मागोवा लावणीचा

अलकनंदा's picture
अलकनंदा in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

मागोवा लावणीचा

images-31
नाट्यशास्त्राचा ऊहापोह करणाऱ्या संस्कृत ग्रंथांमध्ये नाट्य, गायन, संगीत, नृत्य ह्या कला, मार्ग आणि देशी ह्या दोन वर्गांमध्ये विभागलेल्या आहेत. मार्ग म्हणजे नटराज शंकर निर्मित आणि नाट्याचार्य भरतमुनी ह्यांनी सांगितलेली अभिजात कला. देशी, म्हणजे विविध प्रांतातली परंपरागत लोककला. संगीत मकरंद नामक ग्रंथाचा रचनाकार पंडित वेद ह्याने नृत्यकलेच्या बारा देशी पद्धती सांगितल्या आहेत. हा पंडित वेद ही सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातील व्यक्ती. त्याने वर्णिलेल्या नृत्यप्रकारातील एक प्रकार म्हणजे, 'लावणम्'. त्याची लक्षणं अशी:

IMG-20191003-144124
मण्डले दक्षहस्तोर्ध्वप्रसारितपटाकक:।
वामोsर्धचन्द्र: कट्यां चेद्भ्रामयेत्तु कटीतटात्।।
ऊर्ध्वमङ्गं विपर्यासाद् भ्रामयेदुत्प्लुतानि चेत्।
दक्षिणे दक्षिणमुखो वामे वाममुखस्तथा।।
सन्मुखे द्वौ करावर्धचन्द्रौ स्यातां कटीतटे।
रूपकेणैव तुल्येन भ्रामयेल्लावणं तत:।।

अर्थात, (नृत्य)रंगमंडलात उजवा हात पताकामुद्रेमध्ये उभा धरून व डावा हात कमरेवर अर्धचंद्राकृती पद्धतीने ठेवून कमरेखालील शरीर मुरडणे, व त्याच वेळी वरील शरीर त्या विरुद्ध अशा दिशेत मुरडणे; ते असे मुरडले असता - उजवीकडे मुरडले असता मुख उजवीकडे व डावीकडे मुरडले असता मुख डावीकडे वळवणे आणि समोर असता दोन्ही हात अर्धचंद्राकृती कमरेवर ठेवून रूपकाच्या आशयानुसार सर्व शरीर मुरडणे, हे लावणनृत्य होय. ह्यातील रूपक म्हणजे काय? तर रूपक म्हणजे नाट्य. त्याचे पुढे पाठ्य रूपक, गेय रूपक आणि नृत्त रूपक असे पाठभेद. पाठ्य रूपकातील पद केवळ पाठ करावयाचे, गेय रूपकातील पदाचे गायन करावयाचे, हे गायन हावभावयुक्तही असू शकते. गीतास, गायनास नृत्याची जोड असेल, तर ते होते नृत्तरूपक.

'लावणम्' हे नृत्तरूपक* असल्याने गेय रूपकाशी - म्हणजे गीत, गायन ह्यांसह त्याचा समन्वय अपेक्षित आहे. गीत, गायन आणि त्याला पूरक असे नृत्य**. ह्या प्रकारास पंडित वेद ह्याने लावणम् असे संबोधित केले आहे, तर त्याच्या पित्याने, पंडित दामोदर ह्याने संगीतदर्पण ह्या आपल्या ग्रंथात लावणी असेच म्हटलेले आहे. दामोदराच्याही दोन शतके आधी, १४००च्या सुमारास, आंध्र प्रदेशीय राजा वेमभूपाल ह्याने त्याच्या संगीतचिंतामणी ह्या ग्रंथात लावणीस 'लवणी' म्हटलेले आहे.

लावणी ही संज्ञा व्यापक अर्थाने लक्षात घ्यायला हवी, कारण तिच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रचनांचा समावेश होतो. साधारणत: शाहीर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कवनकारांनी पोवाड्याव्यतिरिक्त केलेल्या इतर रचना म्हणजे लावणी, असे म्हणायला हरकत नाही.

लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत.

