छायेत मानवाच्या

स्मिताके's picture
स्मिताके in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

छायेत मानवाच्या

फ्लोची पाच मुलं - फेबन, फिगन, फिफी, फ्लिंट आणि फ्लेम. मरिनाची तीन - पेपे, मिफ, मर्लिन. मेलिसाची दोन - गॉब्लिन आणि ग्रेमलिन. शाळेत जातात? अं हं. सतत तोंडात काहीतरी कोंबलेलं, खेळ आणि धुमाकूळ.. झाडांवरून उड्या काय, सूरपारंब्या काय.. काही विचारू नका. मूर्तिमंत सळाळतं चैतन्य..

कुठली मुलं ही सगळी? आणि कोण या तिघी जणी?

गोष्ट आहे फार जुनी, एकोणीसशे साठ सालची. टांझानियातल्या किगोमा शहराजवळच्या गॉम्बे अभयारण्यात राहणारी ही मंडळी. हे चिंपांझींचं अभयारण्य. डॉ. जेन गुडाल यांच्या 'इन द शॅडो ऑफ मॅन' या पुस्तकातून यांची भेट झाली आणि म्हणता म्हणता हे चिंपांझी आहेत, हे विसरायलाच झालं मुळी. एखादं गजबजलेलं गावच गवसलं जणू. पुस्तकातली कृष्णधवल प्रकाशचित्रं इतकी जिवंत झाली, की डोळ्यांसमोर एखादा चित्रपट पाहिल्यासारखं सगळं दिसू लागलं. अगदी बारीकसारीक तपशिलांसकट.

या गावातला कोणताही दिवस म्हणता म्हणता धामधुमीचा होऊन जातो. एकीकडे प्रौढ चिंपांझी कोंडाळं करून बसलेत. एकमेकांचे केस साफसूफ करताहेत. दुसरीकडे अगदी छोटी पिल्लं एकमेकांशी खेळताहेत. त्यांच्यात खेळायचं वय नसलेले तरुण त्या कोंडाळ्यात काय चाललंय, ते बघत जरासे दूर बसलेत. एवढ्यात लांबून चित्कार ऐकू येतात. बबून माकडं आलेली पाहून लांबच्या चिंपांझींनी हाकाटी सुरू केलेली आहे. अक्षरशः गाव गोळा होतो आणि एकच हैदोस घालून बबून माकडांना हाकलवून जातं. पुन्हा एकदा कोंडाळं करून केस सफाई सुरू होते.

वाचता वाचता मला वाटलं की चिंपांझींचा प्रत्येक दिवस काही नाट्यमय नसणार. आता उरलेलं पुस्तकभर काहीतरी संथ, रटाळ वाचावं लागणार. ते खातात कसे, चालतात कसे, बस्स. माकडंच ती, आणखी काय करत असणार असं मोठंसं? पण त्या संथ आयुष्यातून इतका मोठा पट हळूहळू उलगडत गेला, की पुढचं प्रकरण भराभर वाचायची उत्सुकता वाढत गेली. त्यांचं खाद्यजीवन, लैंगिक जीवन, कुटुंबजीवन, समाजजीवन असं काय काय चहूबाजूंनी सामोरं आलं. माझ्या दृष्टीने सर्वात सुरेख भाग होता तो फ्लो, मरिना, मेलिसा, आणि इतर काही माद्यांच्या मातृत्वाच्या निरनिराळ्या तऱ्हा. कोण पिल्लाला सतत जवळ ठेवणारी, तर कोण त्याला फटकारणारी. नव्या भावंडाच्या जन्मामुळे तात्पुरता पोरका झालेला आणि त्यामुळे कुपोषित आणि हिंसक बनलेला हळवा मर्लिन मनाला चटका लावून गेला.

