आवाज आवाज...

सरनौबत's picture
सरनौबत in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

आवाज आवाज...

दिवाळी म्हटलं की भल्या पहाटे नरकचतुर्दशीला उडवलेल्या 'लक्ष्मी बाँब'चा आवाज कानांत घुमतो. आसपासच्या परिसरात अगदी पहाटेपासून उडणारे फटाके दिवाळी चालू झाल्याची वर्दी देत असतात. गेल्या सहा वर्षांपासून मी मस्कत येथे वास्तव्यास आहे. इकडे एकतर दिवाळीची सुट्टी नाही, त्यामुळे जे काही सेलिब्रेशन करायचं ते शुक्रवार-शनिवारच्या वीकांताला. शिवाय इकडे फटाके उडवण्यावर बंदी असल्याने दिवाळीचा म्हणावा तसा 'माहोल' नसतो. एकंदरीत भारताच्या मानाने इकडे आवाज कमीच. अगदी नाइलाज झाल्यासच कारचा हॉर्न वाजवणं असा अलिखित नियम असल्याने हॉर्नचेदेखील आवाज नाहीत. रस्त्यावरील रहदारीचे तुरळक आवाज, जवळच्या मशिदीतली बांग आणि अधून-मधून येणाऱ्या कबुतरांचे गुटर-गू सोडल्यास इतर आवाज कानांवर फारसे पडत नाहीत. त्यामुळे कमी आवाजाची सवय झाल्यावर भारतात सुट्टीवर आलो असता रोजचे नेहमीचे आवाज जास्त प्रकर्षाने जाणवतात.

अगदी पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येते. त्यानंतर दूधवाले, पेपरवाले, कचरेवाले ह्यांच्या वाहनांचे आवाज. लांबून "भाआआजेय" असा भाजीवाल्याचा खणखणीत आवाज ऐकून भाजी घेण्यासाठी लोक येतात. वरच्या मजल्यावर राहणारे बरेच ज्येष्ठ नागरिक बाल्कनीतून भाजीवाल्याकडे लांब दोरीला पिशवी बांधून खाली टाकतात. Online shopping with Cash on Deliveryची सुरुवात बहुधा इथूनच झाली असावी.
सीझननुसार आंबे, पेरू, सीताफळं वगैरे विकणाऱ्यांच्या हाळी देण्याच्या विविध तऱ्हा. "काळी काळी मैना, डोंगरची मैना"वाल्या बाईचा 'लई ग्वाड' आवाज अजूनही कानात घुमतो. सकाळी असे पैसे खर्च झाल्यावर दुपारी मग थोडे पैसे कमावण्याची संधी. 'ए रद्दी पेपोरऽऽऽऽऽ' आणि “पलाऽऽसटीक ..... बाऽऽऽऽटली ......भंगाऽऽऽऽऽऽरवालेएएएएएएएय” अशा आवाजांनी अवघा आसमंत दुमदुमून जातो.

भाजी-फळ विक्रेत्याखेरीज खाद्यपदार्थ विकणाऱ्याचेदेखील विविध आवाज. रबरी भोंगा पुक-पुक वाजवत इडलीवाला, खारी-टोस्ट विकणारा मुसलमान, उसाचा रस काढून देणाऱ्या लाकडी गाडीचा खडखडाट, घंटानाद करत येणारा कुल्फीवाला. पूर्वी अनेक कलाकारदेखील हजेरी लावायचे. सकाळी येणाऱ्या वासुदेवाचा पोषाख बघायला आणि गाणी ऐकायला आवडायचं. 'पिंगळा' नामक माणसाबद्दल कायम कुतूहल वाटायचं. लांबवरून येणारा त्याचा पहाडी आवाज, त्याचा देखणा नंदीबैल इत्यादीबद्दल एक गूढ आकर्षण होतं. पेटी वाजवत 'रमया वस्तावया' गाणारा आंधळा आणि त्याची (कायम) गरोदर असणारी बायको. माकडाचा खेळ करणारा मदारी आणि त्याच्या डमरूचा आवाज, डोंबाऱ्याच्या ढोलाचा आवाज, नागपंचमीला 'नागोबाला दूSSSSध' मागणारा आवाज.