नृत्यप्रधान लावणी
गानप्रधान लावणी
अदाकारीप्रधान लावणी

सुरुवातीच्या काळात लावणीचे स्वरूप गेय होते. नृत्यप्रधान लावणी हे अलीकडच्या काळातील रूप. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छक्कड, पंढरपुरी बाजाची अशी लावणीची विविध रूपे आहेत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी. 'छक्कड' म्हणजे द्रुत लयीतील, उडत्या चालीची लावणी. लावणीच्या रचनेसाठी आठ मात्रांचे पद्‌मावर्तनी वा सहा मात्रांचे भृंगावर्तनी वृत्त वापरले जाते, ज्यांचे मुख्य लक्षण म्हणजे गायनसुलभता. म्हणण्यासाठी आठ मात्रांचा धुमाळी ताल वापरतात, ज्याला लावणीचा ताल म्हणूनही ओळखतात. साधारणपणे ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज अशी वाद्ये लावणी गायनात वापरली जातात. अपवाद फक्त बैठकीच्या लावणीचा.

सादरीकरणाच्या दृष्टीने पाहिले तर लावणीचे सर्वसाधारणतः तीन प्रकारांत वर्गीकरण करता येईल.

शाहिरी लावणी : डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिराने पद्यमय कथन वा निवेदन करत गायलेली लावणी. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी सादरकर्त्या संचामध्ये असतात.

बैठकीची लावणी : तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने बैठकीमध्ये गायिका-नर्तिका ह्यांनी सादर केलेली लावणी. ह्या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि ह्यास माफक अभिनयाची, रागसंगीताची जोड असते.

फडाची लावणी : नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणारी लावणी. ह्यातले भेद म्हणजे ‘बालेघाटी’ - विरहदुःखाची भावना आळवणारी, ‘छक्कड’ - उत्तान शृंगारिक, ‘सवाल-जवाब ’ - प्रश्रोत्तरयुक्त, ‘चौका’ची दीर्घ चार कडव्यांची वा चार वेळा चाली बदलणारी रचना.

ढोबळमानाने लावणीचा इतिहास पाहिला तर काय दिसते?

***

मध्ययुगीन कालखंड पाहिला, तर तीन प्रकारचे साहित्य पाहावयास मिळते, संत साहित्य, पंडिती साहित्य आणि तिसरे म्हणजे शाहिरी साहित्य. ढोबळ मानाने शिवकाळात ह्या साहित्यप्रकाराची सुरुवात झाली, पेशवाई काळात विकास व पेशवाईच्या अस्ताबरोबरच हा साहित्यप्रकार कमी होत गेला, असे म्हणता येईल. शाहिरी साहित्याचे पोवाडे आणि लावण्या हे भेद, आणि ह्या साहित्याची प्रेरणा म्हणजे महाराष्ट्रातील तात्कालिक राजकीय व सामाजिक जीवन. सहसा पोवाडे तत्कालीन मराठेशाहीतील राजकीय जीवन, घटना, धामधूम ह्याचे चित्र रेखाटत, तर लावणी तत्कालीन सामाजिक जीवनाचे दर्शन घडवी. शाहिरांच्या दृष्टीने जे जे टिपले, पाहिले आणि समजून घेतले, त्याचे ह्या कवनांमधून प्रत्ययकारक शब्दांत उत्कट दर्शन घडवले.

जरी उत्तर पेशवाई काळात लावणीचा अधिक विकास झालेला असला, तरीही तिचे अस्तित्व ह्याही अगोदरचे आहे. इ. स. १६०० पूर्व एकनाथकालीन मन्मथ शिवलिंग ह्यांची लावणी सगळ्यात जुनी मानली जाते. ह्या लावणीत नागनाथ ह्या ज्ञानेश्वर समकालीन व्यक्तीचा उल्लेख आढळतो, आणि हा काळ १२९० ते १३४० असा सांगितला जातो. लावणीचा मागोवा घेत, असे ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत जाता येईल. पुढे सतराव्या शतकात जोतीराम ह्या कवीची लावणी पाहावयास मिळते, तसेच १७६५च्या दरम्यान गंगाधर ह्यांची शिवरात्रीची कथा ही लावणीही मिळते.

