युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३५

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
21 Aug 2019 - 10:09 am

भरलेली सभा!
मान्यवर आसनस्थ होते.
द्रोणाचार्य उठले तेव्हा सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. स्पर्धा काय असेल, यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
"ही स्पर्धा समजा अथवा गुरु आज्ञा, पण माझ्यासाठी ही गुरुदक्षिणा असेल!" मुठीत धरून सगळे ऐकत होते.... "तुम्हाला पांचाल नरेश द्रुपद राजाला हरवून त्याला बंदी बनवायचे आहे."
दुर्योधनच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. 'राजाला हरवायचे आहे? .....आणि हे पांडव स्पर्धा जिंकतील ? हे पाच जण?' त्याला हसू आले. 'ही गुरुदक्षिणा तर आम्हीच देणार तुम्हाला, गुरु द्रोण! १०० कौरव आणि हस्तिनापुरच्या सैन्यापुढे कोणीही टिकू शकत नाही!'
तितक्यात द्रोणाचार्यांनी नियम सांगायला सुरवात केली.
"ही गुरुदक्षिणा आहे. त्यामुळे ती केवळ माझ्या शिष्यांकडून अपेक्षित आहे. त्यात कोणाचीही मदत घेणे अमान्य आहे. आणि महत्त्वाचे, द्रुपदला केवळ बंदी बनवण्याची आज्ञा आहे, तेव्हा त्याचा वध आणि अनावश्यक हानी होणार नाही याची काळजी घेतली जावी."
"मग द्रोणाचार्य, प्रथम संधी आम्हाला मिळायला हवी." दुर्योधन म्हणाला.
विदुर आणि कृपाचार्य काही बोलणार त्या आधीच द्रोणाचार्यांनी होकारार्थी मान हलवली. दुर्योधनाने पांडवांकडे एक तुच्छ नजर टाकली आणि त्याच्या भावंडांना घेऊन त्याने पांचालच्या दिशेने कूच केली.
"तुम्ही त्यांना सैन्याविना एका युद्धावर कसे पाठवू शकता, आचार्य? जर यात राजकुमारांना काही झाले तर?"
"विदुर, ते शिष्य आहेत माझे. मी दिलेल्या शस्त्रविद्येवर विश्वास आहे माझा. प्रत्येकाची पात्रता ओळखून आहे मी! खात्री बाळगा, सर्व राजकुमार जिवंत परत येतील."
"पण द्रोणाचार्य, हा कोणता न्याय आहे? धृतराष्ट्रपुत्रांना संधी दिलीत..... पांडवांचं काय? पराजित राजाला परत कसे पराजित करणार पांडव?"
"मी धृतराष्ट्र पुत्र जिवंत परत येतील असे म्हणलो, कृपाचार्य. विजयी होऊन येतील, असे म्हणालो नाही."
"नक्की काय सुरु आहे तुमच्या मनात आचार्य? पांचाल वर विनाकारण आक्रमण करून काय सिद्ध होणार आहे?"
"विनाकारण? गुरुबंधु असूनही, घनिष्ट मित्र असूनही द्रुपदने माझा जो अपमान केला, तो 'विनाकारण' होता, विदुर. हे आक्रमण तर सकारण आणि सहेतू आहे."
"अपमान? तुमचा अपमान केला त्याने? मग त्या तुम्ही त्याच वेळी शाप का दिला नाहीत द्रुपदला?"
"शाप? काय मिळेल त्याने? मला अजूनही ते शब्द जसेच्या तसे आठवतात, विदुर.....'बालपणातून बाहेर ये, द्रोण. मैत्री बरोबरीच्या लोकांमध्ये होते. मी एक क्षत्रिय आहे.... आणि तू ब्राह्मण! भिक्षा मागं, हवं ते दान करेन. पण मित्र म्हणवून घेऊ नकोस स्वतःला.' माझ्या हृदयावर प्रचंड मोठा आघात केलाय या शब्दांनी. भर दरबारात त्याने माझा उपहास केला. तेव्हा त्याच्या नजरेत माझ्याबद्दल, माझ्या वर्णाबद्दल तुच्छता होती. ती तुच्छता शापाने निघून जाणार होती का विदुर?"
कटू आठवणींनी द्रोणाचार्यांचे मन ग्रासले होते.
"पण तुम्ही स्वतः समर्थ होतात, आचार्य.... त्याला तिथेच पराजित का नाही केलेत?"