चाकू-सुऱ्यांना धार करून देणारे धारवाले आणि भांड्यांना कल्हई लावणारे कल्हईवालेदेखील विशेष आवडीचे. त्या स्पेशल सायकलचे पायडल मारत 'धार करताना उडणाऱ्या ठिणग्या आणि टर्र्र्रर्र्रर्र्र आवाज' अतिशय आवडायचा. कल्हईवाला ४-५ भांडी जमली की मग रस्त्याच्या एका कोपऱ्यात मांडामांड करून विस्तव पेटवायला लागला, की मी समोरच बैठक मारायचो. एखादी ‘जादू झाल्याप्रमाणे जुनं भांडं क्षणार्धात लखलखीत दिसायला लागतं’. 'लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती या' गाणं ऐकल्यावर मला खरं तर कल्हईचं चंदेरी भांडं आणि धार करताना उडणाऱ्या कोटी ठिणग्या आठवतात.

घरोघरी गॅस आल्यानंतर सकाळी स्टोव्हला पंप मारण्याचा आवाज बंद झाला. त्या आवाजाची उणीव स्कूटर्सना 'किक' मारण्याच्या आवाजाने काही अंशी भरून काढली. हिवाळ्यातदेखील सकाळी सकाळी घाम काढण्याचे श्रेय बजाज, व्हेस्पा, विजय वगैरे कंपन्यांना द्यायला हवे. आता 'इलेक्ट्रॉनिक स्टार्ट'मुळे स्कूटर्सच्या 'किका'टण्याची जागा अ‍ॅक्टिव्हाच्या 'खाकरण्याने' घेतलीये. अ‍ॅक्टिव्हा नुसतं बटन दाबून चालू होत असली, तरी सकाळी पहिल्यांदा किक मारून चालू करावी असं म्हणतात. होंडाने 'ग्राहकांची गैरसोय हाच आमचा संतोष' ह्या धोरणानुसार 'किक' बसवली असावी. त्या अरुंद जागेत पाय घालून अतिशय घट्ट किक मारण्याचा त्रास ज्याने अनुभवलाय, त्यालाच ह्यामागची तळमळ समजू शकते. १२-१५ वेळा किक मारूनही गाडी चालू झाली नाही तर असली किक डिझाइन करणाऱ्याच्या पार्श्वभागावर किक मारण्यासाठी (दुखरा) पाय सळसळत असतो. गाडी वाकडी केल्यास चालू होण्याचं 'बजाजचं कॉपीराइट' तरी निदान होंडावाल्यांनी विकत घ्यावं अशी कळकळीची मागणी आहे.
आता घरटी किमान एक कार असल्याने सकाळी सकाळी कार्सच्या रिव्हर्स हॉर्नचे देखील अनेक आवाज ऐकू येतात. साध्या 'पुक पुक'पासून अगदी ओम जय जगदीश आणि झिंगाटपर्यंतच्या धून घरबसल्या ऐकू येतात.

आता National Geographic, Animal Planet आणि तत्सम चॅनल्सवर घरबसल्या आफ्रिकेच्या जंगलातील शिकारी बघता येतात. पूर्वी आमची मांजरं उंदीर, कबुतरं वगैरे मारायची, तीच काय ती Live शिकार बघायला मिळायची. आता मांजरांना 'कॅट फूड' नामक 'चखना' आयता मिळतो. त्यामुळे तीदेखील शिकारीच्या भानगडीत पडत नसावीत. आमच्या लहानपणी क्वचित डुकरांचा आवाज आणि मागून कुत्र्यांचं जोरजोरात भुंकणं ऐकू यायचं. मग आम्हा पोरांच्या उत्साहाला पारावार राहायचा नाही. डुक्कर पकडणारे लोक कुत्र्यांना डुकरांमागे सोडून दोरीच्या फासात पकडताना बघायला अतिशय थ्रिल वाटायचं. मात्र पकडल्यानंतर तोंड बांधताना डुकरांचं विव्हळणं मात्र ऐकवायचं नाही.

