सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


वलय

Primary tabs

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
वलय
घटनेचे ठिकाण - शासकीय ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद, जिल्हा बुलडाणा, महाराष्ट्र.
वेळ - साधारण रात्री ८ वाजता.

डॉ. विनय आज जरा गडबडीतच होता. स्वतःच्या उपचारासंबंधी तो डॉ. खरेंना भेटणार होता. ते काम झालं की लगेचच त्याला जुने केस पेपर्स हातावेगळे करायचे होते. तसे म्हणायला ८ वाजायला १०मिनिटे कमी ती म्हणा, तरी डॉ. खरे आलेले असतील अशी त्याला खातरी होती. लगबगीने आत जाऊन बघतो तो डॉ. आलेले नव्हते. मग तेथेच डॉक्टरांच्या समोरील खुर्चीमध्ये तो त्यांची वाट बघत बसला.

डॉ. खरे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठं नाव - डॉ. चंद्रशेखर खरे. या रुग्णालयातील सर्वात वयस्क आणि विद्वान व्यक्तिमत्त्व. हल्ली त्यांचं 'उपासमारीचा मानसिकतेवर होणारा परिणाम' यावर संशोधन चालू होतं. या भागात आदिवासी लोक जास्त असल्यामुळे त्यांना उपासमारीचे रुग्ण सहज उपलब्ध व्हायचे, म्हणून त्यांनी या रुग्णालयाला सेवा द्यायचं ठरवलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयाची इतर कोणतीही जबाबदारी टाकायचा प्रश्नच नव्हता. ते एक सन्माननीय डॉ. होते. त्यांनी फक्त त्यांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करावं म्हणून रुग्णालयाचा स्टाफ त्यांना होईल ती सगळी मदत करत होता. शेवटी ते रुग्णालयाचे भूषण होते.

दिवसभर प्रकाश देणाऱ्या सूर्याचा अस्त झाला की या सूर्याचा हॉस्पिटलमध्ये उदय होणार. अहो सूर्यच तो. सूर्यासारखा वक्तशीरपणा, चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि कामही तसंच, गरजू लोकांच्या जीवनातील अंधार दूर करणं. त्यांपैकीच एक गरजू म्हणजे डॉ. विनय. हो, विनयच. स्वतः डॉक्टर असून विनयला दैनंदिन जीवनात विचित्र भास होतं. काल्पनिक पात्र त्याच्या आजूबाजूला वावरत. तसं विनयला आपण ठणठणीत आहोत असं वाटायचं. तो एकटा कधी कधी कोणाला तरी बोलतो म्हणून त्याने चांगल्या डॉक्टरांना भेटावं असा घरच्यांचा आग्रह होता. अर्थात विनयला हे पटायचं नाही. पण मागच्या वर्षी घडलेल्या घटनेमुळे विनयचा आत्मविश्वास थोडा डगमगला होता. आपण ठणठणीत आहोत याला कुठे तरी किंचित तडा गेला होता.

ती रात्र अजूनही त्याला स्पष्ट आठवत होती. बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. रात्रीचे साधारणतः ३ वाजले होते. विनय त्याच्या आरामखोलीत झोपला असताना अचानक कोणीतरी दरवाजा ठोठावला. सावध झोपलेला विनय लगेच उठून बघतो तो हॉस्पिटलचे मामा होते. २०-२५ वर्षांची एक गर्भवती अवघडल्या परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाली होती. विनयने तिला प्रसूतिगृहात हलवायला सांगितलं. लगेचच सगळे रिपोर्ट पाहिले. रिपोर्ट म्हणजे काय, तर फक्त रक्त-लघवीची तपासणी होती. सोनोग्राफी नव्हती, इतर कोणतेही रिपोर्ट नव्हते. बाळाची वाढ, त्याची सध्याची स्थिती याचा अंदाज घ्यायला लागणारे कोणतेही रिपोर्ट त्यांच्याकडे नव्हते. विनयची तिडीक मस्तकात गेली. पण वेळ नातेवाइकांशी भांडत बसण्याची नव्हती. अजून चीड यायचं कारण म्हणजे घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न झालेला दिसत होता. रुग्ण जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत होता. रक्तदाब वाढलेला होता आणि तिला मध्ये मध्ये झटकेही येत होते. आता परिस्थिती बिकट वाटत होती. जिल्हा रुग्णालय तेथून ८०-८५ कि.मी. अंतरावर होते. या रुग्णालयात रक्तपेढी नव्हती, सिझेरियन करायची वेळ आली, तर स्त्रीरोगतज्ज्ञ नव्हता. एकूणच रेफर करण्यावाचून दुसरा पर्याय विनयला दिसत नव्हता. पण जिल्ह्याला जायला किमान एक ते दीड तास लागेल, तेवढा वेळ रुग्णाकडे नाही, असं मामांचं मत होतं. प्रसूती झाली की परिस्थिती नियंत्रणात येईल, असं नर्सचं म्हणणं होतं. दोघांचंही बरोबर होतं. Eclampsia नावाच्या गरोदर असताना होणाऱ्या आजाराची ही लक्षणं होती. प्रसूती झाली की रक्तदाब आणि झटके नियंत्रणात येणार होते. त्या वेळी विनयला कोणीतरी अनुभवी व्यक्तीची अनुपस्थिती भासून गेली. लगेचच डॉ. खरेंचा चेहरा डोळ्यांपुढे आला. पण काही उपयोग नव्हता. त्या रात्री तर ते लवकर घरी गेले होते. आलेल्या परिस्थितीला तोंड देणे भाग होते. सिझेरियनची गरज पडली तर काय? असा साधा प्रश्न डावलून विनयने तिची प्रसूती करण्याचं धाडस केलं. पुढचा अध्याय नियतीचा लिहून झाला होता. थोड्याच वेळात आईची शुद्ध हरपली. बाळ आत अडकून पडलं. रुग्णालयात दोघांचाही मृत्यू झाला.

