मराठी दिन २०१८: फारसी मराठी अनुबंध

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
4 Mar 2018 - 9:15 am

आजच्या काळात इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर मोडी वाचन यावे लागते, हे तर सगळ्यांनाच माहित असते. पण लक्षावधी कागदपत्रे आज फारसीतून वाचनाच्या अभावामुळे तशीच पडली आहेत, हे थोड्यानाच ठाऊक आहे. एकेकाळी राजभाषा असलेल्या फारसीतून मराठीत अनेक शब्द शिरले, आज ते कुणाला फारसी वाटणारही नाहीत. आज अगदी घरात असण्याऱ्या वस्तूंची यादी पाहिली तर त्यातले हे सगळे शब्द फारसी आहेत - खुर्ची, मेज, पलंग, तक्त डेग, तबक, समई, शामदान, गुलाबदाणी, अम्बर, जाफरा, ताफा, अत्तर. अश्या या ऐतिहासिक फारसी-मराठी अनुबंधाचा हा धावता आढावा, मराठी दिन २०१८ च्या निमित्ताने.

(टीप: या लेखातील बरीच माहिती मी डॉ. यु म पठाण यांच्या 'फारसी मराठी अनुबंध' आणि प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन यांच्या 'फारसी मराठी कोष' यामधून जशीच्या तशी घेतलेली आहे, त्यामुळे माझे श्रेय इथे फक्त संकलकाचे आहे. मूळ संशोधन डॉ पठाण आणि पटवर्धन यांचे आहे.)

तुर्क,मोगल यांनी इराणवर केलेले आक्रमण,त्यांच्यावर झालेले इराणी संस्कृतीचे संस्कार(फार्सी माषेचा स्वीकार इ.) व त्यांचा भारतात प्रवेश इ. गोष्टी इतिहासात नमूद आहेत. बाराव्या-तेराव्या शतकात त्यांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली व त्याच सुमारास अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या रामदेवराव यादवांवर स्वारी केली, हा इतिहासही प्रसिद्ध आहेच. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा महाराष्ट्राशी निकट संबंध येऊ लागला, मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा फार्सी असल्याने अर्थातच फार्सीचा व मराठीचाही संबंध आला. राज्यकारभारविषयक शिष्ट व्यवहारासाठी फार्सीचा उपयोग होऊ लागला,महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक जीवनही काही अंशी फार्सीमय झाले. मुसलमान राज्यकर्त्याप्रमाणे मराठ्यांनीही इतिहासलेखनास प्रोत्साहन दिले आणि महाराष्ट्रात बखरनवीसांचा, अख्यबारनवीसांचा व पारसनिसांचा एक वर्गच तयार झाला. अगदी एकनाथ महाराजही त्यातून सुटलेले दिसत नाहीत. खालच्या एकनाथी भारुडातले फारसी शब्द पहा:

अर्जदास्त अर्जदार, बंदगी बंदेनवाज, अलेक सलाम साहेबांचे सेवेशी ।
बेंदे शरीराकार जिवाजी शेखदार बुधाजी कारकून परगणे शरीराबाद किल्ले कायापुरी ||

विशेष म्हणजे तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जसा मध्ययुगीन मराठी साहित्याला अरबी-फार्सीचा फ़ारसा स्पर्श होत नाही, तसाच मराठवाड्यातील मराठी भाषेलाही होत नाही. विसाव्या क्रमांकाच्या हातनूरच्या शिलालेखापर्यंतच्या (काल: शके १२२३/ इ.स. १३०१) सर्व शिलालेखांत एकाही अरबी-फार्सी शब्दाचा वापर केला गेल्याचे आढळत नाही, ही मोठी आश्चर्याची बाब होय. ज्ञानेश्वरीत व यादवकालीन महानुभावीय साहित्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके का होईना फार्सी शब्द आढळतात, पण तसे येथे होत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. शके १३२० (इ.स. १३९८) मध्ये सुलतान फेरोजशहाचा या लेखांना स्पर्श होतो पण हे चौदाव्या शतकापर्यंतचे शिलालेख स्वत्वाचे एवढे अभिमानी की 'सुरतान 'व 'पेरोजसाहा 'या दोन फार्सी शब्दाव्यातिरिक्त ते कोणत्याही परकीय शब्दाचा स्वीकार करीत नाहीत. त्यानंतर मात्र फार्सी ही बहमनी राज्यकर्त्यांची राज्यकारभाराची भाषा झाल्याने आपोआपच लोकव्यहारातील मराठी भाषेवर अरबी - फार्सीचा प्रभाव पडणे अपरिहार्य होते. त्यामुळे उत्तरोत्तर मराठीत अरबी - फार्सी शब्दांचा आढळ होतो.