या वर्णनाची मानवी मातृत्वाशी, मुलांच्या वाढीच्या मानसशास्त्राशी घातलेली सांगड पाहून मी थक्क झाले. पुस्तकाच्या आतल्या पुठ्ठयावर या सर्वांची वंशावळी, नावासहित प्रकाशचित्रं पाहून त्यांच्या वर्णनाशी ती ताडून पाहण्याचीही गंमत वाटली.

वरवर दिसायला सगळे चिंपांझीच, पण त्यांच्यातही एकाचं उच्च सामाजिक स्थान असतं आणि बाकीचे त्याच्याशी जरा नमतं घेऊनच वागतात. नर चिंपांझींचा पिल्लं वाढवण्यात सहभाग नसला, तरी ते गोतावळ्यातल्या पिल्लांवर लक्ष ठेवतात, त्यांना मायेने थोपटतात, एखादं पिल्लू संकटात असताना त्याला सांभाळून त्याच्या आईच्या हवाली करतात. हे निरनिराळ्या प्रसंगातून समोर येतं. पण याला अपवाद असे प्रसंगही यात वर्णन केले आहेत. त्या त्या वेळी त्यामागे काय कारणं असतील, याचा शोधही घेतलेला आहे. किंवा कारण समजलं नाही, हे नमूद केलं आहे. पण मुळात अमुक एक वर्णन अपवादात्मक आहे, हे कळून येणं यात संशोधनाची बरीचशी सफलता नाही का?

झाडाच्या बारक्या फांद्या वापरून वारुळातून वाळवी शोधून खाणारी आई आणि तिला पाहून अगदी छोटी काटकी घेऊन प्रयत्न करणारं पिल्लू पाहताना लागलेला शोध म्हणजे चिंपांझी एखाद्या गोष्टीचा वापर साधन म्हणून करू शकतात. याअगोदर साधनं वापरू शकणारा प्राणी, ही मानवाची एक व्याख्या समजली जात असे. डॉ. गुडालनी अत्यंत उत्साहाने आपलं निरीक्षण कळवल्यानंतर त्यांचे गाईड डॉ. लीकी म्हणाले, "कमाल आहे. आता मानव किंवा साधन या शब्दांच्या व्याख्या बदलायला हव्यात. किंवा चिंपांझींना मानव म्हणून मान्यता तरी द्यायला हवी!"

चिंपांझींबरोबरच इथे दिसतात डॉ. गुडाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे परिश्रम. चिंपांझी एका जागी कुठले बसायला? मग त्यांच्या मागून फिरणं, आडोशाला लपून त्यांना पाहणं, कधी त्यांच्याचपासून स्वतःचं संरक्षण करणं आणि सतत समोर येणाऱ्या निरनिराळ्या आव्हानांचा सामना करणं. अभयारण्यात उभारलेल्या एका कॅम्पमध्ये राहून एखाददुसरा दिवस नव्हे, तर सतत काही वर्षं दिवसरात्र अशी सूक्ष्म निरीक्षणं करणं आणि त्यांच्या अचूक नोंदी ठेवणं. प्रत्येक दिवस निराळा. कामाला कुठलंच वेळापत्रक नाही, मर्यादा नाही.

