बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ५: राजापूर- देवगड (५२ किमी)

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
29 Oct 2018 - 8:08 pm

बघता मानस होते दंग ५: राजापूर- देवगड (५२ किमी)

१० सप्टेंबरची पहाट. आज छोटाच‌ टप्पा आहे- फक्त ५१ किलोमीटर. पण आज माझं‌ स्वप्न पूर्ण होणार असल्यामुळे फारच उत्साह वाटतोय. तसंच सलग चार दिवसांमध्ये मिळून ३५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पूर्ण झाल्यामुळे आजचं अंतर फार कमी वाटतं आहे. अर्थात्, वेळ तर लागेल, पण काहीच अडचण नाही. अगदी औपचारिकताच वाटते आहे. जेव्हा सकाळी निघालो तेव्हा मनात फक्त एंजॉय करण्याचा भाव आहे. उजाडलं तेव्हा निघालो. दूरवर आकाश खूप काळं दिसतंय. पावसाची भितीही वाटून गेली. पण लवकरच कळालं की, ते तर धुकं आहे आणि आता पाऊस पडण्याची शक्यता अगदी कमी आहे. राजापूरवरून निघालो व मुंबई गोवा हायवेवरून बाजूला वळालो! अतिशय सुंदर वर चढणारा रस्ता! आणि थोडं पुढे गेलो तर जणू धुक्याचा समुद्र! आज समुद्र भेटणारच आहे, पण त्याआधी धुक्याचा समुद्र! अद्भुत दृश्य! आणि अतिशय रोमँटीक व जवळजवळ निर्जन रस्ता!

आजच्या टप्प्याचा मॅप बघितला होता, तेव्हा कळालं होतं की, सुरुवातीलाच दोन तीव्र चढ लागणार आहेत. पण हळु हळु आरामात ते चढ चढलो. खूप वेळ धुक्याने सोबत केली. अतिशय स्वप्नवत नजारे आणि मध्ये मध्ये असलेले छोटी गावं! वा! आता त्याबद्दल जास्त वर्णन करणार नाही. फोटोतून त्याची झलक मिळू शकते. आज "त्याची" वाट बघतोय! पण त्याच्या सपाटीपर्यंत पोहचण्यासाठी बरेच चढ व उतार पार करावे लागतील. थोड्याच वेळात सुरुवातीचे दोन छोटे घाट पार झाले. अर्थात् इतक्या सुंदर आसमंतात चढ जाणवलेच नाहीत.


यहाँ कदम कदम पे धरती बदले रंग!

आता हा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधूदुर्ग जिल्ह्यात जाईल. आणि हळु हळु समुद्राच्या दिशेलाही वळेल. ह्या रस्त्यावर एकही मोठं गाव नाही लागणार. सरळ देवगडच मोठं गाव लागेल. मध्ये एका जागी रस्त्यावर लिहिलं आहे- एकच जिद्द रिफायनरी रद्द! नाणार जवळच आहे तर! लोकांमध्ये बराच विरोध दिसतोय. आता ऊन जाणवतंय. तसंच समुद्र जवळ येतोय तसं वातावरणही दमट होणार. त्यामुळे थोडं थकायला झालं. पण वाटेत एकही हॉटेल नाही आलं. एका जागी चौक तर आहे, पण इथेही हॉटेल नाहीय. मग सोबत घेतलेली चिक्कीच खाल्ली.


नाणार गावाजवळ!


दूर विजयदुर्गचा आसमंत!

