मन आनंद आनंद छायो..

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

मन आनंद आनंद छायो..

झक्क झोप झाल्यामुळे आपण खूप ताजेतवाने झालेलो असतो. घरातले बाकीचे अजून झोपलेले आहेत. अशा एका भल्या सकाळी जाग येते. आपण टेरेसवर येतो. शहर अजून जागे व्हायचेय. जग झोपलेले असताना रात्री खूप काही घडून गेलेय. रात्र सरून आता दिवस येणार आहे. बाहेर मिट्ट काळोख आहे. शुक्रतारा आकाशात लखलखतोय. पूर्वेला अजून तांबडे फुटलेले नाहीये. पहाटवार्‍याचा गारवा अंगाला जाणवतोय. स्वच्छ हवेने आपण फुप्फुसे भरून घेतो. अंगात एक अनामिक उत्साह सळसळतो. गात्र न गात्र शहारते. एक अनामिक गूढ पवित्र भावना वातावरणात भरून आहे.

या सृष्टीशी आपले आदिम नाते आहे हे जाणवणारा क्षण आपण जगत असतो.

आपण झाडाखाली उभे असतो. काहीतरी कारणाने आपण वर पाहतो आणि अचानक प्राजक्ताचे फूल झाडावरून टपकन आपल्या कपाळावर पडते. आपल्या अंतःकरणात काहीतरी शुद्ध भावना जागी होते. लहानपणचे काहीतरी खूप आत दडलेले आपल्याला खुणवायला लागते. सुपारीची बाग, डोणीवरच्या पाण्याची अंघोळ, पैलाडीच्या शंकराच्या देवळासमोरचा फुलून आलेला पांढरा चाफा. त्याची ती पिवळी, लाल अस्फुट रेघ अंगावर वागवणारी फुले. देवळात वाजलेला शंख आणि घंटानाद. तेल-उटणे लावून केलेली आंघोळ, विठोबाच्या देवळातली काकड आरती, अंधार्‍या पहाटे तुळशी वृंदावनाशेजारी स्निग्ध प्रकाशात तेवत असलेली मिणमिणती पणती, हवेतला ओलसरपणा आपल्याला जाणवतो. कुठेतरी आत खोलवर खूप भरून येते.

स्वच्छ म्हणता येईल भावनेने आसमंत भरून गेलेला आहे. मनात कोणतेही विचार नाहीत, किल्मिष नाही. रोजच्या चिंतासुद्धा जाग्या झालेल्या नाहीत. खूप काही घडून गेलेय, पण तुम्ही एकटे नाहीत. तो विश्वाचा अनामिक कर्ता अकर्ता-तुमच्या सोबत आहे. झाले ते होऊन गेले. आता नव्याने सुरुवात करायची आहे. ही भावना व्यक्त करणे अवघडच.

अशा वेळेस अव्यक्ताला व्यक्त करायला स्वर मदतीला येतात. आसमंत भारून टाकतात. धैवत ,कोमल निषाद, षड्ज, कोमल ऋषभ चारच स्वर. पुरेसे होतात. आपली आणि या सृष्टीची जुनी ओळख पुन्हा करून देतात. आपल्यातला तो निरागस स्वच्छ भाव पुन्हा जागवतात. शब्दात नक्की सांगता येणार नाही अशी ही अनामिक हुरहुर लावणारी आणि त्याच वेळेस आश्वस्त करणारी भावना व्यक्त करायला तितक्याच ताकतीने आणि नजाकतीने मदतीला कोमल ऋषभ आणि कोमल निषाद सोबत घेत अहीर भैरव मदतीला येतो.

https://youtu.be/kPc_dyJbs1U

विजेता सिनेमातली आशाताई आणि सत्यशील देशपांडे यांनी गायलेली ही बंदिश आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. संगीतकार अजित वर्मननी या संगीतात साथीला केवळ तंबोरा आणि तालासाठी तबला. इतर कोणत्याच वाद्यांची गरज भासत नाही. बंदिश नीट ऐकली, तर आशाताईंनी घेतलेले खटके, धैवतावरून कोमल ऋषभ घेत षड्जावर उतरणे हे वर्णनातीत.

असेच आणखी एक गाणे म्हणजे मन्ना डेंनी गायलेले 'मेरी सूरत तेरी आँँखें'मधले 'पूछो ना कैसे मैंंने रैन बितायी'. एस.डी. बर्मनदांचे संगीत शैलेंद्रच्या शब्दांना वेगळ्याच उंचीवर नेते. मन्नादांबद्दल काय बोलायचं! 'जुग बीते मोहे नींद ना आयी' म्हणताना मींड घेत कोमल ऋषभापर्यंत पोहोचतात.