रात्री गुरख्याच्या 'जागते रहो'च्या आरोळीबरोबर रस्त्यावर काठी आपटण्याचा आवाज. 'जागते रहो'मागचं प्रयोजनदेखील कळायचं नाही. परीक्षेच्या काळात अभ्यास म्हणून आणि श्रावणात मंगळागौरीनिमित्त वगैरे जागणं ठीक आहे. चोरांच्या भीतीने रोज जागरण केलं, तर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये झोपा काढाव्या लागतील. मग पुढे घरात चोरायलादेखील काही शिल्लक राहणार नाही!

सणासुदीला प्रसंगानुरूप विविध आवाजांची भर पडायची. निवडणुका जवळ आल्यावर रिक्षामधून केलेला 'ताई माई अक्का'चा प्रचार. शिवजयंतीला घराजवळचं गणेश मंडळ लाउडस्पीकरवर पोवाडे लावायचं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देशभक्तीची गाणी. गणेशोत्सवात तर भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध आवाज सतत कानी पडायचे. मराठी-हिंदी गाण्यांबरोबर 'Are you ready' आणि 'मैसम्मा' अशी इतर भाषांतील गाणी ऐकायला मिळायची. मला खातरी आहे की 'मुंगळा' हे गाणं आम्हा गणेशभक्तांनी जितक्या वेळा ऐकलंय, तितकं स्वतः उषा मंगेशकरांनीदेखील ऐकलं नसेल! आसपासच्या सोसायट्यांमधून संध्याकाळी 'आरतीला चला रे'च्या आरोळ्या ऐकू येत असत. आता आरतीची वेळ झाली की सोसायटीच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर मेसेज करतात.

काळ बदलला, लोकांचं राहणीमान बदललं. जुन्या छोट्या सोसायट्या पाडून मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये लोक राहायला गेले. मुख्य गेटवर 'फेरीवाल्यास आत येण्यास सक्त मनाई'चे बोर्ड्स असतात. इकडे आत फक्त येतात पिझ्झा आणि अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरेची डिलिव्हरी पोरं. पोस्टमनशी आपुलकीच्या गप्पा होत नाहीत, कारण तो बिचारा खाली लावलेल्या लेटर बॉक्समध्ये पत्रं टाकून खालच्या खालीच निघून जातो. सुदैवाने पक्ष्यांना आत यायला मज्जाव नसल्याने ते अजूनही किलबिल करतात. पण घरोघरी येणाऱ्या टीव्हीच्या आणि मोबाइल फोन्सच्या गोंगाटांत ती गोड किलबिल ऐकू येईनाशी झालीये. ह्या सृष्टीत इतके गोड आवाज निर्माण करणाऱ्या DJला म्हणावसं वाटतं की 'आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय'.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

6 Nov 2018 - 5:46 pm | गुल्लू दादा

आता 'इलेक्ट्रॉनिक स्टार्ट'मुळे स्कूटर्सच्या 'किका'टण्याची जागा अ‍ॅक्टिव्हाच्या 'खाकरण्याने' घेतलीये.

हे खूप सही लिहिलंय..;)

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 8:14 pm | तुषार काळभोर

असं झालंय खरं!

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 8:34 pm | टर्मीनेटर

खुसखुशीत लेख आवडला.

यशोधरा's picture

7 Nov 2018 - 9:07 am | यशोधरा

मस्त लेख! आवाज की दुनिया!

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2018 - 9:12 am | प्राची अश्विनी

आवडला लेख.

पद्मावति's picture

7 Nov 2018 - 8:42 pm | पद्मावति

मस्तं लेख.

मुक्त विहारि's picture

7 Nov 2018 - 9:59 pm | मुक्त विहारि

आवडला...

सुधीर कांदळकर's picture

8 Nov 2018 - 5:57 am | सुधीर कांदळकर

जमली आहे. मुंबईत दुचाक्यांचे आवाज जवळजवळ नव्हतेच. मात्र इमारतीतल्या जवळजवळ प्रत्येक घरातून सतत चालू असणार्‍या पंख्यांचे ़खस्स खस्स हवा कपणारे आवाज त्यात चालू-बंद होणारे काही वातानुकूलन यंत्रांचे आणि फ्रीजचे घुसमटलेले आवाज मिसळून एक पार्श्वसंगीत २४ तास चालू असते. या आवाजात गाण्यातले काही स्वर कमी ऐकू येतात. थंडीची लाट आली की हे सारे आवाज गायब झाल्यावर हे आवाज होते हे कळते.