या घटनेनंतर विनय सतत तणावात वावरू लागला. त्याची काही चूक नव्हती, पण दोन जीव आपल्यासमोर गेलेत याचं त्याला वाईट वाटत होतं. उपलब्ध परिस्थितीत तिचा जीव वाचवणं अशक्य होतं. यात चूक कोणाची होती? काळजी न घेतलेल्या नातेवाइकांची की फाजील धाडस केलेल्या स्टाफची, हे ठरवणं खरोखर अवघड होतं. खरं तर हे प्रकरण तेव्हा वरिष्ठांपर्यंत पोहोचलं होतं. पण नातेवाइकांची चूक, साधनांचा अभाव, वरिष्ठांची मध्यस्थी यामुळे त्या प्रकरणाचा जास्ती धुरळा उडाला नाही. खरं म्हणजे वरिष्ठांना विनयच्या मानसिक स्थितीची बऱ्यापैकी जाणीव होती. सर्वात वरिष्ठ असणारे डॉ. पगारे विनयचे नातेवाईकच होते. विनयच्या वडिलांचा अपघाती झालेला मृत्यू, हलाखीची परिस्थिती या सर्व गोष्टींची त्यांना जाण होती.

images-10


त्या वेळी झालेल्या तातडीच्या बैठकीत वरिष्ठांनी विनयला वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्लाही दिला होता. घरच्यांचा आग्रह आणि वरिष्ठांचा सल्ला यावर गंभीर विचार करून विनयने डॉ. खरेंचा सल्ला घ्यायचं ठरवलं होतं. त्यापेक्षा सुशिक्षित आणि अचूक निदान असलेले डॉक्टर भेटणार नाहीत, असा त्याला ठाम विश्वास होता. एकाच रुग्णालयात दोघे काम करत होते, तरी आजवर त्यांचा जास्त संपर्क आला नव्हता. खरं म्हणजे डॉ. खरे सतत कामात असल्यामुळे त्यांचा कोणाशीही जास्ती संपर्क यायचा नाही. त्यानंतर मात्र दोघांची मैत्री वाढत गेली. डॉ. खरेंचा कामाचा आवाका, त्यांची बैठक, त्यांचा उत्साह तर कोणत्याही समवयीन इसमास लाजवेल असाच होता. त्याच भेटीमध्ये विनयला कळून चुकलं होतं की त्या रात्री प्रसूती करताना असणारी नर्स आणि मामा ही त्याची काल्पनिक पात्रं होती, भास होता. डॉ. खरेंच्या म्हणण्याप्रमाणे या रुग्णालयात रात्री कुठलाच कर्मचारी थांबत नाही. सगळे हाकेच्या अंतरावर असलेल्या शासकीय निवासस्थानात राहतात. हे ऐकून विनयचा स्वतःवर विश्वास बसला नव्हता. कसा बसेल? चांगली चालणारी, बोलणारी माणसं ज्यांच्यात काहीच खोट निघणार नाही ती काल्पनिक पात्रं..! तेवढ्यात बाहेर डॉ. खरेंच्या मोटारीचा आवाज आला आणि विनय वर्तमानात परतला.