बहमनी,शिवकाल व पेशवेकाल यांतील फार्सी - मराठी अनुबंधाचे स्वरूप पाहता त्यात अनेक स्थित्यंतरे झाल्याचे आढळते. बहमनीकालात फार्सीची मराठीशी विलक्षण जवळीक निर्माण झाली पण तिचे रूपान्तर सावटात होऊ नये अशी चिन्ताही शिवकालात वाटू लागली. राज्यव्यवहारकोशाच्या निर्मितीमुळे मराठीच्या अस्मितेच्या रक्षणाचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला खरा पण पुन्हा पेशवेकालात उत्तर भारताशी व मोगल राजवटीशी संपर्क येऊ लागल्याने फार्सी - मराठीचे संबंध अधिक व्यापक व घनिष्ट झाले.मराठी माणसाच्या जीवनव्यवहाराशी,वाड्मयव्यवहाराशी ,भाषिक व शासकीय व्यवहाराशी असलेला फार्सी भाषेचा हा संबंध उत्तरोत्तर वाढत वाढतच गेला. अव्वल इंग्रजीत व इंग्रजी अमदांनीत,मुसलमानांची राजवट नसतानाही तो टिकून राहिला. एवढेच नव्हे तर इंग्रज हा देश सोडून गेल्यावरही गेले अर्ध शतक हा अनुबंध टिकूनच राहिला.

व्यक्तिनाम हे विशेषनाम असते पण आडनाव हे सामान्यनाम असते. आडनावाचा त्या त्या घराण्याशी संबंध येतो, त्यामुळे फार्सी शब्दयुक्त आडनावांचा मराठी माणसाने केलेला स्वीकार ही त्याच्या जीवनव्यवस्थेतील महत्त्वाची घटना होय, इस्लामी राजवट जाऊन काही शतके लोटली तरी ही आडनावे तशीच कायम आहेत त्यावरून हा प्रभाव किती दूरगामी होता,ते कळते. फार्सी शब्दयुक्त विशेषनामांप्रमाणेच यादवोत्तर कालात महाराष्ट्रात फार्सी शब्दयुक्त हुद्दे रूढ झाले व त्यांचेच पुढे आडनावात रूपान्तर झाले. त्याविषयी व पित्याचे नाव लिहिण्यापूर्वी मुस्लिम पध्दतीप्रमाणे बिन/ विश्न (चा पुत्र) हा अरबी शब्द लावला जाई, त्याविषयीही इतिहासकार वि का राजवाडे यांनी या शब्दांत खंत व्यक्त केली आहे - 'सौदागर, मुश्रीफ,सराफ,चिटणीस,फडणीस पोतनीस ,हेजीबराव,दिवाण,वाकनीस ,वफ्तरदार, वगैरे फारशी आडनावेहि मराठीत रूढ झाली, 'बिन्' ह्या फारशी शब्दानें पिता पुत्रांचा संबंध दाखविण्यापर्यंत ज्या देशातील भटाभिक्षुकांचीही मजल गेली जाऊन पोहोचली, त्या देशांतील भाषेच्या भ्रष्टपणाबद्दल जास्त काय लिंहायचे?'

ही आडनावे किंवा हुद्दा / व्यवसाय दर्शविणारे फार्सी शब्द मुसलमानपूर्व महाराष्ट्रात मुळीच प्रचारात नव्हते, हे मत श्री.वा.कृ.भावे यांनी सप्रमाण नोंदविले आहे.मराठी बखरींत आढळलेली फार्सी शब्दयुक्त आडनावे देत आहे, त्यांतील बरीच आडनावे आजही रूढ असल्याचे दिसून येईल. बखरींतील या आडनावांची संख्याच साठपेक्षा अधिक आहे, त्यावरून हा प्रभाय किती मोठा होता तेही कळेल.