श्री समर्थांनी लिहिली आहे अथवा नाही, ह्याबाबत मतभेद असलेली, ही आणखी एक तत्कालीन लावणी.

IMG-20190926-205251

पूर्व पेशवाईकालीन साताप्पा ( होनाजीचा आजा) ह्याने लिहिलेली आणि आज उपलब्ध असलेली लावणी ही परंपरेनुसार लावण्यांपैकी सगळ्यांत जुनी लावणी मानली जाते.

सुरुवातीच्या काळात संत साहित्यापासून प्रभावित लावणी ही आध्यात्मिक अंगाने जाणारी होती. अशा लावण्यांची संख्या तशी कमी आहे, थोड्याफार अशा रचना सर्वच शाहिरांनी केल्या, पण तो त्यांचा स्थायिभाव नव्हता. आध्यात्मिक आणि भेदिक लावण्या, शृंगारिक लावण्या व इतर विषयांवरील लावण्या असे लावण्यांचे ढोबळमानाने वर्गीकरण करता येऊ शकेल.

पानिपतानंतरचा काळ हा लावणी साहित्याचा बहरकाळ म्हणून गणला जातो. ह्या काळात, त्यातही उत्तर पेशवाई काळात शृंगारिक लावण्या अधिक लिहिल्या गेल्या.

पानिपतात मराठेशाहीची प्रचंड हानी झाली होती. वीरांची एक पिढी नष्ट झाली होती, इतर हानी वेगळीच. पूर्ण हाहाकाराची स्थिती महाराष्ट्र देश अनुभवत होता. ह्या दुःखावर फुंकर म्हणून की काय, पेशवाईस माधवरावांसारखा कर्तबगार नेता लाभला खरा, परंतु, परिस्थिती काबूत येते आहे असे चित्र निर्माण होता होताच अवघ्या अकरा वर्षांत माधवरावांचे निधन झाले. पाठोपाठ सात-आठ महिन्यांत नारायणरावांचा गादीसाठी खून झाला. रघुनाथरावांचे बंड मोडून काढत, अक्कलहुशारीने पेशवाईतील मुत्सद्दी श्रेष्ठांनी सवाई माधवरावांना गादीवर बसवले व राजकारण सुरू झाले खरे, पण मराठेशाहीच्या अध:पातास हळूहळू सुरुवात झाली होती. ह्यातच भर म्हणून सवाई माधवरावांनी आत्महत्या केली. यापुढील उत्तर पेशवाईचे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही. नि:पक्ष कारभार, मुत्सद्दीपण, सरदार-दरकदारांचा एकोपा, शिस्त, स्वाभिमान, गादीशी निष्ठा हे सारे हळूहळू लयास जाऊ लागले होते. स्वार्थबुद्धी, वैयक्तिक हेवेदावे, बेशिस्तपणा ह्यामुळे मध्यवर्ती सत्ता आतून खिळखिळी होत चालली होती. युद्धे, सरदारांचे हेवेदावे, गादीशी निर्माण झालेली दुष्मनी ह्याचा सामान्य प्रजेस सर्वाधिक त्रास होऊ लागला होता. कशी होती त्या काळची सामाजिक परिस्थिती?

रयत आणि सामान्य जनता दारिद्र्याच्या आणि विनाशाच्या मार्गाने जाऊ लागली होती, तर सरदार, कारभारी, सावकार वगैरे मंडळी व्यक्तिशः श्रीमंत होऊ लागले होते. तत्कालीन लावण्यांमधून संपन्न पुण्याचे दर्शन घडते, तसेच दारिद्र्याचेही. नमुन्यादाखल, ही -

लंकाच पुण्यामध्यें लेश न दारिद्राचे
शहरांत घरोघर सावकार गबर घरचे
सरदार एकाहून एक श्रीमंतांचे
लढणार शिपाई किती सांगू मी वाचे
हत्ती घोडे रथ अंबारी थवे पालख्यांचे
सरकार वाडयाभौताली झुलती बाहारीचे
जागोजाग वस्ती भरदार, गर्दी बाजार,
कमती नसे काही
पुणे शहर अमोलिक रचना दुसरी नाही

हे चित्र एकीकडे, तर पुण्यातील सामान्य रयतेचे दारिद्र्य, विपन्नता ह्याचे वर्णन करताना शाहीर म्हणतात,

करितील काय हो अन्नाविण गांजली
ही दुनया सारी जठराग्नित भाजली

होनाजीच्या लावणीत दुसऱ्या बाजीरावाच्या दरबाराचे वर्णन कसे केले आहे, पाहा.

