धरलं तर चावतं...

मित्रहो's picture
मित्रहो in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

धरलं तर चावतं..

दुसऱ्या महायुद्धाचा काळ. रोमपासून काही अंतरावर जर्मनी आणि इटली यांच्या सीमेवरील पियानोझा नावाचे बेट, जिथे अमेरिकन सैन्याचा तळ आहे. अमेरिकन सैन्य जर्मन फौजांपासून इटलीचे संरक्षण करण्यासाठी तैनात आहे. गेली काही वर्षे झाली, हे सैनिक त्यांच्या देशापासून दूर याच बेटावर तैनात आहे. अशात एका सैनिकाची तब्येत बिघडली. तो मरायला टेकला. त्याच्या घरच्यांना कळविण्यात आले, पण त्याच्या घरची मंडळी पोहोचायच्या आधीच तो सैनिक दगावला. एखादी युद्धकथा किंवा करुण कथा वाटावी अशा पार्श्वभूमीवर उभे राहते हे विनोदी पुस्तक. या पुस्तकाच्या नावाने पुढे जाऊन कॉर्पोरेट विश्वाला रोज वापरासाठी शब्द दिला, CATCH-22. कित्येकांनी पुस्तक वाचले नाही, Catch-22 हे पुस्तकाचे नाव आहे याची कित्येकांना कल्पनासुद्धा नाही, तरी सारे Catch-22 हा वाक्यप्रचार वापरत असतात. Catch-22 या शब्दसमूहाला काही अर्थ नाही. इथे Catch हा शब्द मेख असणे किंवा गोम असणे या अर्थाने वापरलेला आहे. पुस्तकाचे नाव लक्षात असण्यासारखे हवे, म्हणून Catch-12 असे नाव ठरले होते. पण ते काही कारणाने रद्द झाले आणि पुस्तकाचे नाव Catch-22 देण्यात आले. सहज वापरलेले हे शब्द पुढे जाऊन हा इंग्लिशमधला इतका प्रचलित वाक्यप्रचार होईल, हे लेखक जोसेफ हेलरलासुद्धा वाटले नसेल. मराठीतल्या 'धरले तर चावते, सोडले तर पळते' याच्याशी जवळपास जाणारे कॉर्पोरेट इंग्लिशमध्ये वापरले जाणारे स्वरूप म्हणजे Catch-22.

पुस्तकाच्या नावाविषयी खूप झाले, जरा पुस्तकाविषयी जाणून घेऊ या. गंभीर पार्श्वभूमीवर लेखकाने विनोद कसा निर्माण केला ते बघा. हे आणि असे बरेच प्रसंग पुस्तकात आहेत. सैनिक मेल्यावर तिथल्या सैन्य रुग्णालयाचा डॉक्टर त्या सैनिकाच्या जागी कथेच्या नायकाला - म्हणजे योसारियनला झोपायला सांगतो. त्यांना तसाही आपला मुलगा आता आठवत नसणार, तू त्यांच्या जागी पेशंट म्हणून झोप म्हणजे निदान मरायच्या आधी मुलाला बघितल्याचे त्यांना समाधान मिळेल. त्या सैनिकाचे आईवडील आल्यानंतरचा संवाद :

"आम्ही लांबून न्यूयॉर्कवरून तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला भीती वाटत होती वेळेत पोहोचू की नाही."
"कशासाठी वेळेत?"
"तू मरायच्या आधी."
"त्याने काय फरक पडतो?"
"आम्हाला तुला असे एकट्याने मरू द्यायचे नाही."
"त्याने काय फरक पडतो?"

"त्याने काय फरक पडतो?" हे वाक्य नायक सतत म्हणत असतो. तो ते म्हणायचे कारण तुमचा मुलगा मेला आहे, मी दुसरा कोणी आहे, मी मरणार नाही आहे. तुमचे येणे विनाकारण आहे. तर त्या सैनिकाच्या आईवडिलांना वाटत असते आपल्या मुलगा आपल्यापासून दूर जातोय म्हणून असे बोलतो. एकच वाक्य परत परत बोलतोय. कारुण्यावर आधारित विनोदाचे याहून सुंदर उदाहरण दुसरे नाही. मृत्यूची अशी क्रूर थट्टा आजवर वाचण्यात आली नाही. जशी मृत्यूची थट्टा आहे, तशीच जगण्याचीसुद्धा थट्टा आहे. तेथील दवाखान्यात एक पेशंट असतो. त्या व्यक्तीच्या शरीराच्या प्रत्येक भागावर प्लास्टर असते. एखाद्या इजिप्शियन ममीसारखा असतो. परिपूर्ण मरणासन्न अवस्थेतली व्यक्ती. त्याला एका सलाइनद्वारे खाद्य पुरविले जाते. सलाइनची एक बाटली वर ठेवलेली असते, तर आउटलेट म्हणून एक बाटली त्या व्यक्तीच्या बेडखाली असते. रोज सकाळी एक नर्स येते, आउटलेटची बाटली इनलेट म्हणून लावते आणि रिकामी झालेली इनलेटची बाटली आउटलेट म्हणून लावते आणि निघून जाते. माणसाच्या मरणासन्न अवस्थेची ही क्रूर थट्टा दवाखान्यात भरती असलेले सैनिक रोज बघत असतात. नायक तर विचारतोसुद्धा - "यात आत खरेच व्यक्ती आहे की नाही हे समजायचे कसे?" ही काहीशी अतिशयोक्ती असली, तरी हे युद्ध लढून असेच जगायचे असले तर कशाला हवे हे युद्ध? खरेच जगाला युद्धाची आवश्यकता आहे का? हा मूलभूत प्रश्न घेऊन हे पुस्तक लिहिले गेले. संपूर्ण पुस्तकात युद्धाचा, युद्धजन्य परिस्थितीत माणसाच्या जगण्याचा, मरणाचा सर्वत्र उपहास आहे.

लेखक जोसेफ हेलर स्वतः दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला अमेरिकेन एअरफोर्समध्ये होते. कथेच्या नायकाने त्याच्यासह विमानात असणाऱ्या स्नोडनचा मृत्यू जवळून बघितला आहे. त्याच्या मनात मृत्यूविषयी प्रचंड भय आहे. जगातला प्रत्येक मनुष्य त्याला मारायला टपला आहेत असेच त्याला वाटते. त्याला या साऱ्यापासून दूर जायचे आहे. कुठल्याही युद्ध कादंबऱ्यात सापडतो त्यापेक्षा पूर्णतः वेगळा असा हा नायक आहे. तो आकर्षक आहे, निरोगी आहे, पण भितरा आहे, युद्धापासून पळणारा आहे. त्याला युद्धभूमीवर जायचे नाही. त्याला विमानातून उडणे थांबवायचे आहे. त्याला सर्वसामान्या माणसांसारखे क्षणोक्षणी मृत्यूचे भय नसणारे जीवन जगायचे आहे. यातून सुटण्याचा मार्ग त्याला डॉक्टर डॅनिका सांगतो. या दोघातला संवाद म्हणजे या पूर्ण पुस्तकाचा सारांश.

"डॉक्टर, कुण्या वेड्याला युद्धावर पाठवू नये असा नियम नाही का?”
"नक्कीच आहे. जो कोणी वेडा असेल, तो युद्धावर जाऊ शकत नाही. नियम आहे तसा.”
"मी वेडा आहे डॉक्टर, ठार वेडा आहे. विचारा कुणालाही.” तो एकाला विचारतो आणि तो वेडा असल्याचे खातरीने सांगतो.
"बघ, सारे सांगताहेत."
"हो, पण तो वेडा आहे. एक वेडा दुसऱ्याला वेडा ठरवू शकत नाही.”
"तो वेडा आहे, तर तू त्याला युद्धावर का पाठवतो?”
"त्यांनी कधी विचारले नाही तसे."
"का?”
"तो वेडा आहे. सतत असे विमान घेऊन युद्धमोहिमेवर जाणारा वेडा नाहीतर काय? असे वेडे विमान उडवायच्या लायकीचे नाहीत. पण त्याने तसे विचारायला हवे.”
"त्याने फक्त त्याला युद्धावर जायचे नाही एवढेच विचारायला हवे, म्हणजे तो परत कधी युद्धावर जाऊ शकणार नाही.”
"हो. पण एक मेख आहे. ज्याक्षणी त्याला वाटेल त्याला वेड्यासारखे विमान उडवायचे नाही आणि तो तसे विचारेल, त्याक्षणी तो वेडा नसेल.”

हेच ते Catch-22. सारांश काय - यातून सुटण्याचा मार्ग नाही. हे युद्ध, जीवन-मरणाचा हा संघर्ष असाच अविरत सुरू राहणार.

या पुस्तकात विनोदाचे सारे प्रकार वापरले गेले आहेत. उपहास सर्वत्र आहे, प्रसंगनिष्ठ विनोद आहे, शाब्दिक विनोद आहे, ब्लॅक ह्यूमर आहे, अतिशयोक्ती आहे. यातील उपहासपूर्ण भाषेची सवय व्हायला वेळ लागतो. एकदा ती सवय झाली की कुणी सतत असे कसे लिहू शकतो याचेच आश्चर्य वाटते. पुस्तकातले पहिलेच वाक्य बघा - 'योसारियन दवाखान्यात भरती होता. त्याला झालेला आजार काविळीपेक्षा जरा कमी होता. डॉक्टर तो आजार काविळीत रूपांतरित व्हायची वाट बघत होते, म्हणजे त्यांना आजाराचा इलाज करता येईल.' दुसरे उदाहरण - 'त्याच्याविरुद्धची केस अगदी ओपन आणि शट या प्रकारातली होती. फक्त त्याच्यावर आरोप काय ठेवायचा हे ठरायचे होते.' अशा चक्रीय, विरोधाभासी वाक्यांची सवय व्हायला वेळ लागतो.