खूप वेळापासून "त्याची" वाट बघतोय. कधी येईल तो? कधी‌ येणार? आणि आला! उजवीकडे दूरवर एक निळा पट्टा दिसतोय! अंतर दहा- पंधरा किलोमीटर तरी असेल, त्यामुळे नीट फोटो येत नाहीय. आणि जसं पुढे जातोय, तसा दूरवर विजयदुर्गसुद्धा दिसतोय. समुद्राजवळ अगदी दगडांनी बनलेला एक किल्ला! आणि तो असाच तर आहे! तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला! इतक्या दूरवरून विजयदुर्ग बघताना मस्त वाटतंय! जिथे सायकल चालवतोय, तिथून खूप दूरवरचा आसमंत दिसतोय. अचानक वाटलं की, मी इथेही पूर्वी कधी‌तरी आलोय. मी अगदी १० वर्षांचा किंवा त्याहून लहान असताना एकदा विजयदुर्गला आलो तर होतो. पण पुढे इकडे आलो होतो का हे माहित नाही. पण हे दृश्य तर ओळखीचं वाटतंय. असो. इथले रस्ते सायकलीला मस्त आहेत. काही जागी तर अतिशय मस्त आहेत. पण आता हॉटेल शोधतोय. देवगड अजून पंचवीस किलोमीटर असावं, पण मला रिचार्ज करायची गरज आहे. शेवटी कात्रादेवी गावाचा चौरस्ता आला तेव्हा काही हॉटेल दिसले. इथे कात्रादेवीचं मंदीर आहे! मंदिरात गणपतीची गाणी वाजत आहेत! मंदिराजवळच चहा मिळाला. सोबत बिस्कीट व चिप्सही घेतले. चहा पिताना बाजूला मासे घेऊन एक ताई आल्या. त्या मासे विकत असतानाच बाजूला एक मांजर आलं आणि तिने त्यांना अक्षरश: मासा मागितला! आणि त्यांनी तो तिला दिलाही आणि म्हणाल्या, जा राणी ऐश कर. अर्थात् हे कोंकणीत बोलत आहेत. मला ती कोंकणी ऐकायला मस्त वाटतंय! वा!


कात्रादेवी गांव!

समुद्र जवळच आहे आता. इथून एक रस्ता जैतापूरकडे जातो. मी देवगडच्या दिशेला वळालो. वाघोटण नदीवरचा पूल ओलांडला व सिंधूदुर्ग जिल्हा सुरू झाला. इथून नदीचं मुख जवळचं आहे, त्यामुळे ही‌ खरं तर खाडीच आहे. पुढेही एक खाडी मला लागेल. आता पडेल तिठ्याची वाट बघतोय! कारण त्या जागी मी पूर्वी अनेकदा आलोय. म्हणजे माझ्यासाठी एका अर्थाने देवगड तिथूनच सुरू होईल. ओळखीचा परिसर लागेल! पण त्याच्या आधीही नजा-यांची बॅटींग सुरूच आहे. इतका आनंद घेऊन घेऊन थकल्यासारखंच होतंय आता! कोंकणात सायकल चालवताना राहून राहून हिमालयाची याद येता! कारण तसेच सततचे चढ किंवा उतार असलेले रस्ते! आणि तसंच नैसर्गिक सौंदर्य! सगळं‌ स्वप्नवत आहे! खरंच मी देवगडला सायकलवर पोहचतोय?!


खूप वेळाने लागलेला थोडा सपाट रस्ता!

आता अगदी थोडंच अंतर बाकी आहे. देवगडच्या आधी आणखी एक खाडी लागेल- वाडा तर! वाडा गांव् बरंच पसरलेलं आहे. हे माझ्या पूर्वजांचं गाव आहे. लहानपणी‌ जेव्हा इथे आलो होतो, तेव्हा माझ्याच आडनावाचे इतके लोक बघून आश्चर्य वाटलं होतं! आता एक तीव्र चढ लागणार आहे. बहुतेक ब्रिज पार केल्यावर लगेचच. जेव्हा जेव्हा इथे मोटरसायकल आणि कार चालवली आहे, तेव्हा ह्या छोट्या पण तीव्र चढांनी नेहमी त्रास दिला आहे. त्यामुळे मी ह्यावेळी अगदी तयार आहे. पण चढ अपेक्षेपेक्षा उशीरा आला व त्याच्या आधी‌थोडा उतार असल्यामुळे सायकलचा दुसरा गेअर टाकला होता. मनाने तयार असूनही अचानकच तीव्र चढ सुरू झाला. त्यामुळे घाई घाईत पहिला गेअर टाकला व त्यामुळे गेअरवर एकदम ताण पडला. एक क्षण सायकलीची काळजी वाटली. पण काही त्रास नाही. हळु हळु चढ पार केला व जामसंडे गाव सुरू‌ झालं. आता देवगडही आलंच. जामसंडेमध्ये एका दुकानात दुध घेतलं. चक्क मारवाड्याचं दुकान! लोक रोजगारासाठी किती दूरपर्यंत जातात!


वाडा तर!

