सहजच

चंद्र.शेखर's picture
चंद्र.शेखर in जनातलं, मनातलं
12 Sep 2019 - 9:23 am

तुला भेटण्याची ओढ मला अनंत काळापासून लागून राहीलेली आहे ...

निसर्गात तू असतोस म्हणे म्हणून मग तुझ्या ओढीने मी पर्वतांत ट्रेकिंग ला जातो
तुझा रखरखीतपणा देखील अंगावर झेलतो, मातीच्या सुगंधानं हरखून जातो
जंगलात-शेतात जातो, नदीत डुंबतो, पाण्याची तरलता, प्रवाह, ओढ मी माझ्यात साठवतो, प्रसन्न वाटतं
तिथे एखादी मोठी शीळा बघून तिच्या आडोशाला मी शरीर मोकळं करतो
छोट्या सुबक दगडांना मात्र मी सोबत घेवून येतो, शेंदूर फासतो आणि त्यांच्यासमोर मन मोकळं करतो

तु सर्वव्यापी आहेस मी मुलांना हेच त्यांच्या लहानपणापासून शिकवतो
पण शरीरधर्माच्या त्या दिवसांत विटाळ होईल म्हणून मी मंदिराच्या गाभाऱ्यात, देवघराजवळ जात नाही
इतर ठिकाणी वावरतांना मात्र मला काही अडचण नसते
नकळत मी इतर ठिकाणचं तुझं अस्तित्व नाकारत असतो हे माझ्या गावीही नसतं

वाऱ्याच्या रुपात वाहणाऱ्या तुला, पाण्याच्या प्रवाहातून खळाळत जाणाऱ्या तुझ्या वेगाला पकडणं मला जमलंय आता
त्या शक्तीला मी रुपांतरीत करतो आणि तुझ्या या बदलून विज झालेल्या रुपाचा मी विलक्षण चाहता होतो
रुपांतरण सृष्टिचा नियम आहे हेही मी ठासून सांगतो
पण माझ्यातली लहानशीही त्रासदायक सवय, अवगुण देखील मला कधी बदलायचा नसतो

विश्वाची निर्मिती करणारा तो तुच यावर माझा गाढ विश्वास असतो
सारे ग्रह, नक्षत्र, दिशा ही तुझीच उधळणं
सारं कसं युगानं युगे जागच्या जागी. एकमेकांच्या आधाराने आपापली गती आणि दिशा सांभाळून गतीमान तरीही स्थिर
मग त्यातल्याच काही दिशा/वेळ शुभ, काही अशुभ, काही ग्रह माझ्या वाईटावर उठलेले यावर विश्वास ठेवतांना
अप्रत्यक्षरीत्या मी तुझ्यावर अविश्वास दाखवतोय यावर मला विचार करावासा वाटतं नाही

कधी लाल दगड, कधी काळा तर कधी संगमरमर
विविध दगडांमधून मी तुला कोरून घडवतो
दगडामधून कोरलेल्या तुझ्या रुपावर जीव ओवाळून टाकतो
ओबडधोबड दगडामधून अनावश्यक भाग काढून टाकला तर
त्यातून मला हवाहवासा वाटणारा तू प्रकट होतोस
हे माहित असतांना देखील
माझ्यातला कोणताच अनावश्यक भाग मला काढून टाकायचा नसतो

तुझी स्थापना मी करतो, मनोभावे यथाशक्ति पुजा देखील करतो
तु निर्माण केलेली फुलं, पानं अनं फळं, ‘माझ्यातर्फे’ तुला चढवतो
तुला आवडेल म्हणून मी माझ्याचं आवडीचे पदार्थ तुला नेवैद्यात दाखवतो
जगाचा स्वामी तू, तुला मी खावू घालू शकतो
अशी अवास्तव कल्पना मी स्वत:बद्दल बाळगतो
नेवैद्य दाखवणं म्हणजे तु मला अन्न दिलंस, ते खाण्यालायक मला बनवलंस म्हणून तुला धन्यवाद द्यायचे असतं हे मात्र मी विसरतो

निरोप घेतोयस ना आता
माझ्या दिवाणखान्यात ठेवण्यासाठी एक शब्दकोश हवाय मला
दांभिक, दुटप्पी, दोगला, double standard असे शब्द नसलेला
शोध माझ्यासाठी
मिळाला तर तो घेवून पुढच्या वर्षी लवकर ये, बाप्पा.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

12 Sep 2019 - 3:07 pm | जॉनविक्क

काय बोललात.

कुमार१'s picture

13 Sep 2019 - 12:21 pm | कुमार१

आवडले

पद्मावति's picture

13 Sep 2019 - 1:25 pm | पद्मावति

छानच.

जगप्रवासी's picture

16 Sep 2019 - 5:05 pm | जगप्रवासी

छान लिहिलंय

छान!
हे माहित असतांना देखील
माझ्यातला कोणताच अनावश्यक भाग मला काढून टाकायचा नसतो.

आणि
नेवैद्य दाखवणं म्हणजे तु मला अन्न दिलंस, ते खाण्यालायक मला बनवलंस म्हणून तुला धन्यवाद द्यायचे असतं हे मात्र मी विसरतो
हे विशेष आवडलं.