"कृपाचार्य, मैत्री होत नसली तरी द्वंद्व मात्र बरोबरीच्याच लोकांमध्ये होते. आणि तो मला त्याच्या बरोबरीचे समजतच नव्हता, कृपाचार्य! आवाहन तरी कसे करणार मी त्याला द्वंद्वासाठी? तेव्हा ठरवलं, त्याला एक दिवस मान्य करायला लावेन की आम्ही मित्र होतो....आणि हे सुद्धा......की, मैत्री कधी संपत्ती बघून, वर्ण बघून केली जात नाही, आणि काळं बदलला म्हणून तोडलीही जात नाही. मला त्याच्या नजरेत मानाचे स्थान हवे आहे, कृपाचार्य. सन्मान हवा आहे. जो त्याने स्वतः मला दिला पाहिजे, पराजय स्विकारून......! "
-------
"कसा आहेस अंगराज?" दुर्योधनने कर्णाला घट्ट आलिंगन देत विचारले.
"तुमच्या कृपेने उत्तम आहे, युवराज." कर्णाने नमस्कार केला.
"कर्ण, किती वेळा सांगितले, मला दुर्योधन म्हण. निदान एकेरी संबोधन कर. तू ऐकतच नाहीस."
"क्षमा असावी." त्याने पुन्हा हात जोडले.
"चमत्कारिक आहेस. अरे, मित्रांना पाहिले की मिठी मारायला हात लांब ताणले जातात. छाती वरती येते. आणि इथे बघ....मला पाहिलं की तुझे हात असे जुळतात कसे?"
कर्णाला उत्तर सुचेना.
"हरकत नाही. तुला जे हवं ते म्हणं मला. तसही मित्राच्या तोंडून गोडंच वाटते कुठलीही हाक."
कर्णाच्या खांद्यावर हात ठेवून दुर्योधन कर्णासोबत महालाच्या दालनांतून फिरू लागला. अंगप्रदेशाचा महाल सुंदर बांधला होता. सुवर्ण आणि माणिक मोत्यांची रेलचेल होती. पण सर्वात जास्त झळाळी मात्र कर्णाच्या कवचाचीच भासत होती.
"मित्रा, तुला कधी विचारले नाही. पण काही प्रश्न आहेत मनात."
"विचारा ना, युवराज."
"हे तुझं वस्त्र.... सगळे त्याला कवच म्हणतात. हे कसं आलं तुझ्याकडे?"
"मलाही माहित नाही खरंतरं. माझ्या माता-पित्यांनाही नेमकं माहित नाही. पण ते म्हणतात, की देवाचा आशिर्वाद आहे हे कवच."
"जन्मापासूनच आहे?"
"हो."
"मी ऐकलयं खूप याबद्दल. पाहून अंदाज लागला नाही. म्हणून उत्सुकता होती विचारायची की काय आहे हे नक्की."
दुर्योधनाचं लक्ष कर्णाच्या कवचाकडे होतं. कर्णाने शेजारचे धनुष्य आणि भात्यातला एक बाण उचलून दुर्योधनाच्या हातात दिला. १० - १२ पावले मागे जात म्हणाला,
"चालवा माझ्यावर."
"काय? हे काय बोलतो आहेस तू?" 'नकळत आपण कर्णाला दुखावले की काय? विचारले म्हणून संताप आला की काय?' दुर्योधनाने आश्चर्याने कर्णाकडे पाहिले. तो अगदी शांत होता.
"मित्राचा शब्द समजा हवंतरं. घ्या धनुष्य."
मित्राचा शब्द! कसा टाळणार? दुर्योधनाने धनुष्य उचलले. सोडलेला बाण सरळं मागच्या भिंतीत घुसून बसला.
मुद्दाम चुकलेल्या बाणाकडे पाहात कर्णाने स्मित केले. काढून पुन्हा दुर्योधनाच्या हातात दिला.
"चिंता करू नका, युवराज. बाण माझ्या दिशेने चालवा."
दुर्योधनाच्या जिवावर आले होते. पण कर्ण इतक्या विश्वासाने सांगतो आहे म्हणल्यावर थरथरत्या हाताने त्याने कर्णाच्या दिशेने बाण चालवला.
बाण जाऊन कर्णाच्या कवचावर आदळला आणि गवताची काडी फेकून मारल्यासारखा कवचाला धडकून बाण खाली पडला. कवच जसेच्या तसे. तसूभरही फरक पडला नव्हता त्या कवचाच्या मोहिनीत.
दुर्योधन बघत राहिला. "अद्वितीय!" नकळत त्याच्या मुखातून बाहेर पडले.
"प्रणाम युवराज!" वृषाली बाहेर येत म्हणाली. "रोज तुमचे गोडवे ऐकते यांच्या कडून. आज दर्शनही झाले म्हणायचे."
"प्रणाम वहिनी. आनंद वाटला तुम्हाला भेटून." दुर्योधन नमस्कार करत म्हणाला.
"चला, आपण भोजन करून घेऊया. ताट वाढलेले आहे."
"हो, वृषाली. युवराज, चला."
वृषालीच्या हाताला वेगळीच चव होती. हस्तिनापुरचे राजभोजन आणि गुरुकुल मधले वनभोजन सोडून दुर्योधन पहिल्यांदाच काही वेगळ्या चवीचे खातं होता. पोटभर जेवून दोघे उठले. आणि वृषालीने साखर हातात आणून दिली. जेवणाच्या शेवटी काही गोड खाल्ले की मगच जेवण परिपूर्ण होते, असे तिचे मत.
कर्णाने साखर तोंडात टाकली. दुर्योधन हातातल्या साखरेकडे नुसताच बघत राहिला.
"काय झालं युवराज?"
"कर्ण, मला विचारलं नाहीस मी इथे का आलो ते?"
"मी विचारणारचं होतो की मलाच का नाही बोलावून घेतलेत. पण बरे झाले तुम्ही इथे आलात. तुमचे चरणस्पर्श झाले आज या सदनाला."
दोघे चालत चालत कक्षात आले.
"तिथे बोलावून तुला दाखवणार तरी काय होतो मी? युधिष्ठिरच्या राज्याभिषेकाची तयारी?"
"म्हणजे? त्याला महाराज म्हणून नियोजित केले?"
"दुसरे काय? राजनिती होती ती. आधी आम्ही आक्रमण केले पांचाल वर. एक युद्ध झाल्यावर द्रुपद बेसावध राहिलं, हे ओळखले असणार द्रोणाचार्यांनी. म्हणून पांडवांना दुसऱ्या वेळेस पाठवले त्यांनी. जेव्हा पांचालचे बरेचसे सैन्य आम्ही आधीच नेस्तनाबूत केले होते. म्हणजे आम्ही स्वतःच पांडवांना विजयाचा मार्ग मोकळा करून दिला, असं म्हण."
"मग?"
"काय होणार होते? एव्हड सगळं करून पांचाल नरेशकडून फक्त अर्ध राज्य घेऊन तो त्यांचा 'मित्र' होता असं वदवून घेतलं आणि पांडव जिंकले असे घोषित करून युधिष्ठिरला निवडलं. द्रोणाचार्यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत, कर्णा." दुर्योधनने साखर तोंडात टाकत रागारागाने चावल्यासारखी करत नुसतेच दात आपटत गिळली.
'शेवटी, द्रोणाचार्य अर्जुनाची.... पर्यायी पांडवांची बाजूच घेणार.' कर्ण पुटपुटला.
"काही म्हणालास?"
"युवराज, तुम्ही विश्रांती घ्या. प्रवासाने दमला असाल." कर्णाने विषय बदलला.
"विश्रांती? मन अस्वस्थ असताना कसली विश्रांती?" असं म्हणत दुर्योधन कक्षात जाऊन शय्येवर पडला आणि काही वेळातच घोरू लागला.
कर्ण बाहेर आला. कडेला ठेवलेल्या धनुष्याकडे त्याचे लक्ष गेले. 'तुमच्या मनाची अस्वस्थता मी नक्की दूर करेन, युवराज.... एक दिवस त्या द्रोण शिष्य अर्जुनला या धनुष्याच्या बळावर माझ्यापुढे गुडघे टेकायला लावेन. द्रोणाचार्यांना तेव्हाच कळेल.... त्यांच्या आवडत्या शिष्यापेक्षा महान धर्नुधारी अस्तित्वात आहेत.
द्रोणाचार्य, अर्जुनाचे खोटे श्रेष्ठत्व तुम्ही जे सर्वांच्या नजरेवर चढवले आहेत, ते हा कर्ण उतरवेलं. आणि लक्षात ठेवा, द्रोणाचार्य.....तुम्ही शिक्षा नाकारलेले सगळेच एकलव्य नसतात!'

©मधुरा

धर्मलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

21 Aug 2019 - 8:53 pm | जॉनविक्क

तमराज किल्विष's picture

21 Aug 2019 - 10:54 pm | तमराज किल्विष

:-((

लहान मुलांना मला प्रयत्न करूनही पटवता येईना दुर्योधन वाईट का ते. आणि लेखिकेचा इतिहास बोलतो की तिच्याकडेही याचे स्पष्टीकरण नाही म्हणून मी दुःखी झालो. आपले काय कारण आहे ?