अहीर भैरव 'हम दिल दे चुके सनम'मध्ये वेगळ्याच रूपात समोर येतो. 'अलबेला सजन आयो रे'मध्ये संगीतकार इस्माइल दरबारने तबला आणि गिटारचे फ्यूजन तालासाठी वापरलेय. उस्ताद सुलतान खान, शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती एकमेकांना पूरक. गाण्यात एके ठिकाणी नायिकेला तिच्या आज्जीला काही सांगायचेय. "जे सांगायचेय त्यासाठी शब्द माझ्याकडे नाहीत, तू स्पर्शातून समजून घे" म्हणत ती आज्जीचा हात हातात घेऊन कुरवाळते. स्वतःच्या गालावरून फिरवत तिच्या स्पर्शाची माया अनुभवते. आज्जीच्या कुशीत शिरते. आज्जी तिला हळुवार थोपटून आश्वस्त करते. या प्रसंगात कविता कृष्णमूर्ती नुसत्या स्वरांनी खूप काही सांगून जातात. जे हजार शब्दांनी सांगता येणार नाही, ते केवळ चार स्वरांनी काम केलेय.

कोणी एखाद्या एका अनामिक क्षणी भेटते. मनात कायमची एखादी हळवी आठवण ठेवून दूर जाते. बरीच वर्षे जातात. अचानक काहीतरी जाणवायला लागते. मनात कसलीशी हुरहुर लागते. नक्की काय होतेय ते समजत नाही, मात्र हातातून काहीतरी निसटत चाललेय असे वाटायला लागते. मन कातर होते. एकटे एकटे बावरायला होते. अगदी संदीप खरेच्या भाषेत सांगायचे, तर 'कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..' असे काही होत असेल तर नक्की समजा - तुम्ही कुठेतरी अहीर भैरवचे स्वर ऐकले आहेत... खासकरून कोमल ऋषभ आणि कोमल निषाद.

तशीही कोमल ऋषभ असलेली सुरावट काळजाची आतली तार छेडते. नुसती छेडून थांबत नाही, तर आपण पार आतून घुसळून निघतो . दु:खद नाही, पण जबाबदारीची जाणीव करून देणारी एका क्षणात प्रगल्भ बनवणारी सुरावट. कोमल ऋषभच्या जोडीला कोमल निषाद येतो. गंधार-मध्यम-धैवतची सहज वाट चालत नकळत कोमल निषाद लागतो. काळजात कुठेतरी कळ येते. पण खरी कमाल येते ती अवरोहात मध्यमानंतर गंधार घेत कोमल ऋषभ येताना पुन्हा मध्यमाला घेत येतो, तेव्हा. साधी सोपी सुरावट भल्याभल्यांना चकवा देणारी. आणि त्यामुळेच मैफलीत फारसा गायला न जाणारा राग. मात्र गायकांचा आवडता. अहीर भैरवाच्या प्रकृतीला नटखटपणा मानवत नाही. साधेपणा आणि एक प्रकारचा पवित्र भाव यामुळे हवेली संगीतात देवाला सकाळी "भोर भयी.. जागो हे गिरिधारी" म्हणत जागे करण्याची जबाबदारी अहीर भैरव रागाला दिली आहे.

एकदा सतलज नदीचे पाचूच्या रंगाचे नितळ पाणी पहाण्याचा योग आला होता. नावालासुद्धा प्रदूषण नसलेली स्वच्छ हवा आणि ते स्फटिकासारखे पाणी. अहीर भैरव जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा तेव्हा मला त्या नितळ पाण्याची आठवण येते. हा पवित्र अहीर भैरव एका गाण्यात मात्र पूर्ण वेगळ्याच रूपात पाहायला मिळाला. राजेश खन्ना आणि शर्मिला यांच्या दाग चित्रपटातील "अब चाहे माँँ रूठे या बाबा" या गाण्यात. लक्ष्मी-प्यारेच्या पंजाबी ढोलकच्या ठेक्यावर किशोरकुमार गायलायही तितक्याच जोशात. घरात कडक सोवळेओवळे पाळणारा एखादा काका ट्रिपला गेल्यावर मुलांबरोबर टाळ्या-शिट्ट्यांच्या तालावर गाण्यांच्या भेंड्या खेळताना दिसावा ना, तसा धक्का बसला होता हे गाणे ऐकताना. पण असा क्षण विरळाच.

जाहीर मैफलीत फारसा प्रचलित नसणारा अहीर भैरव हिंदी सिनेसंगीतात यमनइतक्या नाही, पण खूप वेळेस भेटीला येतो. नायक/ नायिकेला 'खूप काहीतरी घडून गेलेय, माझ्या मनातली उलाघाल कोणाला सांगू?' अशी एक अनामिक हुरहुर लावणारी भावना व्यक्त करायची असेल, तेव्हा हमखास अहीर भैरव मदतीला येतो. मनापासून मदत करणार्‍या निष्कपट मित्रासारखा. एक दूजे के लियेमधले 'ऐ प्यार तेरी पहली नजर को सलाम', आशिकीमधले 'अब तेरे बिन जी लेंगे हम' ही गाणी अहीर भैरवमधलीच. देख कबीरा रोयामध्ये मदन मोहननी कंपोझ केलेले लतादीदींच्या आवाजातले 'मेरी वीणा तुम बिन रोये' हे गाणे अहीर भैरवमधला मास्टरपीस म्हणावे लागेल.