डॉ. खरे ताडताड पावलं टाकत केबिनमध्ये घुसले. वाघाला शिकार करताना कुणाची परवानगी थोडीच लागते! समोर विनयला बघून ते म्हणाले, "अरे बैस, बैस." इतक्या वेळ भकास वाटणारी ती केबिन एकदम उजळून निघाली. "उशीर झाला सर आज..." उगा काहीतरी बोलायचं म्हणून विनय बोलला. "हो रे..! बायकोने उशीर केला स्वयंपाकाला, मग जेवणही उशिरा झालं. या बायकांची कारणंही अशी असतात की बस. काय तर म्हणे मी ब्युटी पार्लरला गेले होते. म्हणजे 'आधी नटोबा मग पोटोबा'." यावर दोघे मनमोकळे हसले. तरी विनयच्या कपाळावर एक आठी बाकी होतीच. त्याला कसली तरी चिंता लागून राहिली होती. पण त्याने ती खुबीने लपवत असतानाच डॉ. खरेंनी त्याला विचारलं, "काय मग, स्वारी इकडे कशी आज?"

"दोन दिवस झाले गोळ्या संपून, मग म्हटलं तुम्हाला भेटून घ्यावं एकदा." विनय म्हणाला.

"अच्छा... मग काही तक्रार? बरंय ना आता सगळं? गोळ्यांचा काही त्रास वगैरे?"

"नाही नाही, ठीक आहे सर, एकदम ओके आहे." कपाळावरची एक आठी तशीच होती, त्यावरून तरी विनयच्या मनात काहीतरी दडलंय याची डॉ. खरेंना चाहूल लागली होती. त्यांनी सरळ विषयाला हात घालत विचारलं, "खरं सांग विनय, तुला अजूनही ते दोघे दिसतात का?"

डॉक्टरांनी नेमकी नस पकडल्यामुळे विनयला घाम फुटला. पण कसं तरी सावरत तो "नाही" म्हणाला. उत्तर देताना विनयच्या होणाऱ्या नकळत हालचाली डॉक्टरांनी अचूक टिपल्या होत्या. त्यांना नेमकं उत्तर मिळालं होतं. "दिसले, तरी त्यांना प्रतिसाद देऊ नको, दुर्लक्ष कर" असा सल्लाही त्यांनी दिला. हे संभाषण विनयला लांबवायचं नव्हतं. "येतो सर" म्हणत डॉ. खरेंनी दिलेली प्रिस्क्रिपशनची चिट्ठी घेऊन घाम टिपत विनय केबिनबाहेर पडला.

खरं तर ते दोघे (मामा आणि नर्स) त्याला रोज दिसायचे. त्यांचा तसा त्याला काहीच त्रास नव्हता. उलट ते मदतीला हजर असायचे. आता हेच बघा ना - विनय स्वतःच्या केबिनकडे जात असताना वॉर्डातच त्याला मामा भेटले. ते बघून हसले, पण डॉ. खरेंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत विनय आपल्या केबिनकडे निघून गेला. त्याच्या मागोमाग मामा केबिनमध्ये दाखल होऊन त्याची खुर्ची अन टेबल पुसू लागले. तेवढ्यात नर्सही तेथे आली. हजेरी रजिस्टर काढून त्यावर सही करत होती. अगदी सगळ्यांकडे विनय दुर्लक्ष करत होता. हे नेहमीचंच होतं, ते दोघे विनयला त्यांच्या दुनियेत अलगद सामिल करून घेत. डॉ. विनयला छोटे छोटे चुटकुले आवडतात हे त्यांना बरोबर ठाऊक होतं. त्याचा आधार घेत नर्स म्हणाली, "सर, एक जोक सांगू का?" विनयने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

तीच मूकसंमती समजून बाई चालू झाल्या.
"रुग्ण म्हणतो, डॉक्टर, अलीकडे मला सौचास साफ होत नाही."
"डॉ. :असे करा, पलीकडे जाऊन बसत चला."
पुढे तो रुग्ण म्हणतो, "डॉक्टर, थट्टा नका हो करू. मला खरंच अलीकडे सौचास साफ होत नाही."
डॉ. : "मग सलीमकडे जाऊन बघा ना." यावर मामा आणि नर्स दोघेही टाळी देऊन हसले.

विनय हसत नाही हे बघून मामा गप्प बसले. खरं तर विनयला पण हसू आलंच होतं, पण त्याला वातावरणात सैलता आणायची नव्हती. आणखी १-२ चुटकुल्यांमध्ये सगळं वातावरण बदलून जाईल, याची दोघांना कल्पना होती. आणखी एक सांगू, म्हणत नर्सबाई सांगायला लागल्या, "एक गरोदर बाई डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तिला विचारलं, कितवा महिना? बाई म्हणाल्या, आठवा. डॉक्टर म्हणाले, मी कसा आठवू बरं? तुम्हीच सांगा." हा विनोद मात्र मामांनाही इतका रुचला नाही.

आता मामा सांगायला लागले, "एकदा एका पुजाऱ्याला जुलाब होत होते, म्हणून तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याला औषध दिलं. पण तरीही याने डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, आणखी काय काळजी घेऊ? डॉक्टर म्हणाले, शंख जरा हळू फुंकत जा." आता मात्र तिघेही जोरात हसायला लागले. डॉ. विनय पण खळखळून हसला. आता विनय पूर्णपणे त्यांच्यात सामील झाला. ते दोघे काल्पनिक आहेत याचा त्याला मागमूसही नव्हता. अशा प्रकारे वातावरण खुसखुशीत झाल्यावर सगळे आपापल्या कामाला लागले.

रुग्णालयाचा कारभार सुरळीत चालू असताना वरिष्ठांनी एक तातडीची बैठक बोलावली. विषय होता डॉ. विनय यांनी रुग्णालयात घातलेला धिंगाणा. एका रुग्णाच्या नातेवाइकाने विनयचा व्हिडिओ काढला होता. वरिष्ठांमध्ये दोन गट होते. एक गट म्हणाला, विनयला हे दाखवू नका, तो आणखी खचून जाईल. पण दुसरा गट, ज्यात डॉ. पगारे होते, ते म्हणत होते, त्याला आपण विश्वासात घेऊन दाखवू या. म्हणजे तो त्याच्या उपचाराबाबत गंभीर होईल.

सर्वसंमतीने त्याला तो व्हिडिओ दाखवण्यात आला. विनय ते पाहून हैराण झाला. त्याला काल रात्री मामा आणि नर्स दोघांशी झालेली वादावादी चांगलीच आठवत होती. पण या व्हिडिओमध्ये तर काही वेगळंच होतं - तो एकटाच हातवारे करून बोलत होता. दोन व्यक्तींशी बोलतोय हेसुद्धा जाणवत होतं. फक्त दोन व्यक्ती दिसत नव्हत्या. त्याला हळूहळू घडलेल्या गोष्टीचा अंदाज येऊ लागला. वरिष्ठांपुढे अशा वेळी उभं राहण्यात त्याला अपराधीपणाची भावना वाटली. डॉ. पगारेंनी त्याला जवळ बसवलं, "विनय, काळजी करू नको. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तुला उपचार घेण्याचा सल्ला दिला होता मागे..." मध्येच त्यांचं वाक्य तोडत तो म्हणाला, "हो सर, चालू आहेत ना उपचार."

"कोणाकडे?"

"डॉ. खरेंकडे.... आपल्या रुग्णालयाचे माननीय डॉक्टर." सगळी वरिष्ठ मंडळी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघून कुजबुजू लागली. आता विनयचा चेहरा उजळला. डॉ. खरे नेहमी आपल्याला साथ देतात, ते नक्की यावर उपाय काढतील, याचा त्याला विश्वास होता. "पण आपल्या रुग्णालयात तर कोणीच डॉ. खरे नाहीत!" डॉ. पगारे आश्चर्याने म्हणाले.

"आहेत ना सर. या, मी तुम्हाला दाखवतो." असं म्हणून त्याने सगळ्या वरिष्ठ मंडळींना मागच्या स्टोअर रूमकडे नेलं. त्यात फक्त अडगळीचं सामान असणार आहे, बाकी काही नाही, असा सगळ्यांना विश्वास होता, एकटा विनय सोडून.

त्याने लगबगीने स्टोअर रूमचा दरवाजा उघडला. आत दिसलं एक टेबल आणि दोन मोडक्या खुर्च्या. सगळ्या खोलीत कोळीष्टकं आणि धुळीचं साम्राज्य....! याला अपवाद होती ती फक्त एक खुर्ची..श्रेयनिर्देश: प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार.


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:10 pm | यशोधरा

भन्नाट!

Rockstar's picture

27 Oct 2019 - 12:23 am | Rockstar

जबरदस्त .....

जेम्स वांड's picture

27 Oct 2019 - 12:14 pm | जेम्स वांड

काय ट्विस्ट आहे! एकदम भारी! आवडली गोष्ट खूप..

जव्हेरगंज's picture

27 Oct 2019 - 2:13 pm | जव्हेरगंज

जबरी!!

बेंगुताई's picture

27 Oct 2019 - 2:32 pm | बेंगुताई

शेवट तर पोह्यावर ज्यादा तर्रीचं अहाहा!!! जमलयं.

कुमार१'s picture

27 Oct 2019 - 6:09 pm | कुमार१

छान लिहीली आहे. आवडली.
दिवाळी शुभेच्छा !

गुल्लू दादा's picture

30 Oct 2019 - 10:07 am | गुल्लू दादा

यशोधरा,Rockstar,जेम्स वांड, जव्हेरगंज, बेंगुताई, कुमार१ सर सर्वांचे धन्यवाद...!

समीरसूर's picture

31 Oct 2019 - 2:55 pm | समीरसूर

खूप आवडली!

king_of_net's picture

31 Oct 2019 - 4:30 pm | king_of_net

आवडली!

पद्मावति's picture

31 Oct 2019 - 4:52 pm | पद्मावति

भन्नाट!

जबरदस्त! दिवाळी अंकाची शान वाढवणारी कथा!

- (वलयांकित) सोकाजी

ज्योति अळवणी's picture

1 Nov 2019 - 2:49 pm | ज्योति अळवणी

मस्त

आवडली कथा

ज्योति अळवणी's picture

1 Nov 2019 - 2:49 pm | ज्योति अळवणी

मस्त

आवडली कथा

चित्रगुप्त's picture

1 Nov 2019 - 4:45 pm | चित्रगुप्त

वेगळ्या वातावरणात घडलेली विस्मयकारक कथा आवडली.

जॉनविक्क's picture

1 Nov 2019 - 5:19 pm | जॉनविक्क

ओके, ठीक आहे.

नावातकायआहे's picture

1 Nov 2019 - 6:47 pm | नावातकायआहे

आवडली!

सुबोध खरे's picture

1 Nov 2019 - 7:06 pm | सुबोध खरे

सुंदर कथा
उन्माद (schizophrenia) हा आजार असणाऱ्या रुग्णांना खरंच असे भास होत असतात.

तुषार काळभोर's picture

2 Nov 2019 - 1:02 pm | तुषार काळभोर

ट्विस्ट एकदम भारी!

श्वेता२४'s picture

2 Nov 2019 - 1:16 pm | श्वेता२४

शेवटचा ट्विस्ट तर एकदम जबरदस्त

नरेश माने's picture

2 Nov 2019 - 4:59 pm | नरेश माने

जबरा आहे एकदम खतरनाक! आवडली हेवेसांनल!

वाह! जबरदस्त!! खिळवून ठेवणारी कथा.

गुल्लू दादा's picture

6 Nov 2019 - 5:55 pm | गुल्लू दादा

धन्यवाद समीरसूर, king_of_net, पद्मावति, सोत्रि, ज्योति अळवणी, चित्रगुप्त, जॉनविक्क, नावातकायआहे, सुबोध खरे,पैलवान,श्वेता२४,नरेश माने,टर्मीनेटर.

मित्रहो's picture

6 Nov 2019 - 7:11 pm | मित्रहो

कथा शेवटला ट्विस्ट तर भारी एकदम

गुल्लू दादा's picture

12 Nov 2019 - 12:42 pm | गुल्लू दादा

धन्यवाद मित्रहो.

सुधीर कांदळकर's picture

12 Nov 2019 - 7:35 pm | सुधीर कांदळकर

ब्यूटिफुल माईंड या सत्यघटनेवर आधारित चित्रपटाची आठवण आली. दिवाळीअंकातले एक देखणे रत्न. अनेक, अनेक धन्यवाद.

सुमो's picture

12 Nov 2019 - 9:29 pm | सुमो

छान कथा ....
कथानकातील शेवटचा वळसा भारीच !

नाखु's picture

12 Nov 2019 - 10:29 pm | नाखु

रोमांचक आहे.
रात्र आरंभ चित्रपटात जसा विषय हाताळला अगदी त्याचीच आठवण झाली.

वाचकांची पत्रेवाला नाखु

मुक्त विहारि's picture

22 Nov 2019 - 7:10 am | मुक्त विहारि

शेवटचा परिच्छेद तर अप्रतिम