लेखातून वाचकांच्याही आवाजांची दुनिया जागविलीत.
धन्यवाद

सरनौबत's picture

11 Nov 2018 - 10:55 am | सरनौबत

धन्यवाद सुधीर जी.

किल्लेदार's picture

8 Nov 2018 - 12:03 pm | किल्लेदार

पूर्वी पुण्यातल्या सायकलींची मंजुळ आणि आदबशीर किण-किण कानी पडायची (त्यात अरे मित्रा जरा वाट देतोस का असा भाव असे). आता मात्र मोटरसायकलींचे भसाडे आणि गुर्मी असलेले हॉर्न्स कानावर आदळतात तेव्हा उगाच मस्ती आलेल्या अश्यांच्या कानाखाली एक मोठ्ठा आवाssssssssज काढावासा वाटतो.

बाकी लेख चोक्कस !!!

सरनौबत's picture

11 Nov 2018 - 10:54 am | सरनौबत

तरी आता विचित्र हॉर्न्स वर बंदी आहे ते बरंय... अनेक शौकीन लोकांनी अतिशय विचित्र आवाजाचे हॉर्न्स लावले होते पूर्वी

मित्रहो's picture

8 Nov 2018 - 8:04 pm | मित्रहो

बरेच आवाज आता नाहीसे झाले आणि नको ते आवाज निर्माण झाले. बोअरवेलचा आवाज भयंकर कंटाळवाणा असतो. लहानपणी आमच्या गावात रस्ते नव्हते. अशा वेळेला गावात ट्रक आल्यावर पोरं ज्या प्रकारे ठेला आला असा आवाज देत होते ते आजही लक्षात आहे.
छान लेख

दुर्गविहारी's picture

8 Nov 2018 - 8:12 pm | दुर्गविहारी

अजून बरेच आवाज लिहीता आले असते. पण जे लिहीले आहे ते छान! शक्य झाल्यास अजून आवाजचित्र लिहा.

सरनौबत's picture

11 Nov 2018 - 10:51 am | सरनौबत

धन्यवाद दुर्गविहारी. नक्की प्रयत्न करेन.

ज्योति अळवणी's picture

9 Nov 2018 - 6:10 pm | ज्योति अळवणी

खूप छान लिहिलं आहे. एप्रिल मे मध्ये होलसेल मध्ये धान्य घेऊन ते निवडून, पाखडून, ऊन दाखवून साठवून ठेवायची पद्धत होती. त्या3-4 दिवसातला पाखडण्याचा आवाज, तिखट कुटून घेतानाचा आवाज अजूनही आठवतो. खूप आवडायचा मला तो आवाज.

लेख मस्तच जमलाय

सरनौबत's picture

11 Nov 2018 - 10:49 am | सरनौबत

धन्यवाद ज्योती. माझं आजोळ पुण्यापासून ५० किमी वर असलेलं भोर... तिकडे बाजारपेठेत मसाले कुटण्याचा 'डंक' होता त्याचा आवाज तुमच्या प्रतिक्रियेमुळे कानांत घुमला

नाखु's picture

13 Nov 2018 - 8:37 pm | नाखु

डिस्को आणि रॉक म्युझिक हे या कांडप मशीनच्या आवाजावरून घेतलं आहे याबद्दल मला शंका नाही.

स्मरणशील नाखु

चौथा कोनाडा's picture

13 Nov 2018 - 8:54 pm | चौथा कोनाडा

अगदी बरोबर :-)

विशेषतः बाप्पी लाहिरीची गाणी ऐकताना कांडप मशीनची अनुभुती यायची.

रागो's picture

9 Nov 2018 - 7:15 pm | रागो

लेख आवडला.छान लिहिलं आहे.

प्राजु's picture

10 Nov 2018 - 7:57 pm | प्राजु

माझ्या https://www.misalpav.com/node/6028 या लेख आठवण झाली.