उच्च रक्तदाबाच्या पेशंट्सनी अहीर भैरव ऐकावा, असे म्हणतात. भीमसेनजींचे भजन 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल', जगजीत सिंगची गजल 'दर्द से मेरा दामन भर दे या अल्लाह' हे अहीर भैरवमधलेच. खूप काहीतरी घडून गेलेय ही भावना व्यक्त करायला तेजाब चित्रपटात 'सो गया ये जहां सो गया आसमान' या गाण्यात पार्श्वसंगीतातले बासरीचे स्वर अहीर भैरवमधलेच.

एखाद्या भल्या पहाटे शांत वातावरणात अहीर भैरव बासरीवर ऐका. किशोरी आमोणकरांच्या स्वर्गीय काळी पाचमध्ये ऐका. लतादीदींच्या आवाजात ऐका, किंवा सरोदसारख्या आस नसणार्‍या साजावर ऐका. एकएका स्वरानिशी वातावरणाची शांतता थेट हृदयाला भिडते. कोमल ऋषभ तुमच्या मनाचा नुसता ठावच घेत नाही, पूर्ण ताबा घेतो. मग तुम्ही तुमचे राहात नाही. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागतात. सगळे मळभ निघून जाते. पाऊस पडून गेल्यावर ढग पांगतात आणि स्वच्छ सूर्य प्रकाश येतो, तितके स्वच्छ वाटायला लागते. आपल्या मनाचं क्लिन्जिंग होते.

मग दिवसभर आपले मन अहीर भैरवसह 'मन आनंद आनंद छायो....' अवस्थेत नेणारी, 'पूछो ना कैसे मैने रैन बितायी... उत जले दीपक इत मन मोरा' इतके या पलीकडचेही जे शब्दात मांडता येत नाही, ते चार सुरांनी सांगणारी, अहीर भैरवची शब्दांपलीकडली जादू या जन्मी एकदा तरी अनुभवावीच.

शुभ दीपावली म्हणत या लेखनाच्या निमित्ताने सरस्वतीच्या एक उपासक पं. माधुरी नारायण यांनी खास मिसळपावसाठी गायलेली ही अहीर भैरव रागातली बंदिश आपल्या दिवाळीला अधिक समृद्ध करून जाईल.

श्रेयनिर्देश: व्हिडीओ आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 3:06 pm | यशोधरा

विजुभाऊ, काय देखणं लिहिलं आहेत! समांं बंध गया, म्हणतात तसं. बहुत बढिया! पं. माधुरी नारायण ह्यांनी घेतलेला सुरुवातीचा आलाप अतिशय सुरेख! फार सुरेख आवाज, सुस्पष्ट गायकी.

ही सुरेल दिवाळी भेट फार आवडली! खूप खूप आभार!

विजुभाऊ's picture

26 Oct 2019 - 9:01 pm | विजुभाऊ

धन्यवाद
अहीरभैरव बद्दल खूप सांगावसं वाटत.
हरीप्रसाद जींचा अहीरभैरव ऐकताना मेडीटेशनच होते
ताला शिवाय नुसती आलापी ऐकली तरी अंगावर रोमांच उभे रहातात. एकदाच पुण्यात प्रत्यक्ष ऐकायचा योग आला होता.

सुमो's picture

27 Oct 2019 - 4:02 am | सुमो

काय लिहिलंय विजुभाऊ. खूपच आवडलं.

श्रीनिवास खळेंनी संगीतबद्ध केलेलं, भीमसेन आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं राम का गुनगान करिये हे भजन पण अहिर भैरव मधलंच...

रच्याकने: यातली वीणा शंकर महादेवन यांनी वाजविली आहे.

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2019 - 5:00 pm | सुधीर कांदळकर

शाळेत असल्यापासून पूछो ना कैसे आवडत होतेच. मैफिलीत कमी गायला जात असला तरी मुंबई रेडिओवर मात्र अनेक वेळा गायला वाजवला गेल्यामुळे तसा परिचयाचा राग.

छान लेखाबद्दल धन्यवाद.

