ओ साथी चल ....

मालविका's picture
मालविका in भटकंती
7 Oct 2019 - 4:19 pm

ओ साथी चल ....

मध्यंतरी सायकलिंग मध्ये चांगलाच खंड पडला होता. श्रीनिवासच्या पायाला दुखापत झाल्याने,मग पाऊस आला म्हणून जवळ जवळ ७/८ महिने सायकल घेऊन कुठे फिरायला गेलो नव्हतो. खरं तर चैन पडत नव्हतं पण आमचा सेनापतीच जिथे जायबंदी तिथे आम्हा मावळ्यात जोश कुठून येणार. त्यात नवीन दुसरी घ्यायची म्हणून त्याने स्वतःची सायकल पण विकून टाकली होती. तशा टँडेम सायकलने जवळपासच्या २/३ फेऱ्या मारल्या पण समाधान नाही झालं. त्यातही ईशानला माझ्या मुलाला (वय वर्ष ८ पूर्ण )आमच्या बरोबर नेता येत नाही. सगळा पावसाळा असा घालवून झाल्यावर शेवटी एकदाची मागच्या आठवड्यात श्रीनिवासची नवीन सायकल घरी आली. स्वारी त्यामुळे भलतीच खुश होती हे वेगळं सांगायलाच नको. पायाला दुखापत झाल्याने यावेळची त्याची सायकल इलेक्ट्रिक असिस्ट होती. सायकलला एक बॅटरी आहे. ती चार्ज करून लागेल तेव्हा सुरु करून आरामात जायचं. सरळ रस्त्यावर पॅडलिंग करायचं, चढ चढताना पायावर जास्त जोर येऊ नये म्हणून बॅटरी असिस्ट. पॅडलिंग चालूच ठेवायचं पण पायावर प्रेशर खूप कमी येत त्यामुळे. नवीन सायकलची छोटी राईड करून ट्रायल झाली होती पण जरा मोठ्या रस्त्यावर चढ उतारावर न्यायची होती. शिवाय आमचीही एकत्र अशी राईड बरेच दिवसात झाली नव्हती. मागच्या एका परशुराम च्या ३०किमी राईड नंतर ईशानला पण कुठे नेलं नव्हतं. त्यामुळे या रविवारी नक्की जायचं ठरलं.

रविवारची झोप सोडून बाहेर पडणे म्हणजे आम्हा दोघांसाठी मोठा त्याग आहे. :) :) :) पण हौसेला मोल नाही नि सायकलवाल्याला झोप नाही असं म्हणून सकाळी ६ चा गाजर पुढे ढकलत शेवटी ६. ४५ ला उठलो. मस्त धुकं पडलं होत. गरम गरम चहा हातात घेऊन नुसतं बसावसं वाटत होतं. पण सायकलींगचा मोहसुद्धा आवारत नव्हता. शेवटी आळस झटकून उठलो. ईशानला देखील उठवून तयार केलं. आधी चिपळूणपर्यंतच जायचं ठरलं. खर तर घरापासून चिपळूण फक्त १० किमी आहे. जाऊन येऊन २०किमी. हे अंतर आता खूपच कमी वाटत. पण तरीही तयार झालोच आहोत तर चला नाश्ता तरी चिपळूणला करून येऊ म्हणून निघालो. ईशान आणि श्रीनिवास मला केव्हाच मागे टाकून पुढे जातात. म्हणून श्रीनिवासची तयारी होईपर्यंत मी आधीच निघाले. ईशानला सांभाळून आणायचं काम अर्थातच श्रनिवासच त्यामुळे ते दोघे जरा पाठी रेंगाळले. मी ७किमी अंतर पार करून थांबले. अजून हे दिसेनात म्हणून फोन लावला. मग आलेच थोड्या वेळात. मधल्या वेळात श्रीनिवासने ईशानला काय पटवलं माहित नाही, पण अचानक जरा जास्त लांब राऊंड मारून येऊअसं ठरलं. चिपळूणला वैभव हॉटेलला भरपेट नाश्ता केला. आणि निघालो. चिपळूणपासून साधारण ७ ते ८ किमी अंतरावर टेरव नावाचं गाव आहे. तिथे सुंदर असं वाघजाई देवीचं मंदिर आहे. तिथे जाऊन दुसऱ्या रस्त्याने खेर्डीत बाहेर पडून खडपोलीला परत यायचं ठरलं.