सरनौबत's picture

11 Nov 2018 - 10:26 am | सरनौबत

धन्यवाद प्राजु. तुमचा लेख वाचला होता पूर्वी.. मस्त आठवणी

बबन ताम्बे's picture

10 Nov 2018 - 8:14 pm | बबन ताम्बे

पु लं च्या आवाज आवाज लेखाची आठवण झाली.

सरनौबत's picture

11 Nov 2018 - 10:27 am | सरनौबत

धन्यवाद बबन भाऊ

बबन ताम्बे's picture

10 Nov 2018 - 8:24 pm | बबन ताम्बे

.

माहितगार's picture

10 Nov 2018 - 8:54 pm | माहितगार

खुसखुशीत लेख आवडला. काही प्रतिसादातील आवाजांच्या आठवणीही रोचक.

या लेखावरुन आठवले माझ्या परदेशीच्या सुरवातीच्या काही महिने रात्री एका आवाजाच्या अबसेन्समुळे झोप लागत नव्हती, तो मिसलेला आवाज रस्त्यावरच्या कुत्र्यांचा होता ! :)

सरनौबत's picture

11 Nov 2018 - 10:25 am | सरनौबत

हा हा! पुष्पक सिनेमा आठवला

विनिता००२'s picture

13 Nov 2018 - 3:09 pm | विनिता००२

सकाळी सकाळ्ळी आमच्या इथे खालील प्रमाणे आवाज येत असतात :)

सगळ्या लेडीजच पण...पुरुषांचे आवाजच नाही येत ;)

खाली रहाणारे...वरच्यांना...
"ये प्राचीऽ..."
प्राची घरात...परत काही वेळाने...
"ये प्राचीऽ..."
प्राचीची आई गॅलरी..
"काय ओ?"
"टाकी भरली वाट्टं!"
"हा हा...(घरात बघून...ओऽ नळ बंद कराऽऽऽ" ) जातो बिचारा पळतच खाली...नळ बंद करुन पळतच वर! :)

मग समोसेवाला येतो......"स....म्मोसे गर्रमऽ" हा समोसेवाला दिवसातून तीन वेळा येतो.

दुपारी बटाटे, कांदे विकणारे टेपो येतात.
"कांदेऽ १०० ला पाच किलोऽ"

एमी's picture

20 Nov 2018 - 11:06 am | एमी

छान लिहिले आहे.

> आमच्या लहानपणी क्वचित डुकरांचा आवाज आणि मागून कुत्र्यांचं जोरजोरात भुंकणं ऐकू यायचं. मग आम्हा पोरांच्या उत्साहाला पारावार राहायचा नाही. डुक्कर पकडणारे लोक कुत्र्यांना डुकरांमागे सोडून दोरीच्या फासात पकडताना बघायला अतिशय थ्रिल वाटायचं. मात्र पकडल्यानंतर तोंड बांधताना डुकरांचं विव्हळणं मात्र ऐकवायचं नाही. > फॅन्ड्री?

तिमा's picture

21 Nov 2018 - 8:45 am | तिमा

मी शांतताप्रिय असल्याने, निवृत्त झाल्यावर, मुंबई सोडून एका शांत ठिकाणी रहायला गेलो. तिथे गेल्यावर हे लक्षांत आले की सर्वच व्हॉल्युम्स आता अर्ध्यावर ठेवावे लागतात. इतकंच काय तर, घरांत बोलतानाही सुरवातीला आपण उगाच मोठ्या आवाजात बोलतोय, हे लक्षांत आले. त्यानंतर, कमी आवाजात बोलण्याची संवय लागली. आजुबाजूच्या निसर्गातले , बारीक सारीक आवाजही स्पष्ट ऐकू यायला लागले! एकुणांत, आयुष्यच काय, मनही शांत झाले.

जुइ's picture

23 Nov 2018 - 1:39 am | जुइ

लेख आवडला. अनेक आवाजांची या निमीत्याने आठवण आली.

बागेतले आवाज
रोज सकाळी बागेत फिरायला जायचे म्हणून पाचचा कर्कश गजर लावते पण गजर ऐकून परत बंद करून एखादी डुलकी काढावी वाटतेच मग सकाळी सकाळी जाता येत नाहीच . मग सोनूचा डबा ,तिला शाळेत घालवून सव्वा सातला बागेत पाऊल पडते . गेट समोरच एक कारंज्या आहे . त्याचा सरसर आवाज येत असतो . पण काही केल्या हा आवाज मला शब्दात पकडता येतच नाही म्हणून "सरसर" हा शब्द शोधला मी . तिथून पुढे गेले कि बऱ्याचशे लोक गोलाकार उभे असतात . आणि त्यांचा हे हे हु हु हो हो चाललेले असते . त्यांची हि ह ची बाराखडी किती किती वळणे घेते . तिथे उभे असणारे हसण्याचे नाटक करत असतात पण बाहेर चालणाऱ्याना त्यांच्या कडून पाहून खूप हसू येते त्यांचे ते कृत्रिम हसे पाहून बाकीचे बाहेरचे खूप हसत असतात . त्यांच्या हसण्याचा आवाज येत राहतो .
परवा एक छोटी आपल्या आजोबांबरोबर आलेली होती . आजोबा तिला थोड्या पुढे असणाऱ्या मुलांच्या खेळाच्या जागेकडे नेवु पाहत होती तर ती हट्टुण पुढे पाय उचलत नव्हती . आजोबा म्हणत होते , "झोपाळ्यावर नाही बसायचे तुला बाळ ?" ती," मला हसायला जायचे आहे". मज्जाच वाटली तिचे हे उत्तर ऐकून . आजोबांचे वय लहान होवू पाहत होते आणि तिला मोठे होण्याची घाई लागली होती
इथून पुढे खऱ्या अर्थाने चालणाऱ्याच्या पायाचे "झपझप " आवाज ऐकू येवू लागतो कारण हा रस्ता उताराचा आहे . . शूज घालून चालणाऱ्या पेक्षा धावणाऱ्या माणसांच्या शूज चा खूप आवाज येत असतो . आता बाग वळण घेते . त्या कोपऱ्यावर बच्चे कंपनीची जागा आहे . तिथे सी सा , घसरगुंडी , झोपाळे आणि बरीच खेळणी आहेत . मग झोके फिरतानाचा "करकर "आवाज येत असतो आणि त्या बरोबर कोणी मजेने हसत असतो तर कोणी घाबरून "स्सस " असा आवाज काढत असतो . कोणी आनंदाने ओरडत असतो . कोणी छोटी मुलं जबरदस्तीने झुल्यावर बसवली कि हे "भोकाड " पसरून, शिरा ताणून रडत असतात . सी सा वर मुलं खेळत असली कि जोरात एक बाजू टायर वर आपटून "फट फट " असा आवाज येत असतो . घसरगुंड्या -त्यावर पण एक "सुस्स्स " असा आवाज येतो अ. आणि त्या नळयासारख्या घसरगुंडीवरून कोणी आले की त्या नळ्या वाजतात त्याचाही एक आवाज येतो . तो हि आवाज मला शब्दात पकडता आला नाही . पण तो गडगड आवाज म्हणता येयील .
तिथून पुढे बागेच्या रस्त्याला चढ लागतो , आणि बागेत हिरवळीवर टाळ्या वाजवत बसलेले बरेच असतात . कोणी प्राणायाम करत असतो . त्यांचा नाकाने जोरजोरात श्वास सोडणे चालू असते . फूस फूस असा आवाज त्याचा येत असतो . तिथून पुढे काही जणांनी ओमकारचा नाद लावलेला असतो .
रस्त्यावर चालणारे आता चढाला चालत असतात . मग दमून ते सॉय सॉय आवाज काढत असतात . मधून त्यांचा चपलांचा घासाल्याचा आवाज येत असतो . काहींचा वेग मंदावतो मग संन्त आवाज येत राहतो .
तिथून पुढे एक ओहळ आहे . तिथे एक बाकडे आहे . तिथे त्यावर एखादे जोडपे बसलेले असते . इतक्या हळू आवाजात ते कुजबुजत असतात आणि आपल्याच धुंदीत मग्न असतात . घरात काही बोलायला मिळत नसेल म्हणून इथे येवून त्यांची लाडिक गुफ्तगू चालत असेल .
पुढे पुढे एक धबधबा येतो . त्याचा धबधब आवाज येत असतो . त्यात बरेच कावळे भिजून पंख फडफडवत असतात , त्यांच्या पंखाचा फडफडण्याचा आवाज येत असतो . मधेच काव काव करत असतात . धबधब्याशेजारी बच्चे कंपनी खूप असतात . त्यांचा त्यात उतरण्याचा प्रयत्न असतो . मग मजेत भिजत खळाळणारे पाणी अडवतात आणि फुर्र करून सोडून देतात . तेच पाणी पुढे छोट्या तलावात साठवलेय , तिथेही ही बच्चे कंपनी पण थोडी मोठी (१२ -१३ वर्षाची ) छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यात हे पाणी भरून पुन्हा खाली सोडतात . त्याचा टप टप आवाज येत राहतो आणि पाण्यावर तरंग उमटतात . मध्येच बाहेरून जाणाऱ्या एखाद्या बसचा आवाज येतो , एखद्या स्कूटरचा . धबधब्याच्या थोडे पुढे म्हाताऱ्या बायकांचा एक अड्डा बसलेला असतो ,अगदी कासटा घातलेल्या ह्या आज्ज्या यायाम , सुना , नातवंडे , पोरं , दुखणी भानी ,डाकदर ह्यावर मनसोक्त गप्पा मारत असतात . जवळच खेळणाऱ्या नातवंडावर लक्ष ठेवून असतात . तिथेच जवळ काही दोरीवर उड्या मारणारे असतात . त्याचाही एक वेगळाच आवाज येत असतो . काही सुगावत्या सूर्याकडे पाहून मंत्र पुटपुटत असतात . मधेच चिमणी चिवचिवत असते . अगदी छोटी चिमणीसारखी दिसणारी चीरचीरत असते . मधुनच कोकीळ कुहूकुहू करत असते . मधेच बसायला असणाऱ्या छपराखाली काही हास्य क्लब वाले हाहू हेहे करत उड्या मारत असतात . अजून खूप सारे पक्षांचे आवाज येतात पण ते मला शब्दात बसवताच येत नाहीत .

आता बागेचा राउंड संपतो . बाहेर आल्यावर नारळ वाला खापखाप नारळ फोडून पाणी देत असतो , त्यांचे रेट सांगत असतो. मध्येच एखाद्या लहान मुलाने नारळ मागितलेला असतो. आई बाबा नको म्हणत असतात . मग त्याचे भोकाड पसरलेले असते . पुढे कसले कसले रस विकणारा असतो. तो बाटल्यातून रस ग्लासात ओतत असतो . तो ओतन्याचाही एक आवाज असतोच.

नमकिन's picture

28 Dec 2018 - 8:46 am | नमकिन

फोडणी आवाज व पाठोपाठ शिंकांचा, सकाळी/संध्याकाळी.
बाळ/बाळंतीण ला आंघोळ घालताना कढवलेल्या तेलाचा.
बंब/शेकोटीच्या सरणांचा जळताना.
उंदीर मामा कुरतडत असताना.
कचरा ढकलगाडी चाकाचा. खराट्याने झाडून स्वच्छ करताना चार.
शाळेच्या बस/व्हॅनचा भोंगा.
वरच्या मजल्यावर टेबल, खुर्ची, गॅस सिलिंडर ओढताना.
पोटातली गुरगर.........

नमकिन's picture

28 Dec 2018 - 9:09 am | नमकिन

फोडणी आवाज व पाठोपाठ शिंकांचा, सकाळी/संध्याकाळी.
बाळ/बाळंतीण ला आंघोळ घालताना कढवलेल्या तेलाचा.
बंब/शेकोटीच्या सरणांचा जळताना.
उंदीर मामा कुरतडत असताना.
कचरा ढकलगाडी चाकाचा. खराट्याने झाडून स्वच्छ करताना चार.
शाळेच्या बस/व्हॅनचा भोंगा.
वरच्या मजल्यावर टेबल, खुर्ची, गॅस सिलिंडर ओढताना.
पोटातली गुरगर.........
सर्व बिछान्यावर पहुडलेल्या अवस्थेत असतानाच ऐकू येतात.