पोपट

Primary tabs

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
11 Jul 2019 - 11:46 pm

पशुपक्षी आणि माणूस यांचे जग स्वतंत्र असले तरी काही पशू आणि पक्षी माणसांच्या आसपासच, माणसांच्या सहवासातच वावरणे पसंत करतात. वने आणि जंगले हेच आपले जग याची त्यांना जाणीवही नसते.
कुत्रामांजरे तर मानवी जगरहाटीचा अविभाज्य भाग आहे. हळुहळू अन्य काही पशुपक्ष्यांनाही मानवी सहवासाची ओढ आणि आवड वाढू लागली असून वने आणि जंगले सोडून मानवी वस्त्यांवर फेरफटके मारण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीस यामध्ये संघर्षाचे प्रकार घडू शकतात, पण परस्परांवर विश्वास रुजला की हे प्राणीही कुत्र्यामांजरासारखे रस्तोरस्ती वावरतील असे वातावरण भविष्यात शक्य आहे.
त्यासाठी पहिला मैत्रीचा हात मानवाने पुढे केला पाहिजे.
आजकाल कोणताही वन्य पशु मानवी वस्तीत आला की त्याला पकडून पुन्हा जंगलात सोडले जाते. सध्या हे सहाजिक असले तरी यावेळी माणसाकडून त्याच्या घरवापसीचा जो काही गदारोळ केला जातो, त्यामुळे माणसाशी मैत्री करण्याच्या वन्य पशुपक्ष्यांच्या हेतूकडे कदाचित दुर्लक्ष होते. ही प्रक्रिया बदलून मैत्रीपूर्ण केली तर कदाचित वन्य पशुपक्षी आणि माणूस हे एकमेकांचे पाहुणे होतील, व त्यांच्या त्यांच्या जगात एकमेकांचा पाहुणचारही होईल.
पण तशी शक्यता नाही.
वन्यजीवांची कितीही इच्छा असली तरी माणसाच्या जगात त्याला प्रवेश नाही अशीच मानसिकता दिसते.
वन्यजीव पाळणाऱ्यावर कारवाया होतात.
काही वन्यजीव तर माणसाच्या जगाशी एकरूप होण्यात आनंद मानतात. पोपट हा त्यातला एक पक्षी... पिंजऱ्यात तो स्वातंत्र्य गमावतो ही माणसाची एक कल्पना असली तरी खुद्द पोपटाला तसे वाटते का हा प्रश्नच आहे.
बरेचसे पोपट पिंजऱ्यात राहण्यासाठी उत्सुक असतात आणि पिंजऱ्यात राहण्यातच आनंद आहे अशीही त्यांची भावना असते.
आजकाल तर, माणसांच्या जगातही अशी ‘पोपट वृत्ती’ दिसू लागली असून, ‘मला पाळा- पिंजऱ्यात घ्या’ अशी विनवणी करत दारोदार हिंडणारे ‘मानवी पोपट’ आसपास आढळू लागले आहेत.
जिथे माणसामध्येच ‘पोपटपणा’ वाढत असेल, तर खरे पोपट पाळण्यास व त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात गैर काय?
सहा वर्षांपूर्वी, याच दिवशी सरकारने एक निर्णय जारी केला. ‘पोपट पाळणाऱ्यास पंचवीस हजारांचा दंड ठोठावला जाईल’ असे बजावले.
कदाचित त्यावेळी सरकारला भविष्याची चाहूल नसावी. प्रत्यक्षात, पोपट पाळणाऱ्यांवर अशी कारवाई झाल्याचे ऐकिवातही नाही.
उलट, काही पोपटांची पळवापळवी सुरू आहे, तर काही पोपट स्वत:च या पिंजऱ्यातून त्या पिंजऱ्यात जाऊ पहात आहेत.
त्यामुळेच, पोपटाला वन्य पक्षी न मानता माणसांच्या जगाचा भाग मानण्यातच शहाणपणा आहे.
तुम्हाला काय वाटते?

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

वनात एखादा माणूस सापडला तर त्यास पकडून परत शहरात सोडण्यात येत आहे/ येईल.
पिंजऱ्यात बालपण काढलेले प्राणी, पक्षी अचनक वनात जगू शकत नाहीत. अन्न वेळच्या वेळी समोर येऊन पडत असते ते अचानक गायब होते.
(पोपटांची पळवापळवी - राजकीय रूपक आहे का?)

माहितगार's picture

12 Jul 2019 - 6:26 am | माहितगार

रूपक

काही पोपटांची पळवापळवी सुरू आहे, तर काही पोपट स्वत:च या पिंजऱ्यातून त्या पिंजऱ्यात जाऊ पहात आहेत.

बोध
त्यामुळेच, पोपटाला वन्य पक्षी न मानता माणसांच्या जगाचा भाग मानण्यातच शहाणपणा आहे.

आनन्दा's picture

12 Jul 2019 - 2:07 pm | आनन्दा

पोपटांशिवाय माणसांचे जग अपुर्ण आहे.

जॉनविक्क's picture

12 Jul 2019 - 3:35 pm | जॉनविक्क

पोपटाला वन्य पक्षी न मानता माणसांच्या जगाचा भाग मानण्यातच शहाणपणा आहे.
तुम्हाला काय वाटते?

याच ओळीला हा प्रतिसाद आहे ना ?

जालिम लोशन's picture

12 Jul 2019 - 4:02 pm | जालिम लोशन

Queen Elizabeth ने त्यांचा प्रचार व प्रसार केला.

अथांग आकाश's picture

12 Jul 2019 - 4:23 pm | अथांग आकाश

सध्या कर्नाटकातले काही पोपट स्वत:च या पिंजऱ्यातून त्या पिंजऱ्यात जाऊ पहात आहेत. त्यांचेअनुकरण लवकरच राजथान आणि मध्य प्रदेशातले काही पोपट करण्याची दाट शक्यता पक्षीतद्न्य व्यक्त करत आहेत.

parrot