आपल्या गावाबद्दल, आपल्या माणसांबद्दल लिहावं, तसं आत्मीयतेने लिहिलं आहे हे पुस्तक. माझं संशोधन किती अमोल असा आव आणलेला नाही की बोजड शास्त्रीय भाषेने वाचकाला गुदमरून टाकलेलं नाही. उलट, उलगडता न आलेल्या रहस्यांबद्दल मोकळेपणाने लिहिलं आहे. उदा., साधारणपणे शाकाहारी असणाऱ्या चिंपांझींना कधीकधी मांसाहार खुणावतो. (हो, चिंपांझी मांसाहार करतात हा शोधही इथलाच. ) सर्व जण एकत्र येऊन भक्ष्य घेरतात. अशा वेळी एखादं लहानगं पिल्लू पुढे होऊन भक्ष्याला विचलित करतं आणि हल्ला सुरू होतो. मग शेवटी ज्याच्या घावाने शिकार झाली, त्याचा मान मोठा. एरवी केळी खाताना हक्क गाजवणारा उच्च स्थानावरचा चिंपांझीही या शिकाऱ्याला प्रथम मांस खाऊ देतो. असं का? हे कोडं न सुटल्याची कबुली डॉ. गुडालनी दिली आहे. हा शिकारी आपली हक्काची शिकार घेऊन बहुधा एखाद्या उंच फांदीवर जाऊन बसतो. फांद्यांवरची पानं तोडून त्याच्यासकट मांसाचे तोबरे भरून संथपणे त्याचा आस्वाद घेत बसतो. लगेच भोवती कोंडाळं जमतं, "ए, मला दे ना, मलासुद्धा.." करत. मग तो लहर लागेल तेव्हा आपल्या तोंडातल्या घासातला थोडा थोडा भाग समोर पसरलेल्या एका एका हातावर ठेवतो की मंडळी खूश! एकदा अशी मांसाहाराची चटक लागली की काही दिवस अशा शिकारी चालतात. तो भर ओसरून त्या बंद पडल्या, की मग पुन्हा शाकाहार..

9780753809471
आत्ता हे लिहिताना पुस्तकातले अनेक प्रसंग आठवताहेत. रात्री झाडावर चढून, फांद्या वाकवून, ओढून घेऊन, पानं अंथरून झोपणं.. हो, रोज रात्री निराळं झाड, निराळा बिछाना! लहानपणी आईच्या बिछान्यात झोपणारी पिल्लं कशी हळूहळू आपला बिछाना आपण बनवायला शिकतात. छोटी पिल्लं केळ्यांची खोकी पटापट उघडताहेत म्हटल्यावर त्यांच्या पाळतीवर राहून केळी मिळवणारे साळसूद चिंपांझी! भर पावसात नरांनी केलेला जल्लोश! कच्च्या अंड्यांऐवजी उकडलेली अंडी मिळाल्याने उडालेली भंबेरी! शिकारीच्या वेळी निरीक्षण करत उभ्या असलेल्या डॉ. गुडालनी मांस चोरलं तर नाही ना, या संशयाने त्यांच्या जवळ येऊन त्यांना हुंगून घेतलेली झडती! आणि असंच पुष्कळ काही.. पण ते सारं मूळ पुस्तकातूनच वाचायला हवं.

या प्रकल्पावर एकत्र काम करता करता छायाचित्रकार ह्युगो व्हान लाविक यांच्याशी सूर जुळले आणि डॉ. गुडालना जीवनसाथी गवसला. संशोधनातून जमेल तितका वेळ काढून त्यांचं लग्न झालं. पुढे त्यांना मुलगा झाल्यावर ज्या ज्या वेळी त्यांचं कुटुंब गॉम्बेत जाई, त्या त्या वेळी त्याने आपलं लहानपण चक्क एका पिंजऱ्यात बसून काढलं. मग तो पिंजरा लहान पडायला लागल्यावर त्याला एक मोठा पिंजरा मिळाला आणि त्याला दूर समुद्रकिनाऱ्यावर ठेवण्यात आलं. फक्त आईवडील जवळ असतानाच त्याला बाहेर फिरायला मिळायचं. कारण कल्पना करा, माणसांबद्दलची भीती नाहीशी झाली असली, तरी माणसाचं हे कोवळं पिल्लू म्हणजे चिंपांझींच्या नजरेत काय असेल? पण असं असूनही हा चिमुकला म्हणायचा, "माझी जगातली सगळ्यात आवडती जागा कोणती सांगू? गॉम्बे!!"