अंकबरनीस (फा. अख्बार नवीस्‌ - बातमीपत्र पाठविणारा)
अमीन (अ. अमीन्‌ = विश्वस्त )'
कानगौ (फा. कानून्गो = वहिषाटीची नोंद ठेवणारा)
कारखानीस (फा. कार्निह-नवीस्‌ कारकून)
कारभारी (फा. कार्बारी नव्यवस्थापक,दिवाण)
*कासीद (फा. कासिंद्‌ = पत्रे पोहोचविणारा दूत)
*किल्लेदार (फा. कलअह -दार्‌ = दुर्गाधिपती, किल्लेकरी)
*कोतवाल (फा.कोत्वाल्‌ किल्लेदार, दारोगा)
खासगीवाले (फा. खासगी, राजाच्या खासगीचा अधिकारी)
खासनीस (फा. खास - नवीस्‌ )
चिटणीस (फा. नवीस ) = पत्रव्यवहार करणारा
*जकाते (अ. ज़ुकात्‌ ) च जकात वसूल करणारा,
*जमादार (फा. टोळीचा / तुकडीचा नायक)
*जहागिरदार (फा. जागीर दार )
ठाणेदार (फा. दार )
*डबीर (फा. दबीर्‌ = लेखक,कारकून,चिटणीस)
*तबीब (अ. तबीब्‌ > वैद्य)
*तोफखाने (तुं. लोप्‌ 4- फा. खानह्‌ )तोफखानेवाला
*दप्तरवार (फा. दफ्लर्‌ दार्‌ कागदपत्रांची काळजी घेणारा अधिकारी)
दफेदार (फा. दफूअदार्‌ रिसाल्यातला लहान, अधिकारी)
*दारुवाला (पारशी जमातीत)(फा. दारू = मद्य)
*दिवाण (फा. दीवान्‌ = प्रधान)
*दिवाणजी (तु. दीवान्‌ ची = प्रधान)
नालबंद (फा. नअलबंद = नाल छोकणारा)
*पागनीस (फा. पाय्‌गाह नवीस्‌ रिसाल्याकडील कारकून )
*पागे (फा.पायूगाह = रिसाल्याचा अधिकारी )
पागेदार (फा. पायूगाह दार्‌ )
*पारसनीस (फा. फार्सीनवीस्‌ = फार्सी पत्रव्यवहार करणारा)
*पेशवे (फा.पेश्वा = पुढारी पंतप्रधान)
पोतदार (फा. पोतहदार्‌ = नाणेपारखी )
*फडणीस (अ. फर्द. = एकेरी पत्र,नवीस्‌ लिहिणारा )
*फरास (अ. फर्राश = बिछावत घालणारा)
बक्षी (फा. बख्शी = सैन्यात पगार वाटणारा)
*बारगीर (फा. बार्गीर्‌ = धन्याने दिलेला घोडा ठेवणारा शिपाई )
*बिनवाला/ली (फा. बीनी = सैन्याची आघाडी)
बेलदार (फा. बेलदार = खणत्या)
*म॒ (मु) जुमदार (फा, मजुमूअदार्‌ = बसुली कारकून)
*महाले (अ. महल) = महालाचा रक्षक?
"मिराशी (अ. मीशस्‌ ) = मिराशीचा उपभोग घेणारा
*मिरासदार (फा. मीरासीवार्‌)
मिर्धा / धे (फा. दहा शिपायांचा नाईक)
*मोकाशी (मुक्रासा)
*रास्ते (फा.रास्त्‌ )
*वाक(के)नीस (फा. वाकिअ नवीस्‌ = अखबार नवीस्‌ )
*शिकिलकर (फा. सैकल्गर्‌ = हत्यारे साफसूफ करून पाणी देणारा )
*शिलेदार (फा. सिलह्दार्‌ = सैन्यातील राऊत)
शेखदार (अ. शेख , फा. दार्‌ )
*सबनीस (फा. स॒फूनवीस्‌ र्‌ सैन्यातील तुकड्यांतील सैनिकांची गणती करणारा )
*सरदार (फा. सरदार : बडा अधिकारी, मनसबदार)
सरंजामी (फा. सरंजामी)
*सरंजामे
*सराफ (अ. सर्राफ़ : सोनेचांदीचा व्यापारी)
*सुभेदार (फा, सूबद्ददार्‌ प्रान्ताधिकारी)
हकीम, हकीमजी (अ, हाकिम्‌ = आज्ञा देणारा अधिकारी)
*हजारी, हजारे (फा. हजारी, हजार सैनिक बाळगण्याची मनसब असलेला)
हरीप, हरीफ (अ. हरीफू) '
*हशमनीम, हसबनीस (फा. हशम्‌नवीस्‌ = हशमाकडील कारकून)
*हधालदार (फा. हवालत्‌ - वार्‌)
*हेजीब (अ. हाजिंब्‌ = वकील)