केवळ रत्नाची खाण सुस्वरूप दिनमान राजबीज पुतळा
मध्यभागी आपुण भोवत्या नाटकशाळा
शृंगार करुनी कामिनी नित्य अवघ्याजणी मिळून वेल्हाळा
एक आपल्या हाती एकांती चुरिती पदकमळा
एक आजूबाजू एक सन्मुख घाली डोळा
त्या मुशाफराच्या संगे भोगिती सोहळा

किंवा त्या काळी धार्मिक अवडंबराचे वर्णन करणारी लावणी पाहा -

प्रतिवार्षिक दक्षण लक्ष ब्राह्मण श्रावणमासीं
असा धर्म आहे कोठे आवंतर कोण्या ग्रामासी
निरिच्छ योगी ध्याती गाती जे ईश्वरनामासी
अन्न वस्त्र धनधान्य तयांच्या धाडिती धामासी
नंदादिप नैवेद्य ठाईं ठाईं विठ्ठल रामासी
उच्छाहास दिल्हे गाव सुभद्रसुताच्या मामासी***

सांगायचा मुद्दा हा, की तत्कालीन आयुष्याचे प्रतिबिंब शाहिरांच्या काव्यांमधून दिसून येत होते.

***

लावणीचा मुखडा महत्त्वाचा. सोप्या शब्दरचनेचा आकर्षक मुखडा ऐकणाऱ्याला आवडतो, लक्षात राहतो. या कारणामुळे लावणीकार मुखडा लिहिताना मुखडा बांधताना श्रम घेतात. सोपी, ठसकेबाज शब्दरचना, ऐकणारा जलद आत्मसात करू शकतो. आकर्षक, बंदिस्त आणि नादमय मुखड्याचे उत्तम उदाहरण म्हणजे,

सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेलीत शिरली, मोत्याचा भांग।
अरे गड्या हौस नाही पुरली, म्हणुनी विरली, पुन्हा नाही फिरली, कुणाची सांग।।

पूर्ण लावणीचे सार मुखड्यातील ध्रुवपदात आणून, पुढे लावणीचा जो आशय आहे, त्याच्या विस्तारासाठी पुढील कडवी रचली जातात. परंतु लावणी म्हणजे केवळ शृंगाराचे वर्णन किंवा शृंगारिक काव्य नव्हे. विषयानुसार वर्गीकरण केल्यास लावण्यांचे तीन प्रकार पडतात.

images-29

आध्यात्मिक भेदिक लावणी
शृंगारिक लावणी आणि
विविध विषयांवरच्या लावण्या

हे पाठभेद, त्यांचे उपप्रकार किंचित तपशिलात पाहू.

आध्यात्मिक व भेदिक लावणी: या लावण्या संतवाङ्मयाच्या परंपरेचा वारसा सांगतात. भक्ती, वैराग्य, आत्मज्ञानाचे स्वरूप इत्यादी संकल्पना समजावून सांगणाऱ्या अशा या लावण्या. यातील आणखी पाठभेद म्हणजे आध्यात्मिक कूट लावण्या, जिथे गूढ स्वरूपातील आध्यात्मिक अनुभव लावणी स्वरूपात मांडलेले असतात. परमेश्वरभेटीची आर्तता व्यक्त केलेली असते. उदाहरणार्थ, गंगू हैबती ह्यांची खालील रचना -

दे गा पायी जागा पंढरीच्या पांडुरंगा।
शरण तुला मी आलो अरे जगदीशा।
सोडवी मजला भक्त-भव-भय-भंगा।।
मंत्रहीन क्रियाहीन दीन देवा।
कृपा करी रुक्मिणीच्या मानस रंगा।।