चिंपांझींना खायला केळी सहज उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचं निरीक्षण करणं सोपं झालं खरं, पण त्यामुळे त्यांच्या एकमेकांबरोबरच्या नैसर्गिक संबंधात प्रचंड बदल घडून आले. त्या भागातल्या चिंपांझींमध्ये हिंसक वृत्ती वाढीला लागली आणि ती अजूनही त्यांच्या वंशजांमध्ये टिकून आहे, अशी टीकाही नंतर झाली. हे टाळता आलं असतं का? संशोधक सतत दृष्टीस पडल्यामुळे गॉम्बेतल्या चिंपांझींची मानवजातीसंबंधीची भीती कमी झाली, हे चांगलं झालं, की वाईट? या पुस्तकात डॉ. गुडालनी आपल्या मनात उभं राहिलेलं द्वंद्व कोणताही आडपडदा न ठेवता मांडलं आहे.

चिंपांझींना आकडे देऊन ओळखण्याऐवजी नावं देणं, त्यांच्यावर मानवी भावनांचे आरोप करणं या संशोधन पद्धतीवर टीका झाली, चर्चा झाल्या. पण हे आरोप मान्य असूनही, तसं करणं आवश्यक होतं असं प्रत्युत्तर डॉ. गुडाल यांनी ठामपणे दिलं. इतक्या आत्मीयतेने आणि सहज सोपेपणाने वर्णन केल्यामुळे सामान्य जनतेला ते समजलं , अशा विचाराने इतर काही शास्त्रज्ञांनी त्यांना पाठिंबा दिला.

मला या पुस्तकाने एका निराळ्या जगाची मनोवेधक सफर घडवून आणली आणि प्राण्यांवरचं संशोधन चालतं तरी कसं, याची झलक दाखवली. एरवी मी जिच्या वाट्याला कधीच गेले नसते, अशी शास्त्रशुद्ध माहिती रंजक रितीने समजली. पुस्तक हातात घेतल्यावर भोवतालचं जग विसरून एखाद्या शांत गावात गेल्याचा भास होऊ लागला. तिथे झाडाखाली बसून निसर्गचक्र प्रत्यक्ष पाहिल्याचं समाधान झालं. या सुरेख अनुभवाबद्दल थँक्यू, डॉ. गुडाल!

पुस्तकाचे नाव: In the Shadow of Man
लेखिका: Jane Goodall
प्रकाशक: Mariner Books (first published 1971) ISBN0618056769

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

सुरेख लिहिलं आहे. पुस्तक मिळवून वाचावं असं वाटत आहे म्हणजे रसग्रहण सुफळसंपूर्ण झालं आहे.

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 4:00 pm | यशोधरा

उत्तम पुस्तक ओळख.
पुस्तकाचं अंतरंग नेमकं उलगडलेलं आहे.

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2019 - 6:15 pm | सुधीर कांदळकर

रसग्रहण.


मला या पुस्तकाने एका निराळ्या जगाची मनोवेधक सफर घडवून आणली आणि प्राण्यांवरचं संशोधन चालतं तरी कसं, याची झलक दाखवली. एरवी मी जिच्या वाट्याला कधीच गेले नसते, अशी शास्त्रशुद्ध माहिती रंजक रितीने समजली. पुस्तक हातात घेतल्यावर भोवतालचं जग विसरून एखाद्या शांत गावात गेल्याचा भास होऊ लागला. तिथे झाडाखाली बसून निसर्गचक्र प्रत्यक्ष पाहिल्याचं समाधान झालं.

वा! सुरेख!! हे वाचल्यावर कोणाला मूळ पुस्तक वाचावेसे वाटणार नाही! अनेक अनेक धन्यवाद.

स्मिताके's picture

27 Oct 2019 - 11:23 pm | स्मिताके

आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

एका वाचनीय पुस्तकाची सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

- (वाचक) सोकाजी

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 1:57 pm | किल्लेदार

व्यंकटेश माडगूळकरांचं "अशी माणसं अशी साहसं" हे पुस्तकही जरूर वाचा (कदाचित वाचलंही असेल). त्यात अश्या बऱ्याच पुस्तकांचं अतिशय सुंदर रसग्रहण आहे.

स्मिताके's picture

29 Oct 2019 - 7:34 pm | स्मिताके

हे पुस्तक नव्हतं वाचलं. आता मिळवून वाचेन नक्की.

मस्तच परिचय करून दिला आहात पुस्तकाचा 👍

रात्री झाडावर चढून, फांद्या वाकवून, ओढून घेऊन, पानं अंथरून झोपणं.. हो, रोज रात्री निराळं झाड, निराळा बिछाना! लहानपणी आईच्या बिछान्यात झोपणारी पिल्लं कशी हळूहळू आपला बिछाना आपण बनवायला शिकतात. छोटी पिल्लं केळ्यांची खोकी पटापट उघडताहेत म्हटल्यावर त्यांच्या पाळतीवर राहून केळी मिळवणारे साळसूद चिंपांझी! भर पावसात नरांनी केलेला जल्लोश! कच्च्या अंड्यांऐवजी उकडलेली अंडी मिळाल्याने उडालेली भंबेरी! शिकारीच्या वेळी निरीक्षण करत उभ्या असलेल्या डॉ. गुडालनी मांस चोरलं तर नाही ना, या संशयाने त्यांच्या जवळ येऊन त्यांना हुंगून घेतलेली झडती! आणि असंच पुष्कळ काही.. पण ते सारं मूळ पुस्तकातूनच वाचायला हवं.

फार रोचक आहे हे सगळं, पुस्तक वाचावेच लागेल!

स्मिताके's picture

29 Oct 2019 - 7:37 pm | स्मिताके

@सोकाजी, टर्मिनेटर

आभारी आहे.

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 11:45 pm | गुल्लू दादा

वेगळ्या विषयावरील पुस्तक परिचय करून दिल्याबद्दल आभारी आहे... नक्की वाचणार. धन्यवाद.

कुमार१'s picture

6 Nov 2019 - 5:57 pm | कुमार१

उत्तम पुस्तक ओळख.
आवडली

स्मिताके's picture

7 Nov 2019 - 9:21 pm | स्मिताके

गुल्लू दादा आणि कुमार१ अभिप्रायाबद्द्ल आभारी आहे.

आपण सुरेख रसग्रहण केलेत वाचकांसाठी. आवडलं

श्रीरंग_जोशी's picture

8 Nov 2019 - 9:54 pm | श्रीरंग_जोशी

नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या विषयावरच्या पुस्तकावर लिहिलेला हा लेख खूप आवडला.
सुदैवाने आमच्या स्थानिक ग्रंथालयात इन द शॅडो ऑफ मॅन हे पुस्तक उपलब्ध आहे. लगेच ऑनलाइन बुकींग करून टाकले :-).

याच प्रकारचे तुमचे आगामी काळातले लेखन वाचायला आवडेल.

श्रीरंग_जोशी's picture

8 Nov 2019 - 9:57 pm | श्रीरंग_जोशी

लेख वाचू लागल्यावर परवाच वाचलेली खालची बातमी आठवली.

This orangutan is legally a ‘non-human person.’ So now she’s a Florida woman.

जुइ's picture

8 Nov 2019 - 10:50 pm | जुइ

अतिशय उत्तम प्रकारे या पुस्तकाची ओळख करून दिली आहे. लागलीच हे पुस्तक वाचायचे ठरवले आहे. अजूनही या प्रकारातले तुमचे लेखन वाचायला आवडेल.

स्मिताके's picture

11 Nov 2019 - 6:25 pm | स्मिताके

श्वेता२४ , जुइ, श्रीरंग_जोशी आपल्या प्रोत्साहनामुळे आनंद झाला. आभारी आहे.

श्रीरंग_जोशी पुस्तक वाचता आहात हे वाचून आनंद झाला. नक्की आवडेल. ओरँगउटान बद्दलची ही नवी माहिती ठाऊक नव्हती.

नूतन's picture

28 Nov 2019 - 9:24 pm | नूतन

लेख आवडला. वेगळ्या विश्वाची सफर घडवणारं हे पुस्तक माझ्या' वाचनीय पुस्तकांच्या 'यादीत जमा.