मिलिटरी आणि तिथले अतिशिस्तीचे वातावरण, पदानुसार ठरणारे क्रम, वरिष्ठांच्या विचित्र आज्ञा आणि त्या पाळण्यासाठी त्यांच्या हाताखालच्या लोकांची होणारी धडपड, हांजी हांजी प्रवृत्ती हे उपहासी विनोदासाठी खूप पूरक असे खाद्य आहे. लेखकाने त्याचा भरपूर उपयोग करून या साऱ्या व्यवस्थेवर प्रचंड टीका केली आहे. न्यूयॉर्कवरून एक गाण्याचा ग्रूप सैनिकांच्या मनोरंजानासाठी येतो. तेव्हा एक अधिकारी सैनिकांना सांगतो, "हा ग्रूप फार लांबून तुमचे मनोरंजन करण्यासाठी आला आहे. त्यांना निराश करू नका. वरिष्ठांची आज्ञा आहे की तुम्ही तुमचे भरपूर मनोरंजन करून घ्या." मनोरंजन करून घेण्यासाठीसुद्धा आज्ञा! घरदार सोडून वर्षानुवर्षे इथे राहणाऱ्या सैनिकांचे काही नाही, पण दोन दिवसांसाठी आलेल्या ग्रूपला मात्र नाराज करू नका. परिस्थितीचा केवढा मोठा उपहास आहे हा.

योसारियनला कुठलेसे मेडल मिळते. ते घ्यायला तो कपडे न घालताच जातो. जनरल त्याला विचारतो, "तू असा का आलास? कपडे का घातले नाही?”
"मला घालावेसे वाटले नाही."
"याला कपडे का घालावेसे वाटले नाही?” असा प्रश्न जनरल ड्रिडल कर्नलला विचारतो. कर्नल मेजरला विचारतो, मेजर कॅप्टनला विचारतो, कॅप्टन सार्जंटला विचारतो. प्रश्नाचे उत्तरसुद्धा असेच पायरीपायरीने वर पोहोचते. अशा प्रकारे दोन-तीन प्रश्नोत्तरे झाल्यावर जनरल म्हणतो, "सारा फालतू प्रकार आहे.”
कर्नल लगेच म्हणतो. "मलाही तेच वाटते. मी तुम्हाला शब्द देतो, मी त्याला चांगली शिक्षा करतो.”
"त्याने काय होणार? त्याला मेडल मिळाले आहे. त्याला जर मेडल कपडे न घालता घ्यायचे असेल तर कपडे न घालता घेऊ दे.”
"अगदी बरोबर सर. माझ्याही ह्याच भावना आहेत.” कर्नल कॅथकार्ट लगेच हो ला हो मिळवतो. या प्रसंगातून लेखकाने हायरार्कियल व्यवस्थेची जबरदस्त खिल्ली उडवली आहे. तसेच सतत वरिष्ठाची मर्जी सांभाळून वागणाऱ्या व्यक्तींवरही हात धुऊन घेतले. हायरार्कियल व्यवस्था असेल तर असे वरिष्ठांच्या हो ला हो हो मिळवणारे कर्नल कॅथकार्ट तयार होणारच, हेच सांगायचे असेल. या पुस्तकातला विनोद आवडायचे मुख्य कारण हेच आहे की तो विनोद काहीतरी सांगत असतो. यातील विनोद कधी व्यक्तीतील दोषांवर भाष्य करतो, तर कधी व्यवस्थेवर भाष्य करतो, तर कधी जीवन-मृत्यूसारख्या मूलभूत गोष्टींवर भाष्य करतो.

प्रसंगनिष्ठ विनोदाचे आणखी एक उदाहरण म्हणजे डॉक्टर डॅनिकाचा मृत्यू. डॉक्टरला विमानाची भीती वाटत असते. तिथल्या नियमानुसार काही उड्डाणे करणे बंधनकारक असते. डॉक्टर मग एका पायलटशी संधान बांधतो. तो उडत असताना डॉक्टर त्या पायलटसह विमानात होता अशी कागदोपत्री नोंद करतो. एकदा असेच नेहमीप्रमाणे पायलट डॉक्टरसह उड्डाण भरत आहे असा फॉर्म भरतो. त्या दिवशी विमानाला अपघात होतो, पायलट अपघात घडवून आणतो. विमान पूर्णतः नष्ट होते. त्यात प्रवास करणाऱ्या सर्व व्यक्तींचा मृत्यू झाला आहे अशी कागदोपत्री नोंद होते. डॉक्टर मेला आहे ही बातमी पेशंटपर्यंत पोहोचते. डॉक्टर पेशंटची तपासणी करण्यासाठी येतो.

"तुमचे अंग खूप थंड आहे.” पेशंट काहीच बोलत नाही.
"तुमचे अंग इतके थंड कसे राहू शकते?”
"डॉक्टर, तुम्ही मेलेले आहात."
"काय?”
"हो डॉक्टर, तुम्ही मेलेले आहात, म्हणूनच तुम्हाला सारे थंड वाटते.”
सार्जंट डॉक्टरला सल्ला देतो, "तुझ्या प्रेताची विल्हेवाट लागेपर्यंत तू या दवाखान्यापासून दूर राहा.”

डॉक्टर बायकोला तो जिवंत असल्याचे लिहून कळवतो. ती संबंधित खात्याशी संपर्क साधून त्या पत्राची शहानिशा करायला सांगते. खात्याकडून पत्र येते - नि:संशय मृत्यू, आमच्या खात्याकडून चूक होणे शक्यच नाही. मग तिला खूप रकमा मिळत राहतात. वेगवेगळ्या विम्याचे पैसे, विविध खात्यांकडून मिळणारे पेन्शन. तिच्या मैत्रिणींचे नवरे तिच्यात रस घ्यायला लागतात. ती केसांना डाय करायला सुरुवात करते. तिची खातरी असते, नवरा जिवंत असताना जे मिळाले नाही, त्याहीपेक्षा जास्त वैभव केवळ नवऱ्याच्या बलिदानामुळे मिळालेले आहे. म्हणूनच ती जिवंत असणाऱ्या नवर्‍याच्या पत्रांकडे दुर्लक्ष करीत असते.

यातला अतिशयोक्तीचा दोष ग्राह्य धरला, तरी जगणे, मृत्यू आणि व्यवस्था याची जितकी थट्टा करता येईल तितकी थट्टा लेखकाने केली आहे. एका गंभीर विषयाची या प्रकारे थट्टा करायला विलक्षण कौशल्य लागते. निर्विवाद ही अतिशयोक्ती आहे, पण म्हणून लेखकाला जे सांगायचे आहे, त्याचे महत्त्व कमी होत नाही. पात्रांच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करताना, किंवा प्रसंगाचे वर्णन करताना लेखकाने भरपूर अतिशयोक्ती केली आहे. मेजर मिलो हे अतिशयोक्तीची अतिशयोक्ती असे पात्र आहे असे म्हटल्यास अजिबात चूक होणार नाही. हा तिथल्या कँटीनमधली मेस चालवणारा असतो. एक पूर्णपणे भ्रष्टाचारी असा व्यावसायिक. लाच देण्यासंबधी त्याचे मत असेच मजेशीर असते. 'लाच देणे हा गुन्हा आहे आणि नक्कीच गुन्हा आहे, पण नफा कमाविण्यासाठी लाच देणे हा काही गुन्हा नाही.' तो इजिप्तमधून कापूस घेतो, पण तो कुठे विकायचा हा प्रश्न असतो, तेव्हा तो कापूस मेसमध्ये येतो. त्याचे वाक्य This stuff is better than cotton candy, it is made out of real cotton. पुढे जाऊन तो मोठा व्यापारी बनतो. तो या देशाचा माल त्या देशाला आणि त्या देशाचा माल या देशाला विकतो. तो जर्मनीलासुद्धा पेट्रोलियम आणि बॉल बेअरिंग विकून येतो. कितीही भ्रष्टाचार केला, लाच दिली तरी त्याचे पालुपद असते - Fair is Fair.

पुस्तकात खूप पात्रे आहेत. कुठल्या पात्राची काय भूमिका आहे, त्याचे स्वभाववैशिष्ट्य काय हे सारे ध्यानात ठेवून पुस्तक वाचताना दमछाक होते.

योसारियन या कथेचा नायक आहे. पारंपरिक नायकाच्या प्रतिमेलाच लेखकाने तडा दिलेला आहे. नायकाला युद्धमोहिमेवरील मृत्यूच्या तांडवाचे भय वाटते. तो सतत यु्द्धमोहिमेपासून दूर राहू इच्छितो. युद्धमोहिमा टाळण्यासाठी तो निरनिराळे बहाणे शोधतो. आजारी असल्याचे सोंग करून दवाखान्यात भरती होतो. एकदा तर तो मला प्रत्येक गोष्ट दोन दिसते असा आजार आहे हे सांगतो. डॉक्टर डॅनिका हा नायकाचा मित्र. Catch-22 समजावून सांगणारा तोच असतो. हा व्यवहारी आहे, तिथे राहून आपला फायदा कसा साधता येईल असा विचार करणारा. त्याच्या क्लृप्त्या त्याच्यावर कशा उलटतात हे मी आधी सांगितलेलेच आहे.

कर्नल कॅथकार्ट हा एक शिस्तीचा कर्नल. त्याला जनरल व्हायचे आहे, म्हणूनच तो सतत वरिष्ठ जनरलच्या हो ला हो मिळविण्यात पुढे असतो. वरिष्ठांना खूश करण्यासाठी तो सतत सैनिकांच्या युद्धमोहिमा वाढवत असतो. स्वतःने मात्र फक्त चार युद्धमोहिमांत भाग घेतलेला असतो. कर्नल कॅथकार्ट आणि कर्नल कार्न यांच्यात सतत काटछाट सुरू असते. जनरल ड्रिडल आणि जनरल पेकम सतत एकमेकावर कुरघोडी करायला टपलेले असतात. जनरल पेकमला जनरल ड्रिडलला बाजूला हटवून पियानोझाच्या कँपचा मुख्य जनरल व्हायचे असते. युद्धभूमीवर गणवेशात जायला हवे असा आदेश जनरल पेकम देतो, तर जनरल ड्रिडल त्याबरोबर युद्धमोहिमेवर जाताना टाय घालण्याचा आदेश देतो.

मेजर हे पात्र म्हणजे आयुष्यात फार काही न करता केवळ नशिबाने (luck by chance) ज्याला बरेच काही मिळत जाते असे पात्र. त्याच्या आयुष्यातील सर्व गोष्टी त्याला केवळ नशिबानेच मिळालेल्या असतात. तो कुणाला भेटत नाही. सर्वांपासून लपून राहतो. सार्जंट टोवसर त्याची सारी कामे बघतो. हंग्री जो हे अतिशय बोअरिंग पात्र. वरिष्ठांनी सांगितल्या त्या आज्ञा कुठलाही प्रतिप्रश्न न विचारता पाळणारी व्यक्ती. सर्वात जास्त युद्धमोहिमांवर तो गेलेला असतो. जेव्हा त्याला युद्धमोहिमांवर पाठवायचे नाही असा निर्णय व्हायचा असतो, नेमका तेव्हाच कागदपत्रांचा घोटाळा होतो. काही दिवसांनी जास्तीत जास्त मोहिमांची संख्या वाढविली जाते. नेटली हा योसारियनचा मित्र, पण अगदी त्याच्या विरुद्ध स्वभावाचा. ध्येयवादी, आदर्शवादी, आशावादी असतो. बऱ्याचदा त्याचा आशावाद खूप भोळाभाबडा आहे, हेच सिद्ध होते.

चॅपलीन हा धर्मगुरू. याला दवाखान्यात भरती असलेल्या सैनिकांना उपदेश करून त्यांचा हुरूप वाढविणे, त्यांचे मनोबळ वाढविणे हे काम दिले आहे. तो प्रत्यक्षात खूप घाबरट आहे. त्याच्या हाताखालची व्यक्तीच त्याच्यावर हुकूम गाजवत असते.

एक गोष्ट मात्र खटकत राहते, ती म्हणजे या पुस्तकात स्त्रीपात्रे फार कमी आहेत. जी आहेत त्यांनाही फार महत्त्व नाही. दुसऱ्या महायुद्धातील युद्धभूमीवरील वातावरणामुळे तसे झाले असावे कदाचित. दोन नर्स, रोममधील वेश्यागृहातील बहिणी, लुसियाना, मेड, एका वरिष्ठाची बायको, डॉ. डॅनिकाची बायको अशी काही पात्रे आहेत, पण ती फारशी महत्त्वपूर्ण वाटत नाहीत.

IMG-20191007-224208

Catch-22 हे हलकेफुलके विनोदी पुस्तक नाही, ही युद्ध आणि युद्धाची आवश्यकता या वरील एक प्रखर टीका आहे. या टीकेची पद्धत जरी विनोदी असली, तरी त्यातले गांभीर्य कुठेही कमी होत नाही. शेवटी शेवटी पुस्तक अतिशय गंभीर होत जाते. उद्ध्वस्त झालेल्या रोमचे वर्णन वाचताना अंगावर काटा उभा होतो. शेवटली काही प्रकरणे अतिशय गंभीर आहेत. हे सारे वाचताना खरेच युद्धाची आवश्यकता आहे का? असा प्रश्न सतत पडत राहतो.