मी देवगडला ज्यांच्याकडे जातोय, ते नातेवाईक (आत्या) आधी जामसंडेला राहायचे. त्यामुळे हेही तितकंच ओळखीचं आहे. आता माझी आत्या देवगडला राहात नाही, पण जवळच त्यांचं फार्म हाऊस आहे. स्वप्नामध्ये तरंगत जावं तसं तरंगत तरंगत तिथे पोहचलो. इथे पूर्वी खूपच निर्जन भाग होता, आजही रात्री इथे निर्जनच वाटतं. आता तरी बाजूला काही दुकान- गोडाउन झाले आहेत आणि घरी दोन केअरटेकर्सही राहतात. सकाळी साडे अकरा वाजता स्वप्नपूर्ती झाली! सायकलवर देवगडला आलो! आज ५२ किलोमीटर झाले, त्यासाठी सव्वाचार तास लागले. पण नजारे इतके जबरदस्त की अंतर जाणवणार नव्हतंच. आता एका अर्थाने राईड ऑन द रोडबरोबरच राईड डाउन द मेमरी लेनसुद्धा सुरू झाली. माझ्या लहानपणीच्या काही रम्य आठवणी ह्या जागेशी निगडीत आहेत! आत्तापर्यंत निसर्ग सौंदर्यात डुबकी घेत होतो, आता आठवणींच्या प्रवाहात डुबकी घेईन|


माळरानावरचं फार्म हाऊस!


स्वप्नपूर्ती


आजचा लेखाजोखा

पुढील भाग: बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ६: देवगड बीच आणि किल्ला

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रतिक्रिया

नया है वह's picture

30 Oct 2018 - 12:48 pm | नया है वह

+१११

सिरुसेरि's picture

30 Oct 2018 - 6:26 pm | सिरुसेरि

मस्त भटकंती . फोटोही छान .

सायकल पर्यटन कधी केलं नाही पण वाचाया छान वाटलं.
>>आजच्या टप्प्याचा मॅप बघितला होता, तेव्हा कळालं होतं की, सुरुवातीलाच दोन तीव्र चढ लागणार आहेत.>>
- कोणत्या मॅपवर कळतं हे चढउतार?
- रुट ट्रेसिंग कोणत्या अॅपवर केलं? डेटा/रेंज नसतानाही होईल का?

मार्गी's picture

31 Oct 2018 - 11:41 am | मार्गी

अनेक धन्यवाद! :)

कंजूसजी, www.mapmyride.comwww.cycleroute.org साईटवर आपण कोणताही रूट एंटर करून तिथले चढ- उतार व घाट बघू शकतो. तसा रूट नीट बघूनच नियोजन केलं होतं. ते बघण्यासाठी नेट लागतं. पण आपण इमेजेस/ स्क्रीन शॉटस डाउनलोड करून ठेवू शकतो. आणि प्रत्यक्ष राईड स्ट्राव्हा एपवर रेकॉर्ड केली. धन्यवाद.

कंजूस's picture

31 Oct 2018 - 1:04 pm | कंजूस

बघतो ती अॅप, साइट.
धन्यवाद.
पण हे सायकलने जाणे कुठेकुठे राहण्याने खर्चाचे होत असेल ना? स्वस्त आणि चांगल्या लॅाजेसची यादी असते का सायकल_असोसिएशनच्या ग्रुपकडे?

मार्गी's picture

31 Oct 2018 - 3:32 pm | मार्गी

नाही. तसं कधी सायकल असोशिएशनशी संपर्कच आला नाही. नेटवर्कमध्ये मात्र आहे अनेक ग्रूप्सच्या. त्यामुळे त्या रूटवर एखादा सायकलिस्ट असेल तर बाकी माहितीसाठी किंवा लॉज कुठे कसे आहेत, हे कळायला उपयोग होतो. जसे ह्यावेळी साखरप्याला एक सायकलिस्ट भेटले. बाकी आपणच सगळं करायचं. काही अडचण येत नाही. बाजारात आपल्या गरजेचेही लॉज असतातच. शिवाय महाबळेश्वरऐवजी वाईला मुक्काम करायचा. :)

दुर्गविहारी's picture

2 Nov 2018 - 10:41 am | दुर्गविहारी

मस्तच लिहीताय. फोटोतर एकदम कडक आले आहेत. शेवटचा पवनचक्क्यांचा फोटो बघून लहानपणी शाळेमधे केलेली देवगड सहल आठवली. त्यावेळी देवगड किनार्‍यावर जेलीफिश दिसायचे. आता दिसतात का?

मार्गी's picture

2 Nov 2018 - 11:22 am | मार्गी

धन्यवाद! जेलीफिशचं माहित नाही. विचारावं लागेल.

मी_आहे_ना's picture

5 Nov 2018 - 4:53 am | मी_आहे_ना

मार्गीजी , खूपच सुन्दर. खूपच छान अनुभूती आली असेल तुम्हाला. अश्या अनेक मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा!