चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
7 Jul 2019 - 5:38 pm

या मालिकेतील मागील लेख: चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार

हीच मालिका युट्युबवर दृकश्राव्य माध्यमात :
Chopta Chandrashila Trek | Part 1 | A day in Haridwar
Chopta Chandrashila Trek | Part 2 | Haridwar Sari Deoria Tal

ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला लांबलचक प्रवास करायचा होता. हरिद्वारहुन ऋषिकेश मार्गे सारी या गावी आम्हाला जायचं होतं.

i1

अंतर म्हणायला सव्वादोनशे किमीच्या आसपास जरी असलं तरी पूर्ण रस्ता घाटातला आहे. उंच डोंगरात दोन्ही बाजूने फक्त एकच लेन आहे. त्यामुळे फार वेगात प्रवास होत नाही.

आणि त्यात भर पडली ती हरिद्वार आणि ऋषिकेश जवळ झालेल्या ट्रॅफिक जॅमची. पर्यटनाचा मोसम असल्यामुळे या ठिकाणी यात्रेकरूची भरपूर गर्दी झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची कामेही चालू आहेत. त्यामुळे सध्या रोज ट्रॅफिक होत असल्याचं आम्हाला समजलं.

आमचा ८ जणांचा ग्रुप, आणि अजून ६ ट्रेकर्स हरिद्वार मध्ये आलेले होते. ट्रेक दि हिमालयाजकडून आमच्यासाठी ३ गाड्यांची (सुमो/बोलेरो) व्यवस्था करण्यात आली होती. हरिद्वार स्टेशनहुन आम्हाला घेऊन या गाड्या निघाल्या आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्या. ऋषिकेश पार करायलाच ५-६ तास लागले.

आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे मी ज्या गाडीत होतो त्या गाडीचं चाक जॅम झालं. ट्रॅफिक जॅम असल्यामुळे बाकी गाड्या पुढेमागे झाल्या होत्या. आमची गाडी बाजूला घेईपर्यंत बाकी गाड्या पुढे गेल्या आणि आम्ही मागे हरिद्वार शहराच्या थोडंसंच बाहेर अडकलो.

मेकॅनिक बोलावणे, तीच गाडी नीट करायचा प्रयत्न करणे ह्यात २-३ तास गेले. तोपर्यंत आम्ही बाजूला धाब्यावर वेगवेगळे चविष्ट पराठे, लस्सी असा भरपेट नाष्टा केला, पत्ते खेळले. दुसरी गाडी बोलावली पण तीसुद्धा हरिद्वारहुनच याच ट्रॅफिकमधुन येणार असल्यामुळे भरपूर वेळ गेला. शेवटी एकदाचे आम्ही निघालो.

ऋषिकेशच्या पुढेच जरा रस्ता मोकळा झाला आणि ड्रायव्हरचं कौशल्य पाहायला मिळायला लागलं. तिथले सगळेच ड्रायव्हर अशा दुर्गम घाटातसुद्धा इतक्या सफाईनं आणि वेगात गाड्या चालवतात. आपण शहरातसुद्धा बारीक गल्ल्यांमध्ये समोर गाडी आली कि जरा जपून थांबत थांबत चालवतो. पण ते अशा घाटातसुद्धा कोणाच्या बापासाठी थांबत नाहीत. सुरुवातीला जरा धडकी भरू शकते, पण थोड्यावेळाने आपल्यालासुद्धा ह्याची सवय होते.

i2

रस्त्यात अलकनंदा आणि भागीरथीचा संगम म्हणजेच देवप्रयाग लागतं. दोन्ही नद्यांचा रंग वेगळा, प्रवाहाचा वेग वेगळा, आणि संगम झाल्यावरसुद्धा काही अंतरापर्यंत हा वेगळेपणा स्पष्ट दिसत राहतो. बरोब्बर संगमाच्या कोपऱ्यावर एक सुंदर घाट आणि गाव आहे. तिथे जायला रस्ता पण आहे. मागे व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जाताना आणि याही वेळेस तिथे थांबण्याची आणि जाण्याची खूप इच्छा होती. पण खूप दूर जायचं असल्यामुळे तेवढा वेळ नसतो. आणि आजतर आम्हाला खूप उशीरही झाला होता.

जेवण सोडता आम्ही कुठेही थांबलो नाही. सारीला आम्हाला पोचायचं होतं ५ वाजता पण वाजले १०. जेवण करून आम्ही लगेच झोपून गेलो.

सकाळी देवेंदर या आमच्या ट्रेक लीडरने ब्रिफींग घेतली. सगळ्यांच्या ओळखी झाल्या, कोणी कोणकोणते ट्रेक केलेत, काय तयारी केली आहे यावर बोलणं झालं. सारी ते देओरीया ताल हा आजचा ट्रेक अगदीच छोटा आणि सोपा असल्यामुळे आम्ही आरामात नाश्ता करून निघालो.

i3

३-४ किलोमीटरचा हा ट्रेक आहे आणि ह्यात मुख्यतः चढच आहे. अगदी रमत गमत जाऊनसुद्धा आम्ही ३-४ तासात लंचच्या आधी आरामात पोचलो.

कॅम्पसाईट वर आमचं वेलकम ड्रिंक देऊन स्वागत करण्यात आलं. तिथे एक बुरांश नावाची त्या भागात उगवणारी वनस्पती आहे. त्याला लालसर रंगाची फुलं येतात. त्याचं इंग्रजीतील नाव Rhododendron आहे. हे म्हणताना सगळ्यांची गम्मत येते. त्याचा अगदी रुह अफझासारखा दिसणारा ज्यूस बनतो. आणि हे वेलकम ड्रिंक सुद्धा रुह अफझासारखंच तजेलदार आहे. तिथे सर्व दुकानात कोकमसारख्या ह्याच्या बाटल्या मिळतात. ट्रिपहुन येताना मी बुरांश आणि बेलफळ अशा स्क्वाशच्या दोन बाटल्या ट्राय करायला घेऊन आलो.

i4

तिथे कॅम्पसाईटवर पोचल्यावर देवेंदरने सगळ्यांकडून ५-१० मिनिटे स्ट्रेचिंग करून घेतलं. हि गोष्ट मला खूप आवडली. ट्रेकनंतर जो शीण येतो किंवा अंग दुखतं ते ट्रेक संपल्या संपल्या अशी स्ट्रेचिंग करण्यामुळे जवळपास नाहीसं होऊन जातं. एकदम ताजंतवानं वाटतं.

मी या आधी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, एव्हरेस्ट बेस कॅम्प असे दोन हिमालयातले ट्रेक्स केलेत, पण तिथे आमच्याकडून हे करून घेतलं नव्हतं. स्ट्रेचिंगची हि जादू पहिल्यांदाच पाहिली, त्यामुळे ट्रेक दि हिमालयाजच्या त्यांनी ह्या विचारपूर्वक टाकलेल्या गोष्टीचं कौतुक वाटलं.

i5

थोड्याच वेळात पाऊस सुरु झाला. ताजेतवाने होऊन जेवण वगैरे झाल्यावर आम्ही थोडावेळ पाऊस थांबण्याची वाट बघितली. पण कमीअधिक जोराने पाऊस चालूच होता. त्यामुळे आम्ही शेवटी पावसातच ताल म्हणजेच तलाव बघायला गेलो. ह्याच्यामुळेच ह्या जागेच नाव देओरीया ताल असं आहे.

अतिशय सुंदर तलाव आहे, पण पावसामुळे आम्हाला तिथली दृश्य मात्र फार काही बघता आली नाही. परत आलो.

मग सगळ्यांमध्ये मिळून बराच वेळ काही गेम्स खेळण्यांमध्ये छान टाईमपास झाला. संध्याकाळी पाऊस जरा थांबला आणि आम्ही मग जवळपासच्या छोट्या मोठ्या टेकड्यांवर जाऊन फेरफटका मारला. हळूहळू ढग बाजूला होत आम्हाला फार सुंदर दृश्य दिसायला लागली.

i6

आणि काहीच वेळाने आम्हाला पहिल्यांदाच हिमाच्छादित शिखरे दिसायला लागली. तेव्हा सर्वांना झालेला आनंद शब्दांच्या पलीकडे होता. वाह, जब्बरदस्त, क्लास, एक नंबर असे सतत एका मागून एक उद्गार आमच्या सर्वांच्या तोंडून निघत होते.

संध्याकाळची कातरवेळ आणि ढगांचा प्रकाशसोबत खेळ चालू असल्यामुळे कॅमेऱ्यात मात्र ते आम्हाला तितक्या ताकदीने टिपता आलं नाही.

कधी कधी देव माणसाला असं काही दाखवतो कि ते टिपायला त्याची कला आणि त्याने बनवलेली यंत्रेसुद्धा पुरी पडत नाहीत. अशा वेळेस आपण फक्त तो सुंदर क्षण आपल्या डोळ्यात आणि मनात साठवु शकतो आणि तो अनुभवायला दिल्याबद्दल देवाचे आभार मानु शकतो. अनंत हस्ते कमला कराने देता किती घेशील दो कराने ह्या ओळी मला पुसटश्या आठवत होत्या पण नेमके शब्द आठवत नव्हते. नंतर गुगल करून शेवटी सापडल्या.

छोटासा ट्रेक, गेम्स, निसर्गसौंदर्य असा हा दिवस छान गेला. पुढच्या दिवशी मात्र तिथून बनियाकुंडपर्यंत २० किलोमीटरच्या ट्रेकचं आव्हान होतं. त्याबद्दल पुढच्या वृत्तांतात.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2019 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालला आहे ट्रेक ! पुभाप्र.

प्रचेतस's picture

8 Jul 2019 - 8:54 am | प्रचेतस

छान लिहिताय

जॉनविक्क's picture

8 Jul 2019 - 5:35 pm | जॉनविक्क

आकाश खोत's picture

9 Jul 2019 - 7:04 pm | आकाश खोत

धन्यवाद :-)

किल्लेदार's picture

12 Jul 2019 - 5:39 pm | किल्लेदार

पुभाप्र.....

मुक्त विहारि's picture

29 Jul 2019 - 11:35 pm | मुक्त विहारि

मस्त

गोरगावलेकर's picture

30 Jul 2019 - 1:35 pm | गोरगावलेकर

फोटो आणि लेखन दोन्ही आवडले. पहिला भाग सुटला होता तोही आजच वाचला.

श्वेता२४'s picture

30 Jul 2019 - 11:02 pm | श्वेता२४

वाचतेय