विजुभाऊ's picture

28 Oct 2019 - 11:19 am | विजुभाऊ

संपूर्णपणे अरबी सुरावटीवर आधारीत हे गाणे ही अहीरभैरव मधले आहे. बँग्चेराउंडचे वाद्यसंगीतही याच रागातले आहे. गंमत म्हणजे सी रामचंद्रनी या गाण्याची धून पूर्णपणे अरेबीयन नाईट्स या रेकाँर्ड अल्रबम वरुन उचलला आहे.
उत्तर भारतीय संगीतात अरबी संगीताचाही वाटा आहे
https://youtu.be/wD6AUzUGE1c

चौकटराजा's picture

30 Oct 2019 - 9:31 am | चौकटराजा

अरबी संगीतात अहीर भैरव रागाचे सूरच मुळी प्रामुख्याने आहेत. जसे भूपाली रागाचे जपानी संगीतात. अरबी मध्ये किरवाणी देखील खूप सापडतो . मला आवडलेली अहीर भैरव वर आधारित रचना म्हणजे कुमार सानू ने गायलेले नदीम श्रावण संगीत असलेले " अब तो तेरे बिन जी लेंगे हम " भैरव जरा अधिक गंभीर असल्याने सुगम संगीतात तरी अहिर भैरव जास्त वापरात आहे ! मला वाटते " मेरे दिलमें हलकीसी " ही पारसमनी मधील गीत अहिर भैरव मध्ये असावे बहुदा !

विजुभाऊ's picture

28 Oct 2019 - 11:19 am | विजुभाऊ

संपूर्णपणे अरबी सुरावटीवर आधारीत हे गाणे ही अहीरभैरव मधले आहे. बँग्चेराउंडचे वाद्यसंगीतही याच रागातले आहे. गंमत म्हणजे सी रामचंद्रनी या गाण्याची धून पूर्णपणे अरेबीयन नाईट्स या रेकाँर्ड अल्रबम वरुन उचलला आहे.
उत्तर भारतीय संगीतात अरबी संगीताचाही वाटा आहे
https://youtu.be/wD6AUzUGE1c

चौकटराजा's picture

30 Oct 2019 - 9:35 am | चौकटराजा

ही गीत कल्याणजी आनंदजी यांचे आहे . यातील मूळ धून बरेच वर्ष पुण्याच्या राहुल चित्रगृहात वाजत असे. संगीत रॉन गुडवीन या माझया लाडक्या संगीतकाराचे आहे !

विजुभाऊ's picture

30 Oct 2019 - 10:22 am | विजुभाऊ

बरोबर . कल्याणजी आनंदजींचेच आहे. चू भू द्या

विजुभाऊ's picture

28 Oct 2019 - 11:20 am | विजुभाऊ
पद्मावति's picture

28 Oct 2019 - 12:01 pm | पद्मावति

सुरेख!

क्या बात है विजुभाऊ...तुमच्या वाक्यरचना खूप आवडतात.
तसं पाहिलं तर तुम्हा संगीताची जाण असलेल्या तानसेन पंथी लोकांपासून कित्येक योजने दूर असलेला आणि राग, ताल, सूर ह्यांतले ओ का ठो न समजणारा, वर शास्त्रीय संगीताचे वावडे असणारा (अपवाद फक्त - पं. जसराज ह्यांचे "गोविंद दामोदर माधवेती") असा मी एक कानसेन पंथी श्रोता !
असे असूनही तुमच्या लेखातील वाक्यरचना आणि माझ्याही आवडीची 'पूछो ना कैसे मैंंने रैन बितायी', 'अब चाहे माँँ रूठे या बाबा' ही दोन गाणी बघून "मन आनंद आनंद छायो.. "
धन्यवाद.

सोत्रि's picture

28 Oct 2019 - 4:27 pm | सोत्रि

सुमधुर!

- (कानसेन) सोकाजी

सर्वसाक्षी's picture

30 Oct 2019 - 9:54 am | सर्वसाक्षी

विजुभाऊ
अत्यंत प्रवाही आणि अकृत्रिम लेखन.

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 8:47 pm | गुल्लू दादा

छान लिहिलंय... सुंदर गाणी आहेत या रागात पण हे तुमच्यामुळेच कळाले.

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 8:37 pm | श्वेता२४

कोमल ऋषभ तुमच्या मनाचा नुसता ठावच घेत नाही, पूर्ण ताबा घेतो. मग तुम्ही तुमचे राहात नाही. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागतात. सगळे मळभ निघून जाते. पाऊस पडून गेल्यावर ढग पांगतात आणि स्वच्छ सूर्य प्रकाश येतो, तितके स्वच्छ वाटायला लागते. आपल्या मनाचं क्लिन्जिंग होते

अगदी सहमत. लेख अतीशय आवडला

अतिशय सुरेख लिहलं आहे. गाणी सगळी आवडीची खास आहेत पण खूप दिवस ऐकली नाहीत. या लेखाच्या निमित्ताने परत ऐकेल, धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 4:37 pm | मुक्त विहारि

छान लिहिलंय