मुळातले हुद्दे (व्यवसाय व त्यांचे स्वरूप लक्षात यावे, यासाठी येथे मूळ शब्द व त्यांचे डॉ.पटवर्धन यांनी दिलेले अर्थ वरील यादीत नौंदविले आहेत.

*या खुणेने दर्शविलेली आडनावे आजही महाराष्ट्रात प्रचलित आहेत, याशिवाय गुमास्ते (फा.गुमाश्‍तह),दासताने (फा. दास्तान ), पेशकार (फा.पैश्‌ कार),शिकारखाने (फा. शिकार्‌ गानद्),वकील॑ (अ. वकील) अशी कितीतरी आडनावेही आढळतात.

फार्शी लेखक पर्यायवाचक शब्दांचे विशेष चाहते; त्यामुळें कांही शब्दांना प्रतिशब्द अनेक आहेत, ऐक्य व सख्य यास आश्‍नाई, इख्लास, इतलाखी, इंतफाक,
इतह्मद, इरतिंबात, इस्तियाक, एक-दिली, एक-रछ्टगी, एकी, खला-मला, ससूसीयत, तस्फिया, दिल्जमाई, दोस्ती, वसालत, मुस्ताकी, यगानगत वगेरे १८ वर प्रतिशब्द आहेत. वैर-भाण्डण या अर्थी अकस, कर्कैशा, कजिया, किलाफ, खळश, खिसा, जिकीर, जुदाई, दावा, दुस्मनगी, दुही, निफाक, पुर्कश, बर्कशी, असे १४ वर शब्द आहेत. प्रतिष्ठा याअर्थी अज, अस्करा, आब, आबताब, इज्जत, तम्मा, नक्श, नछग, नामोश, वकर, शोहरत, हुर्मत वगैरे १२ वर शब्द आहेत. कौटिल्य या अर्थी कंवाईत, केंद्‌, दुगा, फन्द, फरेब, मकर, हुन्नर, हरिफी, हिक्मत, वगेरे ९ वर शब्द आहेत. संशय या अर्थी अन्देशा, गर्द, गुबार, गुमान, दग्दगा, वस्वास, वहीम, शुक, शूभ वगेरे ९ वर शुब्द आहेत. समाधान या अर्थी खातर, खातरजमा, खातदारी, खातर्दास्त, तक्‍वा, तमानीयत, तशफ्फी, तसली, दिल्दारी, दिल्भरी, दिलासा वगेरे ११ वर शब्द आहेत. पीडा या अर्थी आजार, कसाला, जूबरी, जळाल, जाजती; जुळूम, तश्‍वीस, ताशसि वगैरे शब्द आहेत. शिक्षा या अर्थी तस्बी, नातिजा, नश्यत, शास्त, सजा असे पांच शब्द आहेत. परिश्रम या अर्थी कस्त, कोशीस, मशायत, मेहनत, शिकस्त, सई असे शब्द आहेत. चाल-रिवाज या अर्थी तऱ्हा, तरिका, दस्तूर, पाय-रव, मामूल, रव, रस्म, रवेश, रहा, रिवाज, शिरस्ता, सुदामत असे १२ शब्द आहेत. फार्शीनें मराठींत पर्यायवाचक शब्दांची भर किती आणि कशी केली आहे हें कळायला वरील विवेचन पुरे आहे.
.
.
1

संस्कृतीइतिहासभाषाआस्वादमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

पैसा's picture

4 Mar 2018 - 10:29 am | पैसा

माहितीपूर्ण आणि मनोरंजक! इतकी आडनावे फारसी उगम असलेली आहेत हे माहित नव्हते.

भीडस्त's picture

4 Mar 2018 - 4:28 pm | भीडस्त

मराठीपेक्षाही अधिक मराठी झालेत हे सगळे शब्द

लेख फार आवडला . पठाणांचे पुस्तक अप्रतिम आहे. फार पुर्वी लोकमत मध्ये एक छोटेखानी सदर येत असे त्यात ते एक एक शब्दाचा संबंध जोडुन दाखवत असत.
हे असे शोधुन काढणे मोठे मनोरंजक आहे. म्हणजे बघा वरील

*बिनवाला/ली (फा. बीनी = सैन्याची आघाडी) आणि *शिलेदार (फा. सिलह्दार्‌ = सैन्यातील राऊत) हे दोन स्वतंत्र शब्द आहेत याचवरुन बनलेला मराठीत एक खास शब्द वापरला जातो " बिनीचे शिलेदार "

*फरास (अ. फर्राश = बिछावत घालणारा) पुण्यात एक पोलीस चौकी आहे " फरासखाना" नावाने म्हणजे हे पुर्वी काय असणार इथे ?
तसेच

*फडणीस (अ. फर्द. = एकेरी पत्र,नवीस्‌ लिहिणारा )
नाना फडणवीस म्हणजे एक आग्रह मी बघितलाय नाना फडणीस नव्हे नाना फडणवीस व पाहीजे हा आग्रह काहीशा शुद्धतेच्या आग्रही अभिनिवेशाने धरला जातो.
तेव्हा त्याच्या शब्दाचा मुळांविषयी अनभिज्ञता हे कदाचित एक कारण असावे. म्हणजे मुळ तर फारसी आहे मात्र आमचे व्हर्जन असे असेच असावे या प्युरीटनीस्ट आग्रहाची मौज वाटते.

याच पुस्तकात एक शब्द दिलेला आहे "रिसाला" याचे रुट रिसालह = घोडदळाची तुकडी असे दिलेले आहे. मराठवाड्यातील जालना शहरात दर रंगपंचमीच्या दिवशी राजा ची रिसाला मिरवणुक निघण्याची परंपरा आहे. म्हणजे राजा बहुधा कधी काळी घोडदळाच्या तुकडी सहीत निघत असावा त्याला तेथे " रिसाला " मिरवणुक असेच म्हटले जाते. तो राजा पुढे गेला की मग रंग खेळणे बंद होते अशी गाव परंपरा आहे.

गालिबच्या फारशी गझला जर देवनागरीत मिळाल्या तर या दोन ग्रंथाची मदत घेऊन आपल्याला नक्कीच काही प्रमाणात अर्थ शोधता येइल .
पण सबसे बडी दिक्कत ही आहे की मला देवनागरीत गालिब ची फारसी शायरी कुठे सापडली नाहे.

देवनागरी कशाला, मूळ स्वरूपात वाचता येईल की. फार अवघड नाहीये.

हे एक पुस्तक आहे - चित्रे पाहून शब्द शिका, सोपे ani मजेदार आहे
http://ncertbooks.prashanthellina.com/class_1.Urdu.IbtadayeUrdu/all_in_one1.पडफ

दुसरा सोपा उपाय - फारसी शब्द कॉपी करून ईथे पेस्ट करा. हि साईट तुम्हाला ती गझल वाचून दाखवेल.
http://farsireader.com/webdemoen/

(शेवटचे वाक्य त्यांची जाहिरात आहे - आपण टाकलेला मजकूर नाही )

मारवा's picture

4 Mar 2018 - 7:37 pm | मारवा

*शिकिलकर (फा. सैकल्गर्‌ = हत्यारे साफसूफ करून पाणी देणारा

"शिकलकरी" या नावाने ओळखला जाणारा समाज माहीतीत आहे. हे साधारण शिख लोकांसारखे डोक्यावर फेटा बांधतात.
पण हा मुळ शब्द आणि यांचा असा संबंध माहीत नव्हता.

अजुन एक प्रश्न असा पडतो की कारखानीस चिटणीस मुजुमदार फडणीस पोतनीस टिपणीस अशी बरीच नावे " चांद्रसेनीय कायस्थ प्रभु" ची आडनावे आहेत
या समाजाचा सामाजिक इतिहास हा या व्यवसायाच्या नोकरीच्या अंगाने पडताळता येइल का ? म्हणजे मुघलांच्या सेवेत या समाजाचे प्रमाण अधिक असावे का ? कशा स्वरुपाचे असावे ? की आडनावे इथेच या समाजात उचलली गेली इतर समाजातही असे नोकरी करणारे असतीलच पण आडनावे नसतील लावली कदाचित

त्याविषयी व पित्याचे नाव लिहिण्यापूर्वी मुस्लिम पध्दतीप्रमाणे बिन/ विश्न (चा पुत्र) हा अरबी शब्द लावला जाई,

बिन्' ह्या फारशी शब्दानें पिता पुत्रांचा संबंध दाखविण्यापर्यंत ज्या देशातील भटाभिक्षुकांचीही मजल गेली जाऊन पोहोचली, त्या देशांतील भाषेच्या भ्रष्टपणाबद्दल जास्त काय लिंहायचे?'

ओसामा बिन लादेन

असे आहे होय

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2018 - 2:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

होय ! अरबीत संपूर्ण नाव लिहिण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे...

(व्यक्तीचे नाव) बिन / बिन्त* (वडिलांचे नाव) बिन (आजोबांचे नाव) अल् (घराण्याचे/ट्राईबचे नाव)

* बिन = चा मुलगा आणि बिन्त = ची मुलगी.

सुधीर कांदळकर's picture

4 Mar 2018 - 8:11 pm | सुधीर कांदळकर

आता अशा आडनावाच्या मित्रांना परकीय म्हणून चिडवायला हरकत नाही.

लेख आवडला हे वेगळे सानल

गामा पैलवान's picture

4 Mar 2018 - 8:16 pm | गामा पैलवान

मनो,

रोचक संकलन आहे. त्याबद्दल धन्यवाद.

एक अस्सल मराठी (?) शब्द आहे शिपाई. सिपाही हा मूळ फारसी शब्द आहे. त्यावरून मराठीत शिपाई आला. चपराशी व शिफारस हे देखील मराठीत रुळलेले मूळचे फारसी शब्द आहेत.

शेवटी त्या सुप्रसिद्ध मराठी वाक्याची आठवण होतेच : शाब्बास तुमच्या रुस्तुमीची, दिलेरीची आणि सफेजंगीची.

आ.न.,
-गा.पै.

तेजस आठवले's picture

4 Mar 2018 - 10:38 pm | तेजस आठवले

फारच माहितीपूर्ण लेख. खरंच असे काही असू शकेल असे माहिती नव्हते. अमीन आडनाव ब्राह्मणात पाहिलेले आहे. खासगीवाले पण. त्यांचा उगम असा असेल असे वाटले नव्हते. दहावीला माझ्या बरोबर एक शेरखाने आडनावाचा मुलगा होता.

प्रचेतस's picture

5 Mar 2018 - 9:08 am | प्रचेतस

उत्कृष्ट

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2018 - 1:24 pm | चौथा कोनाडा

माहितीपूर्ण आणि मनोरंजक!
इतके शब्द फारसी उगम असलेली आहेत हे जाणून थक्क व्हायला झाले !

माझ्या एका परिचिताचे आडनांव खवीसखान असे होते. याचा काय उगम असावा ?

खटपट्या's picture

26 Sep 2018 - 2:19 pm | खटपट्या

नेहमीप्रमाणे रोचक माहीती...

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2018 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच फार रोचक, रंजक आणि माहितीपूर्ण लेख !

"मराठीमध्ये हल्ली हल्ली (खरंच ?) फारच परकिय शब्द घुसत आहेत", अशी फार काळजी वाटत असलेल्यांनी जरूर वाचावा असा लेख आहे हा. :)

राही's picture

28 Sep 2018 - 7:16 am | राही

असेच.
Bdw, ' हल्ली' चे मूळ 'हाल ही मे' या उर्दू/ हिंदी आणि पर्यायाने पारसी/अरबी भाषेत असावे का? तसेही ' सद्यस्थिती कशी आहे, किंवा कसे आहात ' या अर्थी काय हालहवाल असे आपण म्हणतोच.

गामा पैलवान's picture

27 Sep 2018 - 6:14 pm | गामा पैलवान

लेखात कौटिल्य च्या जागी कौशल्य अभिप्रेत आहे बहुतेक.

-गा.पै.

समर्पक's picture

27 Sep 2018 - 9:50 pm | समर्पक

*दारुवाला (पारशी जमातीत)(फा. दारू = मद्य)

दारू म्हणजे औषध... आजही इराणी प्रभावळीच्या प्रदेशात औषधालयास 'दारूखाने' असेच म्हणतात.

राही's picture

28 Sep 2018 - 7:09 am | राही

सुंदर लेख.

कंजूस's picture

28 Sep 2018 - 10:09 am | कंजूस

,छान!
ढालगज, बिनिवाले?

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2018 - 12:52 pm | चौथा कोनाडा

'ढालगज-भवानी' हा शब्द अनेक वेळा 'भोचक' वा 'पुढे पुढे मिरविणारी अशा अर्थाने वापरला जातो. मात्र या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तर जिला उद्देशून हा शब्द वापरला गेला तिला ते अभिमानास्पद वाटेल.

ढाल म्हणजे कवच, संरक्षक आवरण.

गज म्हणजे हत्ती.

भवानी म्हणजे आरंभ, आघाडी, कार्याला सुरुवात.

पूर्वीच्या काळी शत्रूच्या किल्ल्याला वेढा घातला जात असे. अनेक दिवस वेढा चालवूनही शत्रू शरण येत नाही म्हणताना निकराचा हल्ला म्हणजे 'सुलतानढवा' किंवा 'एल्गार' केला जात असे - म्हणजे सर्व शक्तिनीशी किल्ल्याचा दरवाजा भेदून आत शिरायचा प्रयत्न.

यासाठी मदमस्त हत्तींना मस्तकावर कवच चढवून किल्ल्याच्या दारावर मुसंडी मारायला लावले जात असे. प्रचंड ताकदीच्या हत्तीने दिलेल्या धडकांनी दरवाजा कोलमडून अखेर किल्ल्यात प्रवेश शक्य होत असे. यात मजबूत दरवाज्यावर लावलेल्या अणकुचीदार खिळ्यांची पर्वा न करता स्वामीच्या आज्ञेनुसार धडका देणार्‍या हत्तीची भूमिका सर्वात महत्त्वाची.

तेंव्हा ढालगजभवानी म्हणजे परिणामांची तमा न बाळगता, अडचणींची पर्वा न करता ध्येयाप्रत पोचण्यासाठी पुढे सरसावलेली पराक्रमी स्त्री असा आहे.
- सर्वसाक्षी

हा मनोगत संस्थळावर सापडलेला सर्वसाक्षी यांचा प्रतिसाद

डॉक्टर सुहास म्हात्रे,

"मराठीमध्ये हल्ली हल्ली (खरंच ?) फारच परकिय शब्द घुसत आहेत", अशी फार काळजी वाटत असलेल्यांनी जरूर वाचावा असा लेख आहे हा. :)

तुमचं म्हणणं गंमतीनं घेतोय. पण थोडा खोलवर विचार केला तर लेखातलं हे वाक्य रोचक वाटलं :

तुर्क,मोगल यांनी इराणवर केलेले आक्रमण,त्यांच्यावर झालेले इराणी संस्कृतीचे संस्कार(फार्सी माषेचा स्वीकार इ.) व त्यांचा भारतात प्रवेश इ. गोष्टी इतिहासात नमूद आहेत.

याचा अर्थ असा की पर्शियन लोकांनी/राजांनी भारतावर कधीच आक्रमण केलं नाही (अपवाद फक्त नादिरशहा). भारतात फारसी भाषेचा प्रचार व प्रसार झाला तो तुर्क व मंगोल्यांमुळे. त्यांच्या स्वत:च्या भाषेत राज्यकारभाराविषयी काहीच माहिती नव्हती. युद्ध जिंकणं वेगळं आणि जिंकलेल्या प्रदेशाच्या राज्यकारभाराची घडी बसवणं वेगळं.

तर मग मराठीतले फारसी शब्द हे तुर्क व मंगोल्यांचं भाषादारिद्र्यच दर्शवीत नाही काय? अर्थात, मराठीत राजनीतीसाठी प्रतिशब्द उत्पन्न करायला हवेतंच. किंबहुना शिवाजीमहाराजांनी ते तसे केलेही आहेत. फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की मराठीतले फारसी शब्द हे एका वेगळ्या तथ्याकडेही अंगुलीनिर्देश करतात. त्यामुळे मराठीच्या शुद्धतेचा आग्रह हा मराठीचं अंगभूत सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी असावा.

आ.न.,
-गा.पै.