणवायूचा श्वास आहे.
चौराकाका - कौसानी रिज! क्या बात. कौसानीवरून नंदादेवी, त्रिशूलसारखी शिखरं दिसतात ना?
भटका - खरंय.
स्मिताके - आभार.
पाषाणभेद भाऊ - हो, शिक्रेटच ठेवणार!
गवि आणि सोत्रि - धन्यवाद!
किल्लेदार - धन्यवाद. व्यंकटेश माडगूळकर माझेही आवडते लेखक आहेत.
Jayant Naik - खूप आभार. तुम्हांला लेख आवडला हे वाचून आनंद वाटला. पहाड असतातच तसे, अनुभूती देतात.
ऋतु हिरवा - माझ्यासोबत मटरगश्ती केलीत, मज्जा! :) आभार.

उत्तमरीत्या शब्दांकित केलेले हे निसर्गचित्र खूप आवडले. फोटोही झकास आहेत.
जंगलातली भटकंती, मग ती हिमालयातली असो, अरवली पर्वतातली असो कि सह्याद्री वा निलगिरी पर्वतरांगांमधली, नेहमीच आनंददायी वाटते.

चाणक्य's picture

4 Nov 2019 - 12:05 am | चाणक्य

कसलं भारी लिहीलय. दिवाळी अंक आल्या दिवशी वाचायला सुरूवात केली आणि जाणवलं हे निगुतीने वाचायचं काम आहे. रात्रीच्या शांततेत कुणाचाही डिस्टर्बन्स नसेल तेव्हाच वाचायचं. खूपच भारी. समोर दृश्य उभं रहात होतं, वेगवेगळे आवाज जणू ऐकू येत होते आणि तो पहाडांमधला शुद्ध हवेचा वासही जाणवत होता वाचताना.

प्रचेतस's picture

4 Nov 2019 - 10:09 am | प्रचेतस

उत्कृष्ट दर्जाचे लेखन.
हिमालयातील जंगल आणि सह्याद्रीतील जंगल दोन्ही किती वेगळे. पण येणारी अनुभूती एकच.
लिहित राहा.

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 11:14 am | श्वेता२४

एखाद्या खळाळत्या झऱ्यामध्ये पाय सोडून बसल्यावर जसं वाटतं, तसं वाटत होतं तुमचे लिखाण वाचताना. फोटो तर अप्रतिमच.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

4 Nov 2019 - 2:46 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

सुरेख लिहिले आहे. अगदी तिथंच असल्याचा भास झाला. आणि ते किशोरीचे गाणे...त्याचे सुर आले कानावर. फारच सुंदर.

यशोधरा's picture

8 Nov 2019 - 10:41 pm | यशोधरा

टर्मीनेटर, चाणक्य, प्रचेतस, श्वेता२४ आणि गौरीबाई गोवेकर नवीन - आपणां सर्वांचे अभिप्रायांबद्दल आभार.

मृत्युन्जय's picture

8 Nov 2019 - 10:51 pm | मृत्युन्जय

एकदम कमाल लिहिले आहे. आताशा मिपावर येत नाही. पण हा लेख जबरदस्तच

जुइ's picture

15 Nov 2019 - 12:27 am | जुइ

पाहाडा मधील भटकंती तसेच मनोगत आवडले.

मस्तच यशो. शब्द आणि चित्रे दोन्ही उत्तम.
तुम्ही हिमालयातून येता पण हिमालय तुमच्यातून जात नाही असं म्हणतात त्याप्रमाणे पुढील हिमालय भेट कधी बरं?

वाचायला थोडा उशीरच झाला, जसा वेळ मिळेल तसं तसं वाचतेय. अजून लिही. :)

तुम्ही हिमालयातून येता पण हिमालय तुमच्यातून जात नाही असं म्हणतात

खरंच म्हणतात. :)

पुढील हिमालय भेट कधी

जेव्हा हिमालयाची इच्छा होईल, तेव्हा. मी पण वाट बघत आहे.

सुबोध खरे's picture

15 Nov 2019 - 11:15 am | सुबोध खरे

उत्तम ओघवते निसर्गचित्र
फार वर्षे झाली असे निवांत जंगलात नुसते बसून.
तेंव्हा हातात मोबाईल नव्हता कि घरची जबाबदारी नव्हती.
खिशात पोट व्यवस्थित भरेल इतके पैसे आणि कायम अशी सरकारी नोकरी होती.
गीर, बांदीपूर, मुदुमलाई, रंगनाथिट्टू, कर्नाळा, दांडेली, कोटी गाव( कि खोतीगाव) अशा अनेक जंगलांत पाणवठ्याच्या/ झऱ्याच्या शेजारी निःशब्द बसून राहणे आणि जंगलातील "शांतता ऐकणे" हा एक उच्च कोटींचा आनंद (घेतला) आहे
आपल्या लेखाने परत एकदा जंगलाकडे धाव घ्यावीशी वाटते आहे.

यशोधरा's picture

15 Nov 2019 - 2:03 pm | यशोधरा

धन्यवाद डॉ.

तुम्ही पण बरीच जंगले फिरलात की. मस्त. येउद्यात काही डिटेल्स.

कोटी गाव( कि खोतीगाव)

मध्य प्रदेशातले का, पुनासा तहसील? त्या गावाचे नाव - तेच असल्यास- कोठी.

सुबोध खरे's picture

16 Nov 2019 - 6:58 pm | सुबोध खरे

नाही.
हे दक्षिण गोव्यातील आहे. पैंगीण या गावावरुन गेल्याचे आठवते.
घनदाट हिरवे जंगल आहे. फारसे प्राणी दिसले नाहीत एक अस्वल, दोन तीन चितळ, आणि बरेच पक्षी दिसले. गवे पण आहेत असं ऐकलं, दिसला एकही नाही.
गव्या वरून आठवलं. राधानगरी अभयारण्यातुन दोन चार तास फक्त कारमधून फेरफटका मारला तेंव्हा एक गवा आमच्या पुढून झाडीत शिरला तेंव्हा जेमतेम दिसला तेवढा.

यशोधरा's picture

16 Nov 2019 - 7:24 pm | यशोधरा

गवे अवाढव्य असले तरी बरेच लाजाळू असतात, दिवसा उजेडी वर डोंगरभागात, झाडीत असतात असे अभ्यासकांकडून ऐकून आहे. एकदा कोकणात रात्री जंगलवाटेने येत असताना अगदी जवळून एका गव्याने रस्ता ओलांडला, तेव्हा पहिल्यांदा मी हा अजस्त्र प्राणी पाहिला! रस्ता ओलांडायला जवळ येईतोवर आम्हांला चाहूल सुद्धा लागली नव्हती. रस्त्यावरून आडवा जाताना अख्खा रस्ता गव्याने व्यापला होता..

यशोधरा's picture

15 Nov 2019 - 2:06 pm | यशोधरा

मृ, जुइ आभार.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 10:41 pm | मुक्त विहारि

मस्त. ..