पौराणिक कूट लावण्या : रामायण, महाभारत, पुराणकथा यांचे भाग घेऊन त्या भागांवर लिहिलेल्या रचना, हे या प्रकारच्या लावण्यांचे स्वरूप. लावणीतील कूटपश्नाचे उत्तर प्रतिपक्षाकडून अपेक्षित असते. उदाहरणार्थ,

आज शेषाची पाळी म्हणता लवण जळामधी पडले।
जसे आभाळ गगनी विराले गंधर्वाचे हुडे।
शेष जातो भानुमतीस हे श्रुत झाले चहुंकडे।
पृथ्वी कशावर ठेवीत होता सांगून बोला पुढे।।

लौकिक कूट लावण्या : ह्या प्रकारच्या लावण्यांमध्ये व्यवहारातील घटनाक्रम, सामान्यज्ञान यासंबंधी प्रश्न असतात. प्रतिपक्षास लावणी रचनेतून प्रश्न विचारले जातात व त्यांच्याकडून लावणी रचनेतच उत्तर अपेक्षित असते.

भेदिक लावण्या: भेदिक लावण्या म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचे, तर ज्या लावण्यांमध्ये सामान्य जनांना अज्ञात असे काही रहस्य उलगडून दाखवलेले असेल, त्या भेदिक लावण्या. याचे प्रकार म्हणजे चढाच्या व उताराच्या लावण्या व कलगीतुऱ्याच्या लावण्या. सवाल-जवाबाच्या वेळी, दोन्ही पक्षांपैकी जी बाजू प्रश्न विचारेल ती चढाची लावणी म्हणत असते आणि उत्तर देणारी बाजू उताराची लावणी. कलगीतुऱ्याची लावणी हेही सवाल-जवाबाचे स्वरूपच. सहसा या प्रकारच्या लावण्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात.

भेदिक चौसर : या प्रकारच्या लावणीमध्ये योगशास्त्रातील अवस्था, चक्रे, योगपद्धतीचे विवेचन इत्यादी आढळते.

शृंगारिक लावण्या: शाहिरी रचनेच्या एकंदर लावणी रचनांपैकी शृंगारिक लावण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ह्या प्रकारच्या लावण्या म्हणजे लावणी वाङ्मयाचा जणू प्राण आहेत!

लावण्यांमधून येणारा शृंगार प्रामुख्याने दोन प्रकारचा आहे, भोगवादी शृंगार व विप्रलंभ शृंगार. विप्रलंभ शृंगार हा नायक आणि नायिक यांच्यामधील वियोगाचे आणि त्यामुळे होणाऱ्या विरहव्यथेचे दर्शन घडवतो. भोगवादी आणि विप्रलंभ शृंगार लावण्यांचे पुढे आणखी दोन प्रकार पडतात, ते म्हणजे कृष्ण-गोपींच्या आणि लौकिक म्हणजे सामान्यजनांच्या शृंगारपर लावण्या.

कृष्ण-गोपींच्या शृंगारपर लावण्या : कृष्ण-गोपींचा भोगवादी व विप्रलंभ प्रकारच्या लावण्यांमधला शृंगार हा जिवाशिवाचे ऐक्य प्रतिपादन करणारा आहे. श्रीकृष्णाच्या अनेकविध लीलांचे वर्णन, त्याच्या खोड्यांनी त्रस्त झालेल्या पण तरीही कृष्णावर निस्सीम प्रेम करणाऱ्या गोपिका, त्यांचा कृतक कोप या सर्वांचे वर्णन ह्या लावण्यांमध्ये असते. तसे पाहता, त्यांच्यातील भांडण क्षणिक आहे, हृदयात आहे ते फक्त प्रेम!

हे एक उदाहरण पाहा -

दूर होय कान्हा आम्ही तुशी खेळूनि होरी।
तुटली मर्जी तू गर्जी नको बळजोरी।
कालच गडे म्यां याशी केली होती बोली।
शिवू नये अंगा नको दंगा करू वनमाळी।।

विप्रलंभ प्रकारच्या लावण्यांमध्ये कृष्णाच्या विरहामुळे गोपींना झालेल्या दुःखाचे वर्णन आहे. अशा या विरहवर्णनाला मध्यमुनीश्वरांपर्यंत जाणारी मोठी परंपराही आहे. अशा प्रकारच्या लावणीचे हे एक छोटेसे उदाहरण -

हरिवाचूनी संसार कशाचा।
किती साजणी धीर धरू।
चैन पडेना कसे करू।।

लौकिक शृंगारपर लावण्या: सर्वप्रथम हे लक्षात घ्यावयास हवे, की ह्या प्रकारच्या लावण्यांमधून ज्या स्त्रियांचे वर्णन असे, त्या गृहिणी वा घरंदाज नसाव्यात. त्यांचे दर्शन ही सहजसाध्य गोष्ट नसावी. त्या काळात पुरुषांना सर्वसाधारणपणे एखादे तरी अंगवस्त्र असे. लोकहितवादींची 'शतपत्रे' पाहिली असता, एखाद्याला किती अंगवस्त्रे आहेत यावरून त्याची प्रतिष्ठा ठरवली जाई, असे नमूद केलेले आहे. लौकिक शृंगारपर लावण्यांमध्ये वर्णिलेली स्त्री अंगवस्त्र असण्याची शक्यता अधिक. अशा लावण्यांचे विषय विविध आहेत. स्त्री रूपाचे वर्णन करणाऱ्या लावण्या, स्त्री शरीराचे वर्णन करणाऱ्या लावण्या - ह्या लावण्या जरा उत्तान प्रकृतीच्या आहेत. तसेच नवविवाहितांची मानसिकता वर्णिणाऱ्या, मिलनोत्सुक स्त्री, पुरुषांच्या भावनांचे वर्णन करणाऱ्या, इत्यादी. विप्रलंभ लौकिक शृंगारिक लावण्यांमध्ये जोडीदाराच्या विरहाचे आणि त्यामुळे होत असलेल्या दुःखाचे वर्णन केलेले असते.

विविध विषयांवरच्या लावण्या: शृंगारीक आणि आध्यात्मिक लावण्यांप्रमाणेच स्वतःला भावलेल्या आणि समाजाचे प्रबोधन आणि मनोरंजन होईल अशा विषयांवरदेखील शाहिरी लेखणी बोलली आहे. यांंमध्ये गणाच्या लावण्या, यामध्ये गणपतीला आवाहन केलेले असते, त्याप्रमाणे इतर देवता वर्णनपर आणि स्तुतिपर लावण्या, संत आणि गुरुमाहात्म्य वर्णन करणाऱ्या लावण्या यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, विठ्ठलाचे वर्णन करणारी ही लावणी-

समपद कटी कर ठेवून सावळा विटेवर अक्षई उभा।
निशीदिनी भक्तांचा सखा वैकुंठ पुरीचा सुभा।
नामी धरिता आवडी दर्शनी मुक्ती रोकडी।।

ह्याचंबरोबर व्यक्तीवर्णनपर, कथाकथनपर, क्षेत्रमाहिमावर्णनपर, उपदेशपर, सामाजिक परिस्थिती वर्णनपर, सृष्टीसौंदर्याचे वर्णन करणाऱ्या अशा अनेकविध विषयांवर लावण्या रचल्या गेल्या आहेत. मातृभावनेवरही सुरेख लावण्या रचल्या गेल्या आहेत.

सृष्टिसौंदर्य आणि वात्सल्याची गुंफण करत रचलेली, आणि आजही महाराष्ट्राच्या तोंडी वसणारी 'घनश्याम सुंदरा, श्रीधरा' ही भूपाळीसुद्धा लावणीच आहे.

***
images-26

लावणी ही मुळात कविता आहे. लोकगीताच्या परंपरेतून आलेली, जनसमुदायाच्या आनंदासाठी, मनोरंजनासाठी आणि कधीकधी उद्बोधनासाठी, त्यांच्यातीलच कवींनी रचलेली रचना. पुढे तिला नृत्याची, नाट्याची साथ मिळाली आणि गीत, नाट्य आणि नृत्य ह्यांनी परिपूर्ण असा मनोरंजनात्मक वाङ्मयप्रकार रसिकांच्या सेवेत रुजू झाला.

लावणीच्या वेगवेगळ्या भेदांबद्दल विस्ताराने, वेगवेगळ्या उदाहरणांसकट लिहिता येईल, ते पुन्हा कधीतरी.

तळटीपा :
*नृत्त : शुद्ध नाच
**नृत्य : हावभावयुक्त नाच
*** सुभद्रसुताच्या मामासी, म्हणजे श्रीकृष्णास.
संदर्भ : मऱ्हाटी लावणी : म. वा. धोंड
मराठी लावणी वाङ्मय : डॉ. गंगाधर मोरजे

श्रेयनिर्देश: चित्रे आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 12:18 pm | पाषाणभेद

लावणी म्हणजे शृंगारीकच नव्हे हे समजून देणारा लेख.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख प्रसारमाध्यमांमुळे केवळ लावणी अन ती पण शृंगारीक लावणीच अशी होवू पाहते आहे. याला कोठेतरी थांबवायला हवे.
अन लावणीच ओळख द्यायची असेल तर या लेखात आलेल्या इतर लावण्यांचीही होवू देत.

अवांतरः कधीतरी मागे सामनाचा दिवाळी अंक लावणीवरच होता.

सोत्रि's picture

29 Oct 2019 - 8:18 am | सोत्रि

तन्तोतन्त!

- (लेख अतिशय आवडलेला) सोकाजी

लावणी म्हणजे शृंगारीकच नव्हे

बरोबर.

लावणी ह्या विषयावर विस्तृत लिहायचे मनात तरी आहे, पाहू कसे जमते.

लावणीबद्दलचे विवेचन आवडले.
लावणीच्या वेगवेगळ्या भेदांबद्दल विस्ताराने, वेगवेगळ्या उदाहरणांसकट जरूर लिहा.

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2019 - 7:42 pm | सुधीर कांदळकर

आकर्षक मांडणी. कर्षक, बंदिस्त आणि नादमय मुखड्याचे उत्तम उदाहरण मत दिलेले आहे. भेदिक लावणीचे उदाहरण वाचायला आवडेल.


तत्कालीन लावण्यांमधून संपन्न पुण्याचे दर्शन घडते, तसेच दारिद्र्याचेही.

हे मला ठाऊक नव्हते.

स्वराज्य उभारणीकाळी आणि स्वातंत्र्यलढ्यात शाहीरांनी आणि तमाशा बार्‍यांनी प्रसंगी झळ सोसूनही सांकेतिक/गुप्त संदेशवहनाचे मोठे कार्य बजावले होते. केला इशारा जाता जाता सारख्या चित्रपटांतून याचे छान दर्शन घडवले आहे.

छान लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

चौकटराजा's picture

27 Oct 2019 - 9:11 pm | चौकटराजा

लावणीला एक संपूर्ण नृत्य प्रकार ही मानले जाते व एक काव्य प्रकारही ! निरनिराळी उदाहरणे देऊन आपण लावणीलाही कोणत्याही विषयाचे वावडे नसते हे दाखवून दिले आहे. शास्तरीय संगीतात ही बंदिशीचे विषय भक्ती किंवा शृंगार यांना धरून जास्त असले तर त्यात इतर विषयही आणू शकतो आपण .
उदा बहार रागातील ही कुमार गंधर्व यांची बंदिश " ऐसो कैसो आयो रिता रे , अम्बुवापे मोर ना आयो , करिओ ना गुंजार , भंवरारे " !

पद्मावति's picture

28 Oct 2019 - 8:58 pm | पद्मावति

खुप सुंदर लेख.

कसला अभ्यासपूर्ण + माहितीपूर्ण लेख आहे !
जुन्या मराठी चित्रपटांतील लावण्यांचीआवड आहे, विषेशतः ‘सवाल-जवाब ’ प्रकारच्या.
लावणीचा मागोवा घेणाऱ्या ह्या उत्कृष्ठ लेखासाठी धन्यवाद.

ऋतु हिरवा's picture

30 Oct 2019 - 7:29 pm | ऋतु हिरवा

खूप छान अभ्यासपूर्ण लेख

लिहिलेले वाचल्याबद्दल सर्व वाचक व अभिप्रायदात्यांचे आभार मानते. लेख कसा आवडेल किंवा कसे ह्याबद्दल जरा साशंक होते.