दुसरे म्हणजे या पुस्तकाची रचना. पुस्तक Non Linear पद्धतीने लिहिलेले आहे. एकामागे एक घटना येत नाही. काही घटना चालू काळात घडतात, काही भूतकाळात घडतात. हा काळ बदल कुठे होतो आहे हे ध्यानात ठेवावे लागते. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण (शेवटी काही अपवाद सोडता) हे त्यातील पात्रांच्या नावाने आहे. त्या पात्राविषयी लिहिता लिहिता कथा पुढे सरकत जाते. कथानक कधी या स्थळावरून दुसऱ्या स्थळावर किंवा काळात थोडे मागेपुढे जाईल सांगता येत नाही, त्यामुळे फार लक्ष ठेवून वाचावे लागते. हेच उदाहरण बघा - 'त्याला थँक्सगिव्हिंगचे टर्कीचे जेवण फार आवडले. पुढील प्रत्येक थँक्सगिव्हिंगला त्याने तिथेच राहायचे ठरविले. पुढच्या थँक्सगिव्हिंगला तो दुसऱ्या कुणासोबत होता.' काळ एक वर्ष पुढे गेला, स्थळ बदलले. हा बदल एका परिच्छेदाच्या मध्ये होतो. दोन वाक्ये जरी वाचायची राहिली, तर अरे हे काय चालले आहे असा प्रश्न पडतो. नेटलीचा मृत्यू हाही असाच आहे. संपूर्ण प्रकरणात एक विमान दुसऱ्या विमानाला जाऊन धडकले याचे वर्णन आहे. ते दुसरे विमान कसे धडकले, त्याचे काय नुकसान झाले, त्यातील व्यक्ती कशा मेल्या याचे तपशीलवार वर्णन आहे. शेवटी एक वाक्य आहे - दुसऱ्या विमानाची गत तशीच झाली होती. त्यात नेटली उडाण भरत होता. कथानकाच्या दृष्टीने नेटली हे महत्त्वाचे पात्र आहे. दुसऱ्या विमानात मृत्यू पावलेला व्यक्ती फक्त त्या प्रकरणापुरती आहे. वाचताना मला बऱ्याचदा मागे जाऊन वाचावे लागले, तेव्हा कुठे नक्की काय झाले ते समजले.

तिसरे म्हणजे यातली परस्पर विरोधाभासी वाक्ये 'त्याची बायको त्याच्यावर त्या गुन्ह्याविषयी सूड उगवीत होती, जो गुन्हा तिला आता आठवत नाही.' जवळजवळ प्रत्येक परिच्छेदामध्ये या प्रकारची वाक्ये आहेत. अशा वाक्यातून कथा पुढे सरकत जाते. तेव्हा कथा लक्षात घेत लेखकाला नक्की काय सांगायचे हे समजून घेत पुढे वाचत राहायचे.

विरोधाभासी वाक्यांची आणखीन काही उदाहरणे -

'ती मेंदू नसलेला एक अतिबुद्धिमान व्यक्ती होती.'

'तो डाव्यासमोर उजव्या व्यक्तींची बाजू घ्यायचा आणि उजव्यांसमोर डाव्या व्यक्तींची बाजू घ्यायचा, पण कोणीच कुठेही त्याची बाजू घेत नव्हते.'

'त्याला त्याच्या ऑफिसमध्ये कधीच बघू शकत नव्हते. अपवाद होता तो तिथे नसतानाचा.'

'माझा देवावर विश्वास नाही. पण माझा ज्या देवावर विश्वास नाही, तो देव चांगला आहे. तू सांगतो तसा नाही.'

'मिलोने नंतर जेवणाच्या किमती वाढवल्या. इतक्या वाढवल्या की सारा पगार खाण्यातच संपायचा. मिलोचा निवडस्वातंत्र्यावर पूर्ण विश्वास होता. त्याने दुसरा पर्याय दिला - उपाशी राहणे.'

अशा विरोधाभासी वाक्यात तुमच्यावर धडकत राहतात. एकामागोमाग एक पात्रांचे मृत्यू, प्रेत, रक्ताचे थारोळे आणि रक्तरंजित युद्ध. विनोद, युद्ध आणि युद्धावरील विनोद हे सारे समजून घ्यायला वेळ लागतो. त्याचसाठी हे पुस्तक वाचताना त्याला त्याचा वेळ द्यावा लागतो. लेखकाला लिहायला आठ वर्षे लागली होती, तेव्हा वाचकाने थोडा वेळ द्यायला हरकत नाही. एकदा या पुस्तकाची नशा चढली की मग पूर्ण झाल्याशिवाय पुस्तक सोडायची इच्छा होत नाही.

Catch-22 हे इंग्लिश साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. इंग्लिश क्लासिकमध्ये याची गणना होते. १९६१ साली हे पुस्तक प्रकाशित झाले होते. १९५३ ते १९६१ अशी आठ वर्षे लेखक या पुस्तकावर काम करीत होता. विसाव्या शतकातील सर्वोत्तम अशा १५ पुस्तकांत याची गणना होते. इंग्लिश साहित्यातील आजवरच्या सर्वोत्तम अशा शंभर पुस्तकांत या पुस्तकाची गणना होते. विनोदी कादंबरी म्हणून जर याकडे बघायचे म्हटले, तर माझ्या मते कदाचित याचा नंबर पहिला किंवा दुसरा असेल.

हे पुस्तक का वाचावे याची बरीच कारणे आहेत. विनोद कसा आणि कुठे निर्माण होऊ शकतो, या शक्यता समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक वस्तुपाठ आहे. मृत्यूपासून वाचण्याची माणसाची धडपड यापेक्षा करुण असे काही नाही. या कारुण्यावर आधारित जो विनोद या पुस्तकात आहे, तो इतरत्र कुठेही वाचायला मिळत नाही. यातली नुमनेदार पात्रे, यातली काही नमुने बघून 'आमच्या ऑफिसमध्ये आहे असा नुमना' असे बऱ्याच जणांना वाटू शकते. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे यातल्या पात्रांची वैशिष्ट्ये. थोडा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की ही पात्रे समाजातील विविध घटकांचे, विविध प्रवृत्तींचे दर्शन घडविणारी आहेत.

शेवटी या पुस्तकातला मला आवडलेला एक प्रसंग सांगतो. हा प्रसंग परत एकदा युद्धविरोधाचा मुद्दा जोरकसपणे मांडतो. एक एकशेसात वर्षांचा म्हातारा रोममध्ये वेश्यालय चालवीत असतो. म्हातारा नेटलीला सांगतो,
"या युद्धात अमेरिका हरणार."
"अमेरिका ही जगातील शक्तिशाली महासत्ता आहे. त्यांचे सैन्य जगात सर्वोत्तम आहे.”
"युद्धात इटली जिंकणार. आम्ही जगातली महासत्ता नाही, आमचे सैन्य कदाचित दुय्यम दर्जाचे असेल, पण युद्धात इटली जिंकणार.”
"हे कसे शक्य आहे? जर्मन लोकांनी तुमच्यावर ताबा मिळविला, मग अमेरिकन तुमच्या मदतीला आले, तरी तुम्ही जेते कसे?”
"जर्मन आले नि गेले. आज अमेरिकन आहेत. आज अमेरिकन सैन्य आमच्यासाठी जर्मन फौजांविरुद्ध लढत आहे. उद्या तुम्ही अमेरिकनसुद्धा जाल. पण आम्ही इटालियन इथेच राहू. मग विजयी कोण?” बराच मोठा संवाद आहे आणि खूप तिरक्या पद्धतीने म्हातारा आपला मुद्धा मांडतो. पुढे जाऊन सारेच उद्ध्वस्त होते. रोम, रोममधीला त्या म्हाताऱ्याचे वेश्यालय, तो म्हातारा सारे सारे नष्ट होते.

माणसाचा इतिहास हा बेडकाइतका पन्नास कोटी वर्षे जुना नाही. माणूस ही प्रजाती बेडकासारखी पन्नास कोटी वर्षे जगू शकेल असे कोणी खातरीने सांगू शकत नाही. असे असतानाही एका मानवाने दुसऱ्या मानवावर कुरघो़डी करण्यासाठी युद्धाची आवश्यकता आहे का? रक्तसंहाराची गरज आहे का?

कदाचित जग Catch-22 च्या चक्रात सापडले आहे. जगात शांतता हवी असेल तर जगाला युद्धाची गरज आहे...

पुस्तकाचे नाव: Catch 22
लेखिका: Joseph Heller
प्रकाशक: Simon & Schuster (first published 10 October 1961)
ISBN 0-671-12805-1

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

26 Oct 2019 - 2:19 am | राघवेंद्र

आवडले.

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:48 pm | यशोधरा

एका क्लासिकची उत्तम ओळख.
छानच लिहिलेत.

टर्मीनेटर's picture

27 Oct 2019 - 3:45 pm | टर्मीनेटर

पुस्तक परिचय आवडला!

माणसाचा इतिहास हा बेडकाइतका पन्नास कोटी वर्षे जुना नाही. माणूस ही प्रजाती बेडकासारखी पन्नास कोटी वर्षे जगू शकेल असे कोणी खातरीने सांगू शकत नाही. असे असतानाही एका मानवाने दुसऱ्या मानवावर कुरघो़डी करण्यासाठी युद्धाची आवश्यकता आहे का? रक्तसंहाराची गरज आहे का?

कदाचित जग Catch-22 च्या चक्रात सापडले आहे. जगात शांतता हवी असेल तर जगाला युद्धाची गरज आहे...

शेवटचा हा परिच्छेद अंतर्मुख करून गेला...

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2019 - 6:45 pm | सुधीर कांदळकर

वेगळ्या विचारधारेचे, अतर्क्य वाटणारे छान उलगडून दाखवले आहे. आणि हे वाचायची स्वय व्हावी लागते असा इशाराही दिला आहे. आता हे ऑल टाईम ग्रेट पैकी एक असलेले क्लासिक वाचावेच लागणार. अनेक, अनेक धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2019 - 6:46 pm | सुधीर कांदळकर

वेगळ्या विचारधारेचे, अतर्क्य वाटणारे छान उलगडून दाखवले आहे. आणि हे वाचायची स्वय व्हावी लागते असा इशाराही दिला आहे. आता हे ऑल टाईम ग्रेट पैकी एक असलेले क्लासिक वाचावेच लागणार. अनेक, अनेक धन्यवाद.

जॉनविक्क's picture

27 Oct 2019 - 7:41 pm | जॉनविक्क

युध्दे नेमकी का घडतात याची सहजसोपी मीमांसा आहे पण धागा पुस्तकाबाबत आहे आणी ओळख आवडली

सोत्रि's picture

28 Oct 2019 - 3:38 pm | सोत्रि

अतिशय सुन्दर ओळख!

- (कॅच २२ परिस्थिती अनुभवलेला) सोकाजी

मित्रहो's picture

28 Oct 2019 - 9:26 pm | मित्रहो

धन्यवाद राधवेंद्र, यशोधरा, टर्मीनेटर, सुधीर कांदळकर, जॉनविक्क, सोत्रि.
मी रसग्रहणात सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक आवडायचे महत्वाचे कारण म्हणजे एका अतिशय गंभीर विषयावर, एका गंभीर परिस्थितीवर विनोदी पद्धतीने केलेली टिका. हे पुस्तक फक्त हसवत नाही तर विचार करायला लावत. खूप दिवस विचार करायला लावत.

मित्रहो's picture

28 Oct 2019 - 9:50 pm | मित्रहो

याच लेखकाने पुढे जाऊन १९९४ मधे Closing time नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात Catch-22 मधलीच पात्रे आहेत. त्यातली ही काही पात्रे न्यू यॉर्क मधे भेटतात असे काही आहे. कुणी हे पुस्तक वाचले असेल तर त्याविषयी सांगावे

पद्मावति's picture

28 Oct 2019 - 11:17 pm | पद्मावति

सुंदर ओळख.

युद्धजन्य हिंसेतला कारुण्यजनक विनोद. विरोधाभासी गोफ छान आहे.
तुम्ही मोठ्या आवाक्याचा विषय साक्षेपी मांडलाय, उत्तम जमलाय.
असे नॉन-लिनियर पद्धतीचे वाचण्यात बुद्धीचा आणि स्मरणशक्तीचा कस लागतो खरा.

आता 'क्लोजिंग टाईम' वाचायची इच्छा होत आहे.

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 12:17 pm | किल्लेदार

छान... वाचायला हवे..

मित्रहो's picture

31 Oct 2019 - 5:36 pm | मित्रहो

धन्यवाद किल्लेदार
पुस्तक जरुर वाचा

जेम्स वांड's picture

29 Oct 2019 - 2:47 pm | जेम्स वांड

एकदम "Irony च्या देवा तुला" आठवले मीम! ही संकल्पनाच मला पूर्ण नवीन होती/आहे आता हे मिळवून वाचणे आले मित्रहो!.

मित्रहो's picture

30 Oct 2019 - 6:23 am | मित्रहो

धन्यवाद पद्मावती, आनिंद्य, जेम्स वांड वाचा पुस्तक भारी आहे

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 7:06 pm | गुल्लू दादा

पुस्तक मिळवून वाचावेसे वाटत आहे..धन्यवाद

मित्रहो's picture

3 Nov 2019 - 10:58 am | मित्रहो

धन्यवाद गुल्लु दादा. संग्रही ठेवून वाचण्यासारखे पुस्तक आहे. नक्की वाचा.

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 8:22 pm | श्वेता२४

युद्धाच्या भयानक परिस्थिती वरती विनोदी लिखाण करणे हे निश्चितच साधी सोपे काम नाही. वाचकाला अंतर्मुख करून सोडणार हे लिखाण आहे .हे पुस्तक आता वाचायची ओढ निर्माण झाली आहे.

मित्रहो's picture

5 Nov 2019 - 1:47 pm | मित्रहो

धन्यवाद श्वेता२४ हो पुस्तक अस्वस्थ करतं. विचार करायला लावतं. हे सारं तिरकस विनोदी लिखाणातून शक्य होत. नक्की वाचा

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 3:44 pm | मुक्त विहारि

ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे का?

कुमार१'s picture

19 Nov 2019 - 6:51 pm | कुमार१

पुस्तक परिचय आवडला!

मित्रहो's picture

20 Nov 2019 - 4:27 pm | मित्रहो

धन्यवाद मुवि आणि कुमार१
मुवि
या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे असे मी तर वाचले नाही. यावर याचा नावाचा इंग्रजी चित्रपट आला होता. माझ्या मते दिग्दर्शकाला तो चित्रपट तितका जमला नाही.