खडपोली - चिपळूण , चिपळूण - कामथे हा सगळं जवळपास फ्लॅट रस्ता आहे. त्यामुळे हे अंतर सायकलने जायला काहीच कष्ट पडले नाहीत. कामथे गावातून टेरव गावात जायला फाटा फुटतो. आम्ही टेरव फाट्यावरून आत वळलो आणि मोठ्या अश्या बोर्डाने आमचं स्वागत केलं. तिथून टेरव फक्त ३ किमी. पण त्या बोर्डाच्या पाठी भला मोठा डोंगर आणि चढत जाणारा रस्ता आम्हाला भीती दाखवत होता. हर हर महादेव म्हणून जोशात सुरवात केली. पण अक्षरशः ५मिनिटं पण पुरी केली नसतील नि दम निघाला माझा. एरवी कधी न थकणारा आमचा छोटा चॅम्प देखील आज पायउतार झाला. इतका तीव्र चढ होता कि बास रे बास. खर तर या रस्त्याने आम्ही याआधीही अनेक वेळा गेलोय. पण गाडीतून जाताना वाटणारी मजा नि सायकलने जाताना लागणारा दम हे परस्पर विरोधी आहेत असं जाणवलं. मी नि ईशान हार पत्करून सायकल हातात धरून पायी चढ चढायला लागलो. श्रीनिवास त्याच्या नवीन सायकलने निवांतपणे चढ चढून थांबत होता. पाणी पीत, दम खात, मध्येच थांबत आता तरी संपेल, आता तरी संपेल करीत चढ चढत होतो. जवळपास प्रत्येक वळणावर आता हे समोर दिसणार वळण झालं कि आलंच टेरव असं वाटत होत. पण काही केल्या ते गाव काही येत नव्हतं. नवरात्र असल्याने देवळात जायला गाड्या येत जात होत्या. येणारे जाणारे विचित्र नजरेने बघत होते. पण आता सवय झालेय त्याची.

जवळपास पाऊण चढ चढून झाल्यावर एक माणूस गाडी थांबवून मुद्दाम चौकशी करून गेला. गावातच राहणारा माणूस होता. घरी यायचा आग्रह केला होता. श्रीनिवास त्यांच्याशी बोलून होईतो आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतली. परत एका सपाट रस्ता आला म्हणून सायकल चालवायला सुरवात केली पण परत ५ मिनिटं झाली नि मोठा चढ आला. “देवी आई संपव हे चढ आता !“असं मनातल्या मनात म्हटलं आणि काय आश्चर्य संपले कि चढ. :):):)तो शेवटचाच चढ होता मग पूर्ण गाव सपाट होत. टेरव गाव एकदम डोंगराच्या टोकावर आहे . चढाच्या एकदम टोकावर गेल्यावर सुंदर असं दृश्य नजरेस पडलं . डाव्या बाजूला कामथे घाटातले टॉवर तर समोरच्या बाजूला कामथे धरणाचा तलाव . सगळीकडे हिरवळ नुसती गच्च भरून होती . निसर्गाचं हे रूप मला प्रचंड आवडतं . निळंशार आकाश , मधूनच डोकावणारा एखादा राखाडी ढग आणि खाली पसरलेले हिरवेगार डोंगर. बस मन प्रसन्न झालं नि एवढा मोठा चढ चढून आल्याचं समाधान झालं .

मगाशी भेटलेल्या गृहस्थांचं नाव शरदराव कदम होत. शरदरावांची वाडी नावाने ते एक छोटंसं रिसॉर्ट सारखं डेव्हलोप करता आहेत. त्यांच्याकडे जरा निवांत गप्पा नि कोकम सरबत झालं. त्यांची वाडी बघितली फिरून. मग निघालो .११.३० वाजले होते. सूर्य बरोबर डोक्यावर आला होता. पण आता चिंता नव्हती. इथून खेर्डी फक्त ५किमी आणि तेही पूर्ण उतार. मग काय ? एरवी श्रीनिवास नि ईशानच्या मागे असणारी मी इथे फुल्ल जोशात त्यांच्या पुढे. रस्ता चांगला असलयाने उताराची मस्त मजा घेता आली. गिअर रेशो ३-७ करून ब्रेक दाबत सगळा उतार उतरून आलो. इथे अर्थात श्रीनिवास ईशान बरोबर त्याला कंट्रोल करत येत होता. खेर्डीत आल्यावर मग परत रोजचाच रस्ता. मी दोघांना पाठी टाकून पुढे आले. मागे वळून दोघे दिसेनात. पण आता घर गाठायची घाई झाली होती. ऊन तापत होत. शिवाय ईशान बरोबर श्रीनिवास असल्याने चिंतेचं कारण नव्हतं. मी आपली माझ्याच नादात घरापर्यंत आले. माझ्या मागून १५ मिनिटं झाली तरी दोघे आले नाहीत म्हणून फोन केला. तर बिचार्या ईशानच्या सायकलची चेन ३ वेळा उतरली. मग त्यांचा वेळ गेला.

प्रत्येक राईडच्या वेळी कायम येणाराअनुभव म्हणजे लोकांचे विचित्र बघणे. त्यातही एक बाई सायकल चालवते म्हटल्यावर हमखास अशी नजर आता परिचयाची झाली आहे. आज देखील मी सकाळी पुढे जाऊन दोघांची वाट बघत थांबले असताना कितीतरी पुरुष विचित्र नजरेने बघत, तर कधी कोणी अगदी न्याहाळत गेले. मुद्दाम हॉर्न वाजवणारे तर कित्येक. हाच अनुभव आम्ही टेरवचा चढ चढत असताना देखील आला. फक्त या वेळी मी एकटी नसून मुलगा बरोबर होता त्यामुळे कुतूहलाचा विषय तो होता. वळून बघणारे बरेच असतात. बरोबर श्रीनिवास असेल तर हॉर्न वाजवणाऱ्यांची संख्या चांगलीच कमी होते, हे देखील एक निरीक्षण.

असो, आज बरेच दिवसानंतर छान राईड झाली. भटक्या खेडवाले काका नवीन नवीन ठिकाणी दर आठवड्याला जाऊन आम्हाला जळवत होते. दर आठवड्याला नवीन राईड नवीन फोटो. चला आज मला पण समाधान झालं कि त्यांच्याएवढी मोठी नाही निदान ३०किमीची तरी राईड झाली. मन प्रसन्न झालं. आता परत सुरवात झाली. पाऊस पण कमी होतोय. दिवाळीची सुट्टी खुणावतेय. बघूया पुढे काय जमतंय ते.

मिपावर फोटो टाकणे अजूनही जमत नसल्याने फोटोसाठी क्षमस्व ! आमच्या ब्लॉग वर या राईडचे तसेच आधीचेही फोटो पाहू शकता.

---- धनश्रीनिवास

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

7 Oct 2019 - 4:58 pm | चौथा कोनाडा

खुपच सुरेख लिहिलंय ! मजा आली वाचायला !


हौसेला मोल नाही नि सायकलवाल्याला झोप नाही


हा ... हा .... हा ... !

आणि ब्लॉगची लिंका टाका ना !

ब्लॉगवरच्या फोटोवर क्लिक केल्यावर एक लिंक दिसेल तीच इथे वापरा.

मालविका's picture

7 Oct 2019 - 9:30 pm | मालविका

ब्लॉग ची लिंक द्यायची राहिली.
http://shrigokhale.in/a-ride-to-terav/

चौथा कोनाडा's picture

9 Oct 2019 - 11:01 am | चौथा कोनाडा

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद, मालविका.

फोटो पाहिले, भारी आहेत, नकाशा वै दिल्यामुळे आणखी कल्पना आली.

चौथा कोनाडा's picture

9 Oct 2019 - 11:08 am | चौथा कोनाडा

या धाग्यात मिपावर फोटो कसे टाकावेत याची माहिती आहे. त्याचा वापर करून पुढिल लेखासोबत फोटो नक्की टाका,
मंग लेख भारी वाचनिय अन प्रेक्षणिय होतो की नाय ते बगा.

मदत -मिपावर फोटो चिकटवणे.
http://www.misalpav.com/node/13573?page=1

जेम्स वांड's picture

9 Oct 2019 - 9:28 am | जेम्स वांड

पण त्या इलेक्ट्रिक असिस्ट वर इमानदारीत अडखळलो, हे असले असिस्टन्स घेतल्याने मुळातच सायकलिंगचा मोटिव्ह डिफीट होतो असे वाटते. उद्या कोणीतरी बारकं इंटर्नल कंबसशन इंजिन पण लावेल चढावर मदत व्हायला, त्यात काय अर्थ असेल? त्यापेक्षा पूर्ण दुखापत बरी होऊन मग हार्डकोर ट्रेडिशनल सायकलिंग करणे ठीक नसेल का?

मार्गी's picture

14 Oct 2019 - 5:31 pm | मार्गी

नमस्कार. तुम्ही सायकलिंग करताय व त्याबद्दल लिहिताय ह्याबद्दल अभिनंदन! मीसुद्धा अनेकांच्या अशा नजरा सायकलवर असलेल्या महिलेकडे/ मुलीकडे बघत असताना बघितल्या आहेत. वाईट आहे हे. पण जोपर्यंत खूप मुली सायकलिंग करणार नाहीत, सगळीकडे जोपर्यंत मुली सायकल चालवताना दिसणार नाहीत, तोपर्यंत दुर्दैवाने अशा नजरा असतील. :( बाकी तुम्ही उतारावर ३-७ वर उतरलात हे फारच अजब! उतारावर स्पीड कंट्रोलमध्ये ठेवायची असते आणि तुम्ही हायेस्ट गेअर वापरलात! ते जरा थोडं नीट कराल. शक्यतो जेव्हा अगदी फ्लॅट किंवा सरळ असलेला उताराचा रोड आहे; अडथळे नाहीत; तेव्हा हायर गेअर वापरायचे. आणि तीव्र उतार असेल तर तोही स्लो उतरावा लागतो. स्पीड कमी राहावी म्हणून तोही लोअर गेअर्सनेच उतरायचा. असो.

मीसुद्धा अनेकांच्या अशा नजरा सायकलवर असलेल्या महिलेकडे/ मुलीकडे बघत असताना बघितल्या आहेत. वाईट आहे हे.

काय वाईट आहे ?

मालविका's picture

3 Dec 2019 - 8:09 am | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद !